Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

रविवार, ६ जुलै, २०२५

मोहीम सीताहरण


  • पुनर्शोध रामायणाचा

    Suvarnamrug


    लंकेचा रावण हा ब्रह्मदेवाचा पणतू. ब्रह्मदेव, पुलस्त्य, विश्रव असा हा रावणाचा ब्राह्मण पितृवंश. पुराण कथांचा आधार घेतला तर पुलस्त्य ऋशींनी किमान चार जणींशी विवाह केला होता, असे दिसते. गंमत अशी की त्यांनी केवळ ब्राह्मण मानव ऋषींनाच जन्म दिलेला नाही. ते गंधर्व, वानर, किन्नर यांचेही जैविक पिता होते. त्यांच्या हविर्भू किंवा मानिनी या पत्नीला विश्रवा नावाचा ब्राह्मणपुत्र झाला. या विश्रवाला कैकसी नावाच्या राक्षसी पासून जन्मला तोच दशमुखी लंकापती रावण (देवांचा खजिनदार कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ) सुमाली राक्षसाने विद्वान ब्राह्मणाचे बुद्धी तेज आणि राक्षसाचे शरीरबल यांचा संयोग व्हावा अशी युक्ती केली. तेच हे रावण नावाचे अद्भूत हायब्रीड (संकर).

    कुंडली रावणाची

    या महान प्रयोगासाठी सुमाली राक्षसाने आपल्या पोटच्या कैकसी कन्येचा कच्चामाल म्हणून उपयोग करून घेतला. तिने आपल्या मायावी विद्येच्या जोरावर ऋषी विश्रवाला समागमासाठी वश केले. तिच्या रुपावर ऋषी भाळला. रावणाच्या आजोबाने (पुलत्स्य) चार जणींशी, पित्या विश्रवाने दोघींशी संसार केला, तर रावणाने पट्टराणी मंदोदरीला सवती आणल्या तर काय बिघडले? रावणाने धन्यमालिनीशी दुसरा विवाह उरकून घेतला. थोडे अधिक शोधले तर आढळले रावणाने तिसरी पत्नीही केली होती. तिचे नाव किंवा कुळ कुणाला सापडत नाही. त्रिशिरा (तीन माना, तीन डोकी) राक्षस तो हाच असावा, असा एक कयास आहे. दुसरा तपशील असा, की रावणाने या तिसरीला काही कारणाने म्हणे मारुनही टाकले. दहशत पसरावी म्हणूनही असेल. तिचे नाव उच्चारायलाही कुणी धजत नसावे. मुद्दा असा की रावणाचे आजोबा, वडील यांसह स्वतःचे ‘गणगोत’ फार मोठे. आजच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बोलायचे, तर रावणाचे सगे सोयरे संख्येने प्रचंड. सख्ख्या आजोबांचे भाऊ किमान पंधरा. तितक्याच आज्या, दोन आया. काका, मामा, मावशा, आत्या त्या सर्वांची मुले अशी भरपूर भावंडे. असा हा सग्यासोयऱ्यांचा अगडबंब पसारा. अशा सगळ्यांना रावण आपल्या मंत्रिमंडळात कसे सामावून घेणार? सल्लागार म्हणून कुणा कुणाची कुठेकुठे वर्णी लावणार?

    मुळात लंका काही क्षेत्रफळाने फार मोठी नव्हती. रावणाची लंका हे एक बेट. म्हणूनच साम्राज्य विस्तार सुरू झाला. भारतातील दंडकारण्यात जनस्थान ही लष्करी वसाहत त्याने निर्माण केली. १४००० (चौदा हजार) सशस्त्र सैनिकांचा जनस्थानचा लष्करी तळ! (भारतापासून सुमारे १८०० कि.मि. दूर हिंदी महासागरात दिॲगो गार्सिया या ब्रिटिश मालकीचा बेट समूह आहे. तिथे अमेरिकेचा लष्करी तळ आज अस्तित्वात आहे. पाकिस्तानात अमेरिकेने नक्की कुठे आणि काय काय लपवलेले आहे?) रावणाच्या लष्करी जनस्थानासारखी ही आजची जगभर पसरलेली आवृत्ती आहे. सध्याचे त्यांचे मालक आहेत, अमेरिकेचे अध्यक्ष विक्षिप्तवीर डोनाल्ड ट्रंप!

    योजना सीताहरणाची

    एकट्या दशरथ पुत्र रामाने दंडकारण्यातील जनस्थान नावाचा रावणाचा लष्करी तळ उद्ध्वस्त केला. त्यातील त्रिशिरा, दूषण आणि खर या लष्करी प्रमुखांसह १४००० राक्षस सैन्याचा नाश केला. अकंपन नावाचा रावणाचा मामा (लष्करावर लक्ष ठेवणारा हेर असावा) जीव मुठीत धरुन थेट लंकेत पळाला. रावणाला म्हणाला, “खर, दूषण आणि त्रिशिर राक्षसांसह संपूर्ण सैन्य नष्ट झाले आहे.” “कोणत्या देवाने वा गंधर्वाने हे दुःसाहस केले आहे? यम किंवा कुबेर आला होता काय? मी अग्नीला जाळीन, मृत्यूला ठार करीन, माझ्या डोळे वटारण्याने वायू थबकतो, माझ्या तेजाने मी सूर्याचे भस्म करीन.” रावणाच्या या गर्जनेने अकंपनाची बोबडी वळली, संपूर्ण शरीर थरथरु लागलं. त्याने रावणासमोर हात जोडले, कसाबसा म्हणाला, “अभय, अभय द्या मला.” “अरे तू घाबरु नकोस, मला फक्त एवढेच सांग की मृत्यूच्या मुखात जायला इतका आतूर कोण झाला आहे? कुणा कुणाला त्यांचा जीव नकोसा झाला आहे?” “हे दशानना, महाराजा! तो दशरथ पुत्र राम आहे. दूषणाच्या मृत्यूनंतर त्याने त्रिशिराचा नाश केला. अखेरीस त्याने खराचे शीर धुळीला मिळवले. मी प्रत्यक्ष पाहिले. तो निःसंशय सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे. दिव्य अस्त्रांचा ज्ञानी, युद्ध कलेत निपुण आहे. त्याची कीर्ती मोठी आणि तेज तर अवर्णनीय आहे. आज तो पंचवटीत राहत आहे. तो फार मोठा बलवान आहे. त्याची कीर्ती फार मोठी आहे. तो सिंहालाही फाडून मारील. त्याच्यासोबत त्याचा बंधू आहे. अग्नीला वायूची साथ असावी, असे मला ते दोघे बंधू वाटले. त्या दोघांबरोबर एकही देव नव्हता. ना कुणी महात्मा ऋषी होता. एकट्या रामाने जमिनीवर उभा राहून जनस्थानातून रथ आणि हत्तींसह चालून आलेल्या सर्व राक्षसांचा नाश केला. दंडकारण्यात आता आपले जनस्थान हा तळ उरला नाही.”

    “अकंपन मामा! मी लगेच आपल्या जनस्थानात जाऊन राम लक्ष्मण दोघांनाही ठार करतो.” “हे राजा! मी रामाच्या बलाचे वर्णन करतो ते ऐक” संतप्त रामासमोर कुणा वीराचा निभाव लागणार नाही. तो बाणाच्या वेगाने नदीला उलट्या दिशेने वाहायला लावील. नक्षत्र ग्रहताऱ्यांसह आकाशाला पृथ्वीवर आणील. मनात आणील तर तो उंच डोंगर समुद्रात बुडवील. सृष्टीचा नाश करुन पुनर्निर्मिती करील. पापी मनुष्य जितक्या खात्रीने स्वर्गात जाणार नाही तसेच तुमच्यासह कुणी राक्षस रामावर विजय प्राप्त करू शकणार नाही. देव आणि असुर जरी एकत्र येऊन त्याच्याशी लढले तरी रामच विजयी होईल.” “राजा! असे असले तरी माझ्याजवळ त्याच्या वधाचा निश्चित उपाय मी सांगतो, तो ऐक.” रावणाचे सर्वच्या सर्व वीसही कान एकदम टवकारले गेले. “बोल अनुकंप मामा बोल, मी ऐकायला उत्सुक आहे. त्वरा कर.”

    “रामाच्या पत्नीचे नाव सीता. ती भर यौवनात आहे. तिच्या सौंदर्याशी स्पर्धा करील अशी कुणी देव, नाग, गंधर्व कन्या त्रिलोकात नाही, स्वर्गातील एकही अप्सरा तिच्याइतकी रुपसंपन्न नाही. पृथ्वीवरच्या मानवी नारीचा तर विचारच करायला नको. हे राजा! एखादी नामी युक्ती योजून, तिला फसवून पळवून आणता येईल. हा विरह रामाला सहनच होणार नाही. तो स्वतःच प्राणत्याग करील. इतका सोपा उपाय असताना युद्धाची गरजच काय?” झाले. रावणाने रथ सज्ज करायची आज्ञा दिली. गाढवे जोडलेला रथ आकाशमार्गे निघाला... रावणाचे ऑपरेशन-सीता हरण सुरू झाले. ताटिका पुत्र मारिचाला भेटण्यासाठी दशानन, गर्दभ रथातून उतरला.

    क्षेमकुशल विचारपूस झाल्यावर रावणाने ब्रेकिंग न्यूज दिली. “अजिंक्य जनस्थानातील सर्व राक्षसांना रामाने मारले आहे. याचा बदला घेण्यासाठी मी त्याच्या पत्नीला म्हणजे, सीतेला पळवून आणणार आहे.”

    “तुला हा बदसल्ला कुणी दिला? तुझी फजिती करण्याचा हा डाव कुणाचा? राम हा मदोन्मत्त हत्तीसारखा आहे. तो कुणी क्षुल्लक मानव नव्हे. त्याच्यासमोर युद्धाला उभा राहू नकोस. वडवानलाच्या मुखात डोळे मिटून तू शिरू नकोस. लंकेश्वरा तू परत जा. तू तुझ्या पत्न्यांसह सुखाने राहा. रामाला त्याच्या साच्या पत्नीसह राहू दे.” मारिच म्हणाला. त्यानंतर आश्चर्यकारक गोष्ट अशी घडली की रावण चक्क लंकेत परत गेला.

    भयभीत शूर्पणखेचा त्रागा

    तोपर्यंत शूर्पणखा परतली होती. नाक कान कापल्याने विद्रूप झालेली. रामाच्या अचाट पराक्रमाची धास्ती घेतलेली रावण भगिनी राजप्रासादात शिरली. रावणाच्या सोन्याच्या सिंहासनाभोवती मंत्रिगण होते. रावणाच्या तेजस्वी चेहऱ्यावर वज्रघाताच्या खुणा होत्या, विष्णुचक्राचे व्रणही होते. ऐरावताने ओरबाडलेले चरे दिसत होते. देवांनाही अजिंक्य असल्याने, अवाढव्य शरीराचा रावण आपल्या गुर्मीतच सुवर्णालंकार मिरवीत होता. देवांना चिरडून धर्म नाश करणाऱ्या रावणाला परस्त्रिया भ्रष्ट करण्यात भलताच पुरुषार्थ वाटत असे. ऋषींना त्रास दिला की त्याला आनंद होत असे. यज्ञातला सोमरस स्वतः पिण्यात त्याला खूप आनंद वाटत असे. कुबेराचे विमान हस्तगत करुन, कैलास जिंकून आल्याने तो अत्यंत निर्भय झाला होता. दहा हजार वर्षांचे तप केल्याचा तो उल्लेख करायचा. मानव सोडून अन्यांपासून त्याला अभय प्राप्त होते. वेदमंत्र म्हणणाऱ्यांची हत्या केली की तो खूष होत असे. विनाकारण कुणाचीही हत्या केली की त्याला अत्यानंद होई. सर्व जग ज्याला घाबरते अशा क्रूर बंधू रावणासमोर शूर्पणखा हजर झाली. ती फार दुःखी, मनातून भयभीत होती, तरीही निर्भयपणे बोलू लागली.

    “हे राक्षसराज! तू भोगासक्त आणि स्वैराचारी झाल्याने निष्काळजीपणे वागत आहेस. येणाऱ्या संकटाची तुला काळजी नाही. तुझे राज्य नष्ट होऊ शकते. शत्रूने तुझ्या राज्याचा लचका तोडला आहे. तुझे गुप्तहेर खाते झोपलेले आहे. हे बालबुद्धीचे लक्षण आहे. तुझ्या वयाचा विचार करता याला निर्बुद्ध म्हणायला हवे. तुझे हे खुषमस्करे मंत्रीही मूर्खच असावेत. जनस्थानातील राक्षसवस्ती उद्ध्वस्त झाली, याचा तुला पत्ता आहे का? खर, दूषणासह चौदा हजार राक्षस एकट्या रामाने मारुन टाकले. दंडकारण्यातले ऋषी निर्भय झाले आहेत. याचा थांगपत्ता तुला नाही. दुष्टबुद्धी आणि विषयासक्त ही तुझी मुख्य ओळख उरली आहे.” मंत्रीगणांदेखत ही शूर्पणखा निर्भय होऊन बोलत होती. शब्द कठोर होते.

    “शूर्पणखे, हा राम कोण आहे? इतके कोणते प्रभावी अस्त्र त्याच्याजवळ आहे? कोणत्या अस्त्राने खर आणि दूषणाला त्याने मारले? त्रिशिराला कसे मारले? शूर्पणखे तुझे सुंदर नाक आणि कान कोणी कापले? तुला असे कुरुप कुणी केलं?”

    RavanInPanchavati
    अहंकार आणि सूडभावनेने पछाडलेल्या रावणाने तपस्वी मारिचाने ऐकवलेले शहाणपणाचे बोल धुडकावून लावले. मारिचालाच जीवाची भीती घातली. परिणाम असा झाला, रावणासह मारिच सीतेचे हरण करण्यास पंचवटीत दाखल झाला...

    “तो राम दशरथाचा पुत्र आहे. तो दीर्घ बाहूचा, मदनासारखा सुंदर, चीर (वल्कले) वस्त्र नेसलेला. इंद्राचे धनुष्य हाती असावे, धनुष्यातून निघालेले बाण दिसण्याआधीच राक्षस मरून पडताना मी पाहिले. तुझे सगळे वीर सेनाप्रमुखही बाणांनीच मारले गेले. मला एकटीलाच जिवंत सोडले. स्त्रीवध निषिद्ध आहे म्हणूनच मी जिवंत आहे. त्याचा भाऊ लक्ष्मण त्याचा उजवा हात आहे. रामावर त्याची भक्ती आहे. लक्ष्मण कठोर अंतःकरणाचा संतापी पुरुष आहे. त्यानेच माझे नाक, कान कापले. मला मारले नाही ही मेहरबानीच. रामाची धर्मपत्नी त्यांच्यासोबत वनात राहते. ती पतीसेवेत मम्म असते. तिचे सर्व अवयव रेखीव सुबक आहेत. नेत्र सुंदर आहेत. चंद्रासारखे मुखकमल आहे. त्या राजकन्येमुळेच दंडकारण्याला शोभा आली आहे. तिची कांती तप्तसुवर्णासारखी. ती विदेहजनकाची मुलगी सीता आहे. या जगातच काय, स्वर्गातही कुणी देवकन्या, किन्नरी वा गंधर्वी इतकी सुंदर नाही. अशा स्त्रीला जो पती प्रेमाने आलिंगन देतो, तो त्रैलोक्यातला भाग्यवान पुरुष मी पाहिला आहे. तो इंद्रापेक्षाही भाग्यवान आहे. ती खरोखरच अंगप्रत्यंगाने विलक्षण आकर्षक प्रशंसनीय आहे.”

    “मी तर म्हणेन, की ही पृथ्वीवरील सर्वांत सुंदर स्त्री आहे. तुझ्यासारखा बलवान पतीच तिला योग्य आहे. हे रत्न तुला पत्नीरुपाने प्राप्त व्हावे, याच हेतूने तिला उचलून आणण्यासाठी मी सीतेजवळ गेले आणि माझे नाक कान छेदून घेतले. केवळ तुझ्यासाठी मी हे धाडस केले. कुणाही पराक्रमी पुरुषात कामदेवाचा संचार होईल, असे त्या राम पत्नीचे रुप आहे. जर ती तुला प्राप्त होऊन तिचे पाणिग्रहण करावे, अशी तुझी तळमळ होत असेल तर माझा सल्ला ऐक. तू महाबलीच आहेस. राम-लक्ष्मण तुझ्यापुढे दुर्बल आहेत. ही सीता तुझी पत्नी होईल, अशी विजयाकांक्षा बाळग. तिला पळवून आण. जनस्थानातला रामाने केलेला संहार, तुझ्या महावीर दूषण, त्रिशिरा, खर यांना ठार करुन केलेल्या अपमानाचा, अपराधाचा बदला घे. प्रतिशोध घे. सीतेला पळवून आण.”

    शूर्पणखेने रावणास चेतवले

    रावणाने शूर्पणखेचे जळजळीत आर्जव ऐकल्यावर त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने मंत्र्यांचा सल्ला ऐकला. हे मंत्री राजाची मर्जी कशी राखायची हेच जाणतात. (वर्तमानाच्या संदर्भाने बोलायचे, तर आजपर्यंत भारतातील कुणा एका मंत्र्याने पंतप्रधानांना किंचितही जाहीर विरोध केलेला ऐकला आहे का?) रावण पुढे काय करायचे हे मनाशी ठरवत निघून गेला. सीता मनातून जाणे शक्यच नव्हते. अकंपन आणि शूर्पणखा यांच्या निवेदनातील साम्य आणि फरक तो पडताळून पहात असावा. राम फार पराक्रमी असून, सीतेला पळवून आणण्याचा सल्ला दोघांनी दिला. मारिच यातले काहीच करू नकोस, असे म्हणत होता. मंत्रीमंडळ तर पुचाट होयबांनी भरलेले होते. (यात नवल ते काय?) शूर्पणखेच्या निवेदनात तिने राम नसेल तर लक्ष्मण पैकी कुणाशीही विवाह करण्याचा प्रस्ताव दिला होता, तोही सीतेसमक्ष. हे लपवून ठेवले होते. हे रावणाला कळण्याचा दुसरा मार्गच नव्हता. रावणाचा गर्दभजुंपलेला शीघ्रगामी रथ वेगाने निघून आकाशमार्गे जाऊ लागला. रावण स्वतः सालंकृत होता. मारिच जटाधारी कृष्णजिन धारण करु लागला होता. रावणाने साधू बनलेल्या मारिचाला, अकंपन आणि शूर्पणखेने ऐकवलेला वृत्तांत सविस्तरपणे सांगितला. जणू देवकन्याच असलेल्या सीतेला पळवून आणण्याच्या योजनेत सामील होऊन मदत कर, असेही सांगितले. देवांचेही भय नसलेल्या मला मदत करण्यास तूच सर्वात लायक आहेस. अशी मारिचाची त्याने तारीफ केली.

    डाव अपहरणाचा

    “हे मारिच्या! तुझ्यासारखा माया शक्तीवीर कुणी नाही. माझी योजना ठरली आहे. चंदेरी ठिपके अंगभर असणाऱ्या सोनेरी रंगाच्या सुंदर हरिणाचे रूप तू धारण कर. पंचवटीतील सीतेच्या पर्णकुटीजवळ तू सीतेच्या सहज दृष्टीस पडशील असा फिरत राहा. अशा सुंदर हरिणाचा तिला मोह नक्कीच होईल. हे हरीण पकडून आणायचा ती नक्कीच आग्रह धरील. ते दोघे पर्णकुटीत नसताना मी सहजच तिला पळवून आणीन. युद्ध नाही, एकही राक्षस न मारता हे काम फत्ते होईल. भार्येचे हरण झाल्याने कष्टी, अपमानी झालेल्या रामावर मी सहज आघात करीन. राहू चंद्राचे बीन बोभाट हरण करतो (ग्रहण?) तद्वत मी सीतेला पळवून नेईन.”

    तपस्वी मारिचाने ऐकवले शहाणपणाचे बोल

    मारिच हे ऐकूनच घाबरला. तोंड कोरडे पडले, घसा सुकला, भयकंपित झाला. रामाचा पराक्रम रावणाला ऐकवणे भागच होते. नाहीतर स्वतःचे मरण ओढवले आहे, हे तो जाणून होता. त्याने धैर्य एकवटले. साधू बनलेल्या या राक्षसाच्या तोंडून आजही भारतभर शिकवले जाणारे सुभाषित बाहेर पडले.

    सुलभा: पुरुषा राजन् सततं प्रियवादिन:।
    अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभ:। (अरण्यकांड सर्ग ३७. वाल्मिकी रामायण)

    “हे राजा! राजासमोर प्रिय गोड गोड बोलणारा (चापलुशी) सहज मिळतो. अप्रिय आणि हिताचे (सत्य) बोलणारा व ऐकणारा फार दुर्मीळ असतो. रामाच्या पराक्रमाची गाथा रावणाला पुन्हा ऐकणे भाग होते. राम हा इंद्र आणि वरुणाहून पराक्रमी आहे. तू त्याच्या वाट्याला गेलास तर राक्षस कुळाचाच नाश ओढवून घेशील. ही जनकसुता तुझ्या नाशासाठीच जन्माला आली आहे. तुझा स्वैराचार तुझ्यासह प्रजेच्या आणि राष्ट्राच्या नाशालाच आमंत्रण देत आहे. राम धर्माची मर्यादा पाळण्यासाठी, पित्याला सत्यवचनी ठरवण्यासाठी कैकेयीच्या मागणीप्रमाणे वनात आला आहे. हे वनवासाचे दीर्घ काळाचे व्रत तो आचरित आहे. सीतेचे अपहरण करून तू अग्नीत प्रवेश करू नकोस. सिंहासमोर उभा ठाकू नकोस. मिथिलेश कन्या ज्वालेसारखी तेजस्वी रामाची प्रियतमा आहे. रामाशी युद्ध करण्यास तू समर्थ नाहीस, त्यात तुझे हीतही नाही. एके काळी विश्वामित्राला मी यज्ञ करू देत नव्हतो. त्याचवेळी राम आणि लक्ष्मणांनी यज्ञपूर्तीच्या यशाची व्यवस्था केली. माझ्या माता त्राटिकेसह मी यज्ञ उद्ध्वस्त करायला गेलो. कुमार वयाच्या रामाने माझ्या माता त्राटिकेचा पहिल्यांदा वध केला (स्त्री हत्त्या). मला दूर समुद्रात एका बाणाच्या आघाताने फेकून दिले. मी जिवंत होतो. घाबरुन पुन्हा लंकेत आलो. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही पुन्हा दंडक वनात गेलो. यज्ञकर्त्या ऋषींना मारून त्यांचे रक्त पिणे हाच आमचा दिनक्रम होता. आम्ही तीन राक्षसांनी भल्यामोठ्या शिंगधारी मृगांचे रुप घेऊन राम लक्ष्मणावर दंडकारण्यातच हल्ला केला होता. माझे सहकारी दोन मृग मारले गेले. मी पुन्हा पळून आलो. रामाने पुन्हा मला जीवदान दिले होते. नंतर मी तपस्वी होण्याचे ठरविले. माझा सल्ला हा राक्षसाचा नसून एका तपस्वी मारिचाचा तुझ्या हिताचा आहे. पर नारीचा संग हे महापाप आहे. आत्ताच हजारो स्त्रिया तुझ्या ताब्यात आहेत. सीतेचा हट्ट धरशील, तर राक्षससेनेचा नाश अटळ दिसतोय. लंका आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल. रावण राजा! मला राम हा शब्दही आता ऐकायचा नाही. इतकी धास्ती मी त्या शब्दाची घेतली आहे. मी तुझ्या कार्यात सहभागी होऊ इच्छित नाही. शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घ्यायला तुझा सेनापती खर राक्षस, रामाला मारण्यासाठी आक्रमण करून गेला. रामाने स्वसंरक्षणार्थ खराला मारले, तर दोष कुणाचा? मी बंधुहितार्थ बोलतोय. माझे न ऐकशील तर तुझ्या आप्तांसह तूही रामाकडून मारला जाशील.”

    “हलकट कुळात जन्मलेल्या मारिच्या, तुझ्या बडबडीने मी रामाशी युद्ध करण्याचा आणि त्याची स्त्री पळवण्याचा निर्धार बदलणार नाही.” रावण गरजला.

    “मारिचा! खराच्या वधाचा बदला मी त्याच्या स्त्रीला पळवूनच घेणार, तेही तुझ्या सक्रिय मदतीने. यात इंद्रासह देव आणि दानव आड आले तरीही हे होणारच. योग्य-अयोग्य काय असे मी तुला विचारलेले नाही. तुझ्या अभिप्रायाला मी काडीचीही किंमत देत नाही. राजासमोर त्याला रुचेल जे अनुकूल असेल तसे मधुर, आदरानेच बोलावे. राजा नाराज होईल असे बोलायचेच नसते. माझ्या गुणदोषांची चर्चा तुला करायचीच गरज नव्हती.”

    “मी तुला आज्ञा दिली आहे. ती तुला नीट समजली आहे. राम तुला मारील की नाही मला सांगता येणार नाही, पण तू माझे न ऐकशील तर माझ्या हातून आत्ताच मारला जाशील. ठरव काय ते!”

    RavanWithMarich
    शूर्पणखेला एकाचवेळी रावण आणि राम अशा दोघांचा सूड उगवायचा होता. तिच्या दुःसाहसात दुःख नि कष्ट सीतेच्या वाट्याला आले आणि अंतिमतः रावणाची लंका भस्मसात झाली...

    “हे निशाचर राक्षसा! तुला सीतेच्या अपहरणाचा सल्ला ज्यांनी कुणी दिला, ते तुझे शत्रूच आहेत. तुझा घात व्हावा हाच त्यामागे दुष्ट हेतू आहे. माझे भविष्य ऐक.” मारिच बोलला.

    “माझ्यावर अकस्मात प्राणसंकट ओढवले आहे हे मी जाणतो. राम आधी मला मारील आणि नंतर त्याच्या हातून तुझा मृत्यू अटळ आहे. आत्ता तुला मित्राचा सल्ला ऐकायचाच नाही हे स्पष्ट दिसत आहे. दुष्कर्म करायलाच तू अधीर झाला आहेस. चल आपण दंडकारण्यात जाऊया.”

    रावणाच्या हातून मरण्याऐवजी रामा हातूनच मरावे हा मारिचाचा निश्चय ठरला. दोघे आकाशमार्गी रथावर चढले. मारिचाने मृगरुपाने सीतेला मोहात पाडायचे. दूर पळायचे. आश्रमात एकटीच सीता राहिली, की रावणाने बळाने सीतेला उचलून आणायचे!

    ‘ऑपरेश सीताहरण’ राबवण्यासाठी पंचवटीत दोघे दाखल झाले...

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » [पुढील भागाचे शीर्षक]


    राजा पटवर्धन
    राजा पटवर्धन

    राजा पटवर्धन हे विज्ञान, समाज, अर्थशास्त्र आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत. कोकणातील विकास प्रकल्पांवर यांनी सातत्यपूर्ण लेखन केले आहे. यांचे ‘पुनर्शोध महाभारताचा’ हे पुस्तक प्रकाशित आहे.
    ईमेल:



संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा