Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

रविवार, १३ जुलै, २०२५

भारतीय नास्तिक परंपरेचा मागोवा

  • नास्तिक दर्शन

    TheThinkers

    भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञाने

    भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानातील साम्य आणि फरक यांचा तुलनात्मक अभ्यास करणे हा एक अत्यंत व्यापक आणि वैचारिक विषय आहे. या दोन्ही तत्त्वज्ञान परंपरांनी मानवी जीवन, विश्व, नैतिकता, ज्ञान आणि सत्य यांच्याबाबत गहन विचार मांडले आहेत. तत्त्वज्ञान हा मानवाच्या विचारांचा आणि अनुभवांचा गाभा आहे, जो जीवन आणि विश्वाच्या मूलभूत प्रश्नांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान या दोन्ही परंपरांनी याच प्रश्नांना आपापल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय तत्त्वज्ञान प्रामुख्याने वेद, उपनिषदे, भगवद्‌गीता, बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञान यांवर आधारित आहे, तर पाश्चात्य तत्त्वज्ञान ग्रीक तत्त्वज्ञ, मध्ययुगीन ख्रिश्चन विचारवंत, प्रबोधनकालीन तत्त्ववेत्ते आणि आधुनिक विचारवंत यांच्या कार्यावर उभे आहे. दोन्ही परंपरांमध्ये त्यांच्या दृष्टिकोन, पद्धती आणि उद्दिष्टांमध्ये साम्य आणि फरक आढळतात.

    IndianPhilosophy
    मानवी बुद्धीचा विकास ही उत्क्रांतीच्या टप्प्यातली एक क्रांतिकारी घटना मानली, तर विकसित बुद्धीच्या मानवाने सत्याचा शोध घेण्यासाठी तत्त्वज्ञानाची निर्मिती करणे ही दुसरी क्रांतिकारी घटना ठरते...

    भारतीय तत्त्वज्ञान हे प्राचीन काळापासून विकसित होत आले आहे. याची पाळेमुळे वेद आणि उपनिषदांमध्ये सापडतात. भारतीय तत्त्वज्ञानाची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत -

    १. आध्यात्मिक दृष्टिकोनः भारतीय तत्त्वज्ञानात आत्मा, ब्रह्म, मोक्ष आणि कर्म यांच्यावर विशेष भर आहे. उपनिषदांमधील तत्त्वमसि (तू तो आहेस) आणि अहम् ब्रह्मास्मि (मी ब्रह्म आहे) यासारखी तत्त्वे आत्म्याच्या विश्वाशी एकरूपतेवर जोर देतात.

    २. कर्म आणि पुनर्जन्मः भारतीय तत्त्वज्ञानात कर्म सिद्धांत आणि पुनर्जन्म यांना मध्यवर्ती स्थान आहे. यानुसार, व्यक्तीचे वर्तमानकालीन कृत्य तिच्या भविष्यातील जीवनावर परिणाम करतात.

    ३. दर्शन परंपराः भारतीय तत्त्वज्ञानात सहा आस्तिक दर्शने (न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत) आणि तीन नास्तिक दर्शने (बौद्ध, जैन आणि चार्वाक) यांचा समावेश होतो. प्रत्येक दर्शन जीवन आणि विश्वाच्या स्वरूपाबाबत स्वतंत्र दृष्टिकोन मांडते.

    ४. नैतिमत्ता आणि धर्म: भारतीय तत्त्वज्ञानात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले गेले आहेत. नैतिक जीवन आणि आत्मशुद्धी यांना यात विशेष महत्त्व आहे.

    ५. ज्ञानाची पद्धती: भारतीय तत्त्वज्ञानात प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द (वेदांचे प्रामाण्य) यांना ज्ञानाचे साधन मानले जाते. यात अनुभव आणि अंतर्ज्ञान यांना महत्त्व आहे.

    पाश्चात्य तत्त्वज्ञानाची सुरुवात प्राचीन ग्रीसपासून होते. सॉक्रेटिस, प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांनी या तत्त्वज्ञानाचा पाया रचला. पाश्चात्य तत्त्वज्ञानाची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतात-

    १. वैज्ञानिक आणि तार्किक दृष्टिकोन: पाश्चात्य तत्त्वज्ञानात तर्क, विश्लेषण आणि वैज्ञानिक पद्धतींवर विशेष भर आहे. अॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र आणि डेकार्टचे ‘मी विचार करतो म्हणून मी आहे,’ यासारखी तत्त्वे याचे उदाहरणे म्हणून सांगता येतात.

    २. वास्तववाद आणि आदर्शवाद: पाश्चात्य तत्त्वज्ञानात वास्तववाद आणि आदर्शवाद यांच्यातील वाद हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्लेटोचा आदर्शाचा सिद्धांत आणि अॅरिस्टॉटलचा वास्तववाद यांनी याला दिशा दिली.

    ३. नैतिकता आणि स्वातंत्र्य: पाश्चात्य तत्त्वज्ञानात नैतिकतेचा संबंध विचार स्वातंत्र्य, जबाबदारी आणि सामाजिक करार यांच्याशी जोडला गेला आहे. कँटचा कटेगॉरिकल इम्पेरेटिव्ह आणि मिलचा उपयुक्ततावाद यांनी नैतिकतेचे वेगवेगळे पैलू मांडले आहेत.

    ४. विश्लेषणात्मक दृष्टिकोन: आधुनिक पाश्चात्य तत्त्वज्ञानात भाषा, तर्क आणि विज्ञान यांचे विश्लेषण महत्त्वाचे आहे. विट्गेन्स्टाइन आणि रसेल यांनी यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

    ५. मानवकेंद्रित विचार: पाश्चात्य तत्त्वज्ञानात व्यक्तीच्या स्वातंत्र्याला आणि बुद्धीला विशेष स्थान आहे. प्रबोधनकाळाने मानवाच्या तर्कबुद्धीला आणि स्वायत्ततेला प्राधान्य दिले.

    भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानात काही मूलभूत प्रश्न आणि उद्दिष्टे समान आहेत. दोन्ही परंपरांनी सत्य, नैतिकता, विश्व आणि मानव जीवन यांच्याबाबत विचार केला आहे. भारतीय तत्त्वज्ञानात सत्यं शिवं सुंदरम् असे मानले जाते, तर पाश्चात्य तत्त्वज्ञानात प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांनी सत्याचा शोध घेण्यावर भर दिला. दोन्ही परंपरांमध्ये सत्य हे तत्त्वज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट आहे. उपनिषदांमधील नेति नेति (हा नाही, तो नाही) आणि पाश्चात्य संशयवाद (उदा. डेकार्टचा संशय) यात सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी नकारात्मक दृष्टिकोनाचे साम्य दिसते. भारतीय तत्त्वज्ञानात धर्म आणि नैतिकता यांना मध्यवर्ती स्थान आहे. भगवद्गीतेचा कर्मयोग आणि बौद्ध तत्त्वज्ञानातील अष्टांगिक मार्ग यात नैतिक जीवनावर जोर आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञानात कँट, मिल आणि अॅरिस्टॉटल यांनी नैतिकतेचे सिद्धांत मांडले. दोन्ही परंपरांमध्ये सद्‌गुण, कर्तव्य आणि सामाजिक जबाबदारी यांना महत्त्व आहे. भारतीय तत्त्वज्ञानात आत्मा हा विश्वाशी एकरूप आहे, तर पाश्चात्य तत्त्वज्ञानात आत्म्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. प्लेटोने आत्म्याला अमर मानले, जे उपनिषदांच्या विचारांशी मिळते-जुळते. पण दोन्ही परंपरांमध्ये आत्म्याच्या स्वरूपाबाबत आणि त्याच्या अमरत्वाबाबत विचार झाला आहे. भारतीय तत्त्वज्ञानात ज्ञानाला (विद्या) मोक्षाचे साधन मानले जाते. साविद्या या विमुक्तये (ज्ञानच मुक्ती देते) हे उपनिषदांचे तत्त्व आहे.

    पाश्चात्य तत्त्वज्ञानातही ज्ञानाला विशेष स्थान आहे. सॉक्रेटिसचा ‘मला काहीच माहिती नाही’ हा विचार आणि प्लेटोचा ‘ज्ञान ही स्मृती आहे’ हा सिद्धांत यात साम्य दिसते. भारतीय तत्त्वज्ञानात विश्व हे ब्रह्म किंवा मायेचे स्वरूप मानले जाते. सांख्य दर्शनात प्रकृती आणि पुरुष यांचा विचार आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञानातही विश्वाच्या स्वरूपाबाबत विचार झाला आहे. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांनी विश्वाचे मूलद्रव्य (पाणी, हवा, अग्नी) शोधण्याचा प्रयत्न केला, तर आधुनिक तत्त्वज्ञानात विश्वाच्या उत्पत्ती आणि स्वरूपाबाबत विज्ञानावर आधारित विचार झाला.

    Philosophers
    तत्त्वज्ञ भारतीय असोत वा पाश्चिमात्य त्यांच्या सखोल विचारांनी जगाची दिशा बदलली, माणूस माणुसपणाकडे एकेक पाऊल सरकू लागला...

    जरी दोन्ही परंपरांमध्ये साम्य असले, तरी त्यांच्यातील दृष्टिकोन, पद्धती आणि उद्दिष्टांमध्ये लक्षणीय फरक आहेत. भारतीय तत्त्वज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट मोक्ष किंवा मुक्ती आहे. यात आत्म्याला कर्म आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त करणे हा हेतू आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट सत्याचा शोध आणि मानव जीवनाचे विश्लेषण आहे. यात मोक्षापेक्षा तर्क, विज्ञान आणि सामाजिक सुधारणा यांना प्राधान्य आहे.

    भारतीय तत्त्वज्ञानात आध्यात्मिकता आणि अंतर्ज्ञान यांना महत्त्व आहे. योग आणि ध्यान यासारख्या पद्धती आत्मशोधासाठी वापरल्या जातात. पाश्चात्य तत्त्वज्ञानात तर्क, विश्लेषण आणि वैज्ञानिक पद्धतींना प्राधान्य आहे. डेकार्ट, कँट आणि रसेल यांनी तर्कावर आधारित विचारांना पुढे नेले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात विश्व हे चक्रीय स्वरूपाचे मानले जाते, जिथे सृष्टी, स्थिती आणि लय यांचे चक्र चालू असते. पाश्चात्य तत्त्वज्ञानात विश्वाला रेखीय दृष्टिकोनातून पाहिले जाते, जिथे उत्पत्ती, विकास आणि अंत यांचा विचार केला जातो. भारतीय तत्त्वज्ञानात नैतिकता ही कर्म आणि धर्म यांच्याशी जोडली गेली आहे. यात व्यक्तीच्या कृत्यांचा परिणाम पुनर्जन्मावर होतो. पाश्चात्य तत्त्वज्ञानात नैतिकता ही स्वातंत्र्य, जबाबदारी आणि सामाजिक करार यांच्याशी जोडली जाते. कँटचा कॅटेगॉरिकल इम्पेरेटिव्ह हा याचे उदाहरण आहे. भारतीय तत्त्वज्ञानात शब्द (वेदांचा प्रामाण्य) आणि अनुभव यांना विशेष स्थान आहे. उपनिषदे आणि बौद्ध तत्त्वज्ञानात ध्यानाद्वारे ज्ञानप्राप्तीवर जोर आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञानात अनुभववाद आणि तर्कवाद यांच्यातील वाद महत्त्वाचा आहे. लॉक, ह्यूम आणि कँट यांनी यावर गहन विचार केला.

    परस्पर तत्त्व प्रभाव

    भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्यात परस्पर प्रभावही दिसून येतो. १९व्या आणि २०व्या शतकात स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय तत्त्वज्ञान पाश्चात्य देशांमध्ये पोहोचवले. त्याचप्रमाणे, शोपेनहावर आणि नित्शे यांसारख्या पाश्चात्य तत्त्वज्ञांनी उपनिषदे आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. आधुनिक काळात योग, ध्यान आणि आयुर्वेद यांनी पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान यांनी भारतीय विचारसरणीवर प्रभाव टाकला आहे. भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्यातील परस्पर प्रभावाची सुरुवात मर्यादित स्वरूपात असली तरी प्राचीन काळापासून दिसून येते. प्राचीन ग्रीक आणि भारतीय संस्कृती यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध, विशेषतः सिकंदराच्या भारतावरील आक्रमणानंतर (इ.स.पू. ३२६), याला कारणीभूत ठरले. या काळात ग्रीक तत्त्वज्ञ आणि भारतीय विचारवंत यांच्यात विचारांची देवाणघेवाण झाल्याचे काही पुरावे आहेत.

    ग्रीक इतिहासकार मेगस्थनीज याने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात वास्तव्य केले होते. त्याने भारतीय समाज, धर्म आणि तत्त्वज्ञान यांचे वर्णन केले. यातून ग्रीक विचारवंतांना भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख झाली असावी. पायथागोरस आणि प्लेटो यांच्या काही विचारांमध्ये भारतीय तत्त्वज्ञानाशी, विशेषतः आत्म्याच्या अमरत्वाबाबत आणि पुनर्जन्माबाबत, साम्य आढळते. आज ज्याला आपण पायथागोरसचा सिद्धांत म्हणतो, तो भारतीय तत्त्वज्ञानात शुल्वसूत्रे म्हणून आधीच प्रसिद्ध होता. यावरून काही विद्वानांचे मत आहे, की याबाबतीत ठोस पुरावे कमी असले, तरी पायथागोरसवर भारतीय विचारांचा अप्रत्यक्ष प्रभाव असावा. बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाश्चात्य जगावर प्राचीन काळातच प्रभाव पडला. अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार पश्चिम आशिया आणि ग्रीसपर्यंत केला. बौद्ध तत्त्वज्ञानातील करुणा, ध्यान आणि नैतिकता यांनी ग्रीक संन्यासी परंपरांवर प्रभाव टाकला असावा. ग्रीक स्टोइक तत्त्वज्ञान आणि बौद्ध तत्त्वज्ञान यांच्यातील साम्य, विशेषतः मानसिक शांती आणि आत्मसंयम याबाबत, यातून परस्पर प्रभावाची शक्यता दिसते. पण मध्ययुगात भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्यातील थेट संपर्क कमी झाला, कारण युरोप ख्रिश्चन धर्म मध्ययुगीन विचारसरणींमध्ये गुंतला होता, तर भारतात भक्ती आणि तांत्रिक परंपरांचा विकास होत होता. तथापि, अरब आणि पर्शियन विद्वानांनी भारतीय ग्रंथांचे अरबी आणि फारसी भाषेत अनुवाद केले, त्यामुळे अप्रत्यक्षपणे भारतीय विचार पाश्चात्य जगापर्यंत पोहोचले.

    भारतीय गणित, खगोलशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांचा अरब विद्वानांवर प्रभाव होता. उदा. बौद्ध तत्त्वज्ञान आणि उपनिषदांचे काही विचार अरब तत्त्वज्ञानातून युरोपात पोहोचले. मध्ययुगीन युरोपीय विचारवंत, जसे की थॉमस एक्किनॉस यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय विचारांचा अभ्यास केला असावा. १६व्या आणि १७ व्या शतकात युरोपीय प्रवासी आणि ख्रिश्चन मिशनरींनी भारतातील तत्त्वज्ञान आणि धर्म यांच्याबाबत माहिती गोळा केली. यातून पाश्चात्य विचारवंतांना भारतीय तत्त्वज्ञानाची प्राथमिक ओळख झाली. तथापि, या काळात युरोपीय दृष्टिकोन हा प्रामुख्याने ख्रिश्चन केंद्रित होता, त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञानाला कमी महत्त्व देण्यात आले.

    भारतीय आध्यात्मिक विचारांना मान्यता

    १९व्या शतकात भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्यातील परस्पर प्रभावाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. याचे प्रमुख कारण म्हणजे, ब्रिटिश वसाहतवाद, ज्यामुळे भारत आणि युरोप यांच्यात सांस्कृतिक आणि वैचारिक देवाणघेवाण वाढली. या काळात भारतीय तत्त्वज्ञानाने पाश्चात्य विचारवंतांवर प्रभाव टाकला, तर पाश्चात्य तर्कवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने भारतीय विचारसरणीवर परिणाम केला. तर भारतीय तत्त्वज्ञानाचा पाश्चात्य जगावर प्रभाव स्वामी विवेकानंदांमुळे वाढला. त्यांनी १८९३मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत वेदांत तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली. त्यांनी विश्वबंधुत्व आणि आत्म्याच्या एकतेचा विचार मांडला. त्यांच्या या विचाराने पाश्चात्य विचारवंत आणि सामान्य जनतेला प्रभावित केले. वेदांत आणि योग यांचा प्रसार पाश्चात्य देशांमध्ये याच काळात सुरू झाला. रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचा पाश्चात्य जगाशी संवाद घडवून आणला. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार मिळाला. त्यामुळे भारतीय आध्यात्मिक विचारांना जागतिक मान्यता मिळाली.

    न्याय आणि समतेच्या आग्रहाचे तत्त्वविचार

    जर्मन तत्त्वज्ञ आर्थर शोपेनहॉवर यांनी उपनिषदांचा अभ्यास केला आणि त्यांच्या ‘द वर्ल्डज् विल अँड रिप्रेझेंटेशन’ या ग्रंथात भारतीय विचारांचा प्रभाव दिसतो. त्यांनी मायावाद आणि इच्छेच्या नकाराचा विचार उपनिषदांमधून घेतला. त्याचप्रमाणे, फ्रेड्रिख नित्शे यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि त्यांच्या झरथुस्त्राने असे सांगितले. या ग्रंथात बौद्ध विचारांचे काही पैलू दिसतात. १८७५ मध्ये स्थापन झालेल्या थिओसॉफिकल सोसायटीने भारतीय तत्त्वज्ञान, विशेषतः वेदांत आणि बौद्ध तत्त्वज्ञान अॅनी बेझंट आणि मॅडम ब्लाव्हात्स्की यांनी पाश्चात्य देशांमध्ये प्रसारित केले. यामुळे भारतीय तत्त्वज्ञानाला पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रियता मिळाली. पाश्चात्य प्रबोधनकालीन विचारांनी, विशेषतः तर्कवाद, व्यक्तिस्वातंत्र्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांनी १९व्या शतकातील भारतीय विचारवंतांवर प्रभाव टाकला. राजा राममोहन रॉय यांनी ब्रम्हो समाजाची स्थापना करून भारतीय समाजात सुधारणा घडवून आणली. २०व्या शतकात मार्क्सवादी विचारांनी भारतीय तत्त्वज्ञान आणि समाज सुधारणांवर प्रभाव टाकला. जवाहरलाल नेहरू आणि इतर विचारवंतांनी लोकशाहीकेंद्री समाजवादी विचारांचा स्वीकार केला. यामुळे भारतीय तत्त्वज्ञानात सामाजिक न्याय आणि समता यांना महत्त्व प्राप्त झाले. २०व्या शतकात पाश्चात्य विश्लेषणात्मक तत्त्वज्ञानाचा, विशेषतः भाषा आणि तर्क यांच्यावरील विचारांचा, भारतीय तत्त्वज्ञानावर प्रभाव पडला. भारतीय तत्त्वज्ञ जे.एन. मोहंती आणि बिमल कृष्ण मातिलाल यांनी पाश्चात्य विश्लेषणात्मक पद्धतींचा उपयोग करून भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली.

    आज २१व्या शतकातील आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्यातील परस्पर प्रभाव जागतिकीकरण, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे अधिक गतिमान झाला आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील योग आणि ध्यान यांनी पाश्चात्य देशांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. बी.के.एस. अय्यंगार, स्वामी शिवानंद आणि पतंजली यांच्या योगसूत्रांनी पाश्चात्य जीवनशैलीवर खोल प्रभाव टाकला. आज योग आणि माइंडफुलनेस यांना पाश्चात्य देशांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.

    पाश्चात्य मानसशास्त्र आणि न्यूरो सायन्स यांनी योग आणि ध्यान यांचे वैज्ञानिक विश्लेषण केले आहे, ज्यामुळे भारतीय तत्त्वज्ञानाला आधुनिक संदर्भात मान्यता मिळाली. भारतीय तत्त्वज्ञानातील प्रकृतीशी एकरूपता आणि अहिंसा यांचा आधुनिक पर्यावरणीय चळवळींवर प्रभाव आहे. गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वाने पाश्चात्य पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरित केले आहे. पाश्चात्य पर्यावरणीय डीप इकॉलॉजी, यांनी भारतीय तत्त्वज्ञानातील विश्वाच्या एकतेच्या विचाराशी साम्य दाखवले आहे. भारतीय तत्त्वज्ञानाने पाश्चात्य चित्रपट, साहित्य आणि कला यांवर प्रभाव टाकला आहे. उदा. हॉलिवूड चित्रपट ‘द मॅट्रिक्स’मध्ये मायावाद आणि वेदांत यांचा प्रभाव दिसतो. त्याचप्रमाणे, पाश्चात्य साहित्य आणि चित्रपटांनी भारतीय विचारवंत आणि कलाकारांवर प्रभाव टाकला आहे, ज्यामुळे आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानात नवीन दृष्टिकोन अंगीकारला जाऊ लागला आहे. आधुनिक काळात तत्त्वज्ञान हा आता स्थानिक किंवा प्रादेशिक विषय राहिला नसून तो जागतिक स्वरूपाचा झाला आहे. भारतीय तत्त्वज्ञ रमण महर्षी, जे. कृष्णमूर्ती आणि दीपक चोप्रा यांनी आपापल्या काळात पाश्चात्य देशांमध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. तर पाश्चात्य तत्त्वज्ञ केन विल्बर यांनी भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचे एकत्रीकरण करून इंटिग्रल थिअरी सारखे सिद्धांत मांडले.

    असा हा भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्यातील परस्पर प्रभाव सतत विकसित होणारा आणि समृद्ध करणारा एक प्रवास आहे. प्राचीन काळातील व्यापारी संबंधांपासून ते आधुनिक जागतिकीकरणापर्यंत या दोन्ही परंपरांनी एकमेकांना प्रेरित केले आहे. भारतीय तत्त्वज्ञानाने पाश्चात्य जगाला आध्यात्मिकता, ध्यान आणि विश्व एकतेची संकल्पना दिली, तर पाश्चात्य तत्त्वज्ञानाने भारतीय विचारसरणीला तर्क, विश्लेषण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड दिली. हा परस्पर प्रभाव केवळ वैचारिक पातळीवरच नव्हे, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मक क्षेत्रांतही दिसून येतो. भविष्यात हा संवाद अधिक गहन होईल. त्यामुळे मानवजातीला जीवन आणि विश्व यांच्याबाबत अधिक समग्र दृष्टिकोन मिळेल.

    भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान या दोन्ही परंपरांनी मानवाच्या मूलभूत प्रश्नांना आपापल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय तत्त्वज्ञान आध्यात्मिकता, कर्म आणि मोक्ष यांच्यावर केंद्रित आहे, तर पाश्चात्य तत्त्वज्ञान तर्क, विश्लेषण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे. दोन्ही परंपरांमध्ये सत्याचा शोध, नैतिकतेचे महत्त्व आणि आत्म्याबाबत विचार यासारखी साम्ये आहेत, परंतु त्यांच्या दृष्टिकोन आणि उद्दिष्टांमध्ये लक्षणीय फरक आहेत. या दोन्ही परंपरांचा तुलनात्मक अभ्यास केल्याने आपल्याला मानव जीवन आणि विश्व यांच्याबाबत अधिक व्यापक दृष्टिकोन मिळतो. या परंपरांच्या परस्पर संवादातूनच मानवजातीच्या वैचारिक प्रगतीची खरी शक्यता दिसून येते.

    अशाप्रकारे भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाची ओळख करून घेतल्यानंतर पुढील लेखांतून आपण भारतीय दर्शनातून नास्तिकतेचा मागोवा घेणार आहोत.

    ही लेखमाला लिहिण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या संदर्भग्रंथांची यादी जिज्ञासू अभ्यासकांसाठी शेवटच्या लेखात शेवटी देण्यात येईल.

    -oOo-



    जगदीश काबरे
    जगदीश काबरे

    जगदीश काबरे हे विज्ञानप्रसार आणि सामाजिक उन्नयनाशी निगडित कार्यकर्ते, ज्येष्ठ लेखक आणि आस्वादक आहेत.
    ईमेल: jetjagdish@gmail.com.



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा