-
संपादकीय
अहमदाबाद आणि बंगळुरु, दोन्हींकडचा परिणाम एकच : मृत्युची आकस्मिक झडपएकदा का प्रजा मेंढरांसारखी वागायला लागली की, तिच्या पालनपोषणाची सोय तेवढी लावून देता येते. मात्र, चार भिंतींपलीकडच्या मरणाची जबाबदारी तिच्या एकटीवर सहज ढकलता येते. आम्ही दोन वेळचे चरायला दिले होते, मरायला नव्हते सांगितले, असा साधारणपणे प्रजेवर राज्य करणाऱ्या सत्ताधीशांचा (अ) विचार असतो. क्रिकेट चाहते विजयोन्मादात मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना असो, अहमदाबादमध्ये अडीचशेहून अधिक जणांचे बळी घेणारी विमान दुर्घटना असो वा पुण्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेली दुर्घटना असो किंवा ओडिशात जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना असो, सॅडन्ड... कंडोलन्सेस... प्रेइंग फॉर स्पीडी रिकव्हरी असे निर्जीव शब्द पेरून ओलावाशून्य संदेश तेवढा दिला जातो...ज्याचे त्याचे कर्म... हा पाप-पुण्याची निश्चिती करणारा वेदप्रणित कर्मफलसिद्धांत या देशातल्या राजा कम सत्ताधीशांच्या, विशेषाधिकारसंपन्न वर्गाच्या हरघडी कामी येताना दिसतो. सार्वजनिक परिघात दुर्घटना घडते. सर्वसामान्य नागरिकांचे बळी जातात. मरणारे आपल्या कर्माने मेले, कोणी सांगितले होते नसते उपद्व्याप करायला, असा सूर दुर्घटनांप्रसंगी बळी सोडून उर्वरितांमध्ये उमटतो. अशाने अकाली मरणदेखील कर्मफलसिद्धांतानुसार योग्य ठरून जाते.
सार्वजनिक असंवेदनशीलता
मात्र, सामान्य माणसे अशी वेळोवेळी बेबंद, बेपर्वा आणि प्रसंगी अगतिक का होतात, स्वतःहून मरणाच्या दारात का जातात, किंबहुना या दारापर्यंत त्यांना कोण आणून सोडतो आणि आपल्याला इथवर कोणीतरी आणून सोडलेय, याची एखाद्याला जाणीवसुद्धा का होत नाही? पहलगामची दहशतवादी घटना, त्यानंतर बंगळुरूमध्ये आयपीएल विजयानंतरची चेंगराचेंगरीची घटना, महामुंबईत (मध्य रेल्वेवरच्या मुंब्रा स्टेशनजवळची) लोकल ट्रेन ट्रॅकवर प्रवासी नाहक मृत्युमुखी पडल्याची घटना... पुण्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून लोक मृत्युमुखी पडल्याची घटना, ओडिशातल्या पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत ३ जण मृत्युमुखी आणि ५० हून अधिक जखमी झाल्याची घटना या अलीकडच्या काळातल्या व्यवस्थेने लादलेल्या आणि जनतेने स्वतःहून ओढवून घेतलेल्या दुर्घटना पाहिल्या की, वरील प्रश्न थोडाफार विचार करू पाहणाऱ्यांच्या मनात आल्यावाचून राहत नाहीत
हे खरेच की, वरील तीन प्रातिनिधिक घटना घडून एक काळ उलटून गेला आहे वाटावे, अशा तऱ्हेने वेगवान घटना आसपास घडल्या आहेत. देशाच्या प्रगतीची द्वाही फिरवणाऱ्या, थोडेफार वास्तव आणि बरेचसे आभासी विकासाचे चित्र रंगवणाऱ्या घटना हेतूपुरस्सर घडवून आणल्या जात आहेत. या ‘विकास’यात्रेत जूनच्या मध्यावर अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत २७५हून अधिक बळी गेल्याच्या घटनेने थोडाफार अडथळा आणला, पण तेवढाच.
इतर वेळी दुःखाचा, नैराश्याचा अंमल जनतेच्या मनावर जराही चढू नये, यासाठी महोत्सवी वातावरण निर्मिती अव्याहत, अखंडपणे सुरू आहे. या महोत्सवी वातावरणात अकरा वर्षांच्या देदीप्यमान यशाच्या जंत्रीमध्ये ‘८० कोटींना मोफत अन्नधान्य वाटप’ हे दाहक वास्तव सुद्धा अचिव्हमेंट म्हणून पेश करण्यात सत्ताधीशांनी मिळवलेले प्रावीण्य थक्क करून टाकणारे, संवेदनशील माणसाची गात्रे गोठवणारे आहे.
वास्तव हे आहे की, सार्वजनिक परिघात विनम्रता, विनयशीलता आणि विचारशीलता या तीन गुणांची जागा आक्रस्ताळेपणा, आक्रमकपणा आणि विचारशून्यता या तीन अवगुणांनी घेतली आहे. हा प्रभाव विद्यमान शासनसत्तेच्या (अ) विचार आणि नीतिमूल्यहीन वर्तनाचा असल्याचा शोध कोणी लावला, तर त्याला दोष देता येणार नाही. पण, मुळात अवगुणांचा प्रभाव पडावा यासाठी भूमी सुपीक असावी लागते. धर्मपरायण संस्कृतीचा देश अशी ओळख असलेल्या भारतातली भूमी या संदर्भाने नेहमीच सुपीक होती, हेही निरीक्षण योग्यच ठरावे.
सत्तेचे सावज
या निरीक्षणाची दिशा पकडू जाता असे दिसते की, प्रांत कोणताही असो, खंड कोणताही असो धर्मसत्ता आणि राजसत्ता हे पूर्वापार संस्कृतींचे दोन पहारेकरी राहिले आहेत. हे दोन पहारेकरी भारतासारख्या विकसनशील देशात बाजारसत्तेला हाताशी धरतात आणि प्रजेला आपल्याच तालावर नाचण्यास भाग पाडतात. प्रजेचे मन ताब्यात घेतात. ही म्हटली तर चालती फिरती अघोषित कैदच असते. अशी कैद झालेली ही जनता शासनसत्तेचे सहज सावज बनते. एकदा हे सावज शासनसत्तेच्या कह्यात गेले की, ही सत्ता या सावजास आंजारत-गोंजारत राहते. मनाला येईल तसे खेळवत राहते. अशा वेळी हा संबंध मेंढपाळ-मेंढरे असा न राहता याचक आणि उपकारकर्ता, आश्रित आश्रयदाता असा होऊन जातो.
हा उपकारकर्ता स्वातंत्र्य सोडून सगळे काही, तेही तुकड्या तुकड्याने (कल्याणकारी योजनांचे तुकडे) सावजाला पुरवत राहतो. तेव्हा हेच तुमचे भाग्य आहे, असा या उपकारकर्त्याच्या मनीचा आपले श्रेष्ठत्त्व ठसवणारा भाव असतो. याचक मात्र, आपणच खरोखरीचे भाग्यवंत आहोत, अशा समजुतीत आला दिवस साजरा करत राहतात. उपकारकर्त्याने भरवलेल्या नित्य उत्सव-महोत्सवात उत्साहाने सामील होत राहतात.
खरे तर याचकाच्या मनातली असुरक्षितता धर्मसत्ता सर्वात आधी हेरते आणि सुरक्षिततेच्या हमीच्या बदल्यात बाजारसत्ता आणि राज्यसत्तेकडे हवाली करून देते. अशा प्रसंगी याचकाने राज्यसत्तेकडे नुसतेच सर्वस्व गहाण ठेवलेले नसते, तर आपल्या आयुष्याची दोरीसुद्धा राज्यसत्तेच्या हाती राजीखुशी सोपवलेली असते. सुरक्षिततेच्या बदल्यात कळत-नकळत घडून आणलेला हा सौदा ठरतो. आणि सौद्याच्या नियमानुसार याचक कधीच सौदा जिंकत नसतो.
भावनिक समाधान आणि भावनिक सुरक्षितता या प्रजेच्या सर्वोच्च गरजा असतात, हे अचूक ओळखणारी धर्मसत्ता या व्यवहारात नेहमीच अपरहँड राखून असते. त्यानुसार तुमचे भले झाले तर आमच्यामुळे आणि तुमचे नुकसान झाले तर त्याचा दोष तुमचा. इथेच धर्मसत्तेचे दलाल कर्मफलसिद्धांताचे दाखले देत राज्यसत्तेची निर्दोष मुक्तता होण्याचा मार्ग प्रशस्त करत जातात.
म्हणजेच, प्रजेला बेबंद, बेपर्वा आणि अगतिक बनवणारी परिस्थिती अशी अचानक ओढवलेली नसते. धर्म-अध्यात्माच्या नावाखाली ती हेतूतः निर्माण केली जाते. एका अदृश्य साखळीचा तो परिपाक असतो. या अभद्र युतीच्या संगनमतातून उद्भवलेल्या परिणामांची जबाबदारी (जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना एकवेळची नुकसान भरपाई वगळता) कोणत्याही पक्षाची शासनसत्ता घेत नाही. अगदी अमृतकाळातल्या विकासाचा जयघोष करणारी, स्वतःस विश्वगुरुपद बहाल करणारी व्यवस्थासुद्धा परिणामांची पर्वा करत नाही. आम्हीच तुम्हाला या अवस्थेपर्यंत ढकलले, अशी कबुली देत नाही. माफी मागण्याचा तर प्रश्नच येत नाही.
आठवून पहा, महाकुंभपासूनच्या मानवनिर्मित घटना. यातल्या कोणत्या घटनेची जबाबदारी राज्यसत्तेने वा सत्तेतल्या पुढाऱ्याने घेतली? कोणत्या घटनेनंतर राज्यसत्तेने वा पुढाऱ्याने माफी मागितली? बहुतेक घटना-दुर्घटनांमध्ये चौकशी समितीची घोषणा हा त्या घटनेचा शेवट ठरतो. त्यानंतर घटनेत पोळलेल्यांचे पुढे काय होते, दोषींवर कोणती कारवाई होते, हे अभावानेच जगापुढे येते.
कार्यसंस्कृतीचा अभावराजकीय, धार्मिक लाभासाठी सत्तापक्षातर्फे जनतेला उत्सवधुंद बनवण्याच्या योजना, मोहिमा धूमधडाक्यात राबवल्या जात असताना, जून महिन्याच्या मध्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग विमान नागरी वस्तीवर कोसळून प्रवाशांसह २७५ हून अधिक जणांचे प्राण घेणारी भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत विमान ज्या वैद्यकीय वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले, तिथल्या विद्यार्थ्यांचा, कर्मचाऱ्यांचा यात बळी गेलाच, पण रस्त्यावरच्या विस्थापित झालेल्या चहा विकणाऱ्याच्या कुटुंबातल्या एका तरुणाचाही यात नाहक मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा दुःखावेग इतका तीव्र नि अनावर होता की, त्या प्रसंगात दुर्घटनेच्या कारणांचा शोध, झालेल्या संभाव्य मानवी चुका, या चुकांना अवकाश देणाऱ्या यंत्रणा यावर फारसा प्रकाश पडला नाही. अर्थातच या घटनेचा राज्यसत्ता, धर्मसत्ता वा बाजारसत्ता या एरवीच्या वर्चस्ववादी युतीशी संबंध नव्हता. तरीही, सार्वत्रिक धुंदीचा आणि त्यातून आलेल्या बेपर्वाईचा हा अप्रत्यक्ष परिणाम असल्याचा निष्कर्ष विरोधकांनी काढला. व्यवस्थेतल्या आतले मात्र दबक्या आवाजात का होईना, कर्तव्य बजावताना अनुभवास येणारी अमानवी स्थितीगती, वेळेचे बंधन न पाळता 'टार्गेट अचिव्ह' करणयातून येणारा असह्य मानसिक दबाव आणि सत्ताधारी व्यवस्थेच्या भावनाशून्य हाताळणीकडे लक्ष वेधत आहेत.
हे तर खरेच की, राज्यसत्ता कोणाच्याही हाती असो भारतासारख्या सळसळत्या, उसळत्या नि अडखळत्या लोकशाहीत जनतेवर ही आपबिती यापूर्वीही आलेली आहे, यापुढेही येत राहणार आहे. आपली मानसिक-भावनिक सुरक्षितता पारंपरिक धर्मसत्ता वा आधुनिक राज्य आणि बाजारसत्तेच्या हाती नाही. ते तर धोकादायक असे अपघातप्रवण क्षेत्र आहे. या तीनही सत्तांना शरण जाणे म्हणजे, स्वतःहून अपघाती वळणावर स्वतःला झोकून देणे आहे. हे आपले भागधेय नाही, तर आपले नादानपण आहे. पण हे एवढेसे उमगणे हीसुद्धा या देशात क्रांतीसदृश घटना भासू लागली आहे.
नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभी जागतिकीकरण-उदारीकरणामुळे जगाचे दरवाजे सताड उघडल्यानंतर तयारीत नसलेल्या भारतात अचानक नवमध्यमवर्गीय, नवश्रीमंतांमध्ये वाढ होऊन एक ओंगळ, एक बीभत्स चेहरा आकार घेऊ लागला. त्याचे दुष्परिणाम पुढे सामाजिक-सांस्कृतिक परिघात या देशाने अनुभवले. तसेच आतासुद्धा सत्ताधाऱ्यांच्या मनातला विकासाचा वेग गाठताना प्रगल्भकार्यसंस्कृती अभावी या देशातल्या सामान्य नागरिकांना मोठी किंमत चुकवावी लागत आहे.
जगाची परिस्थिती थोड्याफार फरकाने कायमच बिकट होती, रशिया-युक्रेन, इस्रायल इराण, इस्त्रायल पॅलेस्टिन, भारत-पाकिस्तान असे एकापाठोपाठ एक सुरू असलेल्या लष्करी संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जगावर आलेले अस्थिरतेचे सावट पाहता, आता परिस्थिती बिकट होण्याचा वेगही वाढला आहे. या वेगात देशातले खासगी आणि सरकारी व्यवस्थांमधले प्रतिक्रांतीचे अडते कोणतीही जबाबदारी न घेता सामान्य जनतेला मरणाच्या दारात ढकलत आहेत आणि याची जनतेला साधी जाणीवही नाही, हीच या देशाची खरी शोकांतिका आहे.
एक लांब पल्ल्याचे विमान काठोकाठ इंधन भरून आकाशात झेपावू पाहते आणि अवघ्या तीसेक सेकंदांत आगीच्या लोळात भस्मसात होऊन जाते. विजयी उन्मादाला मोकळी वाट करून देण्यासाठी सत्ताधीश योग्य ते नियोजन न करता बेलगाम गर्दीला मरणाच्या दारात सोडून देतात, एरवीसुद्धा जीवावर उदार होऊन प्रवास करणारे मुंबईकर दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीमुळे मरण पावतात, हजारदा विनवण्या करूनही पुलाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने दोन-पाच माणसे एका फटक्यात मरतात. प्रचंड वेगाने विकसित होऊ पाहणाऱ्या देशाने विकसित राष्ट्रासाठी आवश्यक सर्वोत्तमाचा ध्यास असलेली कार्यसंस्कृती, क्षमता आणि पात्रता अद्याप कमावलेली नाही, असेच या निमित्ताने म्हणता येते. ११ वर्षांची यशोगाथा सांगणाऱ्या सरकारी जाहिरातींनुसार भारत हा एव्हाना विकसित झालेला देश बनला आहे, केवळ हेच नाही, तर देशाच्या अमृतकाळातला हा विकास आहे. २०४७ मध्ये भारत विकसित राष्ट्रांच्या पंगतीत अभिमानाने बसणार असे सांगता सांगता, भारत हा विकसित झालेला देश आहे, असेच जणू जनतेच्या मनावर बिंबवले जाऊ लागले आहे. हा विनोद क्रूर आहे की करुण आहे, हसण्यावारी नेण्यासारखा आहे की, जिव्हारी लागणारा आहे, पाचकळ आहे की बीभत्स आहे, हे पोट भरलेल्या विशेषाधिकार संपन्नांपेक्षा वर्तमान विकासाच्या वेगात भरडले जाणाऱ्या व्यवस्थेतल्या आतल्या नि बाहेरच्यांनी सांगावे हेच बरे.
-संपादक
- oOo -
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
शनिवार, ५ जुलै, २०२५
लोकशाहीतली आपबिती
संबंधित लेखन
जुलै-२०२५
संपादकीय
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा