-
आदरांजली
निसर्गाचा निरपेक्ष नातेवाईकः मारुती चितमपल्लीज्येष्ठ साहित्यिक, वनमहर्षी, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे १८ जून २०२५ला निधन झाले. निरंतर हिरवाईचा अक्षर अवकाश झाकोळला. एक सृजन थांबले. अरण्यपुत्राला आपल्या कुशीत घ्यायला भूमी मृदु झाली. चितमपल्ली गेल्याने नेमके काय झाले? तर, वनसंशोधनाच्या दिशा ओस झाल्या. गेली सत्तर वर्षे जंगलांशी तद्रूप झालेले माणूसपण माणसांच्या जगातून हरपले...मारुती चितमपल्ली यांच्याशी माझा उण्यापुऱ्या चाळीस वर्षांचा ऋणानुबंध होता. त्याची रुजुवात १९८०मध्ये नागपुरात झाली. त्यावेळी मी ‘तरुण भारत’मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झालो होतो. पण तत्पूर्वी १९७५मध्ये ते नवेगावबांधला उपविभागीय वनाधिकारी म्हणून बदलीवर आले होते. ८२ साली त्यांची नागपूर वन कार्यालयात बदली झाली. मग भेटीगाठी वाढल्या. ‘पक्षी जाय दिगंतरा’ हे त्यांचे पहिले पुस्तक १९८३मध्ये प्रकाशित झाले. त्यावर परिचयात्मक लिहिले होते. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात वयाच्या नव्वदीत २०२० मध्ये ते सोलापुरात स्थायिक झाले, तेव्हाही योगायोगाने मी तिथे होतो. आकाशवाणीत साहाय्यक संचालक होतो. २०२१मध्ये निवृत्त झाल्यानंतर काही काळ तिथेच वास्तव्याला होतो. त्या चार वर्षात चितमपल्ली यांच्याशी वारंवार भेटी, चर्चा घडल्या डल्या त्या माझ्या, त्यांच्या साहित्यावरील पीएच.डी. च्या निमित्ताने.
नव्वदी पार केल्यावरही चितमपल्ली यांची स्मृती ताजी होती. दिनचर्या वनानुकूल होती. योग, ध्यानधारणा, शाकाहारी मिताहार आणि पुरेशा विश्रांतीचे तास सोडले, तर ते अखंड वाचन, संशोधन आणि लेखनातच व्यग्र असत. वनखात्यातील नोकरीमुळे सुमारे तीन दशकांहून अधिक काळ त्यांना महाराष्ट्राच्या विविध वनांमध्ये वास्तव्य करता आले. शासकीय सेवेतील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण करतानाच ते आपल्या छंदाचे ध्यासात आणि ध्यासाचे अभ्यासात रूपांतर करू शकले. चितमपल्ली यांची ज्ञानलालसा, ज्ञान मिळविण्यासाठी कष्टांची तयारी विलक्षण होती. संशोधनाच्या ध्यासाला समर्पित आयुष्य होते त्यांचे.
मारुती चितमपल्ली यांच्या समग्र लेखनावर दृष्टिक्षेप टाकला, तर त्यात विलोभनीय वैविध्य आढळते. हे लेखन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. शास्त्र आणि अनुभवावर आधारित, माहितीपर लेखन, अनुवादित लेखन, समृद्ध वनविश्वाचा ललितरम्य आविष्कार, वन्य लोकजीवनाचा कथात्म आविष्कार, व्यक्तिचित्रे, आत्मचरित्र, कोशवाङ्मय अशा विविध क्षेत्रांत चितमपल्ली कायम लिहित राहिले आणि साहित्यात मोलाची भर घालत राहिले.
ध्यासाचा पैस
चितमपल्ली यांच्या लेखनाला साधनेची बैठक आणि ध्यासाचा पैस होता. मुंगीपासून हत्तीपर्यंत, टिटवीपासून गरुडापर्यंत आणि गवतापासून महाकाय वृक्षापर्यंत शेकडो, हजारो प्राणी, पक्षी आणि वनस्पती त्यांचा अभ्यासविषय नि लेखनविषय झाले. त्यांच्या लेखनाला अनुभव, अनुभूती, निरीक्षण आणि अभ्यासाचा भक्कम आधार राहिला. आपल्याला गवसले ते पारखून घेऊन इतरांना सांगण्याची त्यांना विलक्षण ओढ असे. त्यांच्या लेखनातील आणि ग्रंथनिर्मितीतील सातत्य बघितले, तरी त्यावरून आपल्याला याची कल्पना येते.
वनविभागातील सेवेत रुजू झाल्यापासूनच चितमपल्ली यांनी निरीक्षणं, नोंदी, टिपणं याची सवय स्वतःला लावून घेतली. जंगलांमध्ये फिरताना नेहमी त्यांच्या खिशात छोटी डायरी आणि पेन असायचे. बरेचदा ते जंगलात अनुभवलेले तिथेच लगेच टिपून ठेवत. कधी ते शक्य होत नसे. अर्थात, त्यांचे स्मरणही लख्ख होते, त्यामुळे जंगलातून परतल्यानंतरसुद्धा ते लिहून काढत. काहीशा गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे अशा जंगल अनुभवांचे कथन ते मित्र मंडळीत बरेचदा करायचे. या अनुभवकथनामुळे लिहिण्याला चालना मिळाली आणि बळही.
निसर्गाशी एकरूप झालेल्या मारुती चितमपल्लींची भेट होणे ही केवळ एका व्यक्तीची भेट होणे नव्हते, तर एका ज्ञानकोशाची भेट होणे होते.‘पक्षी जाय दिगंतरा’ या पहिल्याच पुस्तकात स्वाभाविकपणे चितमपल्ली यांनी प्रामुख्याने इंग्रजी आणि जगभरातील इतर भाषांमधील प्रख्यात लेखकांनी वन्यजीव आणि निसर्गाविषयी केलेले ललितलेखन, कथालेखन यांचेच मराठीत रूपांतर केले आहे. ते करताना त्यांनी पुरेसे स्वातंत्र्यही घेतले आहे. मोपासाँ, पर्ल बक, जपानी लेखक याशुनारा कावाबाटा, रशियन लेखक कोन्स्तान्तीन, पेनोव्हस्की, चिनी लेखक लियु त्सुंग युएन या सर्वांच्या कथांचे स्वैर अनुवाद त्यांनी अतिशय कौशल्याने केले आहेत.
१९८५ साली प्रकाशित झालेले त्यांचे ‘जंगलाचं देणं’ हे पुस्तक म्हणजे पशुपक्षी, वनस्पती आदी समृद्ध नैसर्गिक खजिन्याची चितमपल्लींनी केलेली अक्षरलूट आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. यातील जंगल आणि जंगलातील विश्व अद्भुत आहे. जंगलांचे प्रदेश आणि प्रकारही कितीतरी. त्या त्या प्रदेशातील भौगोलिक हवामानानुसार तेथील वृक्ष, वनस्पती आणि पक्षी, प्राणी यांचे स्तिमित करणारे वैभव चित्तमपल्ली आपल्या चित्रदर्शी शैलीतून हुबेहूब साकारतात. दिवेआगर नजीकच्या खाजणीच्या जंगलात आढळणारे झाडावर चढणारे मासे म्हणजे तेलमुंडे किंवा डेमके, उदाचे घबाड म्हणजे उदमांजराचे घर, समुद्रविंचवांची घरे हे सारे धर्मा कोळीच्या मदतीने अनुभवी नजरेतून त्यांनी पाहिले आणि सर्वांना सांगितले. त्या जंगलातले मोहाचे रान, मोहाच्या झाडाच्या पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालणारी अडई व वणकी रानबदक, मोहफळांच्या आवडीने त्या झाडांवर उतरणारे टोई पोपटांचे लक्ष थवे हे सारे जंगलाचे देणे. चिंच, पळस, देवदार, निंबोणी असे भिन्न भिन्न प्रांतातले वृक्ष आपल्याला नावानिशी माहीत असले, तरी त्यांच्याविषयी आपल्याला सखोल काहीच माहिती नसते. निरीक्षण, अभ्यास, अनुभवातून अशी माहिती या पुस्तकात मिळते. रातवा या संग्रहातील ‘रातकिड्यांचे संगीत’ या लेखात त्यांनी विस्ताराने सांगितलेला रातकिड्यांच्या किरकिरी मागच्या संदर्भाचा, रहस्याचा अनुभव हा मुळातून वाचण्याजोगा आहे. त्यासाठी त्यांनी संध्याकाळपासून पहाटेपर्यंत जंगलातच मुक्काम ठोकून केलेली निरीक्षणं स्तिमित करतात.
काही विशिष्ट पक्षी आणि प्राणी यांच्या विलक्षण सवयींचा अभ्यास करताना ते वेदपुराणांमधील अनेक संदर्भाचा शोध घेतात आणि महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवतात. त्यातूनच, वाघ हा ओंकाराचा जनक, घुबडाने सातबहिणी पक्ष्यांवर केलेला संमोहन प्रयोग, वाघ-बिबट्या यांच्या जंगलातील वास्तव्याची भयसूचक आवाजाने अचूक सूचना देणारा मोर, सुसरी, कासव आणि उत्तर ध्रुवावरील पांढरे अस्वल यांची प्राणायामाद्वारे अनेक महिने निराहार राहण्याची कला, सापाचे कात टाकणे हा कायाकल्पाचाच भाग, पर्जन्यवृक्ष, काजवे, हठयोगी बेडूक आणि त्यांचा सूर्यकिरणांचा आहार अशी चकित करणारी माहिती ते देतात आणि त्यासाठी भक्कम पुरावे आणि आधार सुद्धा सादर करतात.
संदर्भबहुल लेखनसंसार
अनेक पौराणिक अनुबंध, धर्म, संस्कृती आणि अध्यात्म, सामाजिक शास्त्रे, लोकजीवन, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण अशा विविध ज्ञानशाखांचे सोदाहरण दाखले देत चितमपल्ली आपले लेखन संदर्भबहुल करतात. संत वाङ्मय, महानुभाव वाङ्मय, आधुनिक मराठी साहित्य, लोकसाहित्य यांचाही त्यांचा अभ्यास उत्तम होता आणि आपल्या लेखनाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी त्याचा उपयोग केला.
चितमपल्ली यांची सर्वच पुस्तके त्या त्या विषयाला संपूर्ण न्याय देणारी आहेत. ‘केशराचा पाऊस’ (२००५) हे त्यांचे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातील कथा विलक्षण आणि आगळ्यावेगळ्या आहेत. शैली म्हणून आत्मपर लेखनाचा अवलंब केल्याचे चितमपल्ली या पुस्तकाच्या मनोगतात म्हणतात. रोजनिशीतून लिहिलेल्या आठवणी म्हणजे यातील कथा. बहुतेक कथांची पार्श्वभूमी मेळघाटातील जंगले आहेत. तेथील आदिवासी कोरकू, गोंड, निहाल, तसेच गवळी यांनी सांगितलेल्या लोककथा, दंतकथा, श्रद्धा यांचा या कथांमध्ये उपयोग केला आहे. यातील वृक्षदेवता, निसर्गदेवता यांना वास्तवाचा आधार आहे. सुमित्रा आणि माधव यांच्यातील प्रेममधुर नात्याचा भावरम्य अनुबंध म्हणजे 'केशराचा पाऊस'मधील या कथा. या शिवाय इतरही काही कथा या संग्रहात आहेत. संग्रहात चितमपल्ली यांच्यातील हळवा, भावुक कवी-कथाकार अतिशय तरलतेने प्रकटला आहे. इतर सर्वच पुस्तकांपेक्षा ‘केशराचा पाऊस’चे वेगळेपण मनावर ठसणारे आहे.
उत्फुल्ल संशोधक
चितमपल्ली यांचे कोशवाङ्मय ही तर मराठीतील वनसाहित्याची आणि अभ्यासाची समृद्धी! पक्षीकोश, प्राणीकोश तयार झाल्यानंतर ते मत्स्यकोशाकडे वळले. त्यासाठी कोकणातील समुद्रकिनारे त्यांनी गाठले. काठावर राहून माहिती मिळणे अवघड आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट कोळ्यांच्या वस्तीतच मुक्काम केला आणि त्यांच्यासोबत बोटींमधून समुद्र सफारीही केल्या. निधनापूर्वी त्यांनी वृक्षकोशाचे काम बरेचसे पूर्ण करत आणले होते. चितमपल्ली यांच्यातला संशोधक आणि लेखक सदैव उत्सुक, जागरूक असायचा. वनखात्यातील नोकरीच्या सुरुवातीलाच पुणे, वडगाव, मावळ भागात नियुक्ती असताना त्यांना गो. नी. दांडेकर यांचा सहवास लाभला. दांडेकरांमुळे आपल्याला जंगलांची अधिक आणि उत्तम ओळख झाली, असे ते नमूद करतात. दांडेकरांच्या कादंबऱ्यांमधील पवनाकाठचा धोंडी आणि माचीवरला बुधा या दोघांनाही ते दांडेकरांसोबत प्रत्यक्ष भेटले. जगप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सालिम अली हे त्यांचे गुरू होते. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातून तणमोर तसेच रानकुत्र्यांबाबतचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन चितमपल्ली यांनी पूर्ण केले. त्यासाठी प्रसंगी वनखात्याचा रोष पत्करला. आकाशवाणी सोलापूरसाठी मला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे विस्तारपूर्वक सांगितले होते.
साहित्याच्या प्रांगणात मारुती चितमपल्लींनी आपल्या अभिव्यक्तीचे अंगण फुलवले. त्यांच्या पुस्तकांनी केवळ वाचनानंद दिला नाही, तर वाचकांची आत्मजाणीवही विस्तारली...झाले होते असे की, रानकुत्री आणि वाघ यांच्यात भक्ष्यासाठी चढाओढ असते आणि रानकुत्री वाघांचे भक्ष्य पळवतात, असा वनखात्याने निष्कर्ष काढला होता. तसा एक अहवालही महाराष्ट्र वनखात्याने प्रकाशित करून सर्वत्र वितरित केला होता. डॉ. सालिम अली यांच्या हातीही तो पडला. ते या निष्कर्षाशी सहमत नव्हते; परंतु यावर संशोधन होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन त्यांनी चितमपल्ली यांना त्यासाठी प्रवृत्त केले. चितमपल्ली यांना या संशोधनासाठी फेलोशिप मिळाली. सहा महिन्यांचा हा संशोधन प्रकल्प होता. चितमपल्ली यांनी त्यासाठी अकरा रानकुत्र्यांचा कळप निवडला आणि रानकुत्र्यांचे व वाघांचे भक्ष्य नेमके काय, रानकुत्री वाघांचे भक्ष्य पळवतात का? याचा अभ्यास केला. निरीक्षणे केली. अकरा रानकुत्र्यांचा माग काढत पहाटे पाचपासून रात्रीपर्यंत त्यांनी टांगसू महाजन या आदिवासी जाणकाराच्या मदतीने या विषयाचा वेध घेतला. त्यात असे लक्षात आले की रानकुत्री ७० टक्के वानरे मारतात, २० टक्के रानडुकरांची शिकार करतात आणि पाच ते दहा टक्के हरणांना मारतात. परंतु ते म्हातारे, गोळी लागलेले, आजारी अशा हरणांनाच भक्ष्य करतात, असे चितमपल्ली यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी त्या हरणांची वैद्यकीय तपासणी आणि शल्यक्रिया सुद्धा तज्ज्ञांकडून करवून घेतल्या. निरोगी हरणांना रानकुत्री कधीच मारत नाहीत. त्यामुळे रानकुत्री आणि वाघ यांच्यात भक्ष्यासाठी चढाओढ नाही. रानकुत्र्यांमुळे वाघाला अन्न मिळत नाही, हे म्हणणे रास्त नाही, असा अहवाल चितमपल्ली यांनी सादर केला. त्यावरून वन खात्यात गदारोळ झाला होता.
डॉ. सालिम अली यांच्या सांगण्यावरून चितमपल्ली संशोधन करतात आणि ते संशोधन वनखात्याच्या भूमिकेला छेद देणारे असते, सत्य सांगणारे असते, या आकसातून वनखात्याने संशोधनाच्या सहा महिन्यांचा चितमपल्ली यांचा पगार रोखून धरला होता. संशोधन कालावधी पूर्ण झाल्यानंतर संघर्ष करून चितमपल्ली यांना ते वेतन पदरात पाडून घ्यावे लागले होते, ही वस्तुस्थिती आहे. निवृत्तीनंतर तीस वर्षांनी चितमपल्ली याबाबत मनमोकळे बोलत होते. मात्र, वन खात्यात अनेक उच्च अधिकारी चितमपल्ली यांच्या कार्याचे मोल जाणणारेही होते आणि ते चितमपल्ली यांना साहाय्य करीत असत. त्यांच्याप्रती चितमपल्ली कायम कृतज्ञ होते.
प्रेरणादायी दंतकथा
चितमपल्ली यांच्या संशोधनावर आणि निरीक्षणांवर अलिकडे अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. परंतु चितमपल्ली यांचे जंगलांमधील अनेक गूढ अनुभव आणि निरीक्षणे तरल, अद्भुत आहेत. ज्या समर्पित भावनेने आणि तादात्म्यतेने चितमपल्ली जंगलातील अनुभवांना सामोरे गेले ती एकतानता दुर्मीळ आहे. त्यांना प्राप्त झालेल्या योगसाधनेमुळे, त्यांच्या वनानुकूल जीवनसरणीमुळे आणि अत्यंत शुद्ध, निर्हेतुक भावनेमुळे जंगलातील अनेक संकटांमधून चितमपल्ली सुखरूप बाहेर आले होते. टांगसू महाजन, मंगरू गोंड, निरगू गोंड, माधो गोंड हे त्यांचे वाटाडे असलेले आदिवासी सांगाती यांनी त्यांना दिलेले ज्ञान अनुभवसिद्ध होते. माधवराव पाटील डोंगरवार हे चितमपल्ली यांचे जीवश्च मित्र. त्यांच्यामार्फतच या आदिवासी वाटाड्यांशी चितमपल्ली यांची ओळख झाली होती. माधवरावांनी चितमपल्ली यांना जंगल, वनस्पती, प्राणी आणि जल या सर्वांची आणि अनेक रहस्यांची ओळख करून दिली होती. त्या माधवरावांच्या समाधीशेजारी आपल्या अस्थी पुरण्यात याव्यात, अशी इच्छा चितमपल्ली यांनी लिहून ठेवली होती. प्रत्यक्षात त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. चितमपल्लींच्या अस्थी नवेगावबांध तलावात विसर्जित करण्यात आल्या. असे घडले तरीही, आता अरण्यऋषी चितमपल्ली नावाची माझ्यासारख्या असंख्यांनी अनुभवलेली जिवंत दंतकथा नद्या आणि तलावांच्या पाण्यावर पोसलेल्या वनमातीतून बहरलेल्या हिरवाईने आकाश व्यापत, आपल्या अक्षरवेलींतून मराठी वाचकांना सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
-oOo-
सुनील शिनखेडेलेखक सुनील शिनखेडे हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. ते सध्या ‘मारुती चितमपल्ली यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएच. डी. संशोधन करीत आहेत.
ईमेल: sunilshinkhede521@gmail.com.
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
गुरुवार, ३१ जुलै, २०२५
अरण्यपुत्राचा चिरवियोग
रविवार, २७ जुलै, २०२५
अँटेना
-
अनुनाद
बंगाली साहित्य हा एक अद्भुत नि अफाट लेखनकला प्रकार आहे. त्यातही विशेषतः काळानुरूप उत्क्रांत होत गेलेल्या बंगाली कथांचा आगळाच ढंग राहिलेला आहे. या कथांना बंगाली मातीचा नि माशांचा गंध आहे, नदीच्या पाण्यासारखे नादमयी रूप आहे, समुद्राची गाज तिच्यात सामावलेली आहे. कथा व्यक्तीची असो, कुटुंबाची असो वा समूहाची, आत्मरत असण्यापेक्षा ही कथा समाजाशी, संस्कृती रूढीपरंपरांशी, पर्यावरणाशी, राजकारणाशी जोडलेली आहे. मुळात माणसाच्या अस्तित्वाचं, त्या अस्तित्वाच्या मर्यादेचं अचूक भान ती राखून आहे. यातून निर्माण होणारे ताण ती सहज गुंफत आली आहे. जुन्या पिढीतल्या कथा-कादंबऱ्यांचं वाचकांवर गारुड आहेच, पण नव्या पिढीतल्या लेखक-लेखिकांचंही तितक्याच उत्स्फूर्तपणे स्वागत करण्याची दिलदारी बंगाली वाचकांमध्ये कायम आहे. यातल्या काही निवडक लेखक-लेखिकांच्या लक्षवेधी कथांचा मराठी अनुवाद सादर करणारी ही कथामाला...आमच्या घरातला आदिम काळातला अँटेना काढून टाकून डिश अँटेना बसवण्यासाठी आज टेम्पोदा आमच्या घरी आला होता. गच्चीचा जवळ जवळ सगळा भाग करोगेटेड शिट्सनी झाकलेला होता. फक्त कोपऱ्यातली अँटेना लावलेली जागा मोकळी सोडलेली होती. त्यामुळे मौनाच्या सांगण्यावरून मोठ्या दादांनी तिथलं केबल कनेक्शन काढून टाकून डिश बसवायचं ठरवलं होतं. केबलवर मौनाला हवे असलेले चॅनेल्स बघता येत नव्हते!
मौनाला कोणते चॅनेल्स आवडतात, हे तिचा धाकटा काका या नात्याने तिला जन्मापासून पहात असूनही मला अजून समजू शकलेलं नाही. तिला आज लाल आवडतो, तर दुसऱ्या दिवशी सफेद! आज सामोशाची प्रशंसा, तर उद्या जिलबी डोक्यात ठेवून नाचत राहते! तिला पाहून माझ्या मनात शंका येत राहते, आजकालची मुलं अशीच असतात का?
राजूशी आपला ब्रेक अप झालाय, असं सांगून गेल्या दोन दिवसांपासून मौना खोली बंद करून बसून होती. राजू तिच्यावर फारच जबरदस्ती करू लागला होता, तिच्या पर्सनल स्पेसवर आक्रमण करत होता. ती कोणा मुलाशी बोलू लागली तर तो रागाने बेभान होऊ लागला होता. मौनाच्या मते, हे किती दिवस सहन करता आलं असतं? प्रेम करतेय, म्हणून इतरांशी बोलायचंसुद्धा नाही का? म्हणून तिने राजूला सोडचिठ्ठी दिली होती!
राजूला सोडचिठ्ठी दिलीस, हे छान केलंस पण त्यामुळे मन खट्टू कशासाठी करतेयस? राजू काही तुला मस्का लावायला आला नाहीय. पोरगा तुला छान छान चिठ्ठया पाठवत असे. सतत तुझ्या हवं नकोचा विचार करत असे. सारा वेळ म्हणत असे, माझं प्रेम आहे तुझ्यावर! तरीही का आला नाही? मौना त्याला सोडचिठ्ठी देऊ शकत होती. ते टाळण्यासाठी राजू तिच्या भोवती नाचणार नव्हता! या देशात कायदेकानून नावाची चीज खरोखरच उरली नाहीय!
लेकीचं मन विषण्ण झाल्यामुळे तिचे बाबा, माझे दादा असे वागत होते की वाटावं, एकाच वेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार गडगडलंय! लेकीच्या उदास मनाला उभारी देण्यासाठी माझ्या दादांनी नाना उपाय योजना राबवल्या. मौनाने सांगितलं होतं, यापुढे या घरात केबल-फेबल चालणार नाही. डिश बसवावी लागेल. मन रिझवण्यासाठी तिला अनेक चॅनेल्स हवे होते. आमचा केबलवाला तीचं मन गुंतून राहील, असे चॅनेल्स देत नव्हता.
असं करण्यामुळे राजू नावाच्या पोराचं धारिष्ट्य कसं लोप पावेल, ते मला समजत नसलं तरी माझ्या दादाला समजलं होतं. म्हणून तर जुनापुराना अँटेना काढून टाकून तिथे डिश बसवायची होती. आता मौना सगळं विसरून प्रचंड उत्साहाने त्याच्यासमोर बसून सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करत होती. मला मजा वाटत होती. देशातल्या पोस्टातलं व्यवस्थापन कसं चालतं, हे समजत नसलं तरी अलीकडे सोशल मीडियावर पोस्टमनचा सुळसुळाट झालेला बघत होतो.
मी विचारलं, “मौना, आता तुझं मन उदास नाहीय ना?”
सेल्फीचा अँगल नीट जुळवता जुळवता ती म्हणाली, “कोणासाठी? त्या राजूसाठी? की जुन्या काळातल्या या अँटेनासाठी? काहीतरीच काय विचारतोयस काका? अलीकडचं लाडीगोडी लावायचं प्रेम असतं या तुमच्या डायनासोरचा छाप असलेल्या जुनाट अँटेनासारखं. सगळं स्क्रॅप करून टाकायला / मोडीत काढायला हवं!”
मी हसलो. टेम्पोदांनी गंजलेला, मोडका अँटेना काढून टाकला होता. तो आणि त्याचा मदतनीस या दोघांनी मिळून प्लास्टिकच्या आवरणातून आणला होता नवीन डिश अँटेना!
फ्लॅश बॅक १९८६
उचक्या देत देत टी.व्ही. च्या पडद्यावर झरझर चित्रं दिसू लागली.
दादा जोरात ओरडले, “सर्वनाश! हे काय झालं? बाबू, ताबडतोब जा आणि टेम्पोला बोलावून घेऊन ये. नक्कीच पुन्हा अँटेना चालेनासा झालाय.”
इतक्या रात्री बाबा मला एकट्याला जाऊ देत नव्हते, पण मी वाट न बघता बाहेर पडलो. बारावं लागल्यावर कोणाला कार्ल लुई व्हावंसं वाटणार नाही?
टेम्पोदांच्या घरी पोचेपर्यंतच्या मधल्या काळात मी कथेची पार्श्वभूमी सांगतो.
श्याऐंशीच्या विश्वकपाची आज फायनल. त्या टीममध्ये ईश्वर असल्यामुळे आमचं घर आर्जेन्टिनाचं सपोर्टर.
हातांनी, पायांनी, नाना प्रकारांनी गोल करून साऱ्या जगाला वेड लावत ईश्वर फायनलपर्यंत पोचला होता. आतापर्यंत ईश्वरच्या टीमने पश्चिम जर्मनीवर एक गोल चढवला होता. यानंतर काय होईल, ते माहीत नव्हतं. आज आर्जेन्टिनाचा विजय होणं अत्यावश्यक होतं, कारण गेल्या काही दिवसांपासून आमचं घर वाईट मनःस्थिती नावाच्या तळ्याच्या तळाशी बुडालं होतं. आर्जेन्टिनाचा विजय झाला असता, तर आमच्या घरात जरा उजेड-हवा खेळत राहिली असती.
आता मनःस्थिती वाईट असण्याचं कारण सांगतो. माझी चुलत बहीण विनी!
मोठ्या काकींना कोपऱ्यातल्या विनीच्या खोलीत एक लव्ह लेटर मिळालं होतं. त्यात विवाह-संसार या बाबतीतली कितीतरी निषिद्ध वाटावीत अशी विधानं लिहिलेली होती. बंगाली लोक सुट्टीच्या दिवशी दूरदर्शन चालू करून उत्तम कुमार आणि सुचित्रा यांचं प्रेम बघत असले, तरी घरातल्या मुलीने प्रेम केलं तर त्यांच्या घरी कुरुक्षेत्र घडणारच, ते अडवता येणार नाही, हे विनीदी साफ विसरून गेली होती!
एके दिवशी हा कुळाला बट्टा लावणारा आणि सेन्ट्रल इंटलिजन्स कंपनीचा हिरो, ज्याच्याबरोबर विनीदीने असभ्यपणा केला होता, तो आहे तरी कोण, हे समजून घेण्यासाठी विनीदीला नानाप्रकारे प्रश्न विचारले होते.
यातला एकही प्रश्नबाण विनीदीला घायाळ करू शकला नव्हता. विनीदी फक्त मिसेस सेन यांच्यासारखी हनुवटी उंचावून म्हणाली होती, ‘मी सांगणार नाही!’
आत्या अरुणाचल प्रदेशात राहत असे. मुलीच्या शिक्षणासाठी विनीला आमच्याकडे ठेवली होती. अशा वेळी ती मुलगी जर अशा नकोत्या गोष्टीत अडकून पडली असती तर आम्ही बंगाली माणसं आणि बंगाली जातीचा ऐतिहासिक चेहरा सुरक्षित राहिला असता का? त्यामुळे हे सारं उघड झाल्यावर विनीदीला घरातून बाहेर जायला मज्जाव केला होता.
मोठ्या काकांनी, विनीदीच्या बाबांनी तिच्या विवाहासाठी पत्रापत्री सुरु केली होती. इतकंच नाही तर राष्ट्रसंघालाही पत्र लिहावं, म्हणून त्यांनी एक पोस्ट कार्डही खरेदी केलं होतं. फक्त काकींनी धमकावल्यामुळे... जाऊ दे.
आज विनीदीला बघायला येणार होते. त्यावेळी विनीदी काय गोंधळ घालेल कोण जाणे! त्यामुळेच आर्जेन्टिनाचा विजय होणं माझ्यासाठी अतिशय आवश्यक होतं. उजेड-हवा यांची नितांत गरज होती. अशा वेळी त्या अँटेनाने दगा दिला.
सध्या अँटेना म्हणजे, बंगाली घराचा स्टेटस सिम्बॉल. तीन दांड्या किंवा पाच दांड्या असलेल्या अँटेनाच्या कृपेमुळे लाकडी शटर्स बसवलेल्या टी. व्ही. वर दूरदर्शन बघता येत असे.
चित्रमाला, चित्रहार यांच्या जोडीला आठवड्यातून एकदा हिंदी आणि बांगला सिनेमा माझ्यासारख्या चातकांना उपलब्ध होत असे. काही जण त्या मोठ्या अँटेनाला एक लहानसा अँटेना जोडत असत. त्याला म्हणत बुस्टर. तो बेटा बांगला देशातले चॅनेल्स खेचून आणत असे. आमच्याकडे बुस्टर नव्हता. फक्त पाच दांड्या असलेला अँटेना होता. कधी कधी त्याची तार तुटून जाई आणि ती दुरुस्त करण्यासाठी आमच्या परिसरातल्या अठ्ठावीस वर्षांच्या एकमेव इलेक्ट्रिशियनला - टेम्पोदाला बोलवावं लागत असे. पोरगा फार चांगला होता, कधीही नाही म्हणत नसे.
आजही मी हाका मारल्यावर त्याने झटकन दरवाजा उघडला.
मी म्हटलं, “ताबडतोब चल, नाहीतर घरी कोलाहल माजेल.”
डोळे चोळत आपली दुरुस्तीची साधनं असलेली बॅग घेऊन आणि डोक्यावर कवच-कुंडल असल्यासारखी टोपी चढवून टेम्पोदा म्हणाला, “या वयात तू ही कसली भाषा बोलतोयस!”
मी हसलो. बारा वर्षे म्हणजे कमी आहेत का? मला बरंच काही माहीत असे. मला माहीत होतं, दादा काडेपेटी हातात घेऊन हळूच गच्चीवर का जातात! शेजारच्या घरातली शुक्ला आत्या ओढणी काढून टाकून मॅक्सी घालून रस्त्याच्या कोपऱ्यावर का उभी राहते! जेड स्टोन बसवलेल्या महालात डायना पामारबरोबर काय करत असते!
मी चालता चालता विचारलं, “उद्या गुजरातला जाणार का?”
टेम्पोदा म्हणाला, “होय रे! माहितेय ना तुला, मला उत्तम नोकरी मिळालीय.”
घरी पोचल्यावर टेम्पोदांनी टॉर्च बाहेर काढला. मग मला खालीच थांबायला सांगून तो एकटाच गच्चीवर गेला. या घरातल्या सगळ्या गोष्टी टेम्पोदांना तोंडपाठ असत! या आधी कितीतरी वेळा अँटेनाने आम्हाला त्रास दिला होता.
मोजून साडेसहा मिनिटात चिडीक असा आवाज होत टीव्हीवर चित्र दिसू लागलं. मी काही बोलायच्या आधीच काका इतक्या मोठ्याने ओरडले, की मैदानावरच्या आर्जेन्टिनाच्या खेळाडूंनी चपापून मागे वळून पाहिलं.
मनःस्थिती ठीक नसल्यामुळे गच्चीवरच्या आपल्या खोलीत झोपलेली विनीदी आणि तळ मजल्यावर झोपलेली आजी सोडून आम्ही सारे आज खालच्या टीव्हीच्या खोलीत बसलो होतो.
त्यात मधेच एकदा रागीट आवाजात काकी म्हणाली, “गुरासारखे ओरडताय कशासाठी? आईची झोपमोड होईल ना!”
आजोबा दोन वर्षांपूर्वीच देवाघरी गेले होते. आजी म्हणजे सवयीची गुलाम! त्यामुळेच जितका वेळ झोपेल तितका वेळ घरच्या मंडळीना शांतता लाभणार होती!
खेळ सुरू झाला असल्यामुळे काकांनी प्रतिवाद करत बोलणं वाढवलं नाही. मी बघत होतो, गच्चीवरून खाली आल्यावर टेम्पोदासुद्धा खोलीच्या दरवाजापाशी उभे होते. नजर टीव्हीच्या स्क्रीनवर.
काका म्हणाले, “टेम्पो बस आणि मॅच बघ. खेळ संपला की घरी जा. पुन्हा जर काही बिघाड झाला तर!”
बोलणं न वाढवता टेम्पोदा टीव्हीवर नजर रोखून दरवाजापाशी बसला.
अचानक दरवाजापाशी येत आजीने विचारलं, “काय रे टेम्पो, तू गेला नाहीस?”
काकीने दबक्या आवाजात काकांना दम भरला, “बघितलंत ना!”
टेम्पोदा चकित होत विचारू लागले, “जाणार कुठे? मी खेळ बघतोय ना!”
आजी म्हणाली, “झोपमोड झाली, तेव्हा खिडकीतून बघत होते.”
काका ओरडू लागले, “अगं आई, हे नवीन काय सुरू केलंस? आर्जेन्टिनाचा गोल झाला तर बरं होईल. तू जा आणि झोप पाहू मुकाट्याने!”
आजी मान हलवत म्हणाली, “ते ठीक आहे! परंतु... अच्छा, मी जाते.”
आजीसाठी आर्जेन्टिना कसा काय गोल करेल, ते समजलं नसलं तरी आर्जेन्टिनाने आणखी एक गोल केल्यावर त्याच्या बदल्यात हावरटासारखे आणखी दोन गोल खाऊन टाकले! रागाने माझ्या पायापासून डोक्यापर्यंतच्या साऱ्या शरीराची आग आग होऊ लागली. असली कसली तुझी टीम ईश्वर!
कडेकोट बंदोबस्तात असलेल्या ईश्वरच्या अंतरात्म्याला बहुतेक माझं बोलणं ऐकू गेलं असावं. त्यामुळे पुढच्या चौऱ्याऐंशी मिनिटात एकदा संधी मिळाल्याबरोबर त्यांनी बुरुचागाच्या करवी पश्चिम जर्मनीचा धुव्वा उडवून टाकला!
ते पाहिल्यावर काका ताडकन उडी मारून उभे राहिले. मला, टेम्पोदाला, मिठ्या मारत आनंदातिशयाने किती जोरात ओरडले! आजीला मिठी मारायला गेले, तेव्हा मात्र ‘पाडशील मला’, असं म्हणत आजीने काकांना दूर लोटलं.
जिंकल्यामुळे निमिषभरात काकाचं मन नबाब-बादशहासारखं झालं. सगळ्यांकडे नजर टाकत ते म्हणाले, “अशा दिवशी विनी वाईट वाटून एकटी बसून राहणार, हे होऊच शकणार नाही. चला, सगळ्यांनी तिच्या खोलीत जाऊ या. ती आपल्याच घरची पोर आहे, होय ना!”
गच्चीवरच्या एका कोपऱ्यात विनीदीची खोली. तिथे गेल्यावर आम्ही सारे थबकलो! दरवाजा सताड उघडा! दिवा जळत होता! नीटनेटकी, आवरून ठेवलेली खोली. परंतु विनीदी तिथे नव्हती! बिछान्यावर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात लिहिलं होतं, “मी त्याच्याबरोबर निघून जातेय. आमचा शोध घेऊ नका.”
चिठ्ठी हातात घेऊन काका थरथर कापू लागले. म्हणाले, तो…? तो म्हणजे कोणता प्राणी? ऐकून ठेवा. विनी आपली कोणी लागत नाही. हा कट आहे... महाभयंकर कट आहे. (सेन्ट्रल इंटलिजन्स एजन्सीचा हा कट आहे का, अशी चौकशी मी केली नाही)
आता
डिश बसवून झाल्यावर खाली उतरून टेम्पोदांनी आपली टोपी सारखी केली. आजही कवच-कुंडल! तो हसला आणि म्हणाला, “सवयीने घातली रे बाबू!”
दुपारच्या उन्हात मी त्या माणसाला पाहिलं. आता स्टेशन रोडवर टेम्पोदांचं इलेक्ट्रॉनिक्सचं मोठं दुकान आहे. दुकानात बारा कर्मचारी. तरीही आमच्या घरातलं काम तो स्वतः येऊन करतो. गुजरात फार दिवस मानवलं नाही या माणसाला.
मी म्हटलं, “मोडका अँटेना फेकून...”
“नाही, तो टाकून देऊ नकोस. मी तो घरी घेऊन जाईन.” जवळच असलेली विनीदी म्हणाली.
मी नुसता हसलो. मला आठवली एकतीस वर्षांपूर्वीची ती रात्र! रहस्यमय वाटावं, असं विनीदीचं नाहीसं होणं.
खरं पाहता त्या रात्री आजींनी टेम्पोदाला नाही तर विनीदीला पाहिलं होतं. टेम्पोदांनी स्वतःच्या मोठ्या बॅगेतून शर्टपँटचा एक सेट आणला होता. घरातली सारी मंडळी खाली एकाच खोलीत बसली होती. गच्चीवर जाऊन अँटेना बदलायच्या आधी टेम्पोदांनी विनीदीला ते कपडे दिले होते. मग कोणालाही सुगावा लागू नये म्हणून टेम्पोदांनी आमच्यासमवेत बसून संपूर्ण मॅच बघितली होती. त्यावेळी विनीदी गुपचूप घराबाहेर पडून टेम्पोदांच्या घरी जाऊन लपली होती. आजीनी बरोबर बघितलं होतं, पण तीचं बोलणं कोणी ऐकून घेतलं असतं तर ना!
दुसऱ्या दिवशी ती दोघं गुजरातला निघून गेली. एक महिन्याने पत्र पाठवून विनीदीने सगळी हकीकत सांगितली होती. तिने आपला बेत कोणाला समजू दिला नाही. त्या रात्री सगळी तळ मजल्यावरच्या खोलीत असतील, हे विनीदीला माहीत होतं. हीच संधी साधून गेमचा हाफ टाइम झाल्यावर मी अँटेनाची तार कापून टाकली. अपेक्षेनुसार टेम्पोदाला बोलवायला मलाच जावं लागलं. अरे बाबांनो, प्रेम नसलं तर अर्ध्या रात्री अँटेना दुरुस्त करायला कोणी येईल का? इतक्या वर्षानंतर आज काका नाहीत, बाबा नाहीत. मीही हे सगळं विसरलो होतो. टेम्पोदांचा आम्हाला अभिमान वाटतो. विनीदीलाही सारे वाखाणत असतात. म्हणतात, “विनी ही खरोखरच गुणी पोर आहे. अशा अनाथ, गरीब मुलासाठी तिने सगळ्याचा त्याग केला. अशा प्रेमाचा विचार तरी करता येईल का?”
काठीचा अँटेना कालबाह्य झालाय. डिश अँटेनाने त्याला बाजूला सारलाय. नुसतं दूरदर्शन मौनाला पुरेसा वाटत नाही. जेव्हा इतर काहीच उपलब्ध नव्हतं, तेव्हा हा एक अँटेनाच सगळ्यांना रिझवत असे. ईश्वर दर्शन घडवत असे; याचा त्यांना विसर पडतो.
मी पाहिलं तेव्हा मौना डिश अँटेनासमोर उभी राहून सेल्फी काढत होती. एका बाजूला बाद केलेल्या, मोडक्या, जुनाट अँटेनावरून हळुवारपणे हात फिरवत होती, आमची रुपेरी केस असलेली विनीदी. आमच्या सगळ्यांच विनीदी!
अनुभवाने मला समजतंय हे सारं!
-oOo-
(स्मरणजित चक्रबर्ती यांनी लिहिलेल्या ‘अँटेना’ या बंगाली कथेचा मराठी भावानुवाद.)
सर्व रेखाचित्रे : सागर शिंदे (७०३०९९००८१)
सुमती जोशीअनुवादिका सुमती जोशी या राज्य पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिका, अनुवादिका आहेत. त्यांची ‘उत्क्रांती’, ‘बंगरंग’, ‘दैत्याचा बगीचा’, ‘मंत्र’ आदी स्वतंत्र तसेच अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
ईमेल: sumatijoshi154@gmail.com
आजीला केंद्रबिंदू ठेवून केलेले मनस्वी लेखन
-
प्रस्तावना
आजीच्या सहवासातून फुलत गेलेल्या नातवाचे भावविश्व रेखाटणारे ज्येष्ठ पत्रकार, लेखक विकास महाडिकही गोष्ट एका आजीची आहे. तिच्या सोबतीने फुलत गेलेल्या नातवाच्या भावविश्वाचीही आहे. खरे तर ही एक गोष्ट नाही, तर अनेक गोष्टींची मिळून बनलेली ही फूलमाळ आहे. या गोष्टींना स्मरणरंजनाचा, मातीचा आणि मातीशी जैविक नाते सांगणाऱ्या पारदर्शी माणसांचा गंध आहे. त्यांचे राग, त्यांचे लोभ, त्यांच्या आशा, त्यांच्या आकांक्षा वाचकाला गुंतवून टाकणाऱ्या आहेत. एका पातळीवर या बोधकथाही आहेत आणि आठवणपर शब्दचित्रेसुद्धा. पार्श्वसंगीतासह ऐकता-पाहता याव्यात इतक्या या कथा जीवंत नि ठसठशीत उतरल्या आहेत. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ पत्रकार विकास महाडिक हे या ‘एका आजीची गोष्ट’चे लेखक आहेत. लहान-थोरांना भुरळ घालू पाहणाऱ्या या गोष्टरुपी आत्मकथनाला ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची छोटेखानी प्रस्तावना लाभली आहे. त्याचेच हे पुनर्मुद्रण...देखण्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणाच्या पदरात जिव्हाळा, रसाळवाणी आणि व्यक्त होण्याची असोशी याचे दान पडलेले आहे. धनसंपत्ती, श्रीमंती आणि वित्त वैभवाचा अभाव असलेला कोकण निसर्ग श्रीमंतीने आणि माणसांच्या आस्थेने मालामाल राहिला आहे आणि हे प्रेमाचे, माणुसकीचे माप कोकणी माणसाने आपल्या काळजाशी आतल्या कोयीसारखे जपले आहे.
मुंबईसारख्या शहरात येऊन इकडच्या अनेक माणसांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मात्र ते कधीही पूर्णपणे मुंबईचे होऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या गावची माती त्यांना सतत साद घालत असते आणि दुरूनही आपल्या कुशीत घेत असते.
लेखक विकास महाडिक यांनी सांगितलेल्या गोष्टी या आजीच्या गोष्टी राहतच नाहीत, त्या सहजपणे बोधकथा होऊन मनाची पकड घेतात…छत्रपती शिवाजी महाराजांचे वतन लाभलेले महाडिक राजे यांचे वंशज असलेली अनेक महाडिक कुटुंबे चिपळूण, गुहागर या भागात आहेत. मुंबईत पत्रकार म्हणून नाव मिळवलेले विकास महाडिक याच महाडिकांच्या वंशजांपैकीच. मुंबईत राहणाऱ्या आईवडिलांना सोडून ते काही काळ गावी गेले आणि आपल्या आजीसोबत राहिले, मोठे झाले. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात आजीसोबत घालवलेल्या त्या बालपणातील आठवणींचा अल्बम म्हणजे ‘एका आजीची गोष्ट’ हे पुस्तक आहे. स्वतःच्या प्रगतीचा आलेख मांडणारं आणि सोबत आपली नाळ ज्या मातीत पुरली गेली आहे, त्या गावाचा, त्या भागाचा ललित शैलीत लेखाजोखा घेणारं मराठीतलं आजीच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारं असं हे पहिलंच पुस्तक असावं. स्वतःचं कष्टमय जीवन आणि कोकणातल्या व्यवहारांची माहिती देणारे, गत आयुष्याचा मागोवा घेणारं हे लेखन मला खूपच रंजक वाटलं.
खरं सांगायचं, तर माझ्याच ‘करुळचा मुलगा’ या आत्मचरित्राची मला आठवण झाली. माझे बालपणीचे हालातले दिवस असेच गेले. ते आठवले. बालपणीच्या हालअपेष्टांच्या आठवणींना बहुधा लेखन हा एकमेव उःशाप आहे असे वाटते. कारण त्या हालअपेष्टांचा त्रास या लेखनाने कमी करता येतो. एका अर्थाने, अशा आठवणींचे लिखाण म्हणजे बालपणीचे ऋण फेडणे असते.
विकास महाडिक यांनी आपल्या चरित्रातून ते ऋण फेडले आहे आणि कोकणातील लेखकांच्या मांदियाळीत आपलेही नाव जोडले आहे.
कोकणची माती ही तशी सुपीक, पण पिके घ्यायला अवघड. इथल्या माणसांचेही तसेच आहे. दिसायला राकट, वागायला कडक, पण आतून नारळाफणसासारखे रसाळ, प्रेमळ. कोकणातल्या अशाच एका जिद्दी आजी नातवाची ही गोष्ट. दिसायला देखणी, प्रेमळ पण निश्चयाची ठाम अशी एक आजी आपल्या नातवाला मुंबईतून गावाला घेऊन जाते, स्वतःकडे ठेवून घेते, वाढवते, मोठे करते, त्याच्यावर निश्चयाचे, आपल्या ध्येयाप्रती ठाम राहण्याचे संस्कार करते आणि नातवाला एक उत्तम माणूस, उमदा पत्रकार बनवते, त्याची ही कहाणी.
संस्कारक्षम मन स्वातंत्र्याची, मनमोकळ्या अवकाशाची मागणी करत असते. जिथे त्याला हे सारे मिळते, तिथेच कोणताही महागडा क्लास न लावता त्याचे व्यक्तिमत्व फुलण्याची प्रक्रिया सुरु झालेली असते...चिपळूण - गुहागर भागातील चिवेली गावच्या एका आजीने जिद्दीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नातवाला वाढवले. आलेल्या एकेक वादळाला सहज सामोरे जात मोठे केले. त्याचे लालित्यपूर्ण चित्रण म्हणजे हे आत्मकथन...
तसे आजी-नातवाचे नातेच वेगळे असते. जसे दुधाहून दुधावरच्या सायीला जपतात तशी आजी मुलाला नव्हे, तर नातवाला जपते. अनेकांच्या आकांक्षाना आणि प्रतिभाविश्वाला ऊर्जा देणारे, त्याचे वा तिचे आई वा वडील नसतात तर अशा प्रेमळ आज्याच असतात, हे जीवशास्त्रीय सत्यही हे पुस्तक सांगते. मुंबईत पत्रकार म्हणून नाव मिळवलेले विकास महाडिक लहानपणी हट्टाने आजीचा पदर धरून गावी गेले आणि काहीच सोयीसुविधा नसलेल्या गावात निश्चयी करारी आजीच्या आधाराने काही वर्ष राहिले. उमदा माणूस झाले, याचं अत्यंत तपशिलाने केलेलं विवेचन म्हणजे महाडिकांचे हे छोटेखानी आत्मचरित्र, कोकणातल्या अशा कैक काटक, खमक्या आणि प्रेमळ आज्यांचे चित्र उभे करणारे आणि आपल्या आजीलाच लेखनाचा केंद्रबिंदू बनवलेले माझ्या वाचनात आलेले हे पहिलेच आत्मकथन, तेही माझ्या लाडक्या कोकणच्या पार्श्वभूमीवरचे. आपल्या अभावग्रस्त आयुष्याला आजी हेच कणखर उत्तर लाभले, हे एका पत्रकाराने आजीच्या लुसलुशीत स्पर्शाच्या ममतेने विशद करून सांगितले आहे...
अशा या व्रतस्थ आजीच्या भाम्यवान पत्रकार नातवाचं मी कौतुक करतो आणि यापुढेही त्यांच्याकडून कोकणचे अंतरंग उलगडणारे असे मनस्वी लेखन व्हावे यासाठी आशीर्वाद देतो.
-oOo-
पुस्तकाचे नाव : एका आजीची गोष्ट
लेखक : विकास महाडिक
प्रकाशक : संगणक प्रकाशन
मुखपृष्ठ व रेखाचित्रे : अनिल विठ्ठल डावरे आणि आदित्य चारी
संपादन साहाय्य : प्रशांत मोरे
मूल्य : २५० रुपये
मधु मंगेश कर्णिक
ईमेल: .
शनिवार, २६ जुलै, २०२५
गोष्टींचा अवलिया जोपासक
-
प्रस्तावना
शालेय विद्यार्थ्यांचे भावविश्व समृद्ध करण्याच्या धडपडीतून कथालेखनाचाही संसार मांडणारे उत्फुल्ल मिलींद यादव...समाजनिष्ठ पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता, संस्कृती-परंपरांचा अभ्यासक संवेदनशील कलावंत, प्रयोगशील शिक्षक, निसर्गाशी गूज करू पाहणारा निसर्गमित्र, दमदार गिर्यारोहक, चित्रपट, चित्रकला यातील सौंदर्य चळवळींच्या माध्यमातून संस्कारक्षम वयातल्या मुला-मुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणारा उत्फुल्ल आस्वादक अशा विविध रुपांत कोल्हापूरस्थित विद्यार्थीप्रिय शिक्षक मिलींद यादव भेटत राहतात. लोकविलक्षण अशी व्यक्त होत राहण्यातली त्यांची असोशी चित्र, शब्द आणि सातत्यपूर्ण लेखनातून वाचकांपुढ्यात येत राहते. आता कथालेखक या नव्या भूमिकेत ते समोर येत आहेत. ‘कथा अंगाखांद्यावरच्या’ हा वास्तव कथांवर बेतलेला त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित होत आहे. या संग्रहाला त्यांच्या स्नेही गुरुजनाने लिहिलेली ही प्रस्तावना...मिलींद एक अवलिया हरहुन्नरी कलाकार, निर्भीड कार्यकर्ता, स्पष्टवक्ता माणूस. पहिल्या भेटीत मिलींद भेटतो आपल्याला एक टपोरी, उनाड वाटणारा तरुण म्हणून. पुढे मिलींद, मिलींदसर म्हणून भेटतात. आत्ताच्या शिक्षण शास्त्राच्या भाषेत ‘उपक्रमशील शिक्षक’ म्हणावे असे.
मिलींदसर एक दोन तपे एका शाळेत कार्यरत होते. Thinking out of the box हा मिलींदसरांचा उपजत गुण असावा. चौकटीत, शाळेच्या रुटीन नियमावलीत, कोडमध्ये न बसणारा माणूस किंवा त्या चौकटीत न मावणारा शिक्षक. पण चौकट कसलीही आणि कुठलीही असो मिलींद आपल्या मनात जे आहे, ते नवनवीन मुलांना देत राहिले. मध्येच या रुटीनचा आणि मला जे करावयाचे आहे ते, यांचा मेळ बसत नाही म्हटल्यावर मिलींदसरांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. मनासारख्या कामाला सुरुवात केली आणि मुलांच्या विश्वात नव्याने अवतरले.
गोष्टीमागची गोष्ट
एक सृजनशील, विचारी, विचाराची पक्की बैठक आणि दिशा स्पष्ट असलेल्या मिलींद सरांनी लिहायला सुरुवात केली. आपल्या नोकरीच्या कार्यकाळात त्यांनी मुलांशी साधलेला संवाद, मुलांची अंतरंगे उघडून त्यांच्या भावविश्वात त्यांचे रमणे, वावरणे हे सर्व शिक्षणातील प्रयोगच म्हणावे लागतील. मुलांची मने घडविणे, त्यांना संवादी करणे, संवेदनशील बनविणे, समाजशील बनविणे, समाजातील जबाबदार नागरिक बनविणे या खऱ्या शिक्षणासाठी, ज्याला जीवन शिक्षण म्हणता येईल असे पूर्णतः अनौपचारिक शिक्षण मिलींदसरांनी मुलांना दिले. एरवी, जी मुलं बोलत नाहीत. बोलू इच्छित नाहीत किंवा त्यांचा स्तर पाहून इतरांना त्यांच्याशी मैत्री करावी, असे वाटत नाही. अशा मुलांसाठी सर धडपडले. पावलो प्रेयरी या शिक्षण तज्ज्ञाचे एक पुस्तक आहे. ‘Pedagogy of Oppressed’ समाजाच्या तळागाळातील मुलांना बोलता येते. पण त्यांना त्यांचा आवाज नसतो. या तत्त्वज्ञानानुसार या मुलांना जमेत न धरता किंवा त्यांचे तसे असणे गृहीत धरून शिक्षण चालते. ही जगभरची रीत आहे. अशा मुलांशी मिलींद सरांनी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधला आहे. मुलांच्या भावविश्वाशी ते समरस झाले आहेत. त्या बाबतच्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या ‘अंगा खांद्यावरच्या कथा’ या पुस्तकात आहेत. मुलांचे आत्मभान, सन्मान, मन जपून त्यांना आपल्या मनात स्थान देत सर कार्यरत होते. त्या उपक्रमांचे, घटनांचे, प्रसंगांचे या पुस्तकात वास्तव चित्रण आहे.
आपण फार मोठे काही काम केले. मुलांसाठी खूप कष्ट घेतले, असा अविर्भाव फुशारकी व स्वस्तुती या लेखनात कुठेही नाही. मुलांचे मात्र मन भरून आणि समरसून कौतुक करताना सर जागोजागी दृष्टीस पडले. या मुलामुलींची वेगळी सृष्टी जाणून घेण्याची दृष्टी असलेला एक सच्चा शिक्षक या प्रसंगातून सतत दिसत राहतो.
चटका लावणाऱ्या कथा
या पुस्तकातील काही कथा तर मनाला चटका लावणाऱ्या आहेत. ‘एक शालीन स्नेहभोजन’ या कथेतील शालन ही विद्यार्थिनी आपला जेवणाचा डबा सर्वांसमोर उघडू इच्छित नाही. डबा काढून घेऊन उघडल्यावर शालनची झालेली घालमेल. डबा पाहून भारावलेले सर आणि त्या प्रसंगाला आपली कल्पकता वापरून दिलेल्या शालीन कलाटणीचे वास्तव चित्रण अस्वस्थ करते.
‘आमचा सिकंदर’ या कथेतील श्रीधर पैसे ठेवलेली डबी शोधण्यासाठी, पकडण्यासाठी धप्पकन पाण्यात उडी मारतो. ही गोष्ट मुलांचे प्रसंगानुरूप साहस अधोरेखित करते. ‘चौकातलं भूत’ या कथेतील घोणसीचा आवाज आणि मुलांची प्रचंड घाबरलेली स्थिती यातून सरांनी नरेशला मिठीत घेणे. ही गोष्ट शिक्षकाचे धैर्य तर दाखवतेच, पण पुढे भूत हा कसा भ्रम आहे, हे मुलांना अनुभवातून पटविते. या सर्व कथा मुलं आणि मिलींद सर यांचे बहुपदरी, बहुआयामी बहुअनुभवजन्य ज्ञान देणाऱ्या नावीन्यपूर्ण पद्धती आहेत.
एक कला शिक्षक... भवतालाचे भान असलेला... राजकीय-सामाजिक सजगता जपलेला... निसर्गात रमणारा... जागतिक सिनेमांच्या माध्यमातून मुलांचे जग विस्तारणारा... विद्यार्थ्यांचे मन जाणून घेण्यासाठी परकायाप्रवेश साधतो, तेव्हा त्यातून चटका लावणाऱ्या कथा जन्म घेतात...प्रयोगशीलतेचा अखंड ध्यास
‘Experiencial Learning’ प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे, असा एक शिकण्याच्या पद्धतीतील प्रकार आहे. मुलांच्या विश्वात एकरूप होऊन असे अनुभवजन्य प्रत्यक्षदर्शी ज्ञान सहजपणे देत राहिलेले उपक्रमशील उपद्व्यापी शिक्षक मिलींद आणि त्यांची शिकण्याची आस असलेली मुलं, हा एक शिक्षणातला प्रयोग आहे. ‘तुकाराम’ सिनेमा मुलांना दाखविल्यानंतर ओंकार या विद्यार्थ्याच्या वर्तनात झालेला बदल आणि त्याचे मित्राला रबर देतानाचे उत्तर थक्क करणारे आहे. शालेय एकांकिकेसाठी मुलांची तयारी करून घेणे, त्यांना भूमिका देणे आणि त्यातून भन्नाट पात्र उभी करणे, त्यामध्ये सरांसमोरची अडचण सोडविण्यासाठी टक्कल करून अचानक अवतरलेला संदीप, दाजीपूरच्या ट्रेकमध्ये जेवणाची उद्भवलेली अडचण आणि अचानक झालेला भोजनलाभ आणि त्यानंतरचा भांडी घासण्याचा धडा, छत्रपती शिवाजी राजांच्या पेंटिंग दुरुस्तीसाठी आनंदाने पाच रुपये घ्या, म्हणणारी समा खान, पक्ष्यांचे घरटे सांभाळण्यासाठी मुन्सिपालिटीच्या लोकांना मेंदीचे झाड कापू न देणारा सागर, फटाके न वाजवता त्याच पैशातून वर्ग मित्रासाठी दिवाळीसाठी कपडे घेणारी मुलं, या सर्व कथांत मुलं मुलीच नायक नायिका आहेत आणि दिग्दर्शकही आहेत.
पुस्तकातील फक्त शेवटची गोष्ट आहे, खुद्द मिलींद सरांची. कथा आहे, हाती घेतलेल्या कामाप्रती निष्ठेची. काम सामाजिक असल्याने मिलींद सरांनी मुख्याध्यापकांना दिलेले सडेतोड पर्यायी उत्तर, त्यासाठी सोसलेल्या प्रचंड शारीरिक यातना आणि मानसिक त्रास. योग्य तर्काच्या दृष्टीने योग्य असलेले पण कोणी वेड्या माणसाने करावे असे केलेले धाडस आणि ‘लढाई जिंकलेल्या सैनिकाला दुखण्याचं फारसं काही वाटत नसतं’ असे त्यांचे सुभाषितवजा वाक्य, हे सारेच वाचताना मनाची घालमेल करणारे असे आहे. हे नाट्य घडल्यानंतर सरांनी उभा केलेल्या संसदेच्या सेटला प्रेक्षकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद आणि त्यांना झालेला आनंद. हे सारं मिलींद सरांनीच करावं. कॉम्रेड, यू रिअली डिझर्व ग्रँड रेड सॅल्युट...
पुस्तकात खरं तर सर्व गोष्टी मूल्य शिक्षणाच्या, जीवन शिक्षणाच्या उत्तम वस्तुपाठ आहेत. धाडस, कष्ट, समजूतदारपणा, औदार्य, हजरजबाबीपणा, जातीपातीच्या पलीकडचे मैत्र, सर्वधर्मसमभाव, स्त्री पुरुष समानता अशा अनेक गोष्टींची, मूल्यांची, गुणांची अनुभवलेल्या गोष्टीतून केलेली सुरेख गुंफण, हे या कथांचे वैशिष्ट्य आहे.
सध्या लिहिताना हे पुस्तक हाच एक मुद्दा आहे. त्यामुळे मिलींद सरांबद्दल आणि आमच्या अवलिया मिलींदबद्दल लिहिणे उचित नाही. सुज्ञ पालक, संवेदनशील, उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक अशा सर्वांनीच हे पुस्तक वाचावे म्हणजे, आपले अध्यापन आणि मुलांचे शिक्षण अधिक समृद्ध होईल.
-oOo-
पुस्तकाचे नाव: कथा अंगाखांद्यावरच्या
लेखक: मिलींद यादव
प्रकाशक: विद्यार्थी समूह, शिवाजी मराठा हायस्कूल, कोल्हापूर
मूल्य: १६० रुपये मात्र
नोंदणीसाठी संपर्क: ९८५०८ ४७३८४
डॉ.बी.एम. हिर्डेकर
ईमेल:
युद्धसंघर्षाच्या आगीत मांडला लेखनसंसार
-
बुक लाउंज
२७ राज्यक्रांती आणि ४५० वेळा तुरुंगवास भोगलेला धाडसी पत्रकार, लेखक रेसार्द कापुचिन्स्कीसध्या भोवताली युद्धाच्या, हल्ला-प्रतिहल्ल्याच्या कहाण्या पसरलेल्या आहेत. रशिया-युक्रेनचा नव्याने भडका उडालेला असताना, भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्षाचे एक आवर्तन पार पडले असताना आणि हमासला संपवण्याच्या बहाण्याने अवघा पॅलेस्टाइन बेचिराख करण्याच्या सूडबुद्धीने पछाडलेल्या इस्रायलच्या नेत्यन्याहू यांनी जूनच्या मध्यात अण्वस्त्रधारी इराणला संपवण्याची मोहीम राबवली. त्याला आव्हान देत इराणने इस्रायलवर प्रतिहल्ला चढवला. एकूणच जागतिक पातळीवर हिंसा आणि प्रतिहिंसेचे नवे आवर्तन सुरू असताना शहाणीव आणि संयम देणारी पुस्तकेच आपली खरी सोबत करत असतात. युद्धखोरीचा फोलपणा साऱ्या जगानेच अनुभवलेला असतानाही काही जल्पकांना युद्धच सगळ्या प्रश्नांवरचा उतारा वाटतो. अशावेळी आपल्याला जी पुस्तके हाताशी असावी वाटतात, त्यात आपल्या ज्ञान आणि अनुभवांच्या बळावर अवघे जग तोलून धरणारा रेसार्द कापुचिन्स्की याच्या लेखनाचा मोठाच आधार वाटतो. खरंतर लोकविलक्षण आयुष्य जगलेल्या या लेखकावर प्रवास वर्णन लिहिणारा लेखक म्हणून आजवर मोठाच अन्याय झालेला आहे...या सदरातून लिहिलेला लेख प्रकाशित झाला, की पोटात गोळा उमटलेला असतो. कारण पुढचा लेख देण्याची वेळ येऊन ठेपलेली असते. अशा वेळी अंधाराने कडे घातले घरा भोवती, ऐक जरा ना... अशी परिस्थिती असते. मग अंधारात भर नदीत फिरणाऱ्या नावाड्याच्या वल्ह्यांचा चुबुक चुबुक येणारा आवाजच सोबत करत असतो... असो.
काही वर्षांपूर्वी निळू दामले यांनी एका लेखात रेसार्द कापुचिन्स्कीची ओळख करून दिलेली आठवते. इराण म्हटले की आम्हाला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जफर पनाही आठवतो. त्यांच्या चित्रपटातून इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या अधिपत्याखाली जगणाऱ्या लोकांचे दहशतीच्या छायेखाली जगणे आणि त्यातून सुटण्याची अधीरता नेमकेपणाने दाखवलेली दिसत राहते. आमच्या पिढीला इराणच्या खोमेनीची इत्यंभूत माहिती असते. म्हणजे असे वाचलेलेही आठवते, की खोमेनी वारला तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला इतकी गर्दी झाली होती की शेवटी हेलिकॉप्टरने त्यांचं पार्थिव उचलून नेऊन गुप्तपणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
धडकी भरवणारी निरीक्षणशक्ती
हिरोडेट्सने लिहिलेल्या इतिहासाच्या तिसऱ्या खंडातील १४व्या अध्यायात इराणच्या राजाची एक कथा नोंदवली आहे. सैमिनट्स या इजिप्तच्या राजाला इराणच्या कॅम्बिसेस या राजाने युद्धात हरवून कैद केले. जिंकलेला राजा हरलेल्या राजाला कमी लेखून त्याच्यासमोर स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. तर इराणच्या कैम्बिसेस राजाने विजयी मिरवणूक काढण्याचे ठरवले. त्यावेळी त्याने हट्टाने सैमिनट्सला उघड्या मैदानावर साखळदंडांनी जखडून हजर करायला सांगितले. त्याला जाणवेल अशा पद्धतीने त्यांची राजकन्या असलेल्या मुलीला अगदी साध्या कपड्यात पाणी वगैरे आणायला सांगण्यात आले, नंतर त्यांच्या मुलाला वधस्तंभावर फाशी देण्यासाठी मिरवणुकीने नेण्यात आले. इजिप्तचा राजा कठोरपणे हे सगळं सहन करत उभा होता, इतक्यात त्यांच्या खास नोकराला गुलाम म्हणून विकण्यासाठी परवानगी मागितली गेली. तो गुलाम समोरून साखळींनी जेरबंद अवस्थेत जाताना बघून मात्र राजाचा धीर खचला. तो अगदी कोसळला. स्वतःचे आप्त जाताना त्याला जितके वाईट वाटले नाही, तितके या नोकराबद्दल त्यांना का वाईट वाटले, असेल यावर तात्त्विक चर्चाही या खंडात नोंदवली आहे.
अर्थात, या चर्चेत मला रस नव्हता. मी बघत होतो, की क्रूरपणा हा पिढीजात उपजतो, की त्याला काही इतरही आयाम असतात. इराणच्या ‘शाह ऑफ शाहज्’ या पुस्तकात लेखक जे वर्णन करतो ते वाचताना निव्वळ धडकीच भरते. शहांची क्रूर राजवट तितक्याच क्रूर खोमेनींनी उलथवलेली. लेखक कापुचिन्स्कीने अगदी जवळून बघितलेली आणि अनुभवलेली. तब्बल २७ वी राज्यक्रांती होती. हा लेखक ज्या त-हेनं वर्णन करत तेहरान, इराण डोळ्यासमोर उभा करतो, तसा आपण कल्पनेतही विचार केलेला नसतो. या क्रांती बघताना त्यानं तब्बल ४५० वेळा वेगवेगळ्या देशातला तुरुंगवासही अनुभवला आहे.
नीतिशास्त्र घडवणारा ऐवज
हा गृहस्थ सरावानेच उत्तम पत्रकार झाला. यासंदर्भात तो म्हणतो, माझे लेखन हे तीन घटकांचे मिश्रण आहे. पहिले म्हणजे प्रवासः पण तो एखाद्या पर्यटकासारखा नाही, तर शोध म्हणून, एकाग्रतेसाठी, काही तरी उद्देश म्हणून केलेला प्रवास. दुसरे म्हणजे, या विषयावरील साहित्य वाचणेः पुस्तके, लेख, वगैरे आणि तिसरे म्हणजे चिंतन, जे प्रवास आणि वाचनातूनच येतं. कापुचिन्स्कीची पुस्तके या तीन घटकांच्या संयोगातून तयार झाली आहेत. अमेरिकन शैलीत याला नवीन काळाची पत्रकारिता (न्यू एज जर्नालिझम) म्हटले जाते. म्हणजे वास्तुस्थिती मांडायची पण ललित अंगानं, कल्पनेची भरारी घेत वास्तवाच्या अंगाला भिडायचं. तेही केवळ तीन-चार पानांच्या जागेत. एखादं वास्तव पाहिलेलं आणि त्यावर वाचलेलं यांचं मिश्रण एखाद्या चित्रासारखं स्वच्छ दिसतं. ते चित्र एकाचवेळी अनेक गोष्टी सांगतं. ती एकोणिसाव्या शतकातील रशियन परंपरा होती. पोलंडमध्ये भूमिगत साहित्य नव्हतं. भूमिगत साहित्याची सुरुवात ७० च्या दशकात झाली. त्यांचं ‘द एम्परर’ हे पुस्तक पोलंड आणि सोव्हिएत युनियनमध्ये अक्षरशः एक नीतिशास्त्राचे पुस्तक म्हणून वाचलं जातं. अर्थात ते इथिओपिया किंवा तिथला राजा हेले सेलासीबद्दल आहेच, पण त्याहून अधिक ते कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीबद्दलही आहे. हेले सेलासी या इथिओपियन सम्राटाच्या एका दालनाचं वर्णन लेखक ‘अँटि सेप्टिक क्लिन’ खोली असं करतो. हेले सेलासी यांच्याजवळ काम करणाऱ्या नोकरांना कापुचिन्स्की भेटतो. तो नोकर लेखकाला सांगतो, की राजाकडे एक छोटासा जपानी वाणाचा कुत्रा होता. त्याचं नाव लुलु. सम्राटाच्या आलिशान पलंगावर झोपायची त्याला परवानगी होती. अनेक समारंभ होत. लुलु सम्राटाच्या मांडीवरून उठे आणि पळत जाई. एखाद्या प्रतिष्ठिताच्या बुटावर शू करी. आपले पाय ओले झालेत, असं ध्यानात आलं तरी त्या माणसाला तसूभरही हलता येत नसे. मी कापड घेऊन त्या प्रतिष्ठिताचे बूट कोरडे करत असे. दहा वर्ष मी हे काम केलं.
राजवाड्यातल्या नोकरांच्या मुलाखतींबरोबरच एवेलिन वॉ याच्या ‘दे वेअर स्टिल डान्सिंग’ या पुस्तकातले उतारे कापुचिन्स्की उद्धृत करतो. कापुचिन्स्की आदिस अबाबात पोचला ते १९६२ साल होतं. एवेलिन वॉ आदिस अबाबामध्ये १९३० साली गेला होता. सम्राट हेले सेलासी यांनी दिलेल्या पार्टीचं वर्णन वॉ करतो. एकीकडे झगमगाट आणि पक्वान्नाचे पर्वत. पलीकडे राजवाड्याच्या पिछाडीला काळोख. तिथं ऊष्टं खरकटं खाणाऱ्यांची झुंबड. निःशब्द. फक्त हाडं चघळण्याचे आवाज. ३२ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग, ६२ सालच्या घटना समजून घ्यायला मदत करतो. सर्व पुस्तकभर मुलाखती आहेत. प्रथमपुरुषी एकवचनी. हेले सेलासींची राज्य करण्याची रीत त्यात दिसते. प्रत्येक माणसाकडे ते संशयानं पाहतात. राज्यातली प्रत्येक नेमणूक ते करतात. खेडेगावातल्या पोस्टमास्तरचीही. राज्याचं उत्पन्न सम्राटाच्या खाजगीत रवाना होतं. तिथून ते स्विस बँकेत खाजगी खात्यात जमा होतं. राजाशी मतभेद दाखवणारा, गद्दारी करणारा मरणार. राज्यात कायम दुष्काळ. माणसं सतत दारिद्र्यात. सम्राटांना त्याची काळजी नाही. पत्रकारांना हाताशी धरून राजांनी स्वतःची चांगली प्रतिमा जगात तयार केलीय.
कम्युनिस्टांच्या काळात ज्ञानाच्या मर्यादित स्त्रोतांचा पुस्तक वगैरे वाचनावर प्रचंड राजकीय परिणाम दिसून येत होता. लोकांकडे फक्त एखादेच पुस्तक असायचे आणि मनोरंजनासाठी दुसरे कुठलेही साधन नसायचे - टेलिव्हिजन किंवा इतर मनोरंजन असे काही नव्हतेच म्हणून लोक आहे तेच पुस्तक अनेक वेळा खूप काळजीपूर्वक वाचत असत. वाचक संख्या अफाट तर होतीच, पण खूप बारकाईने लक्ष देऊन वाचणारीही होती. त्या काळात बाहेरच्या जगाचे कुतूहल शमविण्यासाठी लोकांकडेही वाचन हा एकमेव ज्ञानाचा स्रोत होता. आपल्याला हे मान्य करावे लागेल, की रशियन साहित्याला एक उज्ज्वल परंपरा होती आणि रशियन लोक उत्तम वाचकही होते. वाक्यांच्या मधल्या जागा वाचण्यासाठी लागणारी समज आणि सवय त्यांनी यातूनच कमावली होती. मजकुरामागील मजकूर वाचण्याची, मुळात वाचनाचीच कला आताशा हरवत चालली आहे, असंही कापुचिन्स्की एका मुलाखतीत म्हणतो, ते आजच्या काळालाही लागू होते. तरीही लेखक हे सुद्धा सुचवतो, की वास्तवाला कल्पनेची जोड दिल्याने माझं लेखन लोकांना वाचावंसं वाटतं.
युद्ध भूमीवर पत्रकार म्हणून वावरताना साधारणपणे सगळेच एकमेकांना सहकार्य करतात. कारण वास्तवाचा विचार केला, तर आहे त्याहीपेक्षा परिस्थिती खरोखरच भयानक असते. कापुचिन्स्की म्हणतो, हे असे सहकार्य करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नसतो. आम्ही नेहमीच एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, एका युद्धापासून दुसऱ्या युद्धापर्यंत गटा-गटांमध्ये फिरत असू... म्हणजे जर एखाद्या देशात डाव्या विचारसरणीचा जत्था आला, तर मी माझ्या पाश्चात्य सहकाऱ्यांना माझ्यासोबत घेऊन जायचो आणि जर उजव्या विचारसरणीचा कोणी असेल, तर ते मला घेऊन जायचे. त्याही काळात आम्ही ‘द न्यूयॉर्क टाइम्स’शी कधीच स्पर्धा केली नाही, कारण पोलिश प्रेस एजन्सी ही एक अतिशय छोटी एजन्सी होती, आणि महत्त्वाची तर बिलकूल नव्हती. युद्ध काळात परिस्थिती खूपच कठीण असल्याने म्हणजे बातम्या पाठवण्यासाठी वगैरे, कारण ई-मेल वगैरे त्या काळात काहीही नव्हते. टेलेक्स हे एकमेव साधन होते, परंतु आफ्रिकेत टेलेक्स खूप दुर्मीळ होते. म्हणून जर कोणी युरोपला उड्डाण करत असेल, तर आम्ही त्याला आमचा पत्रव्यवहार त्याच्याकडे सुपुर्द करायचो, तो तिथून आमच्या एजन्सीपर्यंत पोचवायचा. कापुचिन्स्की सांगतो की १९७५मध्ये अंगोलाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात, तीन महिने तो तिथे एकमेव वार्ताहर होता. अंगोलात त्यांच्या हॉटेलच्या खोलीत असताना एकदा कोणीतरी दरवाजा ठोठावला उघडून बघितले, तर समोर एकजण उभा होता, म्हणाला, मी न्यूयॉर्क टाइम्सचा प्रतिनिधी. अंगोलाचा अधिकृत स्वातंत्र्य उत्सव चार किंवा पाचच दिवस चालणार होता. यादरम्यान जगभरातील पत्रकारांच्या फक्त एकाच गटाला त्यावेळी विमानाने आत येण्याची परवानगी देण्यात आली होती. अंगोलामध्ये त्यावेळी कडकडीत बंद होता. तो पुढे म्हणाला, मला अंगोलाच्या सद्य परिस्थितीवरचा लेख ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला पाठवायचा आहे आणि त्याची अशीही इच्छा होती की कापुचिन्स्कीने तो लेख वाचून वाटले तर संपादितही करून पुढे पाठवावा आणि त्याबदल्यात त्याने व्हिस्कीची बाटली पुढे केली... कापुचिन्स्की म्हणतो, त्या काळात व्हिस्कीसारखी गोष्ट अंगोलात तरी अद्भुतच होती, कारण तिथे काहीही नव्हते, सिगारेट नाही, अन्न नाही, काहीही नाही...
संघर्षाच्या आगीत धाडसाने स्वतःला झोकून देत कोणालाही न दिसलेले, बहुदा कधीही न दिसणारे जग बारीक नजरेने टिपायचे आणि फारसा गाजावाजा न करता आपल्या पुस्तकांतून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणाऱ्या माणूस नावाच्या प्राण्याला जागे करायचे... हे कापुचिन्स्कीइतके प्रभावी फार कमी पत्रकार, लेखकांना जमले...इराणी पाहुणचार
कापुचिन्स्की नेहमी म्हणायचा, की त्या काळातील आम्हा लेखकांना खरोखरच कुठली ना कुठली तरी पार्श्वभूमी होती, विषयाचे ज्ञान होते. ती पत्रकारितेची एक अतिशय उच्च पात्रता होती - आम्ही सर्वजण उत्तम तज्ज्ञ होतो. एक काळ असा होता की संपूर्ण जगच समाजवादाने भारावून गेलेले होते. अशा प्रभावातच या लेखकाचीही जडणघडण झाली आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात इंग्रजांनी तुर्की बंडखोरांना मदत दिल्याने तुर्कस्थानचा पराभव झाला आणि त्यांच्या खलिफाची उचलबांगडी करण्याच्या शक्यतेने अनेक भयग्रस्त स्थानिक मुस्लिम नागरिकांनी स्थलांतर केले, पण खलिफाला खरं तर केमाल पाशानेच हटवले आणि नंतर सर्वांची सरसकट कत्तल करून टाकली. इथेही इंग्रजांनीच शाहच्या हातात सत्ता सोपवली, तेव्हा केरमान शहरातील नागरिकांच्या नातेवाईकांनी अगोदरच्या शाहला आसरा दिला होता, या अपराधाची शिक्षा म्हणून तमाम नागरिकांची कत्तल करण्यात आली. लहान मुलांचे डोळे काढण्यात आले. नंतरचे जे काही जिवंत राहिले, ते गळे कापून मारणारे थकले म्हणून. रस्तोरस्ती आंधळी मुले देशोधडीला लागली, तेव्हा इतरांना या अत्याचारांचा पत्ता लागला आणि त्यांच्या कारणांचाही. यामुळे शाहची दहशत कैक वर्षे टिकून राहली. शाहच्या राजवटीतलं क्रौर्य सांगत असतानाच कापुचिन्स्कीने घेतलेली टिपणं बोलू लागतात. इस्लामचा इतिहास कापुचिन्स्की सांगतो. शिया कसे असतात ते सांगतो. ‘पहिली गोष्ट म्हणजे शिया हा अतिशय वाईट संधिसाधू असतो’ अशा वाक्यानं टिपणांची सुरुवात होते. इराणचा आणि शियांचा इतिहास तो मांडतो. या शाहच्या काळात सावक नावाची एक धडकी भरवणारी सरकारी व्यवस्था निर्माण केली गेली. ती मंडळी कुठेही दबा धरून असायची आणि सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून कुणालाही उचललं जायचं. भर रस्त्यावर, उघडपणे कुठले शब्द बोलायचे नाही, याची भली मोठी यादीच लेखकाने दिली आहे. यातला कुठलाही शब्द सरकारविरोधी समजून त्याला उचललं जायचं, ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ हा सरसकट अनुभव लोकांना येत होता. हे असे मुद्दे लिहिताना लेखक आपल्या संग्रहातील फोटोंवर नजर मारतो, त्यातले मरणप्राय चेहरे बघतो, तेव्हा ते त्यांच्या लेखनातून आपल्याही डोळ्यासमोर उभे करतो. सावाकचे हस्तक माणसांना गपचुप नाहीसे करतात. खटला नाही. चौकशी नाही. भुकेली मांजरं पोत्यात भरतात. त्यात माणसाला ढकलतात. सापांच्या पिशवीत माणसाला सोडतात. तळघरात कुजबुजत ही माहिती लेखकाला सांगितली जाते.
पुस्तकभर निव्वळ मुलाखती, पण त्या कुणाच्या तर अगदी वरपासून खालच्या सामान्य माणसांपर्यंत. लेखक जेव्हा या धामधुमीत तेहरानच्या हॉटेलात उतरतो तेव्हा, त्याला सहज खोली मिळून जाते, पण त्याच हॉटेलात एकेकाळी एखादी रूम मिळणंही म्हणजे चक्क लॉटरीच लागणं कसं होतं त्या काळातही सहज फिरवून आणतो. कूम हे खोमेनीचं शहर. इथून खोमेनी मार्गदर्शन करायचे. या शहराबद्दल आणि खोमेनीच्या राहत्या घराबद्दल लेखक लिहितो कूममध्ये पाचशेवर मशिदी आहेत. इथूनच खोमेनी राज्य चालवतात. खोमेनींचं घर लहान. जुनाट. मोडकळीस आलेलं. घरापर्यंत जाणारा रस्ता कच्चा. धूळ, मधोमध वाहणारं गटार... खोमेनींची खोली रिकामी. भिंती रिकाम्या. फर्निचर नाही. जमिनीवर वळकटी. पुस्तकांची चळत. ते भात, दही आणि फळांवर राहतात. भिंतीला टेकून बसतात. हे वाचून खोमेनी डोळ्यासमोर उभा राहतो. या लोकांसाठी मशीद म्हणजे निव्वळ परमेश्वराचे ध्यान करायची जागा नसते. मशीद म्हणजे सर्वस्व असते. तिथे जाऊन त्यांना आपल्या आप्तांना, नातेवाईकांना भेटायचे असते, चहा प्यायचा असतो, सुखदुःखाच्या गप्पा करायच्या असतात, खरेदी करायची असते... मशीद आणि परिसर यामध्येच शिया माणसाला जगातल्या सगळ्या गोष्टी मिळतात, म्हणूनच या मशिदींच्या भोवतालीच सगळे बाजार फुललेले दिसतात, याचं अचूक वर्णन लेखकानं केलेलं आहे. इमारतींचे आकार, त्या बाहेरून कशा दिसतात हा त्यांचा एक पैलू झाला. कापुचिन्स्की अर्किटेक्चर, समाज, माणसं, इतिहास, राजकारण अशा नाना गोष्टी मोठ्या खुबीने एकत्र गुंफतो. इराणी समाज, मुस्लिम मानस त्यातून समजतं. हाच इराणचा शाह नंतर एकांतवासात मरून गेला, तेव्हा त्यांच्या जवळ कुणीही नव्हते, याचं लेखकानं केलेलं करूण चित्रण मुळातूनच वाचायला हवे.
वाचकांना समृद्धी देणारे लेखन
पोलिश वंशाचा पत्रकार असलेल्या रेसार्द कापुचिन्स्कीने १९५८ ते १९८०पर्यंत विविध पोलिश नियतकालिकांमध्ये आणि प्रेस एजन्सींमध्ये आफ्रिकन वार्ताहर म्हणून काम केलं. पोलंडच्या कैक पिढ्या कापुचिन्स्की वाचतच मोठी झाली. त्यांच्या इम्पेरियम (ग्रँटा बुक्स, १९९४) या पुस्तकात, तो रशियन राज्य आणि दैनंदिन रशियन आयुष्यावर हुकूमशाहीचे परिणाम यावर ज्या पोटतिडकीने लिहितो, ते वाचून आपणच हादरून जातो. तो रशियात उतरतो आणि भोवताली जिथे तिथे फक्त तारेचीच कुंपणं बघतो आणि आपल्या मिश्किल शैलीत लिहितो, की रशियात सर्वात जास्त उत्पादन बहुतेक तारेच्या कुंपणाचेच केले जात असावे. त्यामुळे औद्योगिक उत्पादनात तो मागेच राहिला आणि त्या अनुषंगाने आलेल्या अनेक दुष्परिणामांना कैक वर्षे भोगतही राहिला.
या लेखकाची तुलना काही समीक्षकांनी विन्स्टन चर्चिल बरोबर केलेलीही काही ठिकाणी वाचायला मिळाली. चर्चिलही वास्तव आणि कल्पना यांचा अद्भूत मेळ घालून चटपटीत लिखाण करायचे. त्यांना नोबेल मिळालं, पण कापुचिन्स्कीला नोबेल नाही मिळालं, कारण त्याच्यावर हाही आक्षेप होता की त्याने कल्पनांचा वास्तव लेखनात अतिरेकच केला आहे. असं म्हटलं जातं, की कापुचिन्स्कीने दोन वह्या ठेवल्या होत्या, एक वही ज्या संस्थेने त्याला परदेशात पाठवले होते त्या पोलिश वृत्तसंस्थेकडे पाठवायच्या अहवालांसाठी होती, आणि दुसरी वही त्याने नंतर जुलूम, सत्ता आणि क्रांतीवरील त्याच्या पुस्तकांमध्ये वापरलेल्या संदर्भासाठी होती. यांच्यातील फरकांमुळे त्याने तथ्ये खोटी ठरवल्याचाही त्याच्यावर आरोप झाला आहे. कापुचिन्स्कीने त्याच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं. प्रेमसंबंध ठेवले. पोलंडच्या सरकारसाठी हेरगिरीही केली आणि १९८१पर्यंत त्याचे पक्ष सदस्यत्वही कायम ठेवले. परंतु कापुचिन्स्कीचा चरित्रकार डोमोस्लाव्स्की त्याच्याबद्दल नेहमीच सौम्य दृष्टिकोन बाळगतो. हे असे अकाल्पनिक लेखन आहे जे काल्पनिक कथांना तुच्छ मानत नाही, असे म्हणून तो कापुचिन्स्कीच्या लेखनाचे कौतुकही करतो आणि लेखक म्हणून त्याचा दृष्टिकोन तो अगदी सहजपणे स्वीकारतो. कापुचिन्स्की एकदा म्हणाले होते की, मला नुसते निरीक्षणापुरते थांबायचे नाही, तर परिस्थितीत सहभागी व्हायचे आहे.
व्यक्तिशः मला यांची पुस्तके वाचताना जगाचे एक वेगळेच भान येत गेले. कापुचिन्स्की आपल्याला भोवतालच्या जगाकडे बघण्याची एक अद्भुत नजर देतो, म्हणजे नकळत आपलीही समज वाढवतो!
-oOo-
गणेश मनोहर कुलकर्णीगणेश मनोहर कुलकर्णी प्रसिद्ध ललितलेखक, कला आस्वादक आहेत. त्यांच्या ‘रूळानुबंध’ या लेख संग्रहाला अलीकडेच राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ईमेल:
रविवार, २० जुलै, २०२५
घुसमटीचा हुंकार दुमदुमला!
-
मान-सन्मान
बुकर पुरस्कारविजेत्या दोघी जणी: बानू मुश्ताक आणि दीपा भश्ती...आधी हिंदीतल्या गीतांजली श्री आणि आता कानडी बानू मुश्ताक. बानू मुश्ताक कन्नड भाषेत कथालेखन करतात. त्यांच्या कथा निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय मुस्लीम स्त्रियांच्या कोंडमाऱ्याचे, मनात उफाळून येत असलेल्या धुम्मसीचे चित्रण करतात. स्त्रीवादी लेखिका, कार्यकर्ता, वकील, पत्रकार अशी विविधांगी ओळख असलेल्या बानू मुश्ताक यांना यंदाचा मानाच बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी हा मान ‘रेत समाधि’ ही अद्भूत नि विहंगम कादंबरी लिहिणाऱ्या गीतांजली श्री यांना मिळाला होता. म्हणजेच सलग दुसऱ्यांदा भारतीय स्त्री लेखिका जागतिक साहित्यविश्वात नावाजली गेली. त्यांच्या कथालेखन प्रवासाचा मागोवा घेणारे हे टिपण...२५ फेब्रुवारी २०२५ रोजी कानडी लेखिका, कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांचा ‘हार्ट लॅम्प’ हा कथासंग्रह इंटरनॅशनल बुकर पारितोषिकाच्या ‘लाँग लिस्ट’मध्ये सामील झाल्याची अधिकृत घोषणा झाली, तसे ८०च्या घरातल्या या कानडी लेखिकेकडे देशभरातल्या साहित्यजगताचे लक्ष वेधले गेले. आधी १३ पुस्तकांच्या प्राथमिक यादीत, मग सहा पुस्तकांच्या लघुयादीत समावेश झाला, तसे हे कुतूहल वाढत गेले आणि शेवटी २० मे २०२५ रोजी इंटरनॅशनल बुकर पारितोषिकासाठी त्यांच्या ‘हार्ट लॅप’ या कथासंग्रहाची निवड झाल्याची घोषणा झाली.
कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यातील पारंपरिक मुस्लिम कुटुंबातून (जन्म १९४८) आलेल्या बानू मुश्ताक यांनी कुटुंबाच्या मर्जी विरूद्ध प्रेमविवाह केला. पण नंतरच्या अनपेक्षित त्रासदायक अनुभवातून त्यांची स्त्रीप्रश्नांकडे व चळवळीकडे वाटचाल झाली. कानडीतील डी.आर. नागराज आणि शूद्र श्रीनिवास यांनी १९७४मध्ये सुरू केलेल्या बंडाय आंदोलनाशी त्या जोडलेल्या होत्या. त्या काळात कर्नाटकातील कार्यकर्ते लेखक-संपादक पी. लंकेश यांच्या ‘लंकेश पत्रिके’त त्या वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले. तोवर त्यांनी केलेले काही कथा, कवितालेखन बरेचसे हौशी स्वरूपाचे होते. राजकारणातही एक इंनिंग या काळात खेळून झाली. हसन नगरपरिषदेत त्या दोन वेळा सदस्य म्हणून निवडून आल्या. १९९०मध्ये पत्रकारितेतून बाहेर पडून वकिली सुरू केल्यानंतर काही स्थैर्य आले, तसा त्यांच्या कथात्म लेखनाला बहर आला. आजवर त्यांचे सहा कथासंग्रह, एक कवितासंग्रह, एक कादंबरी आणि एक लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. १९९०-२०२३ या काळात त्यांनी लिहिलेल्या ५० कथांमधील १२ निवडक कथांचा कानडीतून इंग्रजी अनुवाद दीपा भिश्ती यांनी केला, जो सप्टेंबर २४मध्ये इंग्लंडमध्ये प्रकाशित झाला. त्याआधी भिश्तींनी त्यांचा ‘हसीना अँड अदर स्टोरीज’ हा संग्रह देखील इंग्रजीत अनुवादित केला होता, त्याला ‘पेन इंटरनॅशनल ट्रान्सलेशन’ सन्मान मिळाला होता.
विद्रोहाचा आलेख
‘हार्ट लॅम्प’ या संग्रहामध्ये बानूंच्या निवडक १२ कथा समाविष्ट आहेत. प्रामुख्यानं मुस्लिम स्त्रियांचं अडचणी आणि वेदनांनी भरलेलं आयुष्य या कथांच्या केंद्रस्थानी आहे. कौटुंबिक, सामाजिक व्यवस्थेतले अन्याय आणि शोषण यातून ‘हृदयातले दिवे’ विझू लागलेल्या स्त्रिया यात प्रामुख्याने आहेत.
‘वोग’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लग्नानंतर आपले आयुष्य कसे बदलले हे सांगितले आहे. त्या म्हणतात, ‘मला नेहमीच याविषयी लिहायचे होते. प्रेमविवाह (असूनही) नंतर अचानक मला बुरखा वापरावा आणि घरीच राहून घर सांभाळावे, असे सांगण्यात आले. २९ व्या वर्षी मी प्रसवोत्तर औदासिन्यात (Postpartum depression) गेले होते.’ याच सुमारास कानडीतील सत्तरीच्या दशकातल्या बंडाय आंदोलनाशी त्यांचा संपर्क झाला. त्यानंतर त्यांनी विद्रोहाचा रस्ता स्वीकारला आणि आपले आयुष्य यातनामुक्त केले. पुढे दशकभराच्या पत्रकारितेनंतर त्यांनी वकिली सुरू केली. ‘हार्ट लॅम्प’मध्ये अशाच विद्रोहाचे आणि स्त्रियांच्या मानसिक कणखरपणाकडच्या प्रवासाचे दर्शन होते.
‘लव बर्ड’ कथेतली सुजाता परिवाराच्या विरोधात जाऊन त्यांनी दाखवलेल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करीत प्रेमविवाह करते, पण लग्नानंतर प्रियकराचे खरे रूप समोर येताच दाहक वास्तवाची जाणीव होते, तसे पश्चात्तापात जळत मन आत्महत्येच्या विचारापर्यंत पोचते. ‘वोग’ला दिलेल्या मुलाखतीत त्या पुढे म्हणतात, ‘माझ्या लेखनातून मी सतत धार्मिक व्याख्यांना आव्हान देत आले आहे. समाज बदलला आहे, तरी मूलभूत मुद्दे आजही जसेच्या तसेच आहेत. संदर्भबदललेत तरी स्त्रिया आणि परिघावरचे समूह यांचे मूलभूत संघर्ष अद्याप तसेच चालू आहेत.’
अभिव्यक्तीची अटळता
बुकर पुरस्कार समितीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना कथांचे प्रेरणास्त्रोत आणि (एकूणच) लिहिण्याची कारणं विचारली असता त्या म्हणाल्या, ‘माझ्या कथा महिलांच्या कथा आहेत. धर्म, समाज आणि राजकारण या सर्वांनीच महिलांकडे कायम आपलं म्हणणं कुठलाही प्रश्न न विचारता मान्य करण्याची मागणी केली. असं करताना ते महिलांना मानवी क्रौर्याची शिकार बनवत आले. माझे अनुभव आणि रोज माध्यमांत येतात त्या बातम्या यातून मला हे सगळे कथेतून मांडण्याची प्रेरणा मिळाली. या महिलांचे दुःखयातनांनी भरलेले असहाय्य जीवन पाहताना माझ्या मनात एक विचित्र भावना येते, ज्याची प्रतिक्रिया म्हणून लिहिणे माझ्यासाठी अटळ, अपरिहार्य होते. मी फार संशोधन वगैरेंवर विश्वास ठेवत नाही, माझे हृदय हेच माझे संशोधनक्षेत्र (रिसर्च फील्ड) आहे. एखादी घटना ज्या तीव्रतेने मला प्रभावित करते (उद्वेग आणते) तितक्याच गहनात आणि भावनात्मकतेने मी ती कथेत आणते.
एरवी, इतरांच्या भावना उचंबळून येतात नि कालांतराने विरतातही. बानू मुश्ताक यांच्या संदभनि उचंबळून आलेल्या भावनांतून वास्तव टिपणाऱ्या कथा आकारास येत जातात...सत्तरीचे दशक कर्नाटकात आंदोलनांचे दशक होते. दलित, शेतकरी, महिलांची तसेच भाषा-पर्यावरणाशी संबंधित अशा सर्व आंदोलनांचा हा काळ होता. मंचीय चळवळीही (थिएटर अॅक्टिव्हिटीज) सुरू होत्या. या सगळ्यांनी मला प्रभावित केले. परिघावर असणारे विभिन्न समूह आणि महिलांच्या आयुष्याशी थेट जोडलेली असल्याने मी हे सगळे जाणत होते, समजून घेत होते. या जोडलेल्या असण्यातून माझ्या लेखनाला बळ मिळाले. एकंदर माझे लेखक होणे-असणे, ही कर्नाटकातील तत्कालीन सामाजिक परिस्थितीची उपज आहे, असे म्हणता येईल.
मौलिक ऐवज
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे श्रेय मात्र त्या अनुवादक दीपा भरतींना देतात. २०२५च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या निवडसमिती (ज्यूरी) चे प्रमुख मॅक्स पोर्टर ‘हार्ट लॅम्प’च्या निवडी संदर्भात म्हणाले, ‘इंग्रजी वाचकांसाठी ‘हार्ट लॅम्प’ हा खरंच नवा ऐवज आहे. भाषेला मुळापासून गदगदून हलवून टाकणारा हा मौलिक अनुवाद आहे. इंग्रजीतल्या वैविध्यात त्याने नवी भर पडली आहे. त्याने अनुवादाबाबतच्या आमच्या आकलनाला आव्हान देत त्याचा विस्तारही केला. या सुंदर, व्यग्र, आयुष्याला सघन करणाऱ्या कथा मूळ कानडी भाषेतल्या आहेत. यात भाषा आणि बोलींतली सामाजिक, राजकीय तत्त्वंही सामील आहेत, ज्यांनी याला अधिक समृद्ध केले आहे. या कथा महिलांचं आयुष्य, मुलं जन्माला घालण्याबाबतचे त्यांचे अधिकार, त्यांच्या सर्वांगीण शोषणासंदर्भाने बोलतात. सर्व ज्यूरी सदस्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या कथांची केलेली प्रशंसा ऐकणे आनंददायी होते. हा आनंद जगभरच्या वाचकांशी वाटून घेताना आम्ही रोमांचित झालो आहोत.’
लेखन प्रेरणेसंदर्भात बानू म्हणतात, ‘लिहिणं माझ्यासाठी श्वास घेण्याइतकं सहज आहे. मी जो काही विचार करते, आपल्या आसपास पाहते, त्यातून मला जे जाणवते त्याला कथेच्या प्रकारात उतरवणे मला सहजशक्य आहे. फक्त लिहिणे सुरू करायची खोटी असते. लिहिणं माझ्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक प्रकारही आहे. आसपास काही गैर, चुकीचे घडत असेल तर (ते कळल्यावरही) गप्प बसणे मला शक्य होत नाही. भावनेला दाबून ठेवणे जमत नाही मला. मी लिहून प्रतिक्रिया देते.’
रोष परंपरावाद्यांचा
आपले लेखन आणि त्यातले विचार यातून बरेच जण नाराज झाल्याच्या, त्यांच्या रोषाला बळी पडण्याच्या, त्यातून मुश्किलीनं बाहेर पडण्याच्या अनुभवाबद्दल विचारले असता बानू म्हणतात, ‘साल २००० माझ्यासाठी संकटे-अडचणींनी भरलेले होते. त्याआधीच मी मशिदीतल्या स्त्रियांच्या अधिकारांबद्दल बोलत त्याचे समर्थन केले होते. तेव्हापासून धमक्यांचे फोन येत. बरेच महिने मी घरातच राहिले, बाहेर जाणे येणे थांबले होते. कुटुंबाबाबत मोठीच चिंता वाटत होती. विशेषतः मुलांची फार काळजी वाटत होती. पण तेव्हा पती आणि आई माझ्याबरोबर होते. माझी आई जेमतेम हायस्कूलपर्यंत शिकलेली, काय होतंय तिला माहीत नव्हतं. पण मी त्रासात आहे, हे तिला कळलं होतं. मी तिला सगळं सांगितलं, तेव्हा तिने माझ्या विचारांचे समर्थन केलं. अगदी या सगळ्यांत मला काही झालंच, तर ती माझ्या मुलांची काळजी घेईल, असंही म्हणाली. फार धोकादायक दिवस होते ते. ती दोन वर्षं मी काहीही लिहू शकले नाही.’
वळणे, आडवळणे, खाचखळगे कधी आयुष्य संपवून टाकण्याची आत्मनाशी भावना, कधी परंपरेविरोधातली बंडखोरी तर कधी वंचितांसाठी केलेली धडपड यातून आत्मदीप उजळला... बानू मुश्ताक यांना बुकरचा सन्मान देऊन गेला...इंटरनॅशनल बुकर पुरस्कारासाठी नामांकित होणे ही लहानसहान गोष्ट नाही. आपले नाव या यादीत पाहिल्यावर काय वाटले, असे विचारल्यावर बानू म्हणाल्या, ‘काही वर्षांपूर्वी दीपा भश्तींनी माझ्या पहिल्या कथासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद केला, ‘हसीना अँड अदर स्टोरीज’ या शीर्षकाने. त्याला मागील वर्षी इंग्लिश पेन ट्रान्सलेशन अॅवार्ड मिळाले. त्यानंतरच्या काळातल्या निवडक ११ कथांचा अनुवाद आता ‘हार्ट लॅम्प’मध्ये आहे. हे पुस्तक आता इंटरनॅशनल बुकर पुरस्कारासाठी नामांकित १३ पुस्तकांच्या सूचीत येणं माझ्यासाठी आनंदाचं आहे फार. त्यातून जी ख्याती आणि ओळख मिळेल त्यासाठी मी खूश आहे. या निमित्ताने कानडी भाषेला प्रातिनिधित्वाची संधी मिळतेय हेही आनंदाचे.’
जीवनदृष्टी विस्तारणारी भाषिक लय
आपल्या लेखनप्रक्रियेसंदर्भात त्या सांगतात, ‘मी वकिली व्यवसायात आहे, त्यामुळे लिहिण्यासाठी वेळ मिळत नाही. पूर्वी माझ्याकडे एक साहाय्यक होता, त्याला मी डिक्टेट करत असे. अलीकडे मात्र मी मोबाइल अॅप वापरते. कोर्टातले माझे ड्राफ्टही मी त्याच्याआधारेच तयार करते. माझे उच्चार आणि भाषा त्याला समजतात, त्यामुळे फार कमी सुधारांसह माझी मुद्रणप्रत तयार होते. काळाबरोबर लोकांमध्ये दुरावा वाढत चालला आहे, समाज माध्यमांमध्ये वेगळे चित्र दिसते. अशी काही माणसं आहेत, ज्यांना मी दशकांपासून ओळखते, पण ते समोरासमोर भेटून बोलत नाहीत, तरी समाजमाध्यमांवर माझ्या राजकीय विचारांबाबत त्यांना असलेली उत्सुकता कमी झालेली नाही. सध्या माझ्या सातव्या कथासंग्रहावर काम करतेय. आत्मकथेचेही लेखन अर्ध्यावर आले आहे. पण आता आणखी काही गोष्टी त्यासाठी गोळा कराव्या लागणार आहेत. त्या मी लवकरच करेन.’
अनुवादक दीपा भश्ती या इंटरनॅशनल बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक आहेत. गीतांजली श्री यांच्या बुकर मिळालेल्या ‘रेत समाधि’ या हिंदी कादंबरीचा अनुवाद डेझी रॉकवेल या ब्रिटिश अनुवादिकेने केला होता. ‘हार्ट लॅम्प’ हे भश्ती यांचे प्रकाशित अनुवादाचे तिसरे पुस्तक आहे. याआधी त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बुजुर्ग लेखक शिवराम कारंथ यांची कादंबरी अनुवादित केली आहे. समीक्षा आणि विविध सांस्कृतिक संदर्भातले त्यांचे लेखन ‘पॅरिस रिव्ह्यू’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ सहित चाळीसच्यावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमधून प्रकाशित झाले आहे. लेखकाची जीवनदृष्टी आणि भाषिक लय अनुवादात नेमकी उतरावी यासाठी त्या मुश्ताक़ यांच्याबरोबर तीन वर्षे काम करीत होत्या. त्या मेहनतीवरच बुकर पुरस्काराची मोहोर उठली आहे.
-oOo-
हा लेख jankipul.com या प्रभात रंजन यांच्या वेब पोर्टलवरील दोन टिपणांचा संपादित अनुवाद आणि अन्य माहितीवरून तयार केला आहे.
नीतिन वैद्य
ईमेल :
घनवादाचे चित्र-विज्ञान
-
ज्ञान-विज्ञान
पिकासो आणि त्याचे ब्युबिस्ट शैलीतले लालबत्ती भागातल्या रमणींचे चित्र...शब्द नसलेली संगीत सुरावट श्रोत्याला आनंद देते. शब्द हे भाषेचे मूलघटक वापरुन कवी ग्रेस अमूर्त कविता निर्मितात आणि वाचकाला मोहून टाकतात. त्याचप्रमाणे आकार, रेषा वापरुन चित्रकार अमूर्त चित्र निर्मितात आणि दर्शकाला विलक्षण आनंद देतात. शब्द नसलेली सुरावट ऐकताना होणारा प्रत्येक श्रोत्याचा आनंद आगळा वेगळा, कवितेच्या प्रत्येक वाचकाचे मोहरून जाणे भिन्न-विभिन्न, अमूर्त चित्राची प्रत्येक दर्शकाची अनुभूती दृष्टीवेगळी. चित्रकला ही एक ज्ञानशाखा आहे. निसर्गाचा शोध घेत विज्ञान प्रयोग करत ही ज्ञानशाखा नवीन ज्ञान मिळवते. या पार्श्वभूमीवर पाश्चात्य चित्रकला ही ज्ञानशाखा कशी आकारास आली याचा इतिहास तपासणे उद्बोधक आहे...कला ते ज्ञानशाखा
सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील चित्रकार, शिल्पकार यांना समाजात स्थान आणि मान नव्हता. हे लोक म्हणजे, हातकाम करणारे कारागीर असाच समज समाजात सर्वदूर पसरला होता. सत्ता आणि मत्ताधारी या दोहोंच्या लेखी ही कारागिरी होती. लेखक, कवी, नाटककार, लॅटिन बोलणारे पंडित, यांना समाजात आणि दरबारात मोठा मान होता. मात्र त्यापासून चित्र-शिल्पकार खूपच दूर होते. सरदार-दरकदार, धनिक व्यापारी यांच्या घरी मेजवानीला लेखक कवी वगैरेना आमंत्रण असे, पण चित्र कलावंतांना यात स्थान नसे.
या पार्श्वभूमीवर, चित्रकार, शिल्पकार यांनी समाजातील धुरिणांशी वाद घातले, चर्चा केल्या आणि हस्तकौशल्य हे मेंदूकौशल्यच असते, हे त्यांना पटवून देण्याची पराकाष्ठा केली. हळूहळू परिस्थिती बदलली. सुरुवातीला होतकरू चित्रकार मोठमोठ्या चित्रकार शिल्पकारांकडे रंग घोटण्यापासून माती कालवण्यापर्यंत कामे करत आणि ‘मास्टर’च्या मर्जीनुसार शिकत. कालांतराने ही स्थितीही बदलली. कला ही तत्त्वज्ञानासारखी ‘अकॅडमी’मध्ये शिकवली जाऊ लागली.
अकॅडमी हा शब्द वापरण्यामागे कलेबद्दलचा बदलेला दृष्टिकोन होता. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो एका राईत विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवत असे, त्याला ‘अकॅडमी’ म्हणत असत. त्यावरून हा शब्द आला आहे. आरंभाला इटालियन कलाकार एकत्र जमत त्याला ते अकॅडमी म्हणत, त्यांना कलेचा संबंध मेंदूकौशल्याशी, व्यासंगाशी, आहे हे जणू दाखवून द्यायचे होते. अठराव्या शतकापासून चित्र-शिल्पकला शिकवणाऱ्या संस्थांसाठी ‘अकॅडमी’ हा शब्द रूढ झाला. कलाशाखा ही ज्ञानशाखा होतीच, ती आता समाजमान्य झाली, असे म्हणणे सुयोग्य ठरेल. ज्ञानाचा संबंध कल्पनेची भरारी आणि त्यासाठी प्रयोग यांच्याशी असतो. असे प्रयोग पूर्वीही होत होते, तसेच ते पुढेही चालू राहिले.
घाट आणि रंगांची मुक्ती
निसर्गातील मूलभूत घटकांकडे जाण्याचा ध्यास जसा विज्ञानाला, तसा तो दृश्यकलेलाही असतो. या मूलभूत घटकांकडे चित्रकलेच्या माध्यमातून जाण्याच्या ध्यासातून क्युबिझम घनवादाच्या चळवळीचा उगम आहे. मॉडर्न अॅबस्ट्रॅक्ट आर्ट = आधुनिक अमूर्त कलेत दोन मूलभूत घटकांच्या बाबतीत प्रगत पाऊले पडली, ‘लिबरेशन ऑफ फॉर्म’ आणि लिबरेशन ऑफ कलर घाटांची मुक्ती आणि रंगांची मुक्ती. यातील घाटांच्या मुक्तीचे पाऊल क्युबिझमने टाकले. तेव्हापासून आधुनिक चित्रकलेत कलावंताच्या व्यक्तिनिष्ठ चित्रदृष्टी-व्हीजनचे; त्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व दिसू लागले. भवतालातील नैसर्गिक विभ्रम, घाटांचे मोहजाल या पेक्षा कलावंताच्या मनातील भ्रम-विभ्रम त्याच्या कलाकृतीत प्रतिबिंबित होऊ लागले.
निसर्गातही अमूर्त घाट असतात, त्याचा मेंदू कसा अर्थ लावतो हे पाहणे मनोहारी आहे.
पॅरिडोलियाः यादृच्छिक पोत
याचा अर्थ, यादृच्छिक रॅन्डम किंवा अमूर्त अॅबस्ट्रॅक्ट ‘व्हिजुअल पॅटर्न’ ‘दृष्टिगम्य नमुनाकृती’मध्ये अनेकदा अर्थपूर्ण प्रतिमा पाहण्याची मेंदूची क्षमता असते. काही उदाहरणांनी ही संकल्पना स्पष्ट होईल. आकाशात ढग विहरत असतात. माणूस त्याकडे गमतीने पाहत असतो. अचानक एखादा ढग त्याला कुत्र्यासारखा भासतो, तर कधी विदुषकासारखा! कधी कधी विलक्षण आकाराच्या फळभाज्या शेतकऱ्याला त्याच्या बागेत भेटतात. कोणाला त्यात मूर्तीचा भास होतो, त्याचे फोटो वर्तमानपत्रात येतात.
पॅरिडोलियाने मोठमोठ्या वैज्ञानिकांना सुद्धा चकवले आहे. १९७६चा जुलै महिना होता. वायकिंग-वन हे स्पेसक्राफ्ट मंगळाच्या पृष्ठभागाचा धांडोळा घेऊन नासाला फोटो पाठवत होते. अचानक माणसाच्या चेहऱ्यासारखा फोटो वैज्ञानिकांना आढळला. तो फोटो जगभर व्हायरल झाला. त्या छायाचित्राचे संशोधकांनी विश्लेषण केले. विविध सावल्या एकत्र येऊन ही प्रतिमा तयार झाली होती. हा पॅरिडोलियाचा प्रकार आहे, हे सिद्ध झाले. सप्टेंबर २०२३. नासाच्या प्रिझव्र्हरन्स रोव्हरने खडकांचे फोटो पाठवले. एक खडक शार्क फिनच्या आकाराचा तर दुसरा खेकड्याच्या पंजासारखा होता. हा पॅराडोलियाच होता.
कोणताही ‘रँडम’ आकार वा घाटाचा प्रकार माणसाने पाहिला तर तो माणूस त्याच्या स्मृतीत जे आकार नोंदवलेले असतात, त्याच्याशी त्या रँडम घाटाची तुलना करून त्या आकाराशी जो आकार जुळेल त्याचे रोपण त्या रँडम आकारावर करतो. त्याचा भास त्याच्या नजरेला होतो. हा पॅराडोलियाचा गाभा आहे. म्हणजे स्मृतीत जर त्या सारखा किंवा त्याच्या जवळ जाणारा घाट नसेल तर मेंदू त्या आकाराचा अर्थ लावण्याचे कष्ट घेत नाही. या पार्श्वभूमीवर दृष्टीविज्ञानाच्या निकषानुसार क्युबिझमचा शोध या लेखात घेतला आहे.
पॅरिसचा परिसस्पर्श
दृश्यकलेच्या अनेक चळवळीत पॅरिसचा परिसस्पर्श महत्त्वाचा ठरलेला आहे. घनवाद या चित्र चळवळीचे उद्घाटन पॅरिसमध्ये झाले. पॉल सेझान हा इथे सूचक बिंदू असला तरी या घनवादाच्या उद्घाटनाचे श्रेय पाब्लो पिकासो (१८८१-१९७३) आणि जॉर्ज ब्राक (१८८२-१९६३) यांना दिले जाते. प्रातिनिधिक कलेचा त्याग करणे हा घनवादाचा उद्देश नव्हता, पण काहीतरी सुधारणा करण्याचा उद्देश असावा, असे पाश्चात्य कलेच्या इतिहासकारांनी नमूद केले आहे.
आंतरविद्याशाखीय विचारधारांकडे नजर टाकली म्हणजे, काही समांतर धारा दिसतात. ज्यावेळी घनवादी चित्रकार कॅनव्हास वरील अवकाशाचे आयोजन करून नवीन वास्तव रचीत होते. त्याच सुमारास (१९२४) साहित्यात, कलेत सर्रिआलिझम अर्थात अतिवास्तववादाची सुरुवात झाली होती.
वास्तव अनेक असतात, प्रत्येकाचे वास्तव वेगळे, स्वप्नातील वास्तव आगळे आणि नेणीवेतील तर त्याहून विलक्षण. शब्दांच्या अवकाशात साहित्यकार अशी वास्तवे रचून निराळाच अनुभव देण्याचा प्रयत्न करतात.
दृश्यकला, साहित्य यातील नवनवे प्रयोग फ्रान्समध्ये झालेले दिसतात. पाश्चिमात्य देशातील सर्व कलांच्या दृश्यकलेपासून साहित्यापर्यंत चळवळीचे केंद्र मुख्यत्वे करून फ्रान्स होते असे का? विचारात पडलो. जुन्या नोंदीचा धांडोळा घेतला. चार्ल्स बॉदलेअर (१८२१-१८६७) हा एक वादग्रस्त पण प्रभावी कवी आणि कलासमीक्षक याचे एक विधान महत्त्वाचे वाटले. ते असे ‘आधुनिक जीवनात सौंदर्याचा स्वभाव, रुप बदलत असते. माणसांची पंचेंद्रिये विविध उद्दीपकाद्वारे सौंदर्याच्या लहरी घेऊन येत असतात, पण शेवटी ही पंचेंद्रिये आत खोलवर कुठेतरी एकवटलेली असतात.’
मला हे विधान मेंदूविज्ञानाच्या नजरेतून अर्थपूर्ण वाटले. कलाकाराला पंचेंद्रियांची जाण असणे, सोबतच सौंदर्याचा स्वभाव आणि रुप काळानुसार बदलत असते याचे भान असणे, हाच कलेच्या चळवळीचा आरंभबिंदू असू शकतो. कारण हा बदल मेंदूत घडत असतो. आता बराच उलगडा मला झाला.
फ्रान्स आणि ब्रिटन या दोहोंमध्ये काही तासात पार करता येईल, अशी दर्याची दरी. याच कालखंडात पल्याडच्या ब्रिटनमध्ये काय घडत होते, ते तपासले. १८५०च्या जुलै-ऑगस्टमध्ये लंडन शहर ऐतिहासिक ‘The Great Stink - द ग्रेट स्टिंक’ महादुर्गंधीने त्रस्त झाले होते. थेम्स नदीत स्वच्छ प्रक्रिया न केलेले सबंध शहराचे सांडपाणी सोडल्यामुळे हे घडले होते. ब्रिटनमधील शहरात कॉलराच्या साथी पसरल्या होत्या. पार्लमेंटने १८५० मध्ये महत्त्वाचा लोकोपयुक्त ‘ग्रंथालय कायदा’ पास केला होता. १८५१ मध्ये तंत्रज्ञान, विज्ञान आणि औद्योगिक क्रांति दाखवणारे जागतिक ‘The Great Exibition द ग्रेट एक्झिबिशन’ भरवले जात होते.
फ्रान्स आणि ब्रिटन अगदी जवळ असणारे भूगोलाचे दोन तुकडे, पण दोन किती भिन्न संस्कृती. तेव्हा घनवादाच्या कला चळवळीचा आरंभ फ्रान्समध्ये होणे, याचे बीज फ्रेंचांच्या स्वभावाला धरून आहे.
घनवाद एक विश्लेषण
हुआन ग्री- Juan Gris (१८८७-१९२७) हा स्पॅनिश पेंटर आणि कला समीक्षक. जन्म, शिक्षण माद्रिद येथे, पण बहुतेक जीवन पॅरिसमध्ये. पाब्लो आणि जॉर्ज हे दोघे हुआन ग्रीचे दोस्त होते. हुआन ग्री हा स्वतः क्युबिस्ट होता. त्याने पाब्लोचे क्युबिस्ट शैलीत पोर्ट्रेट काढले होते. हुआन ग्रीने घनवादाबाबत लिहिले आहे. त्याचा आशय असाः ‘घनवाद हे एक प्रकारचे विश्लेषण आहे. चित्रकार एका वस्तूकडे पाहत त्या वस्तू भोवती गोल फिरतो, तेव्हा एका पाठोपाठ एक त्या वस्तूचे अवतार चित्रकार पाहतो आणि त्या क्रमनुसार प्रतिमा एकीकृत = fused करून कॅनव्हासवर उमटवतो. वस्तूभोवती फिरत असताना दर क्षणाला, वेगळ्या कोनात त्याला त्या वस्तूची प्रतिमा दिसते. त्यातील अस्थिर घटक त्याला उघड करून दाखवायचे असतात. हे अस्थिर घटक अशाप्रकारचे असतात जे सतत बदलत नाहीत. जरी ते अस्थिर असले तरी, असे क्युबिस्टला दाखवायचे असते. कारण ते घटक नित्य आणि जरुरीचे असतात, असे क्युबिस्टला वाटत असते,’ हुआन ग्रीचे घनवादाबाबतचे हे स्पष्टिकरण बरेच काही सांगून जाते. या स्पष्टिकरणाचा धागा पकडून पिकासोच्या एका चित्राचे मेंदूतज्ज्ञांनी केलेले विश्लेषण उद्बोधक ठरेल.
पिकासोची पेंटिग्ज
Les Demoiselles d'Avignon हे १९०७ सालचे पिकासोचे पहिले क्युबिस्ट शैलीकडे झुकणारे चित्र. अॅव्हिनॉन या बार्सीलोना शहरातील रेड लाइट भागातील रमणींचे हे चित्र. पिकासोसारखे चित्रकार या भागाला वरचेवर भेट देत.
प्रज्ञावंत चित्रकारांची बुद्धी आणि नजर आसपासच्या जगण्यातले आकार, घाट नेहमीच एकमेवाद्वितीय प्रकाराने टिपत असते. त्या प्रज्ञेची अनुभूती देणारे पिकासोचे ‘मॅन विथ ए व्हायोलिन’ हे चित्र...या चित्राचे सूक्ष्म निरीक्षण मेंदूतज्ज्ञांनी केले आहे. ते असेः या ललनांच्या समूहासमोरून चित्रकार अर्धगोलातून फिरत आहे, मागे वळून फिरून पाहत आहे. प्रत्येक क्षणी त्याच्या नजरेत जी प्रतिमा उमटली, ती तो कॅनव्हासवर गोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. उजव्या कोपऱ्यात बसलेल्या तरुणीची छबी बघा, मेंदू विज्ञानाच्या कोनातून त्या प्रतिमेतील ‘अॅम्बिग्युइटी’ = अस्पष्ट संदिग्धता रसिली आहे. नजरबोध असाच होत असतो, कधी ती दर्शकाकडे ‘फेसिंग’ = सन्मुख आहे, दर्शकाकडे बघत आहे, तिचा ‘पुढा’ दर्शकाकडे आहे, असे भासते, का ती उजवीकडे, क्षणात डावीकडे बघते आहे, तर कधी चक्क पाठच दर्शकाकडे आहे. पण ती मान पूर्ण वळवून दर्शकाकडे पाहत आहे असे भासते, जणू अर्धगोलातून फिरताना पिकासोला दिसणाऱ्या प्रतिमा त्याने एका ‘सिंगल व्हिजन’मध्ये कॅनव्हासवर चितारल्या आहेत. याला दृष्टी विज्ञानाच्या भाषेत ‘सायमल्टेनियस व्हिजन’ म्हणतात.
मानवी व्यवहारात असेच घडते. तुम्ही गर्दीतून चालला आहात, तुम्हाला क्षणभर एक चेहरा दिसतो, तो तुम्हाला आकर्षित करतो. ती सुंदरता तुमची नजर टिपून घेते, तुमचा व्यवहार चालू राहतो. एखादी पाठमोरी आकृती दिसते, तुम्ही स्वतःशी म्हणता ‘अरे याला आपण कोठे तरी पाहिले आहे’. अशी अनेक उदाहरणे, तुमच्या नजरपटलावर उमटलेली तुम्हाला आठवतील. याला ‘सायमल्टेनियस व्हिजन’
‘एकाचवेळी होणारे दृष्टीज्ञान’ असे म्हणतात. याचा मानवी व्यवहारात उपयोग असतो, हे आपण अनुभवलेले आहे. नजर स्मृती तयार करून साठवण्याच्या अनेक वाटा मेंदूत आहेत, त्यातील ही एक वाट आहे.
सेमिर झेकी हा मेंदू तज्ज्ञ म्हणतो, मानवी मेंदू हा सुद्धा आसपासची माणसे, वस्तू वेगवेगळ्या कोनांतून बघत असतो आणि त्या सार्यांचे संश्लेषण करून स्वतःसाठी ओळखता येईल अशी एक प्रतिमा निर्माण करत असतो...जॉन गोल्डिंग (१९२९-२०१२) हे सुप्रसिद्ध कला इतिहासकार, कलासमीक्षक आणि पिकासो अभ्यासक होते. यांनी जे नमूद केले आहे, त्याचा आशय असा आहे की, ‘इटालियन रेनेसाँपासून पुढे पाचशे वर्षे अनेक चित्रकार द्विमितीय पृष्ठभागावर त्रिमितीयता दाखवण्यासाठी गणितीय आणि वैज्ञानिक मार्गदर्शक तत्त्वे वापरुन त्यांच्या चित्रविषयाचे चित्र एका स्थिर दृष्टिकोनातून बघून काढत असत. परंतु ‘Les Demoiselles हे चित्र काढताना पिकासोने अस्सल स्वयंभू नवता दाखविली आहे’.
संश्लेषणात्मक घनवाद
संश्लेषणात्मक = सिंथेटिक घनवादाचा भर नवीन घाटांची आकारांची निर्मिती हा असतो. यासाठी पिकासोचे ‘Man with a Violin’ (१९११-१९१२) हे चित्र पाहिले पाहिजे. पिकासोने अनेक अंगाने, विविध कोनातून या चित्रविषयाचे संश्लेषण कॅनव्हासवर केले आहे. त्याला ‘मॅन विथ ए व्हायोलिन’ हे शीर्षक दिल्यामुळे दर्शक त्या चित्राचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. हे शीर्षक जर दिले नसते, तर दर्शकाला हे चित्र उमगले नसते. याचे स्पष्टिकरण सेमिर झेकी या मेंदूतज्ज्ञाने दिले आहे. त्याचा आशय असाः ‘मानवी मेंदूसुद्धा वस्तू, माणसे, विविध कोनातून बघतो आणि या प्रतिमांचे संश्लेषण करून एक प्रतिमा निर्माण करतो, जी त्याला ओळखता येईल व त्या बाबतचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो’. याचा अर्थ, ती प्रतिमा ओळखण्यासारखी नसेल तर मानवी मेंदू त्यापासून ‘ज्ञान’ मिळवू शकत नाही, म्हणजे त्याचा अर्थ लावू शकत नाही. पण या चित्राचे शीर्षक ‘मॅन विथ ए व्हायोलिन’ हे वाचल्यावर वा ऐकल्यावर काही दर्शकांना तसा या चित्राचा अर्थ लागू शकतो. याला एक मार्मिक कारण आहे. त्याचा मला शोध ‘दृश्यकला- जागतिक कलेचा संक्षिप्त इतिहास’ (मूळ गुजराती संस्करण सरदार पटेल युनिव्हर्सिटी, वल्लभ विद्यानगर, मराठी अनुवाद अरुणा जोशी (बडोदा), पॉप्युलर प्रकाशन, मुंबई पहिली आवृत्ती २०२१/१९४३) या पुस्तकाचे संपादकद्वय गुलाम मोहम्मद शेख आणि शिरीष पांचाल यांनी लिहिलेले प्रास्ताविक वाचताना लागला. त्यांनी नमुदलेले विधान असेः ‘चिनी भाषेत अशी म्हण आहे की, कित्येक लोक चित्र कानाने पाहतात. म्हणजे जे ऐकले असेल ते, ते चित्रामध्ये पाहू जातात.’ या विधानात वर सांगितलेल्या शीर्षकाचे सत्य दडलेले आहे.
चित्रत्वचा आणि अंतरंग
घनवादाने दर्शकाच्या दृष्टी संवेदनाला पहिल्यांदा इतके मूलगामी आव्हान दिले, असे पाश्चात्य कलेचा इतिहास पाहिला तर दिसून येते. अमूर्त कलेतील घनवादी चित्रे पाहताना दर्शकाला निर्मितीक्षम दर्शक व्हावे लागते. मेंदू विज्ञानाच्या दृष्टीने मेंदूला पडलेल्या सवयीमुळे हे सहज शक्य होत नाही. त्यामुळे सामान्य दर्शक या कलेपासून दूर जातो असे मेंदू तज्ज्ञांचे मत आहे.
कार्ल आइनस्टाइन (१८८५-१९४०) हे जर्मनीतले सुप्रसिद्ध कलेचे इतिहासकार आणि समीक्षक यांनी घनवादाबाबत जे विधान केले आहे, त्याचा आशय असाः ‘आळसावलेल्या आणि शिणलेल्या दृष्टी संवेदनेला घनवादाने उद्दिपित केले, त्यामुळे ‘पाहणे’ ही पुन्हा एकदा निर्मितीक्षम प्रक्रिया होईल’ असा आशावाद या विधानात दिसतो.
अमूर्त चित्रकलेची चित्रत्वचा अलगदपणे, अलवार प्रयत्नाने उकलून अंतरंगांचा चित्रबोध दर्शकाने आपल्या वकुबाप्रमाणे लावून आनंद लुटणे शक्य आहे. मानवी मेंदू नेहमीच नव नवीन शिकत आला आहे.
-oOo-
व्यवसायाने हृदयरोग तज्ज्ञ असलेले डॉ. आनंद जोशी हे मराठीतले नामवंत विज्ञानलेखक, ललितलेखक आहेत. ‘बोलकी हाडे’, ‘मेंदूतला माणूस’, ‘कर्कविज्ञानाची गोष्ट’, ‘अक्षर पाविजे निर्धार’, ‘व्यूहचक्र’, ‘आपले वर्तन, आपला मेंदू’ (सहलेखक सुबोध जावडेकर) ही त्यांची अलीकडच्या काळात प्रकाशित झालेली पुस्तके आहेत.
ईमेल : drjoshianand628@gmail.com