Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

शनिवार, १९ जुलै, २०२५

“तर्कशक्ती नैसर्गिकरित्या विकसित होण्यासाठी सर्जनाचं स्वातंत्र्य मोलाचं” (मुलाखतकार : सायली परांजपे)

  • संवादयात्रा

    HeadImage
    कोरची तालुक्यातले सृजन स्वातंत्र्य देणाऱ्या उपक्रमाचे क्षणचित्र आणि उपक्रमांच्या पुरस्कर्त्या प्राजक्ता अतुल.


    तर्कसंगत विचार नैसर्गिक समजला जात असला तरी अतार्किक विचारांचं प्राबल्य समाजात दिसतं, याचं कारण काय असावं?

    बहुसंख्य लोकांचे विचार सुरुवातीला कुटुंबात आकाराला येतात. आईवडील, नातेवाईक, शेजारी ज्या पद्धतीने विचार-वर्तन करतात, त्याचंच अनुकरण मूल कळत-नकळत करत असतं. बऱ्याच वयापर्यंत तर्क, विज्ञान वगैरे शोधण्याच्या फंदात ते पडत नाहीत, पण मनात प्रश्न उभे राहत असतातच. देव-धर्म, भवतालचा परिसर, आजूबाजूची परिस्थिती, स्वतःच्या शरीरातले बदल या सगळ्यांविषयी अनेक प्रश्न त्याच्या मनात असतात. वेळोवेळी हे प्रश्न विचारलेही जातात. कधी काहींची उत्तरं मिळतात, काहींची मिळत नाहीत. बरेचदा तर मोठ्यांकडून गप्प केलं जातं. प्रश्न पडणं नैसर्गिकच आहे, तो माणसाचा मूळ स्वभाव आहे. मुलांचं अनुभवविश्व हळूहळू विस्तारतं. वाचन वाढतं, तसा त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा त्याचा स्वतःचा प्रवास सुरू होतो. हा खूप नैसर्गिक प्रवास आहे. त्यासाठी तर्कशास्त्राचा विषय म्हणून अभ्यास वगैरे आवश्यक नाही. कारण, तर्क हा आपल्या सहजजीवनाचाच भाग असतो. त्यासाठी पोषक वातावरण मिळणं मात्र आवश्यक आहे. अगदीच काही नाही तर गप्प करण्यासारखं नकारात्मक तरी वातावरण नसावं.

    समाजात एक वर्ग अतिशय श्रद्धाळू, तर्कशुद्ध विचारांना फारसा थारा न देणारा असा आढळतो कारण ते सोयीचं पडतं. प्रश्न पडणं आणि उत्तरासाठी प्रयत्न करणं यात लागणारा वेळ नि उर्जा घालवण्यापेक्षा पूर्वापार चालत आलेलं आपल्या भल्यासाठीच आहे असं समजून व्यवहार करणं बहुतेकांना बरं वाटतं. हा सोपा पर्याय निवडणाऱ्यांची संख्या त्यामुळे जास्त असते. कुणी दुसरा आपल्यासाठी विचार करीत आहे, जबाबदारी घेत आहे, ही भावना सोयीची वाटते.

    या बहुसंख्य गटाच्या विरोधात बोललं तर नाती तुटतील, आपण समाजापासून वेगळं पडू या असुरक्षिततेपोटी, तर्कसंगत विचार करणारेही अनेकदा अतार्किक विचारांच्या विरोधात बोलत नाहीत.

    व्यावसायिक आयुष्यात विज्ञानाचा आधार न सोडणाऱ्या व्यक्ती व्यक्तिगत आयुष्यात मात्र तर्क धाब्यावर बसवणाऱ्या गोष्टी करतात, याबाबत तुमचं मत काय आहे?

    यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण उपजीविकेसाठी विज्ञान एक विषय म्हणून आपण शिकतो, वापरतो, आपण ज्ञान घेत नाही. ज्ञान नसलेलं हे शिक्षण आपल्याला विवेकी किंवा तार्किक करत नाही, फक्त उपजीविकेचं साधन देतं.

    मुळात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दांविषयीच मी थोडी साशंक आहे. सायन्स या इंग्रजी शब्दाचं मूळ लॅटिन भाषेतल्या Scientiaमध्ये आहे. त्याचा अर्थ आहे Knowledge अर्थात ज्ञान, पण सायन्स या शब्दासाठी मराठी भाषेत विज्ञान हा पर्यायी शब्द वापरल्यामुळे हा फक्त एक विषयमात्र बनला. मुळात, ‘सायंटिफिक टेम्परामेण्ट’ अर्थात ज्ञानलालसा विषयांपुरती मर्यादित नाही, दैनंदिन जगण्याचा तो एक भाव आहे.

    ज्ञानाला तर्काची जोड द्यायची तर ती अशी देता येईल- आपलं एखादं गृहीतक वैध आहे की नाही हे तपासण्यासाठी असलेली पहिली कसोटी म्हणजे, ते तर्कसंगत आहे अथवा नाही हे तपासणं. तर्कनिष्ठ विचारांनी (Reasoning) मग आपण त्या गृहीतकाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. ते निष्कर्ष बरोबर आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज भासते. प्रयोगांनी, अनुभवांनी आणि विश्लेषणाने त्या निष्कर्षाची सत्यता आपण पडताळू शकतो.

    तार्किक विचाराची सहजप्रेरणा लहान वयातच जपली गेली तर सजग, विवेकी समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यात मदत होऊ शकेल का?

    तार्किक विचार ही सहजप्रेरणा असूनही समाजात त्याच्या बरोबर उलट वर्तन करणाऱ्यांचं प्रमाण अधिक दिसतं, याचं मुख्य कारण दडलं आहे ते आपल्या मनातल्या असुरक्षिततेत. ती इतकी झपाट्याने वाढण्याचं कारण उपजीविकाकेंद्री शिक्षणव्यवस्था. पैसे कमावणं, ते साठवणं आणि त्यायोगे उपभोगी जीवन जगणं हाच आजच्या शिक्षणव्यवस्थेचा स्थायीभाव झालेला आहे. शिक्षणाचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी न होता तो उपभोग्य वस्तूंचं सेवन, मालकी किंवा उत्पादनाधिष्ट कौशल्य असा झाला आहे. तर्कनिष्ठ, विवेकी विचार माणुसकी जपतील, त्याच्या अभावाने आपण उत्पादनशील यंत्र होऊन राहू, यात शंका नाही. येणाऱ्या पिढीची तार्किक विचारांची कास सुटण्यापूर्वी त्यांच्यातली तर्कनिष्ठता बळकट झाली, तर आणि तरच आपला समाज सुजाण होईल. याकरता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे आणि हे प्रयत्न लहान वयापासून शिक्षणाच्या माध्यमातूनच करायला हवेत.

    वाढत्या वयात कुतूहल, जिज्ञासा यांसारख्या जाणिवांची योग्य निगराणी आणि मशागत व्हायला हवी. अगदी लहान वयातही मूल स्वतःहून जसं भाषा शिकतं, तसंच आहे हे. घरातले संवाद मुलाच्या कानांवर पडत असतात. त्यातून उपयुक्त वाटणारे शब्द, वाक्यरचना, लिंग, क्रियापदं ते मूल वापरात आणतं. मोठे लोक वापरतात त्यातला एखादा वेगळा शब्द त्याने वापरला आणि त्याचं कौतुक झालं तर ते वारंवार या शब्दाचा वापर करतं. कधी चुकीचा वापर झाल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर त्या ठिकाणी ते त्या शब्दाचा वापर थांबवतं. त्याला त्या विशिष्ट शब्दाचा अर्थ कळलाच असतो, असं नाही पण प्रतिसादावरून ते काही ठोकताळे बांधतं.

    हे जसं भाषेबाबत होतं, तसं इतर अनेक गोष्टींबाबत, घटनांबाबतही होत असतं. मूल विशिष्ट गोष्ट किंवा घटना यांबाबत स्वतःच्या समजुतीनुसार व्यक्त होत असतं. सभोवतालच्या घटकांचा परस्परसंबंध समजून घेत त्या घटकांचं अस्तित्व मान्य किंवा अमान्य करण्याची त्याची प्रक्रिया म्हणजे त्याचा स्वतःचा तर्क. कुठल्याही घटनेकडे बघताना किंवा कुणी सांगितलेलं काही मान्य करताना त्याला बळ देणारे पुरावे शोधण्याची सवय त्याला इथूनच लागते. या प्रक्रियेत माहितीचं रूपांतर ज्ञानात होतं आणि सत्य नेमकं काय आहे, हा विचार पुढे येतो.

    चांगलं-वाईट किंवा मान्य-अमान्य या संकल्पना तर्कामुळे धारदार होत जातात. हा प्रवास याच पद्धतीने होणं अपेक्षित आहे. तर्क किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन ही लादण्याची गोष्टच नाही.

    मुलांमधल्या सहजप्रेरणा जोपासण्यासाठी उपक्रम राबवावे ही कल्पना नेमकी कुठून सुचली?

    सजग नागरिक या नात्याने सध्याच्या शिक्षणपद्धतीतल्या अनेक त्रुटी आम्हाला दिसत होत्याच. सांप्रत शिक्षणपद्धती केवळ शिक्षकांच्या आणि व्यवस्थेच्या सोयीची आहे हे जाणवत होतं. मुलांमधल्या सहजप्रेरणा, अंगभूत गुण जपले गेले पाहिजेत असं वाटत होतं; पण शालेय शिक्षणात ते होताना दिसत नव्हतं, अजूनही दिसत नाही.

    UnBox1
    मुलांना काही तरी शिकवणे ही शिक्षणक्रमात आखण्यात आलेली दिशाच चुकीची ठरते. न पेक्षा मुलांमध्ये दडलेले सुप्त कलागुण उमलण्यासाठी, तर्कबुद्धी आणि विचारांना चालना देणारे अवकाश आणि स्वातंत्र्य मिळवून देणे, कैकपटीने महत्त्वाचे...

    लहान मुलांमध्ये अनेक सहजप्रेरणा असतातच. त्यांची कल्पनाशक्ती अफाट असते, त्यांच्यात सहकंप/सहानुभूती असते. जिज्ञासा-कुतूहल तर असतंच. त्यांचं निरीक्षण उत्तम असतं. सर्जनशीलता भरपूर असते. या सहजप्रेरणा सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत दडपल्या जात आहेत, स्वतंत्र विचाराला कुठे जागाच नाही, याची खंत होती. हे सगळं कुठेतरी चुकतंय असंही सतत वाटत होतं. यातूनच ‘अनबॉक्स’च्या संकल्पनेशी आम्ही जोडले गेलो.

    त्याविषयी बोलण्याआधी थोडी आमची पार्श्वभूमी सांगते. कॉलेजमध्ये असताना गणित, विज्ञान शिकण्यासाठी आणि सोबतच त्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी आम्ही काही मित्रमंडळी काम करायचो. याचंच पुढे ‘कुतूहल’ नामक संस्थेत रूपांतर झालं. यात वैज्ञानिक खेळणी, आकाशदर्शन आणि कमी खर्चाचे टेलिस्कोप, मायक्रोस्कोप बनवणं अशा सगळ्या अॅक्टिव्हिटीज् होत्या. हे करत असताना लक्षात आलं की, ज्या मुलांना या विषयांची कोडी सुटलेली आहेत, त्यांना शालेय अभ्यासक्रमात ते विषय समजण्यात मदत झाली होती पण ज्या मुलांमध्ये त्याविषयी भीती होती, त्यांना मात्र याचा फार लाभ झाला नव्हता. तसंच दोन्हींमध्ये तर्क किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यात फारशी मदत होत नव्हती, असंही लक्षात येत होतं.

    पुढे मी आणि माझा जोडीदार अतुल अशा दोघांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात काम सुरू केलं. ते सुरू असतानाच वेगळं काही करण्याची ऊर्मी होतीच. व्यवसायात फार न अडकता अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत आम्ही स्वतःला जोडून घेतलं. हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक तरुण आमच्याशी जोडले गेले. हर्षवर्धन आणि समीरही असेच आमच्या संपर्कात आले. हर्षवर्धन हा ‘कुतूहल’शी जोडला गेलेला विद्यार्थी आणि समीर हा मुलांसोबत कामाचा अनुभव असलेला कलाकार, ‘अनबॉक्स’ ही संकल्पना मुळात या दोघांची. तर्कसंगत विचारसरणी विकसित होण्यासाठी गणित किंवा विज्ञानाच्या खेळण्यांपेक्षा कलेचा वापर आम्हाला अधिक प्रभावी वाटला.

    प्रत्येक मुलात अव्यक्त पण संभाव्य असे काही गुण असतातच. त्याला पोषक वातावरण, संधी पुरवण्याबाबत आपण दक्ष राहिलो, तर असंख्य शक्यतांची दारं हळूहळू उघडत जातात, त्यातून शिकण्याच्या संधीही उलगडत जातात. तर्कसंगत विचारसरणी रुजवणं असा काही हेतू ठरवून ‘अनबॉक्स’चं काम सुरू झालं नव्हतं. कुतूहलातून तर्कसंगत विचार हा जो मुलांचा नैसर्गिक प्रवास असतो, तो थांबू नये एवढाच उद्देश त्यामागे होता. काही संशोधनांचा आधार घेऊन आम्ही मुलांमधल्या सहजप्रेरणा शोधून काढल्या. या प्रेरणांना जपणारं किंवा त्यांची मशागत करणारं काहीतरी हवं या विचारापासून सुरुवात झाली, तेव्हा ३ ते १५ वर्षं हा वयोगट समोर होता.

    या वयोगटातल्या मुलांनी त्यांच्या जाणिवा, विचार आणि कल्पना प्रत्यक्ष कृतीतून, हातांनी करून, अनुभवातून जिवंत कराव्या यासाठी ‘अनबॉक्स’च्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी ‘कलाकसरत’ म्हणजे काही क्रिया आखल्या. या क्रियांमधून काही विशिष्ट निष्पत्ती काढण्याचं उद्दिष्ट नसावं हा विचार गाभ्याशी होता. कारण प्रत्येक मुलाचा कल वेगळा असतो, दृष्टिकोन वेगळा असतो, कृती करण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे निष्पत्तीही वेगळीच असणार. शिवाय या कलाकसरतीतून मुलं जे काही तयार करतील, काढतील, शिकतील त्याची तुलना इतरांशी होण्याची शक्यताही टाळायची हेही निश्चित होतं.

    हे प्रयोग करताना लक्षात आलं की, दोन कलाकसरतींमध्ये काही दिवसांचं अंतर ठेवलं पाहिजे. लागोपाठ या कलाकसरती घेतल्या तर पहिलीचा परिणाम दुसऱ्या कलाकसरतीवर होतो. नवे अनुभव, नवे धडे यांना वाव मिळत नाही. हेच जर दोन कलाकसरतींमध्ये साधारण ७-८ दिवसांचं अंतर ठेवलं तर पहिल्या कलाकसरतीतून मूल जे शिकतं त्याचा त्याला दुसरी कलाकसरत करत असता उपयोग होतो.

    या कलाकसरतीत फार साध्या वस्तू असतात. कागद, पारदर्शक कागद, दोरे, माती, गहू, कागदी कप-ग्लास इत्यादी. या सगळ्याचं नेमकं काय करायचं, याचं कोणतंही निश्चित उत्तर नसतं. विशेष गोष्ट म्हणजे, मुलं फक्त त्या गोष्टी ‘करत’ नाहीत, तर त्या तपासत असतात. ते कागद हलवतात, रेषा कुठे संपते, कुठे ओव्हरलॅप होते हे बघतात. ते केवळ आकारांशी खेळत नाहीत, तर अर्थ शोधत असतात.

    मुलांना पाहू दे, हात लावू दे, चुकू दे, प्रश्न विचारू दे, अशी आमची पद्धत आहे. कारण या सगळ्या अनुभवातूनच विचार सुरू होतो आणि विचार करण्याच्या या शांत सरावातून तर्कशक्तीची पायाभरणी होत जाते.

    एका कृतीचं उदाहरण इथे देते. एका पारदर्शक कागदावर काळ्या रंगाच्या रेषा छापलेल्या असतात. एखादी मुलगी तो कागद दुसऱ्या तशाच चित्रावर ठेवते आणि ‘आता याच्यावर जाळं तयार झाल्यासारखं वाटतंय’ असं म्हणते. तिने फक्त वस्तूवर वस्तू ठेवलेली नसते, तर ती त्या मांडणीला एक अर्थ देत असते.

    UnBox2
    ‘अनबॉक्स’ हा सृजनाला आमंत्रण देणारा छोटेखानी पेटाराच. याची संकल्पना हर्षवर्धन आणि समीर यांची. त्यांनी गडचिरोली-छत्तीसगढपासून थेट जम्मू काश्मिरपर्यंतच्या मुलांमधल्या सहजप्रेरणा जोपासण्यासाठी केलेली धडपड कितीतरी आशादायी...

    आणखी एका कृतीचं उदाहरण देते. ती कृती आहे दिलेल्या आकारावरून दोरा चिकटवण्याची. या कृतीत ‘कुठून सुरुवात करू?’ असा प्रश्नच एखाद्या मुलाकडून येतो. कोणी तो दोरा गुंडाळतो, कोणी सरळ रेषा काढून, त्यावर दोरा चिकटवतं. एक मुलगा म्हणतो, ‘मी इथे थांबलो, कारण पुढे गेलो तर गोंधळ होईल.’ ‘गोंधळ’ म्हणजे त्याच्या दृष्टीने काय? त्याच्या मनात निश्चित काही तरी तर्क आहे. तो फक्त दोऱ्याला विशिष्ट आकारात चिकटवत नाही, तर एक प्रकारची अंतर्गत शिस्त आणि सुसंगती शोधत असतो.

    आपली कृती काय परिणाम घडवते आणि आपण ती कृती का निवडली, याचं भान ठेवणं हेच आपल्या तर्कशक्तीचं मूळ आहे.

    आजही काही कलाकसरती वगळल्या जातात, काही नव्याने समाविष्ट केल्या जातात. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आमच्यासाठीही ही शिकण्याचीच प्रक्रिया आहे.

    आज सुमारे बारा वर्ष आम्ही या प्रक्रियेत आहोत. या काळात वेगवेगळ्या शाळांमधून हा उपक्रम आम्ही घेत राहिलो. कोविड साथीच्या काळात शाळा बंद होत्या. त्या काळात मुलांपर्यंत कसं पोहोचायचं, या विचारातून मग उपक्रमाकडून आम्ही उत्पादनाकडे वळलो.

    छत्तीसगढमधल्या नारायणपूर जिल्ह्यातल्या १३५ अंगणवाड्यांतील मुलांसोबत आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यातल्या १० ग्रामसभांसोबत हे काम केलं. नागपूरच्या आसपास दुधाचा व्यवसाय करणारी भारवाड ही भटकी जमात आहे. त्यांच्या मुलांसाठी लर्निंग स्पेसेस (शिकण्यासाठी जागा) तयार करत असताना ‘अनबॉक्स’च्या कलाकसरतींनी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नागपूरजवळच्या मध्य प्रदेशाच्या सीमेजवळच्या पारडसिंगा या गावातल्या दोन शाळांनी तिथल्या मुलांसाठी ‘अनबॉक्स’चा प्रयोग राबवायला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा आवाका असा वाढताना बघून भविष्यात तर्कसंगत विचार करणारा वर्ग वाढेल याची खात्री वाटते.

    कोरचीतल्या मुलांचं काम आम्ही स्वतंत्र निरीक्षकांकडून तपासून घेतलं. पहिली ते पाचवी या वर्गातल्या मुलांमधल्या चार अंगभूत गुणांवर ‘अनबॉक्स’च्या कलाकसरतींमुळे झालेल्या प्रभावांचा हा अभ्यास होता. यानुसार मुलांच्या संज्ञानात्मक विकासात (Cognitive Development) ४७.७ टक्के, भावनिक विकासात ५१.१ टक्के, सर्जनशीलतेत ४०.७ टक्के तर नावीन्यपूर्ण विचारसरणीत ४९.५ टक्के वाढ झालेली दिसून आली. यातही सगळ्यांत जास्त प्रभाव दुसरीच्या मुलांवर, म्हणजे ७ वर्षांच्या मुलांवर झालेला दिसला.

    जम्मू-काश्मीरमधल्या चार सरकारी शाळांमधल्या ११५ मुलांसोबत दोन महिन्यांसाठी एक नमुना म्हणून ‘अनबॉक्स’चा उपक्रम राबवला. इथेही स्वतंत्र निरीक्षकांनी मुलांचं काम तपासलं. मुलांमध्ये जिज्ञासा, स्वतंत्र विचार करण्याचं प्रमाण आणि स्वतःची कृती पुन्हा तपासण्याची तयारी यामध्ये स्पष्ट वाढ दिसत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.

    मुलांना रचनात्मक परिसंस्थेमध्ये (इकोसिस्टम) सर्जनाचं स्वातंत्र्य मिळतं तेव्हा तर्कशक्ती नैसर्गिकरित्या विकसित होते हेच यावरून स्पष्ट होतं.

    लहान मुलांमधला तार्किक विचार जपण्यासाठी थेट कृतीचा मार्ग तुम्ही अवलंबत आहात. मोठ्या माणसांनाही तो आवश्यक आहेच पण त्याशिवाय विवेकवादी विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काही पुस्तकांचं लेखन, संपादन केलं आहे, ‘आजचा सुधारक’ हे त्रैमासिकही तुम्ही चालवता. त्याबद्दल काय सांगता येईल?

    ‘आजचा सुधारक’ हे मासिक १९९० साली सुरू झालं. दि. य. देशपांडे मासिकाचे संस्थापक-संपादक होते. विवेकवादी विचारांचा प्रसार करणं आणि तो मराठी भाषेतून करणं ही या मासिकाची वैशिष्ट्यं होती. २०१७मध्ये काही प्रशासकीय कारणांमुळे ते बंद पडलं. या मासिकातील मजकूर अतिशय मौल्यवान होता, आहे. काही वर्षांनंतर मासिकाचे अंक मिळेनासे होतील आणि एक मौल्यवान संचित हरवलं जाईल, असं वाटून मग ‘सुधारक’चे पूर्वीचे सगळे अंक डिजिटाइज करून, अंकाची वेबसाइट तयार करून त्यावर आम्ही ते जपून ठेवले. तेव्हाचे मासिकाचे पूर्वसंपादक दिवाकर मोहनी, नंदा खरे यांच्याशी आमचे आपुलकीचे संबंध होते. हे मासिक पुन्हा सुरू व्हावं आणि तरुणांनी ते पुढे न्यावं अशी त्यांची आणि आमचीदेखील इच्छा होती. २०१९मध्ये आम्ही ‘आजचा सुधारक’ त्रैमासिकाच्या स्वरूपात, पण फक्त ऑनलाइन फॉरमॅटमध्ये आम्ही सुरू केलं. ‘सुधारक’च्या वेबसाइटवर हा सगळा मजकूर विनामूल्य उपलब्ध आहे.

    ब्राइट्स सोसायटी या बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकतेचा प्रसार-प्रचार करणाऱ्या संस्थेसाठी ‘तर्किष्ट’ आणि ‘तर्कटपंजिरी’ या दोन पुस्तकांचं संपादन केलं. विविध क्षेत्रात तर्कशुद्ध विचारसरणी कशी उपयुक्त ठरते, या विषयाला धरून केलेली भाषणं तसंच सामान्य माणसाचा नास्तिकतेकडे झालेला प्रवास वाचकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये या पुस्तकांची भूमिका महत्त्वाची ठरते. या सगळ्या माध्यमातूनही बिवेकवादी विचारांच्या प्रसारात योगदान देता आलं.

    कोणत्याही विचारसरणीच्या प्रसारासाठी दोन प्रकारे हातभार लावला जाऊ शकतो कृतीतून आणि विचारांतून. ‘अनबॉक्स’सारखा उपक्रम कृतीच्या माध्यमातून योगदान देत आहे, तर ‘आजचा सुधारक’ आणि वर उल्लेख केलेली पुस्तकं विचारांच्या माध्यमातून योगदान देत आहेत, याचं समाधान नक्कीच आहे.

    -oOo-



    सायली परांजपे
    सायली परांजपे

    लेखिका, अनुवादिका असलेल्या सायली परांजपे यांची ‘राया’ (अनुवादित), ‘शहीद भगतसिंग’, ‘क्रांतिज्योती सावित्राबाई फुले’, ‘सम्राट अशोक’ ही लघुचरित्रपर पुस्तके प्रकाशित आहेत. त्या ‘समतावादी मुक्त संवाद पत्रिके’च्या सल्लागार संपादक मंडळाच्या सदस्या आहेत.
    ईमेल: sayalee. paranjape@gmail.com



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा