-
आत्म संवाद
सिसिफसने जगण्यातल्या अगम्यतेचा स्वीकार केलेला आहे आणि तरीही आयुष्य निर्धाराने जगत राहण्याची निवड केलेली आहे. आपल्या आयुष्यात जे काही घडतेय, त्यामागची कारणे आपल्याला बहुतेकवेळा दिली जात नाहीत. मिळतही नाहीत. त्यामुळे निष्ठूर वास्तवाखेरीज वा वास्तवाला तोंड देण्यापलीकडे आपल्या हातात काही उरतही नाही. अशा प्रसंगी प्रतिक्रिया देणे किंवा परिस्थितीला प्रत्युत्तर देणे एवढी मर्यादशील कृती आपल्या हातून घडते. त्या अर्थाने, मीच का? हा पडणारा वा पडलेला प्रश्न, हे विदग्ध मनाचे केवळ रुदन नसते...व्हाय मी? मीच का? संकटाच्या प्रसंगी हा प्रश्न मनात हटकून फणा काढून उभा असतो. हा प्रश्न तुम्ही हॉस्पिटल वॉर्डमध्ये असताना उफाळून येतो. रोगाचे निदान झाल्यानंतरच्या सून्न क्षणांमध्ये डोके वर काढतो किंवा आजाराशी झुंजणाऱ्या प्रियजनांच्या उशाशी बसले असताना तुम्हाला अस्वस्थ करतो.
एक सेवानिवृत्त मनोविकार तज्ज्ञ आणि एक नवरा म्हणून मी जेव्हा माझ्या ५२ वर्षांच्या बायकोला पार्किन्सन्सच्या दुर्धर नि वेदनादायी आजाराशी झुंजताना पाहत असतो, तेव्हा या प्रश्नाची मला पुरती जाण असते. ही काही केवळ एक सैद्धांतिक चिकित्सा नसते, तर जगण्यासाठी किंवा जगण्याच्या धडपडीसाठीचे घेतलेले श्वास, प्रियजनांचा दुरावा आणि न संपणाऱ्या कितीतरी रात्री अनुभवताना आकारास आलेली ही जाण असते.
अल्बेर काम्यू लिहितो, मानवी आयुष्याला अर्थ आहे का आणि ते जगण्यायोग्य आहे का, हाच या जगातला सर्वात गांभीर्याने घेण्याजोगा तत्त्विक प्रश्न आहे. या संदर्भाने काम्यूने आपल्याला सिसिफसची प्रतिमा भेट दिली आहे. सिसिफस हा ग्रीक पुराण कथेतला असा कमनशिबी राजा आहे, ज्याला देवाने भलीमोठी शिळा डोंगरावर चढवण्याची शिक्षा देण्यात आलेली आहे. सिसिफसचे प्राक्तन हे आहे, की शिळा वर चढवण्याला, ती पुन्हा पुन्हा घरंगळत येण्याला अंत नाही. हे कधीही न संपणाऱ्या दुःख वेदनांचे प्रतीक आहे. तरीही, सिसिफस एकच कृती न थकता करत राहतो आहे. इथे, आनंदी सिसिफसची कल्पना करण्यास काम्यूने जणू आपल्याला आमंत्रित केले आहे. सिसिफसला दिलेल्या शिक्षेत बदल झाला, म्हणून नाही तर त्याच्या मनात बदल झाला म्हणून तो आनंदी असल्याचे काम्यूला सुचवायचे आहे.
बळ निर्धाराचे
सिसिफसने जगण्यातल्या अगम्यतेचा स्वीकार केलेला आहे आणि तरीही आयुष्य निर्धाराने जगत राहण्याची निवड केलेली आहे. आपल्या आयुष्यात जे काही घडतेय, त्यामागची कारणे आपल्याला बहुतेकवेळा दिली जात नाहीत. मिळतही नाहीत. त्यामुळे निष्ठुर वास्तवाखेरीज वा वास्तवाला तोंड देण्याखेरीज आपल्या हातात काही असत नाही. उरतही नाही. अशा प्रसंगी प्रतिक्रिया देणे किंवा परिस्थितीला प्रत्युत्तर देणे एवढी मर्यादशील कृती माणूस म्हणून आपल्या हातून घडते. त्या अर्थाने, मीच का? हा पडणारा वा पडलेला प्रश्न हे विदग्ध मनाचे केवळ रुदन नसते, तर मीच का? या प्रश्नाच्या उत्तरासाठीची केलेली एक प्रकारची याचिका असते. हे खरे तर मानवी अस्तित्वाच्या गाभ्याशी नेमके दडलेय काय, याची चिकित्सा करण्यासाठीचेही बोलवणे असते.
आपला मर्यादांशी आमनासामना होतो, तेव्हाच मीच का? हा प्रश्न उभा राहतो. हे केव्हा घडते, तर जेव्हा आजारपणाचा विळखा पडतो किंवा आपले करियर आकस्मिक संपते किंवा दुःखवेग आपल्याला कोलमडून टाकतो तेव्हा, आपण अंतर्बाह्य हादरून जातो. आपले आयुष्य आपल्या ताब्यात राहत नाही. आपण रचत आलेल्या आपल्या आयुष्याच्या गोष्टीवर आपला ताबा राहत नाही. मनोविकार तज्ज्ञ व्हिक्टर फ्रैंक हे हिटलरने उभारलेल्या आऊत्स्वित्झ छळछावणीतून बचावले होते. ते म्हणतात, माणूस हा कल्पनाही करता येणार नाही, इतकी वेदना सोसू वा सहन करू शकतो. मीच का? किंवा का? हा प्रश्न त्यांचे उद्दिष्ट असेल, तर सहनसिद्धीतून तो सहज तरुन जाऊ शकतो, विशेषतः जेव्हा आपण परिस्थिती बदलू शकत नाही, हे पुरेसे स्पष्ट होते, तेव्हा तर हे खचितच घडू शकते. या संदर्भाने ते असेही लिहितात की, स्वतःला बदलण्यासाठी अशा रितीने आपल्याला आव्हान मिळालेलं असतं.
वास प्रेमाचाच
माझ्या आयुष्यात तर हे अनेक अर्थाने खरे ठरले आहे. माझ्या बायकोचे खचत जाणे, क्षीण होत जाणे सर्वकाही बदलून टाकणारे ठरले आहे. आता मला एकही सुट्टी नसते. घराबाहेर सहजपणे फेरफटका मारायला जाणेही सहसा घडत नसते. इतरांना अनुभवास येणारा निवांतपणाही माझ्या वाट्याला येत नसतो. तरीही प्रत्येक नव्या सकाळी, जसे आम्ही तिची काळजी घेण्यास सुरुवात करतो, तिला खाऊ पिऊ घालतो, तिला फिजिओथेरपी देतो, सौम्य स्वरांतले संगीत ऐकवतो, तिच्याशी मृदु शब्दांत संवाद साधतो, तेव्हा मला याची प्रकर्षाने जाणीव होते की, प्रेम माझ्या घरात, आसपास भरून राहिलेय. नव्हे, प्रेमच अवघे वातावरण भारून आहे. तेव्हा हे असे प्रेम व्यापून असते, तेव्हा आयुष्याला, आयुष्य जगण्याला अर्थ आलेला असतो.
समानुभूती, सहवेदनेची जाणीव माणसाचे माणूसपण ठळक करत राहते. व्याधीग्रस्तास मदतीचा हात जिथे पुढे येतो, तिथे प्रेम, स्वातंत्र्य आणि मुक्ततेचा अवकाश आकारास येत जातो...एरवी, एखाद्याची काळजी घेणे ही कृती स्वतःचे म्हणून एक ओझे राखून असते. हे एका अर्थाने ऊर्जा आणि ओळखीचे धीमेधीमे त्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीपुरते कापरासारखे उडून जाणेच असते. पण त्याचवेळी हे असे घडणे, आपले व्यक्तित्व भरीव नि सखोल करणारेही ठरते. जी कृती एक कर्तव्य म्हणून सुरू झालेली असते, एका क्षणी कर्तव्याची जागा समर्पणाने घेतलेली असते. तेव्हासुद्धा मीच का? किंवा मलाच का? हा प्रश्न मनात रुतून बसलेला असतो. तो जाणीवही करून देत असतो, परंतु आता या प्रश्नाचे उत्तर तितकेसे महत्त्वाचे राहिलेले नसते. महत्त्वाचे असते, समर्पण भावनेने दैनंदिन कृतींचे साधणे. मनात समर्पणाचा भाव राखत इतरांची देखभाल करणे, जीवापाड काळजी घेत राहणे. श्रद्धाळूसाठी व्हाय मी? किंवा मीच का? हा प्रश्न एकप्रकारची प्रार्थना होऊन गेलेला असतो. ईशस्तवनकर्ता अश्रू ढाळताना म्हणतो, ‘अरे माझ्या परमेश्वरा, का म्हणून तू मला अव्हेरले आहेस.’ हेच शब्द येशू ख्रिस्ताने सुळावर चढल्यानंतर उच्चारले होते. म्हणूनही मला वाटते, शंका आणि संशय हा श्रद्धेच्या विरुद्ध नव्हे तर श्रद्धेचाच एक भाग आहे. अपराध नाही. हिंदू आणि बौद्ध धर्मतत्त्वांमध्ये मानवी आयुष्याची एक अवस्था म्हणून वेदनेचा स्वीकार करण्यात आला आहे. दुःख आणि वेदना ही जाणिवेतून, नि:संगतेतून आणि करुणेतून पाझरत राहणारी आहे. इस्लाममध्ये सब्र ही संकल्पना, दैवी शक्ती रंजल्या-गांजल्यांच्या सोबत असल्याचे, सुचवत आली आहेत.
जाणीव समानुभूतीची
अनेकदा घडते असे की, श्रद्धेमुळे दुःख-वेदना लोप पावत नाहीत, तर त्या तोलून धरल्या जातात. यामुळे आपल्याला एक विस्तृत अवकाश मिळतो, एक चौकट लाभते, ज्यात वेदनेला आपल्याला राखता येते. वेदना सुशोभित होते, म्हणा हवे तर. शेवटी, हे लक्षात ठेवले पाहिजे की, वेदनेचा धीरोदात्तपणे सांभाळ होणे आवश्यक आहे. जैविकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, वेदना एकप्रकाराने आपले संरक्षणही करत असते आणि आपल्याला धोक्याची सूचनासुद्धा देत असते. एकूणच, यातना आपल्याला इतरांपर्यंत पोहोचण्यास भाग पाडतात. शेवटी, मीच का? या प्रश्नाला किंवा या आक्रोशाला उत्क्रांतमूल्यदेखील आहे. हे मूल्य इतरांना, आप्तेष्टांना तुमच्या जवळ आणते, साक्षीदार बनवते, मदतीचा हात पुढे करण्यास प्रेरित करते.
अर्थातच जीवशास्त्रापलीकडे समानुभूती कायमच अवकाश व्यापून असते. आपण जेव्हा यातनांमधून जात असतो, तेव्हा इतरांच्या वेदना जाणून घेण्यातली आपली समज प्रगल्भ झालेली असते. वेदना जाणून घेण्याची आपली क्षमता वाढलेली असते. आपण या क्षमतेला मुक्त वाव दिला तर मन आणि हृदय मोकळे नि मोठे होण्यास प्रारंभ होतो. हा म्हटला तर यातनांतून झालेला एक लाभच असतो. कृपाप्रसादच म्हणा ना. हा कृपाप्रसाद आपल्याला गहनतेकडे नेतो. ही गहनता समानुभूतीची असते!
अर्थात, कालांतराने मीच का? हा प्रश्न आताच का? किंवा ‘मी यातून, या परिस्थितीतून कसा मार्ग काढू?’चे रूप घेऊ शकतो. हा बदल सहज नि तरल पातळीवरचा पण ताकदीचा असतो. निषेधाकडून उद्दिष्टाकडे नेणारा, पंगुत्वाकडून कृतीकडे नेणारा असतो.
तसे पाहायला गेले, तर सगळ्याच प्रश्नांना उत्तरांची गरज नसते. काहींना फक्त ऐकून घेणे गरजेचे असते. तेही शांतपणे ऐकून घेणे गरजेचे असते. धर्मशास्त्रतज्ज्ञ पॉल टिलिच म्हणतातही की, प्रेमाचे पहिले कर्तव्य समोरच्या माणसाचे म्हणणे ऐकून घेणे, हे असते. तेव्हाच, आपण आपलेच म्हणणे ऐकतो, ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांचे म्हणणे ऐकतो आणि हो, नीरव शांततेचेही म्हणणे ऐकतो. तो अवकाश निःशब्द असतो. शब्दशून्य असतो. माझ्या घरात, औषधांच्या पसाऱ्यात, व्हिलचेअर आणि नर्सेसच्या वावरात, खरे तर अडथळ्यातच म्हणा ना, एक हास्य बागडत असते. सुश्राव्य संगीत तरंगत असते. करुणामयी प्रार्थनेचा गुंजारवही होत असतो. वेदना आणि यातनांपासून कोणाचीच सुटका नसते. परंतु यातना कशा सोसायच्या, सहन करायच्या, हे मात्र आपण नक्कीच ठरवू शकतो.
किंबहुना, याच पर्याय निवडीत आपले खरेखुरे स्वातंत्र्य दडलेले असते!
-oOo-
(‘इंडियन एक्स्प्रेस’ दैनिकाच्या ३ जुलै २०२५ च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा स्वैर अनुवाद.)
जॉर्ज जॉनलेखक निवृत्त मनोविकारतज्ज्ञ आहेत.
ईमेल: .
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५
सिसिफस आनंदी आहे...
संबंधित लेखन
आत्म संवाद
ऑगस्ट-२०२५
जॉर्ज जॉन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा