Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

रविवार, २० जुलै, २०२५

घनवादाचे चित्र-विज्ञान

  • ज्ञान-विज्ञान

    PicassoHisPainting
    पिकासो आणि त्याचे ब्युबिस्ट शैलीतले लालबत्ती भागातल्या रमणींचे चित्र...


    कला ते ज्ञानशाखा

    सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील चित्रकार, शिल्पकार यांना समाजात स्थान आणि मान नव्हता. हे लोक म्हणजे, हातकाम करणारे कारागीर असाच समज समाजात सर्वदूर पसरला होता. सत्ता आणि मत्ताधारी या दोहोंच्या लेखी ही कारागिरी होती. लेखक, कवी, नाटककार, लॅटिन बोलणारे पंडित, यांना समाजात आणि दरबारात मोठा मान होता. मात्र त्यापासून चित्र-शिल्पकार खूपच दूर होते. सरदार-दरकदार, धनिक व्यापारी यांच्या घरी मेजवानीला लेखक कवी वगैरेना आमंत्रण असे, पण चित्र कलावंतांना यात स्थान नसे.

    या पार्श्वभूमीवर, चित्रकार, शिल्पकार यांनी समाजातील धुरिणांशी वाद घातले, चर्चा केल्या आणि हस्तकौशल्य हे मेंदूकौशल्यच असते, हे त्यांना पटवून देण्याची पराकाष्ठा केली. हळूहळू परिस्थिती बदलली. सुरुवातीला होतकरू चित्रकार मोठमोठ्या चित्रकार शिल्पकारांकडे रंग घोटण्यापासून माती कालवण्यापर्यंत कामे करत आणि ‘मास्टर’च्या मर्जीनुसार शिकत. कालांतराने ही स्थितीही बदलली. कला ही तत्त्वज्ञानासारखी ‘अकॅडमी’मध्ये शिकवली जाऊ लागली.

    अकॅडमी हा शब्द वापरण्यामागे कलेबद्दलचा बदलेला दृष्टिकोन होता. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो एका राईत विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवत असे, त्याला ‘अकॅडमी’ म्हणत असत. त्यावरून हा शब्द आला आहे. आरंभाला इटालियन कलाकार एकत्र जमत त्याला ते अकॅडमी म्हणत, त्यांना कलेचा संबंध मेंदूकौशल्याशी, व्यासंगाशी, आहे हे जणू दाखवून द्यायचे होते. अठराव्या शतकापासून चित्र-शिल्पकला शिकवणाऱ्या संस्थांसाठी ‘अकॅडमी’ हा शब्द रूढ झाला. कलाशाखा ही ज्ञानशाखा होतीच, ती आता समाजमान्य झाली, असे म्हणणे सुयोग्य ठरेल. ज्ञानाचा संबंध कल्पनेची भरारी आणि त्यासाठी प्रयोग यांच्याशी असतो. असे प्रयोग पूर्वीही होत होते, तसेच ते पुढेही चालू राहिले.

    घाट आणि रंगांची मुक्ती

    निसर्गातील मूलभूत घटकांकडे जाण्याचा ध्यास जसा विज्ञानाला, तसा तो दृश्यकलेलाही असतो. या मूलभूत घटकांकडे चित्रकलेच्या माध्यमातून जाण्याच्या ध्यासातून क्युबिझम घनवादाच्या चळवळीचा उगम आहे. मॉडर्न अॅबस्ट्रॅक्ट आर्ट = आधुनिक अमूर्त कलेत दोन मूलभूत घटकांच्या बाबतीत प्रगत पाऊले पडली, ‘लिबरेशन ऑफ फॉर्म’ आणि लिबरेशन ऑफ कलर घाटांची मुक्ती आणि रंगांची मुक्ती. यातील घाटांच्या मुक्तीचे पाऊल क्युबिझमने टाकले. तेव्हापासून आधुनिक चित्रकलेत कलावंताच्या व्यक्तिनिष्ठ चित्रदृष्टी-व्हीजनचे; त्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व दिसू लागले. भवतालातील नैसर्गिक विभ्रम, घाटांचे मोहजाल या पेक्षा कलावंताच्या मनातील भ्रम-विभ्रम त्याच्या कलाकृतीत प्रतिबिंबित होऊ लागले.

    निसर्गातही अमूर्त घाट असतात, त्याचा मेंदू कसा अर्थ लावतो हे पाहणे मनोहारी आहे.

    पॅरिडोलियाः यादृच्छिक पोत

    याचा अर्थ, यादृच्छिक रॅन्डम किंवा अमूर्त अॅबस्ट्रॅक्ट ‘व्हिजुअल पॅटर्न’ ‘दृष्टिगम्य नमुनाकृती’मध्ये अनेकदा अर्थपूर्ण प्रतिमा पाहण्याची मेंदूची क्षमता असते. काही उदाहरणांनी ही संकल्पना स्पष्ट होईल. आकाशात ढग विहरत असतात. माणूस त्याकडे गमतीने पाहत असतो. अचानक एखादा ढग त्याला कुत्र्यासारखा भासतो, तर कधी विदुषकासारखा! कधी कधी विलक्षण आकाराच्या फळभाज्या शेतकऱ्याला त्याच्या बागेत भेटतात. कोणाला त्यात मूर्तीचा भास होतो, त्याचे फोटो वर्तमानपत्रात येतात.

    पॅरिडोलियाने मोठमोठ्या वैज्ञानिकांना सुद्धा चकवले आहे. १९७६चा जुलै महिना होता. वायकिंग-वन हे स्पेसक्राफ्ट मंगळाच्या पृष्ठभागाचा धांडोळा घेऊन नासाला फोटो पाठवत होते. अचानक माणसाच्या चेहऱ्यासारखा फोटो वैज्ञानिकांना आढळला. तो फोटो जगभर व्हायरल झाला. त्या छायाचित्राचे संशोधकांनी विश्लेषण केले. विविध सावल्या एकत्र येऊन ही प्रतिमा तयार झाली होती. हा पॅरिडोलियाचा प्रकार आहे, हे सिद्ध झाले. सप्टेंबर २०२३. नासाच्या प्रिझव्र्हरन्स रोव्हरने खडकांचे फोटो पाठवले. एक खडक शार्क फिनच्या आकाराचा तर दुसरा खेकड्याच्या पंजासारखा होता. हा पॅराडोलियाच होता.

    कोणताही ‘रँडम’ आकार वा घाटाचा प्रकार माणसाने पाहिला तर तो माणूस त्याच्या स्मृतीत जे आकार नोंदवलेले असतात, त्याच्याशी त्या रँडम घाटाची तुलना करून त्या आकाराशी जो आकार जुळेल त्याचे रोपण त्या रँडम आकारावर करतो. त्याचा भास त्याच्या नजरेला होतो. हा पॅराडोलियाचा गाभा आहे. म्हणजे स्मृतीत जर त्या सारखा किंवा त्याच्या जवळ जाणारा घाट नसेल तर मेंदू त्या आकाराचा अर्थ लावण्याचे कष्ट घेत नाही. या पार्श्वभूमीवर दृष्टीविज्ञानाच्या निकषानुसार क्युबिझमचा शोध या लेखात घेतला आहे.

    पॅरिसचा परिसस्पर्श

    दृश्यकलेच्या अनेक चळवळीत पॅरिसचा परिसस्पर्श महत्त्वाचा ठरलेला आहे. घनवाद या चित्र चळवळीचे उद्घाटन पॅरिसमध्ये झाले. पॉल सेझान हा इथे सूचक बिंदू असला तरी या घनवादाच्या उद्घाटनाचे श्रेय पाब्लो पिकासो (१८८१-१९७३) आणि जॉर्ज ब्राक (१८८२-१९६३) यांना दिले जाते. प्रातिनिधिक कलेचा त्याग करणे हा घनवादाचा उद्देश नव्हता, पण काहीतरी सुधारणा करण्याचा उद्देश असावा, असे पाश्चात्य कलेच्या इतिहासकारांनी नमूद केले आहे.

    आंतरविद्याशाखीय विचारधारांकडे नजर टाकली म्हणजे, काही समांतर धारा दिसतात. ज्यावेळी घनवादी चित्रकार कॅनव्हास वरील अवकाशाचे आयोजन करून नवीन वास्तव रचीत होते. त्याच सुमारास (१९२४) साहित्यात, कलेत सर्रिआलिझम अर्थात अतिवास्तववादाची सुरुवात झाली होती.

    वास्तव अनेक असतात, प्रत्येकाचे वास्तव वेगळे, स्वप्नातील वास्तव आगळे आणि नेणीवेतील तर त्याहून विलक्षण. शब्दांच्या अवकाशात साहित्यकार अशी वास्तवे रचून निराळाच अनुभव देण्याचा प्रयत्न करतात.

    दृश्यकला, साहित्य यातील नवनवे प्रयोग फ्रान्समध्ये झालेले दिसतात. पाश्चिमात्य देशातील सर्व कलांच्या दृश्यकलेपासून साहित्यापर्यंत चळवळीचे केंद्र मुख्यत्वे करून फ्रान्स होते असे का? विचारात पडलो. जुन्या नोंदीचा धांडोळा घेतला. चार्ल्स बॉदलेअर (१८२१-१८६७) हा एक वादग्रस्त पण प्रभावी कवी आणि कलासमीक्षक याचे एक विधान महत्त्वाचे वाटले. ते असे ‘आधुनिक जीवनात सौंदर्याचा स्वभाव, रुप बदलत असते. माणसांची पंचेंद्रिये विविध उद्दीपकाद्वारे सौंदर्याच्या लहरी घेऊन येत असतात, पण शेवटी ही पंचेंद्रिये आत खोलवर कुठेतरी एकवटलेली असतात.’

    मला हे विधान मेंदूविज्ञानाच्या नजरेतून अर्थपूर्ण वाटले. कलाकाराला पंचेंद्रियांची जाण असणे, सोबतच सौंदर्याचा स्वभाव आणि रुप काळानुसार बदलत असते याचे भान असणे, हाच कलेच्या चळवळीचा आरंभबिंदू असू शकतो. कारण हा बदल मेंदूत घडत असतो. आता बराच उलगडा मला झाला.

    फ्रान्स आणि ब्रिटन या दोहोंमध्ये काही तासात पार करता येईल, अशी दर्याची दरी. याच कालखंडात पल्याडच्या ब्रिटनमध्ये काय घडत होते, ते तपासले. १८५०च्या जुलै-ऑगस्टमध्ये लंडन शहर ऐतिहासिक ‘The Great Stink - द ग्रेट स्टिंक’ महादुर्गंधीने त्रस्त झाले होते. थेम्स नदीत स्वच्छ प्रक्रिया न केलेले सबंध शहराचे सांडपाणी सोडल्यामुळे हे घडले होते. ब्रिटनमधील शहरात कॉलराच्या साथी पसरल्या होत्या. पार्लमेंटने १८५० मध्ये महत्त्वाचा लोकोपयुक्त ‘ग्रंथालय कायदा’ पास केला होता. १८५१ मध्ये तंत्रज्ञान, विज्ञान आणि औद्योगिक क्रांति दाखवणारे जागतिक ‘The Great Exibition द ग्रेट एक्झिबिशन’ भरवले जात होते.

    फ्रान्स आणि ब्रिटन अगदी जवळ असणारे भूगोलाचे दोन तुकडे, पण दोन किती भिन्न संस्कृती. तेव्हा घनवादाच्या कला चळवळीचा आरंभ फ्रान्समध्ये होणे, याचे बीज फ्रेंचांच्या स्वभावाला धरून आहे.

    घनवाद एक विश्लेषण

    हुआन ग्री- Juan Gris (१८८७-१९२७) हा स्पॅनिश पेंटर आणि कला समीक्षक. जन्म, शिक्षण माद्रिद येथे, पण बहुतेक जीवन पॅरिसमध्ये. पाब्लो आणि जॉर्ज हे दोघे हुआन ग्रीचे दोस्त होते. हुआन ग्री हा स्वतः क्युबिस्ट होता. त्याने पाब्लोचे क्युबिस्ट शैलीत पोर्ट्रेट काढले होते. हुआन ग्रीने घनवादाबाबत लिहिले आहे. त्याचा आशय असाः ‘घनवाद हे एक प्रकारचे विश्लेषण आहे. चित्रकार एका वस्तूकडे पाहत त्या वस्तू भोवती गोल फिरतो, तेव्हा एका पाठोपाठ एक त्या वस्तूचे अवतार चित्रकार पाहतो आणि त्या क्रमनुसार प्रतिमा एकीकृत = fused करून कॅनव्हासवर उमटवतो. वस्तूभोवती फिरत असताना दर क्षणाला, वेगळ्या कोनात त्याला त्या वस्तूची प्रतिमा दिसते. त्यातील अस्थिर घटक त्याला उघड करून दाखवायचे असतात. हे अस्थिर घटक अशाप्रकारचे असतात जे सतत बदलत नाहीत. जरी ते अस्थिर असले तरी, असे क्युबिस्टला दाखवायचे असते. कारण ते घटक नित्य आणि जरुरीचे असतात, असे क्युबिस्टला वाटत असते,’ हुआन ग्रीचे घनवादाबाबतचे हे स्पष्टिकरण बरेच काही सांगून जाते. या स्पष्टिकरणाचा धागा पकडून पिकासोच्या एका चित्राचे मेंदूतज्ज्ञांनी केलेले विश्लेषण उद्बोधक ठरेल.

    पिकासोची पेंटिग्ज

    Les Demoiselles d'Avignon हे १९०७ सालचे पिकासोचे पहिले क्युबिस्ट शैलीकडे झुकणारे चित्र. अॅव्हिनॉन या बार्सीलोना शहरातील रेड लाइट भागातील रमणींचे हे चित्र. पिकासोसारखे चित्रकार या भागाला वरचेवर भेट देत.

    ManWithViolin
    प्रज्ञावंत चित्रकारांची बुद्धी आणि नजर आसपासच्या जगण्यातले आकार, घाट नेहमीच एकमेवाद्वितीय प्रकाराने टिपत असते. त्या प्रज्ञेची अनुभूती देणारे पिकासोचे ‘मॅन विथ ए व्हायोलिन’ हे चित्र...

    या चित्राचे सूक्ष्म निरीक्षण मेंदूतज्ज्ञांनी केले आहे. ते असेः या ललनांच्या समूहासमोरून चित्रकार अर्धगोलातून फिरत आहे, मागे वळून फिरून पाहत आहे. प्रत्येक क्षणी त्याच्या नजरेत जी प्रतिमा उमटली, ती तो कॅनव्हासवर गोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. उजव्या कोपऱ्यात बसलेल्या तरुणीची छबी बघा, मेंदू विज्ञानाच्या कोनातून त्या प्रतिमेतील ‘अॅम्बिग्युइटी’ = अस्पष्ट संदिग्धता रसिली आहे. नजरबोध असाच होत असतो, कधी ती दर्शकाकडे ‘फेसिंग’ = सन्मुख आहे, दर्शकाकडे बघत आहे, तिचा ‘पुढा’ दर्शकाकडे आहे, असे भासते, का ती उजवीकडे, क्षणात डावीकडे बघते आहे, तर कधी चक्क पाठच दर्शकाकडे आहे. पण ती मान पूर्ण वळवून दर्शकाकडे पाहत आहे असे भासते, जणू अर्धगोलातून फिरताना पिकासोला दिसणाऱ्या प्रतिमा त्याने एका ‘सिंगल व्हिजन’मध्ये कॅनव्हासवर चितारल्या आहेत. याला दृष्टी विज्ञानाच्या भाषेत ‘सायमल्टेनियस व्हिजन’ म्हणतात.

    मानवी व्यवहारात असेच घडते. तुम्ही गर्दीतून चालला आहात, तुम्हाला क्षणभर एक चेहरा दिसतो, तो तुम्हाला आकर्षित करतो. ती सुंदरता तुमची नजर टिपून घेते, तुमचा व्यवहार चालू राहतो. एखादी पाठमोरी आकृती दिसते, तुम्ही स्वतःशी म्हणता ‘अरे याला आपण कोठे तरी पाहिले आहे’. अशी अनेक उदाहरणे, तुमच्या नजरपटलावर उमटलेली तुम्हाला आठवतील. याला ‘सायमल्टेनियस व्हिजन’

    ‘एकाचवेळी होणारे दृष्टीज्ञान’ असे म्हणतात. याचा मानवी व्यवहारात उपयोग असतो, हे आपण अनुभवलेले आहे. नजर स्मृती तयार करून साठवण्याच्या अनेक वाटा मेंदूत आहेत, त्यातील ही एक वाट आहे.

    Neuro
    सेमिर झेकी हा मेंदू तज्ज्ञ म्हणतो, मानवी मेंदू हा सुद्धा आसपासची माणसे, वस्तू वेगवेगळ्या कोनांतून बघत असतो आणि त्या सार्‍यांचे संश्लेषण करून स्वतःसाठी ओळखता येईल अशी एक प्रतिमा निर्माण करत असतो...

    जॉन गोल्डिंग (१९२९-२०१२) हे सुप्रसिद्ध कला इतिहासकार, कलासमीक्षक आणि पिकासो अभ्यासक होते. यांनी जे नमूद केले आहे, त्याचा आशय असा आहे की, ‘इटालियन रेनेसाँपासून पुढे पाचशे वर्षे अनेक चित्रकार द्विमितीय पृष्ठभागावर त्रिमितीयता दाखवण्यासाठी गणितीय आणि वैज्ञानिक मार्गदर्शक तत्त्वे वापरुन त्यांच्या चित्रविषयाचे चित्र एका स्थिर दृष्टिकोनातून बघून काढत असत. परंतु ‘Les Demoiselles हे चित्र काढताना पिकासोने अस्सल स्वयंभू नवता दाखविली आहे’.

    संश्लेषणात्मक घनवाद

    संश्लेषणात्मक = सिंथेटिक घनवादाचा भर नवीन घाटांची आकारांची निर्मिती हा असतो. यासाठी पिकासोचे ‘Man with a Violin’ (१९११-१९१२) हे चित्र पाहिले पाहिजे. पिकासोने अनेक अंगाने, विविध कोनातून या चित्रविषयाचे संश्लेषण कॅनव्हासवर केले आहे. त्याला ‘मॅन विथ ए व्हायोलिन’ हे शीर्षक दिल्यामुळे दर्शक त्या चित्राचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. हे शीर्षक जर दिले नसते, तर दर्शकाला हे चित्र उमगले नसते. याचे स्पष्टिकरण सेमिर झेकी या मेंदूतज्ज्ञाने दिले आहे. त्याचा आशय असाः ‘मानवी मेंदूसुद्धा वस्तू, माणसे, विविध कोनातून बघतो आणि या प्रतिमांचे संश्लेषण करून एक प्रतिमा निर्माण करतो, जी त्याला ओळखता येईल व त्या बाबतचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो’. याचा अर्थ, ती प्रतिमा ओळखण्यासारखी नसेल तर मानवी मेंदू त्यापासून ‘ज्ञान’ मिळवू शकत नाही, म्हणजे त्याचा अर्थ लावू शकत नाही. पण या चित्राचे शीर्षक ‘मॅन विथ ए व्हायोलिन’ हे वाचल्यावर वा ऐकल्यावर काही दर्शकांना तसा या चित्राचा अर्थ लागू शकतो. याला एक मार्मिक कारण आहे. त्याचा मला शोध ‘दृश्यकला- जागतिक कलेचा संक्षिप्त इतिहास’ (मूळ गुजराती संस्करण सरदार पटेल युनिव्हर्सिटी, वल्लभ विद्यानगर, मराठी अनुवाद अरुणा जोशी (बडोदा), पॉप्युलर प्रकाशन, मुंबई पहिली आवृत्ती २०२१/१९४३) या पुस्तकाचे संपादकद्वय गुलाम मोहम्मद शेख आणि शिरीष पांचाल यांनी लिहिलेले प्रास्ताविक वाचताना लागला. त्यांनी नमुदलेले विधान असेः ‘चिनी भाषेत अशी म्हण आहे की, कित्येक लोक चित्र कानाने पाहतात. म्हणजे जे ऐकले असेल ते, ते चित्रामध्ये पाहू जातात.’ या विधानात वर सांगितलेल्या शीर्षकाचे सत्य दडलेले आहे.

    चित्रत्वचा आणि अंतरंग

    घनवादाने दर्शकाच्या दृष्टी संवेदनाला पहिल्यांदा इतके मूलगामी आव्हान दिले, असे पाश्चात्य कलेचा इतिहास पाहिला तर दिसून येते. अमूर्त कलेतील घनवादी चित्रे पाहताना दर्शकाला निर्मितीक्षम दर्शक व्हावे लागते. मेंदू विज्ञानाच्या दृष्टीने मेंदूला पडलेल्या सवयीमुळे हे सहज शक्य होत नाही. त्यामुळे सामान्य दर्शक या कलेपासून दूर जातो असे मेंदू तज्ज्ञांचे मत आहे.

    कार्ल आइनस्टाइन (१८८५-१९४०) हे जर्मनीतले सुप्रसिद्ध कलेचे इतिहासकार आणि समीक्षक यांनी घनवादाबाबत जे विधान केले आहे, त्याचा आशय असाः ‘आळसावलेल्या आणि शिणलेल्या दृष्टी संवेदनेला घनवादाने उद्दिपित केले, त्यामुळे ‘पाहणे’ ही पुन्हा एकदा निर्मितीक्षम प्रक्रिया होईल’ असा आशावाद या विधानात दिसतो.

    अमूर्त चित्रकलेची चित्रत्वचा अलगदपणे, अलवार प्रयत्नाने उकलून अंतरंगांचा चित्रबोध दर्शकाने आपल्या वकुबाप्रमाणे लावून आनंद लुटणे शक्य आहे. मानवी मेंदू नेहमीच नव नवीन शिकत आला आहे.

    -oOo-


    AnandJ

    व्यवसायाने हृदयरोग तज्ज्ञ असलेले डॉ. आनंद जोशी हे मराठीतले नामवंत विज्ञानलेखक, ललितलेखक आहेत. ‘बोलकी हाडे’, ‘मेंदूतला माणूस’, ‘कर्कविज्ञानाची गोष्ट’, ‘अक्षर पाविजे निर्धार’, ‘व्यूहचक्र’, ‘आपले वर्तन, आपला मेंदू’ (सहलेखक सुबोध जावडेकर) ही त्यांची अलीकडच्या काळात प्रकाशित झालेली पुस्तके आहेत.
    ईमेल : drjoshianand628@gmail.com



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा