-
आदरांजली
निसर्गाचा निरपेक्ष नातेवाईकः मारुती चितमपल्लीज्येष्ठ साहित्यिक, वनमहर्षी, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे १८ जून २०२५ला निधन झाले. निरंतर हिरवाईचा अक्षर अवकाश झाकोळला. एक सृजन थांबले. अरण्यपुत्राला आपल्या कुशीत घ्यायला भूमी मृदु झाली. चितमपल्ली गेल्याने नेमके काय झाले? तर, वनसंशोधनाच्या दिशा ओस झाल्या. गेली सत्तर वर्षे जंगलांशी तद्रूप झालेले माणूसपण माणसांच्या जगातून हरपले...मारुती चितमपल्ली यांच्याशी माझा उण्यापुऱ्या चाळीस वर्षांचा ऋणानुबंध होता. त्याची रुजुवात १९८०मध्ये नागपुरात झाली. त्यावेळी मी ‘तरुण भारत’मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झालो होतो. पण तत्पूर्वी १९७५मध्ये ते नवेगावबांधला उपविभागीय वनाधिकारी म्हणून बदलीवर आले होते. ८२ साली त्यांची नागपूर वन कार्यालयात बदली झाली. मग भेटीगाठी वाढल्या. ‘पक्षी जाय दिगंतरा’ हे त्यांचे पहिले पुस्तक १९८३मध्ये प्रकाशित झाले. त्यावर परिचयात्मक लिहिले होते. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात वयाच्या नव्वदीत २०२० मध्ये ते सोलापुरात स्थायिक झाले, तेव्हाही योगायोगाने मी तिथे होतो. आकाशवाणीत साहाय्यक संचालक होतो. २०२१मध्ये निवृत्त झाल्यानंतर काही काळ तिथेच वास्तव्याला होतो. त्या चार वर्षात चितमपल्ली यांच्याशी वारंवार भेटी, चर्चा घडल्या डल्या त्या माझ्या, त्यांच्या साहित्यावरील पीएच.डी. च्या निमित्ताने.
नव्वदी पार केल्यावरही चितमपल्ली यांची स्मृती ताजी होती. दिनचर्या वनानुकूल होती. योग, ध्यानधारणा, शाकाहारी मिताहार आणि पुरेशा विश्रांतीचे तास सोडले, तर ते अखंड वाचन, संशोधन आणि लेखनातच व्यग्र असत. वनखात्यातील नोकरीमुळे सुमारे तीन दशकांहून अधिक काळ त्यांना महाराष्ट्राच्या विविध वनांमध्ये वास्तव्य करता आले. शासकीय सेवेतील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण करतानाच ते आपल्या छंदाचे ध्यासात आणि ध्यासाचे अभ्यासात रूपांतर करू शकले. चितमपल्ली यांची ज्ञानलालसा, ज्ञान मिळविण्यासाठी कष्टांची तयारी विलक्षण होती. संशोधनाच्या ध्यासाला समर्पित आयुष्य होते त्यांचे.
मारुती चितमपल्ली यांच्या समग्र लेखनावर दृष्टिक्षेप टाकला, तर त्यात विलोभनीय वैविध्य आढळते. हे लेखन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. शास्त्र आणि अनुभवावर आधारित, माहितीपर लेखन, अनुवादित लेखन, समृद्ध वनविश्वाचा ललितरम्य आविष्कार, वन्य लोकजीवनाचा कथात्म आविष्कार, व्यक्तिचित्रे, आत्मचरित्र, कोशवाङ्मय अशा विविध क्षेत्रांत चितमपल्ली कायम लिहित राहिले आणि साहित्यात मोलाची भर घालत राहिले.
ध्यासाचा पैस
चितमपल्ली यांच्या लेखनाला साधनेची बैठक आणि ध्यासाचा पैस होता. मुंगीपासून हत्तीपर्यंत, टिटवीपासून गरुडापर्यंत आणि गवतापासून महाकाय वृक्षापर्यंत शेकडो, हजारो प्राणी, पक्षी आणि वनस्पती त्यांचा अभ्यासविषय नि लेखनविषय झाले. त्यांच्या लेखनाला अनुभव, अनुभूती, निरीक्षण आणि अभ्यासाचा भक्कम आधार राहिला. आपल्याला गवसले ते पारखून घेऊन इतरांना सांगण्याची त्यांना विलक्षण ओढ असे. त्यांच्या लेखनातील आणि ग्रंथनिर्मितीतील सातत्य बघितले, तरी त्यावरून आपल्याला याची कल्पना येते.
वनविभागातील सेवेत रुजू झाल्यापासूनच चितमपल्ली यांनी निरीक्षणं, नोंदी, टिपणं याची सवय स्वतःला लावून घेतली. जंगलांमध्ये फिरताना नेहमी त्यांच्या खिशात छोटी डायरी आणि पेन असायचे. बरेचदा ते जंगलात अनुभवलेले तिथेच लगेच टिपून ठेवत. कधी ते शक्य होत नसे. अर्थात, त्यांचे स्मरणही लख्ख होते, त्यामुळे जंगलातून परतल्यानंतरसुद्धा ते लिहून काढत. काहीशा गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे अशा जंगल अनुभवांचे कथन ते मित्र मंडळीत बरेचदा करायचे. या अनुभवकथनामुळे लिहिण्याला चालना मिळाली आणि बळही.
निसर्गाशी एकरूप झालेल्या मारुती चितमपल्लींची भेट होणे ही केवळ एका व्यक्तीची भेट होणे नव्हते, तर एका ज्ञानकोशाची भेट होणे होते.‘पक्षी जाय दिगंतरा’ या पहिल्याच पुस्तकात स्वाभाविकपणे चितमपल्ली यांनी प्रामुख्याने इंग्रजी आणि जगभरातील इतर भाषांमधील प्रख्यात लेखकांनी वन्यजीव आणि निसर्गाविषयी केलेले ललितलेखन, कथालेखन यांचेच मराठीत रूपांतर केले आहे. ते करताना त्यांनी पुरेसे स्वातंत्र्यही घेतले आहे. मोपासाँ, पर्ल बक, जपानी लेखक याशुनारा कावाबाटा, रशियन लेखक कोन्स्तान्तीन, पेनोव्हस्की, चिनी लेखक लियु त्सुंग युएन या सर्वांच्या कथांचे स्वैर अनुवाद त्यांनी अतिशय कौशल्याने केले आहेत.
१९८५ साली प्रकाशित झालेले त्यांचे ‘जंगलाचं देणं’ हे पुस्तक म्हणजे पशुपक्षी, वनस्पती आदी समृद्ध नैसर्गिक खजिन्याची चितमपल्लींनी केलेली अक्षरलूट आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. यातील जंगल आणि जंगलातील विश्व अद्भुत आहे. जंगलांचे प्रदेश आणि प्रकारही कितीतरी. त्या त्या प्रदेशातील भौगोलिक हवामानानुसार तेथील वृक्ष, वनस्पती आणि पक्षी, प्राणी यांचे स्तिमित करणारे वैभव चित्तमपल्ली आपल्या चित्रदर्शी शैलीतून हुबेहूब साकारतात. दिवेआगर नजीकच्या खाजणीच्या जंगलात आढळणारे झाडावर चढणारे मासे म्हणजे तेलमुंडे किंवा डेमके, उदाचे घबाड म्हणजे उदमांजराचे घर, समुद्रविंचवांची घरे हे सारे धर्मा कोळीच्या मदतीने अनुभवी नजरेतून त्यांनी पाहिले आणि सर्वांना सांगितले. त्या जंगलातले मोहाचे रान, मोहाच्या झाडाच्या पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालणारी अडई व वणकी रानबदक, मोहफळांच्या आवडीने त्या झाडांवर उतरणारे टोई पोपटांचे लक्ष थवे हे सारे जंगलाचे देणे. चिंच, पळस, देवदार, निंबोणी असे भिन्न भिन्न प्रांतातले वृक्ष आपल्याला नावानिशी माहीत असले, तरी त्यांच्याविषयी आपल्याला सखोल काहीच माहिती नसते. निरीक्षण, अभ्यास, अनुभवातून अशी माहिती या पुस्तकात मिळते. रातवा या संग्रहातील ‘रातकिड्यांचे संगीत’ या लेखात त्यांनी विस्ताराने सांगितलेला रातकिड्यांच्या किरकिरी मागच्या संदर्भाचा, रहस्याचा अनुभव हा मुळातून वाचण्याजोगा आहे. त्यासाठी त्यांनी संध्याकाळपासून पहाटेपर्यंत जंगलातच मुक्काम ठोकून केलेली निरीक्षणं स्तिमित करतात.
काही विशिष्ट पक्षी आणि प्राणी यांच्या विलक्षण सवयींचा अभ्यास करताना ते वेदपुराणांमधील अनेक संदर्भाचा शोध घेतात आणि महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवतात. त्यातूनच, वाघ हा ओंकाराचा जनक, घुबडाने सातबहिणी पक्ष्यांवर केलेला संमोहन प्रयोग, वाघ-बिबट्या यांच्या जंगलातील वास्तव्याची भयसूचक आवाजाने अचूक सूचना देणारा मोर, सुसरी, कासव आणि उत्तर ध्रुवावरील पांढरे अस्वल यांची प्राणायामाद्वारे अनेक महिने निराहार राहण्याची कला, सापाचे कात टाकणे हा कायाकल्पाचाच भाग, पर्जन्यवृक्ष, काजवे, हठयोगी बेडूक आणि त्यांचा सूर्यकिरणांचा आहार अशी चकित करणारी माहिती ते देतात आणि त्यासाठी भक्कम पुरावे आणि आधार सुद्धा सादर करतात.
संदर्भबहुल लेखनसंसार
अनेक पौराणिक अनुबंध, धर्म, संस्कृती आणि अध्यात्म, सामाजिक शास्त्रे, लोकजीवन, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण अशा विविध ज्ञानशाखांचे सोदाहरण दाखले देत चितमपल्ली आपले लेखन संदर्भबहुल करतात. संत वाङ्मय, महानुभाव वाङ्मय, आधुनिक मराठी साहित्य, लोकसाहित्य यांचाही त्यांचा अभ्यास उत्तम होता आणि आपल्या लेखनाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी त्याचा उपयोग केला.
चितमपल्ली यांची सर्वच पुस्तके त्या त्या विषयाला संपूर्ण न्याय देणारी आहेत. ‘केशराचा पाऊस’ (२००५) हे त्यांचे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातील कथा विलक्षण आणि आगळ्यावेगळ्या आहेत. शैली म्हणून आत्मपर लेखनाचा अवलंब केल्याचे चितमपल्ली या पुस्तकाच्या मनोगतात म्हणतात. रोजनिशीतून लिहिलेल्या आठवणी म्हणजे यातील कथा. बहुतेक कथांची पार्श्वभूमी मेळघाटातील जंगले आहेत. तेथील आदिवासी कोरकू, गोंड, निहाल, तसेच गवळी यांनी सांगितलेल्या लोककथा, दंतकथा, श्रद्धा यांचा या कथांमध्ये उपयोग केला आहे. यातील वृक्षदेवता, निसर्गदेवता यांना वास्तवाचा आधार आहे. सुमित्रा आणि माधव यांच्यातील प्रेममधुर नात्याचा भावरम्य अनुबंध म्हणजे 'केशराचा पाऊस'मधील या कथा. या शिवाय इतरही काही कथा या संग्रहात आहेत. संग्रहात चितमपल्ली यांच्यातील हळवा, भावुक कवी-कथाकार अतिशय तरलतेने प्रकटला आहे. इतर सर्वच पुस्तकांपेक्षा ‘केशराचा पाऊस’चे वेगळेपण मनावर ठसणारे आहे.
उत्फुल्ल संशोधक
चितमपल्ली यांचे कोशवाङ्मय ही तर मराठीतील वनसाहित्याची आणि अभ्यासाची समृद्धी! पक्षीकोश, प्राणीकोश तयार झाल्यानंतर ते मत्स्यकोशाकडे वळले. त्यासाठी कोकणातील समुद्रकिनारे त्यांनी गाठले. काठावर राहून माहिती मिळणे अवघड आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट कोळ्यांच्या वस्तीतच मुक्काम केला आणि त्यांच्यासोबत बोटींमधून समुद्र सफारीही केल्या. निधनापूर्वी त्यांनी वृक्षकोशाचे काम बरेचसे पूर्ण करत आणले होते. चितमपल्ली यांच्यातला संशोधक आणि लेखक सदैव उत्सुक, जागरूक असायचा. वनखात्यातील नोकरीच्या सुरुवातीलाच पुणे, वडगाव, मावळ भागात नियुक्ती असताना त्यांना गो. नी. दांडेकर यांचा सहवास लाभला. दांडेकरांमुळे आपल्याला जंगलांची अधिक आणि उत्तम ओळख झाली, असे ते नमूद करतात. दांडेकरांच्या कादंबऱ्यांमधील पवनाकाठचा धोंडी आणि माचीवरला बुधा या दोघांनाही ते दांडेकरांसोबत प्रत्यक्ष भेटले. जगप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सालिम अली हे त्यांचे गुरू होते. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातून तणमोर तसेच रानकुत्र्यांबाबतचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन चितमपल्ली यांनी पूर्ण केले. त्यासाठी प्रसंगी वनखात्याचा रोष पत्करला. आकाशवाणी सोलापूरसाठी मला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे विस्तारपूर्वक सांगितले होते.
साहित्याच्या प्रांगणात मारुती चितमपल्लींनी आपल्या अभिव्यक्तीचे अंगण फुलवले. त्यांच्या पुस्तकांनी केवळ वाचनानंद दिला नाही, तर वाचकांची आत्मजाणीवही विस्तारली...झाले होते असे की, रानकुत्री आणि वाघ यांच्यात भक्ष्यासाठी चढाओढ असते आणि रानकुत्री वाघांचे भक्ष्य पळवतात, असा वनखात्याने निष्कर्ष काढला होता. तसा एक अहवालही महाराष्ट्र वनखात्याने प्रकाशित करून सर्वत्र वितरित केला होता. डॉ. सालिम अली यांच्या हातीही तो पडला. ते या निष्कर्षाशी सहमत नव्हते; परंतु यावर संशोधन होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन त्यांनी चितमपल्ली यांना त्यासाठी प्रवृत्त केले. चितमपल्ली यांना या संशोधनासाठी फेलोशिप मिळाली. सहा महिन्यांचा हा संशोधन प्रकल्प होता. चितमपल्ली यांनी त्यासाठी अकरा रानकुत्र्यांचा कळप निवडला आणि रानकुत्र्यांचे व वाघांचे भक्ष्य नेमके काय, रानकुत्री वाघांचे भक्ष्य पळवतात का? याचा अभ्यास केला. निरीक्षणे केली. अकरा रानकुत्र्यांचा माग काढत पहाटे पाचपासून रात्रीपर्यंत त्यांनी टांगसू महाजन या आदिवासी जाणकाराच्या मदतीने या विषयाचा वेध घेतला. त्यात असे लक्षात आले की रानकुत्री ७० टक्के वानरे मारतात, २० टक्के रानडुकरांची शिकार करतात आणि पाच ते दहा टक्के हरणांना मारतात. परंतु ते म्हातारे, गोळी लागलेले, आजारी अशा हरणांनाच भक्ष्य करतात, असे चितमपल्ली यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी त्या हरणांची वैद्यकीय तपासणी आणि शल्यक्रिया सुद्धा तज्ज्ञांकडून करवून घेतल्या. निरोगी हरणांना रानकुत्री कधीच मारत नाहीत. त्यामुळे रानकुत्री आणि वाघ यांच्यात भक्ष्यासाठी चढाओढ नाही. रानकुत्र्यांमुळे वाघाला अन्न मिळत नाही, हे म्हणणे रास्त नाही, असा अहवाल चितमपल्ली यांनी सादर केला. त्यावरून वन खात्यात गदारोळ झाला होता.
डॉ. सालिम अली यांच्या सांगण्यावरून चितमपल्ली संशोधन करतात आणि ते संशोधन वनखात्याच्या भूमिकेला छेद देणारे असते, सत्य सांगणारे असते, या आकसातून वनखात्याने संशोधनाच्या सहा महिन्यांचा चितमपल्ली यांचा पगार रोखून धरला होता. संशोधन कालावधी पूर्ण झाल्यानंतर संघर्ष करून चितमपल्ली यांना ते वेतन पदरात पाडून घ्यावे लागले होते, ही वस्तुस्थिती आहे. निवृत्तीनंतर तीस वर्षांनी चितमपल्ली याबाबत मनमोकळे बोलत होते. मात्र, वन खात्यात अनेक उच्च अधिकारी चितमपल्ली यांच्या कार्याचे मोल जाणणारेही होते आणि ते चितमपल्ली यांना साहाय्य करीत असत. त्यांच्याप्रती चितमपल्ली कायम कृतज्ञ होते.
प्रेरणादायी दंतकथा
चितमपल्ली यांच्या संशोधनावर आणि निरीक्षणांवर अलिकडे अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. परंतु चितमपल्ली यांचे जंगलांमधील अनेक गूढ अनुभव आणि निरीक्षणे तरल, अद्भुत आहेत. ज्या समर्पित भावनेने आणि तादात्म्यतेने चितमपल्ली जंगलातील अनुभवांना सामोरे गेले ती एकतानता दुर्मीळ आहे. त्यांना प्राप्त झालेल्या योगसाधनेमुळे, त्यांच्या वनानुकूल जीवनसरणीमुळे आणि अत्यंत शुद्ध, निर्हेतुक भावनेमुळे जंगलातील अनेक संकटांमधून चितमपल्ली सुखरूप बाहेर आले होते. टांगसू महाजन, मंगरू गोंड, निरगू गोंड, माधो गोंड हे त्यांचे वाटाडे असलेले आदिवासी सांगाती यांनी त्यांना दिलेले ज्ञान अनुभवसिद्ध होते. माधवराव पाटील डोंगरवार हे चितमपल्ली यांचे जीवश्च मित्र. त्यांच्यामार्फतच या आदिवासी वाटाड्यांशी चितमपल्ली यांची ओळख झाली होती. माधवरावांनी चितमपल्ली यांना जंगल, वनस्पती, प्राणी आणि जल या सर्वांची आणि अनेक रहस्यांची ओळख करून दिली होती. त्या माधवरावांच्या समाधीशेजारी आपल्या अस्थी पुरण्यात याव्यात, अशी इच्छा चितमपल्ली यांनी लिहून ठेवली होती. प्रत्यक्षात त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. चितमपल्लींच्या अस्थी नवेगावबांध तलावात विसर्जित करण्यात आल्या. असे घडले तरीही, आता अरण्यऋषी चितमपल्ली नावाची माझ्यासारख्या असंख्यांनी अनुभवलेली जिवंत दंतकथा नद्या आणि तलावांच्या पाण्यावर पोसलेल्या वनमातीतून बहरलेल्या हिरवाईने आकाश व्यापत, आपल्या अक्षरवेलींतून मराठी वाचकांना सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
-oOo-
सुनील शिनखेडेलेखक सुनील शिनखेडे हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. ते सध्या ‘मारुती चितमपल्ली यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएच. डी. संशोधन करीत आहेत.
ईमेल: sunilshinkhede521@gmail.com.
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
गुरुवार, ३१ जुलै, २०२५
अरण्यपुत्राचा चिरवियोग
संबंधित लेखन
आदरांजली
जुलै-२०२५
सुनील शिनखेडे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा