Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

उत्तुंग दीपमाळेचा झळाळता आयुष्यपट

  • बुक लाउंज

    IRU_IrawatiDinkar

    नरहर कुरुंदकर म्हणून गेले होते, की इरावतीबाईंचे मन त्यांच्या विशिष्ट जीवनक्रमामुळे तीन पातळ्यांवर वावरणारे होते. मनाने सुसंस्कृत असणाऱ्या आणि जीवनात रस घेणाऱ्या या विदुषीला आपण स्त्री आहोत, गृहिणी आहोत याचीही उपजत जाणीव होती. मातृत्वात आपल्या जीवनाची परिपूर्ती आहे याचीही जाणीव होती. म्हणून त्या घरात, संसारात आपल्या प्रिय पतीत, मुलाबाळांत समरस झालेल्या आणि रमलेल्या होत्या. समृद्ध सहजीवनासाठी आवश्यक असलेला समरसता हा त्यांच्या व्यक्तित्वाचा एक उपजत गुणधर्म होता. त्यामुळे त्यांचं किंवा त्यांच्या संदर्भात आलेलं काहीही वाचायचं याची खूणगाठ माझ्या मनाशी पक्की होती. लग्नानंतर कर्वेच्या घराचं मोठेपण लाभलेल्या इरावतीबाई म्हणतातः केवढे माझे भाग्य, की मी अशा माणसाची सून झाले! त्याही पेक्षा केवढे महत्तर माझे भाग्य, की मी अशा माणसाची बायको झाले नाही!

    हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण मला मात्र या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील ‘निसर्गायन’चे दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी आठवले. निसर्गाच्या सान्निध्यातलं अतिशय संयमित आणि कठोर जगणं बघून दिलीपजींची आई म्हणते, तू माझा मुलगा आहेस हे थोरच आहे. पण मी तुझी बायको नाही, याचा मला अधिक आनंद आहे... असो.

    रम्य गाठोडं संचिताचं...

    अलीकडेच माधव गाडगीळ यांच्या ‘सह्याचला आणि मी : एक प्रेमकहाणी’ या पुस्तकात देखील इरावतीबाईंचा खूपच आत्मीयतेनं केलेला उल्लेख वाचायला मिळाला होता. माधवरावांना सुरूवातीच्या काळातच इरुकाकूंचा समृद्ध सहवास लाभल्यामुळे त्यांची पुढची दिशा सुस्पष्ट झाली. त्या उत्खननाच्या कामाला गेल्या की, केव्हा परत येताहेत याची ही सर्वजण मोठ्या उत्कंठेने वाट बघायचे. कारण आल्या-आल्या इरुकाकू आपल्या पोतडीतून गारगोटीची पाती, हाडांच्या सुया अशा खूप गमती-जमती काढून दाखवायच्या, अश्मयुगातील मानव जगायचा तरी कसा, याच्या गोष्टी सांगायच्या. त्याच काळात निसर्गरम्य कोडागु जिल्ह्यातल्या मडिकेरीत मानववंशशास्त्रीय संशोधनासाठी जाताना त्यांनी माधवलाही नेल्याने या महिन्याभरात खूप काही नवे शिकायला मिळाले याची, स्वतः माधवराव खूप प्रेमानं नोंद घेतात, तेव्हा मला मात्र थोरोच आठवत राहिला. कारण वाल्डेनच्या तळ्याकाठी अनुभवलेल्या निसर्गातल्या चमत्कारिक गोष्टी ऐकायला थोरोच्या शेजारीपाजारी राहणारी लहान मुले-माणसे उत्कंठतेनं त्याचीही अशीच कमालीच्या उत्कंठतेनं वाट बघायची.

    कथाकार अरविंद गोखले यांना एक कथा लिहिताना नायिकेचे नावच सुचेना. ही प्रसिद्ध कथा म्हणजे, अविधवा. यावरच नंतर ‘माझं घर माझी माणसं’ हा चित्रपट निर्माण झाला. तर अरविंद गोखले कथेच्या तंद्रीत घराच्या पडवीत येरझारा घालत असताना अचानक समोरून एक तरूणी काष्टी साडीत सायकलवरून जाताना दिसली. त्या काळातली ज्या तरूणीची पुण्यात बंडखोर म्हणून ओळख प्रस्थापित झालेली होती. ती दुसरी तिसरी कुणी नसून इरावतीच होती, त्याच क्षणी गोखलेंना कथेतील नायिकेचे इरावती हे नाव सापडले आणि संपूर्ण कथेतील व्यक्तिमत्त्वच झळाळून उठले. इरावतीबाई म्हणजे, त्या काळात १९५२ सालात, लॅम्ब्रिटा स्कूटर चालवणाऱ्या विद्याधर पुंडलिकांच्या शब्दांत सांगायचे तर पुण्यातील पहिल्या ‘रोमन महिला’. यावर स्कूटर विकणारे दिनकररावांकडे तक्रार करायचे की मॅडममुळे ही स्कूटर लेडीज असल्याची सार्वत्रिक भावना झाल्यानं आमचा धंदा मार खातोय. पुरुष मंडळी स्कूटर विकतच घेत नाहीत आणि दुसरीकडे पुण्यात बायका वाहन चालवत नाहीत.

    लोभस माणूसपण

    खरंतर ‘दीपमाळ’ पुस्तकाची अनेक ठिकाणी अनेक विद्वजनांनी आपापल्या तन्हेनं ओळख करून दिली आहे. अनेकांनी त्यांची विद्वत्ता, हुशारी, शैक्षणिक कर्तृत्व याबद्दल भरभरून लिहिलंय, पण मला त्यांच्या आत दडलेले माणूसपण खुणावत राहिलं. या निमित्ताने इरावती कर्वे ही व्यक्तिरेखा जी आमच्या पिढीने निव्वळ वाचनातूनच अनुभवलेली आहे तिचा धांडोळा घ्यावासा वाटला, त्याचाच हा अल्पसा लेखा-जोखा.

    या पुस्तकात तसा बऱ्यापैकी बाईंचा लेखन प्रवास उलगडत जातो. प्रतिभा कणेकर या लेखिकेने अनेक संदर्भ तपासत बाईंचं विदुषीपण या पुस्तकात अधोरेखित केलं आहे. वेदवाङ्मय, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी आणि प्रमुख पाश्चात्त्य तत्त्वज्ञ यांचा वैचारिक गाभा त्यांना माहीत होता. ललित सौंदर्य, सामाजिक आणि सांस्कृतिक आशय आणि मूल्यविचार या तिन्ही पातळ्यांवरून त्यांचा महाभारत, रामायणाचा व्यासंग होता. महाभारताच्या भव्य आणि शाश्वत अशा ललित आणि विचार सौंदर्याचे क्षितिज त्यांच्या ‘युगांत’मुळे विस्तारत गेल्यासारखे वाटते. तथापि या सर्वात त्यांना प्रेम होते, ते मात्र स्वतःच्या समाजशास्त्र आणि मानवशास्त्र या विषयांवर. केवळ अखंड बौद्धिक निष्ठा आणि अपार कुतूहल, जिज्ञासा असल्याने त्या अखेरपर्यंत लेखन आणि संशोधन करू शकल्या. याच प्रचंड बौद्धिक आकांक्षेपायी सत्ता आणि प्रभुत्व गाजवण्याचे ताणही त्यांनी सहन केल्याची नोंद आहे. त्या जितक्या स्वतंत्र बाण्याच्या होत्या तितक्याच वत्सलही होत्या. पराकोटीचा राग आणि पराकोटीचे प्रेम त्यांच्या जवळच्या लोकांनी अनुभवले आहे. विठोबाबद्दल असलेल्या आत्मीयतेनं लोक त्यांची चेष्टाही करायचे, पण बाईंचा याबाबत साधा सरळ विचार होता की महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथे तुकाराम, ज्ञानेश्वर यांचेदेखील माथे टेकले, तिथे मी कोण बापडी. त्या अपार वत्सलतेनं, डबडबत्या डोळ्यांनी म्हणाल्या आहेत, की ज्ञानेश्वरांनी घेतलेल्या समाधीसारखी मनाला खोलवर जखम करणारी जगात दुसरी कुठलीही घटना नसेल.

    अभंग नि टवटवीत मन

    विठ्ठलराव घाटे यांनी बाईंबद्दल अशी नोंद केली आहे की कोंबडीसारखा कोणा ना कोणावर तरी पाखर घालण्याचा त्यांना हव्यासच होता. स्त्रीसुलभ ऋजुतेच्या, पुरुषामुळे स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या अपरिहार्य दुःखामुळे आलेल्या खोल शहाणपणाच्या त्यांच्या सौंदर्य जाणिवांना, कधी वेडेवाकडे विद्रूप तडे गेले नाहीत. उलट वाढत्या वयाबरोबर त्यांचे स्त्री-मन अभंग अन् अधिकाधिक टवटवीत राहिले. ‘कुंती’, ‘गांधारी’, ‘द्रौपदी’, ‘आजोबा’ या सर्वांची व्यक्तिचित्रे रंगवताना बाईंनी अस्तित्वाचा हाच आदि सूर धरला आहे- स्त्रीला कोणातरी पुरुषामुळे फार अटळपणे सोसावे लागणारे दुःख! पुरुषाच्या कणखर अस्तित्वाच्या अभावी घराला आलेले मलूल सुनेपण, उत्खननात सापडलेल्या स्त्रीचा सांगाडा पाहून सनातन स्त्रीच्या सखीपणाचा (हा संदर्भ वाचताना मलाही माझ्या सखीचा नव्याने साक्षात्कार होत गेला.) होत गेलेला साक्षात्कार, गल्लीतल्या वर्षानुवर्षाच्या भाजीवालीचा अबोल ओळखीचा वाटणारा आधार – ‘परिपूर्ती’ आणि ‘भोवरा’ यामध्ये आलेल्या बाईंच्या भावविश्वातील असल्या ‘थीम्स’मध्ये या शहाण्या जाणिवा व्यक्त झालेल्या आहेत. मिलिंद बोकील म्हणतात की, भारतीय समाजाला गोधडी म्हणणे हीच इरावतीबाईंची मुख्य देणगी आहे. कारण, इथे जे निरनिराळे गट आहेत त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध हा गोधडीसारखाच आहे. या सगळ्या विद्याधर पुंडलिकांपासून अनेकांनी केलेल्या नोंदींचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना पदोपदी येत जातो. आमच्यावरचा बाईंचा प्रभाव निव्वळ त्यांच्या तांत्रिक पुस्तकांचा नसून, या अशा ललित लेखनाचाही आहे. या सगळ्या वाचनात एक गोष्ट ठळकपणे जाणवते. ती म्हणजे, दिवा जसा उजळला की मी अंधार दूर केला, याची शेखी कधीच मिरवत नाही. तद्वतच बाईंचा प्रवास होता. भोवताल आपल्या ज्ञानाच्या उजेडात उजळवून टाकताना सहवासात आलेल्या सर्वांनाच मोठं करून टाकणारं हे व्यक्तिमत्व निव्वळ या पुस्तकापुरतं मर्यादित नाही, यानिमित्ताने त्यांच्या सगळ्याच पुस्तकांचा आस्वाद घेतला जावा हीच अपेक्षा आहे.

    म्हणजे, हे पुस्तक वाचता वाचता इरावतीबाई जशा उलगडत जातात ते, अनुभवताना फरहात शेहजादचा शेर समोर आला.

    एक बस तू ही नहीं मुझ से ख़फ़ा हो बैठा
    मैंने जो संग तराशा था ख़ुदा हो बेठा

    त्यांनी स्वतःच्या संशोधनात अनेक शिखरे पादाक्रांत केलीच, पण भोवताली असलेल्या, सोबत काम करणाऱ्या लोकांनाही एका उंचीवर नेऊन ठेवले, तिथवर येण्यासाठी लागणारी हरएक मदत केली. इरावतीबाईंनी विठ्ठल हा सखा, सोबती आणि अगदी आधुनिक परिभाषेत बोलायचं झालं तर ‘बॉयफ्रेंड’च असा लेख लिहिला. तो त्या काळातील प्रसिद्ध आणि दर्जेदार अशा अभिरूचीत छापूनही आला. त्यांच्या या विठ्ठलवेडाविषयी स्वतः पु. ल. देशपांडे यांनी देखील लिहिलंय की, पंढरीचा अबीर-बुक्का वाटावा तसा ‘वारी’ हा लेख वारीचा प्रसाद म्हणूनच समजला पाहिजे. मला मात्र प्रा. सरोजिनी बाबर यांनी गोळा केलेल्या लोकसाहित्यातील अभंग आठवला...

    रूकमिनी विचारती देवा जनीचं काय नातं?
    विठ्ठल सांगितो, पाखरू वस्तीला आलं हुतं!

    याच लोकसाहित्याची चर्चा करायला प्रा. सरोजिनी बाबर आल्या असताना त्यांना माझ्या बॉय फ्रेंडला भेटलात की नाही असंही इरावतीबाई विचारतात, तेव्हा प्रोफेसर चमकल्या, मग हळूच मिश्किल हसत आपल्या बॉयफ्रेंडचं गुपित त्यांना सांगितलं.

    डौलदार आणि नेटकी जीवनशैली

    प्रा. सरोजिनी बाबर आणि इरावतीबाईंचा अपार स्नेह होता. सरोजिनीबाईंच्या मधल्या बहिणीच्या लग्नासाठी इरावतीबाई संपूर्ण पारंपरिक वेशभूषेत आल्याची आठवणही त्या सांगतात. ‘युगांत’ला मिळालेल्या साहित्य अकादमीचा पुरस्कार स्वीकारायला इरावतीबाई दिल्लीला जायला निघाल्या तेव्हा, अचानक विमानात त्यांना सरोजिनी बाबर भेटल्या. त्याबाबतची एक स्नेहाळ आठवण त्यांनी सांगितली आहे. दोघींच्या अनेक विषयांवर गप्पा वगैरे झाल्या. उतरण्याच्या वेळी इरावतीबाई म्हणाल्या, मला घ्यायला गाडी येणार आहे, मी तुम्हाला तुमच्या निवासस्थानी सोडून जाईन. इरावतीबाईंची छोटीशी बॅग त्यांच्या पायाशीच होती. सरोजिनी बाबरांची बॅग सामानात मागे ठेवलेली आहे, हे समजल्यावर त्या इतकंच म्हणाल्या, ‘आपलं सामान नेहमी आपल्यापाशी हवं.’ विमानातून उतरल्यावर त्या सरोजिनी बाबरांची बॅग येईपर्यंत थांबल्यादेखील. नंतरच्या आठवड्यात त्या पुण्यात यायच्या होत्या, इरावतीबाईंना ते माहीत होते. एक दिवस सकाळीच दिनकरराव हातात एक लहानशी सुंदर बॅग घेऊन सरोजिनी बाबरांकडे गेले. फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल असे अचानक दारात पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सरोजिनी बाबरांना बॅग देऊन दिनकरराव म्हणाले, इरूनं पाठवलीय. तुम्हाला निरोप द्यायला सांगितलाय की, प्रवासात नेहमी आटोपशीर असावं! हा असा त्यांचा नेमकेपणा, त्यांची विद्वत्ता, नीटनेटकेपणा त्यांच्या समग्र जगण्यातून आणि लिखाणातून नेहमीच प्रतीत होताना दिसतो. इरावतीबाईंना हे नेहमी वाटायचं की लेखनाच्या सृजनकाळात जे कष्ट लेखक उपसतो, त्याच्या काही प्रमाणात तरी कष्ट, ते समजून घेण्यासाठी वाचकांनी उपसायला हवेत. लेखक लेखन करताना आपलं आयुष्यच पणाला लावत असतो. विष्णू नागरसारखा लेखक म्हणतो, की लेखनातून व्यक्त होण्याची वाट सापडली आणि मी आत्महत्येपासून दूर गेलो, या टोकाला जाऊन केलेलं लिखाण काळजाचा वेध घेतच. म्हणजे १०० वर्षे सुरू असलेल्या ‘नेचर’ मासिकात आलेल्या लेखाने जगभरातील जाणत्या लोकांनी त्यांची दखल घेतली. तोपर्यंत इरावतीबाईंचे अनेक लेख पुस्तके वगैरे मराठीत प्रकाशित होऊनही म्हणावं, तशी मराठी भाषकांनी त्यांची कदर केलीच नाही. तेव्हा त्या उद्वेगाने दिनूला म्हणतात, की अजून किती व्यासंग आणि लेखन करायचं रे! त्यामुळे नकळत एक तुसडेपणा त्यांच्यात मुरत गेला. यातून दुसऱ्याला तुच्छ लेखणं, तोडून बोलणं असेही बाईंकडून कधीमधी घडत गेले.

    मूल्यनिष्ठ आणि परखड

    संशोधनपर सर्वेक्षणासाठी त्या सतत प्रवास करायच्या पण त्यांना रेल्वेचा तिसऱ्या दर्जाचा प्रवास अधिक आवडायचा, कारण या प्रवासात लोकं मोकळी ढाकळी होऊन बोलायची, त्यांच्या प्रबंधाचे विषय नकळत पक्के होत जायचे. त्यांचं ‘हिंदू सोसायटी’ हे पुस्तकच मुळी मुंबई-पुणे रेल्वेच्या प्रवासात तयार झाल्याची नोंद आहे. एकदा पुण्यातील काही उच्चभ्रू मंडळी गांधींना मारायला हवे, अशी चर्चा करत असताना इरावतीबाई तिचं समर्थन करताना दिसतात तेव्हा दुर्गाबाई त्यांना खडसावतात, की असं तुम्ही विचारवंतच जर म्हणायला लागलात आणि हे कुणा अविचारी माणसानं ऐकून त्यावर अमल केला, तर अराजकता माजेल.

    Irawati
    स्वत्वाची जाणीव असलेल्या इरावतीबाईंच्या व्यक्तिमत्वात संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता यांचा अनोखा संगम होता. विद्याधर पुंडलिकांसारखे लेखक त्यांचा उल्लेख स्कूटर चालवणारी पुण्यातली ‘रोमन महिला’ असा करीत आणि स्कूटर लेडिज प्रकार आहे, असा समज पसरल्याने आमचा धंदा मार खातोय, असे लटकी तक्रार विक्रेते करीत...

    दुर्गाबाई आणि यांचा वाद तर जगजाहीर होता. तथाकथित प्रज्ञावंत माणसं मात्र इरावतीबाईंना झुकतं माप देताना दिसतात, यामागे त्यांचं त्या काळात परदेशी जाऊन येणं, जगभरातील या क्षेत्रातील विद्वानांनी त्यांची दखल घेणं, अशा अनेक कारणांचा समावेश आहे, पण त्यांचं म्हणणं की ‘नंद्या कर्व्याची आई’ हे शब्द ऐकताच एक प्रकारची हुरहूर खोलवर जाणवते. (हा नंद्या म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. नंदू कर्वे एकदा कुठल्या तरी वैज्ञानिक परिसंवादात सामील झाले होते, निघताना एकाने स्वतःच्या गाडीतून सोडतो म्हणाले. तर हे म्हणाले, नको माझी स्वतःची गाडी आहे. सहकारी भांबावून इथे तिथे बघत राहिला, पण गाडी कुठे दिसेना तेव्हा यांनी आपल्या सायकलीकडे बोट दाखवून म्हणाले हीच माझी गाडी, एवढा मोठा शास्त्रज्ञ पण जराही बडेजाव नाही, हा आईचाच साधेपणाचा संस्कार!)

    तर दुर्गाबाई आणि इरावतीबाई यांच्यामधला दुस्वास कदाचित आई होणं आणि न होणं याही कारणाभोवती घुटमळताना मला मात्र जाणवतो. म्हणजे, इतका पराकोटीचा दुस्वास की इरावतीबाई गेल्यानंतर मौजेच्या श्री.पु. भागवतांनी दुर्गाबाईंना लेख मागितला. यांनी फारच कडक लिहिला. श्रीपु म्हणाले, अहो, आता त्या वारल्या आहेत इतका तीव्र स्वर नका लावू, लेख जरा मवाळ करून द्या की. तर दुर्गाबाई म्हणतात, त्या माझ्या अगोदर गेल्या तर मी काय करू?

    सम्यक दृष्टीची देणगी

    पण याच इरावतीबाईंनी गांधीहत्या झाल्यानंतर ब्राह्मणां-विरोधात उफाळून आलेल्या हिंसक प्रतिक्रियांचं केलेलं विश्लेषण अधिक सम्यक होतं. त्या म्हणतात, शिवाजीराजांच्या काळापर्यंत सत्ता क्षत्रियांच्या हाती आणि शिक्षण व संस्कृतिरक्षण ब्राह्मणांच्या हाती अशी विभागणी राहिली. नंतरच्या काळात, राजा क्षत्रिय राहिला तरी सत्ता ब्राह्मणांच्या हाती आली व त्यांनी ब्राह्मण वर्गाचेच पोषण केले. इंग्रजी राज्य आल्यानंतर काही काळ ब्राह्मण व क्षत्रिय सत्ताहीन व निष्प्रभ झाले. मात्र मुळातच विद्यार्जन करणारा ब्राह्मण वर्ग इंग्रजी शिकून मामलेदार, सबजज्ज, कारकून, शाळामास्तर असा सरकारी नोकर झाला. पूर्वीच्या समाजव्यवस्थेत सर्व जाती परस्परावलंबी होत्या. नव्या व्यवस्थेत, सरकारी नोकर म्हणून काम करणाऱ्या ब्राह्मण वर्गाला इतर वर्गाशी मिळून मिसळून वागण्याची गरज उरली नाही. याच वर्गातून लोक पुढारी झाले, ते स्वातंत्र्य चळवळीतदेखील अग्रेसर झाले. बाई म्हणतात की, स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची स्थिती ब्रह्मासारखी झाली. तेव्हा बाकीच्यांच्या मनात विशेषच चीड निर्माण झाली. प्रत्येक ब्राह्मण पोटजातींची मंडळे तयार झाली आणि ती एकमेकांच्या आधाराने स्वतःच मोठी होत गेली. यातून निर्माण झालेला द्वेष गांधी हत्येच्या निमित्ताने उफाळून आला आणि ब्राह्मणांच्या घरादाराची राखरांगोळी होण्यास कारणीभूत ठरला. इतकं परखड विवेचन तोपर्यंत कुणीच केलेलं नव्हतं.

    कणखर नि धीरोदात्त

    आज आपण हतबल होऊन महाराष्ट्रात भाषेबद्दल जे अराजक माजलंय, ते बघून निव्वळ अस्वस्थ होतोय, इरावतीबाईंनी त्याही काळात इतक्याच रोखठोकपणे भाषेबद्दल मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणतात प्रत्येक प्रांताच्या भाषेतच सुरूवातीपासून उच्चतम शिक्षण व्हायला हवे. काही झाले तरी भाषिक आक्रमणाला उत्तेजन देऊ नये, ते आत्मघाताचे लक्षण आहे. त्यांचा हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता द्यायला विरोध होता. त्या स्पष्टपणे सांगतात की हिंदी नको म्हणणे म्हणजे राजद्रोह नव्हे. आजच्या काळात इरावतीबाईंसारख्या कणखर आणि प्रखर विदुषीला समाजाने सहन केलं असतं, का हा मला या विवेचनादरम्यान पडलेला प्रश्न भोवताली माजलेल्या अराजकामुळे मनातच विरून गेला.

    त्यांच्या दिसण्यावर बरीच चर्चा आणि हेटाळणी त्यांनी आयुष्यभर सहन केली आहे. त्या तशा दिसायला उंच आणि सडसडीत यावरून सासुबाई बायो त्यांना हिणवायच्या, नुसतीच उंच दीपमाळ म्हणायच्या. पण काळाच्या ओघात त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला असे काही घडवले, की त्यांचं दीपमाळ हे दूषणच भूषण ठरले. सहसा बाईमाणूस असत नाही इतक्या त्या उंच आणि थोराड बांध्याच्या असल्या, तरीही त्यांचा वर्ण मात्र केतकी होता. विद्याधर पुंडलिकांनी बाईंची शेवटची आठवण लिहून ठेवली आहे. ते म्हणतात, त्यांना पाहिल्यावर मला जाणवले की, मरणाचा अचानक पडलेला घाव त्यांच्या सौंदर्याने शांतपणाने झेलला आहे. डोळे मिटले होते, पण वर्ण तसाच लखलखीत होता. अहेवपणी गेल्या म्हणून कुणीतरी ठसठशीत, अधेलीएवढे कुंकू लावले होते. तेही खुलून दिसत होते. अस्तित्व गेल्याची पुसटशी खूणसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. मरणही शांत अन् सुंदर आहे असे वाटून माझ्या मनाला त्या वेळीही जरा बरे वाटले होते...

    खरंतर असं कुणाच्या मरणानं कुणी सुखावत नसतं पण त्यांची भावना अपार मायेची होती. एखादं आपलं जीवाभावाचं, ज्यावर आपला जीव जडलेला आहे, ज्याच्याबद्दल आत्मीयता आहे, ते माणूस असं हळूहळू डोळ्यासमोर अस्तंगत होत जाताना बघवत नाही. त्याक्षणी अखेरच्या दिवशी दिनूने देखील इरावतीबाईंचा श्वास जाणवेना म्हणून नाकाजवळ बोटे नेली, निदान श्वास तरी जाणवतोय का बघायला. तर तशा अवस्थेतही मिश्किल इरावतीबाई म्हणतात, “नाही रे दिनू, अजून वेळ आहे रे” हे भन्नाट आहे. स्वतःचा मृत्यू देखील इतक्या आकर्षकपणे त्यालाच स्वीकारता येतो, ज्यांनी आपलं आयुष्य समरसून जगलेलं असतं.

    -oOo-


    GaneshK
    गणेश मनोहर कुलकर्णी

    गणेश मनोहर कुलकर्णी प्रसिद्ध ललितलेखक, कला आस्वादक आहेत. त्यांच्या ‘रूळानुबंध’ या लेख संग्रहाला अलीकडेच राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
    ईमेल:



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा