Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

कथा: अपराधी कोण?

  • अनुनाद

    AparadhiHeadImage

    दरवाजा उघडल्यावर अमरनाथ अवाक झाले. शिपाई नाही, कुरिअर सर्व्हिसेसचा माणूस नाही, ढगळ खाकी शर्ट आणि कंबरेला लाल पट्टा बांधलेला एकजण पत्र हातात घेऊन उभा होता.

    तो माणूस म्हणाला, “कोर्टाचं समन्स आहे, सही करून घ्या.” हे ऐकल्यावर अमरनाथ घाबरून गेले. समन्स? अमरनाथ जीवनात कधीही कोर्टात गेले नव्हते. पोलीस चौकी, हवालदार यांच्याशीही त्यांचा कधीही संपर्क आला नव्हता. नक्कीच काहीतरी चूक होत असली पाहिजे.

    तो माणूस विचारू लागला, “जयदीप सरकार, आपणच ना?” अमरनाथ म्हणाले, “नाही. म्हणजे माझा मुलगा.”

    तो माणूस म्हणाला, “ते घरात आहेत का? आपणही घेऊ शकता आणि जर घ्यायचं नसलं तर मी हे परत घेऊन जाईन. मग पोलीस येतील.”

    अमरनाथनी सही करून तो कागद घेतला. पत्ता बरोबर घातला होता, त्यांच्या मुलाचं नावही त्यावर लिहिलेलं होतं. परंतु जयदीपला कोर्टाकडून कशासाठी बोलावलं असेल?


    अमल दासगुप्त नावाच्या एका माणसाने हाय कोर्टात तीन लाख रुपयांचा स्कॅम झालाय म्हणून खटला भरला होता. तीन आरोपींच्यात जयदीपचा समावेश होता.

    अमरनाथ यांच्या छातीत धडधडू लागलं. जयदीपने कोणाला तरी सामील होऊन पैशांची अफरातफर केली होती? तेही तीन लाख रुपये? अशक्य! खोटं आहे हे!

    परंतु समन्स खोटं असणार नाही!


    दोन अपत्य. मोठ्या मुलीचा विवाह झाला होता. ती जमशेटपूरला राहत असे. जयदीप यादवपूर विश्वविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. अजून एक वर्ष शिल्लक होतं. अभ्यासात हुशार, सरळमार्गी, चांगला मुलगा. आईबाबांना अभिमान वाटावा, असा मुलगा.

    जयदीप उत्तम बॅडमिंटनपटू होता. आजवर त्याने अनेक ट्रॉफी मिळवल्या होत्या. एका स्पर्धेसाठी तो भुवनेश्वरी येथे गेला होता, त्या दिवशी संध्याकाळी परत येणार होता.

    आत्ता घरात फक्त नवरा-बायको. अमरनाथ पुनःपुन्हा समन्स वाचू लागले. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्यांचा!

    इंदिरेची ही वर्तमानपत्रं वाचायची वेळ. सकाळच्या वेळी ती घरकामात इतकी व्यग्र असे की वर्तमानपत्रं बघायलासुद्धा तिला सवड होत नसे. दुपारी जेवणं झाल्यावर ती दोन वर्तमानपत्रं घेऊन बसत असे.

    हे समन्स पत्नीला दाखवावं की दाखवू नये, हे अमरनाथना समजेना. मुलगा म्हणजे जीव की प्राण! अचानक असं काही ऐकलं, तर तिला धक्काच बसेल! शुद्ध हरपून अर्धांगाचा झटका आला तर…? अशा गोष्टी अनेकदा कानावर येत असत.

    केव्हातरी सांगावं लागणारच! जयदीप परत आला की त्याला हे समन्स दाखवावं लागेल. कोर्टाकडून आलेलं समन्स नाकारता येणार नाही.

    इंदिरेनी आतल्या खोलीतून विचारलं, “कोण आलं होतं?”

    अमरनाथ हळूहळू पावलं टाकत त्या खोलीत गेले. त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता. अस्फुट आवाजात ते म्हणाले, “काहीतरी चमत्कारिक घडलंय. मला त्याचा अर्थ लावता येत नाहीय.”

    यजमानांची स्थिती बघितल्यावर काळजी वाटून इंदिरा उठल्या आणि तो कागद पाहू लागल्या. भुवया उंचावत आठ्या घालत त्या विचारू लागल्या, “हे आहे काय?”

    अमरनाथ म्हणाले, “कोर्टाचं समन्स.”

    “ते तर दिसतंच आहे, पण खोकेनच्या नावाने का आलाय?”

    “ते मलाही ठाऊक नाही.”

    “नक्कीच काहीतरी चूक झालीय.”

    “आपल्याच घराचा पत्ता यावर लिहिलाय.”

    “असेना, का; पण खोकेन असलं घाणेरडं काम करू शकेल का?”

    “माझ्याही मनात तोच विचार येतोय. पण...”

    “तुम्ही हे परत का पाठवलं नाही?”

    “परत पाठवलं असतं तर आपल्याकडे पोलीस आले असते.”

    “इथे आणखी दोघांची नावं लिहिलेली आहेत, त्यांनाही आपण ओळखत नाही ना? खोकेनच्या सगळ्या मित्रांशी आपली ओळख आहे.”

    “आपण ज्यांना ओळखतो, ते सोडून आणखीही...”

    “त्याला इतर फारसे मित्र नाहीत आणि हा अमर दासगुप्ता कोण आहे? त्याचं नावही कधी ऐकलं नाही.”

    “मलाही माहीत नाही. खोकेन अधूनमधून बऱ्याच उशिरा घरी परततो. नऊ-साडेनऊ होऊन जातात. कुठे असतो, त्याविषयी तो काही बोलत नाही.”

    “खेळायला जातो. आणखी कुठे जाणार?”

    “पावसाळ्यात खेळ असतो का?”

    “मित्रांबरोबर असतो. गप्पांचा अड्डा. खोकेन आता मोठा झालाय. सारा वेळ आईबाबांबरोबर कसा राहील तो? तुमच्या या वयात तुम्ही घरात राहत होतात का हो?”

    “कधी कधी तो उदास दिसतो. स्वतःच्या खोलीत गुपचूप बसून राहतो. मी काही विचारलं तर उत्तर देत नाही.”

    “कोणाच्या प्रेमात पडला असेल कदाचित!”

    “इंदू माझ्या मनात एक शंका येतेय, सांगू का तुला? तो कोणाच्या तरी सांगण्याच्या भरीस पडून कोणाबरोबर व्यवसाय करायला गेला नसेल ना? इतके पैसे!”

    “व्यवसाय करणार? आपला खोकेन? अजून शिक्षण पूर्ण व्हायचंय. तुमचं डोकं फिरलंय का? व्यवसाय करायचा विचार तो कशाला करेल? जे काही पैसे लागतात, ते तुमच्याकडून मागून घेतो ना तो? तुम्ही पैसे द्यायला नकार दिलाय, असं कधी झालंय का?”

    “कधीच झालं नाही. तो वायफळ खर्च करत नाही.”

    “मग?”

    “जर कोणाच्या वाईट संगतीत अडकून पडला असला तर...? कोणीतरी सहज पैसे मिळवायचं आमिष दाखवून त्याला वाईट कामात सहभागी करून घेतलं असलं तर...?”

    “माझ्या रक्तामांसाच्या मुलाला मी ओळणार नाही का?”

    SagarShindeSketch2
    रेखाचित्रे : सागर शिंदे.

    जयदीप संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी परतला.

    आल्या आल्या त्याला काही सांगितलं नाही. आधी त्याचं खाणंपिणं होऊ दे. स्नान उरकून घेऊ दे. तरी अमरनाथ त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पुसून टाकू शकले नाहीत.

    अंघोळ झाल्यावर जयदीप बाहेर पडला, परत आला रात्री नवाच्या सुमारास.

    जेवणाच्या टेबलापाशी बसून अमरनाथ हळू हळू सूतोवाच करू लागले. जयदीपने समन्स पाहिलं. त्याने त्याला काहीच महत्त्व दिलं नाही. कपाळाला आठ्या घालत फक्त म्हणाला, “कोणीतरी बहुतेक माझी थट्टा करताय. तीन लाख रुपये? जीवनात दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम आजवर डोळ्याने पहिली नाही.”

    अमरनाथनी सावध होत विचारलं, “हा अमल दासगुप्त तुझा मित्र आहे का?”

    जयदीप म्हणाला, “मित्र! आयुष्यभरात मी हे नावही ऐकलं नाहीय.”

    इंदिरा म्हणाली, “मी तर केव्हाच सांगून टाकलंय, हे चुकीने आपल्याकडे आलंय किंवा कोणीतरी आपली थट्टा करतंय.”

    जयदीप ते समन्स फाडायला निघाला होता, पण अमरनाथ थांब, थांब म्हणत घाईघाईने त्याच्यापाशी गेले.

    ते म्हणाले, “कोर्टाचं समन्स फडता येणार नाही. उद्या तुला कोर्टात हजेरी लावावीच लागेल.”

    जयदीप स्वभाविक होत म्हणाला, “ठीक आहे. जाईन.”

    अमरनाथ म्हणू लागले, “एक वकील ठरवायला हवा ना?”

    “वकील कशासाठी? फॉल्स केस, त्यासाठी वकिलावर मी खर्च कशाला करू?”

    “हे फॉल्स अॅलिगेशन आहे, हे सिद्ध करावं लागेल ना?” “हे काम मी केलं नाहीय, हे मी स्वतःच्या तोंडून सांगेन. ते काही सिद्ध करू शकतील का?”

    “खोकन, तू नीट आठवून बघ. तुझ्या एखाद्या मित्राने तुला जामीन ठेवून कोणाकडून पैसे उसने घेतले होते का?”

    “जो जामीन राहतो, त्याचा काहीच दोष नसतो. परंतु त्याने पैसे परत दिले नाहीत, तर मात्र जमीनदार आपल्याला कोर्टात खेचू शकतात.”

    “इतक्या पैशांसाठी मी जामीन कशाला राहू? माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का?”

    “कदाचित बोलताना कमी पैसे म्हटलं असेल आणि प्रत्यक्षात जास्त पैसे घेतले असतील!”

    “अशा तऱ्हेचा एकही व्यवहार मी केला नाहीय.”

    “तू कधी कोणाला कोऱ्या कागदावर सही करून दिली होतीस का?”

    “बाबा, तुम्ही माझी उलटतपासणी घेताय का? कोऱ्या कागदावर सही देण्याइतका मी मूर्ख आहे, असं तुम्हाला वाटतं का? मित्रांशी मी पैशाचे कोणतेही व्यवहार करत नाही.”

    हे संभाषण थांबवत इंदिरेने त्यांना जेवायला यायची हाक दिली. त्यानंतर काही वेळाने सगळे झोपायला गेले. इंदिरेला झोप लागली असली तरी अमरनाथ जागेच होते. मनातली अस्थिरता काही केल्या कमी होईना.

    जयदीप सगळं सत्याला स्मरून सांगत होता का? अतिशय जोरदार निषेध केला नव्हता त्याने! त्याने नजरेला नजर देऊन पाहिलं नाही, दुसऱ्या दिशेला तोंड वळवून तो बोलत होता. शेवटी शेवटी तर तो चांगलाच रागावला होता.

    जयदीप काही प्रमाणात गोपनीय जीवन जगत होता का? संध्याकाळनंतर एक-दोन तास तो कुठे असतो? बरेचदा एक-दोन मित्र त्याच वेळात फोन करीत. अशा वेळी जय फोन घेतो का? इथल्या मुलांच्या वागण्यातला तपशील नीटसा समजत नाही.

    वकील नेमायला त्याने नकार दिला. का? त्याला खरोखरच तुरुंगात जावं लागलं तर फक्त घोटाळा होणार नाही, त्याच्या जोडीला समाजात तोंड दाखवायची सोय उरणार नाही. माझा मुलगा फसवणारा, लफडेबाज! शी! शी! शी! शी!

    अमरनाथ मध्यरात्री बाथरूमला जाण्यासाठी एकदा उठले होते.

    जयदीपच्या खोलीत अजूनही दिवा जळत होता. पोरगा झोपू शकला नव्हता!

    आईबाबांसमोर कितीही नकार दिला तरी नक्कीच एखादी चूक त्याच्या हातून घडली असणार! कोर्टाचं समन्स पूर्णपणे खोटं असू शकेल का?

    अमरनाथही रात्रभर झोपू शकले नाहीत.

    सकाळी अकरा वाजता कोर्टात हजेरी लावायची होती. एकट्यानेच जावं, अशी जयदीपची इच्छा होती. त्याने त्याच्या एकाही मित्राला यातलं काही सांगितलं नव्हतं. मुलाने तीव्र विरोध केल्यावरही अमरनाथ त्याच्याबरोबर गेले.

    जयदीपच्या वागण्यात कोणत्याही प्रकारचा उद्वेग नव्हता. त्याला ट्रॅमने जायचं होतं, पण अमरनाथनी टॅक्सी केली. ते जोरजोरात सिगारेटचे झुरके घेऊ लागले. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. आता काय होईल, हा विचार त्यांच्या डोक्यात सतत भिरभिरत होता.

    कोर्टात पोचल्यावर जयदीपने प्रथम अमल दासगुप्तच्या वकिलाचा शोध घेतला. त्याची भेट झाल्यावर त्याच्या नाकाच्या शेंड्यावर समन्सचा कागद नाचवत नाचवत म्हणाला, “हे काय आहे, ते सांगा पाहू? ही थट्टा चालवलीय का आमची?”

    समन्सवर नजर टाकत ते म्हणाले, “मी कालच म्हटलं होतं, टायपिंगमध्ये प्रचंड घोटाळा झालाय. जयदीप नाही, असायला हवं होतं जयदेव सरकार. अनुकूल चॅटर्जी स्ट्रीट नाही, अनुकूल बॅनर्जी स्ट्रीट, त्याच नावाचा आणखी एक रस्ता आहे. आज सकाळी शोध घेऊ लागलो, तेव्हा समजलं, तो जयदेव सरकार फरार झालाय!”

    जयदीप अतिशय रागावून म्हणाला, “टायपिंगची चूक? त्यासाठी अभ्यास सोडून मला ओढाताण करत इथे यावं लागलं? फार शहाणे आहात!”

    ते सभ्य गृहस्थ हात जोडून म्हणाले, “मी माफी मागतो. दोष माझा नाही. कोर्टाच्या कारकुनाचा. काय करू सांगा! यांना काही सांगायची सोय आहे का?”

    अमरनाथच्या अंगातून थंडगार घामाच्या धारा ओघळत होत्या. आजच्याइतकं स्वस्थ त्यांना या आधी कधी वाटलं नव्हतं!

    त्यांनी जयदीपला मिठी मारली. अर्थात त्या आलिंगनात मनस्ताप नव्हता!

    जयदीपने कोणताही अपराध केला नव्हता. अपराधी ते स्वतः होते. ते मुलावर विश्वास ठेवू शकले नव्हते. तो खोटं बोलतोय, असा त्यांच्या मनात संशय होता. या उलट इंदिरा प्रथमपासून ठासून सांगत होत्या, ‘त्यांना समजत नाहीय. स्वतःच्या मुलाला ते ओळखत नाहीयत.’

    बाबा या नात्याची आज प्रथमच त्यांना प्रचंड लाज वाटू लागली.

    -oOo-

    (सुनील गंगोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘के अपराधी?’ या बंगाली कथेचा मराठी भावानुवाद.)


    सुमती जोशी
    सुमती जोशी

    अनुवादिका सुमती जोशी या राज्य पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिका, अनुवादिका आहेत. त्यांची ‘उत्क्रांती’, ‘बंगरंग’, ‘दैत्याचा बगीचा’, ‘मंत्र’ आदी स्वतंत्र तसेच अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
    ईमेल: sumatijoshi154@gmail.com



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा