Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

रंगांचा उघडुनिया पंखा...

  • ज्ञान-विज्ञान

    StableDiffusion

    प्रकाशाची उधळण निसर्गाने मुक्त हाताने केली आहे. त्याचे नाना आविष्कार माणूस अनंत कालापासून पाहत आला आहे. पण सामान्यांची नजर आणि चित्रनिर्मिकांची नजरच वेगळी. दर्शकाला वाटते कॅनव्हास, कुंचले, पॅलेट्स, पेन्सिल हे चित्रनिर्मितीचे ‘रॉ मटेरियल’ अहं, हे सगळे दुय्यम. चित्रकाराचे मूळ महत्त्वाचे निर्मितीचे ‘रॉ मटेरियल’ कच्चा माल म्हणजे, प्रकाश. मग हा प्रकाश दिनकराने ‘देता किती घेशील दो कराने’ असो किंवा कृत्रिम प्रकाश असो, वा प्रकाशाचा अभाव असो. प्रकाश महत्त्वाचा. प्रकाशाच्या बहुविध ‘तरंग’ लांबीच्या लहरी म्हणजे रंग. ‘ता ना हि नि पा जा’ याच्या अलिकडे आणि पलिकडे प्रकाशाच्या तरंग लांबी आहेत, ‘इन्फ्रा रेड आणि अल्ट्रा व्हायोलेट’ पण त्या मानवी नजरेला दिसत नाही. त्याला स्पेशल कॅमेरे वापरावे लागतात.

    सेन्सेशन आणि परसेप्शन

    जेव्हा वस्तूवरून प्रकाश परावर्तित होतो आणि माणसाच्या डोळ्यातील दृष्टीपटलातील प्रकाश-ग्राही पेशी उद्दिपित करतो, ते सेन्सेशन = संवेदन. दृष्टीपटलावर पडलेल्या प्रकाश-प्रतिमेचा मेंदू जो अर्थ लावतो, ते परसेप्शन = बोधन. याला बोधन, आकलन, जाणणे, असे पर्यायी शब्द आहेत. हे ‘जाणणे’ गुंतागुतीची प्रक्रिया आहे. व्यक्तीच्या स्मृती, मिळवलेली माहिती, ज्ञान, अनुभव या सगळ्यांचा उपयोग करून त्या संवेदनांचा लावलेला अर्थ म्हणजे, ‘जाणणे’. प्रत्येकाने जमवलेल्या ‘संदर्भ-ज्ञानावर’ ‘बोधन’ अवलंबून असते.

    ‘अॅब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट’ = अमूर्ततेचा चित्रकार काय करतो? दृष्टीपटलावर संवेदनाची एक ठिणगी टाकतो आणि दर्शकांच्या संदर्भ-ज्ञानाला खुणावतो, आवाहन करतो. तो चित्रनिर्मिक काढलेल्या चित्राचे तपशील देत नाही. तो अशी काही ‘चित्रस्थिती’ निर्मितो म्हणजे त्यायोगे दर्शकाने आपल्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या मनात मेंदूत ते चित्र पूर्ण करावे आणि एक विलक्षण अनुभव घ्यावा.

    अमेरिकन तत्त्वज्ञ-मनोवैज्ञानिक विलियम जेम्स (१८४२-१९१०) याने म्हटले आहे, ‘नूतनाचे हे विजयी समावेशन! अमूर्त कलेतून काही दर्शक जे चित्रसुख = प्लेजर अनुभवतात, ते जणू जेम्सच्या विधानाचे एक उदाहरण असते. नोबेल विजेते मेंदूवैज्ञानिक एरिक कँडेल (वय ९४) यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे, त्याचा आशय असा की, ‘जेव्हा दर्शक अमूर्त चित्राची त्याच्या मेंदूत पुनर्रचना करतो, तेव्हा ती सुखदायी ठरते. कारण हे करत असताना त्याची निर्मितीक्षमता उद्दिपित होते आणि हा सकारात्मक अनुभव अतिशय सुखदायी, आनंददायी असतो.’

    चित्रनिर्मिक जसा शिक्षित-प्रशिक्षित झालेला असतो, तसा दर्शकही शिक्षित व्हावा लागतो. शालेय शिक्षणात भाषा, साहित्य विज्ञान शिकवतो त्याचप्रमाणे चित्र पाहणे शिकवले तर? चिमुकल्यांचा मेंदू स्पंजासारखा असतो, हे विसरून चालणार नाही. यामुळे मुलांच्या मेंदूतील कितीतरी दरवाजे नकळत उघडतील. माणसात पंचेंद्रियाकडून सतत संवेदना येत असतात, मेंदू त्याचा अर्थ लावतो, ‘जाणतो’. ही शिदोरी घेऊन ‘रंग’ जाणण्याचा प्रयत्न पिया लेखात केला आहे.

    रंगविज्ञान थोडे ऐतिहासिक

    इंग्लंडमधील केंब्रिज वैज्ञानिक आयझॅक न्यूटन (१६४३-१७२७) यांनी शुभ्र सूर्यप्रकाश प्रीझममधून पाठवून प्रकाशाचा पंखा उलगडला आणि पुन्हा तो परत प्रीझममधून पाठवून शुभ्र प्रकाश दाखवला. न्यूटनने या प्रयोगाने प्रथमच रंगाबाबतचे बुद्धिसंगत, तर्कशुद्ध, मोजता मापता येण्यासारखे स्पष्टीकरण दिले. हा रंगविज्ञानातील वळणबिंदू होता. न्यूटनने नमूद करून ठेवले त्याचा आशय असा ‘प्रकाशकिरणांना रंग नसतो. पण हा ‘रंग का; तो रंग’, असे संवेदन निर्माण करण्याची शक्ती असते.’ स्कॉटिश भौतिकतज्ज्ञ आणि गणितज्ज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१-१८७९) यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी मांडली. ते रंगीत छायाचित्रण कलेचे जनक होते. त्यांनी लिहून ठेवले आहे, ‘ज्या संवेदनाला आपण रंग म्हणतो, याला जर काही नियम असतील ते आपल्या ‘स्वभावात’ असले पाहिजेत, म्हणून रंगविज्ञान हे ‘मेंटल सायन्स’ आहे. हे विज्ञान ‘ऑप्टिक्स प्रकाशविज्ञान आणि अॅनॅटॉमी = शरीरविज्ञान’ यांचा उपयोग करते.’ याचा अर्थ; रंग ही जणू मेंदूची निर्मिती आहे आणि ते समजण्याकरता या दोन विज्ञानाचा उपयोग होतो, हे मॅक्सवेल या विज्ञानवंताने जोखले होते.

    माणसाच्या अवतीभवती अनेक वस्तू आहेत. छाया प्रकाशाचा खेळ सतत सुरू असतो. म्हणजे त्या वस्तूवरुन परावर्तित होऊन येणारे विविध तरंग लांबीचे किरण माणसाच्या दृष्टीपटलावर सतत पडत असतात, पण माणूस गोंधळून जात नाही. याला कारण मेंदू हे बदल जणू फेटाळून लावतो, त्याकडे दुर्लक्ष करतो, ‘डिस्काउन्ट’ करतो. यावर अमेरिकेत संशोधन झाले आहे आणि चालू आहे, त्याचा थोडक्यात आणि सुलभ आढावा घेऊ.

    एडविन लँड (१९०९-१९९१) हा अमेरिकी वैज्ञानिक आणि पोलारॉइड कॉर्पोरेशनचा सहसंस्थापक यांचा या संशोधनात मोठा सहभाग होता.

    जेव्हा माणूस भवताल न्याहाळत असतो, तेव्हा सतत निरनिराळ्या तरंग लांबीचे किरण वस्तूंवर पडत असतात. कधी मळभ येते आणि किरणांची तीव्रता कमी होते, भर दुपारी तीव्रता वाढलेली असते, पण झाडांची पाने हिरवी दिसतात, गुलाबाचे फुल गुलाबी दिसते. ‘इल्युमिनेशन’मध्ये बदल घडत असताना माणसाचा मेंदू त्याकडे दुर्लक्ष करतो. याला 'phenomenon of discounting' म्हणतात, आणि वस्तूचे रंग जवळ जवळ तसेच राहतात याला 'colour constancy' – ‘रंग सातत्य’, ‘रंग स्थिरता’ म्हणतात. मेंदूतील कोणत्या केंद्रामुळे हे घडते, याबाबत विज्ञानाला थोडे फार कळले आहे, पण मेंदू हे कसे साध्य करतो याची मेंदूविज्ञानाला सुतराम कल्पना नाही. म्हणून तर मेंदूतील क्रिया-प्रक्रियांचे शोध घेणे चालू आहे.

    या रंगसातत्याचा व्यवहारात खूप उपयोग असतो हे माणूस अनुभवत असतो. साडी किंवा ड्रेस मटेरियलच्या दुकानात जाऊन पाहा. कृत्रिम प्रखर प्रकाशात बघितलेली साडी अनुभवी महिला दुकानाच्या दरवाजात जाऊन त्या साडीचा रंग नैसर्गिक प्रकाशात कसा दिसतो, हे तपासून मगच साडी विकत घेतात. त्याच्या मागचे हे मेंदूविज्ञान आहे.

    सृष्टी आणि रंगदृष्टी

    ‘रंगात रंगलो मी रंग रंगुनिया’ (मुक्त संवाद मार्च २०२५ अंक पृष्ठ क्र. ५७ ते ६१) या लेखात पुढील माहिती आधीच दिलेली आहे. मात्र, तिचे रुप तांत्रिक असल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात राहिलच असे नाही, म्हणून त्या माहितीचा उल्लेख पुन्हा केला आहे.

    दृष्टीपटलात सृष्टिज्ञान होण्यासाठी रॉड्स दंडपेशी आणि कोन्स = शंकूपेशी या प्रकाशग्राही पेशी असतात. रॉड्स कृष्णधवल दृष्टी करता, तर कोन्स रंगदृष्टी करता उपयुक्त असतात. असे सुलभतेने सांगता येईल. माणूस जो प्रकाश बघू शकतो, त्याला 'visible light spectrum' असे म्हणतात. त्या वर्णपटाची व्याप्ती ३८० नॅनो मीटर्स ते ७८० नॅनो मीटर्स एवढी असते. यातील ३८० तरंग लांबीचे किरण माणूस पर्पल-जांभळा म्हणून ओळखतो तर ७८० तरंग लांबीचे किरण डार्क रेड-गडद लाल म्हणून ओळखतो. याला perceive = दृष्टिगोचर असा पारिभाषिक शब्द आहे. दृष्टीपटलात तीन प्रकारचे कोन असतात. ते कोन परस्परव्यापी-ओवरलॅपिंग तरंग लांबीच्या किरणांना संवेदनशील असतात, म्हणून तर माणूस अनेक रंग अनुभवू शकतो. रेड, ग्रीन आणि ब्लू एवढ्या तरंग लांबीचे किरण दृष्टियंत्रणेला पुरेसे असतात, कारण निसर्गातील वस्तू वरुन परावर्तित होणारे किरण या तीन रंगात बसणारे असतात. पण मानवी मेंदूची कमाल म्हणजे, या छोट्या वर्णपटातून अनेक रंगाची उधळण माणूस अनुभवू शकतो. हे रहस्य चित्रनिर्मिकांनी जाणले होते. युजिन डेलेक्रोए (१७९८-१८६३) हा फ्रेंच क्रांतिकारक चित्रवंत त्याने नमूद करून ठेवले आहे, त्याचा आशय ‘चित्रकलेत आरेखनापेक्षा ‘रंग’ जास्त महत्त्वाचे आणि ज्ञानापेक्षा कल्पनेची भरारी महत्त्वाची’ हा धडा पाश्चात्य दृश्यकलेत बऱ्याच चित्रकारांनी घेतला असावा.

    रंगांची कामगिरी

    सृष्टिबोध होण्याकरता प्रथम दृष्टिबोध व्हावा लागतो. या दृष्टिबोधातील महत्त्वाचा भाग म्हणजे, ‘व्हिज्युअल डिस्क्रिमिनेशन’ एक वस्तू दुसऱ्या वस्तूपासून निराळी आहे हे कळणे. ‘अवकाशीय विवरण’ म्हणजे अवतीभवतीच्या बारीकसारिक गोष्टी कळणे, या करता रंगाची जरूरी असते.

    रंग हा कोणत्यातरी आकारात साधारणपणे बंदिस्त असतो, त्यामुळे आकार सुस्पष्टतेने दिसण्यास आणि ओळखण्यास मदत होते. घाटाचे कंगोरे, कडा, किनारी, बाजू या रंगामुळे कोरीव होतात. भवतालात कितीतरी आकृती गतीने माणसाच्या डोळ्यासमोरून निसटत असतात, त्या रंगामुळे नजरेला दिसतात. वस्तूचा आकार कळण्याआधी १०० मिलिसेकंड आपल्या दृष्टीला म्हणजे मेंदूला त्या आकाराचा रंग कळतो. त्यानंतर आकार आणि नंतर गती असा धागा आहे. मानवी मेंदूची ही विलक्षण क्षमता प्रयोगाने सिद्ध झाली आहे. रंग, आकार आणि गती यांचे असे अतूट नाते आहे.

    मुक्त रंग

    रंगांची मुक्ती म्हणजे काय? कशापासून मुक्ती? असे प्रश्न पडणे साहजिक. रंगाची आकारापासून मुक्ती अशी एक कल्पना आहे. पण त्याचा आशय बघणे महत्त्वाचे. आकारापासून मुक्ती ही तशी अशक्य गोष्ट आहे. रंगांची अमूर्तता अॅब्स्ट्रॅक्शन ऑफ कलर म्हणजे रंगांचा मुक्त वापर. कलाक्षेत्राने अॅब्स्ट्रॅक्ट हा शब्द काही आनंदाने निवडलेला नव्हता. ‘नॉन ऑब्जेक्टिव’ ‘नॉन फिगरेटिव’ असे शब्द सुचवले गेले होते. पण ‘अॅब्स्ट्रॅक्ट’ हा शब्द योगायोगाने वापरला गेला आणि रुळला. त्याचा मराठी अनुवाद अमूर्त असा केला जातो.

    सूर्योदयाचे वेळी पूर्वेकडे तर सूर्यास्ताचे सुमारास पश्चिमेकडे अनेक रंगदृश्ये आपण पाहतो, ते रंग अमूर्त असतात. म्हणजे त्यांना ठराविक आकार नसतात. नासाच्या विविध यानांनी पाठवलेली नेब्युलाच्या छायाचित्रात अमूर्त रंगांची उधळण दिसते. रंग आणि पाश्चात्य दृश्यकलेतील त्यांचा प्रवास समजून घेण्याकरता थोडे कलेच्या इतिहासात डोकावून पाहिले पाहिजे.

    फॉविझमचा प्रभाव

    १९०० सालची ती सुरुवात होती. चित्रकला अतिशुद्ध झाली असून यम-नियमात गुरफटून जात आहे, असे काही तरुण फ्रेंच चित्रकारांना वाटत होते. या गटाने हेन्री मतिस (१८६९-१९५४) हा सुप्रसिद्ध चित्रकारही होता. या गटानी आपल्या चित्रांचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरवले. त्या चित्रात नैसर्गिक घाटांना झुगारून दिले होते, भडक रंगांची आतषबाजी केली होती. कला समीक्षकांनी या गटाला 'les Fauves' रानटी प्राणी किंवा रानटी असे नाव ठेवले. पण त्यात रानटीपणा म्हणावे, असे फार काही नव्हते असे पाश्चात्य कलेच्या इतिहासकारांनी नमूद करून ठेवले आहे. त्या गटाच्या चित्रकारांची चित्रे नेटवर सहज मिळतील.

    हेन्री मतीस (इंग्लिश उच्चार) १९०८ सालचे 'The Dessert' हे चित्र त्या दृष्टीने पाहण्यासारखे आहे. हेन्रीने या चित्राला 'harmony in red' ‘लाल रंगाचा मेळ’ असे कलात्मकतेने म्हटले आहे. लहानग्यांना चित्रात सजावट आवडते. तसे हे सजावटी चित्र आहे. ‘रेषांची चित्रधारा’ (मुक्त संवाद जून २०२५ अंक पृष्ठ क्र. ५४ ते ५८) या लेखाच्या शेवटी ‘हेन्री मतीसला लहान मुलांसारखी चित्रे काढता यावीत, असे वाटत असे’ असे लिहिले होते. त्याचा संदर्भ इथे आहे. कदाचित त्याला लहान मुलांच्या चित्रातील निरागसता भावली असावी. गडद चमकणारे रंग, साधी बाह्यरेखा! कलेच्या इतिहासात फॉविझम फार काळ टिकला नसेल पण त्याचे दूरगामी परिणाम झाले असावेत.

    रंगाची अमूर्तता

    MountingPainting
    लाल, हिरवा, निळा हे तीनच तरंग लांबीचे किरण मानवी दृष्टियंत्रणेला पुरेसे असतात. मेंदूच्या करामतीमुळे माणूस हा छोट्या वर्णपटातून अनेक रंगांची उधळण अनुभवत असतो...

    मार्क रॉथ्को याने १९५०च्या दशकात कलर फिल्ड पेंटिंगची अमेरिकेत सुरुवात केली. त्याने मोठ्या कॅनव्हासवर एका रंगाचा सपाट आणि पातळ थर पसरला. ‘पेंटिंग बघून तीव्र आनंदाची भावना दर्शकांच्या मनात निर्माण होते. हा रंग म्हणजे, एक ‘मेडिटेव स्पेस’ ‘ध्यानशील अवकाशाची’ सुंदर सूचक असते.’ असा दर्शकांचा अनुभव समीक्षकांनी नमूद केला आहे. अमेरिकेतली ह्यूस्टन शहरात रॉथ्को चॅपेल आहे. तेथील भिंतींवर कॉपरी ब्राऊन आणि ब्लॅक छटा असलेली सात पेंटिंग्ज आणि सात प्लम रंगाची टोनल पेंटिग्ज लावलेली आहेत.

    मॉरिस लुईस (१९१२-१९६२) हा अमेरिकी चित्रकार आणि कलर फील्ड पेंटर. त्याने न-ताणलेल्या’ ‘प्रक्रिया न केलेल्या’ मोठ्या कॅनव्हासवर पातळ केलेला अॅक्रिलिक रंग ओतला आणि त्या रंगाला आपल्या गतीने वाहू दिले, भिजू दिले. यामुळे रंग पृष्ठभागाचा अविभाज्य भाग बनतो. ‘डेप्थ’ ‘खोली’चा भास निर्माण होत नाही. हे विलक्षण तंत्र याने विकसित केले. मॉरिसने चित्रांच्या तीन मालिका रंगबद्ध केल्या. The Veils, the Unfurled आणि The Stripes या प्रत्येक मालिकेत शंभरपेक्षा जास्त कॅनव्हास आहेत. त्याने ही पेंटिग्ज कशी निर्मिली हे एक गूढ आहे. त्याच्या घरी डायनिंग रूममध्ये त्याचा स्टुडियो होता. तेथे काम करत असताना तो कोणालाही आत येऊन देत नसे. ही चित्रदृश्ये मुळातून पहाण्यासारखी आहेत. मॉरिस लुईस आणि केनेथ नोलँड (१९२४-२०१०) हे दोघे रंगवंत 'वॉशिंग्टन कलर स्कूल'च्या केंद्रस्थानी होते.

    Projector_Maxwell
    रंग जणू मेंदूची निर्मिती आहे. ती कशी, हे समजण्याकरीता प्रकाशविज्ञान आणि शरीरविज्ञान उपयोगात येते, असे विज्ञानवंत आणि रंगीत छायाचित्रणाचे जनक जेम्स मॅक्सवेल यांनी प्रयोगांती सिद्ध केले...

    चित्र कसे पहाल

    माणूस दोनचार मित्रांबरोबर चित्र दालनात जातो किंवा दृश्यकलेच्या संग्रहालयामध्ये जातो. एक फेरफटका मारून, ‘काय सुंदर होती चित्रे’ म्हणत बाहेर पडतो. पण काहीजण बाकावर बसून चित्राकडे तासन्तास पाहत असतात. हे अभ्यासक असतात. स्तानिस्लास डुहेन (१९६५) हे पॅरिस येथे बोधनाचे मेंदूवैज्ञानिक आहेत, यांनी माणूस चित्र पाहत असताना मेंदूत काय घडते, याचा शोध, बोधन होत असताना न्यूरोइमेजिंग करून घेतला आहे. त्याचा थोडक्यात आशय असाः एखाद्याने एका चित्राकडे काही क्षण बघितले, तर मेंदूतील दृष्टिकेंद्रातील काही भाग उजळून निघतो. पण जसजसे जास्त वेळ तुम्ही त्या चित्राकडे बघत राहता, तसतसे मेंदूतील निरनिराळे भाग उजळू लागतात. हे ‘अॅक्टिवेशन मेंदूतल्या निरनिराळ्या भागात पसरते आणि पुन्हा दृष्टिकेंद्रात माघारी येते आणि पुन्हा पसरू लागते. याचा अर्थ जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक त्या प्रतिमेकडे पाहता, तेव्हा ती माहिती वेगवेगळ्या भागांकडे पाठवून मेंदू त्यांना कामाला लावतो. हे मेंदूच्या स्कॅनिंगमध्ये स्पष्ट दिसून आले. हा कॉन्शस अनुभव असतो. मात्र जेव्हा तुम्ही चित्राकडे फक्त काही क्षण बघता, तेव्हा छोटेसे अॅक्टिवेशन होते. ते काही मर्यादेपर्यंत असते. मेंदू त्याची दखल घेतो. पण ती नेणिवेत. तो कॉन्शस अनुभव नसतो. कॉन्शस अनुभव घेण्यासाठी त्या चित्राकडे बराच वेळ पाहावे लागते.

    हा प्राथमिक शोधाभ्यास आहे. पण चित्राचे अभ्यासक तासंतास का पाहतात याचे स्पष्टिकरण त्यातून मिळते. (आपले वर्तन आपला मेंदू-डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर. आवृत्ती पहिली फेब्रुवारी २०२४ राजहंस प्रकाशन पुणे)

    फॉविस्ट आणि मेंदूविज्ञान

    रंगछंदी फॉविस्ट चित्रकारांचा रंगमुक्ती मागचा विचार काय होता ते पाहू. विशिष्ट आकाराला विशिष्ट रंग असे समीकरण मनात दडलेले असते. ही घाटांची गुलामगिरी दूर करायची आणि हे घट-सहयोगी रंग न वापरता तिसरेच रंग वापरायचे असा विचार त्यामागे होता. (हेन्री मतिस, मॉरिस डिव्लामनिक, आंद्रे डेरेन, की वान डॉन्जन वगैरे यांची चित्रे पाहा) आता मेंदू संशोधकांनी काय केले ते थोडक्यात पाहू. नेहमीची चित्रे म्हणजे पारंपरिक चित्रे पाहत असताना दर्शकांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले, तेव्हा दृष्टीकेंद्राबरोबर स्मृतिकेंद्रे, भावनेची केंद्रे, आनंदाचे बक्षीस देणारी केंद्रे, उद्दीपित झालेली दिसली. पण फॉविस्टची चित्रे पाहताना स्कॅनिंगमध्ये दृष्टीकेंद्रासह मेंदूतील इतर काही जागा उजळलेल्या दिसल्या. यामुळे दृष्टी विज्ञानात आणखी ज्ञान-गुहांचा तिळा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटिश आणि फ्रेंच मेंदूवैज्ञानिक सेमिर झेकी (१९४०) लिहितात त्याचा आशय ‘चित्रकलाकार न्यूरॉलॉजिस्ट असतात, मेंदूतील दृष्टिसंस्थेची रचना कशी असते याचा अभ्यास ते त्यांच्या कार्यातून, त्यांच्यापाशी असलेले आगळेवेगळे तंत्र वापरुन करतात. जेव्हा वैज्ञानिक त्यांच्या कार्याचा शोध घेतात तेव्हा पूर्वी ठाऊक नसलेली मेंदूची रचना उघड होते.’

    लेख बराच लांबला होता. मी थबकलो. दुरवरून कुठूनतरी मंगेश पाडगावकर (१९२९-२०१५) यांच्या गीताचे सूर-शब्द ऐकू आले. ‘रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली?’ या मोहक सवालाचा जबाब मी मनोमन सहज दिला, चित्रकलावंतांनी.

    अमूर्त चित्रकलेची चित्र त्वचा अलगदपणे, हळुवार प्रयत्नाने उकलून अंतरंगांचा चित्रबोध दर्शकाने आपल्या वकुबाप्रमाणे लावून आनंद लुटणे शक्य आहे. कारण, मानवी मेंदू नेहमीच नवनवीनता शिकत आणि आत्मसात करत आला आहे.

    -oOo-


    AnandJ

    व्यवसायाने हृदयरोग तज्ज्ञ असलेले डॉ. आनंद जोशी हे मराठीतले नामवंत विज्ञानलेखक, ललितलेखक आहेत. ‘बोलकी हाडे’, ‘मेंदूतला माणूस’, ‘कर्कविज्ञानाची गोष्ट’, ‘अक्षर पाविजे निर्धार’, ‘व्यूहचक्र’, ‘आपले वर्तन, आपला मेंदू’ (सहलेखक सुबोध जावडेकर) ही त्यांची अलीकडच्या काळात प्रकाशित झालेली पुस्तके आहेत.
    ईमेल : drjoshianand628@gmail.com



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा