-
इतिहासाचे पान
मराठा शौर्याचा इतिहास जपलेले मध्य प्रदेशातल्या रावेरखेडी येथील थोरल्या बाजीरावांचे समाधीस्थळ…प्रारब्धवादाचे पुरस्कर्ते, ख्यातनाम लेखक जी. ए. कुलकर्णी यांनी ‘रमलखुणा’ पुस्तकातील ‘इस्किलार’ कथेत ‘देह कोणत्या मातीचा हे सांगता येते, पण तो कोणत्या मातीत जाणार हे कोण सांगणार?’ असे वाक्य लिहिले आहे. या उक्तीचे निदान मराठी माणसाला पटणारे चपखल उदाहरण म्हणजे श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ पहिला बाजीराव (१८ ऑगस्ट १७०० - २८ एप्रिल १७४०). उणेपुरे ३९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या मराठी सेनानायकाचा जन्म महाराष्ट्रातला (नाशिक जिल्ह्यातील सिन्नर); परंतु देशभरात नावलौकिक मिळवलेल्या या शूर लढवय्याची अखेर मात्र मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील (पश्चिम निमाड) रावेरखेडी येथे झाली. इतकेच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे एकमेव स्मारक म्हणा समाधीस्थळ म्हणा वा छत्री तेथेच आहे, याला काय म्हणावे?... हे वर्ष थोरले बाजीराव पेशव्यांच्या ३२५ व्या जन्मतिथीचे तसेच २८५ व्या पुण्यतिथीचे वर्ष आहे. त्या निमित्ताने इतिहासपुरुषाच्या लोक चर्चेपलीकडच्या अलक्षित पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे हे टिपण...रावेरखेडी. मध्य प्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यातले ऐतिहासिक स्थळ. या स्थळाचे स्थानमहात्म्य मोठे. मराठी अस्मितेच्या गौरवाचे हे प्रेरणादायी स्मृतिस्थळ. माझ्या हृदयाने तीर्थक्षेत्र असल्यासारखी या स्थानमहात्म्याची लगेच नोंद करून घेतली! त्यामुळे डिसेंबर २०२४ मध्ये इंदूरला जायचे ठरल्यावर आडबाजूला असले तरी रावेरखेडीला भेट द्यायचीच आहे, अशी तंबी यजमानांना आणि लेकाला आधीच दिली! इंदूर ते कसरावद (९० कि. मी.) - कसरावद ते रावेरखेडी फाटा (पिपलगांव, १९ कि. मी.)- रावेरखेडी फाटा ते रावेरखेडी (८ कि. मी.) असा प्रवास करून इच्छित स्थळी पोहोचलो. संपूर्ण प्रवासात जागोजागी ‘श्रीमंत बाजीराव पेशवा समाधीस्थल, रावेरखेडी’ अशा अर्थाच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतील दिशादर्शक पाट्या वाचून ऊर भरून येत असताना मनात हीच रेकॉर्ड वाजत होती, की किती अनाकलनीय आहे, नियतीचा खेळ!
बाहेरच्या माहिती फलकावर बाजीराव पेशवे यांचे निष्ठावंत सरदार ग्वाल्हेरचे शिंदे (सिंधिया) यांनी ही छत्री उभारल्याची नोंद आहे. स्मारकाजवळ गेल्यावर नर्मदेकाठचा निसर्गरम्य परिसर बघून, धकाधकीचे आयुष्य घालवलेल्या या वीराला निदान अंत्यसमयी अशी निवांत जागा मिळाली, या विचाराने मन शांतावले. विशाल पिंपळ वृक्षाच्या शेजारील धर्मशाळेच्या आत थोरल्या बाजीरावांची आगळीच रचना असलेली छत्री, स्थानिक भाषेत ‘बलुआ पत्थर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या लालसर पिवळ्या पाषाणाने बांधली आहे. साधारण उंचीच्या चौरस जोत्यावर अष्टकोनी चौथरा असून त्यावर छोट्याशा, षट्कोनी, सपाट छताच्या मंदिराची रचना केलेली दिसते. महिरप असलेल्या उघड्या द्वारातून आतील शिवलिंगावर अज्ञात भाविकाने वाहिलेली फुले दिसली. महिरप आणि सपाट छतामधील जागेत ‘इ. स. १७४० साली निधन पावलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांची रक्षा या छत्रीत असल्याचे मानले जाते’ अशा अर्थाचे इंग्रजी वाक्य लिहिले आहे. एका महान योद्ध्याची छत्री साधी तरी अनवट धाटणीची असावी, याचे समाधान वाटले तरी इतिहासप्रेमी पर्यटकांच्या गैरहजेरीचे वैषम्य निश्चितच वाटते. येथून जवळच काशीबाई यांनी पूर्वी इथे बांधून घेतलेले ‘रामेश्वर’ महादेवाचे मंदिर आहे.
अन्याय्य नोंद
थोरल्या बाजीरावांचा उल्लेख झाला, की आधी मस्तानीच आठवते. मस्तानी हा बाजीरावांच्या आयुष्यातील एक हळवा, कोवळा, नाजुक, मखमली हिस्सा होता याबद्दल दुमत नाहीच. परंतु त्यांची केवळ हीच आणि एवढीच ओळख कायम ठेवून आपण या थोर, कर्तबगार व्यक्तीवर घोर अन्याय करत आहोत, याची आपल्याला यत्किंचितही जाणीव आणि खंतही नाही. त्यांच्या युद्धचातुर्याचे, शौर्याचे गोडवे गाताना नामवंत देशी विदेशी इतिहासकारांची लेखणी थकली नाही. परंतु दुर्दैवाने ते सर्व पुस्तकांमध्येच बंदिस्त राहून दृश्य माध्यमांतून मात्र या कणखर सैनिकाची मुलायम बाजूच मांडण्यावर जास्त भर दिला गेला.
प्रसिद्ध इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई (रियासतकार सरदेसाई) यांच्या १९४८ साली प्रकाशित झालेल्या New History of the Marathas (Volume II), The Expansion of the Maratha Power (१७०७ - १७७२) या पुस्तकात औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ते पेशवे माधवराव यांच्या मृत्यू (१७७२) पर्यंतच्या ऐतिहासिक घटनांचा ऊहापोह केला आहे. ते लिहितात, महान आंग्ल इतिहास तज्ज्ञ ग्रँट डफ यांनी बाजीरावांचे वर्णन, योजना आखण्यासाठी आवश्यक अशा बुद्धी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक अशा पराक्रमी हातांचा धनी असे केले होते. त्यांची शरीरयष्टी काटक होती. शस्त्रास्त्रे चालवण्याचे आणि घोडेस्वारीचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले होते. छ. शिवाजी आणि छ. संभाजी, संताजी घोरपडे यांसारख्या प्रेरणादायी वीरांच्या बलिदानाच्या शौर्यगाथांनी त्यांच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग जागवले. ते वाचन, लेखन, हिशेब यात पारंगत असून तत्कालीन ब्राह्मण वर्गात प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेशी परिचित होते. छाप पडेल अशी सुस्वरूप चेहरेपट्टी, बुद्धिमत्ता आणि शिष्टाचारयुक्त वर्तन या वैशिष्ट्यांमुळे त्यांना बघण्यासाठी विलक्षण उत्साहाने खिडक्यांतून स्त्री पुरुष गर्दी करत.
अलौकिक कर्तबगारी
छ. शाहू महाराजांनी बाजीरावांना अवघ्या विशीतच पेशवाईची वस्त्रे सुपूर्द केली यातच त्यांच्या क्षमतेची, कर्तृत्वाची कल्पना येते. छत्रपतींच्या हाताखालील सर्वात महत्त्वाचे पद भूषवताना त्यांनी सर्वप्रथम समवयस्क अनुयायांचा स्वतःचा गट तयार केला. आपल्या जोमदार धोरणाने त्यांनी पुरंदरे, भानू, बोकील, हिंगणे, पेठे यांसारख्या दिग्गज सरदारांना आकर्षित केले. त्यांनी सुद्धा बाजीरावांच्या उपक्रमात सामील होऊन, निष्ठेने त्यांच्या नेतृत्वाचे अनुसरण करून, त्यांच्या यशात मोठा हातभार लावला. दुसरीकडे बाजीरावांनी दरबारातील वडीलधाऱ्या सदस्यांनाही नाराज न करण्याची सावधगिरी बाळगली. छ. शाहूंच्या मर्जीतील पिलाजी जाधव आणि फतेहसिंह भोसले यांनी छ. शाहूंच्या सांगण्यावरून बाजीरावांना सहकार्य देऊन, त्यांच्या विचारांशी जुळवून घेत, त्यांना कधीही विरोध केला नाही. बाजीरावांच्याच कालखंडात शिंदे, होळकर असे समर्थ सेनापती उदयास आले.
काशीबाई यांनी बांधलेले बाजीरावांच्या समाधीस्थळानजीकचे रामेश्वर महादेवाचे मंदिर...बाजीराव यांचे पिताश्री बाळाजी विश्वनाथ भट यांनी १७१९ साली मुत्सद्देगिरीची पराकाष्ठा करून मराठ्यांसाठी दिल्लीच्या बादशाहकडून दख्खन प्रांतात मोगलांकडून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्याची सनद मिळवली होती. परंतु यावरुन मराठे आणि मोगलांचे विविध प्रांतातील अधिकारी यांच्यात कायम कुरबुर चालायची. मराठ्यांनी ही सनद लष्करी भीती दाखवून, दबावाखाली बादशाहकडून मंजूर करून घेतली आहे, या कारणास्तव मोगलांचा हैदराबादचा सुभेदार निजाम उल मुल्कचा सनदेला कट्टर विरोध होता. त्याला दख्खन प्रांतावर स्वतःची सत्ता प्रस्थापित करून स्वतःकडे चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क घ्यायचे होते. त्यानुसार बाजीराव कर्नाटकातील मोहिमेवर असताना पुण्यावर चाल करून त्याने त्याच्या इराद्यांची चुणूक दाखवली. या आणीबाणीच्या प्रसंगात छ. शाहूंचा सामोपचाराचा सल्ला न मानता बाजीरावांनी समोरून हल्ला करून शत्रूला धडा शिकवणेच श्रेयस्कर, असे छ. शाहूंना पटवून दिले आणि निजामाची धूळधाण उडवली. मार्च १७२८च्या पालखेडच्या नेत्रोद्दीपक विजयामुळे निजामाला बाजीरावांची विरोधक म्हणून क्षमता व भविष्यात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत, याची पूर्ण जाणीव झाली आणि मराठ्यांचा चौथाईचा हक्क त्याने मान्य केला. निजामासारख्या अनुभवी आणि मुत्सद्दी राजकारण्याविरुद्ध मिळवलेल्या उल्लेखनीय विजयामुळे बाजीरावांच्या कारकिर्दीत पालखेडच्या लढाईचे महत्त्व ऐतिहासिक दर्जाचे आहे.
मार्च १७२९मध्ये मोगल सुभेदार मोहम्मद खान बंगश याच्या तावडीत सापडलेल्या बुंदेलखंडचा राजा छत्रसाल यांच्या आर्जवी विनंती नंतर बाजीरावांनी बंगशला नमवून छत्रसाल यांना पुन्हा राज्यपद मिळवून दिले. या विजयाद्वारे बाजीरावांनी उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. या पुढील अप्रूप वाटण्यासारखी बाब म्हणजे, मोगल-मराठा युद्धसमयीची अशांतता असताना, कोणतीही अप्रिय घटना न घडता संपन्न झालेली, पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई यांची उत्तर भारतातील तीर्थयात्रा (फेब्रुवारी १७३५ ते जून १७३६). मथुरा, वृंदावन, कुरुक्षेत्र, प्रयाग, काशी, गया या पवित्र स्थानांच्या आध्यात्मिक वातावरणाचा आनंद लुटून, बुंदेलखंडमार्गे परतीचा प्रवास करून त्या सुरक्षितपणे पुण्याला परतल्या. या सर्व प्रवासात जयसिंह, बंगश वगैरे सरदारांनी त्यांचे सौहार्दपूर्ण स्वागत करून त्यांच्या सर्व सुखसोयींची जातीने व्यवस्था पाहिली. यावरून बाजीरावांनी उत्तरेत निर्माण केलेल्या धाकाची कल्पना येते. पुढे माळवा प्रांताची सरदेशमुखी/चौथाई देण्यास बादशाहने नकार दिल्यावर बाजीरावांनी थेट दिल्लीला धडक दिली. या अनपेक्षित हल्ल्याचा बादशाहची फौज विरोध करू न शकल्यामुळे बादशाहने तिथून पोबारा केला. बाजीरावांच्या या धक्कादायक हल्ल्यामुळे बादशाह खूप नाराज झाला आणि त्यांच्या आक्रमणापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्याने निजामाला पाचारण केले. परंतु निजाम तिथे पोचण्याअगोदरच डिसेंबर १७३७मध्ये भोपाळ येथे बाजीरावांनी त्याचा पाडाव केला. माळवा प्रांत पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात येऊन भोपाळ हा बाजीरावांच्या कारकिर्दीतील शेवटचा सर्वोच्च विजय ठरला.
हळवा कोपरा
युद्धांत असे देदीप्यमान यश मिळवत असताना बाजीरावांच्या कौटुंबिक आयुष्यात मात्र तणाव वाढलेला होता. मस्तानी नावाच्या, तिच्या काळातील ‘सर्वात मोहक स्त्री’ असा नावलौकिक मिळवलेल्या, मुस्लिम युवतीबद्दलच्या त्यांच्या आकर्षणामुळे नातेवाईकांसकट सर्व समाजात त्यांच्याविषयी अतिशय प्रतिकूल मत तयार झाले होते. मस्तानीला बाजीरावांची ‘प्रेयसी’ मानले गेले असले, तरी विदेशी इतिहासकारांच्या पुस्तकांत आणि आंतरजालावर तिचा उल्लेख ‘बाजीरावांची पत्नी’ असा केलेला आढळतो. यावरून ‘कुटुंबियांना मान्य नसलेले लग्न’ हाही याचा एक पैलू असावा असे वाटते. जानेवारी १७३०मध्ये झालेल्या बाजीरावांचा थोरला मुलगा नानासाहेबाच्या विवाह सोहळ्याच्या नोंदींमध्ये तिच्या नावाचा पहिला अधिकृत उल्लेख कागदपत्रांमध्ये आढळतो. त्याच वर्षी बाजीरावांनी पुण्याला शनिवारवाडा उभारून त्यात मस्तानीच्या नावाने महालही बांधला होता. १७३४ मध्ये तिला समशेर बहादूर नावाचा मुलगाही झाला. ती मनाने निर्मळ, बुद्धिमान, नृत्यसंगीतात पारंगत तसेच तलवार व भाला चालवण्यातही निपुण होती. मोहिमांमध्ये सुद्धा तिचा सहभाग असे. तिच्यात भावनिकदृष्ट्या उत्कटपणे गुंतलेल्या बाजीरावांना तिच्या सहवासात अत्यावश्यक प्रेरणा आणि विसावा जाणवायचा. तिची जीवनसरणी, भाषा, पेहराव हिंदू पद्धतीची होती. ती पत्नीच्या भक्तीभावाने बाजीरावांच्या सुखसोयींची काळजी घेत असे. बाजीरावांचे तिच्याबद्दलचे प्रेम वर्षानुवर्षे दृढ होत गेले आणि या विलक्षण, झपाटलेल्या प्रेमकहाणीने तत्कालीन समाजाला नक्कीच अचंबित केले असणार.
इतिहास हा केवळ राजकारण साधण्यापुरता उपयोगात येत असताना थोरले बाजीराव पेशव्यांचे समाधीस्थळ मराठी माणसांपासून बेदखल राहावे, ही वैषम्याचीच बाब...कालांतराने जनमानसाने बाजीरावांच्या मदिरापान आणि मांसभक्षणासाठी मस्तानीलाच जबाबदार धरले. वर्णाने ब्राह्मण असूनही सैनिकाच्या क्षत्रिय धर्माचे पालन करणाऱ्या बाजीरावांना ब्राह्मण जातीच्या कठोर नियमांचे पालन करणे कठीण होते. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये मुक्तपणे मिसळून, त्यांच्या संगतीत खाणे पिणे करून, त्यांच्यातील एक होऊन सैनिकांना त्वेषाने लढण्यासाठी उद्युक्त करणे त्यांना भाग होते. घरापासून दूर असताना मुक्तपणे मदिरापान, मांसाहार, धूम्रपान करणाऱ्या राजपूत सरदारांशी संपर्क येऊन साहजिकच त्यांच्यातही तसे बदल घडले असावेत. परंतु त्यांच्या या तथाकथित ‘चुकांचे’ मूळ कर्मठ समाजाने समजून न घेताच त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. मस्तानी आणि तिच्या मुलाला सामाजिक मान्यतेसकट उचित सन्मान मिळावा, यासाठी बाजीरावांनी जंगजंग पछाडले, परंतु लौकिकार्थाने रणांगणात न हरलेला हा योद्धा कौटुंबिक आणि सामाजिक युद्धात मात्र सपशेल पराभूत झाला!
अर्थात काळाचा महिमा अगाध असतो आणि आपल्या हयातीत बाजीरावांना जे शक्य झाले नाही, ते आता साधारण तीनशे वर्षांनंतर आंतरजालाच्या युगात साकार झालेले दिसते. समशेर बहादूर यांचा उल्लेख नानासाहेब पेशवे यांचे सावत्र बंधू, माधवराव पेशवे यांचे काका असा वाचून निदान माझ्या दिलाला तरी फारच ‘सुकून’ मिळतो!
छ. शाहू महाराजांचे पाठबळ
१७३९च्या अखेरीस बाजीराव पुण्याहून दूर नासिरजंगच्या विरोधात मोहिमेवर असताना, अचानक नानासाहेब व चिमाजी अप्पा यांनी मस्तानीला ताब्यात घेऊन कोठडीत ठेवले. लगोलग पुण्यात येऊन तिला सोडवणे शक्य नाही, या जाणिवेने बाजीरावांना पराकोटीचे दुःख झाले. अडचणींचे एकमेव कारण असणाऱ्या मस्तानीला मार्गातून दूर केल्यावर सर्व आलबेल होईल, असा सगळ्यांना विश्वास होता. परंतु काहीही अघटित करण्यापासून छ. शाहूंनी सर्वांना परावृत्त केले. त्यांनी लिहिलेल्या पत्रात, ‘बाजीरावांच्या मस्तानीबद्दलच्या भावना त्यांनी खाजगीत जाणून घेतल्या आहेत; त्यामुळे जबरदस्तीने त्या दोघांना वेगळे करण्याच्या प्रस्तावावर त्यांचा तीव्र आक्षेप आहे; ती स्त्री वाईट प्रवृत्तीची नाही; बाजीरावांना स्वतःहून वाटेल तेव्हाच हे थांबलेले श्रेयस्कर, तोपर्यंत बाजीरावांच्या भावनांवर आघात करण्याची त्यांची इच्छा नाही; सर्वांनी बाजीरावाची आज्ञा निष्ठेने पाळावी, ते क्रोधित होतील असे वर्तन करू नये,’ असे बजावले होते.
इकडे, मस्तानीला बंदिवासातून सोडवण्याच्या असमर्थतेमुळे आणि कर्तव्यपूर्ती करत असूनही निकटवर्तीयांनीच केलेल्या भावनिक कोंडीमुळे बाजीराव व्यथित झाले. वैफल्यग्रस्त असतानाच २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदेच्या दक्षिण तीरावर असलेल्या रावेरखेडी येथे उष्माघाताच्या तीव्र तापाने बाजीराव आजारी पडले. आयुष्यातील या पहिल्या आणि शेवटच्या आजारातच त्यांचा आकस्मिक अंत झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी मस्तानीला मिळताच महिन्याभरात ती सुद्धा पुण्यात मरण (आत्महत्येने की धक्क्याने याबाबत संदिग्धता) पावली. बाजीरावांबद्दल आत्यंतिक आदर आणि बंधुप्रेम असलेल्या चिमाजी आप्पा यांचाही १७४० सालीच मृत्यू झाला. अशा खळबळजनक घटनांनंतर काशीबाईंनी मस्तानीचा मुलगा समशेर बहादूर याला युद्धनीतीचे आवश्यक ते सर्व शिक्षण देण्याची व्यवस्था केली. यावरून त्यांची नैतिकता तसेच आपल्या पतीविषयीचा आदर नि श्रद्धा जाणवत राहते.
सर्वसामान्य माणसाला बाजीरावांचा युद्धात कधीही पराभव न पत्करण्याचा नावलौकिक माहीत असतो, परंतु इतिहासकार मात्र त्यांच्या मुत्सद्देगिरीचीसुद्धा वाहवा करतात. आपल्या काळातील भू-राजनीती (geopolitics) अचूकपणे उमजलेल्या बाजीरावांनी औरंगजेबानंतर मोगल साम्राज्य कमकुवत झाल्याचे लक्षात आल्यावर, मोगलांचा प्रदेश काबीज करण्याचा निर्णय घेतला. या आधी मराठ्यांना महाराष्ट्रात गनिमी कावा वापरून मोठ्या सैन्यांचा पराभव करण्यात सह्याद्रीतील डोंगरी किल्ल्यांची मदत झाली होती. परंतु उत्तरेच्या सपाट प्रदेशात त्यांना वेगळ्या रणनीतीची आवश्यकता होती. यासाठी बाजीरावांनी वेगवान घोडदळाची नवी रणनीती विकसित केली. सैन्यासाठी रसद बरोबर नेताना सैन्याचा वेग कमी होतो. त्यामुळे ते सैन्यासोबत फारशी रसद न नेता, जिथे जायचे असेल त्या मार्गावरील शत्रूची ठाणी लुटत किंवा जिथे शक्य असेल तिथे खरेदी करत. घोडदळाच्या वाढलेल्या वेगामुळे बाजीराव शत्रूवर अचानक हल्ला करू शकत होते. तसेच युद्धभूमीच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन ते पाण्याच्या स्त्रोतांकडे जाण्याचे मार्ग रोखून धरत. त्यामुळे खूप मोठे शत्रू सैन्य सुद्धा न लढताच शरणागती पत्करत. पालखेडची लढाई हे त्याचे उत्तम उदाहरण होते. त्यांनी श्वास घ्यायला सुद्धा उसंत मिळणार नाही, इतक्या अविरत गतीने केलेल्या श्रीरंगपट्टनम ते दिल्ली आणि अहमदाबाद ते हैदराबाद अशा चौफेर घोडदौडीमुळे मराठा राज्यात क्रांतिकारक बदल घडून येण्याबरोबर देशभरातील सर्व राजकीय सत्तांचे पुनर्वितरण सुद्धा झाले. त्यांच्या कारकिर्दीत देशातील सत्तेचा केंद्रबिंदू दिल्लीपासून दूर होऊन महाराष्ट्राकडे सरकला. भारताच्या नकाशात मराठी सत्तेच्या अधिपत्याखाली अनेक नवीन केंद्रे अंकित होऊन बाजीराव बृहत् महाराष्ट्राचे निर्माते झाले.
छ. शाहूसुद्धा आपल्या वडील अथवा आजोबांसारखे स्वकेंद्रित, लहानशा, एकभाषीय, एकजातीय राज्याचे लहानसहान राजे न राहता, विस्तृत विस्तार असलेल्या अठरापगड राजकीय सत्तेचे अधिपती झाले. सर रिचर्ड टेम्पल म्हणतात, (Oriental Experience, 1883), बाजीरावांनी अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत भारतीय खंडात मराठ्यांची जरब बसवली. नर्मदेच्या उत्तरेस, देशात शांतता आणि समृद्धी आणण्याचा, धर्म आणि सत्तेला गतवैभव मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. बनारस येथील काशी विश्वेश्वराचे महान तीर्थ पुन्हा बांधण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. सैनिकांसमवेत छावणीत असताना मृत्यू पावलेल्या या लढाऊ पेशव्याला मराठ्यांनी ‘महादेवाचा अवतार’ म्हणून गौरवले, यात नवल ते काय?
इतके नाट्यमय आयुष्य व्यतीत केलेल्या बाजीरावांचे त्यांनी स्वतः उभारलेले, कायमस्वरूपी स्मारक पुण्याला शनिवारवाड्याच्या रूपात अस्तित्त्वात आहे. दुर्दैवाने आता त्याची आजूबाजूची भिंत आणि प्रवेशद्वारच शिल्लक आहे. एकीकडे वर्तमानातील पर्यटकांना पेशव्यांच्या महाराष्ट्रातील वास्तूमध्ये त्यांच्या महिम्याची आठवण करून देणारा उघडाबोडका चौथराच पाहायला मिळतो; तर दुसरीकडे जन्मभूमीपासून दूर, पुण्यापासून साडेपाचशे कि. मी. अंतरावर मध्य प्रदेशातील रावेरखेडीतल्या लहानशा, दगडी छत्रीच्या रूपाने मराठा साम्राज्याच्या अस्मितेचा गौरव केलेला आढळतो. नियतीच्या या अगम्य खेळापुढे आणि या अद्वितीय योद्धयाच्या पावन स्मृतीपुढे आत्यंतिक भक्तीभावाने नतमस्तक होण्यापलीकडे आपल्या हाती मात्र काहीही नसते!
-oOo-
ऋणनिर्देश: वेळोवेळी केलेल्या चर्चाबद्दल श्री. समीर शर्मा, मुंबई यांचे आभार!
डॉ. सरिता विनय भावेलेखिका डॉ. भावे या सूक्ष्मजीवशास्त्रातील पीएच.डी. असून साहित्य, निसर्ग आणि ऐतिहासिक विषयांच्या आस्वादक, अभ्यासक आहेत.
ईमेल:
छायाचित्रे - श्री. विनय भावे, डॉ. सरिता भावे
रावेरखेडीतील रामेश्वर मंदिराची छायाचित्रे डॉ. अस्मिता हवालदार, इंदूर यांच्या सौजन्याने!
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
रविवार, १७ ऑगस्ट, २०२५
रावेरखेडीः स्मृतिस्मारक मराठी अस्मितेच्या गौरवाचे...
संबंधित लेखन
इतिहासाचे पान
ऑगस्ट-२०२५
डॉ. सरिता विनय भावे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा