Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

रविवार, २० जुलै, २०२५

घुसमटीचा हुंकार दुमदुमला!

  • मान-सन्मान

    TheBookAndTheBooker
    बुकर पुरस्कारविजेत्या दोघी जणी: बानू मुश्ताक आणि दीपा भश्ती...


    २५ फेब्रुवारी २०२५ रोजी कानडी लेखिका, कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांचा ‘हार्ट लॅम्प’ हा कथासंग्रह इंटरनॅशनल बुकर पारितोषिकाच्या ‘लाँग लिस्ट’मध्ये सामील झाल्याची अधिकृत घोषणा झाली, तसे ८०च्या घरातल्या या कानडी लेखिकेकडे देशभरातल्या साहित्यजगताचे लक्ष वेधले गेले. आधी १३ पुस्तकांच्या प्राथमिक यादीत, मग सहा पुस्तकांच्या लघुयादीत समावेश झाला, तसे हे कुतूहल वाढत गेले आणि शेवटी २० मे २०२५ रोजी इंटरनॅशनल बुकर पारितोषिकासाठी त्यांच्या ‘हार्ट लॅप’ या कथासंग्रहाची निवड झाल्याची घोषणा झाली.

    कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यातील पारंपरिक मुस्लिम कुटुंबातून (जन्म १९४८) आलेल्या बानू मुश्ताक यांनी कुटुंबाच्या मर्जी विरूद्ध प्रेमविवाह केला. पण नंतरच्या अनपेक्षित त्रासदायक अनुभवातून त्यांची स्त्रीप्रश्नांकडे व चळवळीकडे वाटचाल झाली. कानडीतील डी.आर. नागराज आणि शूद्र श्रीनिवास यांनी १९७४मध्ये सुरू केलेल्या बंडाय आंदोलनाशी त्या जोडलेल्या होत्या. त्या काळात कर्नाटकातील कार्यकर्ते लेखक-संपादक पी. लंकेश यांच्या ‘लंकेश पत्रिके’त त्या वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले. तोवर त्यांनी केलेले काही कथा, कवितालेखन बरेचसे हौशी स्वरूपाचे होते. राजकारणातही एक इंनिंग या काळात खेळून झाली. हसन नगरपरिषदेत त्या दोन वेळा सदस्य म्हणून निवडून आल्या. १९९०मध्ये पत्रकारितेतून बाहेर पडून वकिली सुरू केल्यानंतर काही स्थैर्य आले, तसा त्यांच्या कथात्म लेखनाला बहर आला. आजवर त्यांचे सहा कथासंग्रह, एक कवितासंग्रह, एक कादंबरी आणि एक लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. १९९०-२०२३ या काळात त्यांनी लिहिलेल्या ५० कथांमधील १२ निवडक कथांचा कानडीतून इंग्रजी अनुवाद दीपा भिश्ती यांनी केला, जो सप्टेंबर २४मध्ये इंग्लंडमध्ये प्रकाशित झाला. त्याआधी भिश्तींनी त्यांचा ‘हसीना अँड अदर स्टोरीज’ हा संग्रह देखील इंग्रजीत अनुवादित केला होता, त्याला ‘पेन इंटरनॅशनल ट्रान्सलेशन’ सन्मान मिळाला होता.

    विद्रोहाचा आलेख

    ‘हार्ट लॅम्प’ या संग्रहामध्ये बानूंच्या निवडक १२ कथा समाविष्ट आहेत. प्रामुख्यानं मुस्लिम स्त्रियांचं अडचणी आणि वेदनांनी भरलेलं आयुष्य या कथांच्या केंद्रस्थानी आहे. कौटुंबिक, सामाजिक व्यवस्थेतले अन्याय आणि शोषण यातून ‘हृदयातले दिवे’ विझू लागलेल्या स्त्रिया यात प्रामुख्याने आहेत.

    ‘वोग’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लग्नानंतर आपले आयुष्य कसे बदलले हे सांगितले आहे. त्या म्हणतात, ‘मला नेहमीच याविषयी लिहायचे होते. प्रेमविवाह (असूनही) नंतर अचानक मला बुरखा वापरावा आणि घरीच राहून घर सांभाळावे, असे सांगण्यात आले. २९ व्या वर्षी मी प्रसवोत्तर औदासिन्यात (Postpartum depression) गेले होते.’ याच सुमारास कानडीतील सत्तरीच्या दशकातल्या बंडाय आंदोलनाशी त्यांचा संपर्क झाला. त्यानंतर त्यांनी विद्रोहाचा रस्ता स्वीकारला आणि आपले आयुष्य यातनामुक्त केले. पुढे दशकभराच्या पत्रकारितेनंतर त्यांनी वकिली सुरू केली. ‘हार्ट लॅम्प’मध्ये अशाच विद्रोहाचे आणि स्त्रियांच्या मानसिक कणखरपणाकडच्या प्रवासाचे दर्शन होते.

    ‘लव बर्ड’ कथेतली सुजाता परिवाराच्या विरोधात जाऊन त्यांनी दाखवलेल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करीत प्रेमविवाह करते, पण लग्नानंतर प्रियकराचे खरे रूप समोर येताच दाहक वास्तवाची जाणीव होते, तसे पश्चात्तापात जळत मन आत्महत्येच्या विचारापर्यंत पोचते. ‘वोग’ला दिलेल्या मुलाखतीत त्या पुढे म्हणतात, ‘माझ्या लेखनातून मी सतत धार्मिक व्याख्यांना आव्हान देत आले आहे. समाज बदलला आहे, तरी मूलभूत मुद्दे आजही जसेच्या तसेच आहेत. संदर्भबदललेत तरी स्त्रिया आणि परिघावरचे समूह यांचे मूलभूत संघर्ष अद्याप तसेच चालू आहेत.’

    अभिव्यक्तीची अटळता

    बुकर पुरस्कार समितीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना कथांचे प्रेरणास्त्रोत आणि (एकूणच) लिहिण्याची कारणं विचारली असता त्या म्हणाल्या, ‘माझ्या कथा महिलांच्या कथा आहेत. धर्म, समाज आणि राजकारण या सर्वांनीच महिलांकडे कायम आपलं म्हणणं कुठलाही प्रश्न न विचारता मान्य करण्याची मागणी केली. असं करताना ते महिलांना मानवी क्रौर्याची शिकार बनवत आले. माझे अनुभव आणि रोज माध्यमांत येतात त्या बातम्या यातून मला हे सगळे कथेतून मांडण्याची प्रेरणा मिळाली. या महिलांचे दुःखयातनांनी भरलेले असहाय्य जीवन पाहताना माझ्या मनात एक विचित्र भावना येते, ज्याची प्रतिक्रिया म्हणून लिहिणे माझ्यासाठी अटळ, अपरिहार्य होते. मी फार संशोधन वगैरेंवर विश्वास ठेवत नाही, माझे हृदय हेच माझे संशोधनक्षेत्र (रिसर्च फील्ड) आहे. एखादी घटना ज्या तीव्रतेने मला प्रभावित करते (उद्वेग आणते) तितक्याच गहनात आणि भावनात्मकतेने मी ती कथेत आणते.

    TheBooks
    एरवी, इतरांच्या भावना उचंबळून येतात नि कालांतराने विरतातही. बानू मुश्ताक यांच्या संदभनि उचंबळून आलेल्या भावनांतून वास्तव टिपणाऱ्या कथा आकारास येत जातात...

    सत्तरीचे दशक कर्नाटकात आंदोलनांचे दशक होते. दलित, शेतकरी, महिलांची तसेच भाषा-पर्यावरणाशी संबंधित अशा सर्व आंदोलनांचा हा काळ होता. मंचीय चळवळीही (थिएटर अॅक्टिव्हिटीज) सुरू होत्या. या सगळ्यांनी मला प्रभावित केले. परिघावर असणारे विभिन्न समूह आणि महिलांच्या आयुष्याशी थेट जोडलेली असल्याने मी हे सगळे जाणत होते, समजून घेत होते. या जोडलेल्या असण्यातून माझ्या लेखनाला बळ मिळाले. एकंदर माझे लेखक होणे-असणे, ही कर्नाटकातील तत्कालीन सामाजिक परिस्थितीची उपज आहे, असे म्हणता येईल.

    मौलिक ऐवज

    आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे श्रेय मात्र त्या अनुवादक दीपा भरतींना देतात. २०२५च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या निवडसमिती (ज्यूरी) चे प्रमुख मॅक्स पोर्टर ‘हार्ट लॅम्प’च्या निवडी संदर्भात म्हणाले, ‘इंग्रजी वाचकांसाठी ‘हार्ट लॅम्प’ हा खरंच नवा ऐवज आहे. भाषेला मुळापासून गदगदून हलवून टाकणारा हा मौलिक अनुवाद आहे. इंग्रजीतल्या वैविध्यात त्याने नवी भर पडली आहे. त्याने अनुवादाबाबतच्या आमच्या आकलनाला आव्हान देत त्याचा विस्तारही केला. या सुंदर, व्यग्र, आयुष्याला सघन करणाऱ्या कथा मूळ कानडी भाषेतल्या आहेत. यात भाषा आणि बोलींतली सामाजिक, राजकीय तत्त्वंही सामील आहेत, ज्यांनी याला अधिक समृद्ध केले आहे. या कथा महिलांचं आयुष्य, मुलं जन्माला घालण्याबाबतचे त्यांचे अधिकार, त्यांच्या सर्वांगीण शोषणासंदर्भाने बोलतात. सर्व ज्यूरी सदस्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या कथांची केलेली प्रशंसा ऐकणे आनंददायी होते. हा आनंद जगभरच्या वाचकांशी वाटून घेताना आम्ही रोमांचित झालो आहोत.’

    लेखन प्रेरणेसंदर्भात बानू म्हणतात, ‘लिहिणं माझ्यासाठी श्वास घेण्याइतकं सहज आहे. मी जो काही विचार करते, आपल्या आसपास पाहते, त्यातून मला जे जाणवते त्याला कथेच्या प्रकारात उतरवणे मला सहजशक्य आहे. फक्त लिहिणे सुरू करायची खोटी असते. लिहिणं माझ्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक प्रकारही आहे. आसपास काही गैर, चुकीचे घडत असेल तर (ते कळल्यावरही) गप्प बसणे मला शक्य होत नाही. भावनेला दाबून ठेवणे जमत नाही मला. मी लिहून प्रतिक्रिया देते.’

    रोष परंपरावाद्यांचा

    आपले लेखन आणि त्यातले विचार यातून बरेच जण नाराज झाल्याच्या, त्यांच्या रोषाला बळी पडण्याच्या, त्यातून मुश्किलीनं बाहेर पडण्याच्या अनुभवाबद्दल विचारले असता बानू म्हणतात, ‘साल २००० माझ्यासाठी संकटे-अडचणींनी भरलेले होते. त्याआधीच मी मशिदीतल्या स्त्रियांच्या अधिकारांबद्दल बोलत त्याचे समर्थन केले होते. तेव्हापासून धमक्यांचे फोन येत. बरेच महिने मी घरातच राहिले, बाहेर जाणे येणे थांबले होते. कुटुंबाबाबत मोठीच चिंता वाटत होती. विशेषतः मुलांची फार काळजी वाटत होती. पण तेव्हा पती आणि आई माझ्याबरोबर होते. माझी आई जेमतेम हायस्कूलपर्यंत शिकलेली, काय होतंय तिला माहीत नव्हतं. पण मी त्रासात आहे, हे तिला कळलं होतं. मी तिला सगळं सांगितलं, तेव्हा तिने माझ्या विचारांचे समर्थन केलं. अगदी या सगळ्यांत मला काही झालंच, तर ती माझ्या मुलांची काळजी घेईल, असंही म्हणाली. फार धोकादायक दिवस होते ते. ती दोन वर्षं मी काहीही लिहू शकले नाही.’

    BanuMushtaq
    वळणे, आडवळणे, खाचखळगे कधी आयुष्य संपवून टाकण्याची आत्मनाशी भावना, कधी परंपरेविरोधातली बंडखोरी तर कधी वंचितांसाठी केलेली धडपड यातून आत्मदीप उजळला... बानू मुश्ताक यांना बुकरचा सन्मान देऊन गेला...

    इंटरनॅशनल बुकर पुरस्कारासाठी नामांकित होणे ही लहानसहान गोष्ट नाही. आपले नाव या यादीत पाहिल्यावर काय वाटले, असे विचारल्यावर बानू म्हणाल्या, ‘काही वर्षांपूर्वी दीपा भश्तींनी माझ्या पहिल्या कथासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद केला, ‘हसीना अँड अदर स्टोरीज’ या शीर्षकाने. त्याला मागील वर्षी इंग्लिश पेन ट्रान्सलेशन अॅवार्ड मिळाले. त्यानंतरच्या काळातल्या निवडक ११ कथांचा अनुवाद आता ‘हार्ट लॅम्प’मध्ये आहे. हे पुस्तक आता इंटरनॅशनल बुकर पुरस्कारासाठी नामांकित १३ पुस्तकांच्या सूचीत येणं माझ्यासाठी आनंदाचं आहे फार. त्यातून जी ख्याती आणि ओळख मिळेल त्यासाठी मी खूश आहे. या निमित्ताने कानडी भाषेला प्रातिनिधित्वाची संधी मिळतेय हेही आनंदाचे.’

    जीवनदृष्टी विस्तारणारी भाषिक लय

    आपल्या लेखनप्रक्रियेसंदर्भात त्या सांगतात, ‘मी वकिली व्यवसायात आहे, त्यामुळे लिहिण्यासाठी वेळ मिळत नाही. पूर्वी माझ्याकडे एक साहाय्यक होता, त्याला मी डिक्टेट करत असे. अलीकडे मात्र मी मोबाइल अॅप वापरते. कोर्टातले माझे ड्राफ्टही मी त्याच्याआधारेच तयार करते. माझे उच्चार आणि भाषा त्याला समजतात, त्यामुळे फार कमी सुधारांसह माझी मुद्रणप्रत तयार होते. काळाबरोबर लोकांमध्ये दुरावा वाढत चालला आहे, समाज माध्यमांमध्ये वेगळे चित्र दिसते. अशी काही माणसं आहेत, ज्यांना मी दशकांपासून ओळखते, पण ते समोरासमोर भेटून बोलत नाहीत, तरी समाजमाध्यमांवर माझ्या राजकीय विचारांबाबत त्यांना असलेली उत्सुकता कमी झालेली नाही. सध्या माझ्या सातव्या कथासंग्रहावर काम करतेय. आत्मकथेचेही लेखन अर्ध्यावर आले आहे. पण आता आणखी काही गोष्टी त्यासाठी गोळा कराव्या लागणार आहेत. त्या मी लवकरच करेन.’

    अनुवादक दीपा भश्ती या इंटरनॅशनल बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक आहेत. गीतांजली श्री यांच्या बुकर मिळालेल्या ‘रेत समाधि’ या हिंदी कादंबरीचा अनुवाद डेझी रॉकवेल या ब्रिटिश अनुवादिकेने केला होता. ‘हार्ट लॅम्प’ हे भश्ती यांचे प्रकाशित अनुवादाचे तिसरे पुस्तक आहे. याआधी त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बुजुर्ग लेखक शिवराम कारंथ यांची कादंबरी अनुवादित केली आहे. समीक्षा आणि विविध सांस्कृतिक संदर्भातले त्यांचे लेखन ‘पॅरिस रिव्ह्यू’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ सहित चाळीसच्यावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमधून प्रकाशित झाले आहे. लेखकाची जीवनदृष्टी आणि भाषिक लय अनुवादात नेमकी उतरावी यासाठी त्या मुश्ताक़ यांच्याबरोबर तीन वर्षे काम करीत होत्या. त्या मेहनतीवरच बुकर पुरस्काराची मोहोर उठली आहे.

    -oOo-

    हा लेख jankipul.com या प्रभात रंजन यांच्या वेब पोर्टलवरील दोन टिपणांचा संपादित अनुवाद आणि अन्य माहितीवरून तयार केला आहे.


    नीतिन वैद्य
    नीतिन वैद्य


    ईमेल :



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा