-
काव्यार्थ
कविता ही त्या त्या काळाचा उद्गार असते. असावी. हा उद्गार आत्मशोधाचा, आत्मक्लेशाचा आणि आत्मप्रेमाचा असतो. सभोवती घडून येणाऱ्या डुचमळीचा असतो. पण त्यातही आशा आणि निराशेचे हिंदोळे असतात. निराशेत वर्तमानाचा उद्वेग असतो, भविष्याचे भयकारी सूचनही असते. आशा ही पुढच्या क्षणात जगण्याचं निमित्त पुरवते. कविता साचलेल्या भावनांना प्रवाह मिळवून देते. जिथवर हा प्रवाह पोहोचतो, कवीचा उद्गार इतरांचा होत जातो. ती कविता, त्यातले शब्द आपले वाटू लागतात. कवीच्या आणि आपल्या मनातले चित्र तर जुळतेच, पण शब्दही आपल्या भावना होऊन गेलेल्या असतात. असाच खोलवर अनुभव कलावंत, दास्तानगोई, लेखक, अनुवादक आणि अभिवाचक असलेल्या अक्षय शिंपींच्या कविता वाचकांना देतात. अक्षय यांचा ‘अव्याकृत’ हा कवितासंग्रह नुकताच लोकवाङ्मय गृहतर्फे प्रकाशित झाला आहे. त्यावरचे हे टिपण...‘अव्याकृत’ हा अक्षय शिंपी यांचा दुसरा कवितासंग्रह. ‘बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे’ या संग्रहानंतर आलेला हा केवळ ४६ कवितांचा छोटेखानी संग्रह. अक्षय यांच्या पहिल्या संग्रहातील ६१ कविता आणि या नव्या संग्रहातील ४६ असा एकूण १०७ कवितांचा हा गेल्या पंधरा-वीस वर्षांचा काळ अनेक प्रश्न घेऊन उभा असलेला आहे. त्यामुळेच पहिल्या संग्रहातील पहिली कविताही प्रश्नचिन्हांकित झाल्याची नोंद करत अक्षयने आजच्या पिढीचा संभ्रम अधोरेखित केला आहे. अशा संभ्रमाच्या काळात केवळ ‘तू’ एवढाच एक शब्द लिहू शकलो, ही कबुली देत अक्षयचा हा दुसरा संग्रह पूर्ण होतो.
नव्या शतकातील पंचवीस वर्षांच्या ‘वैराण’ वासून उभ्या असलेल्या काळाचा लेखाजोखा मांडणाऱ्या ह्या संग्रहात आजच्या तरुणाईच्या अव्यक्त भावभावनांचा कोलाज पाहायला मिळतो. ‘कोलाहालातील महाकाव्यं कुठल्या यातनांचं खत पिऊन फोफावतात अन् मौनातील महाकाव्यं कुठे कोरून ठेवतात’ हे माहीत नसलेल्या या कवीनं अव्याकृत अशा अनेक भावनांना या संग्रहात मुखर केलं आहे.
सत्य एक मूल्य असण्याच्या काळापासून सत्य वस्तू होण्याच्या काळापर्यंतचा प्रवास कवी इथे करतो आहे. हा प्रवास करताना दुथडी भरून वाहात जाणाऱ्या उदासीच्या नद्यांवर आपली नाव वल्हवत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्या काळात हेच भागधेय असणारे अनेक लोक आज आपल्या आजूबाजूला दिसताहेत
अक्षय शिंपी हे या गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील घडामोडींचे साक्षीदार आहेत. एका मूल्य संचिताचा वारसा असणारे पण मूल्यरहित जगात राहण्यास भाग पडलेल्या तरूण पिढीचे प्रतिनिधीही आहेत.
झपाट्यानं पोखरून काढणाऱ्या काळात
माझी उखडलेली मुळं घेऊन
मी हिंडतोय विस्थापितासारखा
दिशाहीन... (दिशाहीन-बिन चेहऱ्याचे कभिन्न तुकडे)
पण असं दिशाहीन फिरतानाही ते म्हणतात,
माझ्या मुळांना तुझं
खतपाणी आहे,
हे विसरणारही नाही
कधीच. (डॉ. आंबेडकर - अव्याकृत)अक्षय शिंपी यांना जे खतपाणी मिळालं आहे, ते मराठी साहित्य आणि नाट्यसृष्टीचं. हिंदी, मराठी आणि इतर भाषांतील ललित तसेच वैचारिक साहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. या साहित्यातलं तरल, भावविभोर तसंच विचार करायला लावणारं जे काही आहे ते सारं टिपताना ते दिसतात. जसा एक कवी त्यांच्यात वस्तीला आहे, तसाच एक नटही त्यांच्यात वास करून आहे. तो सतत काहीतरी शोधतोय आणि मग स्वतःच उलगडत राहतोय कथांच्या विविध गुंडाळ्या. त्या गुंफत राहतोय, दास्तागोईमधून. सांगत राहतोय, कथा रात्रंदिवस आणि त्यातच गुंतून जातोय.
या जगात पाहिलेलं कल्पित त्याला आपलं वाटतंय. कारण ते संवेदनशील, थेट आत पोहोचणारं आहे. पण बाहेरचा अंधार मात्र त्याला अस्वस्थ करतोय. आपण कोणत्यातरी विवरात गुडूप होण्याचं भय सतत त्याच्या मनात आहे. एवढंच नाही, तर संवेदना हरवलेल्या या जगातून आपल्याला बेदखल डिसकार्ड तर करणार नाही ना, हे भयही त्याच्या मनात सतत वसतीला आहे.
गडद काळाचा साक्षीदार
नव्वोदत्तरी पिढी वेगवेगळ्या अर्थानं वेगानं बदलणाऱ्या काळात जगते आहे. विविध संभ्रमात जगताना शेकडो तुकड्यात विभागलं जाण्याच्या काळात अक्षय शिंपी राहाताहेत. हा कवी ज्या काळात जन्मला आणि वाढला, तो गेल्या चाळीसएक वर्षांचा काळ पाहिला तर लक्षात येतं, की या पिढीच्या अंगावर एकाच वेळी अनेक गोष्टी आदळत होत्या. माहिती-तंत्रज्ञानानं जगाच्या उघडलेल्या खिडक्या आणि त्यासोबत आलेलं खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण होतंच, पण जगभरात आणि विशेषतः भारतात झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणानंही बदललेलं समाजमन ही पिढी पाहत होती. बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगली, त्यातून वाढत गेलेली धार्मिक तेढ, मुंबईत झालेले बॉम्बस्फोट आणि या सर्वांचा परिणाम म्हणून लोकांच्या मनात एकमेकांच्या धर्माविषयी वाढत गेलेला कडवटपणा, त्याचा राजकीय सत्तेसाठी उठवला गेलेला फायदा, पुढे झालेलं गोध्राकांड आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून जागी झालेली हिंदू अस्मिता आणि उसळलेल्या दंगली, त्यात होरपळली गेलेली विशिष्ट धर्माची अनेक निरपराध माणसं.
कोणत्याही संवेदनशील माणसासाठी हा एक अस्वस्थतेनं भरून टाकणारा काळ होता. खरं तर आजही त्या काळातून आपण बाहेर आलेलो नाही. उलट त्या काळाचं अधिकाधिक विद्रूप स्वरूप आपल्यापुढे येत चाललं आहे. समाज माध्यमांचा वापर करून गेले दहा-बारा वर्ष या देशात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरण करून जे अराजक पसरवलं जातंय, ते भयावह आहे. या साऱ्याचा परिणाम या काळात लिहिणाऱ्या कवींवर होत आहे.
समग्र नकाराच्या लाटांमधून
कुठले ३६५ दिवस वेचून साजरं करावं नववर्ष
त्याचा शक कुठल्या दिनदर्शिकेवर नोंदला जाईल...
जुन्या दिनदर्शिका जपाव्यात जीवापाड.
आपली रद्दी अधिक अधिक वातड होत गेली आहे
हे तिच्या इतकं कुणीच प्रेमाने सांगत नाही. (काल खंड- अव्याहत)आपल्या जगण्याची रद्दी होत जाताना पाहणं ही संवेदनशील व विचारी माणसांसाठी शिक्षाच आहे. ती पाहत एका विचित्र तिठ्यावर घेऊन आलेला या सगळ्या काळात हा विचारी माणूस जगतो आहे. आजूबाजूला राजकीय अराजक तर आहेच, पण एवढे दिवस लोकशाही आणि संविधानातील मूल्यांवर विश्वास ठेवत वाढणाऱ्या मागच्या आणि आजच्या पिढीला गेल्या काही वर्षांत आपण नेमक्या कोणत्या चिखलात रूतत चाललो आहोत, हेच कळेनासे झाले आहे.
जो संवेदनशील आहे, विचारशील आणि विवेकवादी आहे, अशा प्रत्येकाच्या भावनांचे प्रतिबिंब अक्षय शिंपी यांच्या काव्यातून उमटताना दिसते. तेव्हा त्यांची ही अभिव्यक्ती त्यांची एकट्याची न राहता, समष्टीची होऊन जाते...अस्वस्थ पिढीचा हुंकार
एकीकडे समाजमाध्यमांनी व्यापलेल्या जगामुळे बाहेरचा मुक्त विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे, तर दुसरीकडे आजूबाजूला असलेला समाज त्यांना काही दशकं आणि शतकं मागे मागे घेऊन चाललेला दिसतोय. एकूणच या काळात त्यांना हव्या असलेल्या जगाचा आणि वास्तवातील जगाचा सतत संघर्ष होतोय. त्यामुळे व्यक्ती म्हणून जगण्याचे रस्ते बंद झाल्यासारखं वाटतंय. आपल्याला हवंय खूप काही आणि काहीच मिळत नाही, ही तीव्र होत चाललेली भावना आणि त्यासोबत जगताना हाती लागलेले निरर्थक पोकळ शब्द.
‘वर्तुळाकार पाराच्या परिघात झाड अगदी सुरक्षित आहे. पार त्याच झाडाशी बांधिलकी ठेवून आहे. इतरांना त्याच्या परिघात मज्जाव आहे.
झाड पाराची नजर चुकवून आपली मुळं जमिनीत खोलवर रूजवत नेत आहे, गनिमी काव्यासारखी....
हळूहळू मला जाणवतं, माझ्या कण्याला पारासारखाच बाक येऊ लागलाय,
माझ्या त्वचेच्या अस्तराचे टवके उडून आतल्या नसाधमन्याचं शेवाळ भेगांमधून बाहेर डोकावतंय,
माझ्या परिघावर अनेकांनी आपल्या अस्तित्वाचे पुरावे सोडलेत वेगवेगळ्या रुपांत.
जणू मी म्हणजे सार्वजनिक शौचालयच.’ (परकाया प्रवेश)आपल्या आयुष्याचं दलदलीत रुपांतर होताना पाहणारी ही पिढी अस्वस्थ आहे, ती आपण काहीच करू शकत नाही या असह्य भावनेनं. खरं तर चळवळींचा काळही त्यांनीही थोडाफार पाहिला आहे. या चळवळी आज छोट्याछोट्या कोपऱ्यांमध्ये सुरु आहेत. त्याविषयी संवेदनशील असलेल्या या कवीला आत्मीयता आहे. पण आपण काहीच करू शकत नाही, ही भावना प्रबळ होत चालली आहे. म्हणूनच जगताना वाट्याला आलेला प्रत्येक दिवस निरर्थकपणे घालवताना तो मांडत राहतो, हिशेब एका एका क्षणाचा, मिनिटांचा, तासांचा, वारांचा. सोमवार ते शनिवार चिरफाळत राहायचं, ‘अन् मग रविवारी काढायची सोलून त्वचा, धुवून काढायच्या मेलेल्या पेशी, ओकायचे अशुद्ध रक्त,/सोडायचे उच्छ्वास, श्वासनलिका शुद्ध करून घ्यायची,/शरीर ताजं करून घ्यायचं -/नव्या सहा दिवसांच्या/नव्या सिगरेटी जिरवायला./इथे इच्छानिच्छेचा प्रश्न नाहीच.’ (रविवार)
काव्यप्रतिभेला अभिनय, लेखन आणि सजग सामाजिक भानाची जोड असल्यामुळे अक्षय शिंपी यांच्या कविता टोकदार तर होतातच, सोबतच आत्मचिंतनास प्रवृत्तही करतात...जगण्याची इच्छा नसताना लादलं केलेलं हे आयुष्य ही पिढी जगते आहे. नेमकं काय करायचं आहे, आजच्या या आत्मकेंद्री जगात, हे कळत नाही त्यांना. जागतिकीकरणाचे फायदे घेऊन श्रीमंत झालेल्या नव्या मध्यमवर्गाच्या संवेदनाच हरवत चालल्या आहेत. आत्ममग्न झालेल्या या लोकांच्यात आणि या कवीसारख्या संवेदनशील माणसांत एक मोठी दरी निर्माण झाली आहे. हा कवी परिवर्तनाच्या चळवळींनी प्रभावीत झालेला आहे. पण आज या चळवळी आणि त्यातून आलेलं परिवर्तन वगैरे केवळ बोलण्याच्या पोकळ गोष्टी झाल्यात की काय, असा माहोल तयार केला गेला आहे. धार्मिक ध्रुवीकरणामुळे ग्लोबल बनलेल्या आजच्या विश्वात पुन्हा संकुचित अस्मितांचं पीक बहराला यायला लागलं आहे.
पुरला गणगोत रोवला दगड
आता माझा मीच मुक्तछंद
नुरला ना पाश भणंग बेभान
अवघाची मास्क झुगारिला. (मीच)आपली मुळं सांभाळायची, अस्मिता जपायच्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा, असलेले नातेसंबंध सांभाळायचे की नसलेल्या संबंधांची चिरफाड करत फँटसीत रमायचं, हे कळेनासे झालेली ही पिढी आता सगळे मुखवटे झुगारून देते आहे आणि सभोवताली पसरलेला अंधार स्वीकारते आहे.
इतका इतका अंधार मौजूद आहे
की सूर्यही,
अंधारच पाडतो प्रकाश नावाचा,
आदिम काळापासूनहा स्वतःला हवा तोच प्रकाश पाडणारा अंधार आजूबाजूला असण्याच्या काळात या पिढीतले लेखक, कवी आपलं तुकड्या तुकड्यात विभागलं गेलेलं जगणं आणि मानगुटीवर स्वार झालेला विचित्र काळ यांच्यातील विसंगती टिपण्याचा प्रयत्न करताहेत. आज लिहिणाऱ्या अनेक कवींच्या कवितेत सभोवार दाटून आलेली असहायता आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शोध तसंच जागतिकीकरणानं जवळ आलेल्या जगात जगताना झालेली विखंडित अवस्था परावर्तित झालेली दिसते.
खरं तर महानगरातलं वास्तव मर्डेकरांच्या काळात जसं होतं तसंच आजही आहे. मुंबईत आणि इतर महानगरांत तर जमिनींना इतकं मोल आलं, की मुंबईतला खलनायक बदलला. या आधी अधोविश्वाशी असलेलं मुंबईचं नातं हळूहळू या धनदांडग्या बिल्डर लोकांशी जोडलं गेलं. वाढती बेकारी आणि त्या बेकारीतून आर्थिक सुबत्ता भोगणाऱ्या समाजाप्रती तयार होत गेलेली नकारात्मकता हा आजच्या महानगरांचा आणि महानगरांकडे वाटचाल करणाऱ्या शहरांचा विशेष होत गेला. तो आपल्याला जसा पाब्लो नेरूदाच्या कवितेत दिसतो किंवा मराठीत मढेकरांपासून नामदेव ढसाळांच्या कवितेत दिसतो, तसा तो अक्षयच्या कवितेतही येताना दिसतो.
शहर साकळत जातं रक्तात
शहराच्या लहान लहान गुठळ्या
पेशींसोबत संचारू लागतात शरीरभर.
शरीरात हाडं आहेत
शहरातल्या उंचच उंच टॉवर्सची
अन् खड्डे शरीराची भोकं. (पार्थिव)कवटीत ठासून भरलेला शहराचा भुस्सा जगण्याचा अपरिहार्य भाग झालाय, या पिढीच्या. अखंड वाहतानाच अखंड स्तब्ध असलेल्या या निर्मनुष्य शहरातून वाहाणाऱ्या अंत्ययात्रा पाहत राहतोय कवी आणि म्हणतोय की,
एक शहर उगवत जातंय,
जखमांच्या वेशीवर मला टांगत. (जखम)गेल्या वीस-पंचवीस वर्षांत, विशेषतः बाबरी पाडल्यानंतर, रूजत गेलेलं हिंसेचं झाड आता तरारून आलं आहे. गेल्या दहा वर्षांतील घटनाक्रमावर नजर टाकली, तर लक्षात येतं की व्यवस्थेविरोधात आवाज उठविणाऱ्या आणि आपल्याला नको वाटणाऱ्या लोकांना संपवण्याचं काम वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू झालं आहे. मग ते एका विशिष्ट धर्माच्या किंवा जातीच्या लोकांना झुंडीनं मारण्याचे असेल किंवा झुंडीनं बलात्कार करून स्त्रियांची धिंड काढण्याचे प्रकार असतील. अशा वेगवेगळ्या जखमा आपण वागवतो आहोत मनात. अशा काळात हा कवी म्हणतो,
एक जखम फुलतीय निखाऱ्यासारखी,
रक्तातला वारा पिऊन.
एक जखम विस्तारतीय वसाहतवादी हिरीरीनं
मेंदूतल्या गल्ल्यागल्ल्यांत लाल झेंडे फडकावत.
एक जखम जिंकत चाललीय
तालिबानी उन्मादात एकेक अवयवआज माणसं केवळ असहिष्णू राहिली नाहीत, तर उन्मादी झाली आहेत. गटागटानं हल्ले करताहेत. धार्मिक उन्मादाबरोबरच एकमेकांविषयी पराकोटीचा द्वेष पसरवण्याचं काम आजचा आपला सोशल मीडिया करतो आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर पाठविलेल्या मेसेजेसमधून तथाकथित राष्ट्रभावना जागवल्या जातात. आपल्या धर्माची दुसऱ्या धर्माशी तुलना करत आपल्याला काय काय नाकारलं आहे, याची यादी देतात. देशभक्ती म्हणजे संस्कृती रक्षण आणि संस्कृती म्हणजे धर्माचरण असा विचार मांडला जातो. अशा काळात हा कवी विचारतोय,
बॉम्बला उगवू शकतील हातपाय?
AK-47 मधून उगवून येतील वेली?
रणगाड्यांतून उगवतील खानावळी?
भाल्याच्या टोकावर उगवेल फुलदाणी?
फासाचा दोर होईल का ब्रेसलेट?
काट्यांना फुटतील गायीचे डोळे?
माझ्या प्रश्नांना मिळेल का मोक्ष? (काही प्रश्न)एकूणच हा सारा काळ हा आत्मकेंद्री होण्याचा, संमोहित होण्याचा असा काळ आहे. या काळात कणा हरवलेले लोक आजूबाजूला दिसताहेत आणि अशा लोकांत राहिल्यावर आपलाही कणा हरवून गेल्याची शंका मनात येत राहते. ही शंका संवेदनशील माणसासाठी अतिशय भयावह असते. या भयातून कधीकधी हताशा येते आणि मग स्वीकारही. मग तो म्हणतो, नुकताच मी कणा काढून ठेवलाय, कणा काढून ठेवलेल्या उरलेल्या शरीराचं काय करायचं, याच्या सूचना देत हा कवी शेवटी सांगतो, ‘माझी हाडं जपून ठेवा त्याच्या कुबड्या करून त्या तुम्हाला वापरता येतील.’ ही सारी हताशा आणि असहायता आजच्या जगात अनेकांच्या मनात दाटून आलेली दिसते. आजूबाजूची हिंसा हताशपणे पहाण्याशिवाय आणि शब्दांतून व्यक्त करण्याशिवाय हाती काही राहत नाही, तेव्हा मग कवी आपलं आपलंच पसायदान तयार करतो.
दीर्घ नष्टचर्यांचा एक तुकडा पडल्यावर
नव्या घरघरीचा नवा अध्याय
सज्जच असतो सजून-धजून.
श्वास घेण्याआधी वा पापणी लवण्याआगोदरच
घाला पडतो नव्या ३६५ श्लोक असलेल्या बारा अध्यायांचा.
स्वाहाकार हे एकच पालुपद असलेल्या
सर्व श्लोकांच्या ज्वाळांत आहुती देण्याचं बळ नवी घरघर देवो
हेच पसायदान. (सरत्या डिसेंबरचा शोक)अक्षय शिंपी या त्यांच्या छोटेखानी कवितासंग्रहात जगण्यातली असाहाय्यता, निरर्थकता आणि आलेलं एकाकीपण अतिशय समर्थपणे व्यक्त करतात. त्यांची स्वतःची अशी शैली आहे. शब्दाची भाषेची त्यांना जाण आहे. नेमके शब्द वापरत, ते आपल्या मनातला कल्लोळ कागदावर उतरवतात. जगण्यातला हा अव्यक्त असा उद्वेग ‘अव्याकृत’ या संग्रहातून ते समर्थपणे मुखर करतात. त्यांच्या पुढील लेखनासाठी त्यांना मनःपूर्वक सदिच्छा!
-oOo-
नीरजानीरजा या नामवंत कवयित्री, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींवर व्यक्त होत राहणाऱ्या सजग नागरिक आहेत.
ईमेल : nrajan20@gmail.com
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५
नव्या घरघरीचा नवा अध्याय
संबंधित लेखन
ऑगस्ट-२०२५
काव्यार्थ
नीरजा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा