Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

रविवार, १३ जुलै, २०२५

आफ्रिकेला जेव्हा जाग येते...

  • विश्वकारण

    AfricaLooted

    आज सर्व जगात अप्रगत खंड कोणता असेल तर तो म्हणजे, आफ्रिका. २५ मे ही तारीख आफ्रिका दिन साजरा करण्यासाठी मुक्रर केलेली. या खंडाची वस्ती आहे १.४ अब्ज, म्हणजे भारताएवढी. पण क्षेत्रफळ आहे, भारताच्या दहापट. वस्ती एवढी विरळ असायचं कारण आफ्रिकेच्या उत्तर एक तृतीयांश भागात कडकडीत सहारानामक जगप्रसिद्ध वाळवंट आहे. या वाळवंटामुळे लोकसंख्या घनता तर कमी झालीच, शिवाय हा खंड उर्वरित जगापासून - भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अनेक शतके तुटलेला राहिला. ही परिस्थिती काहीशी भारतासारखी होती. भारताच्या एका बाजूला हिमालय आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असल्यामुळे तो इतर जगाच्या शास्त्रीय आणि सांस्कृतिक कल्पनांपासून अलिप्तच राहिला.

    हाच प्रकार फार मोठ्या प्रमाणावर आफ्रिकेच्या बाबतीत झाला. आठव्या शतकातील इस्लामचे आगमन सोडले तर एकोणीसाव्या शतकात युरोपीयनांचं आगमन होईपर्यंत आफ्रिका एक अंधकारमय खंड (Dark Continent) राहिला. (इस्लाममधील शिया-सुन्नी ही फूटसुद्धा आफ्रिकेपर्यंत पोचली नाही!) पंधराव्या शतकात तुर्की लोकांनी इस्तंबुल जिंकल्यानंतर युरोप आणि आशिया यांच्यामधल्या व्यापाराचा खुष्कीचा मार्ग बंद पडला. त्यामुळे पाश्चात्यांना आशियात समुद्रमार्गे जावे लागले. त्यासाठी त्यांना आफ्रिकेला वळसा घालणं भाग पडलं. आफ्रिकेची तोंडओळख इथे झाली. अर्थात, पहिली चारशे वर्ष फक्त समुद्रकिनाऱ्याच्या आसपासचीच. तिथल्या स्त्रीपुरुषांचं अपहरण करून त्यांना गुलाम म्हणून अमेरिका खंडात विकायचं, हा धंदा युरोपीयांनी चारशे वर्षं चालवला. आफ्रिकन म्हणजे गुलाम हा शिक्का त्यांच्या कपाळावर कायमचा मारला गेला आणि त्यांच्याकडून गुरांसारखी कामं करून घेणं ही साहजिकच उपपत्ती झाली.

    गिधाडांसम आक्रमण

    गुलामगिरीचं युग संपल्यानंतर युरोपीयन राष्ट्रांनी आफ्रिकेच्या अंतर्भागात शिरायला सुरुवात केली. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, हॉलंड आणि बेल्जियम या साम्राज्यवादी सत्तांनी आफ्रिकेचे लचके तोडून गिळायला सुरुवात केली. (बेल्जियमच्या ताब्यातले देश बेल्जियमच्या मालकीचे नव्हते, तर ते त्यांच्या राजाची वैयक्तिक संपत्ती होती!) कालांतराने त्यांच्यात कोणी किती लुबाडायचं यावरून संघर्ष होऊ लागला. त्यातून तोडगा काढण्यासाठी १८८४-८५ मध्ये बर्लीनला या साम्राज्यवाद्यांची बैठक भरली. त्यांनी पाडलेल्या तुकड्यांवर शिक्कामोर्तब झाले. ते दोन महायुद्धे संपेपर्यंत कायम राहिले. त्यानंतर समाजवादी देशांचा उदय झाला आणि साम्राज्यवादी देश नरमले. १९४५ सालानंतर साम्राज्यवादी देशांना नाइलाजास्तव स्वातंत्र्य देणं भाग पडलं. अनेक ठिकाणी क्रांती झाली. त्यात आशिया खंडाने आघाडी घेतली. आफ्रिका खंड १९६०पर्यंत थांबला.

    साम्राज्यवाद्यांना काही तरी निमित्त पुढे करून आपल्या ताब्यातले देश सोडायचे नव्हते. आणि ते निमित्त १९५० सालानंतर त्यांना मिळाले. १९४५ साली अर्धा कोरिया तर १९४९ साली चीन साम्यवादी झाले आणि व्हिएतनाममध्ये साम्यवादी क्रांती सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने शीतयुद्ध पुकारलं. पाश्चात्य देशांबरोबर नेटो नावाची लष्करी संस्था उभी केली. आज जसं कुठेही हस्तक्षेप करायला पाश्चात्य देश ‘अतिरेकी, दहशतवादी’ हे कारण पुढे करतात तसे त्या काळात ‘कम्युनिस्ट’ हे कारण पुढे केलं जायचं. त्यानंतर ओघाने ‘लोकशाही मूल्यांची गळचेपी’ यांसारख्या गोष्टी आल्या. (त्याच काळी भारतात त्याच चालीवर ‘साधनशुचितेचा’ जप चालत असे!) त्यांच्याशी सामना करायला कोणत्याही अघोरी कृत्याला विधिनिषेध ठेवता कामा नये, हा दृष्टिकोन ठेवला जाई. बरेच वेळा कम्युनिस्ट नसलेले देश पाश्चात्यांच्या कृतींना घाबरून सोव्हिएट युनियनच्या आसऱ्याला जात. आपला भारत हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

    फोडले आणि राज्य केले...

    १९६० साली काँगो या देशाने लढा देऊन बेल्जियम या देशापासून स्वातंत्र्य मिळवलं. पट्रीस लुमुंबा हा स्वातंत्र्य योद्धा निवडणुकीनंतर पंतप्रधान झाला. तीन महिने झाले आणि बेल्जियमने अमेरिकेच्या सहाय्याने काँगोत बंडाळी चालू केली. ‘कळसूत्री’ सरकार आणले. लुमुंबांना पकडलं, त्यांचे हालहाल केले. खून केला. त्यांचं शरीर अॅसिडमध्ये टाकून संपवून टाकलं. फक्त एक दात शिल्लक राहिला तो चाळीस वर्षांनी त्यांच्या मुलाच्या ताब्यात दिला. (२००५ साली बेल्जियमने माफी मागितली, वगैरे, वगैरे.) ते हुतात्मा झाल्यानंतर काही वर्षांतच सोव्हिएट युनियनने त्यांच्या नावाची युनिव्हर्सिटी काढली. १९६३ साली अंकृमा नासर या पुरोगामी नेत्याने आफ्रिकन एकी संघटना (OAU) स्थापन केली. पण कालांतराने तीही पाश्चिमात्य-धार्जिणी झाली.

    पोर्तुगिजांनी आपल्या वसाहती १९७०च्या दशकापर्यंत सोडल्या नाहीत. आपण आपला गोवा लष्कर पाठवून सोडवला, हे आपल्या लक्षात आहे. (या कारणामुळे भारताविरुद्ध कारवाई करावी, हा ठराव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी यूनोमध्ये आणला होता, पण तो फसला हे मात्र फारच थोड्या लोकांच्या लक्षात असेल!) फ्रान्सचा दुसऱ्या महायुद्धात दणदणीत पराभव झाला असला, तरी फ्रेंच राज्यकर्त्यांना आपल्या वसाहती सोडवत नव्हत्या. (दुसरं महायुद्ध चालू असताना त्या जर्मनीच्या ताब्यात गेल्या होत्या.) गंमत म्हणजे, फ्रान्सच्या दृष्टीने त्यांना स्वतंत्र अस्तित्वच नव्हतं. ते फ्रान्सचेच प्रांत होते. सन १९६०मध्ये आफ्रिकेतल्या अल्जिरियाने गनिमी काव्याने स्वातंत्र्य मिळवलं, तर आशियातल्या व्हिएतनामने खुल्या मैदानात! स्वातंत्र्यासाठी दोन्ही देशांतील लक्षावधी लोक हुतात्मा झाले.

    युरोपने केलेल्या लुटीला अंत नाही...

    AfricaEnslaved
    युरोपीय गोर्‍यांनी वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेतून कितीतरी शतके आफ्रिका खंडाची अमर्याद लूट तर केलीच, पण कृष्णवणीय आफ्रिकींवर अमानुषपणे गुलामीदेखील लादली...

    आफ्रिका खंडातील अनेक देशांत नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात मिळाली आहे काँगोत तांबे आणि कोबॉल्ट या धातूची खनिजं. कोबॉल्ट हा स्टेनलेस स्टीलचा एक आवश्यक घटक आहे. विद्युत वाहनांच्या आजच्या जमान्यात या धातूला प्रचंड महत्त्व निर्माण झालं आहे, कारण तो बॅटरी बनवण्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. कोकोच्या बियांचं पन्नास टक्के उत्पादन एकट्या आयव्हरी कोस्ट या देशात होतं. पण चॉकलेट आणि कोको हे मात्र युरोपमध्ये बनतात आणि त्यापासून ते देश वर्षाला दोनशे अब्ज डॉलर कमावतात! नायजेरियात खनिज तेल आहे. बर्किना फासो आणि दक्षिण आफ्रिकेत हिरे आहेत. निझ्येर या देशात युरेनियम धातूचं जगातील वीस टक्के उत्पादन होतं. यापासून विद्युत उर्जा मिळते. आज फ्रान्समधील सत्तर टक्के विद्युतउर्जा निझ्येरच्या युरेनियमपासून मिळते. निझ्येरमध्ये मात्र नव्वद टक्के गावात अंधार आहे. वीजेची विक्री करून फ्रान्स दर वर्षी ७० अब्ज डॉलर कमावून गडगंज होतो आणि निझ्येरच्या ऐंशी टक्के लोकांना उपासमार घडते.

    जगातील दोन क्रमांकाचं सोन्याचं उत्पादन घाना या देशात होतं. बॅटरी बनवायला आवश्यक असा दुसरा धातू लिथियम नमिबिया आणि झिंबाब्वे या दोन देशात मुबलक आहे. सर्वात उपयुक्त असा धातू असलेले तांबे, काँगो, झांबिया, दक्षिण आफ्रिका या देशांत मुबलक प्रमाणात आहे. पण या सर्व संपत्तीचा आफ्रिकेला फारसा फायदा होत नाही. तिची दिवसाढवळ्या चोरी होते. (यात बॅरिकसारख्या कंपन्या आघाडीवर आहेत.) स्वित्सलँडच्या ‘स्विस ओड’ या संस्थेच्या पाहणी प्रमाणे पाश्चिमात्यांनी गेल्या साठ वर्षांत आफ्रिकेचं ४३५ टन सोनं चोरलं आहे, इतर मूल्यवान धातू आणि हिरे वेगळेच. याचा परिणाम म्हणजे, आफ्रिकेला ६५० अब्ज डॉलरचं कर्ज आहे, आणि तिथल्या २६ देशांच्या पदरी दिवाळखोरी आली आहे.

    ही वरवर मिळालेली संपत्ती आहे. पोटात दडलेली संपत्ती अनेक पटीने जास्त असल्याचा अंदाज आहे. ती बाहेर काढणं जितकं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे त्या संपत्तीचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करणं. आतापर्यंत वर्षानुवर्ष युरोपने हिची किती लुटालूट केली आहे, याचा हिशेब कित्येक लक्ष अब्ज डॉलरपर्यंत जातो. अशी परिस्थिती अव्याहत चालू राहिली आहे याचं मुख्य कारण म्हणजे आफ्रिकन लोकांना ते कनिष्ठ आहेत, हे सिद्ध करण्यात साम्राज्यवाद्यांना यश मिळालं हे आहे. शास्त्रीय ज्ञान फक्त आमच्याकडेच आहे आणि ते जबाबदारपणे वापरण्याची कुवतसुद्धा फक्त आमच्याकडेच आहे, हेही त्यांनी तिथल्या जनतेच्या गळ्यात सफाईदारपणे उतरवलं.

    नाटोची युद्धखोरी

    आफ्रिकेत सहारा वाळवंटाच्या दक्षिणेला सहाराच्याच आकाराचा पूर्व-पश्चिम असा साहेल नावाचा हवामानाचा पट्टा आहे. (वाळवंटाचा किनारा म्हणून त्याला साहेल हे अरबी नाव!) त्यात वीस देश येतात आणि त्यातले काही थोडे देश सोडले, तर बाकीचे फ्रान्सच्या ताब्यात होते. त्यांना सामुदायिक नाव आहे ‘फ्रान्साफ्रीक’. त्यांना स्वातंत्र्य दिल्यानंतर सुद्धा फ्रान्सने त्यांच्यावर तीन प्रकारे कब्जा ठेवला आहे. प्रथम म्हणजे, आपण त्यांचा शंभर वर्ष ‘विकास’ केला त्याचा मोबदला म्हणून त्या राष्ट्रांकडून कायम ‘वसाहत कर’ वसूल केला. तो कर आतापर्यंत एक हजार अब्ज डॉलरपर्यंत गेला आहे. दुसरं म्हणजे, त्यांनी त्यांचं परकीय चलन फ्रान्सच्या ताब्यात पॅरिसमधील बँकेत ठेवलं पाहिजे, हा जुलूम. आणि तिसरं म्हणजे, त्यांनी देशांतर्गत स्वतःचं नाणं न ठेवता फ्रैंक-आफ्रिकान फ्रांक, किंवा सी. एफ. ए. या फ्रेंच चलनाचाच वापर केला पाहिजे. (फ्रान्सने स्वतः मात्र फ्रँक सोडून युरोचा आधार घेतला आहे.) असल्या बळजबरी नियमांविरुद्ध कोणत्याही लोकशाही, मानवतावादी देशांनी (किंवा भारताने देखील) आवाज उठवल्याचं सोडून द्या, पण त्याची दखल घेतल्याचंही ऐकण्यात नाही.

    या सर्व गोष्टींचा संताप या देशांतील सामान्य जनतेत खदखदत होता. पण ती असहाय होती. निषेधाचा शब्द जर काढला तर काय होते, याचा अनुभव लोकांना होता. देशांतील वरचे स्तर पाश्चात्यांचे मिंधे असत. पाश्चात्य सांगतील तशा आणि तेव्हा निवडणुका घेतल्या जायच्या. त्यांना प्रतिकूल असे लोक निवडून आले, तर त्या निवडणुकाच अवैध ठरवायच्या किंवा झुंडगिरीला उत्तेजन देऊन त्यांना पळवून लावायचे. सैन्यातील कोणी राज्य घेतले तर त्याचा खून करून आपल्या मर्जीतील माणसं सत्तेवर आणायची. थोडक्यात, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व व्यवस्था तशीच ठेवायची. याला नववसाहतवाद असं नाव दिलं गेलं.

    २००० सालानंतर या विचारांत उत्क्रांती झाली. नववसाहतवादावर आणखी एक थर आला. १९८० च्या दशकात अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने रशियाविरुद्ध मुजिहादीन (म्हणजे जिहादी) ही धर्मांधांची फौज उभी केली. (या गोष्टीला भारताचा सर्वपक्षीय पाठिंबा होता!) त्या लढाईत जसा रशियाचा पाडाव झाला, अमेरिकेची भूक वाढली. इस्लामी जगतातील जरी सर्व देश अमेरिकाधार्जिणे असले, तरी काही देशांमध्ये कधी कधी बंडखोरीचे विचार यायचे. अशांना ताळ्यावर आणण्यासाठी अल-कायदा, बोको हराम, अल-शबाब सारखे आतंकवादी पोसायचे, त्यांना शस्त्रास्त्रं पुरवायची, आणि त्यांच्यापासून देशाला संरक्षण देण्याच्या नावाखाली आपले सैनिकी तळ उभे करायचे. वेळप्रसंगी युद्ध लादायचं. हे तंत्र वापरून नेटो या संघटनेने इराक, लिबिया, सिरियासारख्या देशांत आपल्या मर्जीची सरकारं आणली. सद्दाम हुसेन, मुअम्मर गदाफी, आसाद या त्यांच्या नेत्यांना एक तर ठार मारले किंवा पळवून लावले.

    आफ्रिकेचा कल रशिया, चीनकडे

    ChinaRussiaWithIbrahim
    चीन आणि रशियाने आफ्रिकी देशांत पायाभूत सुविधांमध्ये एका बाजूला मोठी गुंतवणूक केली आहे, तर दुसरीकडे पुतीनसारखा बलवान राष्ट्राध्यक्ष युरोप-अमेरिकेला भीक न घातला, बर्किना फासोच्या क्रांतिकारी नेत्याला सन्मानपूर्वक आमंत्रण देतो आहे...

    अशा अनिश्चित पण स्फोटक वातावरणात बर्किना फासो या एका देशात कॅप्टनच्या हुद्यावर असलेल्या इब्राहिम ट्राओरे नावाच्या एका तिशीतल्या तरुणाने २०२२च्या जुलै महिन्यात ठिणगी टाकली. या भूमीवेढीत लहान देशाचं मुळचं नाव ‘अपर व्होल्टा’. १९८५ साली इब्राहिमसारख्याच संकारा नावाच्या जवान क्रांतिकारकाने ते बदलले. त्यांच्या हौसी भाषेत बर्किना फासो या शब्दाचा अर्थ होतो, संतभूमी. त्याला आणखीही काही बदल करायचे होते. पण सत्तेवर आल्यापासून तीन महिन्यांतच त्याचा खून झाला. “तुझीही तीच परिस्थिती होणार आहे,” असं इब्राहिमच्या घरच्यांनी त्याला सांगून पाहिलं. (इब्राहिमचे वडील एका हिऱ्याच्या खाणीत अपघाती निधन पावले.) पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आता परिस्थिती बदललेली आहे. आज अमेरिका काही एकमेव महाशक्ती नाही राहिली. रशिया आणि चीन या आणखी दोन महाशक्ती आहेत. त्यातल्या रशियाची मदत लष्करी बाबतीत घ्यायची आणि पायाभूत संरचनेत (Infrastructure) सुधारणा करण्यासाठी चीनची मदत घ्यायची, अशी त्याची योजना होती.

    त्याप्रमाणे त्याने चीनच्या मदतीने रस्ते बनवले, हॉस्पिटलं उघडली, शाळा बांधल्या. तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था चालू केल्या. बिगरी ते कॉलेज शिक्षण फुकट. विद्युतवाहनं बनवायचा कारखाना काढला. देशाला समुद्रकिनारा नसल्याने ‘सुकी’ बंदरे (Dry Ports) उभी केली. सोन्याच्या खाणी बांधल्या. हे सर्व फ्रान्सला आवडलं नाही. अतिरेकी कारवाया वाढल्या. युक्रेन, लिबिया, सिरिया इथे अमेरिकन शस्त्रास्त्रांचे साठे मुबलक होते. इब्राहिमने फ्रान्सचे लष्करी तळ बंद केले. त्याच्यावर प्राणघातकी हल्ले चालू झाले. स्वसंरक्षणासाठी त्याने उत्तर कोरियाकडून ७०० अंगरक्षक मागवून घेतले. उत्तर कोरियाला पाश्चिमात्यांनी मुळातच वाळीत टाकल्यामुळे त्याच्यावर कोणतेही निर्बंध घालता येईनात. इब्राहिमची क्रांतिकारक म्हणून ख्याती पसरत चालली. त्याच्या आजूबाजूच्या देशांतील जनता जागृत झाली. माली, निझ्येर, गबॉनसारख्या देशात लष्करी बंड झाली. निझ्येरमधून फ्रेंच आणि अमेरिकन लष्करी तळांना हाकलून लावले. ताज्या बातमीनुसार २१ मेला आयव्हरी कोस्ट या देशांतही बंडाळी चालू झाली आहे. तिथेही जनता रशियाचे झेंडे घेऊन फिरत आहे.

    पाश्चिमात्य सत्तांशी निष्ठ असलेल्या १२ आफ्रिकन देशांची ईकोवास (Economic Cooperation of Westem African States: ECOWAS) नावाची एक संस्था आहे. या संस्थेतून आफ्रिकन तरुण फ्रान्समध्ये जाऊन इंग्लंडमध्ये असायच्या तशा I.C.S. सारख्या परीक्षा देतात. ते स्वदेशात येऊन फ्रान्सधार्जिण्या नोकरशाहीचा भाग होतात. ईकोवासने बर्किना फासोसारख्या देशांवर बहिष्कार घातला आणि सैन्य पाठवून हस्तक्षेप करण्याची धमकी दिली. इब्राहिम व त्याच्या मित्र देशांनी AES: Alliance of Sahel States नावाची स्वतःची संघटना उभी केली. इब्राहिमची ख्याती आता दूरवर पसरली. अॅमेझॉन या कंपनीचा मालक जेफ बेझोसने त्याचं नाव घेऊन त्याच्याविरुद्ध अनुदार उद्‌गार काढले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीचा दिवस रशियात दर वर्षी साजरा करतात. या वर्षीच्या ९ मेला त्या घटनेला ८० वर्ष झाली. त्या समारंभाला रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी इब्राहिमला खास विमान पाठवून बोलवून घेतले. इतर ९० देशप्रमुखही आले होते. पुतिन यांनी इब्राहिमला आपल्या आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याजवळ बसवले. अमेरिकेतील इतिहासातील एकमेव निग्रो फोर-स्टार जनरल लँगली यांनी, बर्किना फासो आता चीन आणि रशियाच्या ताब्यात चालला आहे. आपण काही हालचाल केली पाहिजे, अशी सुप्त धमकी दिली. त्यावर इब्राहिमने भाष्य केलं की, घाणेरडी कामं करायला या साम्राज्यवाद्यांना काळ्या कातडीची माणसं बरी सापडतात. इराकवर हल्ला करायच्या वेळी कोलन पॉवल, लिबियावर हल्ला करायच्या वेळी बराक ओबामा!

    अमेरिका आणि फ्रान्स यांना सोडून तुम्ही चीन आणि रशिया यांच्या गुलामगिरीत पडताय, असं म्हटल्यावर इब्राहिमचं म्हणणं आहे की चीन आणि रशिया यांनी आमच्यावर इतिहासात कधी राज्य केलं नाही. उलट आम्ही जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढा देत होतो, तेव्हा त्यांनीच आम्हाला मदत केली. दुसरं असं की या पाश्चिमात्यांनी आमच्यावर सत्तर वर्ष राज्य केलं. आमची परिस्थिती बघा. आता चीनबरोबर आम्ही दोन वर्षंच काढली. आणि एवढ्या छोट्या काळात झालेली आमची प्रगती बघा! आफ्रिकेची प्रगती कशी करायची याबद्दल आफ्रिकेच्या जनतेची फ्रान्सबरोबर चर्चा गेली साठ वर्ष चालली होती, तो पुढे म्हणाला. त्यातून काही निष्पन्न झालं नाही. पण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर माझी रशियामधल्या लिफ्टमध्ये फक्त पाच मिनिटंच चर्चा झाली. आणि आमचे सर्व प्रश्न सुटले!

    रशियात मुलाखत देताना इब्राहिम म्हणाला, “फ्रान्सने आमची संपत्ती चोरली एवढंच नाही, तर आमचा आत्मा चोरला. तो आम्हाला परत घ्यायचा आहे!”

    -oOo-



    डॉ. मोहन द्रविड
    डॉ. मोहन द्रविड

    डॉ. द्रविड हे फिजिक्समधील पीएच.डी. असून राजकारण, विज्ञान, इतिहास या विषयांवरील त्यांचे लिखाण वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध होते. त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असून ‘मुक्काम पोस्ट अमेरिका’ हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन देणारे पुस्तक ‘रोहन प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आहे.
    ईमेल: mohan.drawid@gmail.com.



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा