Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

रविवार, २७ जुलै, २०२५

अँटेना

  • अनुनाद

    Sketch1

    आमच्या घरातला आदिम काळातला अँटेना काढून टाकून डिश अँटेना बसवण्यासाठी आज टेम्पोदा आमच्या घरी आला होता. गच्चीचा जवळ जवळ सगळा भाग करोगेटेड शिट्सनी झाकलेला होता. फक्त कोपऱ्यातली अँटेना लावलेली जागा मोकळी सोडलेली होती. त्यामुळे मौनाच्या सांगण्यावरून मोठ्या दादांनी तिथलं केबल कनेक्शन काढून टाकून डिश बसवायचं ठरवलं होतं. केबलवर मौनाला हवे असलेले चॅनेल्स बघता येत नव्हते!

    मौनाला कोणते चॅनेल्स आवडतात, हे तिचा धाकटा काका या नात्याने तिला जन्मापासून पहात असूनही मला अजून समजू शकलेलं नाही. तिला आज लाल आवडतो, तर दुसऱ्या दिवशी सफेद! आज सामोशाची प्रशंसा, तर उद्या जिलबी डोक्यात ठेवून नाचत राहते! तिला पाहून माझ्या मनात शंका येत राहते, आजकालची मुलं अशीच असतात का?

    राजूशी आपला ब्रेक अप झालाय, असं सांगून गेल्या दोन दिवसांपासून मौना खोली बंद करून बसून होती. राजू तिच्यावर फारच जबरदस्ती करू लागला होता, तिच्या पर्सनल स्पेसवर आक्रमण करत होता. ती कोणा मुलाशी बोलू लागली तर तो रागाने बेभान होऊ लागला होता. मौनाच्या मते, हे किती दिवस सहन करता आलं असतं? प्रेम करतेय, म्हणून इतरांशी बोलायचंसुद्धा नाही का? म्हणून तिने राजूला सोडचिठ्ठी दिली होती!

    राजूला सोडचिठ्ठी दिलीस, हे छान केलंस पण त्यामुळे मन खट्‌टू कशासाठी करतेयस? राजू काही तुला मस्का लावायला आला नाहीय. पोरगा तुला छान छान चिठ्ठया पाठवत असे. सतत तुझ्या हवं नकोचा विचार करत असे. सारा वेळ म्हणत असे, माझं प्रेम आहे तुझ्यावर! तरीही का आला नाही? मौना त्याला सोडचिठ्ठी देऊ शकत होती. ते टाळण्यासाठी राजू तिच्या भोवती नाचणार नव्हता! या देशात कायदेकानून नावाची चीज खरोखरच उरली नाहीय!

    लेकीचं मन विषण्ण झाल्यामुळे तिचे बाबा, माझे दादा असे वागत होते की वाटावं, एकाच वेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार गडगडलंय! लेकीच्या उदास मनाला उभारी देण्यासाठी माझ्या दादांनी नाना उपाय योजना राबवल्या. मौनाने सांगितलं होतं, यापुढे या घरात केबल-फेबल चालणार नाही. डिश बसवावी लागेल. मन रिझवण्यासाठी तिला अनेक चॅनेल्स हवे होते. आमचा केबलवाला तीचं मन गुंतून राहील, असे चॅनेल्स देत नव्हता.

    असं करण्यामुळे राजू नावाच्या पोराचं धारिष्ट्य कसं लोप पावेल, ते मला समजत नसलं तरी माझ्या दादाला समजलं होतं. म्हणून तर जुनापुराना अँटेना काढून टाकून तिथे डिश बसवायची होती. आता मौना सगळं विसरून प्रचंड उत्साहाने त्याच्यासमोर बसून सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करत होती. मला मजा वाटत होती. देशातल्या पोस्टातलं व्यवस्थापन कसं चालतं, हे समजत नसलं तरी अलीकडे सोशल मीडियावर पोस्टमनचा सुळसुळाट झालेला बघत होतो.

    मी विचारलं, “मौना, आता तुझं मन उदास नाहीय ना?”

    सेल्फीचा अँगल नीट जुळवता जुळवता ती म्हणाली, “कोणासाठी? त्या राजूसाठी? की जुन्या काळातल्या या अँटेनासाठी? काहीतरीच काय विचारतोयस काका? अलीकडचं लाडीगोडी लावायचं प्रेम असतं या तुमच्या डायनासोरचा छाप असलेल्या जुनाट अँटेनासारखं. सगळं स्क्रॅप करून टाकायला / मोडीत काढायला हवं!”

    मी हसलो. टेम्पोदांनी गंजलेला, मोडका अँटेना काढून टाकला होता. तो आणि त्याचा मदतनीस या दोघांनी मिळून प्लास्टिकच्या आवरणातून आणला होता नवीन डिश अँटेना!

    फ्लॅश बॅक १९८६

    उचक्या देत देत टी.व्ही. च्या पडद्यावर झरझर चित्रं दिसू लागली.

    दादा जोरात ओरडले, “सर्वनाश! हे काय झालं? बाबू, ताबडतोब जा आणि टेम्पोला बोलावून घेऊन ये. नक्कीच पुन्हा अँटेना चालेनासा झालाय.”

    इतक्या रात्री बाबा मला एकट्याला जाऊ देत नव्हते, पण मी वाट न बघता बाहेर पडलो. बारावं लागल्यावर कोणाला कार्ल लुई व्हावंसं वाटणार नाही?

    टेम्पोदांच्या घरी पोचेपर्यंतच्या मधल्या काळात मी कथेची पार्श्वभूमी सांगतो.

    श्याऐंशीच्या विश्वकपाची आज फायनल. त्या टीममध्ये ईश्वर असल्यामुळे आमचं घर आर्जेन्टिनाचं सपोर्टर.

    हातांनी, पायांनी, नाना प्रकारांनी गोल करून साऱ्या जगाला वेड लावत ईश्वर फायनलपर्यंत पोचला होता. आतापर्यंत ईश्वरच्या टीमने पश्चिम जर्मनीवर एक गोल चढवला होता. यानंतर काय होईल, ते माहीत नव्हतं. आज आर्जेन्टिनाचा विजय होणं अत्यावश्यक होतं, कारण गेल्या काही दिवसांपासून आमचं घर वाईट मनःस्थिती नावाच्या तळ्याच्या तळाशी बुडालं होतं. आर्जेन्टिनाचा विजय झाला असता, तर आमच्या घरात जरा उजेड-हवा खेळत राहिली असती.

    आता मनःस्थिती वाईट असण्याचं कारण सांगतो. माझी चुलत बहीण विनी!

    मोठ्या काकींना कोपऱ्यातल्या विनीच्या खोलीत एक लव्ह लेटर मिळालं होतं. त्यात विवाह-संसार या बाबतीतली कितीतरी निषिद्ध वाटावीत अशी विधानं लिहिलेली होती. बंगाली लोक सुट्टीच्या दिवशी दूरदर्शन चालू करून उत्तम कुमार आणि सुचित्रा यांचं प्रेम बघत असले, तरी घरातल्या मुलीने प्रेम केलं तर त्यांच्या घरी कुरुक्षेत्र घडणारच, ते अडवता येणार नाही, हे विनीदी साफ विसरून गेली होती!

    एके दिवशी हा कुळाला बट्टा लावणारा आणि सेन्ट्रल इंटलिजन्स कंपनीचा हिरो, ज्याच्याबरोबर विनीदीने असभ्यपणा केला होता, तो आहे तरी कोण, हे समजून घेण्यासाठी विनीदीला नानाप्रकारे प्रश्न विचारले होते.

    यातला एकही प्रश्नबाण विनीदीला घायाळ करू शकला नव्हता. विनीदी फक्त मिसेस सेन यांच्यासारखी हनुवटी उंचावून म्हणाली होती, ‘मी सांगणार नाही!’

    आत्या अरुणाचल प्रदेशात राहत असे. मुलीच्या शिक्षणासाठी विनीला आमच्याकडे ठेवली होती. अशा वेळी ती मुलगी जर अशा नकोत्या गोष्टीत अडकून पडली असती तर आम्ही बंगाली माणसं आणि बंगाली जातीचा ऐतिहासिक चेहरा सुरक्षित राहिला असता का? त्यामुळे हे सारं उघड झाल्यावर विनीदीला घरातून बाहेर जायला मज्जाव केला होता.

    मोठ्या काकांनी, विनीदीच्या बाबांनी तिच्या विवाहासाठी पत्रापत्री सुरु केली होती. इतकंच नाही तर राष्ट्रसंघालाही पत्र लिहावं, म्हणून त्यांनी एक पोस्ट कार्डही खरेदी केलं होतं. फक्त काकींनी धमकावल्यामुळे... जाऊ दे.

    आज विनीदीला बघायला येणार होते. त्यावेळी विनीदी काय गोंधळ घालेल कोण जाणे! त्यामुळेच आर्जेन्टिनाचा विजय होणं माझ्यासाठी अतिशय आवश्यक होतं. उजेड-हवा यांची नितांत गरज होती. अशा वेळी त्या अँटेनाने दगा दिला.

    सध्या अँटेना म्हणजे, बंगाली घराचा स्टेटस सिम्बॉल. तीन दांड्या किंवा पाच दांड्या असलेल्या अँटेनाच्या कृपेमुळे लाकडी शटर्स बसवलेल्या टी. व्ही. वर दूरदर्शन बघता येत असे.

    चित्रमाला, चित्रहार यांच्या जोडीला आठवड्यातून एकदा हिंदी आणि बांगला सिनेमा माझ्यासारख्या चातकांना उपलब्ध होत असे. काही जण त्या मोठ्या अँटेनाला एक लहानसा अँटेना जोडत असत. त्याला म्हणत बुस्टर. तो बेटा बांगला देशातले चॅनेल्स खेचून आणत असे. आमच्याकडे बुस्टर नव्हता. फक्त पाच दांड्या असलेला अँटेना होता. कधी कधी त्याची तार तुटून जाई आणि ती दुरुस्त करण्यासाठी आमच्या परिसरातल्या अठ्ठावीस वर्षांच्या एकमेव इलेक्ट्रिशियनला - टेम्पोदाला बोलवावं लागत असे. पोरगा फार चांगला होता, कधीही नाही म्हणत नसे.

    आजही मी हाका मारल्यावर त्याने झटकन दरवाजा उघडला.

    मी म्हटलं, “ताबडतोब चल, नाहीतर घरी कोलाहल माजेल.”

    डोळे चोळत आपली दुरुस्तीची साधनं असलेली बॅग घेऊन आणि डोक्यावर कवच-कुंडल असल्यासारखी टोपी चढवून टेम्पोदा म्हणाला, “या वयात तू ही कसली भाषा बोलतोयस!”

    मी हसलो. बारा वर्षे म्हणजे कमी आहेत का? मला बरंच काही माहीत असे. मला माहीत होतं, दादा काडेपेटी हातात घेऊन हळूच गच्चीवर का जातात! शेजारच्या घरातली शुक्ला आत्या ओढणी काढून टाकून मॅक्सी घालून रस्त्याच्या कोपऱ्यावर का उभी राहते! जेड स्टोन बसवलेल्या महालात डायना पामारबरोबर काय करत असते!

    मी चालता चालता विचारलं, “उद्या गुजरातला जाणार का?”

    टेम्पोदा म्हणाला, “होय रे! माहितेय ना तुला, मला उत्तम नोकरी मिळालीय.”

    घरी पोचल्यावर टेम्पोदांनी टॉर्च बाहेर काढला. मग मला खालीच थांबायला सांगून तो एकटाच गच्चीवर गेला. या घरातल्या सगळ्या गोष्टी टेम्पोदांना तोंडपाठ असत! या आधी कितीतरी वेळा अँटेनाने आम्हाला त्रास दिला होता.

    मोजून साडेसहा मिनिटात चिडीक असा आवाज होत टीव्हीवर चित्र दिसू लागलं. मी काही बोलायच्या आधीच काका इतक्या मोठ्याने ओरडले, की मैदानावरच्या आर्जेन्टिनाच्या खेळाडूंनी चपापून मागे वळून पाहिलं.

    Sketch2

    मनःस्थिती ठीक नसल्यामुळे गच्चीवरच्या आपल्या खोलीत झोपलेली विनीदी आणि तळ मजल्यावर झोपलेली आजी सोडून आम्ही सारे आज खालच्या टीव्हीच्या खोलीत बसलो होतो.

    त्यात मधेच एकदा रागीट आवाजात काकी म्हणाली, “गुरासारखे ओरडताय कशासाठी? आईची झोपमोड होईल ना!”

    आजोबा दोन वर्षांपूर्वीच देवाघरी गेले होते. आजी म्हणजे सवयीची गुलाम! त्यामुळेच जितका वेळ झोपेल तितका वेळ घरच्या मंडळीना शांतता लाभणार होती!

    खेळ सुरू झाला असल्यामुळे काकांनी प्रतिवाद करत बोलणं वाढवलं नाही. मी बघत होतो, गच्चीवरून खाली आल्यावर टेम्पोदासुद्धा खोलीच्या दरवाजापाशी उभे होते. नजर टीव्हीच्या स्क्रीनवर.

    काका म्हणाले, “टेम्पो बस आणि मॅच बघ. खेळ संपला की घरी जा. पुन्हा जर काही बिघाड झाला तर!”

    बोलणं न वाढवता टेम्पोदा टीव्हीवर नजर रोखून दरवाजापाशी बसला.

    अचानक दरवाजापाशी येत आजीने विचारलं, “काय रे टेम्पो, तू गेला नाहीस?”

    काकीने दबक्या आवाजात काकांना दम भरला, “बघितलंत ना!”

    टेम्पोदा चकित होत विचारू लागले, “जाणार कुठे? मी खेळ बघतोय ना!”

    आजी म्हणाली, “झोपमोड झाली, तेव्हा खिडकीतून बघत होते.”

    काका ओरडू लागले, “अगं आई, हे नवीन काय सुरू केलंस? आर्जेन्टिनाचा गोल झाला तर बरं होईल. तू जा आणि झोप पाहू मुकाट्याने!”

    आजी मान हलवत म्हणाली, “ते ठीक आहे! परंतु... अच्छा, मी जाते.”

    आजीसाठी आर्जेन्टिना कसा काय गोल करेल, ते समजलं नसलं तरी आर्जेन्टिनाने आणखी एक गोल केल्यावर त्याच्या बदल्यात हावरटासारखे आणखी दोन गोल खाऊन टाकले! रागाने माझ्या पायापासून डोक्यापर्यंतच्या साऱ्या शरीराची आग आग होऊ लागली. असली कसली तुझी टीम ईश्वर!

    कडेकोट बंदोबस्तात असलेल्या ईश्वरच्या अंतरात्म्याला बहुतेक माझं बोलणं ऐकू गेलं असावं. त्यामुळे पुढच्या चौऱ्याऐंशी मिनिटात एकदा संधी मिळाल्याबरोबर त्यांनी बुरुचागाच्या करवी पश्चिम जर्मनीचा धुव्वा उडवून टाकला!

    ते पाहिल्यावर काका ताडकन उडी मारून उभे राहिले. मला, टेम्पोदाला, मिठ्या मारत आनंदातिशयाने किती जोरात ओरडले! आजीला मिठी मारायला गेले, तेव्हा मात्र ‘पाडशील मला’, असं म्हणत आजीने काकांना दूर लोटलं.

    जिंकल्यामुळे निमिषभरात काकाचं मन नबाब-बादशहासारखं झालं. सगळ्यांकडे नजर टाकत ते म्हणाले, “अशा दिवशी विनी वाईट वाटून एकटी बसून राहणार, हे होऊच शकणार नाही. चला, सगळ्यांनी तिच्या खोलीत जाऊ या. ती आपल्याच घरची पोर आहे, होय ना!”

    गच्चीवरच्या एका कोपऱ्यात विनीदीची खोली. तिथे गेल्यावर आम्ही सारे थबकलो! दरवाजा सताड उघडा! दिवा जळत होता! नीटनेटकी, आवरून ठेवलेली खोली. परंतु विनीदी तिथे नव्हती! बिछान्यावर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात लिहिलं होतं, “मी त्याच्याबरोबर निघून जातेय. आमचा शोध घेऊ नका.”

    चिठ्‌ठी हातात घेऊन काका थरथर कापू लागले. म्हणाले, तो…? तो म्हणजे कोणता प्राणी? ऐकून ठेवा. विनी आपली कोणी लागत नाही. हा कट आहे... महाभयंकर कट आहे. (सेन्ट्रल इंटलिजन्स एजन्सीचा हा कट आहे का, अशी चौकशी मी केली नाही)

    आता

    डिश बसवून झाल्यावर खाली उतरून टेम्पोदांनी आपली टोपी सारखी केली. आजही कवच-कुंडल! तो हसला आणि म्हणाला, “सवयीने घातली रे बाबू!”

    Sketch3

    दुपारच्या उन्हात मी त्या माणसाला पाहिलं. आता स्टेशन रोडवर टेम्पोदांचं इलेक्ट्रॉनिक्सचं मोठं दुकान आहे. दुकानात बारा कर्मचारी. तरीही आमच्या घरातलं काम तो स्वतः येऊन करतो. गुजरात फार दिवस मानवलं नाही या माणसाला.

    मी म्हटलं, “मोडका अँटेना फेकून...”

    “नाही, तो टाकून देऊ नकोस. मी तो घरी घेऊन जाईन.” जवळच असलेली विनीदी म्हणाली.

    मी नुसता हसलो. मला आठवली एकतीस वर्षांपूर्वीची ती रात्र! रहस्यमय वाटावं, असं विनीदीचं नाहीसं होणं.

    खरं पाहता त्या रात्री आजींनी टेम्पोदाला नाही तर विनीदीला पाहिलं होतं. टेम्पोदांनी स्वतःच्या मोठ्या बॅगेतून शर्टपँटचा एक सेट आणला होता. घरातली सारी मंडळी खाली एकाच खोलीत बसली होती. गच्चीवर जाऊन अँटेना बदलायच्या आधी टेम्पोदांनी विनीदीला ते कपडे दिले होते. मग कोणालाही सुगावा लागू नये म्हणून टेम्पोदांनी आमच्यासमवेत बसून संपूर्ण मॅच बघितली होती. त्यावेळी विनीदी गुपचूप घराबाहेर पडून टेम्पोदांच्या घरी जाऊन लपली होती. आजीनी बरोबर बघितलं होतं, पण तीचं बोलणं कोणी ऐकून घेतलं असतं तर ना!

    दुसऱ्या दिवशी ती दोघं गुजरातला निघून गेली. एक महिन्याने पत्र पाठवून विनीदीने सगळी हकीकत सांगितली होती. तिने आपला बेत कोणाला समजू दिला नाही. त्या रात्री सगळी तळ मजल्यावरच्या खोलीत असतील, हे विनीदीला माहीत होतं. हीच संधी साधून गेमचा हाफ टाइम झाल्यावर मी अँटेनाची तार कापून टाकली. अपेक्षेनुसार टेम्पोदाला बोलवायला मलाच जावं लागलं. अरे बाबांनो, प्रेम नसलं तर अर्ध्या रात्री अँटेना दुरुस्त करायला कोणी येईल का? इतक्या वर्षानंतर आज काका नाहीत, बाबा नाहीत. मीही हे सगळं विसरलो होतो. टेम्पोदांचा आम्हाला अभिमान वाटतो. विनीदीलाही सारे वाखाणत असतात. म्हणतात, “विनी ही खरोखरच गुणी पोर आहे. अशा अनाथ, गरीब मुलासाठी तिने सगळ्याचा त्याग केला. अशा प्रेमाचा विचार तरी करता येईल का?”

    काठीचा अँटेना कालबाह्य झालाय. डिश अँटेनाने त्याला बाजूला सारलाय. नुसतं दूरदर्शन मौनाला पुरेसा वाटत नाही. जेव्हा इतर काहीच उपलब्ध नव्हतं, तेव्हा हा एक अँटेनाच सगळ्यांना रिझवत असे. ईश्वर दर्शन घडवत असे; याचा त्यांना विसर पडतो.

    मी पाहिलं तेव्हा मौना डिश अँटेनासमोर उभी राहून सेल्फी काढत होती. एका बाजूला बाद केलेल्या, मोडक्या, जुनाट अँटेनावरून हळुवारपणे हात फिरवत होती, आमची रुपेरी केस असलेली विनीदी. आमच्या सगळ्यांच विनीदी!

    अनुभवाने मला समजतंय हे सारं!

    -oOo-

    (स्मरणजित चक्रबर्ती यांनी लिहिलेल्या ‘अँटेना’ या बंगाली कथेचा मराठी भावानुवाद.)

    सर्व रेखाचित्रे : सागर शिंदे (७०३०९९००८१)


    सुमती जोशी
    सुमती जोशी

    अनुवादिका सुमती जोशी या राज्य पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिका, अनुवादिका आहेत. त्यांची ‘उत्क्रांती’, ‘बंगरंग’, ‘दैत्याचा बगीचा’, ‘मंत्र’ आदी स्वतंत्र तसेच अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
    ईमेल: sumatijoshi154@gmail.com



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा