Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

कार्यकर्तीच्या छत्रछायेत कथाकार

  • ग्रंथ समीक्षा

    HeartLamp

    कन्नड साहित्यात मुस्लिम समाज जीवनाचं, विशेषतः मुस्लिम आणि पुरुषसत्ताक समाजातील स्त्रियांच्या परिस्थितीचं यथातथ्य चित्रण करणाऱ्या अग्रदूत कन्नड कथाकार म्हणून सारा अबू बकर ओळखल्या जातात. २०२३ मध्ये वयाच्या ८७व्या वर्षी त्यांचं निधन झालं. बानू मुश्ताक या बुकर पुरस्कार विजेत्या लेखिकेच्या त्या पूर्वसूरी होत. त्यामुळे कर्नाटकातल्या मुस्लिम स्त्रियांच्या आयुष्याची परवड चितारणाऱ्या बानू मुश्ताक यांच्या कथा आणि त्यांच्या निवडक कथांचा संग्रह ‘हार्ट लॅप’ हा कन्नड साहित्यातला नवा प्रवाह असं समजण्याचं कारण नाही. ते सूतोवाच याआधीच सारा यांच्या लेखणीने केलेले आहे. तो प्रवाह याआधीच सारा यांच्या लेखणीतून स्रवत राहिलेला आहे.

    मूळ मल्यालम मातृभाषा असलेल्या सारा यांचं सगळं शिक्षण कन्नडमध्येच झालं आणि लेखनही त्यांनी कन्नडमध्येच केलं. ‘चंद्रगिरीतीर दल्ली’ या त्यांच्या कथेनं त्यांना कन्नड साहित्यविश्वातलं पहिल्या पंक्तीतलं स्थान मिळवून दिलं. धर्माचा आणि पुरुषसत्ताकाचा काच मुस्लिम स्त्रियांच्या आयुष्याची कशी परवड करतो याचं अतिशय बोचरं चित्रण करणाऱ्या या कथेनं वादही ओढवून घेतले आणि मुस्लिम सामाजिक प्रश्न धसास लावण्याची सुरुवातच करून दिली. या कथेचा अनुवाद इंग्रजीत ‘ब्रेकिंग टाइज’ नावानं झालेला आहे. ज्या लंकेश पत्रिकेत ‘चंद्रगिरीतीर दल्ली’ मालिकेच्या रूपात प्रसिद्ध होत झाली होती, त्याच नियतकालिकात बानू मुश्ताक यांनी वार्ताहर म्हणून आपल्या कारर्कीदीला सुरुवात केली होती. तेव्हा सारा अबू बकर यांची स्मृती मनात बाळगूनच बानू मुश्ताक यांच्या बुकर पुरस्कार विजेत्या पुस्तकाचा आढावा घ्यायला हवा.

    संग्रहातील पहिली कथा आहे ‘स्टोन स्लॅब्ज फॉर शाइस्ता महल’. कथेची निवेदिका आहे झीनत ही नवपरिणीत, सुशिक्षित स्त्री. ती सुरुवातीलाच नवरा या संकल्पनेभोवती धर्मानं निर्माण केलेल्या देवत्वाची परखड चिकित्सा करते. पतिदेव या संबोधनाची सालटी काढते. लग्नानंतरचे पहिले तीन महिने अतिप्रेम केल्यानंतर आता आपला नवरा नॉर्मल नवरा झाला असल्याचं सांगत ती सतत सावधपणे नवऱ्याच्या वागण्याचीही चिकित्सा करते आहे. यानंतर कथेत प्रवेश होतो, तो नवऱ्याचा सहकारी पन्नाशीचा इफ्तिखार आणि त्याची दहा वर्षांनी लहान असलेली बायको शाइस्ता यांचा. शाइस्तानं काही वर्षांतच सहा मुलांना जन्म देऊन आता ती सातव्यावेळी गरोदर राहिली आहे. यापायी सर्वात मोठ्या मुलीचं आसिफाचं शिक्षण थांबवून तिला भावंडांची आईच व्हायला लावलं आहे. इफ्तिखारच्या मते, मुलीला फार शिक्षणाची गरज नाही. शाइस्ताला ऑपरेशन करून घ्यावं असंही वाटतंय, पण इफ्तिखारचं म्हणणं, कितीही मुलं झाली तरी मी त्यांना पोसायला समर्थ आहे. झीनत इफ्तिखार आणि शाइस्ताच्या संसाराचं निरीक्षण करते आहे, निवेदन करते आहे. इफ्तिखारचं बायकोवरच्या प्रेमाचं अवास्तव प्रदर्शन ती नोंदत राहते. शहाजहाननं बायकोसाठी ताजमहल बांधला तसाच मी शाइस्ता महल बांधीन असं म्हणत इफ्तिखार आपल्या पत्नीप्रेमाचं प्रदर्शन मांडतो, तेव्हा मुजाहिद झीनतचा नवरा - त्याला ताजमहाल हा शहाजहानच्या बायकोची कबर असल्याचं निदर्शनाला आणून देतो. आईचा मृत्यू आयुष्यभर मनात वसत राहतो, पण बायकोच्या मृत्यूचं दुःख फार दिवस टिकत नाही हे त्याचं विधानही झीनतला आपल्या आईच्या शब्दांची आठवण करून देतात. ती म्हणाली होती, बायकोच्या मृत्यूचं दुःख हे कोपर आपटल्यावर होणाऱ्या असह्य पण तात्कालिक वेदनेसारखं असतं. काही सेकंदांतच ती वेदना नाहीशी होते. झीनत कथन करीत असलेल्या या प्रसंगांतून आणि संवादांतून पुरेशा हिंट्स दिल्यानंतर कथेचा शेवट होतो, तेव्हा सातव्या बाळंतपणात शाइस्ता मरण पावलेली आहे आणि इफ्तिखारनं चाळीस दिवसांचं सुतक संपताच अठरा वर्षांच्या मुलीशी लग्न केलं आहे. झीनतच्या निवेदनातून पोहोचलेलं सूचन कथेच्या शेवटाची पूर्ण कल्पना देऊन जातं. किंबहुना, कथेचा नाट्यपूर्ण परिणाम साधण्यासाठी जे वळण अचानक यावं लागतं, जो ट्रिस्ट यावा लागतो, त्याचा संपूर्ण अभाव कथा सपक करून टाकतो. कथा म्हणण्यापेक्षा एका परिस्थितीचं निवेदन एवढंच कथेचं स्वरूप उरतं.

    AmongstMuslims
    मुस्लीम समाजातले स्त्री केंद्री ताणेबाणे बानू मुश्ताक आपल्या कथांतून टिपतात. ते टिपताना त्यांच्या लेखनात स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह दिसत राहतो आणि या आग्रहाला विरोध करणारे जळजळीत वास्तवही ते तितक्याच प्रभावीपणे मांडतात...

    मुतवल्ली म्हणजे वक्फचा विश्वस्त. ‘फायर रेन’ ही कथा मुतवल्लीच्या पुढचा धार्मिक पेच मांडते. मुतवल्ली हा कोणत्याही पारंपरिक मुस्लिम पुरषासारखाच (किंवा कोणत्याही धर्मातील पारंपरिक पुरुषासारखाच) आहे. बायकोला तो काडीची किंमत देत नाही. मुतवल्ली वक्फचा विश्वस्त या नात्याने गावातल्या मुस्लिम सामाजाचा नेताच. घरात आणि गावात त्याची सत्ता. वडिलोपार्जित इस्टेटीत आपला वाटा मागायला बहिणीनं यावं हे त्याला आवडलेलं नाही. आजारी मुलाकडे दुर्लक्ष. काही ना काही कारणासाठी मदत मागायला गावातल्या लोकांची त्याच्या घरापुढे रीघ. कुणाला आजारी आईच्या उपचारासाठी पैसे हवेत, लेकीच्या लग्नासाठी पैसे हवेत, कुणाला नोकरी हवी... यात कुणाला मदत करण्याचा मानस नसला तरी मुतवल्लीचा अहंकार गोंजारला जातोच. आणि अशावेळी त्याच्यापुढे एक धार्मिक पेच उभा राहतो. गावातला गुंड दारुडा रंगारी निसार याचं प्रेत सापडल्यामुळे पोलिसांनी त्याला हिंदू स्मशानात पुरून टाकलं आहे. ही बातमी कळताच एरवी सगळ्यांची फसवणूक करत आलेल्या निसारच्या मोक्षाची काळजी मुतवल्लीसहीत गावाला वाटू लागते आणि मुतवल्लीच्या पुढाकारने निसारचं प्रेत उकरून काढून त्याचं सन्मानाने मुस्लिम रिवाजानुसार कब्रस्तानात दफन करण्यासाठी सगळे सरसावतात. एकदा हा धार्मिक प्रश्न उभा राहिल्यानंतर मुतवल्लीकडे सोडवणुकीसाठी आलेले सगळे प्रश्न आपोआपच मागे पडतात. कारण आता धर्म वाचला पाहिजे! निसारला कब्रस्तानात स्थान मिळवून दिल्यानं मुतवल्लीच्या नेतृत्वाचा गौरव होणार असतो, त्याचं राजकीय वजन वाढणार असतं. या प्रयत्नातलं वैयर्थ कुणालाच जाणवत नाही आणि मुतवल्लीचा हेतू तर त्याचा राजकीय फायदा घेणं हा आहे. पण थाटामाटात निघालेल्या प्रेतयात्रेत अचानक नवाच पेच समोर उभा ठाकतो. समोर जे सत्य येतं ते मान्य करणं मुतवल्लीला अडचणीचं असतं. धर्माच्या नावावर चाललेला सगळाच दांभिकपणा उघडा पडतो. तेव्हा ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशा पद्धतीनं दफनविधी पार पाडला जातो.

    ज्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, ते सगळे प्रश्न मनात कावकाव करत असतानाच घरी परतलेल्या मुतवल्लीला मुलाकडे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम सामोरा येतो. मुतवल्लीनं निसारचं प्रकरण उचलून धरणं, ते प्रेतयात्रेतला आकस्मिक उद्भवलेला प्रसंग पुरुषसत्तेपायी स्त्रियांच्या होणाऱ्या दुर्दशेच्या कथेची दिशा थोडी बदलतो आणि खरं तर विनोद व उपरोधासाठी चपखल परिस्थिती तयार करून देतो. आजारी मुलाच्या समावेशानं सामाजिक कार्यकर्ता कथाकार स्त्री-प्रश्न धरून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण मुख्यतः कथा रंजक होते, ती निसार प्रकरणामुळे.

    ‘ब्लॅक कोब्राज’ या कथेत बानू मुश्ताक यांच्यातली सामाजिक कार्यकर्ती त्यांच्यातल्या कथाकाराहून वरचढ ठरते. ही तीनही मुलीच जन्माला घातल्यामुळे नवऱ्याने सोडून दिलेल्या पत्नीची - अशरफची कथा आहे. आपले व मुलींचे पोट भरण्यासाठी अशरफला जुलैखा बेगमच्या घरी कामाला जावे लागते. जुलैखा बेगम सुशिक्षित स्त्री आहे. ती सतत अशरफला मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांविषयी लेक्चर देते. मुतवल्लीकडे दाद मागायला जायला सुचवते आणि लेखी निवेदनही अशरफला लिहून देते. त्यापलीकडे ही स्त्रियांच्या हक्कांविषयी जागरूक असलेली जुलैखा कोणतीही कृती करत नाही. याउलट मुतवल्लीची बायकोच मशिदीसमोर बसलेल्या भुकेल्या अशरफला आणि तिच्या मुलींना खायला देण्याचा प्रयत्न करते. सात मुलांना पैदा करूनही समाधान न मानणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या- मुतवल्लीच्या - वागण्यावर ती दबल्या सुरात का होईना, आपला निषेध व्यक्त करत राहते.

    या कथेतला मुतवल्ली हा सुद्धा पदसिद्ध माजोर्डेपणा आणि पुरुषी अरेरावी लेवूनच फिरतो. सर्वप्रकारचे ऐश करतो, बायकोसह स्त्रियांना किंमत देत नाही. अशरफचा रिक्षावाला नवरा त्याचा सवंगडी आहे. दरम्यान त्याने दुसरं लग्नही केलेलं आहे. मुतवल्ली अशरफच्या नवऱ्याचीच बाजू घेतो. अशरफला म्हणतो, तुला मुलगा होत नाही मग त्याने दुसरं लग्न केलं तर काय बिघडलं? चार लग्नं करायची मुभा धर्मानेच दिलेली आहे. परंतु पहिल्या बायकोच्या आणि तिच्यापासून झालेल्या मुलांच्या भरणपोषणाची जबाबदारी अशा नवऱ्याने टाळून चालणार नाही या धर्माच्याच कायद्याचा उल्लेख मात्र तो करत नाही. अशरफला न्याय कसा मिळणार? अखेर अशरफची आजारी मुलगी मशिदीसमोर प्राण सोडणार हे ओघाने आलंच. यानंतर मात्र गावातल्या पुरुषग्रस्त मुस्लिम स्त्रिया बंडासाठी एकत्र येतात, ही कथेची वास्तववादी परिणति वाटण्यापेक्षा कथाकारातील सामाजिक कार्यकर्तीचे स्वप्नरंजन अधिक वाटते.

    KarnadGauriD
    बानू मुश्ताक यांच्या कथा घटना-प्रसंगांतून फुलण्याऐवजी निवेदनाच्या अंगाने प्रामुख्याने पुढे जात राहतात. त्यात त्यांच्यातल्या कथाकारा-ऐवजी कार्यकर्ता प्रामुख्याने डोकावत राहतो...

    याच कथेवर गिरीश कासारवल्ली यांनी ‘हसीना’ हा आपला चित्रपट बनवला आहे. मूळ कथेतल्या भाषणबाजीला पूर्ण फाटा देऊन नेटकी केलेली ही पटकथा आणि तिच्यावरील चित्रपट मूळ कथेपेक्षा किती तरी अधिक प्रभावी ठरला आहे. साहित्यकृती हा केवळ चित्रपट-दिग्दर्शकासाठी टेक ऑफ पॉइंट असतो. तिथून पुढे ती संपूर्णपणे त्याच्या प्रतिभेतून निर्माण झालेली त्याची कलाकृती असते, याचा प्रत्यय या ठिकाणी प्रकर्षाने आलेला आहे.

    ‘अ डिसिजन ऑफ द हार्ट’ ही कथा आहे बायको नावाच्या तोफखान्याची, सासूविरोधात बायकोच्या सततच्या कटकटींनी हतबल झालेला नवरा आणि त्याची सहनशील आई यांची. वडिलांच्या मागे पुनर्विवाह न करता आईने एकटीने वाढवल्याची जाणीव युसुफमध्ये आहे. त्याच्या मातृभक्तीमुळे अधिकच चिडलेली अखिला सासूवर वाटेल ते आरोप करते, तिला आपली सवत म्हणते. यातून स्वतःला आणि आईलाही सोडवण्याचा उपाय म्हणून पन्नाशीत असलेल्या आईचा पुनर्विवाह करून द्यायचे युसुफ ठरवतो आणि आईचे मत न घेता तयारीला लागतो, तेव्हा कांगावखोर अखिला नवा पवित्रा घेऊन सासूची माफी मागू लागते. कोणतेही मतप्रदर्शन न करणारी आई ‘आईच्या हृदयाची हाक’ ऐकते. कथा 'ते हृदय कसे आईचे' या सुरावर संपते.

    ‘रेड लुंगी’मधून हट्टीकट्टी गरिबी, दुबळी श्रीमंती या सूत्राबरोबरच बानू मुश्ताक खतना या मुस्लिम प्रथेतल्या क्रौर्यावर भाष्य करतात. ते धाडस कौतुकास्पद. ‘हार्ट लॅप’ या कथेचे शीर्षकच कथासंग्रहाचे शीर्षक म्हणून निवडलेले आहे. इंग्रजी भाषांतरात विचित्र वाटणाऱ्या या शीर्षकामागे हिंदी-उर्दू भाषांतल्या दिल का दीया किंवा मन का दीप ही संकल्पना आहे. इथेही पत्नीकडे दुर्लक्ष करणारा, दुसऱ्या स्त्रीशी लग्न करू पाहणारा नवरा आहे. माहेरही मेहरुनला थारा देत नाही, तेव्हा अंगावर रॉकेल ओतून घेणाऱ्या तिची व्यथा जाणती झालेली तिची मुलगीच जाणते आणि तिच्या सदसद्विवेकाला साद घालते. पुरुषप्रधान समाजात सर्वच बाजूंनी कोंडी झालेल्या स्त्रीच्या नशिबात पोटच्या अपत्याची माया हा देखील निर्णय तडीस नेण्यातला एक अडथळा असतो आणि त्याचवेळी ती माया तिला जगण्याचं बळ देते. स्त्रीचं हे प्राक्तन म्हणजे ‘हार्ट लॅप’. कार्यकर्तीचा वेष जरा उतरवून लेखिका या कथेतून कथाकार म्हणून समोर येते, ही समाधानाची बाब.

    कथा फुलवण्यापूर्वी कथानकाचा कच्चा खर्डा लिहून काढावा तसं काहीसं स्वरूप ‘हाय हील्ड शू’चं जाणवतं. नयाझ खानला वाटणारं थोरल्या भावजयीच्या पेन्सिल हील्सच्या बुटांचं आकर्षण, आपल्या बायकोलाही तसेच बूट असावेत अशी मनात निर्माण झालेली इच्छा, कौटुंबिक गरजांपेक्षा या बुटांनीच घेतलेला त्याच्या मनाचा ताबा यातून गरजांपेक्षा चैनबाजी आणि दिखाऊपणाच्या चंगळवादी हव्यासाचे प्रतिनिधिक रूप कथालेखिका वर्णन करते. वर्तमान समाजाच्या या स्वभावाविषयीचे मतप्रदर्शन करते आणि कथेचा ओघ थांबवून, कांचनमृगाच्या मागे अवघे जग पळत आहे, आजच्या संस्कृतीचे हे रूप आहे, असे निबंधाला साजेसे भाष्य करते.

    प्रचारकीपणाचा आधार न घेता मानवी स्वभावाचं कोडं पेश करणारी ‘सॉफ्ट व्हिस्पर्स’ ही कथा, कथा-तत्त्वाशी अधिक प्रामाणिक वाटते. वर्गभेदातून येणाऱ्या मानसिकतेचं अगदी सूक्ष्म सूचन त्यात आहे. तरुण निवेदिकेकडे गावच्या उरुसाचं आमंत्रण द्यायला मशिदीतला मुजावर- मशिदीची साफसफाई, देखभाल करणारा नोकर-आबिद यायचा आहे. इथून निवेदिकेच्या लहानपणाची आठवण तिच्या मनाच्या पृष्ठभागावर येते. निवेदिकेच्या प्रतिष्ठित कुटुंबाकडे गावच्या मशिदीचं व्यवस्थापन आहे. या नात्याने मुजावर हा या कुटुंबाचा नोकरच होतो. दहाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या निवेदिकेच्या आपल्या आतेभावा-बहिणींबरोबर खेळण्या-बागडण्यात मुजावराचा चौदा पंधरा वर्षांचा मुलगा आबिदही आहे. झाडावर चढता न येणाऱ्या छोट्या निवेदिकेला तो उचलून फांदीवर ठेवतो, पोहता न येणाऱ्या तिला पाण्यात खेचून अचानक तिच्या गालावर ओठ टेकतो. दहाव्या वर्षांत पाऊल ठेवलेल्या निवेदिकेच्या आयुष्यात तो क्षण विजेसारखा चमकून जातो. कसला तरी प्रत्यय, मोठ्यांकडून नकळत कळलेलं नकळलेलं काही तरी निषिद्ध असतं असं अस्तर मनाला चिकटू लागण्याचं ते वय... कालांतराने आता शहरात तिच्याकडे तोच आबिद येणार आहे. वडिलांच्या पश्चात आता तो मुजावर झाला आहे. कुटुंबातल्या इतर कुणालाच उरुसाला हजर राहता येणार नसल्यामुळे निवेदिकेवर ती जबाबदारी आली आहे... आबिद येतो. खालमानेने, नजर जमिनीवर खिळवून आणि निवेदिकेला ‘आपा’ (ताई) असं संबोधून तिला उरुसाचं आमंत्रण देतो. वयाने वाढलेल्या आबिदला निवेदिकेच्या आणि आपल्या सामाजिक स्थानांतील फरक लक्षात आलेला आहे. निवेदिका हे नोंदते, पण त्याचा कसलाही ऊहापोह न करता इतकंच म्हणते की ‘काही माणसं असतात अशी. सगळं उलटं पालट करून टाकतात.’ ही सूचकता संग्रहाच्या सुरुवातीच्या कथांमध्ये का उतरत नाही, असा विचार इथे वाचकाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.

    ही सूचकता संग्रहातल्या पुढच्या ‘अ टेस्ट ऑफ हेवन’मध्ये आहे. किंबहुना या सूचकतेची पूर्ण शक्यता तीत आहे, फक्त कथेच्या शिल्पावर कठोरपणे छिन्नीचा वापर केला असता, तर तिचं सौष्ठव खुललं असतं, असं वाटल्यावाचून राहत नाही. कथा आहे एका वृद्ध बालविधवेची. बी दादी ही सआदतची बालविधवा आत्या त्याच्याकडे राहते आहे. साऱ्या सुखांपासून, आनंदापासून, मौज-मजेपासून कायमची दूर, त्याबद्दल कधीच तक्रार न करणारी, पाचही वेळा आपल्या जीर्ण सतरंजीवर नमाज अदा करणारी. देऊ केलेली नवी सतरंजी तिने कधीच स्वीकारली नाहीय. घरात पडतील ती सगळी कामं ती करते. अशा बी दादीची सतरंजीच नातू सायकल पुसायला घेतो आणि सतरंजी घाण होते, तेव्हा मात्र बी दादीचा बांध फुटतो. नमाजाची ती लहानशी सतरंजी ही बी दादीच्या कोळपून गेलेल्या आयुष्यातली एकमेव जाईची कळी होती. तिला जाईचा सुगंध होता. फार पूर्वी कधी तरी (कदाचित तिच्या तरुणपणी) एकदा दोरीवर सतरंजी वाळत असताना बी दादीच्या खिडकीतून कुणी तरी जाईची फुलं सतरंजीवर उडवली, त्या क्षणाचा तो सुगंध बी दादी जपत आली आहे. त्यात लहानपणीच लग्नानंतर तत्काळ मृत्यू पावलेल्या आणि तिने ज्याला कदाचित कधी पाहिले नव्हते, त्या तिच्या नवऱ्याचं अस्तित्व आहे. तिनं कधीही न अनुभलेल्या प्रणयाचा तो भास ती जपत आली आहे. बालविधवेच्या दमित भावनेचा इतका हळुवार प्रत्यय आणून देताना मात्र कथेचा सुरुवातीचा मोठा भाग सआदतच्या बायकोच्या नॉन-स्टॉप करवादण्याने, त्यापायी हतबल सआदत आणि त्रासलेली मुलं यांच्या वर्णनानी व्यापलेला आहे. त्यामुळे प्रथम ही कथा एका करवादणाऱ्या बायकोची आहे, असाच समज होतो. बी दादीचा प्रवेश बराच नंतर होतो. सतरंजीच्या रहस्याचा उलगडा झाल्यानंतरही कथेचा फापटपसारा चालूच राहतो आणि बी दादीच्या कथेतल्या हळुवारपणावर विनाकारण पाणी पडतं.

    धार्मिक पगडा व्यक्तीला मग ती शाझियासारखी श्रीमंत, साधनसंपन्न असो की यासीन बुआसारखी अभावग्रस्त, गरीब बिचारी बाई आपल्या गरजा बाजूला सारून धार्मिक प्रथा-परंपरा जगण्याच्या नादात केवळ दुःखच सोसायला लावतो, याचे दर्शन ‘श्राऊड’ या कथेत होते.

    ‘द अरेबिक टीचर अँड गोबी मांचुरियन’ या कथेत विनोदाच्या शक्यता आहेत. पण त्या खेळकर अंगाने आजमावण्याची प्रकृती लेखिकेची दिसत नाही. धार्मिक शिक्षणासाठी आवश्यक अशी अरबी भाषा शिकवणाऱ्या तरुण मौलवीच्या जीवनातला एकमेव आनंद आणि त्याचं एकमेव ध्येय म्हणजे गोभी मांचुरियन हा खाद्यप्रकार. लग्नासाठी मुलगी बघताना गोभी मांचुरियन बनवू शकणे ही एकमेव अपेक्षा. जेव्हा ती पुरी होत नाही, तेव्हा तो शिरस्त्यानुसार बायकोचा छळ करतो. प्रकरण वकिलापर्यंत येतं तेव्हा कथेच्या निवेदिका उर्फ व्यवसायाने वकील असलेल्या बानू मुश्ताक यांना पेच सोडवण्यासाठी गोभी मांचुरियनची रेसिपी शोधावी लागते.

    प्रसंग फुलवण्याऐवजी निवेदनावरच अधिक भर देणे हे बानू मुश्ताक यांच्या कथनशैलीचं वैशिष्ट्य दिसतं. पण त्यामुळे वाचकाला प्रत्यक्षदर्शी असल्याचा अनुभव येत नाही आणि रसास्वाद उणावतोच.

    ‘बी अ बूमन वन्स ओ लॉर्ड’ ही शेवटी कथा म्हणजे प्रत्यक्षात निबंध आहे. एकदा तरी बाई होऊन बघ, असं ईश्वराला सांगणारं हे त्याला लिहिलेलं पत्र किंवा निवेदिकेचा एकतर्फी संवाद आहे. शीर्षकावरून स्पष्टच आहे की निवेदिकेने यात स्त्रीच्या जन्माला आल्यामुळे पुरुषांच्या या जगात तिच्या वाट्याला आलेल्या सर्व मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी दुःखांची जंत्रीच आपल्या जीवनकथेतून मांडली आहे. थोडक्यात, इतर कथांमधून लेखिकेला जे सांगायचे आहे त्याचे सार या निबंधात आहे. एका सामजिक कार्यकर्तीद्वारे कथा हा प्रकार हाताळण्याच्या मागचा उद्देश स्त्री-शोषणाविरुद्ध हिरीरीनं आवाज उठवण्याचा आहे.

    कथांतला समाज मुस्लिम आहे, मुस्लिम समाजातल्या रूढी-परंपरांचे दर्शन त्यात होतं. त्याचबरोबर शैलीत लक्ष्मणरेखा, शकुनीमामा, असे रामायण, महाभारतातले उल्लेख येतात, तेव्हा हा समाज भारतीय मुस्लिम सामाज आहे हे सूक्ष्मपणे अधोरेखित होतं, हे नमूद करायला हवं. भौगोलिक लोकसंस्कृती ही धर्म या संकल्पनेच्यावरही कशी दशांगुळे उरते आणि आपलं अस्तित्व दाखवत असते याचं हे उदाहरण.

    स्त्रीचं शोषण हा धागा सर्व धर्मांत समान राहिला आहे. प्रत्येक धर्मातल्या ‘अनंता’ने स्त्रियांना जसे ‘ठेविले तैसेचि’ राहण्यात स्त्रिया सर्वसाधारणपणे जन्माचे सार्थक समजतात. क्वचित काही स्त्रिया तक्ररीचा सूर लावतात आणि सोसतच राहतात. काही थोड्या स्त्रिया शोषणाविरुद्ध आवाज उठवतात, त्यात कथा-लेखिका येते. परंतु कथा-लेखिका एक विचारवंतदेखील आहे. समाजाचं निरीक्षण करणारी आहे. तर हे चित्रण एखाददुसऱ्या करवादणाऱ्या बायकोच्या हतबल नवऱ्यापलीकडे एकांगी होत जातंय, की काय असा विचार तिच्यातल्या कथाकाराला येत नाही.

    -oOo-

    ‘हार्ट लँप’ सिलेक्टेट स्टोरीज : बानू मुश्ताक
    कन्नडमधून इंग्रजी अनुवाद: दीपा भास्ती. पेंग्विन बुक्स


    RekhaD

    रेखा देशपांडे या ज्येष्ठ पत्रकार, लेखिका, अनुवादिका आणि चित्रपट अभ्यासक आहेत.
    ईमेल: deshrekha@yahoo.com.



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा