Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

शनिवार, २६ जुलै, २०२५

युद्धसंघर्षाच्या आगीत मांडला लेखनसंसार

  • बुक लाउंज

    HeadImage
    २७ राज्यक्रांती आणि ४५० वेळा तुरुंगवास भोगलेला धाडसी पत्रकार, लेखक रेसार्द कापुचिन्स्की


    या सदरातून लिहिलेला लेख प्रकाशित झाला, की पोटात गोळा उमटलेला असतो. कारण पुढचा लेख देण्याची वेळ येऊन ठेपलेली असते. अशा वेळी अंधाराने कडे घातले घरा भोवती, ऐक जरा ना... अशी परिस्थिती असते. मग अंधारात भर नदीत फिरणाऱ्या नावाड्याच्या वल्ह्यांचा चुबुक चुबुक येणारा आवाजच सोबत करत असतो... असो.

    काही वर्षांपूर्वी निळू दामले यांनी एका लेखात रेसार्द कापुचिन्स्कीची ओळख करून दिलेली आठवते. इराण म्हटले की आम्हाला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जफर पनाही आठवतो. त्यांच्या चित्रपटातून इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या अधिपत्याखाली जगणाऱ्या लोकांचे दहशतीच्या छायेखाली जगणे आणि त्यातून सुटण्याची अधीरता नेमकेपणाने दाखवलेली दिसत राहते. आमच्या पिढीला इराणच्या खोमेनीची इत्यंभूत माहिती असते. म्हणजे असे वाचलेलेही आठवते, की खोमेनी वारला तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला इतकी गर्दी झाली होती की शेवटी हेलिकॉप्टरने त्यांचं पार्थिव उचलून नेऊन गुप्तपणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    धडकी भरवणारी निरीक्षणशक्ती

    हिरोडेट्सने लिहिलेल्या इतिहासाच्या तिसऱ्या खंडातील १४व्या अध्यायात इराणच्या राजाची एक कथा नोंदवली आहे. सैमिनट्स या इजिप्तच्या राजाला इराणच्या कॅम्बिसेस या राजाने युद्धात हरवून कैद केले. जिंकलेला राजा हरलेल्या राजाला कमी लेखून त्याच्यासमोर स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. तर इराणच्या कैम्बिसेस राजाने विजयी मिरवणूक काढण्याचे ठरवले. त्यावेळी त्याने हट्टाने सैमिनट्सला उघड्या मैदानावर साखळदंडांनी जखडून हजर करायला सांगितले. त्याला जाणवेल अशा पद्धतीने त्यांची राजकन्या असलेल्या मुलीला अगदी साध्या कपड्यात पाणी वगैरे आणायला सांगण्यात आले, नंतर त्यांच्या मुलाला वधस्तंभावर फाशी देण्यासाठी मिरवणुकीने नेण्यात आले. इजिप्तचा राजा कठोरपणे हे सगळं सहन करत उभा होता, इतक्यात त्यांच्या खास नोकराला गुलाम म्हणून विकण्यासाठी परवानगी मागितली गेली. तो गुलाम समोरून साखळींनी जेरबंद अवस्थेत जाताना बघून मात्र राजाचा धीर खचला. तो अगदी कोसळला. स्वतःचे आप्त जाताना त्याला जितके वाईट वाटले नाही, तितके या नोकराबद्दल त्यांना का वाईट वाटले, असेल यावर तात्त्विक चर्चाही या खंडात नोंदवली आहे.

    अर्थात, या चर्चेत मला रस नव्हता. मी बघत होतो, की क्रूरपणा हा पिढीजात उपजतो, की त्याला काही इतरही आयाम असतात. इराणच्या ‘शाह ऑफ शाहज्’ या पुस्तकात लेखक जे वर्णन करतो ते वाचताना निव्वळ धडकीच भरते. शहांची क्रूर राजवट तितक्याच क्रूर खोमेनींनी उलथवलेली. लेखक कापुचिन्स्कीने अगदी जवळून बघितलेली आणि अनुभवलेली. तब्बल २७ वी राज्यक्रांती होती. हा लेखक ज्या त-हेनं वर्णन करत तेहरान, इराण डोळ्यासमोर उभा करतो, तसा आपण कल्पनेतही विचार केलेला नसतो. या क्रांती बघताना त्यानं तब्बल ४५० वेळा वेगवेगळ्या देशातला तुरुंगवासही अनुभवला आहे.

    नीतिशास्त्र घडवणारा ऐवज

    हा गृहस्थ सरावानेच उत्तम पत्रकार झाला. यासंदर्भात तो म्हणतो, माझे लेखन हे तीन घटकांचे मिश्रण आहे. पहिले म्हणजे प्रवासः पण तो एखाद्या पर्यटकासारखा नाही, तर शोध म्हणून, एकाग्रतेसाठी, काही तरी उद्देश म्हणून केलेला प्रवास. दुसरे म्हणजे, या विषयावरील साहित्य वाचणेः पुस्तके, लेख, वगैरे आणि तिसरे म्हणजे चिंतन, जे प्रवास आणि वाचनातूनच येतं. कापुचिन्स्कीची पुस्तके या तीन घटकांच्या संयोगातून तयार झाली आहेत. अमेरिकन शैलीत याला नवीन काळाची पत्रकारिता (न्यू एज जर्नालिझम) म्हटले जाते. म्हणजे वास्तुस्थिती मांडायची पण ललित अंगानं, कल्पनेची भरारी घेत वास्तवाच्या अंगाला भिडायचं. तेही केवळ तीन-चार पानांच्या जागेत. एखादं वास्तव पाहिलेलं आणि त्यावर वाचलेलं यांचं मिश्रण एखाद्या चित्रासारखं स्वच्छ दिसतं. ते चित्र एकाचवेळी अनेक गोष्टी सांगतं. ती एकोणिसाव्या शतकातील रशियन परंपरा होती. पोलंडमध्ये भूमिगत साहित्य नव्हतं. भूमिगत साहित्याची सुरुवात ७० च्या दशकात झाली. त्यांचं ‘द एम्परर’ हे पुस्तक पोलंड आणि सोव्हिएत युनियनमध्ये अक्षरशः एक नीतिशास्त्राचे पुस्तक म्हणून वाचलं जातं. अर्थात ते इथिओपिया किंवा तिथला राजा हेले सेलासीबद्दल आहेच, पण त्याहून अधिक ते कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीबद्दलही आहे. हेले सेलासी या इथिओपियन सम्राटाच्या एका दालनाचं वर्णन लेखक ‘अँटि सेप्टिक क्लिन’ खोली असं करतो. हेले सेलासी यांच्याजवळ काम करणाऱ्या नोकरांना कापुचिन्स्की भेटतो. तो नोकर लेखकाला सांगतो, की राजाकडे एक छोटासा जपानी वाणाचा कुत्रा होता. त्याचं नाव लुलु. सम्राटाच्या आलिशान पलंगावर झोपायची त्याला परवानगी होती. अनेक समारंभ होत. लुलु सम्राटाच्या मांडीवरून उठे आणि पळत जाई. एखाद्या प्रतिष्ठिताच्या बुटावर शू करी. आपले पाय ओले झालेत, असं ध्यानात आलं तरी त्या माणसाला तसूभरही हलता येत नसे. मी कापड घेऊन त्या प्रतिष्ठिताचे बूट कोरडे करत असे. दहा वर्ष मी हे काम केलं.

    राजवाड्यातल्या नोकरांच्या मुलाखतींबरोबरच एवेलिन वॉ याच्या ‘दे वेअर स्टिल डान्सिंग’ या पुस्तकातले उतारे कापुचिन्स्की उद्धृत करतो. कापुचिन्स्की आदिस अबाबात पोचला ते १९६२ साल होतं. एवेलिन वॉ आदिस अबाबामध्ये १९३० साली गेला होता. सम्राट हेले सेलासी यांनी दिलेल्या पार्टीचं वर्णन वॉ करतो. एकीकडे झगमगाट आणि पक्वान्नाचे पर्वत. पलीकडे राजवाड्याच्या पिछाडीला काळोख. तिथं ऊष्टं खरकटं खाणाऱ्यांची झुंबड. निःशब्द. फक्त हाडं चघळण्याचे आवाज. ३२ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग, ६२ सालच्या घटना समजून घ्यायला मदत करतो. सर्व पुस्तकभर मुलाखती आहेत. प्रथमपुरुषी एकवचनी. हेले सेलासींची राज्य करण्याची रीत त्यात दिसते. प्रत्येक माणसाकडे ते संशयानं पाहतात. राज्यातली प्रत्येक नेमणूक ते करतात. खेडेगावातल्या पोस्टमास्तरचीही. राज्याचं उत्पन्न सम्राटाच्या खाजगीत रवाना होतं. तिथून ते स्विस बँकेत खाजगी खात्यात जमा होतं. राजाशी मतभेद दाखवणारा, गद्दारी करणारा मरणार. राज्यात कायम दुष्काळ. माणसं सतत दारिद्र्यात. सम्राटांना त्याची काळजी नाही. पत्रकारांना हाताशी धरून राजांनी स्वतःची चांगली प्रतिमा जगात तयार केलीय.

    कम्युनिस्टांच्या काळात ज्ञानाच्या मर्यादित स्त्रोतांचा पुस्तक वगैरे वाचनावर प्रचंड राजकीय परिणाम दिसून येत होता. लोकांकडे फक्त एखादेच पुस्तक असायचे आणि मनोरंजनासाठी दुसरे कुठलेही साधन नसायचे - टेलिव्हिजन किंवा इतर मनोरंजन असे काही नव्हतेच म्हणून लोक आहे तेच पुस्तक अनेक वेळा खूप काळजीपूर्वक वाचत असत. वाचक संख्या अफाट तर होतीच, पण खूप बारकाईने लक्ष देऊन वाचणारीही होती. त्या काळात बाहेरच्या जगाचे कुतूहल शमविण्यासाठी लोकांकडेही वाचन हा एकमेव ज्ञानाचा स्रोत होता. आपल्याला हे मान्य करावे लागेल, की रशियन साहित्याला एक उज्ज्वल परंपरा होती आणि रशियन लोक उत्तम वाचकही होते. वाक्यांच्या मधल्या जागा वाचण्यासाठी लागणारी समज आणि सवय त्यांनी यातूनच कमावली होती. मजकुरामागील मजकूर वाचण्याची, मुळात वाचनाचीच कला आताशा हरवत चालली आहे, असंही कापुचिन्स्की एका मुलाखतीत म्हणतो, ते आजच्या काळालाही लागू होते. तरीही लेखक हे सुद्धा सुचवतो, की वास्तवाला कल्पनेची जोड दिल्याने माझं लेखन लोकांना वाचावंसं वाटतं.

    युद्ध भूमीवर पत्रकार म्हणून वावरताना साधारणपणे सगळेच एकमेकांना सहकार्य करतात. कारण वास्तवाचा विचार केला, तर आहे त्याहीपेक्षा परिस्थिती खरोखरच भयानक असते. कापुचिन्स्की म्हणतो, हे असे सहकार्य करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नसतो. आम्ही नेहमीच एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, एका युद्धापासून दुसऱ्या युद्धापर्यंत गटा-गटांमध्ये फिरत असू... म्हणजे जर एखाद्या देशात डाव्या विचारसरणीचा जत्था आला, तर मी माझ्या पाश्चात्य सहकाऱ्यांना माझ्यासोबत घेऊन जायचो आणि जर उजव्या विचारसरणीचा कोणी असेल, तर ते मला घेऊन जायचे. त्याही काळात आम्ही ‘द न्यूयॉर्क टाइम्स’शी कधीच स्पर्धा केली नाही, कारण पोलिश प्रेस एजन्सी ही एक अतिशय छोटी एजन्सी होती, आणि महत्त्वाची तर बिलकूल नव्हती. युद्ध काळात परिस्थिती खूपच कठीण असल्याने म्हणजे बातम्या पाठवण्यासाठी वगैरे, कारण ई-मेल वगैरे त्या काळात काहीही नव्हते. टेलेक्स हे एकमेव साधन होते, परंतु आफ्रिकेत टेलेक्स खूप दुर्मीळ होते. म्हणून जर कोणी युरोपला उड्डाण करत असेल, तर आम्ही त्याला आमचा पत्रव्यवहार त्याच्याकडे सुपुर्द करायचो, तो तिथून आमच्या एजन्सीपर्यंत पोचवायचा. कापुचिन्स्की सांगतो की १९७५मध्ये अंगोलाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात, तीन महिने तो तिथे एकमेव वार्ताहर होता. अंगोलात त्यांच्या हॉटेलच्या खोलीत असताना एकदा कोणीतरी दरवाजा ठोठावला उघडून बघितले, तर समोर एकजण उभा होता, म्हणाला, मी न्यूयॉर्क टाइम्सचा प्रतिनिधी. अंगोलाचा अधिकृत स्वातंत्र्य उत्सव चार किंवा पाचच दिवस चालणार होता. यादरम्यान जगभरातील पत्रकारांच्या फक्त एकाच गटाला त्यावेळी विमानाने आत येण्याची परवानगी देण्यात आली होती. अंगोलामध्ये त्यावेळी कडकडीत बंद होता. तो पुढे म्हणाला, मला अंगोलाच्या सद्य परिस्थितीवरचा लेख ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला पाठवायचा आहे आणि त्याची अशीही इच्छा होती की कापुचिन्स्कीने तो लेख वाचून वाटले तर संपादितही करून पुढे पाठवावा आणि त्याबदल्यात त्याने व्हिस्कीची बाटली पुढे केली... कापुचिन्स्की म्हणतो, त्या काळात व्हिस्कीसारखी गोष्ट अंगोलात तरी अद्भुतच होती, कारण तिथे काहीही नव्हते, सिगारेट नाही, अन्न नाही, काहीही नाही...

    Books
    संघर्षाच्या आगीत धाडसाने स्वतःला झोकून देत कोणालाही न दिसलेले, बहुदा कधीही न दिसणारे जग बारीक नजरेने टिपायचे आणि फारसा गाजावाजा न करता आपल्या पुस्तकांतून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणाऱ्या माणूस नावाच्या प्राण्याला जागे करायचे... हे कापुचिन्स्कीइतके प्रभावी फार कमी पत्रकार, लेखकांना जमले...

    इराणी पाहुणचार

    कापुचिन्स्की नेहमी म्हणायचा, की त्या काळातील आम्हा लेखकांना खरोखरच कुठली ना कुठली तरी पार्श्वभूमी होती, विषयाचे ज्ञान होते. ती पत्रकारितेची एक अतिशय उच्च पात्रता होती - आम्ही सर्वजण उत्तम तज्ज्ञ होतो. एक काळ असा होता की संपूर्ण जगच समाजवादाने भारावून गेलेले होते. अशा प्रभावातच या लेखकाचीही जडणघडण झाली आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात इंग्रजांनी तुर्की बंडखोरांना मदत दिल्याने तुर्कस्थानचा पराभव झाला आणि त्यांच्या खलिफाची उचलबांगडी करण्याच्या शक्यतेने अनेक भयग्रस्त स्थानिक मुस्लिम नागरिकांनी स्थलांतर केले, पण खलिफाला खरं तर केमाल पाशानेच हटवले आणि नंतर सर्वांची सरसकट कत्तल करून टाकली. इथेही इंग्रजांनीच शाहच्या हातात सत्ता सोपवली, तेव्हा केरमान शहरातील नागरिकांच्या नातेवाईकांनी अगोदरच्या शाहला आसरा दिला होता, या अपराधाची शिक्षा म्हणून तमाम नागरिकांची कत्तल करण्यात आली. लहान मुलांचे डोळे काढण्यात आले. नंतरचे जे काही जिवंत राहिले, ते गळे कापून मारणारे थकले म्हणून. रस्तोरस्ती आंधळी मुले देशोधडीला लागली, तेव्हा इतरांना या अत्याचारांचा पत्ता लागला आणि त्यांच्या कारणांचाही. यामुळे शाहची दहशत कैक वर्षे टिकून राहली. शाहच्या राजवटीतलं क्रौर्य सांगत असतानाच कापुचिन्स्कीने घेतलेली टिपणं बोलू लागतात. इस्लामचा इतिहास कापुचिन्स्की सांगतो. शिया कसे असतात ते सांगतो. ‘पहिली गोष्ट म्हणजे शिया हा अतिशय वाईट संधिसाधू असतो’ अशा वाक्यानं टिपणांची सुरुवात होते. इराणचा आणि शियांचा इतिहास तो मांडतो. या शाहच्या काळात सावक नावाची एक धडकी भरवणारी सरकारी व्यवस्था निर्माण केली गेली. ती मंडळी कुठेही दबा धरून असायची आणि सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून कुणालाही उचललं जायचं. भर रस्त्यावर, उघडपणे कुठले शब्द बोलायचे नाही, याची भली मोठी यादीच लेखकाने दिली आहे. यातला कुठलाही शब्द सरकारविरोधी समजून त्याला उचललं जायचं, ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ हा सरसकट अनुभव लोकांना येत होता. हे असे मुद्दे लिहिताना लेखक आपल्या संग्रहातील फोटोंवर नजर मारतो, त्यातले मरणप्राय चेहरे बघतो, तेव्हा ते त्यांच्या लेखनातून आपल्याही डोळ्यासमोर उभे करतो. सावाकचे हस्तक माणसांना गपचुप नाहीसे करतात. खटला नाही. चौकशी नाही. भुकेली मांजरं पोत्यात भरतात. त्यात माणसाला ढकलतात. सापांच्या पिशवीत माणसाला सोडतात. तळघरात कुजबुजत ही माहिती लेखकाला सांगितली जाते.

    पुस्तकभर निव्वळ मुलाखती, पण त्या कुणाच्या तर अगदी वरपासून खालच्या सामान्य माणसांपर्यंत. लेखक जेव्हा या धामधुमीत तेहरानच्या हॉटेलात उतरतो तेव्हा, त्याला सहज खोली मिळून जाते, पण त्याच हॉटेलात एकेकाळी एखादी रूम मिळणंही म्हणजे चक्क लॉटरीच लागणं कसं होतं त्या काळातही सहज फिरवून आणतो. कूम हे खोमेनीचं शहर. इथून खोमेनी मार्गदर्शन करायचे. या शहराबद्दल आणि खोमेनीच्या राहत्या घराबद्दल लेखक लिहितो कूममध्ये पाचशेवर मशिदी आहेत. इथूनच खोमेनी राज्य चालवतात. खोमेनींचं घर लहान. जुनाट. मोडकळीस आलेलं. घरापर्यंत जाणारा रस्ता कच्चा. धूळ, मधोमध वाहणारं गटार... खोमेनींची खोली रिकामी. भिंती रिकाम्या. फर्निचर नाही. जमिनीवर वळकटी. पुस्तकांची चळत. ते भात, दही आणि फळांवर राहतात. भिंतीला टेकून बसतात. हे वाचून खोमेनी डोळ्यासमोर उभा राहतो. या लोकांसाठी मशीद म्हणजे निव्वळ परमेश्वराचे ध्यान करायची जागा नसते. मशीद म्हणजे सर्वस्व असते. तिथे जाऊन त्यांना आपल्या आप्तांना, नातेवाईकांना भेटायचे असते, चहा प्यायचा असतो, सुखदुःखाच्या गप्पा करायच्या असतात, खरेदी करायची असते... मशीद आणि परिसर यामध्येच शिया माणसाला जगातल्या सगळ्या गोष्टी मिळतात, म्हणूनच या मशिदींच्या भोवतालीच सगळे बाजार फुललेले दिसतात, याचं अचूक वर्णन लेखकानं केलेलं आहे. इमारतींचे आकार, त्या बाहेरून कशा दिसतात हा त्यांचा एक पैलू झाला. कापुचिन्स्की अर्किटेक्चर, समाज, माणसं, इतिहास, राजकारण अशा नाना गोष्टी मोठ्या खुबीने एकत्र गुंफतो. इराणी समाज, मुस्लिम मानस त्यातून समजतं. हाच इराणचा शाह नंतर एकांतवासात मरून गेला, तेव्हा त्यांच्या जवळ कुणीही नव्हते, याचं लेखकानं केलेलं करूण चित्रण मुळातूनच वाचायला हवे.

    वाचकांना समृद्धी देणारे लेखन

    पोलिश वंशाचा पत्रकार असलेल्या रेसार्द कापुचिन्स्कीने १९५८ ते १९८०पर्यंत विविध पोलिश नियतकालिकांमध्ये आणि प्रेस एजन्सींमध्ये आफ्रिकन वार्ताहर म्हणून काम केलं. पोलंडच्या कैक पिढ्या कापुचिन्स्की वाचतच मोठी झाली. त्यांच्या इम्पेरियम (ग्रँटा बुक्स, १९९४) या पुस्तकात, तो रशियन राज्य आणि दैनंदिन रशियन आयुष्यावर हुकूमशाहीचे परिणाम यावर ज्या पोटतिडकीने लिहितो, ते वाचून आपणच हादरून जातो. तो रशियात उतरतो आणि भोवताली जिथे तिथे फक्त तारेचीच कुंपणं बघतो आणि आपल्या मिश्किल शैलीत लिहितो, की रशियात सर्वात जास्त उत्पादन बहुतेक तारेच्या कुंपणाचेच केले जात असावे. त्यामुळे औद्योगिक उत्पादनात तो मागेच राहिला आणि त्या अनुषंगाने आलेल्या अनेक दुष्परिणामांना कैक वर्षे भोगतही राहिला.

    या लेखकाची तुलना काही समीक्षकांनी विन्स्टन चर्चिल बरोबर केलेलीही काही ठिकाणी वाचायला मिळाली. चर्चिलही वास्तव आणि कल्पना यांचा अद्भूत मेळ घालून चटपटीत लिखाण करायचे. त्यांना नोबेल मिळालं, पण कापुचिन्स्कीला नोबेल नाही मिळालं, कारण त्याच्यावर हाही आक्षेप होता की त्याने कल्पनांचा वास्तव लेखनात अतिरेकच केला आहे. असं म्हटलं जातं, की कापुचिन्स्कीने दोन वह्या ठेवल्या होत्या, एक वही ज्या संस्थेने त्याला परदेशात पाठवले होते त्या पोलिश वृत्तसंस्थेकडे पाठवायच्या अहवालांसाठी होती, आणि दुसरी वही त्याने नंतर जुलूम, सत्ता आणि क्रांतीवरील त्याच्या पुस्तकांमध्ये वापरलेल्या संदर्भासाठी होती. यांच्यातील फरकांमुळे त्याने तथ्ये खोटी ठरवल्याचाही त्याच्यावर आरोप झाला आहे. कापुचिन्स्कीने त्याच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं. प्रेमसंबंध ठेवले. पोलंडच्या सरकारसाठी हेरगिरीही केली आणि १९८१पर्यंत त्याचे पक्ष सदस्यत्वही कायम ठेवले. परंतु कापुचिन्स्कीचा चरित्रकार डोमोस्लाव्स्की त्याच्याबद्दल नेहमीच सौम्य दृष्टिकोन बाळगतो. हे असे अकाल्पनिक लेखन आहे जे काल्पनिक कथांना तुच्छ मानत नाही, असे म्हणून तो कापुचिन्स्कीच्या लेखनाचे कौतुकही करतो आणि लेखक म्हणून त्याचा दृष्टिकोन तो अगदी सहजपणे स्वीकारतो. कापुचिन्स्की एकदा म्हणाले होते की, मला नुसते निरीक्षणापुरते थांबायचे नाही, तर परिस्थितीत सहभागी व्हायचे आहे.

    व्यक्तिशः मला यांची पुस्तके वाचताना जगाचे एक वेगळेच भान येत गेले. कापुचिन्स्की आपल्याला भोवतालच्या जगाकडे बघण्याची एक अद्भुत नजर देतो, म्हणजे नकळत आपलीही समज वाढवतो!

    -oOo-


    GaneshK
    गणेश मनोहर कुलकर्णी

    गणेश मनोहर कुलकर्णी प्रसिद्ध ललितलेखक, कला आस्वादक आहेत. त्यांच्या ‘रूळानुबंध’ या लेख संग्रहाला अलीकडेच राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
    ईमेल:



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा