-
संवादयात्रा
‘आरोग्यभान’कर्ते मोहन देसभान हरपून जाऊन व्यक्ती आणि समाजाने एका ध्येयाचा पाठलाग करणे आणि भान हरवून गेलेल्या समाजाचे भरकटणे या दोहोंतला फरक स्पष्ट करणारा हा काळ आहे. यातही भान हरवलेल्या समाजाचे दर्शन सध्या वारंवार घडते आहे. अशा या समाजात आरोग्याचे भान जागवणे हेदेखील एक मोठे आव्हान आहे. ते आव्हान पेलत भिन्न वयोगटातल्या नागरिकांना सभ्य, सुसंस्कृत नि विज्ञानवादी वळणावर नेण्याचे काम आरोग्य जागृती चळवळीच्या माध्यामतून मोहन देस करत आहेत. कलेच्या आधाराने होत असलेल्या त्यांच्या या कार्याची उकल करणारी मुलाखत...अनेक वर्षांपूर्वी वैद्यकीय व्यवसाय थांबवून आरोग्याचं काम सुरू केल्याचं तुम्ही अनेकवार सूचित करत असता. त्यावरून वैद्यकीय व्यवसाय आणि आरोग्याचं काम या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत की काय असं वाटतं...
वैद्यकीय व्यवसाय आणि आरोग्याचं काम या दोन्ही गोष्टींचा एकमेकींशी थेट संबंध नाही. माझी ओळख करून देतानाही ‘मी डॉक्टर आहे, तरीदेखील आरोग्याचं काम करतो’ असं सांगतो. डॉक्टर हा रुग्णांसाठी असतो आणि रुग्ण डॉक्टरकडे येतो, कारण त्याच्या आरोग्यात बिघाड झालेला असतो. आरोग्य म्हणजे काय, तर शरीराच्या सगळ्या यंत्रणा जागच्या जागी असणं, (त्या स्वस्थ असणं... म्हणून आरोग्याला आपण स्वास्थ्य असं म्हणतो...) त्यांचं काम योग्यरीत्या सुरू असणं. ते बिघडलं तर डॉक्टर लागतो. डॉक्टर रोगांवर काम करतात, आरोग्याचं काम करत नाहीत.
वैद्यकीय व्यवसायात असताना मला वाटायचं, ही एवढी रोगराई खरंच आहे का? रोगराई, अस्वच्छता, मानसिक अस्वस्थता हे सगळे घटक वैद्यक सत्तेसाठी आवश्यक आहेत. अनारोग्य ही काही लोकांची आर्थिक गरज आहे. काही मूलभूत गोष्टींवर काम झालं, तर देशातली सत्तर टक्के रोगराई नाहीशी होईल, पण ती तशीच राहणं अनेकांच्या फायद्याचं आहे. त्यामुळेच मूलभूत आरोग्यावर फारसं काम केलं जात नाही.
मी मुंबईत १७ वर्षं वैद्यकीय व्यवसाय करत होतो. त्यावेळीही मी काही संस्थांशी जोडलेला होतो. कामगारांसाठी, झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने चालवत होतो. पैसा कमावणं हा मुख्य उद्देश तेव्हाही नव्हताच. मात्र, माझ्या पत्नीची आणि नंतर मुलीची साथ असल्याने मी ते करू शकत होतो.
रोगराईवर उपचारांचं काम करायला खूप डॉक्टर्स आहेत, पण रोगराई टाळण्यासाठी आणि आरोग्य टिकवावं, वाढावं यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स खूप कमी आहेत. तसं काही करता आलं तर बघावं, असा विचार प्रकर्षाने मनात येत होता.
मुळात, समाजासाठी काही करण्याच्या विचाराची पायाभरणी कुठे आणि कशी झाली?
सुरुवात झाली, पण ती समाजासाठी नव्हे, समाजासोबत! सुधारणावादी विचारांचा वारसा मला घरातूनच मिळाला होता. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ‘लोकविज्ञान’ या संघटनेचं काम मी डॉक्टर होण्याच्या आधीपासून करत होतो. १९८०च्या दशकात आम्ही महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये विज्ञानाचा प्रसार करत होतो. ‘फाउंडेशनल रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’मध्ये मी डॉ. अंटियांसोबत दहा वर्षं काम केलं होतं. आरोग्यसंवादाचा शोध तिथेच लागला. नुसतं संशोधन पुरेसं नाही, तर उपक्रमांमध्ये उतरणं गरजेचं आहे, हे तिथेच उमगलं. मग वैद्यकीय प्रॅक्टिस सोडली आणि ‘आरोग्यभान’ला सुरुवात झाली.
‘आरोग्यभान’ हे नाव नेमकं कसं आलं?
आरोग्य हा शब्द तर आपल्याला माहीत आहेच. ‘व्हेअर देअर इज नो डॉक्टर’ या पुस्तकाचे एक लेखक डेव्हिड वेर्नर यांनी म्हटलं आहे- एव्हरिथिंग अंडर द सन, इन्क्लुडिंग द सन, इज हेल्थ. म्हणजेच सूर्याच्या प्रकाशपरिघात येणारी प्रत्येक गोष्ट, त्यात अगदी सूर्यसुद्धा येतो, आरोग्याच्या व्याख्यात मोडते. ‘भान’ ही संकल्पना व्यापक आहे, भान म्हणजे केवळ जागरूकता, माहिती नाही, तर अनेक गोष्टींची एकाच वेळी जाणीव असणं. हे भान आरोग्याबाबत असलं पाहिजे. चांगला डॉक्टर कोण, प्यायचं पाणी कसं असलं पाहिजे, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता, लैंगिकता, मैत्री सहकार्य, नातेसंबंध, लैंगिकता, लिंगभाव या सगळ्याचं भान हवं. आरोग्याबाबत भान निर्माण करण्याचा उद्देश असल्याने उपक्रमाला ‘आरोग्यभान’ नाव दिलं. १९९६ साली मी आणि आणखी काही समविचारी लोकांनी ‘आरोग्यभान’ची रचना करायला सुरुवात केली. हळूहळू माणसं जमत गेली. सुरुवातीला आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातच काम करत होतो. नंतर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काम सुरू झालं. मग राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांमधल्या काही ठिकाणी ते पसरलं.
बरीच वर्षं आम्ही संस्था म्हणून नोंदणी वगैरे केलेली नव्हती. समविचारी लोक एकत्र यायचो, काम करायचो, त्यातून मिळणारं मानधन आपसात वाटून घ्यायचो. साहित्याची निर्मितीही सगळे मिळून करायचो. आमच्यात काही चित्रकार होते, काही नाटकात रस असलेले होते, काही गाणारे होते, लिहिणारे होते, आजही आहेत. गावागावांतले स्त्री-पुरुष, शाळा-कॉलेजातले विद्यार्थी यांनी ‘आरोग्यभान’ला खूप साथ दिली. त्यांनी गाणी लिहिली, चाली लावल्या. लोकगीतांच्या चालींवर बसणारे शब्द आम्ही लिहिले. मराठी, हिंदी भाषांतल्या गाण्यांची मग तेलुगुमध्ये, ब्रजभाषेत भाषांतरं झाली. राजस्थानमध्ये बसवाडात बागडी नावाची बोली आहे, त्यातही गाणी भाषांतरित झाली.
चार वर्षांपूर्वी आम्ही संस्थेची नोंदणी केली. त्यामुळे सीएसआर निधी मिळण्याची शक्यता आहे. आम्ही पाच जण पूर्णवेळ काम करतो. बाकीचे १०-११ नोकरी करून वेळ देतात. संस्थेकडे ऑफिसची इमारत, वाहनं वगैरे मालमत्ता निर्माण झाली म्हणजे तिचं संस्थान होतं, सत्तास्थान निर्माण होतं, उतरंडी तयार होतात; त्यात कामाचं नुकसान होतं. पैशाची गरज असते, पण आर्थिक बाबींवर सत्ता उभी राहिली तर मूलभूत तत्त्वालाच बाधा येते. त्यामुळे संस्थेचं ऑफिस नाही, कोणतीही प्रॉपर्टी नाही. संस्थेचा कारभार पारदर्शक आहे. किती पैसे आले, कोणाला किती मिळाले हे प्रत्येकाला माहीत असतं. आमचं काम हा लोकसंस्कृतीचा भाग आहे. घराघरांमध्येच आम्ही पोस्टर्स, वह्या ठेवतो. बैठकाही कधी कोणाच्या घरी होतात, तर कधी चहाच्या टपरीवर. संवादाचं साहित्य विषयवार पेटाऱ्यांमध्ये ठेवलेलं असतं. लोक ते घेऊन जातात आणि परत आणून ठेवतात. कार्यशाळा कधी शाळांमध्ये होतात, कधी कोणाच्या गच्चीवर होतात, कधी आदिवासी भागात, कधी वडाच्या झाडाच्या सावलीत तर कधी शहरी कामगार वस्त्यांमध्ये होतात.
संस्था लहान असल्याने हे जमतं असंही अनेकांचं म्हणणं आहे. ते बरोबरही असेल. मात्र, संस्थेचं स्वरूप विकेंद्रित आहे. बेळगाव-सोलापूरची वेगळी ‘आरोग्यभान’ आहे, कोकणातली वेगळी असू शकते. राजस्थानातल्या उपक्रमात आम्ही लक्ष घालत नाही. सत्तास्थानं निर्माण न होऊ देण्याचा प्रयत्न करतो. त्यातून काही वेळा संस्थेचं नाव वापरून (किंवा वापरण्याचं टाळून) गैरवापराचे प्रकारही झाले आहेत, पण तरीही विकेंद्रीकरणाचा आमचा आग्रह कायम आहे.
‘आरोग्यभान’च्या कामाचं स्वरूप नेमकं कसं आहे?
सुरुवातीला आरोग्याचं शिक्षण हेच डोक्यात होतं. ते खरं तर प्रत्येक स्तरावर अगदी घरोघरीही सुरूच असतं. लहान मुलांना आपण दात घासायला सांगतो, त्यांच्या आहाराचा विचार करतो, वाईट सवयींपासून दूर राहायला सांगतो. डॉक्टर, शिक्षक वगैरे तेच करतात. मात्र, त्यातली एक अडचण लक्षात आली. ज्याच्याकडे माहिती आहे, त्याने ती इतरांना द्यायची ही आपल्या शिक्षणाची परंपरा आहे. यातही सत्तेचं समीकरण येतंच. जशी डॉक्टरांची सत्ता असते, तशी शिक्षकांचीही असते. त्यामुळे आरोग्यशिक्षण सूचनांच्या पातळीवरच राहतं. हे खा, ते खाऊ नका, व्यसनं करू नका, मानसिक आरोग्य सांभाळा अशा सगळ्या सूचना/आज्ञा एकतर्फी पद्धतीने येतात. वैज्ञानिक माहिती देऊनही सूचनाचं कृतीमध्ये रूपांतर होत नाही. यामागचं कारण म्हणजे, शिकवणाऱ्याचा समोरच्या माणसाशी संवाद नसतो. ज्यांना सूचना केल्या जातात ती माणसं कशी जगतात याबद्दल सूचना करणाऱ्याला अजिबातच माहिती नसते. पोषणाच्या शासकीय कार्यशाळेत पोषक पदार्थ म्हणून थालीपीठ करून दाखवलं जातं. मात्र हा पदार्थ करण्यासाठी आवश्यक जिन्नस, वेळ त्यांच्याकडे आहे का, हे बघण्याचे कष्ट घेतले जात नाहीत.
आणखी एक उदाहरण देतो. सरकारने बांधून दिलेली शौचालयं वापरण्याची सूचना आरोग्य कर्मचारी करतात, पण पाणी आहे का, सेप्टिक टैंक आहेत का हे बघितलं जात नाही. अशा परिस्थितीत आरोग्यशिक्षण वाया जातं. कारण संवादाचा अभाव असतो. आरोग्याच्या समस्यांना कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय अशी अनेक अंग असतात. भारत उष्ण कटीबंधीय आणि हिरवा देश आहे, मुबलक लोह असलेल्या हिरव्या भाज्या उपलब्ध आहेत, तरीही अॅनिमियाचं प्रमाण प्रचंड आहे. भारतात आयर्नच्या (लोहाच्या) गोळ्या द्याव्या लागणं ही ‘आयरनी’च आहे. या सगळ्याचा अर्थ गरज शिक्षणाची नसून संवादाची आहे.
शरीरात उत्साह, उमेद आणि जीवंतपणा आणण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची मदत होऊ शकते, हे व्यक्त करताना मुले आपापल्या आकलन आणि अनुभवांना अनुसरून अभिव्यक्त होत राहतात...‘आरोग्यभान’च्या कार्यशाळेत पहिला उपक्रम असतो तो ‘आरोग्य’ म्हटल्यावर जे काही मनात येतं, त्याचं चित्र काढण्याचा. दवाखाना, टॉनिक, इंजेक्शनपासून ते जेवणाचं ताट आणि हसऱ्या चेहऱ्यापर्यंत ३०-३५ चित्रं काढली जातात. आरोग्य म्हणजे डॉक्टर, दवाखाना ही कल्पना काढून टाकण्यासाठी आम्ही हा उपक्रम घेतो. आरोग्याचा प्रवास डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी असतो, हे कथांद्वारे सांगून आम्ही त्यावर चर्चा करतो. त्यातून लोकांना वेगळी जाण येते, शंका दूर होतात. या कार्यशाळांच्या ठिकाणी उपलब्ध घटक वापरून पोषक खाद्यपदार्थ तयार करून दाखवले जातात. काही रानभाज्यांमध्ये लोहाचं प्रमाण मेथी-पालकाच्या तुलनेत आठ पटींनी जास्त असतं, पण तिथल्या लोकांना त्याची माहितीच नसते. अशाप्रकारे संवादामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर समुदायाला आरोग्याबाबत एक पाऊल पुढे टाकता येतं.
आरोग्यसंवादाची समृद्ध संस्कृती नव्याने निर्माण करणं हेच ‘आरोग्यभान’चं काम आहे. संवादाची संस्कृती तर आपल्याकडे आहेच. अनेकदा या संवादात असाहायता असते, नशिबाला बोल लावण्याची वृत्ती असते. एकत्रीकरणाच्या माध्यमातून ही असाहायता कमी करण्यासाठी ‘आरोग्यभान’ काम करते. रुग्णांना हक्क आहेतच. सामान्य माणसालाही आरोग्याचा हक्क आहेच. हा हक्क मान्य केला, तर लोक मागण्या करायला लागतील या भीतीने त्यांना त्या हक्कांपासून अनभिज्ञ ठेवलं जातं. आमच्या आरोग्यसंवादात अधिकार, सक्षमता हे परवलीचे शब्द आहेत, म्हणूनच लोकांना ते आपलेसे वाटतात.
मध्य प्रदेशातल्या एका कार्यशाळेत लोकांना ते जे खातात, ते नमुन्यादाखल आणायला सांगितलं. त्यांचा सूर ‘यहाँ खास कुछ नही मिलता’ असा होता. प्रत्यक्षात त्यांनी तब्बल ६८ प्रकार आणले आणि त्यातले तीन-चार प्रकारच आपल्या माहितीचे होते. आपल्याकडे किती वैविध्य आहे, हेही त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागलं.
आरोग्याचं काम वैज्ञानिक स्वरूपाचं असतं, पण त्यासाठी कलेचं माध्यम तुम्ही आवर्जून वापरता...
निश्चितच. आम्ही गाणी, नाटकं, गोष्टी या सगळ्या माध्यमांचा वापर करतो. कार्यशाळांसाठी काही कथा तयार केल्या आहेत. अर्थात त्यात वेळेवर बदल केले जातात. अनेक संस्थांमध्ये निश्चित मोड्युल्स असतात, आम्ही मोड्युल्सनुसार काम करत नाही. रचना नक्कीच आहे. एक सांगाडा आहे, त्याच्या मधल्या जागा भरणं हे संवादकाच्या हातात असतं. आम्ही शिक्षक म्हणत नाही, संवादक म्हणतो. गुरू, सुधारक, डॉक्टर नको, तर आरोग्य संवादक व्हायला हवं. संवाद संस्कृतीजन्य असतो. अलीकडे तो कमी होत चालला आहे, त्यात कृत्रिमता आली आहे. घरात खाण्याबद्दल बोलतानाही आपण खूपच वैद्यक स्वरूपाचं बोलायला लागलो आहे. कार्ब्स, व्हिटॅमिन्स वगैरे. ही कृत्रिमता टाळली पाहिजे.
संस्कृती प्रमाण नसते. ती लोकांची असते. त्यामुळे आरोग्याची गाणी लोकांची असली पाहिजेत, चित्रं लोकांची असली पाहिजेत, नाटकंही लोकाधिष्ठित असली पाहिजेत. आपलाच आरोग्याचा प्रश्न नाटकाच्या माध्यमातून समोर उभा राहिला, तर लोक त्याकडे त्रयस्थपणे बघू शकतात. त्यावर चर्चा होते. त्याला आम्ही आरोग्याचा संवाद म्हणतो. अखेरीस माणसं म्हणतात, ‘आरोग्यभान’च्या संवादातून काही उत्तरं मिळाली पण काही प्रश्नही पडले, पण या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची जबाबदारी आमची आहे.
चित्रांचा वापरही प्रभावीरीत्या करता येतो. मात्र, अनेकदा शिक्षणासाठी दाखवली जाणारी चित्रं लोकांच्या परिचयाचीच नसतात. आम्ही लोकांनाच चित्र काढायला सांगतो, कथा तयार करायला सांगतो. गुजरातमधल्या भडोचजवळच्या नेत्रांग गावातल्या कार्यशाळेत आम्ही सांडपाणी या विषयावर कथा तयार करायला सांगितली. त्या गावात खूप मोर होते. या कथेतल्या मोराचा पिसारा सांडपाण्यामध्ये लडबडून झडून गेला होता, त्यामुळे लांडोरी त्याला विचारत नव्हत्या. मग एक कावळा येऊन (हा कावळा त्या बाईच्या माहेरच्या गावाचा होता म्हणे!) दुसऱ्या एका गावातल्या शोषखड्ड्यांबद्दल माहिती देतो, अशी गोष्ट त्या स्त्रियांनी तयार केली. हा कलेतून झालेला आरोग्यसंवादच आहे. बुंदेलखंडातल्या चित्रकूट भागातल्या एका कार्यशाळेत लोकांनी रामायणातल्या व्यक्तिरेखा घेऊन आरोग्याबद्दलचं गाणं तयार केलं होतं. तात्पर्य काय, परीकथा, चित्रकथा, पुराणकथा यांची पारंपरिक संवादी संस्कृती आरोग्यामध्ये येऊ शकते.
आम्ही ज्यांच्यामार्फत कार्यशाळा घेतल्या त्या बहुतेक संस्था पुरोगामी विचारांच्या होत्या, लोकांचे अधिकार जाणणाऱ्या होत्या. त्यामुळेच त्यांच्यासोबत आम्ही काम करू शकलो.
‘आरोग्यभान’तर्फे ‘रिलेशानी’ शिबिरं घेतली जातात...
हा शब्द आम्हीच तयार केलेला आहे. रिलेशानी म्हणजे शानदार रिलेशनशिप अर्थात आरोग्यपूर्ण नातेसंबंध. हा विषय शाळांमधून शिकवला जात नाही. ९३ टक्के मुलींना तर ५३ टक्के मुलांना नात्याचे भीषण, त्रासदायक अनुभव कधी ना कधी आलेले असतात, असं आकडेवारी सांगते. शाळांमध्ये दिलं जाणारं लैंगिक शिक्षणही जुजबी स्वरूपाचं असतं. प्रगल्भ, सुंदर नातेसंबंधांची गोष्ट आपल्याकडे काहीशी गोपनीय करून टाकतात. शाळेत सहशिक्षण असतं, कधीकधी त्यातून विसंवाद होतात. प्रेमाचा अर्थ काय, आपलं शरीर कसं घडलं आहे असे अनेक प्रश्न मुलांना पडतात. मासिक पाळीबद्दल मुलींच्या मनात गोंधळ असतात. त्या वयात शरीरात होणाऱ्या विकासाबद्दल त्यांना नीट कळत नाही. या विकासाबद्दल सन्मानाची भावना मुलामुलींच्या मनात निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. स्पर्शाची भाषा अनेकांना कळत नाही. मुलींशी निदान मासिक पाळीबद्दल तरी बोललं जातं. मुलांना तर कोणीच काही सांगत नाही. त्यात आज मोबाइल फोनसारखं साधन मुलांच्या हातात आहे. त्यातून खूप प्रश्न निर्माण होतात. अशा असंख्य गोष्टींबद्दल ‘रिलेशानी’मध्ये चर्चा होते. त्यातही गाणी, नाटकं असतात.
वैद्यकीय व्यवसाय आणि आरोग्य जागृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. अशा प्रसंगी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या सगळ्या वयोगटांमध्ये आरोग्यविषयक जाणिवा जागृत असण्यातच निरोगी मन आणि शरीराचे इंगित दडलेले आहे...आमच्याकडे पोर्नोग्राफीबद्दलचं अत्यंत संयत असं नाटक आहे, लैंगिक छळाबद्दलचं नाटक आहे. मुलांच्या भावी आयुष्यातल्या नात्यांना एक निकोप पाया देणं हाच ‘रिलेशानी’चा उद्देश आहे.
आमच्याकडे वेगवेगळ्या बोली-भाषांतली दीडशे गाणी आहेत. लहान मुलांसाठी शरीरशास्त्रावरचं गाणं बडबडगीतासारखं आहे. ग्रामीण भागांतल्या मुलांसाठी वेगळी गाणी आहेत, शहरांतल्या मुलांसाठी वेगळी गाणी आहेत. आदिवासी भागांत आदिवासी-नागरी नातेसंबंधांच्या गोष्टी आहेत.
रिलेशानी शिबिर आम्ही वेगवेगळ्या वयोगटांसाठी घेतो. १० ते १५ वयोगटासाठी रिलेशानी-१, कॉलेजच्या वयाच्या मुलांसाठी रिलेशानी-२, पंचविशीच्या तरुणांसाठी रिलेशानी-३, आयुष्यात स्थिरावलेल्या मध्यमवयीन लोकांसाठी रिलेशानी-४, ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी रिलेशानी-५ आणि रिलेशानी-६ अशी रचना आहे. रिलेशानी-७ दिव्यांग, भिन्नमती किंवा देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया अशा लोकांसाठी आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरांमध्ये व्याधींवर बोललं जातं. त्यातून येणारं नैराश्य, त्याचे नातेसंबंधांवर होणारे परिणाम यांवर चर्चा करतो. वृद्धांच्या लैंगिकतेचेही प्रश्न असतात, लिव्ह-इन, विवाहबाह्य संबंध यांचेही प्रश्न असतात. आमचे फिजिओथेरपीस्टही वृद्धांना व्यायाम शिकवतात. योगातला अध्यात्मिक भाग बाजूला ठेवून आम्ही त्याचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांसाठी करतो.
ज्येष्ठ नागरिकांचाही प्रतिसाद चांगला आहे. त्यांना खूप बोलायचं असतं, पण संधी मिळत नाही. या शिबिरांमध्ये ते खूप बोलतात.
मुलामुलींना एकत्र बसवून त्यांना शरीराबद्दलची, नातेसंबंधांची माहिती देताना विरोधाचेही प्रसंग आले. राजस्थानात एका गावातल्या लोकांनी कार्यशाळेत येऊन गोंधळ घातला होता. मात्र, हे प्रकार आम्ही व्यवस्थित हाताळले.
डॉक्टर असूनदेखील आरोग्याचं काम करतो अशी ओळख तुम्ही करून देता, पण डॉक्टर असण्याचा या कामात उपयोग होतच असणार...
हे काम करण्यासाठी खरं तर डॉक्टर असण्याची गरजच नाही. संवाद महत्त्वाचा आहे. आमचा १७ दिवसांचा कार्यक्रम पूर्ण करून नववी-दहावी शिकलेली स्त्रीसुद्धा ‘बेअरफूट डॉक्टर’ म्हणून काम करू शकते. आम्ही हा कार्यक्रम मेळघाटमध्ये राबवला आहे.
प्रॅक्टिसिंग डॉक्टर असल्याने सामान्य माणसाशी संपर्क आला, त्यांच्या समस्या मला कळल्या, आरोग्यसंवादाचं बीज तिथून पेरलं गेलं. मात्र डॉक्टर असण्याचा एक अडसर म्हणजे लोक काही वेळा प्रश्न न विचारता, माझं म्हणणं मान्य करतात.
अर्थात, आव्हानं अनेक आहेत. फक्त डॉक्टर असण्याचा नव्हे तर पुरुष असण्याचाही अडसर जाणवतो. उत्तर प्रदेशातल्या एका शिबिरात परपुरुषाला तोंड दाखवायचं नाही म्हणून स्त्रिया पाठ करून बसल्या होत्या. पुरुष कितीही पुरोगामी असला, तरी त्याच्याकडून नकळत वर्चस्व गाजवलं जाऊ शकतं. इंग्रजीत त्याला ‘मॅन्सप्लेनिंग’ असा चपखल शब्द आहे. ते ‘मॅन्सप्लेनिंग’ माझ्याकडूनही अनेकदा झालं, पण संवादी व्हायचं असेल तर हे सोडलं पाहिजे, हे लक्षात आल्यावर मी जाणीवपूर्वक ते कमी करत गेलो. शहरी असण्याचाही अडसर काही वेळा होतो. ग्रामीण भागातले लोक प्रमाणभाषेने दीपून जातात. त्यावेळी लोकांना तुमच्या भाषेत गाणं म्हणा, नाटक करा म्हणून उत्तेजन द्यावं लागतं. मग ते मोकळे होतात.
आव्हानांबद्दल बोलायचं तर गेल्या काही वर्षांतल्या राजकीय परिस्थितीचा परिणामही कामावर होतो. हिंदू संस्कृती, धर्म याबद्दल तुम्ही प्रतिकूल बोलता अशी टीका अनेक लोक करतात. मात्र, माझ्या मते आम्ही संस्कृतीचंच पालन करतो. आपली संस्कृती बहिणाबाईंचीही आहे, तुकारामांचीही आहे, कबिराचीही आहे, बसवेश्वराचीही आहे आणि विज्ञानसंस्कृतीही आपल्याकडे पूर्वापार आहे. वर्णाश्रम, जातीयवाद, लिंगभेद या असंस्कृत बाबी आहेत. त्या आम्हाला मान्य नाहीत. आम्ही संविधान मानतो. त्यातली न्याय, समता, लोकशाही, मानव अधिकार आदी मूल्यं मानतो. त्यामुळे काही संस्थांसोबत आम्ही काम करू शकत नाही. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही करतो, पण काहींशी तो होतो, काहींशी होत नाही.
‘आरोग्यभान’च्या पुढच्या प्रवासाचं नियोजन कसं आहे?
संस्थेची नोंदणी झाल्यामुळे निधी मिळण्याच्या शक्यता खुल्या झाल्या आहेत. त्यातून आणखी काही गोष्टी करता येतीलच. सध्या पहिली गोष्ट म्हणजे, आत्तापर्यंत केलेल्या कामाचं दस्तावेजीकरण आम्ही करणार आहोत. सध्याची कोअर टीम ११ जणांची आहे. सगळे उत्तम काम करणारे आहेत. कोअर टीममधून बाजूला होऊन मी नवीन, तरुण लोकांवर सगळं सोपवण्याचा विचार आहे. काम सुरू राहणार हे मात्र नक्की आणि ते वाढणार, विकसित होणार हेही नक्की.
-oOo-
सायली परांजपेलेखिका, अनुवादिका असलेल्या सायली परांजपे यांची ‘राया’ (अनुवादित), ‘शहीद भगतसिंग’, ‘क्रांतिज्योती सावित्राबाई फुले’, ‘सम्राट अशोक’ ही लघुचरित्रपर पुस्तके प्रकाशित आहेत. त्या ‘समतावादी मुक्त संवाद पत्रिके’च्या सल्लागार संपादक मंडळाच्या सदस्या आहेत.
ईमेल: sayalee. paranjape@gmail.com
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५
मुलाखत : “आरोग्य संवादाची समृद्ध संस्कृती आकारास येणं हेच उद्दिष्ट”
शनिवार, १९ जुलै, २०२५
“तर्कशक्ती नैसर्गिकरित्या विकसित होण्यासाठी सर्जनाचं स्वातंत्र्य मोलाचं” (मुलाखतकार : सायली परांजपे)
-
संवादयात्रा
कोरची तालुक्यातले सृजन स्वातंत्र्य देणाऱ्या उपक्रमाचे क्षणचित्र आणि उपक्रमांच्या पुरस्कर्त्या प्राजक्ता अतुल.प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून बघणारे आणि पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी प्रश्न न विचारता स्वीकारणारे असे दोन वर्ग समाजात नेहमीच असतात. पहिला वर्ग अल्पसंख्य असतो, तर दुसरा बहुसंख्य. तर्कनिष्ठ विचारांची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना व्हावी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याद्वारे विवेकवादी विचारांचा प्रसार-प्रचार व्हावा या उद्देशाने अनेक वर्षांपासून ‘कुतूहल’, ‘अनबॉक्स’, ‘लर्निंग कम्पॅनियन’ आदी उपक्रमांच्या पुरस्कर्त्या प्राजक्ता अतुल यांच्याशी साधलेला हा संवाद...तर्कसंगत विचार नैसर्गिक समजला जात असला तरी अतार्किक विचारांचं प्राबल्य समाजात दिसतं, याचं कारण काय असावं?
बहुसंख्य लोकांचे विचार सुरुवातीला कुटुंबात आकाराला येतात. आईवडील, नातेवाईक, शेजारी ज्या पद्धतीने विचार-वर्तन करतात, त्याचंच अनुकरण मूल कळत-नकळत करत असतं. बऱ्याच वयापर्यंत तर्क, विज्ञान वगैरे शोधण्याच्या फंदात ते पडत नाहीत, पण मनात प्रश्न उभे राहत असतातच. देव-धर्म, भवतालचा परिसर, आजूबाजूची परिस्थिती, स्वतःच्या शरीरातले बदल या सगळ्यांविषयी अनेक प्रश्न त्याच्या मनात असतात. वेळोवेळी हे प्रश्न विचारलेही जातात. कधी काहींची उत्तरं मिळतात, काहींची मिळत नाहीत. बरेचदा तर मोठ्यांकडून गप्प केलं जातं. प्रश्न पडणं नैसर्गिकच आहे, तो माणसाचा मूळ स्वभाव आहे. मुलांचं अनुभवविश्व हळूहळू विस्तारतं. वाचन वाढतं, तसा त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा त्याचा स्वतःचा प्रवास सुरू होतो. हा खूप नैसर्गिक प्रवास आहे. त्यासाठी तर्कशास्त्राचा विषय म्हणून अभ्यास वगैरे आवश्यक नाही. कारण, तर्क हा आपल्या सहजजीवनाचाच भाग असतो. त्यासाठी पोषक वातावरण मिळणं मात्र आवश्यक आहे. अगदीच काही नाही तर गप्प करण्यासारखं नकारात्मक तरी वातावरण नसावं.
समाजात एक वर्ग अतिशय श्रद्धाळू, तर्कशुद्ध विचारांना फारसा थारा न देणारा असा आढळतो कारण ते सोयीचं पडतं. प्रश्न पडणं आणि उत्तरासाठी प्रयत्न करणं यात लागणारा वेळ नि उर्जा घालवण्यापेक्षा पूर्वापार चालत आलेलं आपल्या भल्यासाठीच आहे असं समजून व्यवहार करणं बहुतेकांना बरं वाटतं. हा सोपा पर्याय निवडणाऱ्यांची संख्या त्यामुळे जास्त असते. कुणी दुसरा आपल्यासाठी विचार करीत आहे, जबाबदारी घेत आहे, ही भावना सोयीची वाटते.
या बहुसंख्य गटाच्या विरोधात बोललं तर नाती तुटतील, आपण समाजापासून वेगळं पडू या असुरक्षिततेपोटी, तर्कसंगत विचार करणारेही अनेकदा अतार्किक विचारांच्या विरोधात बोलत नाहीत.
व्यावसायिक आयुष्यात विज्ञानाचा आधार न सोडणाऱ्या व्यक्ती व्यक्तिगत आयुष्यात मात्र तर्क धाब्यावर बसवणाऱ्या गोष्टी करतात, याबाबत तुमचं मत काय आहे?
यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण उपजीविकेसाठी विज्ञान एक विषय म्हणून आपण शिकतो, वापरतो, आपण ज्ञान घेत नाही. ज्ञान नसलेलं हे शिक्षण आपल्याला विवेकी किंवा तार्किक करत नाही, फक्त उपजीविकेचं साधन देतं.
मुळात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दांविषयीच मी थोडी साशंक आहे. सायन्स या इंग्रजी शब्दाचं मूळ लॅटिन भाषेतल्या Scientiaमध्ये आहे. त्याचा अर्थ आहे Knowledge अर्थात ज्ञान, पण सायन्स या शब्दासाठी मराठी भाषेत विज्ञान हा पर्यायी शब्द वापरल्यामुळे हा फक्त एक विषयमात्र बनला. मुळात, ‘सायंटिफिक टेम्परामेण्ट’ अर्थात ज्ञानलालसा विषयांपुरती मर्यादित नाही, दैनंदिन जगण्याचा तो एक भाव आहे.
ज्ञानाला तर्काची जोड द्यायची तर ती अशी देता येईल- आपलं एखादं गृहीतक वैध आहे की नाही हे तपासण्यासाठी असलेली पहिली कसोटी म्हणजे, ते तर्कसंगत आहे अथवा नाही हे तपासणं. तर्कनिष्ठ विचारांनी (Reasoning) मग आपण त्या गृहीतकाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. ते निष्कर्ष बरोबर आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज भासते. प्रयोगांनी, अनुभवांनी आणि विश्लेषणाने त्या निष्कर्षाची सत्यता आपण पडताळू शकतो.
तार्किक विचाराची सहजप्रेरणा लहान वयातच जपली गेली तर सजग, विवेकी समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यात मदत होऊ शकेल का?
तार्किक विचार ही सहजप्रेरणा असूनही समाजात त्याच्या बरोबर उलट वर्तन करणाऱ्यांचं प्रमाण अधिक दिसतं, याचं मुख्य कारण दडलं आहे ते आपल्या मनातल्या असुरक्षिततेत. ती इतकी झपाट्याने वाढण्याचं कारण उपजीविकाकेंद्री शिक्षणव्यवस्था. पैसे कमावणं, ते साठवणं आणि त्यायोगे उपभोगी जीवन जगणं हाच आजच्या शिक्षणव्यवस्थेचा स्थायीभाव झालेला आहे. शिक्षणाचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी न होता तो उपभोग्य वस्तूंचं सेवन, मालकी किंवा उत्पादनाधिष्ट कौशल्य असा झाला आहे. तर्कनिष्ठ, विवेकी विचार माणुसकी जपतील, त्याच्या अभावाने आपण उत्पादनशील यंत्र होऊन राहू, यात शंका नाही. येणाऱ्या पिढीची तार्किक विचारांची कास सुटण्यापूर्वी त्यांच्यातली तर्कनिष्ठता बळकट झाली, तर आणि तरच आपला समाज सुजाण होईल. याकरता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे आणि हे प्रयत्न लहान वयापासून शिक्षणाच्या माध्यमातूनच करायला हवेत.
वाढत्या वयात कुतूहल, जिज्ञासा यांसारख्या जाणिवांची योग्य निगराणी आणि मशागत व्हायला हवी. अगदी लहान वयातही मूल स्वतःहून जसं भाषा शिकतं, तसंच आहे हे. घरातले संवाद मुलाच्या कानांवर पडत असतात. त्यातून उपयुक्त वाटणारे शब्द, वाक्यरचना, लिंग, क्रियापदं ते मूल वापरात आणतं. मोठे लोक वापरतात त्यातला एखादा वेगळा शब्द त्याने वापरला आणि त्याचं कौतुक झालं तर ते वारंवार या शब्दाचा वापर करतं. कधी चुकीचा वापर झाल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर त्या ठिकाणी ते त्या शब्दाचा वापर थांबवतं. त्याला त्या विशिष्ट शब्दाचा अर्थ कळलाच असतो, असं नाही पण प्रतिसादावरून ते काही ठोकताळे बांधतं.
हे जसं भाषेबाबत होतं, तसं इतर अनेक गोष्टींबाबत, घटनांबाबतही होत असतं. मूल विशिष्ट गोष्ट किंवा घटना यांबाबत स्वतःच्या समजुतीनुसार व्यक्त होत असतं. सभोवतालच्या घटकांचा परस्परसंबंध समजून घेत त्या घटकांचं अस्तित्व मान्य किंवा अमान्य करण्याची त्याची प्रक्रिया म्हणजे त्याचा स्वतःचा तर्क. कुठल्याही घटनेकडे बघताना किंवा कुणी सांगितलेलं काही मान्य करताना त्याला बळ देणारे पुरावे शोधण्याची सवय त्याला इथूनच लागते. या प्रक्रियेत माहितीचं रूपांतर ज्ञानात होतं आणि सत्य नेमकं काय आहे, हा विचार पुढे येतो.
चांगलं-वाईट किंवा मान्य-अमान्य या संकल्पना तर्कामुळे धारदार होत जातात. हा प्रवास याच पद्धतीने होणं अपेक्षित आहे. तर्क किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन ही लादण्याची गोष्टच नाही.
मुलांमधल्या सहजप्रेरणा जोपासण्यासाठी उपक्रम राबवावे ही कल्पना नेमकी कुठून सुचली?
सजग नागरिक या नात्याने सध्याच्या शिक्षणपद्धतीतल्या अनेक त्रुटी आम्हाला दिसत होत्याच. सांप्रत शिक्षणपद्धती केवळ शिक्षकांच्या आणि व्यवस्थेच्या सोयीची आहे हे जाणवत होतं. मुलांमधल्या सहजप्रेरणा, अंगभूत गुण जपले गेले पाहिजेत असं वाटत होतं; पण शालेय शिक्षणात ते होताना दिसत नव्हतं, अजूनही दिसत नाही.
मुलांना काही तरी शिकवणे ही शिक्षणक्रमात आखण्यात आलेली दिशाच चुकीची ठरते. न पेक्षा मुलांमध्ये दडलेले सुप्त कलागुण उमलण्यासाठी, तर्कबुद्धी आणि विचारांना चालना देणारे अवकाश आणि स्वातंत्र्य मिळवून देणे, कैकपटीने महत्त्वाचे...लहान मुलांमध्ये अनेक सहजप्रेरणा असतातच. त्यांची कल्पनाशक्ती अफाट असते, त्यांच्यात सहकंप/सहानुभूती असते. जिज्ञासा-कुतूहल तर असतंच. त्यांचं निरीक्षण उत्तम असतं. सर्जनशीलता भरपूर असते. या सहजप्रेरणा सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत दडपल्या जात आहेत, स्वतंत्र विचाराला कुठे जागाच नाही, याची खंत होती. हे सगळं कुठेतरी चुकतंय असंही सतत वाटत होतं. यातूनच ‘अनबॉक्स’च्या संकल्पनेशी आम्ही जोडले गेलो.
त्याविषयी बोलण्याआधी थोडी आमची पार्श्वभूमी सांगते. कॉलेजमध्ये असताना गणित, विज्ञान शिकण्यासाठी आणि सोबतच त्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी आम्ही काही मित्रमंडळी काम करायचो. याचंच पुढे ‘कुतूहल’ नामक संस्थेत रूपांतर झालं. यात वैज्ञानिक खेळणी, आकाशदर्शन आणि कमी खर्चाचे टेलिस्कोप, मायक्रोस्कोप बनवणं अशा सगळ्या अॅक्टिव्हिटीज् होत्या. हे करत असताना लक्षात आलं की, ज्या मुलांना या विषयांची कोडी सुटलेली आहेत, त्यांना शालेय अभ्यासक्रमात ते विषय समजण्यात मदत झाली होती पण ज्या मुलांमध्ये त्याविषयी भीती होती, त्यांना मात्र याचा फार लाभ झाला नव्हता. तसंच दोन्हींमध्ये तर्क किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यात फारशी मदत होत नव्हती, असंही लक्षात येत होतं.
पुढे मी आणि माझा जोडीदार अतुल अशा दोघांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात काम सुरू केलं. ते सुरू असतानाच वेगळं काही करण्याची ऊर्मी होतीच. व्यवसायात फार न अडकता अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत आम्ही स्वतःला जोडून घेतलं. हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक तरुण आमच्याशी जोडले गेले. हर्षवर्धन आणि समीरही असेच आमच्या संपर्कात आले. हर्षवर्धन हा ‘कुतूहल’शी जोडला गेलेला विद्यार्थी आणि समीर हा मुलांसोबत कामाचा अनुभव असलेला कलाकार, ‘अनबॉक्स’ ही संकल्पना मुळात या दोघांची. तर्कसंगत विचारसरणी विकसित होण्यासाठी गणित किंवा विज्ञानाच्या खेळण्यांपेक्षा कलेचा वापर आम्हाला अधिक प्रभावी वाटला.
प्रत्येक मुलात अव्यक्त पण संभाव्य असे काही गुण असतातच. त्याला पोषक वातावरण, संधी पुरवण्याबाबत आपण दक्ष राहिलो, तर असंख्य शक्यतांची दारं हळूहळू उघडत जातात, त्यातून शिकण्याच्या संधीही उलगडत जातात. तर्कसंगत विचारसरणी रुजवणं असा काही हेतू ठरवून ‘अनबॉक्स’चं काम सुरू झालं नव्हतं. कुतूहलातून तर्कसंगत विचार हा जो मुलांचा नैसर्गिक प्रवास असतो, तो थांबू नये एवढाच उद्देश त्यामागे होता. काही संशोधनांचा आधार घेऊन आम्ही मुलांमधल्या सहजप्रेरणा शोधून काढल्या. या प्रेरणांना जपणारं किंवा त्यांची मशागत करणारं काहीतरी हवं या विचारापासून सुरुवात झाली, तेव्हा ३ ते १५ वर्षं हा वयोगट समोर होता.
या वयोगटातल्या मुलांनी त्यांच्या जाणिवा, विचार आणि कल्पना प्रत्यक्ष कृतीतून, हातांनी करून, अनुभवातून जिवंत कराव्या यासाठी ‘अनबॉक्स’च्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी ‘कलाकसरत’ म्हणजे काही क्रिया आखल्या. या क्रियांमधून काही विशिष्ट निष्पत्ती काढण्याचं उद्दिष्ट नसावं हा विचार गाभ्याशी होता. कारण प्रत्येक मुलाचा कल वेगळा असतो, दृष्टिकोन वेगळा असतो, कृती करण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे निष्पत्तीही वेगळीच असणार. शिवाय या कलाकसरतीतून मुलं जे काही तयार करतील, काढतील, शिकतील त्याची तुलना इतरांशी होण्याची शक्यताही टाळायची हेही निश्चित होतं.
हे प्रयोग करताना लक्षात आलं की, दोन कलाकसरतींमध्ये काही दिवसांचं अंतर ठेवलं पाहिजे. लागोपाठ या कलाकसरती घेतल्या तर पहिलीचा परिणाम दुसऱ्या कलाकसरतीवर होतो. नवे अनुभव, नवे धडे यांना वाव मिळत नाही. हेच जर दोन कलाकसरतींमध्ये साधारण ७-८ दिवसांचं अंतर ठेवलं तर पहिल्या कलाकसरतीतून मूल जे शिकतं त्याचा त्याला दुसरी कलाकसरत करत असता उपयोग होतो.
या कलाकसरतीत फार साध्या वस्तू असतात. कागद, पारदर्शक कागद, दोरे, माती, गहू, कागदी कप-ग्लास इत्यादी. या सगळ्याचं नेमकं काय करायचं, याचं कोणतंही निश्चित उत्तर नसतं. विशेष गोष्ट म्हणजे, मुलं फक्त त्या गोष्टी ‘करत’ नाहीत, तर त्या तपासत असतात. ते कागद हलवतात, रेषा कुठे संपते, कुठे ओव्हरलॅप होते हे बघतात. ते केवळ आकारांशी खेळत नाहीत, तर अर्थ शोधत असतात.
मुलांना पाहू दे, हात लावू दे, चुकू दे, प्रश्न विचारू दे, अशी आमची पद्धत आहे. कारण या सगळ्या अनुभवातूनच विचार सुरू होतो आणि विचार करण्याच्या या शांत सरावातून तर्कशक्तीची पायाभरणी होत जाते.
एका कृतीचं उदाहरण इथे देते. एका पारदर्शक कागदावर काळ्या रंगाच्या रेषा छापलेल्या असतात. एखादी मुलगी तो कागद दुसऱ्या तशाच चित्रावर ठेवते आणि ‘आता याच्यावर जाळं तयार झाल्यासारखं वाटतंय’ असं म्हणते. तिने फक्त वस्तूवर वस्तू ठेवलेली नसते, तर ती त्या मांडणीला एक अर्थ देत असते.
‘अनबॉक्स’ हा सृजनाला आमंत्रण देणारा छोटेखानी पेटाराच. याची संकल्पना हर्षवर्धन आणि समीर यांची. त्यांनी गडचिरोली-छत्तीसगढपासून थेट जम्मू काश्मिरपर्यंतच्या मुलांमधल्या सहजप्रेरणा जोपासण्यासाठी केलेली धडपड कितीतरी आशादायी...आणखी एका कृतीचं उदाहरण देते. ती कृती आहे दिलेल्या आकारावरून दोरा चिकटवण्याची. या कृतीत ‘कुठून सुरुवात करू?’ असा प्रश्नच एखाद्या मुलाकडून येतो. कोणी तो दोरा गुंडाळतो, कोणी सरळ रेषा काढून, त्यावर दोरा चिकटवतं. एक मुलगा म्हणतो, ‘मी इथे थांबलो, कारण पुढे गेलो तर गोंधळ होईल.’ ‘गोंधळ’ म्हणजे त्याच्या दृष्टीने काय? त्याच्या मनात निश्चित काही तरी तर्क आहे. तो फक्त दोऱ्याला विशिष्ट आकारात चिकटवत नाही, तर एक प्रकारची अंतर्गत शिस्त आणि सुसंगती शोधत असतो.
आपली कृती काय परिणाम घडवते आणि आपण ती कृती का निवडली, याचं भान ठेवणं हेच आपल्या तर्कशक्तीचं मूळ आहे.
आजही काही कलाकसरती वगळल्या जातात, काही नव्याने समाविष्ट केल्या जातात. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आमच्यासाठीही ही शिकण्याचीच प्रक्रिया आहे.
आज सुमारे बारा वर्ष आम्ही या प्रक्रियेत आहोत. या काळात वेगवेगळ्या शाळांमधून हा उपक्रम आम्ही घेत राहिलो. कोविड साथीच्या काळात शाळा बंद होत्या. त्या काळात मुलांपर्यंत कसं पोहोचायचं, या विचारातून मग उपक्रमाकडून आम्ही उत्पादनाकडे वळलो.
छत्तीसगढमधल्या नारायणपूर जिल्ह्यातल्या १३५ अंगणवाड्यांतील मुलांसोबत आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यातल्या १० ग्रामसभांसोबत हे काम केलं. नागपूरच्या आसपास दुधाचा व्यवसाय करणारी भारवाड ही भटकी जमात आहे. त्यांच्या मुलांसाठी लर्निंग स्पेसेस (शिकण्यासाठी जागा) तयार करत असताना ‘अनबॉक्स’च्या कलाकसरतींनी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नागपूरजवळच्या मध्य प्रदेशाच्या सीमेजवळच्या पारडसिंगा या गावातल्या दोन शाळांनी तिथल्या मुलांसाठी ‘अनबॉक्स’चा प्रयोग राबवायला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा आवाका असा वाढताना बघून भविष्यात तर्कसंगत विचार करणारा वर्ग वाढेल याची खात्री वाटते.
कोरचीतल्या मुलांचं काम आम्ही स्वतंत्र निरीक्षकांकडून तपासून घेतलं. पहिली ते पाचवी या वर्गातल्या मुलांमधल्या चार अंगभूत गुणांवर ‘अनबॉक्स’च्या कलाकसरतींमुळे झालेल्या प्रभावांचा हा अभ्यास होता. यानुसार मुलांच्या संज्ञानात्मक विकासात (Cognitive Development) ४७.७ टक्के, भावनिक विकासात ५१.१ टक्के, सर्जनशीलतेत ४०.७ टक्के तर नावीन्यपूर्ण विचारसरणीत ४९.५ टक्के वाढ झालेली दिसून आली. यातही सगळ्यांत जास्त प्रभाव दुसरीच्या मुलांवर, म्हणजे ७ वर्षांच्या मुलांवर झालेला दिसला.
जम्मू-काश्मीरमधल्या चार सरकारी शाळांमधल्या ११५ मुलांसोबत दोन महिन्यांसाठी एक नमुना म्हणून ‘अनबॉक्स’चा उपक्रम राबवला. इथेही स्वतंत्र निरीक्षकांनी मुलांचं काम तपासलं. मुलांमध्ये जिज्ञासा, स्वतंत्र विचार करण्याचं प्रमाण आणि स्वतःची कृती पुन्हा तपासण्याची तयारी यामध्ये स्पष्ट वाढ दिसत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
मुलांना रचनात्मक परिसंस्थेमध्ये (इकोसिस्टम) सर्जनाचं स्वातंत्र्य मिळतं तेव्हा तर्कशक्ती नैसर्गिकरित्या विकसित होते हेच यावरून स्पष्ट होतं.
लहान मुलांमधला तार्किक विचार जपण्यासाठी थेट कृतीचा मार्ग तुम्ही अवलंबत आहात. मोठ्या माणसांनाही तो आवश्यक आहेच पण त्याशिवाय विवेकवादी विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काही पुस्तकांचं लेखन, संपादन केलं आहे, ‘आजचा सुधारक’ हे त्रैमासिकही तुम्ही चालवता. त्याबद्दल काय सांगता येईल?
‘आजचा सुधारक’ हे मासिक १९९० साली सुरू झालं. दि. य. देशपांडे मासिकाचे संस्थापक-संपादक होते. विवेकवादी विचारांचा प्रसार करणं आणि तो मराठी भाषेतून करणं ही या मासिकाची वैशिष्ट्यं होती. २०१७मध्ये काही प्रशासकीय कारणांमुळे ते बंद पडलं. या मासिकातील मजकूर अतिशय मौल्यवान होता, आहे. काही वर्षांनंतर मासिकाचे अंक मिळेनासे होतील आणि एक मौल्यवान संचित हरवलं जाईल, असं वाटून मग ‘सुधारक’चे पूर्वीचे सगळे अंक डिजिटाइज करून, अंकाची वेबसाइट तयार करून त्यावर आम्ही ते जपून ठेवले. तेव्हाचे मासिकाचे पूर्वसंपादक दिवाकर मोहनी, नंदा खरे यांच्याशी आमचे आपुलकीचे संबंध होते. हे मासिक पुन्हा सुरू व्हावं आणि तरुणांनी ते पुढे न्यावं अशी त्यांची आणि आमचीदेखील इच्छा होती. २०१९मध्ये आम्ही ‘आजचा सुधारक’ त्रैमासिकाच्या स्वरूपात, पण फक्त ऑनलाइन फॉरमॅटमध्ये आम्ही सुरू केलं. ‘सुधारक’च्या वेबसाइटवर हा सगळा मजकूर विनामूल्य उपलब्ध आहे.
ब्राइट्स सोसायटी या बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकतेचा प्रसार-प्रचार करणाऱ्या संस्थेसाठी ‘तर्किष्ट’ आणि ‘तर्कटपंजिरी’ या दोन पुस्तकांचं संपादन केलं. विविध क्षेत्रात तर्कशुद्ध विचारसरणी कशी उपयुक्त ठरते, या विषयाला धरून केलेली भाषणं तसंच सामान्य माणसाचा नास्तिकतेकडे झालेला प्रवास वाचकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये या पुस्तकांची भूमिका महत्त्वाची ठरते. या सगळ्या माध्यमातूनही बिवेकवादी विचारांच्या प्रसारात योगदान देता आलं.
कोणत्याही विचारसरणीच्या प्रसारासाठी दोन प्रकारे हातभार लावला जाऊ शकतो कृतीतून आणि विचारांतून. ‘अनबॉक्स’सारखा उपक्रम कृतीच्या माध्यमातून योगदान देत आहे, तर ‘आजचा सुधारक’ आणि वर उल्लेख केलेली पुस्तकं विचारांच्या माध्यमातून योगदान देत आहेत, याचं समाधान नक्कीच आहे.
-oOo-
सायली परांजपेलेखिका, अनुवादिका असलेल्या सायली परांजपे यांची ‘राया’ (अनुवादित), ‘शहीद भगतसिंग’, ‘क्रांतिज्योती सावित्राबाई फुले’, ‘सम्राट अशोक’ ही लघुचरित्रपर पुस्तके प्रकाशित आहेत. त्या ‘समतावादी मुक्त संवाद पत्रिके’च्या सल्लागार संपादक मंडळाच्या सदस्या आहेत.
ईमेल: sayalee. paranjape@gmail.com