Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

शनिवार, १९ जुलै, २०२५

दि. के. बेडेकरकृत मानवतावादी तत्त्व-सूत्रांचा शोध

  • संशोधनयात्रा

    DK_Thesis
    विचारवंत, लेखक दि. के. बेडेकर


    संशोधन करणे हा अनेकाचा पिंड असतोच असे नाही. तरी देखील अनेक विद्यार्थी संशोधन करतात. एकूणच पीएच.डी. करणे ही अतिशय अवघड आणि कष्टदायी प्रक्रिया आहे. या स्तरावरचे संशोधन करताना सामाजिक, आर्थिक आणि मानसिक समस्यांचे आव्हान परतवताना अनेक वैयक्तिक आणि कौटुंबिक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अर्थातच संशोधक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील हा प्रवास (अगदी प्रवेश घेतल्यापासून ते शेवटचे नोटिफिकेशन मिळेपर्यंत) अनंत आव्हानांबरोबरच आनंद, समाधान देणारा देखील असतो. हा प्रवास अधिक अर्थगर्भ, आल्हाददायक करावयाचा असेल तर एक म्हणजे, मार्गदर्शकांनी संशोधकाच्या आवडीच्या विषयात संशोधन करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. इतकेच नव्हे तर संशोधक विद्यार्थ्याच्या आर्थिक आणि बौद्धिक मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी निवडलेल्या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करत राहिले पाहिजे. काही अपवाद वगळता बहुसंख्य मार्गदर्शक दिशादर्शक मार्गदर्शन करताना दिसून येतात. तर काही ठिकाणी अगदी एकलव्यासारखे विद्यार्थ्यांनाच संशोधन करावे लागत आहे. अशा संशोधकांची संख्या वाढत आहे, हे कटू वास्तव या निमित्ताने नोंदवायला हवे आहे.

    संशोधन विषयाची निवड आणि स्वायत्तता

    संशोधन क्षेत्रात संशोधन विषयाची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. विषय निवडीच्या अनुषंगाने दोन प्रकारात मार्गदर्शकाची विभागणी करता येते. पहिल्या प्रकारात संशोधकांनी स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात संशोधन केले पाहिजे म्हणून, त्यांना त्याच्या आवडीच्या विषयावर संशोधन करू देणारा मार्गदर्शक असतो. तर दुसऱ्या प्रकारात विद्यार्थ्यांना फारसे काही उमजत नाही म्हणून एखादा साधा, सरळ आणि सोपा अथवा स्वतःच्या प्रकल्पाशी निगडित विषय देऊन संशोधन करण्यासाठी परावृत्त करणारा वा एखादा विषय जबरदस्तीने त्याच्यावर लादणारा मार्गदर्शक असतो.

    संशोधकांना विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले तर ते केवळ प्रबंधच पूर्ण करत नाहीत तर असे संशोधन अधिक आशयघन, भावात्मक आणि दिशादर्शक देखील करू शकतात. (व्यक्तिपरत्वे अनुभव भिन्न भिन्न असू शकतो.) माझ्यापुरता विचार केला, तर एम. फीलच्या लघुशोधप्रबंधामध्ये ‘लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांचे निर्मूलन’ करण्यासाठी भारतीय संदर्भात उदारमतवादी स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, जहालवादी स्त्रीवाद यापेक्षा ‘बहुजनवादी स्त्रीवाद' कसा दिशादर्शक ठरू शकतो, या विषयात काही नवीन संकल्पनात्मक भर घालण्याचा प्रयत्न केलेला होता. हे केवळ स्वतःच्या आवडीने निवडलेल्या विषयामुळे आणि मार्गदर्शकांनी दिलेल्या स्वायत्ततेमुळे शक्य झाले, हे वेगळे सांगायला नको. सदर लघुशोधप्रबंधाच्या आधारावर सामजिक शास्त्रातील संशोधन, विद्यापीठ आणि राज्यसंस्थेचे धोरण या अनुषंगाने समतावादी मुक्त संवाद पत्रिका, अंकामध्ये (शीर्षक: ‘वेश्याव्यवसाय: सामाजिक शास्त्रातील संशोधन आणि धोरण निर्मिती’, ऑक्टोबर २०२४, पान २४ ते २९) सारांशपर लेखाची थोडक्यात मांडणी केलेली होती.

    शोधप्रबंधाच्या विषयनिवडीची कारणमीमांसा

    स्थल-काल-स्थितीपरत्वे लघुशोधप्रबंध पूर्ण केल्यानंतर फिल्डवर्कवर आधारित पुन्हा अभ्यास करणे शक्य नव्हते. त्यामुळे विशेषतः महाराष्ट्रातील राजकीय विचारविश्वात, चर्चाविश्वात मूलगामी भर घालणाऱ्या, पण दुर्लक्षित असणाऱ्या विचारवंताचा वेध घेत होतो. तेव्हा अनेक विषयांचा धांडोळा घेतल्यानंतर अंतिमतः विचारवंत, लेखक दि. के. बेडेकर यांच्यावर संशोधन करावयाचे ठरले. बेडेकरांचे समग्र लेखन पाहता सुरुवातीला ‘बेडेकरांचे धर्मचिंतन’ हा विषय घेऊन संशोधनाचा प्रास्ताविक आराखडा तयार केला होता. पण पुढे संशोधन समितीचे बहिस्थ तज्ज्ञ डॉ. यशवंत सुमंत, डॉ. राजा दीक्षित आणि डॉ. मंगेश कुलकर्णी (माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या मौलिक सूचनांचा स्वीकार करून त्यांच्या केवळ एका बाजूचा अभ्यास न करता ‘महाराष्ट्राच्या मार्क्सवादी विचारविश्वात दि. के. बेडेकर यांचे योगदान’ असा समग्र पट घेऊन शोधप्रबंध लिहिण्याचे योजिले. अर्थात माझ्यासह मार्गदर्शक डॉ. कुलकर्णी यांना देखील सदर योजना अधिक सयुक्तिक नि रास्त वाटली आणि पीएच.डी. संशोधनाला सुरुवात झाली.

    एम.फिल. प्रमाणे पीएच.डी. शोधप्रबंधासाठी त्यांनी पूर्णतः स्वातंत्र्य आणि स्वायत्तता दिली होती. प्रस्तुत विषयात काय करावयाचे आहे आणि कसे करावयाचे आहे, याची नीट आखणी झालेली असल्यामुळे तत्कालीन मार्क्सवादी विचारवंतांमध्ये बेडेकरांचे वेगळेपण आणि त्यांच्या अनेक दुर्लक्षित पैलूंवर टीकात्मक प्रकाश टाकणे शक्य झाले. शोधप्रबंधाच्या आधारे सबंध दि. के. बेडेकरांवर ऋजुतापूर्ण मांडणी करता येणार नाही, पण नवमार्क्सवाद म्हणून जे तत्त्वज्ञान मांडले जात होते, त्यातील मानवतावादी, सांस्कृतिक मार्क्सवादाचे तत्त्व बेडेकरांच्या लेखनात कसे दिसून येते, याची उकल शोधप्रबंधात करण्याचा प्रयत्न करता आला.

    व्यक्ती आणि विचार

    एखाद्या व्यक्तीचा एकरेषीय अभ्यास करणे यावर अनेक संशोधन केंद्रावर मार्गदर्शक व संशोधन समितीने प्रतिबंध घातलेला आहे. त्याचे कारण म्हणजे, असे संशोधन चिकित्सेच्या पातळीवर न होता केवळ चरित्रात्मक होते. त्यामुळे विचारवंत यास एकाच एक कोटीत न पाहता, त्यांनी केलेल्या, जोडून घेतलेल्या विचारधारेत त्यांचे अवलोकन केले पाहिजे. प्रथमदर्शनी पाहता एखाद्या व्यक्तीवर अभ्यास करणे सहज सोपी गोष्ट वाटते, पण त्यापेक्षा ती अधिक जटील आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. कारण असा विषय घेऊन अभ्यास कसा केला पाहिजे? त्याचे मापदंड काय असावेत? हे ठरवणे अवघड काम होते. यासाठी स्व-जिज्ञासेबरोबर मार्गदर्शकाची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असते. इंग्रजीबरोबर मराठी विचारविश्वात अशा स्वरूपाचे जे काही लेखन झाले आहे, याचा शोध कुठे आणि कसा घ्यावा, संबंधित टिपणे कशी काढावीत, हे स्वयंशिस्त व योग्य मार्गदर्शन असल्याशिवाय करता येत नाही. इतकेच नव्हे तर एखादा विचारवंत जेव्हा आपण समजून घेतो; तेव्हा त्याचे समग्र पर्यावरण समजून घेणे आवश्यक ठरते. तरच तो विचारवंत समजून घेता येतो. त्या त्या काळाचे संदर्भ समजून घेत संशोधन झाले तर विषयाला न्याय देता येतो.

    विद्यापीठीय संशोधन आणि दि. के. बेडेकर

    शोधप्रबंधासाठी जेव्हा एखादा विषय निवडला जातो, तेव्हा पहिले संबंधित विषयावर काही अभ्यास झालेला आहे का? याचा धांडोळा घेणे हे अतिशय अवघड आणि आव्हानात्मक काम असते. आपण करत असलेल्या विषयावर जे काही संशोधन झालेले असते, त्यापेक्षा नेमके वेगळेपण अधोरेखित करावे लागते. तसे पाहता विद्यापीठीय स्तरावर बेडेकरांविषयी जे काही संशोधन झाले आहे, ते नाममात्र स्वरूपाचे झालेले आहे. जसे की, बेडेकरांच्या साहित्य व ललित लेखनाच्या अनुषंगाने प्रा. नामदेव गपाटे यांनी ‘दि. के. बेडेकरः विचारवंत व समीक्षक’ (२०१२) म्हणून अभ्यास केला आहे. या शिवाय आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय विचारवंतामध्ये दि. के. बेडेकर एक सृजनशील मार्क्सवादी विचारवंत म्हणून नचिकेत कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘Social and Political Thought in Modern Maharashtra: - Study in D. K. Bedekar’ (२०१४) या लघुशोधप्रबंधामध्ये मांडणी केलेली आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विचारात दि. के. बेडेकर यांचा धर्मचिंतनाचा आढावा त्यांनी त्यांच्या संशोधनात घेतलेला आहे. प्रस्तुत संशोधकांनी विषय मर्यादा पाहता, बेडेकर यांच्या एकाच एक अंगाचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखकाने बेडेकरांच्या विचारांतील समग्र दृष्टीचे, त्यांनी केलेल्या लेखनाच्या आधारावर संशोधन केलेले आहे. सबंध बेडेकरांच्या लेखनाचे अवलोकन केले तर त्याचे लेखन केवळ वर्तमानकाळातील समस्या आणि त्याचे मूळ, प्रासंगिकता समजण्यासाठी पुरेसे नाही, तर भविष्याकालीन मार्ग दाखविण्यासाठी दिशादर्शक देखील आहे, याची प्रकर्षाने जाणीव हे संशोधन करताना संशोधक म्हणून मला झालेली आहे. अजूनही बेडेकरांचे असे विपुल लेखन आहे की, त्याकडे सुज्ञ अभ्यासक, संशोधकांचे पुरेसे लक्ष गेलेले नाही. अशा दुर्लक्षित व अप्रकाशित लेखनाचा शोध घेऊन दि. के. बेडेकर यांच्या विचारदर्शनातील प्रमुख अंग अधोरेखित केले, तर महाराष्ट्राच्या विचारविश्वात नव्याने भर पडू शकते.

    संशोधना दरम्यान आलेली आव्हाने

    दरम्यान, अगदी विषय निवडीपासून ते शोधप्रबंध पूर्ण होईपर्यंत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. या प्रवासात अनेकवेळा स्वतःचा स्वतःला नव्याने शोध लागत गेला. आर्थिक आव्हानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, पण त्याचबरोबर बौद्धिक आव्हान देखील होतीच. मुळातच आपला शैक्षणिक पाया जितका पक्का असायला हवा तितका नसतो. याला कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक अशी अनेक कारणे असू शकतात. दैनंदिन व्यवहारात आपण मराठी भाषा बोलतो, लिहितो पण शोधप्रबंधासाठी जेव्हा लेखन करतो तेव्हा अधिक काळजीपूर्वक, अधिक अर्थपूर्ण करावे लागते. अगदी व्याकरणापासून ते वाक्यरचनेपर्यंत अधिक लक्ष द्यावे लागते. ओघवत्या शैलीत, समोरच्या व्यक्तीला समजेल, उमजेल आणि अर्थबोध कसा होईल, याची वारंवार उजळणी करावी लागते. हे एक आव्हानच असते. शिवाय बेडेकरांच्या लेखनाचा विस्तृत प्रपंच पाहता त्यांच्या लेखनातील कोणता भाग वगळला पाहिजे आणि कोणता भाग घेतला पाहिजे, हे एक मोठे आव्हान होते. पण कॉ. सुधीर बेडेकर आणि माझे मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनामुळे एकसंध मांडणी करण्यास मदत झाली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या विचारविश्वात बेडेकरांचे नेमके स्थान काय आहे हे अधोरेखित करणे इथे महत्त्वाचे होते. त्या निमित्ताने नव्याने मार्क्सवाद, नवमार्क्सवाद, गांधीवाद, भारतातील विशेषतः पश्चिम भारतातील समाज प्रबोधन, धर्मचिंतन याचा आढावा घेऊन त्यांना स्थानबद्ध करणे हे संशोधन म्हणून मोठे आव्हान होते.

    माहिती आणि ज्ञानवृद्धी

    बेडेकर यांच्या विषय लेखनाचा परीघ पाहिला तर नैसर्गिक शास्त्राबरोबर सामाजिक शास्त्रातील अनेक संकल्पनाच्या अगदी मुळाशी जाऊन अन्वयार्थ करणे, ही त्यांची शैली होती. साहजिक विषयाच्या अनुषंगाने त्यांनी ज्या विषयांना स्पर्श केला होता, त्या सबंध विषयाची ओळख करणे आवश्यक बनले होते. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यास करतेवेळी जे वाचन केलेले होते, ते अपूर्ण वाटू लागले. केवळ परीक्षार्थी म्हणून वाचलेले मार्क्सवाद, नव मार्क्सवाद याची नव्याने पुनर्वाचनाची, अधिकच्या चिंतन-मननाची गरज जाणवली. त्यामुळे युरोपीय दृष्टीतून मार्क्सवाद समजून घेण्यापेक्षा भारतीय संदर्भातून मार्क्सवाद समजून घेता येईल का? असा प्रश्न उपस्थित करून त्या विषयीचा वेध घेता आला. शिवाय महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील राष्ट्रवाद, धर्मसुधारणा, धर्मचिंतन, साहित्यव्यवहार, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विचारविश्वामुळे केवळ माहितीचा साठाच वाढला नाही, तर ज्ञानात देखील अधिकाधिक भर पडली.

    पीएच. डी. संशोधनादरम्यान माझी जिज्ञासा आणि ज्ञान पातळी उंचावणारे अनेक क्षण मी अनुभवले आहेत. जसे की, भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास युरोपीय पृष्ठभूमीवरून करण्यापेक्षा भारतीय परिप्रेक्ष्यातून केला, तर भारतामध्ये मार्क्सवाद अधिक खोलवर रुजला असता, विकसित झाला असता, हे प्रकर्षाने जाणवले. आंबेडकरवादी समूह आणि मार्क्सवाद यांच्यातील अनेक साम्यस्थळे असताना केवळ एका विशिष्ट वर्गाच्या हाती नेतृत्व गेल्यामुळे ते कसे परस्परविरोधी राहिले, हेदेखील मला ताडून पाहता आले. एकूणच बेडेकरांचा धर्मश्रद्धा विचार आणि आंबेडकर यांचा धम्म विषयक विचार यांच्या तुलनात्मक अभ्यास करण्याची जिज्ञासा निर्माण झाली. बेडेकरांच्या दृष्टीतून गांधी समजून घेतले, तर नव्याने गांधी सापडू शकतात, हेसुद्धा या संशोधनामुळे मला जाणवले. अर्थात मार्गदर्शक जर संबंधित विषयातील तज्ज्ञ असतील आणि खुली चर्चा करण्यासाठी वेळ देणारे असतील तर संशोधकाची जिज्ञासा अगदी उच्च कोटीचे रूप धारण करू शकते.

    मार्क्सवादातील मानवतावादी दृष्टी

    MarxStamp
    असाही एक काळ होता, जेव्हा मानवतावादी बिचारांची कड घेणाऱ्या जागतिक कीर्तीच्या तत्त्वज्ञांचा या ना त्या रुपाने सन्मान केला जात होता. स्मृतिशताब्दीनिमित्त १९८३ मध्ये काढलेले मार्क्सबरचे हे पोस्टाचे तिकीट, त्याचाच एक पुरावा...

    बेडेकर ज्या काळात मानवतावादी मार्क्सवादाचा शोध घेत होते, त्या दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्क्सवादी विचारांची एकूण स्थितीगती कशी होती, यासंबंधाने प्रस्तुत संशोधनामुळे सूक्ष्म पातळीवर जाऊन नव्याने पुनर्वाचन करावे लागले. कार्ल मार्क्स यांनी तारुण्यात जे लेखन केले होते, त्याचा त्या काळात नव्याने शोध लागलेला होता. मार्क्सचे हे साहित्य विशेषतः १९३२ मध्ये प्रकाशित झाले. त्या साहित्याच्या आधारे युरोपमधील काही विचारवंतानी कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा नव्याने अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विचारावर साम्यवादी राष्ट्रांमध्ये मार्क्सला अपेक्षित असलेली क्रांती अथवा परिवर्तन का घडून येत नाही? मार्क्सला नेमके काय अपेक्षित होते? वर्गविहीन राज्यविहीन व शोषणमुक्त समाजाची निर्मिती करून काय स्वरूपाची मुक्ती त्याला अपेक्षित होती? असे अनेक प्रश्न तत्कालीन युरोपीय विचारवंताना पडू लागले. त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत असताना काही अभ्यासकांना मार्क्सच्या विचारांतील मानवतावादी दृष्टीचा शोध लागला होता. कार्ल मार्क्सचा ‘इकॉनॉमिक्स अँड फिलॉसॉफिकल मॅन्युस्क्रिप्ट्स’ नावाचा ग्रंथ प्रकाशित झाल्यामुळे मार्क्सच्या विचारांना नवीन अन्वयार्थ लावण्यास चालना मिळाली. मार्क्सवादी विचार प्रवाहात झालेला हा मोठा बदल होता. नवीन पद्धतीने विचार करणारे जे युरोपीय विचारवंत होते, त्यांना नवमार्क्सवादी म्हणून ओळखले गेले. त्याचे पूर्वसुरी इटालियन साम्यवादी आंतोनियो ग्राम्शी (१८९१-१९३७) यांचे मार्क्सवादातले योगदान अनन्यसाधारण आहे.

    या पार्श्वभूमीवर बेडेकरांचे मानवतावादी विचारांचे मूळ कुठे आहे, या बाबतीत दोन शक्यता वर्तवता येतात. एक म्हणजे, बेडेकरांच्या मानवतावादी विचारांवर नवमार्क्सवादी विचारांचा प्रभाव होता. दुसरे म्हणजे, ते स्वतंत्रपणे या नवमानवतावादी विचारांचा पट मांडत होते. बेडेकरांचे लेखनविश्व पाहिले, तर ग्राम्शींच्या जवळ जाणाऱ्या मार्क्सवादातील मानवतावादी मांडणीचे धागेदोरे त्यांच्या मांडणीत दिसून येतात. हे कसे घडून आले? या पठडीतील साहित्य त्यांना वाचावयास मिळाले होते का? असे प्रश्न त्यांच्या वाचकांना, अभ्यासकांना पडू शकतात. बेडेकरांनी जे गांधी विचार दर्शनाचे प्रारूप मांडले आहे, त्यात ग्राम्शींचा संदर्भ येतो. परंतु ग्राम्शींनी जी नवमार्क्सवादात भर घातलेली आहे; याविषयीचे त्यांचे लेखन आणि इतर नवमार्क्सवादी विचारकांचे लेखन बेडेकरांना वाचावयास मिळाले असेल, याची शक्यता फारच कमी आहे. तो काळ लक्षात घेता, युरोपीय पृष्ठभूमीत रुजलेले नवमार्क्सवादी विचार त्यांना वाचण्यास मिळण्याची शक्यता कमीच होती, कारण हे संपूर्ण साहित्य मुख्यत्वे १९७० नंतरच इंग्रजी भाषेत उपलब्ध झाले. ते मानवतावादी विचार बेडेकरांनी कसे आत्मसात केले? या प्रश्नांची दोन उत्तरं संभवतात. कार्ल मार्क्सने सुरुवातीच्या काळात जे लेखन केले होते, ते त्यांनी वाचले असण्याची एक शक्यता होती. दुसरी शक्यता अशी, की आधुनिक भारतीय प्रबोधनकारांच्या विचारांतील मानवतावादी तत्त्वांचे सूत्र त्यांना गवसले होते व त्याचे महत्त्व देखील मनोमन पटलेले होते. या दुसऱ्या उत्तरात अधिक तथ्य असल्याचे जाणवते.

    विसाव्या शतकातील युरोपमध्ये मार्क्सवादी विचारपरंपरेत लुकास, लुई आल्टुसे अशा या उज्ज्वल विचारपरपरेत आंतोनियो ग्राम्शी यांचे नाव आदराने घेतले जाते. कारण त्यांनी तत्कालीन सोव्हिएत युनियन व पाश्चात्य युरोप येथील प्रचलित मार्क्सवादातल्या मर्यादा हेरल्या आणि पोथीनिष्ठतेमध्ये बंदिस्त झालेल्या मार्क्सवादास अधिक व्यापक आणि गतिशील बनवले. काही प्रमाणात बेडेकरांनी महाराष्ट्राच्या संदर्भात अशीच मोलाची भूमिका बजावल्याचे दिसते. मार्क्सवादाची मानवतावादी, सांस्कृतिक दृष्टिकोनातून भारतीय संदर्भात एक नव्याप्रकारची मांडणी करण्याचा अत्यंत लक्षवेधी प्रयत्न त्यांनी केला. या विषयीची विस्ताराने चर्चा शोधप्रबंधात ‘विषयप्रवेश’ व ‘महाराष्ट्रातील मार्क्सवादी विचारविश्व’ या प्रकरणांमध्ये केली आहे.

    BookCovers
    दि. के. बेडेकरांच्या विचारांवर नवमार्क्सवादाचा प्रभाव होता, हे खरेच. परंतु महत्त्वाचे हेही होते की, आधुनिक भारतीय प्रबोधनकारांच्या विचारांतील मानवतावादी तत्त्वांचे सूत्रदेखील त्यांना गवसले होते...

    दुर्लक्षित बेडेकर

    एक मार्क्सवादी विचारवंत म्हणून बेडेकर खऱ्या अर्थाने भारतीय संदर्भात मार्क्सच्या विचाराला साजेशी व काळाच्या पुढे घेऊन जाणारी धर्मपर्यायी श्रद्धाविचारांची मांडणी करत होते. शिवाय महाराष्ट्राच्या मार्क्सवादी विचारविश्वात त्यांनी मानवतावादी विचारांचे व सांस्कृतिक मार्क्सवादाचे बीजारोपण केले. सोव्हिएत मार्क्सवाद हाच खरा मार्क्सवाद असा जो गैरसमज प्रबळ झाला होता, तो दूर करण्याविषयीची ही मांडणी आहे. प्रामुख्याने आर्थिक नियतिवादाचे तत्त्व केंद्रस्थानी असलेल्या विचारांतून सुटका करून घेण्याचे आवाहन बेडेकरांनी केले होते व कार्ल मार्क्स यांना अपेक्षित असलेल्या मानवतावादी विचारांचा भारतीय संदर्भात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. असे असून देखील २०१० रोजी त्यांचे जन्म शताब्दी वर्ष होऊन गेले, त्या निमित्ताने महाराष्ट्रातील समाजवाद्यांना व मार्क्सवाद्यांना अथवा इतर विचारप्रवाहातील अभ्यासकांना त्यांनी केलेल्या कार्य व चिंतनपर विचारांवर कुठेही साधा लेख, एखादी व्याख्यानमाला अथवा चर्चासत्र आयोजित करावेसे वाटले नाही, असे का झाले असावे? त्यांचे वैचारिक योगदान काहीसे दुर्लक्षित राहाण्यामागची चर्चा या शोधप्रबंधात केलेली आहे.

    समारोप

    एका बाजूला पक्षीय शिस्त सांभाळून केलेले कार्य आणि दुसऱ्या बाजूला बेडेकरांनी संशोधकीय शिस्त सांभाळून आत्मसात केलेला कार्ल मार्क्सचा अस्सल विचार हा त्यांनी भारताच्या अवैदिक परंपरेतल्या प्रबोधनकारांच्या विचारकक्षेत केलेला विचार आहे. शिवाय मार्क्सचे विचार मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कसे समजून घेता येतील, या अनुषंगाने त्यांनी अर्थपूर्ण मांडणी केलेली आहे. बेडेकरांनी इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र व साहित्य आणि सामाजिक शास्त्राला दिलेले जे योगदान आहे ते आशयघन, अर्थपूर्ण आणि दिशादर्शक आहे. त्यांच्या विविधांगी वाचनाची व व्यासगांची बैठक त्यांच्या समग्र चिंतनामध्ये दिसून येते. त्यामुळे त्यांचे विचार वर्तमानकाळातील घटना समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. म्हणून त्यांना केवळ एका कोटीक्रमात पाहाण्यापेक्षा त्यांच्या एकूण विचारव्यवहारातला मुख्य धागा पकडून वादसंवाद साधला. सोबतच महाराष्ट्र, पर्यायाने भारताच्या मार्क्सवादी विचारविश्वात त्यांचे स्थान अधोरेखित केले, तर त्यांचे मार्क्सवादातले वेगळेपण ठळकपणे मांडता येऊ शकते.

    सदर लेखात काही ठळक मुद्द्यांचा ओझरता आढावा घेतलेला आहे. तो वाचून मूळ शोधप्रबंधाविषयी, बेडेकरांच्या ग्रंथ संपदेविषयी आणि संशोधन का करावे, या विषयी कुतूहल जागृत झाल्यास प्रस्तुत लेखाचा हेतू साध्य झाला, असे म्हणता येईल.

    -oOo-

    संदर्भ :

    कनकटे सुनिल, २०२२, महाराष्ट्राच्या मार्क्सवादी विचारविश्वातील दि. के. बेडेकर यांचे योगदान, राज्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. (अप्रकाशित)



    सुनिल कनकटे
    डॉ. सुनिल कनकटे

    लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक, अध्यापक आहेत.
    ईमेल: sunilkunipune@gmail.com.



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा