Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

मुलाखत : “आरोग्य संवादाची समृद्ध संस्कृती आकारास येणं हेच उद्दिष्ट”

  • संवादयात्रा

    MohanDes_Aarogyabhan
    ‘आरोग्यभान’कर्ते मोहन देस

    अनेक वर्षांपूर्वी वैद्यकीय व्यवसाय थांबवून आरोग्याचं काम सुरू केल्याचं तुम्ही अनेकवार सूचित करत असता. त्यावरून वैद्यकीय व्यवसाय आणि आरोग्याचं काम या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत की काय असं वाटतं...

    वैद्यकीय व्यवसाय आणि आरोग्याचं काम या दोन्ही गोष्टींचा एकमेकींशी थेट संबंध नाही. माझी ओळख करून देतानाही ‘मी डॉक्टर आहे, तरीदेखील आरोग्याचं काम करतो’ असं सांगतो. डॉक्टर हा रुग्णांसाठी असतो आणि रुग्ण डॉक्टरकडे येतो, कारण त्याच्या आरोग्यात बिघाड झालेला असतो. आरोग्य म्हणजे काय, तर शरीराच्या सगळ्या यंत्रणा जागच्या जागी असणं, (त्या स्वस्थ असणं... म्हणून आरोग्याला आपण स्वास्थ्य असं म्हणतो...) त्यांचं काम योग्यरीत्या सुरू असणं. ते बिघडलं तर डॉक्टर लागतो. डॉक्टर रोगांवर काम करतात, आरोग्याचं काम करत नाहीत.

    वैद्यकीय व्यवसायात असताना मला वाटायचं, ही एवढी रोगराई खरंच आहे का? रोगराई, अस्वच्छता, मानसिक अस्वस्थता हे सगळे घटक वैद्यक सत्तेसाठी आवश्यक आहेत. अनारोग्य ही काही लोकांची आर्थिक गरज आहे. काही मूलभूत गोष्टींवर काम झालं, तर देशातली सत्तर टक्के रोगराई नाहीशी होईल, पण ती तशीच राहणं अनेकांच्या फायद्याचं आहे. त्यामुळेच मूलभूत आरोग्यावर फारसं काम केलं जात नाही.

    मी मुंबईत १७ वर्षं वैद्यकीय व्यवसाय करत होतो. त्यावेळीही मी काही संस्थांशी जोडलेला होतो. कामगारांसाठी, झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने चालवत होतो. पैसा कमावणं हा मुख्य उद्देश तेव्हाही नव्हताच. मात्र, माझ्या पत्नीची आणि नंतर मुलीची साथ असल्याने मी ते करू शकत होतो.

    रोगराईवर उपचारांचं काम करायला खूप डॉक्टर्स आहेत, पण रोगराई टाळण्यासाठी आणि आरोग्य टिकवावं, वाढावं यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स खूप कमी आहेत. तसं काही करता आलं तर बघावं, असा विचार प्रकर्षाने मनात येत होता.

    मुळात, समाजासाठी काही करण्याच्या विचाराची पायाभरणी कुठे आणि कशी झाली?

    सुरुवात झाली, पण ती समाजासाठी नव्हे, समाजासोबत! सुधारणावादी विचारांचा वारसा मला घरातूनच मिळाला होता. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ‘लोकविज्ञान’ या संघटनेचं काम मी डॉक्टर होण्याच्या आधीपासून करत होतो. १९८०च्या दशकात आम्ही महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये विज्ञानाचा प्रसार करत होतो. ‘फाउंडेशनल रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’मध्ये मी डॉ. अंटियांसोबत दहा वर्षं काम केलं होतं. आरोग्यसंवादाचा शोध तिथेच लागला. नुसतं संशोधन पुरेसं नाही, तर उपक्रमांमध्ये उतरणं गरजेचं आहे, हे तिथेच उमगलं. मग वैद्यकीय प्रॅक्टिस सोडली आणि ‘आरोग्यभान’ला सुरुवात झाली.

    ‘आरोग्यभान’ हे नाव नेमकं कसं आलं?

    आरोग्य हा शब्द तर आपल्याला माहीत आहेच. ‘व्हेअर देअर इज नो डॉक्टर’ या पुस्तकाचे एक लेखक डेव्हिड वेर्नर यांनी म्हटलं आहे- एव्हरिथिंग अंडर द सन, इन्क्लुडिंग द सन, इज हेल्थ. म्हणजेच सूर्याच्या प्रकाशपरिघात येणारी प्रत्येक गोष्ट, त्यात अगदी सूर्यसुद्धा येतो, आरोग्याच्या व्याख्यात मोडते. ‘भान’ ही संकल्पना व्यापक आहे, भान म्हणजे केवळ जागरूकता, माहिती नाही, तर अनेक गोष्टींची एकाच वेळी जाणीव असणं. हे भान आरोग्याबाबत असलं पाहिजे. चांगला डॉक्टर कोण, प्यायचं पाणी कसं असलं पाहिजे, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता, लैंगिकता, मैत्री सहकार्य, नातेसंबंध, लैंगिकता, लिंगभाव या सगळ्याचं भान हवं. आरोग्याबाबत भान निर्माण करण्याचा उद्देश असल्याने उपक्रमाला ‘आरोग्यभान’ नाव दिलं. १९९६ साली मी आणि आणखी काही समविचारी लोकांनी ‘आरोग्यभान’ची रचना करायला सुरुवात केली. हळूहळू माणसं जमत गेली. सुरुवातीला आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातच काम करत होतो. नंतर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काम सुरू झालं. मग राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांमधल्या काही ठिकाणी ते पसरलं.

    बरीच वर्षं आम्ही संस्था म्हणून नोंदणी वगैरे केलेली नव्हती. समविचारी लोक एकत्र यायचो, काम करायचो, त्यातून मिळणारं मानधन आपसात वाटून घ्यायचो. साहित्याची निर्मितीही सगळे मिळून करायचो. आमच्यात काही चित्रकार होते, काही नाटकात रस असलेले होते, काही गाणारे होते, लिहिणारे होते, आजही आहेत. गावागावांतले स्त्री-पुरुष, शाळा-कॉलेजातले विद्यार्थी यांनी ‘आरोग्यभान’ला खूप साथ दिली. त्यांनी गाणी लिहिली, चाली लावल्या. लोकगीतांच्या चालींवर बसणारे शब्द आम्ही लिहिले. मराठी, हिंदी भाषांतल्या गाण्यांची मग तेलुगुमध्ये, ब्रजभाषेत भाषांतरं झाली. राजस्थानमध्ये बसवाडात बागडी नावाची बोली आहे, त्यातही गाणी भाषांतरित झाली.

    चार वर्षांपूर्वी आम्ही संस्थेची नोंदणी केली. त्यामुळे सीएसआर निधी मिळण्याची शक्यता आहे. आम्ही पाच जण पूर्णवेळ काम करतो. बाकीचे १०-११ नोकरी करून वेळ देतात. संस्थेकडे ऑफिसची इमारत, वाहनं वगैरे मालमत्ता निर्माण झाली म्हणजे तिचं संस्थान होतं, सत्तास्थान निर्माण होतं, उतरंडी तयार होतात; त्यात कामाचं नुकसान होतं. पैशाची गरज असते, पण आर्थिक बाबींवर सत्ता उभी राहिली तर मूलभूत तत्त्वालाच बाधा येते. त्यामुळे संस्थेचं ऑफिस नाही, कोणतीही प्रॉपर्टी नाही. संस्थेचा कारभार पारदर्शक आहे. किती पैसे आले, कोणाला किती मिळाले हे प्रत्येकाला माहीत असतं. आमचं काम हा लोकसंस्कृतीचा भाग आहे. घराघरांमध्येच आम्ही पोस्टर्स, वह्या ठेवतो. बैठकाही कधी कोणाच्या घरी होतात, तर कधी चहाच्या टपरीवर. संवादाचं साहित्य विषयवार पेटाऱ्यांमध्ये ठेवलेलं असतं. लोक ते घेऊन जातात आणि परत आणून ठेवतात. कार्यशाळा कधी शाळांमध्ये होतात, कधी कोणाच्या गच्चीवर होतात, कधी आदिवासी भागात, कधी वडाच्या झाडाच्या सावलीत तर कधी शहरी कामगार वस्त्यांमध्ये होतात.

    संस्था लहान असल्याने हे जमतं असंही अनेकांचं म्हणणं आहे. ते बरोबरही असेल. मात्र, संस्थेचं स्वरूप विकेंद्रित आहे. बेळगाव-सोलापूरची वेगळी ‘आरोग्यभान’ आहे, कोकणातली वेगळी असू शकते. राजस्थानातल्या उपक्रमात आम्ही लक्ष घालत नाही. सत्तास्थानं निर्माण न होऊ देण्याचा प्रयत्न करतो. त्यातून काही वेळा संस्थेचं नाव वापरून (किंवा वापरण्याचं टाळून) गैरवापराचे प्रकारही झाले आहेत, पण तरीही विकेंद्रीकरणाचा आमचा आग्रह कायम आहे.

    ‘आरोग्यभान’च्या कामाचं स्वरूप नेमकं कसं आहे?

    सुरुवातीला आरोग्याचं शिक्षण हेच डोक्यात होतं. ते खरं तर प्रत्येक स्तरावर अगदी घरोघरीही सुरूच असतं. लहान मुलांना आपण दात घासायला सांगतो, त्यांच्या आहाराचा विचार करतो, वाईट सवयींपासून दूर राहायला सांगतो. डॉक्टर, शिक्षक वगैरे तेच करतात. मात्र, त्यातली एक अडचण लक्षात आली. ज्याच्याकडे माहिती आहे, त्याने ती इतरांना द्यायची ही आपल्या शिक्षणाची परंपरा आहे. यातही सत्तेचं समीकरण येतंच. जशी डॉक्टरांची सत्ता असते, तशी शिक्षकांचीही असते. त्यामुळे आरोग्यशिक्षण सूचनांच्या पातळीवरच राहतं. हे खा, ते खाऊ नका, व्यसनं करू नका, मानसिक आरोग्य सांभाळा अशा सगळ्या सूचना/आज्ञा एकतर्फी पद्धतीने येतात. वैज्ञानिक माहिती देऊनही सूचनाचं कृतीमध्ये रूपांतर होत नाही. यामागचं कारण म्हणजे, शिकवणाऱ्याचा समोरच्या माणसाशी संवाद नसतो. ज्यांना सूचना केल्या जातात ती माणसं कशी जगतात याबद्दल सूचना करणाऱ्याला अजिबातच माहिती नसते. पोषणाच्या शासकीय कार्यशाळेत पोषक पदार्थ म्हणून थालीपीठ करून दाखवलं जातं. मात्र हा पदार्थ करण्यासाठी आवश्यक जिन्नस, वेळ त्यांच्याकडे आहे का, हे बघण्याचे कष्ट घेतले जात नाहीत.

    आणखी एक उदाहरण देतो. सरकारने बांधून दिलेली शौचालयं वापरण्याची सूचना आरोग्य कर्मचारी करतात, पण पाणी आहे का, सेप्टिक टैंक आहेत का हे बघितलं जात नाही. अशा परिस्थितीत आरोग्यशिक्षण वाया जातं. कारण संवादाचा अभाव असतो. आरोग्याच्या समस्यांना कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय अशी अनेक अंग असतात. भारत उष्ण कटीबंधीय आणि हिरवा देश आहे, मुबलक लोह असलेल्या हिरव्या भाज्या उपलब्ध आहेत, तरीही अॅनिमियाचं प्रमाण प्रचंड आहे. भारतात आयर्नच्या (लोहाच्या) गोळ्या द्याव्या लागणं ही ‘आयरनी’च आहे. या सगळ्याचा अर्थ गरज शिक्षणाची नसून संवादाची आहे.

    Drawing
    शरीरात उत्साह, उमेद आणि जीवंतपणा आणण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची मदत होऊ शकते, हे व्यक्त करताना मुले आपापल्या आकलन आणि अनुभवांना अनुसरून अभिव्यक्त होत राहतात...

    ‘आरोग्यभान’च्या कार्यशाळेत पहिला उपक्रम असतो तो ‘आरोग्य’ म्हटल्यावर जे काही मनात येतं, त्याचं चित्र काढण्याचा. दवाखाना, टॉनिक, इंजेक्शनपासून ते जेवणाचं ताट आणि हसऱ्या चेहऱ्यापर्यंत ३०-३५ चित्रं काढली जातात. आरोग्य म्हणजे डॉक्टर, दवाखाना ही कल्पना काढून टाकण्यासाठी आम्ही हा उपक्रम घेतो. आरोग्याचा प्रवास डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी असतो, हे कथांद्वारे सांगून आम्ही त्यावर चर्चा करतो. त्यातून लोकांना वेगळी जाण येते, शंका दूर होतात. या कार्यशाळांच्या ठिकाणी उपलब्ध घटक वापरून पोषक खाद्यपदार्थ तयार करून दाखवले जातात. काही रानभाज्यांमध्ये लोहाचं प्रमाण मेथी-पालकाच्या तुलनेत आठ पटींनी जास्त असतं, पण तिथल्या लोकांना त्याची माहितीच नसते. अशाप्रकारे संवादामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर समुदायाला आरोग्याबाबत एक पाऊल पुढे टाकता येतं.

    आरोग्यसंवादाची समृद्ध संस्कृती नव्याने निर्माण करणं हेच ‘आरोग्यभान’चं काम आहे. संवादाची संस्कृती तर आपल्याकडे आहेच. अनेकदा या संवादात असाहायता असते, नशिबाला बोल लावण्याची वृत्ती असते. एकत्रीकरणाच्या माध्यमातून ही असाहायता कमी करण्यासाठी ‘आरोग्यभान’ काम करते. रुग्णांना हक्क आहेतच. सामान्य माणसालाही आरोग्याचा हक्क आहेच. हा हक्क मान्य केला, तर लोक मागण्या करायला लागतील या भीतीने त्यांना त्या हक्कांपासून अनभिज्ञ ठेवलं जातं. आमच्या आरोग्यसंवादात अधिकार, सक्षमता हे परवलीचे शब्द आहेत, म्हणूनच लोकांना ते आपलेसे वाटतात.

    मध्य प्रदेशातल्या एका कार्यशाळेत लोकांना ते जे खातात, ते नमुन्यादाखल आणायला सांगितलं. त्यांचा सूर ‘यहाँ खास कुछ नही मिलता’ असा होता. प्रत्यक्षात त्यांनी तब्बल ६८ प्रकार आणले आणि त्यातले तीन-चार प्रकारच आपल्या माहितीचे होते. आपल्याकडे किती वैविध्य आहे, हेही त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागलं.

    आरोग्याचं काम वैज्ञानिक स्वरूपाचं असतं, पण त्यासाठी कलेचं माध्यम तुम्ही आवर्जून वापरता...

    निश्चितच. आम्ही गाणी, नाटकं, गोष्टी या सगळ्या माध्यमांचा वापर करतो. कार्यशाळांसाठी काही कथा तयार केल्या आहेत. अर्थात त्यात वेळेवर बदल केले जातात. अनेक संस्थांमध्ये निश्चित मोड्युल्स असतात, आम्ही मोड्युल्सनुसार काम करत नाही. रचना नक्कीच आहे. एक सांगाडा आहे, त्याच्या मधल्या जागा भरणं हे संवादकाच्या हातात असतं. आम्ही शिक्षक म्हणत नाही, संवादक म्हणतो. गुरू, सुधारक, डॉक्टर नको, तर आरोग्य संवादक व्हायला हवं. संवाद संस्कृतीजन्य असतो. अलीकडे तो कमी होत चालला आहे, त्यात कृत्रिमता आली आहे. घरात खाण्याबद्दल बोलतानाही आपण खूपच वैद्यक स्वरूपाचं बोलायला लागलो आहे. कार्ब्स, व्हिटॅमिन्स वगैरे. ही कृत्रिमता टाळली पाहिजे.

    संस्कृती प्रमाण नसते. ती लोकांची असते. त्यामुळे आरोग्याची गाणी लोकांची असली पाहिजेत, चित्रं लोकांची असली पाहिजेत, नाटकंही लोकाधिष्ठित असली पाहिजेत. आपलाच आरोग्याचा प्रश्न नाटकाच्या माध्यमातून समोर उभा राहिला, तर लोक त्याकडे त्रयस्थपणे बघू शकतात. त्यावर चर्चा होते. त्याला आम्ही आरोग्याचा संवाद म्हणतो. अखेरीस माणसं म्हणतात, ‘आरोग्यभान’च्या संवादातून काही उत्तरं मिळाली पण काही प्रश्नही पडले, पण या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची जबाबदारी आमची आहे.

    चित्रांचा वापरही प्रभावीरीत्या करता येतो. मात्र, अनेकदा शिक्षणासाठी दाखवली जाणारी चित्रं लोकांच्या परिचयाचीच नसतात. आम्ही लोकांनाच चित्र काढायला सांगतो, कथा तयार करायला सांगतो. गुजरातमधल्या भडोचजवळच्या नेत्रांग गावातल्या कार्यशाळेत आम्ही सांडपाणी या विषयावर कथा तयार करायला सांगितली. त्या गावात खूप मोर होते. या कथेतल्या मोराचा पिसारा सांडपाण्यामध्ये लडबडून झडून गेला होता, त्यामुळे लांडोरी त्याला विचारत नव्हत्या. मग एक कावळा येऊन (हा कावळा त्या बाईच्या माहेरच्या गावाचा होता म्हणे!) दुसऱ्या एका गावातल्या शोषखड्ड्यांबद्दल माहिती देतो, अशी गोष्ट त्या स्त्रियांनी तयार केली. हा कलेतून झालेला आरोग्यसंवादच आहे. बुंदेलखंडातल्या चित्रकूट भागातल्या एका कार्यशाळेत लोकांनी रामायणातल्या व्यक्तिरेखा घेऊन आरोग्याबद्दलचं गाणं तयार केलं होतं. तात्पर्य काय, परीकथा, चित्रकथा, पुराणकथा यांची पारंपरिक संवादी संस्कृती आरोग्यामध्ये येऊ शकते.

    आम्ही ज्यांच्यामार्फत कार्यशाळा घेतल्या त्या बहुतेक संस्था पुरोगामी विचारांच्या होत्या, लोकांचे अधिकार जाणणाऱ्या होत्या. त्यामुळेच त्यांच्यासोबत आम्ही काम करू शकलो.

    ‘आरोग्यभान’तर्फे ‘रिलेशानी’ शिबिरं घेतली जातात...

    हा शब्द आम्हीच तयार केलेला आहे. रिलेशानी म्हणजे शानदार रिलेशनशिप अर्थात आरोग्यपूर्ण नातेसंबंध. हा विषय शाळांमधून शिकवला जात नाही. ९३ टक्के मुलींना तर ५३ टक्के मुलांना नात्याचे भीषण, त्रासदायक अनुभव कधी ना कधी आलेले असतात, असं आकडेवारी सांगते. शाळांमध्ये दिलं जाणारं लैंगिक शिक्षणही जुजबी स्वरूपाचं असतं. प्रगल्भ, सुंदर नातेसंबंधांची गोष्ट आपल्याकडे काहीशी गोपनीय करून टाकतात. शाळेत सहशिक्षण असतं, कधीकधी त्यातून विसंवाद होतात. प्रेमाचा अर्थ काय, आपलं शरीर कसं घडलं आहे असे अनेक प्रश्न मुलांना पडतात. मासिक पाळीबद्दल मुलींच्या मनात गोंधळ असतात. त्या वयात शरीरात होणाऱ्या विकासाबद्दल त्यांना नीट कळत नाही. या विकासाबद्दल सन्मानाची भावना मुलामुलींच्या मनात निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. स्पर्शाची भाषा अनेकांना कळत नाही. मुलींशी निदान मासिक पाळीबद्दल तरी बोललं जातं. मुलांना तर कोणीच काही सांगत नाही. त्यात आज मोबाइल फोनसारखं साधन मुलांच्या हातात आहे. त्यातून खूप प्रश्न निर्माण होतात. अशा असंख्य गोष्टींबद्दल ‘रिलेशानी’मध्ये चर्चा होते. त्यातही गाणी, नाटकं असतात.

    Music_Learn
    वैद्यकीय व्यवसाय आणि आरोग्य जागृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. अशा प्रसंगी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या सगळ्या वयोगटांमध्ये आरोग्यविषयक जाणिवा जागृत असण्यातच निरोगी मन आणि शरीराचे इंगित दडलेले आहे...

    आमच्याकडे पोर्नोग्राफीबद्दलचं अत्यंत संयत असं नाटक आहे, लैंगिक छळाबद्दलचं नाटक आहे. मुलांच्या भावी आयुष्यातल्या नात्यांना एक निकोप पाया देणं हाच ‘रिलेशानी’चा उद्देश आहे.

    आमच्याकडे वेगवेगळ्या बोली-भाषांतली दीडशे गाणी आहेत. लहान मुलांसाठी शरीरशास्त्रावरचं गाणं बडबडगीतासारखं आहे. ग्रामीण भागांतल्या मुलांसाठी वेगळी गाणी आहेत, शहरांतल्या मुलांसाठी वेगळी गाणी आहेत. आदिवासी भागांत आदिवासी-नागरी नातेसंबंधांच्या गोष्टी आहेत.

    रिलेशानी शिबिर आम्ही वेगवेगळ्या वयोगटांसाठी घेतो. १० ते १५ वयोगटासाठी रिलेशानी-१, कॉलेजच्या वयाच्या मुलांसाठी रिलेशानी-२, पंचविशीच्या तरुणांसाठी रिलेशानी-३, आयुष्यात स्थिरावलेल्या मध्यमवयीन लोकांसाठी रिलेशानी-४, ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी रिलेशानी-५ आणि रिलेशानी-६ अशी रचना आहे. रिलेशानी-७ दिव्यांग, भिन्नमती किंवा देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया अशा लोकांसाठी आहे.

    ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरांमध्ये व्याधींवर बोललं जातं. त्यातून येणारं नैराश्य, त्याचे नातेसंबंधांवर होणारे परिणाम यांवर चर्चा करतो. वृद्धांच्या लैंगिकतेचेही प्रश्न असतात, लिव्ह-इन, विवाहबाह्य संबंध यांचेही प्रश्न असतात. आमचे फिजिओथेरपीस्टही वृद्धांना व्यायाम शिकवतात. योगातला अध्यात्मिक भाग बाजूला ठेवून आम्ही त्याचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांसाठी करतो.

    ज्येष्ठ नागरिकांचाही प्रतिसाद चांगला आहे. त्यांना खूप बोलायचं असतं, पण संधी मिळत नाही. या शिबिरांमध्ये ते खूप बोलतात.

    मुलामुलींना एकत्र बसवून त्यांना शरीराबद्दलची, नातेसंबंधांची माहिती देताना विरोधाचेही प्रसंग आले. राजस्थानात एका गावातल्या लोकांनी कार्यशाळेत येऊन गोंधळ घातला होता. मात्र, हे प्रकार आम्ही व्यवस्थित हाताळले.

    डॉक्टर असूनदेखील आरोग्याचं काम करतो अशी ओळख तुम्ही करून देता, पण डॉक्टर असण्याचा या कामात उपयोग होतच असणार...

    हे काम करण्यासाठी खरं तर डॉक्टर असण्याची गरजच नाही. संवाद महत्त्वाचा आहे. आमचा १७ दिवसांचा कार्यक्रम पूर्ण करून नववी-दहावी शिकलेली स्त्रीसुद्धा ‘बेअरफूट डॉक्टर’ म्हणून काम करू शकते. आम्ही हा कार्यक्रम मेळघाटमध्ये राबवला आहे.

    प्रॅक्टिसिंग डॉक्टर असल्याने सामान्य माणसाशी संपर्क आला, त्यांच्या समस्या मला कळल्या, आरोग्यसंवादाचं बीज तिथून पेरलं गेलं. मात्र डॉक्टर असण्याचा एक अडसर म्हणजे लोक काही वेळा प्रश्न न विचारता, माझं म्हणणं मान्य करतात.

    अर्थात, आव्हानं अनेक आहेत. फक्त डॉक्टर असण्याचा नव्हे तर पुरुष असण्याचाही अडसर जाणवतो. उत्तर प्रदेशातल्या एका शिबिरात परपुरुषाला तोंड दाखवायचं नाही म्हणून स्त्रिया पाठ करून बसल्या होत्या. पुरुष कितीही पुरोगामी असला, तरी त्याच्याकडून नकळत वर्चस्व गाजवलं जाऊ शकतं. इंग्रजीत त्याला ‘मॅन्सप्लेनिंग’ असा चपखल शब्द आहे. ते ‘मॅन्सप्लेनिंग’ माझ्याकडूनही अनेकदा झालं, पण संवादी व्हायचं असेल तर हे सोडलं पाहिजे, हे लक्षात आल्यावर मी जाणीवपूर्वक ते कमी करत गेलो. शहरी असण्याचाही अडसर काही वेळा होतो. ग्रामीण भागातले लोक प्रमाणभाषेने दीपून जातात. त्यावेळी लोकांना तुमच्या भाषेत गाणं म्हणा, नाटक करा म्हणून उत्तेजन द्यावं लागतं. मग ते मोकळे होतात.

    आव्हानांबद्दल बोलायचं तर गेल्या काही वर्षांतल्या राजकीय परिस्थितीचा परिणामही कामावर होतो. हिंदू संस्कृती, धर्म याबद्दल तुम्ही प्रतिकूल बोलता अशी टीका अनेक लोक करतात. मात्र, माझ्या मते आम्ही संस्कृतीचंच पालन करतो. आपली संस्कृती बहिणाबाईंचीही आहे, तुकारामांचीही आहे, कबिराचीही आहे, बसवेश्वराचीही आहे आणि विज्ञानसंस्कृतीही आपल्याकडे पूर्वापार आहे. वर्णाश्रम, जातीयवाद, लिंगभेद या असंस्कृत बाबी आहेत. त्या आम्हाला मान्य नाहीत. आम्ही संविधान मानतो. त्यातली न्याय, समता, लोकशाही, मानव अधिकार आदी मूल्यं मानतो. त्यामुळे काही संस्थांसोबत आम्ही काम करू शकत नाही. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही करतो, पण काहींशी तो होतो, काहींशी होत नाही.

    ‘आरोग्यभान’च्या पुढच्या प्रवासाचं नियोजन कसं आहे?

    संस्थेची नोंदणी झाल्यामुळे निधी मिळण्याच्या शक्यता खुल्या झाल्या आहेत. त्यातून आणखी काही गोष्टी करता येतीलच. सध्या पहिली गोष्ट म्हणजे, आत्तापर्यंत केलेल्या कामाचं दस्तावेजीकरण आम्ही करणार आहोत. सध्याची कोअर टीम ११ जणांची आहे. सगळे उत्तम काम करणारे आहेत. कोअर टीममधून बाजूला होऊन मी नवीन, तरुण लोकांवर सगळं सोपवण्याचा विचार आहे. काम सुरू राहणार हे मात्र नक्की आणि ते वाढणार, विकसित होणार हेही नक्की.

    -oOo-



    सायली परांजपे
    सायली परांजपे

    लेखिका, अनुवादिका असलेल्या सायली परांजपे यांची ‘राया’ (अनुवादित), ‘शहीद भगतसिंग’, ‘क्रांतिज्योती सावित्राबाई फुले’, ‘सम्राट अशोक’ ही लघुचरित्रपर पुस्तके प्रकाशित आहेत. त्या ‘समतावादी मुक्त संवाद पत्रिके’च्या सल्लागार संपादक मंडळाच्या सदस्या आहेत.
    ईमेल: sayalee. paranjape@gmail.com



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा