Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा जोखताना...

  • ग्रंथ दालन

    Paaulkhuna_PramodM
    लेखक, अनुवादक आणि कार्यकर्ते प्रमोद मुजुमदार

    ‘दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ या पुस्तकातील माहितीसाठीचा आधार ‘गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ इंडिया’ हा अक्षय मुकुल यांचा संशोधित ग्रंथ असल्याची नोंद देऊन लेखक प्रमोद मुजुमदार म्हणतात, ‘हे पुस्तक म्हणजे मूळ पुस्तकाचा अनुवाद नाही किंवा त्याचे संक्षिप्तीकरण नाही. तर मूळ ग्रंथाचा आधार घेऊन केलेली स्वतंत्र मांडणी आहे.’ पुस्तकाच्या अखेरीस संदर्भ ग्रंथांच्या यादीत अक्षय मुकुलांच्या पुस्तकाबरोबरच अन्य पुस्तकांचीही यादी आपल्याला आढळते.

    मुजुमदारांनी आपल्या पुस्तकाची रचना पाच भागांत केली आहे. पहिला, स्वातंत्र्यपूर्व भारत गीता प्रेसची रुजुवात; दुसरा, गीता प्रेस आणि कल्याण मासिकाची वाटचाल; तिसरा, हिंदुत्व तत्त्वज्ञान : एक वैचारिक कसरत; चौथा, हिंदुत्वाची राजकीय चढाई आणि पाचवा, ‘दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ - अन्वयार्थ. या सगळ्या भागांतील मुद्द्यांची सविस्तर नोंद देणे, हा या लेखाचा हेतू नाही. मूळ पुस्तक वाचायला वाचकांनी प्रवृत्त व्हावे, यादृष्टीने काही मोजक्याच मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

    धर्मसंस्था आणि भांडवलदार वर्गाची आघाडी

    इंग्रजी अमलाखालील बदलत्या अर्थव्यवस्थेत १८८०-९० पासून मारवाडी समाजाने व्यापार आणि उद्योगात कळीचे स्थान मिळविले. (आज अग्रणी असलेली औद्योगिक घराणी याच मारवाडी समाजातील आहेत.) तत्पूर्वी ‘ब्राम्हण-क्षत्रिय’ आघाडीकडे असलेल्या हिंदू धर्माच्या प्रतिनिधित्वात आणि नियंत्रणात मारवाडी समाजाचा शिरकाव झाला. व्यापार-उदिमासाठी देशभर विखुरलेल्या मारवाडी समाजाचे संघटन आणि त्याच्या सामाजिक स्तराचा-आध्यात्मिक मान्यतेचा मूलाधार असलेल्या सनातन हिंदू मूल्यव्यवस्थेच्या संवर्धनाची आग्रही भूमिका तो घेऊ लागला. त्यासाठीची आर्थिक संसाधने उभारणे त्याच्या आर्थिक संपन्नतेमुळे सोपे झाले. हिंदुत्वाच्या प्रसारासाठी विविध प्रकाशने त्याने सुरू केली. हिंदुत्वाच्या चिकाटीच्या प्रचार-प्रसाराचे नेतृत्त्व आता ‘ब्राम्हण बनिया' आघाडीकडे आले. हा क्रम या पुस्तकात तपशीलवार आला आहे.

    BlowingConch
    भूतकाळाचे भांडवल करून आक्रमक हिंदुत्वाची पायाभरणी करण्यात गीता प्रेसचा मोठा वाटा राहिला आहे. त्याची प्रचिती वर्तमानातल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असलेल्या कार्यपद्धतीमुळे येताना दिसतेय...

    याच मारवाडी समाजातील एका व्यापारी कुटुंबातील कार्यकर्ते व आध्यात्मिक विचारवंत हनुमानप्रसाद पोद्दार यांनी जयदयाल गोयंका तसेच अन्य सहकाऱ्यांसह १९२३ साली ‘गीता प्रेस’ ही प्रकाशन संस्था काढली. त्याद्वारे हिंदू धर्मविषयक विविध साहित्य प्रकाशित होऊ लागले. पुढे १९२६ साली गीता प्रेसमधूनच त्यांनी ‘कल्याण’ मासिक सुरू केले. हे सर्व साहित्य सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी त्याचे दर स्वस्त राहतील ही दक्षता घेतली गेली. हनुमानप्रसादांनी कल्याण मासिकासाठी तसेच गीता प्रेसच्या विविध प्रकाशनांसाठी आयुष्य वेचले. त्यांची जोपासना आणि प्रचंड विस्तार केला. हिंदुराष्ट्राच्या मोहिमेसाठी प्रचंड जिद्दीने तथापि अत्यंत लवचिकतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि संसाधनांची त्यांना कधीच वानवा पडली नाही. लेखकाने एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भारतात हिंदू राष्ट्र तयार व्हावे, हा केवळ संघपरिवाराचाच नाही, तर देशातील पारंपरिक प्रस्थापित उद्योगपतींचाही प्रकल्प असल्याने आर्थिक संसाधनांची मुबलकता हिंदुराष्ट्राच्या मिशनला कायम राहिली. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत जमिनदारीविरोध, सामान्य शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय, समाजवाद, सामाजिक समता यांचे वाजणारे पडघम संसाधनांची परंपरागत मालकी आणि सामाजिक उतरंडीत वरचे स्थान असलेल्यांना अस्वस्थ करणारे होतेच. त्यांचे हे स्थान आणि संसाधनांची मालकी धोक्यात येणार हे त्यांना दिसत होते. या धगीपासून वाचण्यासाठीचे प्रभावी साधन म्हणून गीता प्रेस, कल्याण मासिक आणि एकूणच पुराणमतवादी हिंदुत्व प्रचारणाऱ्या संघटनांना त्यांनी जोरदार साथ दिली. हे सहाय्य आणि त्याही आधी हनुमानप्रसादांची चिकाटी व कष्ट यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही गीता प्रेस आणि कल्याण मासिकाचा कारभार सांभाळणारी नवी नेतृत्वं उभी राहत गेली. अलीकडेच गीता प्रेसने शंभरी पार केली. कल्याण मासिक पुढच्या वर्षी शंभर वर्षांचे होईल.

    लेखक म्हणतात, ‘आज मागे वळून पाहिले तर गीता प्रेस आणि कल्याण मासिकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, हिंदी भाषा शुद्धीकरणाची चळवळ, गोरक्षा समिती इथपासून पुढे इंटरनॅशनल कृष्णा कॉन्शस (इस्कॉन) अशा सर्व हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना, संस्था, प्रसार मोहिमा यांना एकत्र बांधण्याचे काम केल्याचे दिसते. सन २०१४ पर्यंत कल्याण मासिकाचे दोन लाख वर्गणीदार आणि इंग्रजी कल्याण मासिकाचे एक लाख वर्गणीदार होते. तर ७ कोटी २० लाख गीता प्रती त्यांनी वितरित केल्या. पुराणे आणि उपनिषदांच्या एक कोटी नव्वद लाख प्रती आणि ७ कोटी तुलसीरामायणाच्या प्रती वितरित केल्या गेल्या.’

    लोकशाही मूल्यव्यवस्थेविरोधातले प्रकल्प

    भारतासारख्या अर्धशिक्षित, अशिक्षित देशात झालेला हा साहित्याचा प्रसार लेखकाने म्हटल्याप्रमाणे खरोखरच ‘अचंबित’ करणारा आहे. देशाच्या केंद्रस्थानी हिंदुत्ववाद्यांची निरंकुश सत्ता मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ साली स्थापन झाली. पण त्याच्या पायाभरणीचा हिंदुत्वाचा प्रकल्प शतकभर सुरू होता. आधुनिक मूल्यांचा जागर करणारी सामाजिक सुधारणांची चळवळ आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ यांचा दबदबा आणि देशव्यापी प्रभाव असतानाही गीता प्रेस व कल्याण मासिकाचे हिंदुत्वाचे अग्निहोत्र अखंड सुरू होते. सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्याची चळवळ यातील मूल्यांचे वारसदार विघटित व दुबळे होईपर्यंत हिंदुत्ववादी मंडळी केवळ दबा धरून नव्हती वा वळचणीला बसली नव्हती; ती अखंड सक्रिय होती. ती कायम हिंदुराष्ट्रासाठीच्या युद्धाच्या पवित्र्यात होती. युद्धतंत्रे म्हणून विविध डावपेच टाकत होती. स्वातंत्र्य चळवळीतील सौम्य हिंदुत्ववाद्यांना हाताशी धरत होती. मोठ्या कौशल्याने आपल्या कामाला काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांच्या शुभेच्छा मिळवत होती. कल्याण मासिकात त्यांना लिहायला लावत होती. स्वतंत्रपणे काम करत असल्या तरी हिंदुत्ववादी संघटना परस्परांना कायम पूरक आणि मदतनीस राहिल्या आहेत. हेडगेवारांच्या काळात संघात आलेल्या गोळवलकरांना गीता प्रेस आणि हनुमानप्रसाद यांना काही काळ सहाय्य करायला संघाने गोरखपूरला पाठवले. कल्याण मासिकात त्यांनी लिहिलेल्या लेखांमुळे उत्तरेत अनेक नवे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मिळाले. गोळवलकर पुढे संघाचे दुसरे सरसंघचालक झाले. या सर्व मंडळींकरवी समाजमन पोखरण्याचे, आधुनिक लोकशाही, समतेवर आधारित मूल्ये समाजमनातून निरस्त करण्याचे मिशन अहर्निश सुरू होते.

    चातुर्वर्ण्यकेंद्री दृष्टिकोन आणि प्रतिगामित्वाचा पुरस्कार

    गीता प्रेस व कल्याण मासिक काय प्रचारत होते, हनुमानप्रसाद वा त्यांच्या वर्तुळातील लेखक काय म्हणत होते ते दलित आणि स्त्रियांच्या संदर्भात थोडे समजून घेऊ. बाकी मुद्द्यांसाठी वाचकांनी मूळ पुस्तकच पाहावे.

    गीता प्रेसचे अध्वर्यू हनुमानप्रसाद हे सामाजिक समतेच्या पूर्ण विरोधात होते. अस्पृश्यतेचे ठाम समर्थक होते. ‘अस्पृश्यता पाळणे म्हणजे कोणाचाही अपमान करणे नाही. ती आमची धार्मिक रीत आहे’, ‘अस्पृश्यतेची प्रथा ही पूर्णपणे वैज्ञानिक असून त्याला धर्मशास्त्राचा आधार आहे’ अशी काही त्यांची वचने लेखकाने नोंदली आहेत. ‘गांधीजींनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा आग्रह धरणे, हा सनातन हिंदूंच्या धर्माचरणाच्या हक्कावर हल्ला आहे’ अशी स्पष्ट भूमिका हनुमानप्रसादांनी घेतल्याचेही लेखकाने नमूद केले आहे. चातुर्वर्व्याधारित सनातन धर्म ही कल्याण मासिकाचीही भूमिका होती. लेखकाने हनुमानप्रसादांनी गांधीजींना लिहिलेल्या एका पत्राची नोंद केली आहे. त्या पत्रात हनुमानप्रसाद गांधीजींना लिहितात, ‘तुमच्या उपोषणामुळे अस्पृश्यांच्या आंदोलनाला बळ मिळाले, अनेकांनी दलितांबरोबर सहभोजनाचे कार्यक्रम सुरु केले आहेत. तर अनेक मंदिरांनी अस्पृश्यांसाठी प्रवेश खुला केला आहे. अस्पृश्यांबरोबर सहभोजन आणि अस्पृश्यांना मंदिर प्रवेश हा हिंदू धर्मावरील मोठा हल्ला आहे. याचा काय दुष्परिणाम होईल हे त्या देवालाच ठाऊक!’ याही पुढे जाऊन पोद्दार अत्यंत कर्मठ आणि अमानुष भूमिका मांडतात. ‘अस्पृश्य जोवर अंघोळ करत नाहीत, स्वच्छ कपडे घालत नाहीत, दारु सोडत नाहीत, मृत जनावराचे मांस खाणे सोडत नाहीत, तोवर तुमच्या या ‘सहभोजनाला’ काहीही अर्थ नाही.’

    JaydayalGoenka
    जयदयाल गोयकांनी गीता प्रेसच्या माध्यमातून चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उघडपणे पुरस्कार केला. जोडीला रुढी-परंपरा आणि कर्मकांडांचा अधिकाधिक प्रचार-प्रसार होईल, या दिशेने साहित्याची अखंड निर्मिती देखील केली...

    पोद्दार आणि सनातनी हिंदुत्ववादी लोकांचा मुख्य टीकेचा रोख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर होता, असे सांगून त्या सर्व करण्याचा आव आणत पोद्दार लिहितात, ‘लक्षात घ्या, हे दलितांचे नेते (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) स्पष्टपणे म्हणत आहेत की त्यांची चळवळ ‘देवासाठी’ नाही, तर सामाजिक समतेसाठी आहे. त्यांना सरकारी नोकऱ्यांत हक्क हवा आहे...’

    पोद्दारांच्या पत्राला गांधीजींनी दिलेले उत्तरही लेखकाने या पुस्तकात नोंदवले आहे. गांधीजी म्हणतात, ‘...सनातनी सवर्ण हिंदूंनी अस्पृश्यतेची प्रथा आणि दलितांना मंदिर प्रवेशाची बंदी या प्रथा लादून हिंदू समाजात बहिष्कृत वर्ग तयार केला आहे. हीच मुळात ‘अधार्मिक गोष्ट’ आहे आणि क्रूर प्रथा आहे. दलितांना बहिष्कृत करण्यामुळे त्यांच्यावर अस्वच्छता लादली गेली आहे. हा हिंदू धर्मावरील दोष हिंदूंनीच दूर करायला हवा. हे त्यांच्याच (हिंदूंच्या) हिताचे आहे.’

    हनुमानप्रसाद, गोयंका आणि त्यांची गीता प्रेस व कल्याण मासिक हे दलितांप्रमाणेच स्त्रियांच्या अधिकारांबद्दलही अत्यंत कडवे होते. स्त्रीविषयक अनेक पुस्तिका, विशेषांक त्यांनी काढले आहेत. ‘आदर्श हिंदू नारी’ या कल्पनेचा गीता प्रेस आणि कल्याण मासिकात कायमच पुरस्कार केला गेला, असे लेखकाने म्हटले आहे. त्यांनी ‘आधुनिक शिक्षणामुळे स्त्रिया भ्रष्ट आणि नष्ट होतात, शिक्षणसंस्था म्हणजे अनैतिक संबंधांचे अड्डे आहेत, अशा स्थितीत स्त्री-पुरुषांनी एकमेकांपासून दूर राहणे हाच योग्य मार्ग’ अशा गोयंकांच्या काही विधानांची नोंद केली आहे.

    मनुस्मृतीचा पुरस्कार, धर्मशास्त्रानुसार घटस्फोट अमान्य, हिंदू विवाह हा करार नव्हे तर दोन आत्म्यांचे मीलन, घटस्फोट घेणाऱ्या स्त्रिया म्हणजे राक्षसी आणि जनावरासम, मातृत्वाच्या उदात्त ध्येयासाठी नवऱ्याच्य छळाकडे दुर्लक्ष करणे हितावह, मासिक पाळीच्या काळात स्त्रियांची कामेच्छा अनियंत्रित होत असल्याने मुली वयात आल्या आल्या त्यांचे विवाह करणे, बालविवाह प्रतिबंधक कायद्याला विरोध, स्त्रियांचे स्वातंत्र्य म्हणजे समाजाचे नैतिक अधःपतन, व्यायामामुळे स्त्रियांचा नाजुकपणा नष्ट होतो, स्त्रिया हे केवळ वंशवृद्धीचे साधन, कोणत्याही पुरुषाच्या लैंगिक भावना उद्दिपित करण्याची शक्ती स्त्रियांच्यात असल्याने स्त्रियांनी कधीही आपले वडील, भाऊ आणि मुलासोबतही एकांतात राहू नये... अशी असंख्य वचने गीता प्रेस प्रकाशित साहित्यात आणि कल्याण मासिकात नोंदली गेली आहेत.

    हिंदू कोड बिलाला गीता प्रेसवाल्यांचा विरोध होणे, तर अगदी स्वाभाविक होते. कल्याण मासिकात ‘हिंदू कोड : हिंदू संस्कृति के विनाश का आयोजन’ या शीर्षकाचा मोठा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याची नोंद देऊन लेखक म्हणतात, ‘सर्व सनातन हिंदू धर्म समर्थक एकजुटीने नेहरु आणि डॉ. आंबेडकरांवर तुटून पडले. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध तर अत्यंत हीन पातळीवर जाऊन जहरी टीका सुरू केली. ‘हा स्वतः हीनवर्णीय माणूस, यांनी म्हातारपणी एका ब्राम्हण स्त्रीशी विवाह केला आणि आता आमच्या धर्मावर हल्ला करणारे हिंदू कोड बिल त्याने आणले आहे.’

    गांधीजींशी डावपेचात्मक संबंध ठेवणाऱ्या हनुमानप्रसाद पोद्दारांना नंतर गांधीजी हे सनातन हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या मार्गातील ‘मोठी धोंड’ आहे, असे वाटू लागल्याचे निरीक्षण लेखक नोंदवतात. पुढे सनातनी शक्तीच्या प्रेरणेने व सहाय्याने ही धोंड नथुराम गोडसे दूर करतो. गांधीजींचा देह अचेतन होतो. पण त्यांचा प्रभाव जिवंतच राहतो. ज्यांच्याशी गांधीजींइतकेही संबंध ठेवणे हिंदुत्ववाद्यांना शक्य होत नाही, असे जवाहरलाल नेहरु पुढे दीर्घ काळ या शक्तींचे क्रमांक एकचे शत्रू राहतात. आजही आहेत. मृत नेहरुंचे भूत त्यांना कायम छळत असते.

    सम्यक प्रबोधनाचा उतारा आवश्यक

    सामाजिक समतेसंबंधीच्या हनुमानप्रसाद, पर्यायाने गीता प्रेस व कल्याण मासिक यांच्या भूमिका लेखकाने सविस्तर मांडल्या आहेत. त्यांची ओळख करुन देताना मीही त्यातला बराच भाग इथे नोंदवला आहे. याचे कारण दलितांना वश करण्याची बरीच यशस्वी खटपट करणाऱ्या, त्यासाठी हरघडी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर दंडवत घालणाऱ्या आजच्या संघ-भाजपाचे मूळ वैचारिक घराणे संबंधितांना कळावे. गांधीजी आणि काँग्रेसशी बाबासाहेबांचे तीव्र मतभेद होते. पण या दोहोंत लोकशाही, समता, सामाजिक न्याय याबद्दल सहमती होती. या आधुनिक मूल्यांच्या, समतेच्या व मानवी मूलभूत हक्कांच्या विरोधात आजच्या संघ-भाजपाचे पूर्वसुरी होते. त्यामुळे त्यांना गांधी, नेहरु, काँग्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळेच शत्रू स्थानी होते. त्यांच्या हिंदुराष्ट्राच्या मोहिमेतील हे मोठे अडथळे होते. आज अनधिकृत हिंदू राष्ट्राचा अमल सुरूच आहे. संविधान नावापुरते राहिले आहे. तेही जाऊन येऊ घातलेल्या अधिकृत हिंदुराष्ट्राच्या पूर्ततेची दिशा रोखायची असेल, तर ज्यांना ज्यांना सनातनी हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला होता, त्या सगळ्या लोकशाही, प्रगतिशील शक्तींची संयुक्त आघाडी होणे नितांत गरजेचे आहे. राजकीय सत्तेवरुन हिंदुत्ववादी शक्तींना बेदखल करण्यासाठीची राजकीय मोर्चे बांधणी करतानाच या शक्तींनी विषाक्त केलेल्या समाजमनाला सम्यक प्रबोधनाचा उतारा द्यावा लागेल. सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्याची चळवळ यांचा वारसा असलेल्या प्रगतिशील, लोकशाहीवादी संयुक्त आघाडीला विस्कटलेल्या समाजमनाची घडी नीट बसवण्याचे काम दीर्घकाळ करावे लागेल. त्यासाठीचा आदर्श आपल्या विरोधकांकडून, गीता प्रेस आणि कल्याण मासिक चालवणाऱ्यां-कडून जरूर घ्यावा. संघ-भाजपविरोधी लोकशाहीवाद्यांची संयुक्त आघाडी हे माझे मत आधी होतेच. प्रमोद मुजुमदारांचे हे पुस्तक वाचून त्याचे महत्त्व आणि तातडी अधोरेखित झाली.

    -oOo-

    हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया
    लेखक : प्रमोद मुजुमदार
    लोकवाङ्मय गृह, मुंबई
    पृष्ठे २३२ । किंमत ३०० रुपये


    SureshS
    सुरेश सावंत

    सुरेश सावंत हे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक आहेत.
    ईमेल: sawant.suresh@gmail.com



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा