-
ही लेखमाला मूळ वाल्मीकी रामायणावरून बेतली आहे. रामायणातल्या घटना-प्रसंगांचा अर्थ-अन्वयार्थ लावताना, सादरीकरणात खेळकरपणा आणण्यासाठी आधुनिक प्रतीके/प्रतिमा/घटना/कृतींची जोड देण्यात आली आहे. हेतू हा की, रामायणकालीन घटनांचा आजच्या संदर्भाने वाचकांना सुलभपणे अर्थ लागावा. - संपादक
---[मागील भागाचे शीर्षक] « मागील भाग
---पुनर्शोध रामायणाचा
पर्णकुटीतून राम भेटीसाठी आतूर झालेला लक्ष्मण बाहेर पडलेला रावणाने पाहिला. म्हणजे आता सीता एकटीच आत आहे. हत्ती गेला आणि शेपूट उरले. की दोन्ही वाघ गेले आणि एक मांजर उरले? दोन्ही पुष्ट वृषभ गेले, गरीब गाय उरली. युद्ध कशाला करा? आता सीतेचे यशस्वी अपहरण झाल्यातच जमा होते. रावणाने दशानन रूप त्यागले. एखाद्या फिरस्त्या संन्यासी साधू वा तपस्वीचे रुप घेतले...
रावणाचा सीता हरण कट मारिचाला समजला. रावणाच्या या कटात सामील न झाल्यास लंकाधीश आपला गळा दाबून ठार करील, हे मारिचास लक्षात आले. मारिच आता तपस्वी झाला होता. तो मरणाला घाबरत नव्हता. मरण आता दूर नाही, हे त्याला समजले होते. रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मरण पत्करावे, हा मारिचाचा विचार पक्का झाला. म्हणजे, आपला उद्धारच होईल म्हणून तो रावणाच्या कटात सामील झाला. मरणाच्या ओढीने तो राक्षसी माया करायला तयार झाला. रावणाच्या रथाला पिशाच्यांची तोंडे असलेले सालंकृत गाढव जुंपलेले होते. रावणाने खुषीत येऊन मारिचाला आपल्या आकाशगामी रथात घेतले. (हे पुष्पक विमान नव्हते.)
मारिचाचा रुपपालट
राक्षसांजवळ मायावी विद्या होती. गाढवाचा रथ बोलता बोलता दंडकारण्यात दाखल झाला, तिथून पंचवटीत. क्षणार्धात मारिचाने ‘नर मृगरुप’ धारण केले. (“मज आणून द्या ‘तो’ हरिण अयोध्या नाथा” हे गीत रामायणातले शब्द) रावणाने तर सोनेरी कायेवर चित्रविचित्र चंदेरी ठिपके, दिसायला आकर्षक एवढीच अपेक्षा केली होती. मारिचाने तर अद्भुत सोनेरी रंग धारण केला. शिंगांचा वरचा भाग इंद्रनील मण्यासारखा, कान निळ्या कमळासारखे, पोटही निळ्यारंगाचे, कपाळावर, तोंडावर पांढरे काळे ठिपके, कुशीचा रंग शुभ्र पांढरा. खूर वैदूर मण्यांच्या रंगाचे. त्याची शेपूट जणू इंद्रधनुष्यच. एकूण देहकांती मनोहर चमकणारी. पंचवटीचा आसमंत त्या रमणीय रूपाने सतेज झाला. आता सीता या जाळ्यात अलगद अडकणार, याची रावणाला खात्री पटली. नरमृगरुपी मारिच रामाच्या पंचवटीतील कुटीजवळ बागडू लागला. सीतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मृगाने खांबावर शिंगे घासली, तो कधी जलद गतीने पळून जाई, कधी रेंगाळत राही. पुन्हा पुन्हा मान वळवून पाही. त्याच्या दर्शनाने सीता प्रफुल्लित झाली. त्या मृगाच्या रंगावरच ती भाळली. त्याच्या डोळ्यातला विलक्षण धुंद भाव तिला इतका आवडला, की तिने रामाला, “हा हरीण माझ्यासाठी घेऊन या” असा हट्ट धरला. “जमलं तर सजीवच आणा, न पेक्षा त्या मृगासनावर तुम्ही इंद्रासारखे शोभून दिसाल.”
सीतेची मृग लालसा
सीता जणू मनाने मृगासह अयोध्येत पोचली होती. तिने रामाच्या हाती धनुष्य दिले आणि खांद्यावर भाता चढवलाही. तो रत्नमय विचित्र मृग दोघा भावांनीही पाहिला. मृगाबद्दलचा स्नेह सीता लपवू शकत नव्हती. सीता आपल्याकडेच पाहत आहे, हे मारिचाने ओळखले. त्याने बागडण्यात लडिवाळ आणला. लक्ष्मणाला एक विशिष्ट प्रकाश मृगाच्या भोवती दिसला. लक्ष्मण ओरडलाच, “रामा, हा मृगाचे रूप घेऊन मारिच राक्षस आलेला आहे. अनेक राजे आणि ऋषी यांना मारिचाने मारले आहे. आपणही त्याचे हे गुण अनुभवले आहेत.” भ्रांत चित्त झालेल्या सीतेच्या कानात लक्ष्मणाचे शब्द शिरले नाहीत. ती म्हणाली, “आर्यपुत्र! माझ्यासाठी याला पकडून आणा. या वनात आपल्याला एक मनोरंजनाचे साधन प्राप्त होईल. याचे तेज, याची दीप्ती, रूपवैभव यामुळे कुणीही मोहित होईल. हा स्वार्थी हट्ट शालीन स्त्रीला शोभत नाही, पण मृगाच्या सौंदर्याने मला मोहित केले आहे.”
“लक्ष्मणा, या मृगाचे सौंदर्यच त्याच्या घाताला कारण होणार.” सीतेच्या तोंडी जसे मृगाचे वर्णन होते, तसेच रामही करू लागला. लक्ष्मणा! असे मृगजीन मिळवण्यासाठी किती राजे शिकारीचा आनंद लुटतात. अरण्यातले धातू, रत्ने, मणी, सोने अशी संपत्ती मिळवून राजे आपला खजिना भरतात. (रावणाचा जनस्थानातील लष्करीतळ या लुटीसाठीही होता. जनस्थानात तळ ठोकून दंडकारण्याची अशीच लूट रावणाने केली.)
युरोपियन साम्राज्यशाह्यांनी अठराव्या शतकापासून जगाची खनिजे, शेती उत्पादने राक्षसी वृत्तीनेच लुटली, आजही आफ्रिकी आणि अन्य देशांमध्ये लूट सुरू आहे. खनिज तेल, वायू, दुर्मीळ धातूंची आता त्यात भर पडली आहे. असो.
राम चापबाणासह शस्त्रसज्ज होताच, आणखी एक खड्ग कमरेला अडकवून त्या मृगाच्या मागे एखाद्या शिकार्याच्या थाटात निघताना म्हणाला, “लक्ष्मणा सीतेने आज पहिल्यांदाच काही तरी मागितले आहे. मी त्या मृगाला एकतर जिवंत पकडून आणीन, जर तो मायावी मृग असेल, तर त्याचा वध होईल. तू युद्धसज्ज राहून सीतेचे रक्षण कर. सतर्क राहा.” ही रामाची सहायक बंधू लक्ष्मणाला दिलेली आज्ञा होती.
याच प्रसंगाला धरून नारायण पंडितांनी कथारुपी हितोपदेशात (1-28) सुमारे हजार वर्षापूर्वी संस्कृत सुभाषित रचले होते.
“असंभवं हेम मृगस्य जन्म। तथापि रामो लुलुभे मृगाय। प्राय: समापन्न विपत्ति काले। धियोऽ पि पुंसां मलिना भवन्ति॥”
सोन्याचा मृग दिसणे संभवच असताना, रामालाही लोभ झाला. आपत्तीकाळ येऊन ठेपला की लोकांची बुद्धी संभ्रमित (भ्रष्ट) होते.
सीते धाव! लक्ष्मणा धाव!
रावणाचे मारिचाकडे लक्ष होते. नरमृगाचे हुबेहूब आकर्षक रुप पाहून रावण मनोमनी संतुष्ट झाला होता. राम पर्णकुटीच्या बाहेर पडलेला पाहून रावणाचा जीव भांड्यात पडला. ब्राह्मणाचा वेष कसा हवा यावर त्याने सर्व गोष्टींचा मनात विचार करुन ठेवला. प्रतीक्षा होती, ती लक्ष्मण कुटीबाहेर कधी पडतो याची. मृगाने राम सशस्त्र धावत येतोय हे पाहिले आणि थोडी क्रीडा सुरू केली. वेगाने उंच उड्या मारीत तो धावला, नंतर लपून बसला. पुन्हा धावला. गाडी कधी पहिल्या गियरमध्ये तर क्षणात एकदम चौथ्या पायदानात (चौथा गियर) रामाची शस्त्रसज्ज मॅरेथॉन संपेना. राम चक्क दमला. एका हरणाच्या मागे धावून माझी दमछाक? मृग की मारिच? कुणीही असो रामाने क्रोधित होऊन काळबाणच सोडला. (दशरथ पुत्र, षडरिपूंपैकी, लोभाने बाहेर पडला, क्रोधाने पेटला.) रामाचा बाण व्यर्थ जाणारच नव्हता. मृगाला जिवंत पकडणे रामाला शक्य झाले नाही. सुवर्णमृगाचा देह महाकाय होऊन उंचावर गेला. “सीते धाव! लक्ष्मणा धाव” हे स्वर आसमंतात घुमत असतानाच मारिच रामासमोर कोसळला! मृत झाला. रामाने घुसलेला बाण काढला. रामाच्या हातूनच मरण आल्याने आनंदित झालेल्या मारिचाने प्राण सोडले!
मारिचाने आरोळ्याच ठोकल्या होत्या. अख्खी पंचवटी दणाणली होती. मारिचाच्या हाका ऐकून सीता, लक्ष्मणाचे काय झाले असेल? सीते धाव! लक्ष्मणा धाव! या आपल्या आवाजाची नक्कल हुबेहूब आहे. आता तर प्रतिध्वनी ऐकू येत होते. राम भयभीत झाला. मनातच म्हणाला, “सीते! तुला हवी असलेली मृगशिंगातली ती रत्ने आता कशी आणू?” शांकर धनू तोडणार्या रामाला हा सुवर्णमृग जिवंत पकडता आला नाही. तर मग कोवळ्या मोहफुलांसारखे मृगाजीन आत्ता कुठून आणि कसे आणू?
सीते धाव! लक्ष्मणा धाव! हे ध्वनी त्याचा पिच्छा सोडीत नव्हते. आणि लक्ष्मण धावत निघाला तर? सीता एकटीच राहील? राम अधिकच भयग्रस्त झाला होता. मारिचाचा उद्धार झाला म्हणून सीतेला संकटात टाकून किंमत चुकती करायची? रामाची बुद्धी निर्णयक्षमता गमावून बसली? विश्वामित्राने भयनाशक मंत्र शिकवला होता का? रामाला तर असा मंत्र आठवत नव्हता.
रावण, रामाची ही अवस्था पाहत होता. कलियुगाची कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) मारिचाला बहुधा त्याच्या माता त्राटिकेनेच शिकवली असावी. (जिज्ञासूंनी खगोल अभियांत्रिकी संस्कृत तज्ज्ञ श्री. निलेश ओक यांचाशी संपर्क करावा.) मारिचाने जसा हुबेहूब रामाचा आवाज काढला तितका हुबेहूब आपल्याला तरी काढता आला असता का? अशी शंका रावणाच्या मनात आली. लक्ष्मण कधी एकदा कुटीबाहेर पडतो, याची रावण अधीरतेने वाट पाहत होता.
सीतेचा लक्ष्मणावर संशय
पर्णकुटीत सीतेच्या कानात रामाचा आर्त आणि करुणेने भरलेला आवाज शिरला. सीते धाव! लक्ष्मणा धाव! ती लक्ष्मणासमोर आली. “तुला रामाच्या हाका ऐकू आल्या नाहीत का?” काय झाले असेल? राम एकटा. एखादा सिंह त्याच्यासमोर आ वासून गर्जना करीत उभा राहिला असेल? लक्ष्मणा धावत जा. राम तुझ्या मदतीची अपेक्षा करतोय. तू ढिम्म उभा राहून काय करतोस? धावत रामाच्या मदतीला जा!” सीतेच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या.
“हे सीता माई! रामाच्या मदतीला कुणीही जायची गरज नाही. हाका मारतोय तो पळपुटा राक्षस मारिचच आहे. तो मृग नव्हताच. मारिचाजवळ ‘गंधर्वनगर’ नावाची माया विद्या आहे. (कृत्रिम बुद्धिमत्ता) वैदेही! कुणीही देव, मनुष्य, गंधर्व, पक्षी, राक्षस, पिशाच, किन्नर, दानव, हिंस्त्र पशूच काय इंद्रालाही रामाचा पराभव करणे शक्य नाही. तू भयभीत होऊ नकोस. राम हजर नसताना मी तुला एकटीला ठेवून, कुटी सोडून कुठेही जाणार नाही. पृथ्वीवरचा कोणताही राजा सैन्यबलाने रामाचा पराभव करू शकणार नाही, तू निश्चिंत राहा. मी सतर्क आहे. शत्रसज्जही आहे. जनस्थान रामाने नष्ट केल्याने अनेक राक्षस आपले वैरी झाले आहेत. तू चिंता करू नकोस. मी तुझे रक्षण करीन.” लक्ष्मणाने आपला जणू अवमान केला, असे वाटून सीता संतापली.
तिचा स्वर कठोर आणि नेत्र लाल झाले. “हे निर्दयी अनार्या कुलांगरा! रामावर संकट आले यानेच तुला आनंद झालेला आहे. तुझ्या मनात पापी दुष्ट भाव आहेत. राम एकटाच वनात जायला निघाला, तेव्हा मी पाठोपाठ निघालेली आहे, हे पाहून माझ्या अभिलाषेनेच तूही निघालास. पण सुमित्रा सुता! तुला किंवा भरताला हे जमण्यासारखे नाही. कमलनेत्री शामल रामाचा पती म्हणून स्वीकार केल्यानंतर कोणत्याही परपुरुषाला मी वश होणार नाही. मी तुझ्या समक्षच स्वतःला मारून टाकीन. एक क्षणही मी रामाशिवाय जगू शकणार नाही.”
सीताः अधार्मिक दुर्गुणी स्त्री?
सीतेची आणखी कटू वचने जितेंद्र लक्ष्मणाला ऐकणे शक्य नव्हते. तो सीतेसमोर नतमस्तक होऊन म्हणाला, “हे देवी, तुझी कटुवचने ऐकली. मी यावर प्रतिवाद करणार नाही. सामान्य अधार्मिक दुर्गुणी स्त्रीला शोभून दिसतील, अशी वचने मी तुझ्या तोंडून ऐकली, यावर माझा विश्वासच बसत नाही. मला सहनही होत नाही. तू विनाश ओढवून घेत आहेस. तुझ्या वचनांचा मी धिक्कार करतोय. वनदेवता तुझे रक्षण करोत. माझ्या ज्येष्ठ भावाची आज्ञा मी तंतोतंत पाळत होतो. तरीही तू माझ्याबद्दल शंका व्यक्त केलीस. मला अपशकुन जाणवत आहेत. ही धोक्याची सूचना आहे. हा मी चाललो! मी रामासह परत येईन, तेव्हा तुझे दर्शन होईल की नाही?”
सीता रडतच होती. “लक्ष्मणा! राम दृष्टीस पडला नाही तर मी गोदावरीत उडी मारून जीव देईन. गळफास घेईन, विष प्राशन करीन. अग्नीत प्रवेश करीन. काहीही करीन पण परपुरूषाचा स्पर्श मला होऊ देणार नाही.”
सीता छाती पिटून घेत होती. आक्रंदत होती, तेव्हा लक्ष्मण तिला वंदन करून निघाला.
तू मुक्त रती आहेस की वैभवी?
पर्णकुटीतून राम भेटीसाठी आतूर झालेला लक्ष्मण बाहेर पडलेला रावणाने पाहिला. म्हणजे आता सीता एकटीच आत आहे. हत्ती गेला आणि शेपूट उरले. की दोन्ही वाघ गेले आणि एक मांजर उरले? दोन्ही पुष्ट वृषभ गेले, गरीब गाय उरली. युद्ध कशाला करा? आता सीतेचे यशस्वी अपहरण झाल्यातच जमा होते. रावणाने दशानन रूप त्यागले. एखाद्या फिरस्त्या संन्यासी साधू वा तपस्वीचे रुप घेतले. (परिव्राजक) केशरी छटा असलेले भगवे वस्त्र परिधान केलेला भव्य देही, मस्तकावर शेंडी, त्यावर एक छत्र, पायात खडावा, खांद्यावरच्या काठीवर उपडा (पालथा) कमंडलू. राम लक्ष्मण आत नक्की नाहीत, अशी खातरजमा करुनच तो दाराशी आला.
चंद्र सोबतीला नसलेली रोहिणी असावी, तशी सीता एकटीच होती. सूर्यास्त झालेला आणि चंद्राचा पत्ता नाही, अशा संध्याकाळी पापग्रह उगवावा तसा रावण निसर्गाला दिसला. रावणाला गोदावरी नदीने ओळखले तिची गती मंद झाली, वारा घाबरला, गती कमी झाली तो हळू वाहू लागला. वृक्ष न बोलता स्तब्ध झाले. आसमंत भीतीने भरुन गेला. रामाचा बदला घेण्याची इच्छा त्याच्या मनात दबा धरुन बसलेली होती. बाहेरून साधू, तपस्वी, फिरस्ता संन्यासी, गोसावी, दिसणार्या ब्राह्मण रावणाने चिंताग्रस्त अधोमुख सीतेचा निस्तेज चेहरा पाहिला. तिचे हुंदके सुरूच होते. मुळातले रूप होते चित्रा नक्षत्राचे. शनिग्रहाची वक्रदृष्टी तिच्यावर पडली. रावण चक्क दारातून परवानगी शिवाय आत आला. त्याला तिचे मुख आता पूर्णचंद्रासारखे भासले. तो कामांध तिच्याकडे निरखून पाहत होता. रावण पुढे पुढे सरकत होता. तिच्या पीत रेशमी वस्त्राने आणि पद्मलोचन रुपाने तो मोहित झाला होता. शरीरात कामदेवाचा संचार त्याला जाणवत होता. वरवर त्याने हळू ब्रह्मघोष (गायत्री - ओंकार) सुरू केला. रावणाने एकदम तिच्या तेजस्वी रुपाची प्रशंसा सुरू केली. “हे कमलमाला धारणी, तू कीर्तिमान लक्ष्मीसारखी दिसणारी कुणी अप्सरा आहेस का? मुक्त रती आहेस की वैभवी? असे एकसारखे सुंदर पांढरे शुभ्र दात आज मी प्रथमच पाहतोय. तुझ्या कमनीय देहावरच्या आभूषणांनी तू फारच मनोहारी दिसत आहेस.” (रावणाने ही पर्णकुटीत केलेली घुसखोरी होती. सभ्यपणाचा आव आणीत तो खरं म्हणजे अनोळखी स्त्रीचे अश्लील शैलीत वर्णन करीत होता). तो मांड्यांना हत्तीच्या सोंडेची उपमा देतो, शरीराचे खास अवयव ताडफळासारखे दिसतात, असे सांगतो, केसांपासून नखांपर्यंत अनोळख्या स्त्री समोर तिच्या देहाचे वर्णन करतो. त्याचे वर्णन सुरूच असते.
रावणाने डाव साधला
वाल्मिकी रामायणातला रावण हा अहंकारी होता, उन्मत्त होता आणि लोभीसुद्धा. सीतेला पळवून आणताना त्याने त्याच्यातल्या वासनांध पुरुषाचेही दर्शन घडवले...“हे चारुस्मिते सुंदरी, देव यक्ष किन्नर यामध्ये असे रुप मी प्रथमच पाहातोय. या पृथ्वीवरील सर्वात सुंदर नारी तूच आहेस. तुझे सर्वोत्तम सुंदर तारुण्य आणि हा भयाण अरण्य परिसर पाहून मी संभ्रमित झालो आहे. तुझे मी शुभ चिंतितो. कोणतेही रुप घेणार्या क्रूर राक्षसांच्या या वस्तीत तू का आली आहेस? तू रमणीय नगरात, प्रासादात सुगंधी उपवनातच शोभणारी आहेस. हे सुंदरी ज्याला तुझा सुखद सहवास लाभतो, तो पती भाग्यवान आहे. तू कोण आहेस? रूद्र, वसू, देव या पैकी तू कोणत्या कोटीतली? येथील वानर हिंस्त्र पशू, सिंह, वाघ, हत्ती, गिधाडे आणि अस्वलांची तुला भीती वाटत कशी नाही? तू कोण आहेस? या भयाण दंडकारण्यात तू का राहतेस?” सीता थोडी सावरली होती. अतिथी हा साधू ब्राह्मण असल्याने तिने त्याचे स्वागत केले. त्याला बसायला आसन दिले. पादप्रक्षालन भोजन सर्व तर्हेने उचित आदरातिथ्य केले. त्याला फल, मूल असा आणखी आहारही पुढे ठेवला. ती वारंवार राम-लक्ष्मणाचा काही शब्द कानावर पडतो का, असा अंदाज घेत होती. पण काही मागमूस लागत नव्हता. त्या उलट राम किती दूर गेलेला आहे, मारिचाने किती योजने रामाला पळवले आहे, याचा रावणाला अचूक अंदाज होता. त्यामुळे दीर्घकाळ बाहेरुन काही धोका नाही, हे त्याला ठाऊक होते.
सीतेला सुवर्णमृगाविषयी काहीच कळले नव्हते. इन कमिंग किंवा आऊट गोइंग दोन्ही संपर्क व्यवस्था मानवांजवळ नव्हत्या. राक्षसांना ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता, वाय. फाय. इंटरनेट चुटकीसारखी उपलब्ध होत असे.) शेवटी रावणाचा जन्म भारतातल्या आजच्या बृहन् नॉयडातील बिस्रख गावा मधला. म्हणजे उत्तर प्रदेशातलेच ते गाव. (तिथे रावण मंदिरही आहे. या गावात आजही दसर्याला रावण दहन होत नाही, असे समजते.) त्याचा पिता आजोबा दोघेही ब्राह्मण. ब्रह्मदेवाचेच सारे वंशज. अशा स्थितीत सर्व आधुनिक शास्त्रीय शोधांची जननी भारतातच नको का?)
इकडे रामाला याचा पत्ता नाही की सीता सुखरुप असेल ना? मारिचाच्या हाकांनी लक्ष्मणही सीतेला एकटीच ठेऊन मला शोधण्यासाठी तर निघाला नसेल? पक्षीराज जटायू म्हणाला होता, “सीता एकटीच असली तर मी तिचे रक्षण करीन?” राम पुन्हा पुन्हा भयग्रस्त होत होता.
सीता वारंवार बाहेर डोकावून पाहत होती. गर्द झाडेच दिसत होती. रावण आपल्या प्रश्नांची सीता कधी उत्तरे देते, याची वाट पाहत होता. सीतेला वाटले याला सर्व खरे सांगू की नको? माझे खोटे त्याने पकडले तर? हा परिव्राजक ब्राह्मण शापही देईल?
सीता वदली...
“मी मिथिलेच्या महात्मा जनकाची मुलगी. रामाची प्रिय राणी सीता आहे. बारा वर्षे मी (अयोध्येत) ईक्ष्वाकु कुळात सुखाने राहिले. सर्व ज्येष्ठांच्या संमतीने रामाचा राज्याभिषेक करण्याचे ठरले. माझ्या सासू कैकेयीने रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक असा वर मागितला. राम पिता राजा दशरथ हा कामार्त आणि कैकेयीला दिलेल्या वचनाने असाहाय्य होता. मी त्यावेळी अठरा वर्षांची, तर राम पंचवीस” (सीतेचे विवाह समयी वय किती हा वाद सुरू असतो.) सीता आपले पूर्वायुष्य सविस्तर सांगत होती. कधी एकदा राम लक्ष्मण येतात याची ती वाट पाहत असते. जणू कोर्टातच जबानी द्यावी इतका सविस्तर वृत्तांत ती ब्राह्मणाला सांगत होती. “हा वनवास एकूण चौदा वर्षांचा आहे. माझे पती दृढतापूर्वक प्रतिज्ञा पाळत आहेत. राम फक्त देतात कुणाकडून काहीच घेत नाहीत. त्यांच्या तोंडून कधी असत्य वचन निघत नाही. रामाचा भाऊ लक्ष्मण ब्रह्मचर्याचे व्रत घेऊन रामाचा सहायक आहे. पराक्रमी सेवकाची भूमिका तो बजावतो. लक्ष्मण शत्रुहंता आहे. हे दोघेही बंधू वनात दृढव्रती जीवन जगत असतात. कैकेयीने आम्हा तिघांना दंडकारण्यात पाठवून राज्य भ्रष्ट केले. आम्ही स्वबळावर इथे राहतो. आपण थोडी विश्रांती घ्यावी. माझे पती वन्य आहार घेऊन येतील. खाण्यास योग्य असे वराहादि पशूही मारून घेऊन येतीलच.” (14 वर्षांच्या वनवास काळात राम-सीता-लक्ष्मण यांचा वनस्पतीजन्य आहार असणारच. मात्र क्षत्रिय हे मांसाहारी होते. त्याच अनुषंगाने सीतेच्या तोंडी हे वाक्य आले आहे.) सीता संवाद काळ लांबवीत होती. पण हा ब्राह्मण कोण हे अंतर्ज्ञानाने तिला कळत नव्हते. शेवटी तिने विचारलेच.
तू क्षुद्र कोल्हा आणि मी सिंहीण...
रामाच्या हातून मारिचास मरण आले. ते त्याला त्याचे भाग्य भासले. रावणाचाही शेवट अखेर रामानेच केला. पण त्याच्या लेखी ते त्याचे भाग्य नव्हे, दुर्भाग्य होते...“हे द्विजा! आपले नाव आणि कुलासहित गोत्र मला सांगावे, या दंडकारण्यात आपण एकटेच का फिरत असता?” सीते, मला सर्व देव असुर, मानव घाबरतात. मी राक्षसांचा राजा रावण आहे! रेशमी वस्त्रात तुझी सुवर्ण कांती फारच सुंदर दिसते. तुझ्या रुपामुळे माझ्या स्त्रिया मला आवडेनाशा झाल्या आहेत. मी अनेक देशांतून सुंदर सुंदर स्त्रिया पळवून आणल्या आहेत. तू त्या सर्वात माझी पट्टराणी म्हणूनच शोभून दिसशील. माझ्या राजधानीचे नाव लंका आहे. समुद्र वलयांकित पर्वत शिखरावर ती महानगरी वसली आहे. तू तिथे राहिलीस की या वनाची आठवणही तुला होणार नाही. सीते! तू माझी भार्या झालीस की दागदागिने यांनी मढलेल्या माझ्या पाच हजार स्त्रिया तुझ्या दासी होतील.” सीता क्रोधित झाली. “धिक्कार असो तुझा. माझा पती राम हा पर्वतश्रेष्ठ महेंद्र आहे, महासागरासारखा प्रशांत आहे. माझे तन मन त्यांना अर्पण केले आहे. ते वटवृक्षासारखे छाया आणि आश्रय देणारे आहेत. सत्यवचनी सौभाग्यशील अशा रामाची मी प्रिय पत्नी आहे. महाबाहू, विशाल छातीच्या पराक्रमी सिंहासारखी चाल असलेल्या रामाची मी पत्नी आहे. जितेंद्रिय कीर्तिमान पुरुषाची मी भार्या आहे. तू क्षुद्र कोल्हा आहेस, तर मी सिंहीण आहे. मूर्खा मला प्राप्त करण्याच्या हेतूने तू पंचवटीत आलास काय? सूर्याला हाती पकडण्यासाठी तू आलास काय? सिंहाचे दात काढायला तू निघालास असे तुला वाटते काय? मंदार पर्वत हातावर पेलून नेशील असे तुला वाटते काय? तू विष पिऊनही जिवंत राहशील असा तुला भ्रम झालेला दिसतोय. तू सुईने डोळे पुसायला निघालेला आहेस. गळ्यात शिळा बांधून तू सागरात उडी घेऊन इच्छितोस काय? एक लक्षात ठेव राक्षसा! सागर आणि ओहोळ, अमृत आणि पेज, सिंह आणि कोल्हा यात जो फरक आहे, तो राम आणि रावणात फरक आहे. राम हत्ती तर तू बिळातला उंदीर आहेस. राम गरुड तर तू कावळा आहेस. राम राजहंस, तर तू झाडावरचे सामान्य गिधाड आहेस.”
राम-लक्ष्मणाची चाहूलही लागत नाही, म्हणून सीता कासावीस होऊ लागली होती. आणखी किती उपमा देऊन रावणाचा उपमर्द करणार? शब्द संपत्तीचा खजिना सुद्धा संपत आला होता. राम लक्ष्मणाचा ना कुठे थांग ना पत्ता! सीता थरथर कापू लागली.
सीतेचे शाब्दिक वार झेलून दशानन रावण क्रोधित झाला होता. तुझी सविस्तर जन्मकुंडली आणि कौटुंबिक ओळख मी आत्ताच ऐकली. त्याने मी प्रभावित होण्याचे काहीच कारण नाही. आता माझी संपूर्ण ओळख ऐक.
रावण उत्मातला आणि सीता गर्जली...
“कुबेर हा माझा सावत्र भाऊ. आम्ही ऋषी वैश्रवणाचे पुत्र. मी दशग्रीव रावण. सर्व देव दानव, गंधर्व मला भितात. कुबेराचा युद्धात मी पराभव केला. मला घाबरून त्याने समुद्रवेष्टित वैभवसंपन्न लंकेतून पलायन केले. तो कैलासावर आश्रित झाला. त्याचे सुंदर इच्छागामी पुष्पक विमान मी जिंकले. तेच माझे आकाश मार्गी विमान. माझ्या क्रोधाला इंद्रादि देव घाबरतात. मी जिथे उभा राहतो, तिथे वारा शीतल होऊन मंद गतीने वाहतो. सुमद्रापलिकडे अमरावती प्रमाणे वैभवसंपन्न लंका आहे (आजची श्रीलंका नव्हे!) ते राक्षसांचे वसतिस्थान आहे. संपूर्ण नगरीच रत्ने आणि सोन्याने मढवलेली आहे. महालातील फरशा सोन्याच्या आहेत (लंकेत सोन्याच्या विटा!) हत्ती घोडे रथांची वर्दळ असलेल्या रस्त्यांनजीक सुमधुर फळांचे वृक्ष आहेत. हे राजकुमारी सीते, माझ्यासह तू त्या नगरीत राहा. तू मानवांसह देवांना मिळणार्या सर्व सुखांचा उपभोग घे. त्या रामाचे आयुष्य आता संपल्यातच जमा आहे. राजा दशरथाने आपल्या प्रिय पुत्राला राज्य दिले, अल्पपराक्रमी तुझ्या पुत्राला वनात हाकलून दिले. मी पराक्रमी राजा तुझ्या दाराशी येऊन तुझ्या प्रेमाची अपेक्षा करतोय. माझा धिक्कार करणे उचित ठरणार नाही. तुला पश्चातापच सोसावा लागेल. पुरुरव्याला सोडून उर्वशी स्वर्गात गेली, काय मिळाले तिला? रामाचा पराक्रम व युद्धातील शक्ती माझ्या अंगुलीइतकीही नाही. मी तुझ्या दारात आलोय, हे तुझे भाग्य समज.”
सीतेने धीर एकवटला, “तुझा मी पुन्हा धिक्कारच करते. इंद्रपत्नीचे अपहरण करुन कुणी जिवंत राहीलही. माझ्यासारख्या स्त्रीचा अपमान करून तू अमृत कलश प्यालास तरी तुझी मृत्यूतून सुटका नाही.” सीतेचे कठोर वचन ऐकताच रावणाने प्रचंड टाळी वाजवून आपले गोसाव्याचे रुप त्यागले. शरीर अवाढव्य केले. डोळे लाल झाले. हे उन्मत्त स्त्रिये! मी आकाशात अधांतरी राहून पृथ्वी तोलून धरीन, सूर्याच्या तोंडात बाण मारून समुद्र पिऊन टाकीन. तिन्ही लोकींच्या राजाची पत्नी हो. स्त्री वचनाने राज्यभ्रष्ट झालेल्या रामात काही दमच नाही.”
रावण आणखी पुढे सरकला. एका हाताने सीतेचे केस पकडून दुसर्या हाताने तिला कमरेखालून वर उचलले. (सीतेने परपुरुषाचा स्पर्श मला कधीच सहन होणार नाही, शक्य त्या प्रकारे आत्महत्या करीन, असा लक्ष्मणाजवळ उल्लेख केला होता.) गाढवाच्या रथात ठेवले. विराध राक्षसाने तिला असाच स्पर्श केला होता, तो पहिला. रावणाने केलेला दुसरा. (या आधीच्या लेखात होडीतून गंगेचा काठ बदलून जातेवेळी रामाच्या आज्ञेनुसार लक्ष्मणाने सीतेला हाताला धरून सावरले, असा उल्लेख आला होता. तो पहिला परपुरुषस्पर्श असला तरीही तो पवित्र कर्तव्यस्पर्श होता.) सीतेने व्यथित मनाने किंकाळ्या मारल्या. रामाला हाका मारल्या. “महाबाहू लक्ष्मणा धाव. मायावी राक्षस मला पळवून नेतोय. रघुनंदना सर्वस्वाचा त्याग केलात. मी पळवली जात असता तुम्हाला दिसत कसे नाही? रावणाच्या कुकर्माचे फळ त्याला त्वरित द्या.” “हे वृक्षांनो, रामाला सांगा की त्याची पत्नी रावणाने पळवली आहे. हे सरिते गोदावरी, वनदेवतांनो, पक्षांनो रामाला सांगा त्यांची प्रिय पत्नी सीता असाहाय असताना रावणाने पळवून नेली आहे. माझे पती राम इतके बलिष्ठ आहेत, की वैवस्वताने (मृत्यूदेव यम) मला पळवली तरी परलोकातून परत आणतील. क्षुद्र रावणा! तुझी काय कथा? तुझे दिवस आता भरलेच म्हणून समज.”
- (क्रमश:) -
पुढील भाग » [पुढील भागाचे शीर्षक]
राजा पटवर्धनराजा पटवर्धन हे विज्ञान, समाज, अर्थशास्त्र आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत. कोकणातील विकास प्रकल्पांवर यांनी सातत्यपूर्ण लेखन केले आहे. यांचे ‘पुनर्शोध महाभारताचा’ हे पुस्तक प्रकाशित आहे.
ईमेल:
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
रविवार, ३ ऑगस्ट, २०२५
मारिचाचे मरण, सीतेचे हरण
संबंधित लेखन
ऑगस्ट-२०२५
पुनर्शोध रामायणाचा
राजा पटवर्धन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा