Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

रावेरखेडीः स्मृतिस्मारक मराठी अस्मितेच्या गौरवाचे...

  • इतिहासाचे पान

    Sketch_Samadhi.jpg
    मराठा शौर्याचा इतिहास जपलेले मध्य प्रदेशातल्या रावेरखेडी येथील थोरल्या बाजीरावांचे समाधीस्थळ…


    रावेरखेडी. मध्य प्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यातले ऐतिहासिक स्थळ. या स्थळाचे स्थानमहात्म्य मोठे. मराठी अस्मितेच्या गौरवाचे हे प्रेरणादायी स्मृतिस्थळ. माझ्या हृदयाने तीर्थक्षेत्र असल्यासारखी या स्थानमहात्म्याची लगेच नोंद करून घेतली! त्यामुळे डिसेंबर २०२४ मध्ये इंदूरला जायचे ठरल्यावर आडबाजूला असले तरी रावेरखेडीला भेट द्यायचीच आहे, अशी तंबी यजमानांना आणि लेकाला आधीच दिली! इंदूर ते कसरावद (९० कि. मी.) - कसरावद ते रावेरखेडी फाटा (पिपलगांव, १९ कि. मी.)- रावेरखेडी फाटा ते रावेरखेडी (८ कि. मी.) असा प्रवास करून इच्छित स्थळी पोहोचलो. संपूर्ण प्रवासात जागोजागी ‘श्रीमंत बाजीराव पेशवा समाधीस्थल, रावेरखेडी’ अशा अर्थाच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतील दिशादर्शक पाट्या वाचून ऊर भरून येत असताना मनात हीच रेकॉर्ड वाजत होती, की किती अनाकलनीय आहे, नियतीचा खेळ!

    बाहेरच्या माहिती फलकावर बाजीराव पेशवे यांचे निष्ठावंत सरदार ग्वाल्हेरचे शिंदे (सिंधिया) यांनी ही छत्री उभारल्याची नोंद आहे. स्मारकाजवळ गेल्यावर नर्मदेकाठचा निसर्गरम्य परिसर बघून, धकाधकीचे आयुष्य घालवलेल्या या वीराला निदान अंत्यसमयी अशी निवांत जागा मिळाली, या विचाराने मन शांतावले. विशाल पिंपळ वृक्षाच्या शेजारील धर्मशाळेच्या आत थोरल्या बाजीरावांची आगळीच रचना असलेली छत्री, स्थानिक भाषेत ‘बलुआ पत्थर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या लालसर पिवळ्या पाषाणाने बांधली आहे. साधारण उंचीच्या चौरस जोत्यावर अष्टकोनी चौथरा असून त्यावर छोट्याशा, षट्‌कोनी, सपाट छताच्या मंदिराची रचना केलेली दिसते. महिरप असलेल्या उघड्या द्वारातून आतील शिवलिंगावर अज्ञात भाविकाने वाहिलेली फुले दिसली. महिरप आणि सपाट छतामधील जागेत ‘इ. स. १७४० साली निधन पावलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांची रक्षा या छत्रीत असल्याचे मानले जाते’ अशा अर्थाचे इंग्रजी वाक्य लिहिले आहे. एका महान योद्ध्याची छत्री साधी तरी अनवट धाटणीची असावी, याचे समाधान वाटले तरी इतिहासप्रेमी पर्यटकांच्या गैरहजेरीचे वैषम्य निश्चितच वाटते. येथून जवळच काशीबाई यांनी पूर्वी इथे बांधून घेतलेले ‘रामेश्वर’ महादेवाचे मंदिर आहे.

    अन्याय्य नोंद

    थोरल्या बाजीरावांचा उल्लेख झाला, की आधी मस्तानीच आठवते. मस्तानी हा बाजीरावांच्या आयुष्यातील एक हळवा, कोवळा, नाजुक, मखमली हिस्सा होता याबद्दल दुमत नाहीच. परंतु त्यांची केवळ हीच आणि एवढीच ओळख कायम ठेवून आपण या थोर, कर्तबगार व्यक्तीवर घोर अन्याय करत आहोत, याची आपल्याला यत्किंचितही जाणीव आणि खंतही नाही. त्यांच्या युद्धचातुर्याचे, शौर्याचे गोडवे गाताना नामवंत देशी विदेशी इतिहासकारांची लेखणी थकली नाही. परंतु दुर्दैवाने ते सर्व पुस्तकांमध्येच बंदिस्त राहून दृश्य माध्यमांतून मात्र या कणखर सैनिकाची मुलायम बाजूच मांडण्यावर जास्त भर दिला गेला.

    प्रसिद्ध इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई (रियासतकार सरदेसाई) यांच्या १९४८ साली प्रकाशित झालेल्या New History of the Marathas (Volume II), The Expansion of the Maratha Power (१७०७ - १७७२) या पुस्तकात औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ते पेशवे माधवराव यांच्या मृत्यू (१७७२) पर्यंतच्या ऐतिहासिक घटनांचा ऊहापोह केला आहे. ते लिहितात, महान आंग्ल इतिहास तज्ज्ञ ग्रँट डफ यांनी बाजीरावांचे वर्णन, योजना आखण्यासाठी आवश्यक अशा बुद्धी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक अशा पराक्रमी हातांचा धनी असे केले होते. त्यांची शरीरयष्टी काटक होती. शस्त्रास्त्रे चालवण्याचे आणि घोडेस्वारीचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले होते. छ. शिवाजी आणि छ. संभाजी, संताजी घोरपडे यांसारख्या प्रेरणादायी वीरांच्या बलिदानाच्या शौर्यगाथांनी त्यांच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग जागवले. ते वाचन, लेखन, हिशेब यात पारंगत असून तत्कालीन ब्राह्मण वर्गात प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेशी परिचित होते. छाप पडेल अशी सुस्वरूप चेहरेपट्टी, बुद्धिमत्ता आणि शिष्टाचारयुक्त वर्तन या वैशिष्ट्यांमुळे त्यांना बघण्यासाठी विलक्षण उत्साहाने खिडक्यांतून स्त्री पुरुष गर्दी करत.

    अलौकिक कर्तबगारी

    छ. शाहू महाराजांनी बाजीरावांना अवघ्या विशीतच पेशवाईची वस्त्रे सुपूर्द केली यातच त्यांच्या क्षमतेची, कर्तृत्वाची कल्पना येते. छत्रपतींच्या हाताखालील सर्वात महत्त्वाचे पद भूषवताना त्यांनी सर्वप्रथम समवयस्क अनुयायांचा स्वतःचा गट तयार केला. आपल्या जोमदार धोरणाने त्यांनी पुरंदरे, भानू, बोकील, हिंगणे, पेठे यांसारख्या दिग्गज सरदारांना आकर्षित केले. त्यांनी सुद्धा बाजीरावांच्या उपक्रमात सामील होऊन, निष्ठेने त्यांच्या नेतृत्वाचे अनुसरण करून, त्यांच्या यशात मोठा हातभार लावला. दुसरीकडे बाजीरावांनी दरबारातील वडीलधाऱ्या सदस्यांनाही नाराज न करण्याची सावधगिरी बाळगली. छ. शाहूंच्या मर्जीतील पिलाजी जाधव आणि फतेहसिंह भोसले यांनी छ. शाहूंच्या सांगण्यावरून बाजीरावांना सहकार्य देऊन, त्यांच्या विचारांशी जुळवून घेत, त्यांना कधीही विरोध केला नाही. बाजीरावांच्याच कालखंडात शिंदे, होळकर असे समर्थ सेनापती उदयास आले.

    RameshwarTemple
    काशीबाई यांनी बांधलेले बाजीरावांच्या समाधीस्थळानजीकचे रामेश्वर महादेवाचे मंदिर...

    बाजीराव यांचे पिताश्री बाळाजी विश्वनाथ भट यांनी १७१९ साली मुत्सद्देगिरीची पराकाष्ठा करून मराठ्यांसाठी दिल्लीच्या बादशाहकडून दख्खन प्रांतात मोगलांकडून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्याची सनद मिळवली होती. परंतु यावरुन मराठे आणि मोगलांचे विविध प्रांतातील अधिकारी यांच्यात कायम कुरबुर चालायची. मराठ्यांनी ही सनद लष्करी भीती दाखवून, दबावाखाली बादशाहकडून मंजूर करून घेतली आहे, या कारणास्तव मोगलांचा हैदराबादचा सुभेदार निजाम उल मुल्कचा सनदेला कट्टर विरोध होता. त्याला दख्खन प्रांतावर स्वतःची सत्ता प्रस्थापित करून स्वतःकडे चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क घ्यायचे होते. त्यानुसार बाजीराव कर्नाटकातील मोहिमेवर असताना पुण्यावर चाल करून त्याने त्याच्या इराद्यांची चुणूक दाखवली. या आणीबाणीच्या प्रसंगात छ. शाहूंचा सामोपचाराचा सल्ला न मानता बाजीरावांनी समोरून हल्ला करून शत्रूला धडा शिकवणेच श्रेयस्कर, असे छ. शाहूंना पटवून दिले आणि निजामाची धूळधाण उडवली. मार्च १७२८च्या पालखेडच्या नेत्रोद्दीपक विजयामुळे निजामाला बाजीरावांची विरोधक म्हणून क्षमता व भविष्यात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत, याची पूर्ण जाणीव झाली आणि मराठ्यांचा चौथाईचा हक्क त्याने मान्य केला. निजामासारख्या अनुभवी आणि मुत्सद्दी राजकारण्याविरुद्ध मिळवलेल्या उल्लेखनीय विजयामुळे बाजीरावांच्या कारकिर्दीत पालखेडच्या लढाईचे महत्त्व ऐतिहासिक दर्जाचे आहे.

    मार्च १७२९मध्ये मोगल सुभेदार मोहम्मद खान बंगश याच्या तावडीत सापडलेल्या बुंदेलखंडचा राजा छत्रसाल यांच्या आर्जवी विनंती नंतर बाजीरावांनी बंगशला नमवून छत्रसाल यांना पुन्हा राज्यपद मिळवून दिले. या विजयाद्वारे बाजीरावांनी उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. या पुढील अप्रूप वाटण्यासारखी बाब म्हणजे, मोगल-मराठा युद्धसमयीची अशांतता असताना, कोणतीही अप्रिय घटना न घडता संपन्न झालेली, पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई यांची उत्तर भारतातील तीर्थयात्रा (फेब्रुवारी १७३५ ते जून १७३६). मथुरा, वृंदावन, कुरुक्षेत्र, प्रयाग, काशी, गया या पवित्र स्थानांच्या आध्यात्मिक वातावरणाचा आनंद लुटून, बुंदेलखंडमार्गे परतीचा प्रवास करून त्या सुरक्षितपणे पुण्याला परतल्या. या सर्व प्रवासात जयसिंह, बंगश वगैरे सरदारांनी त्यांचे सौहार्दपूर्ण स्वागत करून त्यांच्या सर्व सुखसोयींची जातीने व्यवस्था पाहिली. यावरून बाजीरावांनी उत्तरेत निर्माण केलेल्या धाकाची कल्पना येते. पुढे माळवा प्रांताची सरदेशमुखी/चौथाई देण्यास बादशाहने नकार दिल्यावर बाजीरावांनी थेट दिल्लीला धडक दिली. या अनपेक्षित हल्ल्याचा बादशाहची फौज विरोध करू न शकल्यामुळे बादशाहने तिथून पोबारा केला. बाजीरावांच्या या धक्कादायक हल्ल्यामुळे बादशाह खूप नाराज झाला आणि त्यांच्या आक्रमणापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्याने निजामाला पाचारण केले. परंतु निजाम तिथे पोचण्याअगोदरच डिसेंबर १७३७मध्ये भोपाळ येथे बाजीरावांनी त्याचा पाडाव केला. माळवा प्रांत पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात येऊन भोपाळ हा बाजीरावांच्या कारकिर्दीतील शेवटचा सर्वोच्च विजय ठरला.

    हळवा कोपरा

    युद्धांत असे देदीप्यमान यश मिळवत असताना बाजीरावांच्या कौटुंबिक आयुष्यात मात्र तणाव वाढलेला होता. मस्तानी नावाच्या, तिच्या काळातील ‘सर्वात मोहक स्त्री’ असा नावलौकिक मिळवलेल्या, मुस्लिम युवतीबद्दलच्या त्यांच्या आकर्षणामुळे नातेवाईकांसकट सर्व समाजात त्यांच्याविषयी अतिशय प्रतिकूल मत तयार झाले होते. मस्तानीला बाजीरावांची ‘प्रेयसी’ मानले गेले असले, तरी विदेशी इतिहासकारांच्या पुस्तकांत आणि आंतरजालावर तिचा उल्लेख ‘बाजीरावांची पत्नी’ असा केलेला आढळतो. यावरून ‘कुटुंबियांना मान्य नसलेले लग्न’ हाही याचा एक पैलू असावा असे वाटते. जानेवारी १७३०मध्ये झालेल्या बाजीरावांचा थोरला मुलगा नानासाहेबाच्या विवाह सोहळ्याच्या नोंदींमध्ये तिच्या नावाचा पहिला अधिकृत उल्लेख कागदपत्रांमध्ये आढळतो. त्याच वर्षी बाजीरावांनी पुण्याला शनिवारवाडा उभारून त्यात मस्तानीच्या नावाने महालही बांधला होता. १७३४ मध्ये तिला समशेर बहादूर नावाचा मुलगाही झाला. ती मनाने निर्मळ, बुद्धिमान, नृत्यसंगीतात पारंगत तसेच तलवार व भाला चालवण्यातही निपुण होती. मोहिमांमध्ये सुद्धा तिचा सहभाग असे. तिच्यात भावनिकदृष्ट्या उत्कटपणे गुंतलेल्या बाजीरावांना तिच्या सहवासात अत्यावश्यक प्रेरणा आणि विसावा जाणवायचा. तिची जीवनसरणी, भाषा, पेहराव हिंदू पद्धतीची होती. ती पत्नीच्या भक्तीभावाने बाजीरावांच्या सुखसोयींची काळजी घेत असे. बाजीरावांचे तिच्याबद्दलचे प्रेम वर्षानुवर्षे दृढ होत गेले आणि या विलक्षण, झपाटलेल्या प्रेमकहाणीने तत्कालीन समाजाला नक्कीच अचंबित केले असणार.

    Samadhi_CloseUp
    इतिहास हा केवळ राजकारण साधण्यापुरता उपयोगात येत असताना थोरले बाजीराव पेशव्यांचे समाधीस्थळ मराठी माणसांपासून बेदखल राहावे, ही वैषम्याचीच बाब...

    कालांतराने जनमानसाने बाजीरावांच्या मदिरापान आणि मांसभक्षणासाठी मस्तानीलाच जबाबदार धरले. वर्णाने ब्राह्मण असूनही सैनिकाच्या क्षत्रिय धर्माचे पालन करणाऱ्या बाजीरावांना ब्राह्मण जातीच्या कठोर नियमांचे पालन करणे कठीण होते. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये मुक्तपणे मिसळून, त्यांच्या संगतीत खाणे पिणे करून, त्यांच्यातील एक होऊन सैनिकांना त्वेषाने लढण्यासाठी उद्युक्त करणे त्यांना भाग होते. घरापासून दूर असताना मुक्तपणे मदिरापान, मांसाहार, धूम्रपान करणाऱ्या राजपूत सरदारांशी संपर्क येऊन साहजिकच त्यांच्यातही तसे बदल घडले असावेत. परंतु त्यांच्या या तथाकथित ‘चुकांचे’ मूळ कर्मठ समाजाने समजून न घेताच त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. मस्तानी आणि तिच्या मुलाला सामाजिक मान्यतेसकट उचित सन्मान मिळावा, यासाठी बाजीरावांनी जंगजंग पछाडले, परंतु लौकिकार्थाने रणांगणात न हरलेला हा योद्धा कौटुंबिक आणि सामाजिक युद्धात मात्र सपशेल पराभूत झाला!

    अर्थात काळाचा महिमा अगाध असतो आणि आपल्या हयातीत बाजीरावांना जे शक्य झाले नाही, ते आता साधारण तीनशे वर्षांनंतर आंतरजालाच्या युगात साकार झालेले दिसते. समशेर बहादूर यांचा उल्लेख नानासाहेब पेशवे यांचे सावत्र बंधू, माधवराव पेशवे यांचे काका असा वाचून निदान माझ्या दिलाला तरी फारच ‘सुकून’ मिळतो!

    छ. शाहू महाराजांचे पाठबळ

    १७३९च्या अखेरीस बाजीराव पुण्याहून दूर नासिरजंगच्या विरोधात मोहिमेवर असताना, अचानक नानासाहेब व चिमाजी अप्पा यांनी मस्तानीला ताब्यात घेऊन कोठडीत ठेवले. लगोलग पुण्यात येऊन तिला सोडवणे शक्य नाही, या जाणिवेने बाजीरावांना पराकोटीचे दुःख झाले. अडचणींचे एकमेव कारण असणाऱ्या मस्तानीला मार्गातून दूर केल्यावर सर्व आलबेल होईल, असा सगळ्यांना विश्वास होता. परंतु काहीही अघटित करण्यापासून छ. शाहूंनी सर्वांना परावृत्त केले. त्यांनी लिहिलेल्या पत्रात, ‘बाजीरावांच्या मस्तानीबद्दलच्या भावना त्यांनी खाजगीत जाणून घेतल्या आहेत; त्यामुळे जबरदस्तीने त्या दोघांना वेगळे करण्याच्या प्रस्तावावर त्यांचा तीव्र आक्षेप आहे; ती स्त्री वाईट प्रवृत्तीची नाही; बाजीरावांना स्वतःहून वाटेल तेव्हाच हे थांबलेले श्रेयस्कर, तोपर्यंत बाजीरावांच्या भावनांवर आघात करण्याची त्यांची इच्छा नाही; सर्वांनी बाजीरावाची आज्ञा निष्ठेने पाळावी, ते क्रोधित होतील असे वर्तन करू नये,’ असे बजावले होते.

    इकडे, मस्तानीला बंदिवासातून सोडवण्याच्या असमर्थतेमुळे आणि कर्तव्यपूर्ती करत असूनही निकटवर्तीयांनीच केलेल्या भावनिक कोंडीमुळे बाजीराव व्यथित झाले. वैफल्यग्रस्त असतानाच २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदेच्या दक्षिण तीरावर असलेल्या रावेरखेडी येथे उष्माघाताच्या तीव्र तापाने बाजीराव आजारी पडले. आयुष्यातील या पहिल्या आणि शेवटच्या आजारातच त्यांचा आकस्मिक अंत झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी मस्तानीला मिळताच महिन्याभरात ती सुद्धा पुण्यात मरण (आत्महत्येने की धक्क्याने याबाबत संदिग्धता) पावली. बाजीरावांबद्दल आत्यंतिक आदर आणि बंधुप्रेम असलेल्या चिमाजी आप्पा यांचाही १७४० सालीच मृत्यू झाला. अशा खळबळजनक घटनांनंतर काशीबाईंनी मस्तानीचा मुलगा समशेर बहादूर याला युद्धनीतीचे आवश्यक ते सर्व शिक्षण देण्याची व्यवस्था केली. यावरून त्यांची नैतिकता तसेच आपल्या पतीविषयीचा आदर नि श्रद्धा जाणवत राहते.

    सर्वसामान्य माणसाला बाजीरावांचा युद्धात कधीही पराभव न पत्करण्याचा नावलौकिक माहीत असतो, परंतु इतिहासकार मात्र त्यांच्या मुत्सद्देगिरीचीसुद्धा वाहवा करतात. आपल्या काळातील भू-राजनीती (geopolitics) अचूकपणे उमजलेल्या बाजीरावांनी औरंगजेबानंतर मोगल साम्राज्य कमकुवत झाल्याचे लक्षात आल्यावर, मोगलांचा प्रदेश काबीज करण्याचा निर्णय घेतला. या आधी मराठ्यांना महाराष्ट्रात गनिमी कावा वापरून मोठ्या सैन्यांचा पराभव करण्यात सह्याद्रीतील डोंगरी किल्ल्यांची मदत झाली होती. परंतु उत्तरेच्या सपाट प्रदेशात त्यांना वेगळ्या रणनीतीची आवश्यकता होती. यासाठी बाजीरावांनी वेगवान घोडदळाची नवी रणनीती विकसित केली. सैन्यासाठी रसद बरोबर नेताना सैन्याचा वेग कमी होतो. त्यामुळे ते सैन्यासोबत फारशी रसद न नेता, जिथे जायचे असेल त्या मार्गावरील शत्रूची ठाणी लुटत किंवा जिथे शक्य असेल तिथे खरेदी करत. घोडदळाच्या वाढलेल्या वेगामुळे बाजीराव शत्रूवर अचानक हल्ला करू शकत होते. तसेच युद्धभूमीच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन ते पाण्याच्या स्त्रोतांकडे जाण्याचे मार्ग रोखून धरत. त्यामुळे खूप मोठे शत्रू सैन्य सुद्धा न लढताच शरणागती पत्करत. पालखेडची लढाई हे त्याचे उत्तम उदाहरण होते. त्यांनी श्वास घ्यायला सुद्धा उसंत मिळणार नाही, इतक्या अविरत गतीने केलेल्या श्रीरंगपट्टनम ते दिल्ली आणि अहमदाबाद ते हैदराबाद अशा चौफेर घोडदौडीमुळे मराठा राज्यात क्रांतिकारक बदल घडून येण्याबरोबर देशभरातील सर्व राजकीय सत्तांचे पुनर्वितरण सुद्धा झाले. त्यांच्या कारकिर्दीत देशातील सत्तेचा केंद्रबिंदू दिल्लीपासून दूर होऊन महाराष्ट्राकडे सरकला. भारताच्या नकाशात मराठी सत्तेच्या अधिपत्याखाली अनेक नवीन केंद्रे अंकित होऊन बाजीराव बृहत् महाराष्ट्राचे निर्माते झाले.

    छ. शाहूसुद्धा आपल्या वडील अथवा आजोबांसारखे स्वकेंद्रित, लहानशा, एकभाषीय, एकजातीय राज्याचे लहानसहान राजे न राहता, विस्तृत विस्तार असलेल्या अठरापगड राजकीय सत्तेचे अधिपती झाले. सर रिचर्ड टेम्पल म्हणतात, (Oriental Experience, 1883), बाजीरावांनी अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत भारतीय खंडात मराठ्यांची जरब बसवली. नर्मदेच्या उत्तरेस, देशात शांतता आणि समृद्धी आणण्याचा, धर्म आणि सत्तेला गतवैभव मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. बनारस येथील काशी विश्वेश्वराचे महान तीर्थ पुन्हा बांधण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. सैनिकांसमवेत छावणीत असताना मृत्यू पावलेल्या या लढाऊ पेशव्याला मराठ्यांनी ‘महादेवाचा अवतार’ म्हणून गौरवले, यात नवल ते काय?

    इतके नाट्यमय आयुष्य व्यतीत केलेल्या बाजीरावांचे त्यांनी स्वतः उभारलेले, कायमस्वरूपी स्मारक पुण्याला शनिवारवाड्याच्या रूपात अस्तित्त्वात आहे. दुर्दैवाने आता त्याची आजूबाजूची भिंत आणि प्रवेशद्वारच शिल्लक आहे. एकीकडे वर्तमानातील पर्यटकांना पेशव्यांच्या महाराष्ट्रातील वास्तूमध्ये त्यांच्या महिम्याची आठवण करून देणारा उघडाबोडका चौथराच पाहायला मिळतो; तर दुसरीकडे जन्मभूमीपासून दूर, पुण्यापासून साडेपाचशे कि. मी. अंतरावर मध्य प्रदेशातील रावेरखेडीतल्या लहानशा, दगडी छत्रीच्या रूपाने मराठा साम्राज्याच्या अस्मितेचा गौरव केलेला आढळतो. नियतीच्या या अगम्य खेळापुढे आणि या अद्वितीय योद्धयाच्या पावन स्मृतीपुढे आत्यंतिक भक्तीभावाने नतमस्तक होण्यापलीकडे आपल्या हाती मात्र काहीही नसते!

    -oOo-

    ऋणनिर्देश: वेळोवेळी केलेल्या चर्चाबद्दल श्री. समीर शर्मा, मुंबई यांचे आभार!


    SaritaB
    डॉ. सरिता विनय भावे

    लेखिका डॉ. भावे या सूक्ष्मजीवशास्त्रातील पीएच.डी. असून साहित्य, निसर्ग आणि ऐतिहासिक विषयांच्या आस्वादक, अभ्यासक आहेत.
    ईमेल:


    छायाचित्रे - श्री. विनय भावे, डॉ. सरिता भावे
    रावेरखेडीतील रामेश्वर मंदिराची छायाचित्रे डॉ. अस्मिता हवालदार, इंदूर यांच्या सौजन्याने!


भारतीय तत्त्वज्ञानाच्या अंतरंगात...


  • नास्तिक दर्शन

    Sculpture

    प्राचीन भारतीय नऊ दर्शने

    भारतीय दर्शनशास्त्रात एकूण नऊ दर्शने आहेत, ज्यांना नवदर्शने असेही म्हणतात. ही नऊ दर्शने आणि त्यांचे सूत्रकर्ते ऋषी खालीलप्रमाणे आहेतः

    १. न्यायदर्शन (न्यायशास्त्र) - महर्षी गौतम, २. वैशेषिकदर्शन (वैशेषिकशास्त्र) - महर्षी कणाद, ३. सांख्यदर्शन (सांख्यशास्त्र) - महर्षी कपिल, ४. योगदर्शन (योगशास्त्र) - महर्षी पतंजलि, ५. मीमांसादर्शन (मीमांसाशास्त्र) – महर्षी जैमिनि, ६. वेदांतदर्शन (वेदांतशास्त्र) - महर्षी व्यास (बादरायण), ७. चर्वाकदर्शन (चर्वाकशास्त्र) - महर्षी बृहस्पती, ८. बौद्धदर्शन (बौद्ध मतशास्त्र) - गौतम बुद्ध आणि ९. जैनदर्शन (जैन मतशास्त्र) - आदिनाथ आणि महावीर.

    ही नऊ दर्शने प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील विविध वैचारिक शाखांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये वास्तविकता, ज्ञान, धर्म, नैतिकता आणि मुक्ती या विषयांवर विविध दृष्टिकोनांनी विस्तृतपणे विवेचन केलेले दिसते. या महर्षीना प्रत्येक दर्शनाचे सूत्रकर्ते म्हणतात. कारण त्यांनी त्या त्या दर्शनिक तत्त्वज्ञानाचे मूलभूत सिद्धांत सूत्रबद्ध केले. याचा अर्थ, या दर्शनांमधील विचार या ऋषींच्या आधीही अनेक वर्षे अस्तित्वात होतेच. त्या विचारांना संकलित करून एकत्रितपणे सूत्रबद्ध करून त्या ऋषींनी त्यांची मांडणी केली म्हणून त्यांना त्या त्या दर्शनाचे सूत्रकर्ते संबोधले जाते. ही दर्शने भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया आहेत.

    प्रत्येकाचे स्वतःचे विचार, तत्त्वे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आस्तिक दर्शने ही वेदांना प्रमाण मानतात आणि ईश्वर, आत्मा, कर्म, पुनर्जन्म यावर विश्वास ठेवतात. यात सहा दर्शने समाविष्ट आहेत, ज्यांना षड्दर्शने म्हणतात. ती न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा (वेदांत) या नावाने ओळखली जातात. नास्तिक दर्शने ही वेदांना प्रमाण मानत नाहीत आणि ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारतात किंवा त्यावर प्रश्न उपस्थित करतात. यात तीन दर्शने येतात, ती अशी... चार्वाक, बौद्ध, जैन.

    आस्तिक षड्दर्शने

    सुरुवातीला आपण थोडक्यात आस्तिक षड्दर्शनांचा विचार करूया. या पार्श्वभूमीवर आपणास नास्तिकतेचा मागोवा घेणे सोपे जाईल.

    (१) सांख्यदर्शन : हे दर्शन ‘विश्वनिर्मिती व विश्वविकासाचा’ निव्वळ ‘भौतिक दृष्टिकोनातून’ विचार करणारे व त्यासाठी ‘कुणा ईश्वराच्या अस्तित्वाची आवश्यकता नाही’ असे मानणारे व त्याअर्थी ‘नास्तिकदर्शन’ आहे. पण ईश्वर मानीत नसले तरी हे दर्शन वेदांना विरोध करीत नसल्यामुळे त्याची ‘आस्तिक’ अशी वर्गवारी केली गेली. मूळ निरीश्वरवादी सांख्यदर्शन आज उपलब्ध नाही. या विचारधारेची दर्शन स्वरूपात मांडणी कपिलमुनीने केलेली असून, नंतरच्या काळातील गीतेनेही (सांख्यमतात काही बदल करून पण) कपिलमुनींना फार मान दिलेला आहे.

    (२) योगदर्शन : ‘सांख्य आणि योग’ या दोन सर्वात जुन्या विचारधारा असाव्यात आणि त्या वेदपूर्व सिंधू संस्कृतींतूनसुद्धा आल्या असण्याची शक्यता आहे. योगात असे मानतात, की मन स्थिर करून ध्यानधारणा केल्यास अनेक मनोशारीरिक रोगप्रतिकारक शक्तीच्या उपलब्धी प्राप्त होतात. योगाची दर्शन-स्वरूप आणि सूत्रमय रचना इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या पतंजली मुनीने केलेली आहे. पतंजलीच्या ‘योगश्चित्वृत्तीनिरोधः’ म्हणजे ‘योग हे चित्तवृत्तीचे नियमन होय’ या योगाच्या व्याख्येत ‘ईश्वर’ नाही. पण पतंजलीने मन केंद्रित करण्यासाठी एक ‘पर्याय’ म्हणून तरी ईश्वर सांगितलेला आहे. कुठल्याही कारणाने का असेना, पण ‘योगदर्शन ईश्वर मानते’ असे साधारणपणे मानले जाते. पुढील काळातील गीतेने तर योग हा ध्यानयोग या नावाने मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला व त्याला ईश्वराबरोबर जोडून टाकले. जैन व बौद्ध हे ईश्वर न मानणारे याअर्थी नास्तिक धर्म असूनसुद्धा ते त्यांचे स्वतःचे योगशास्त्र मानतात.

    (३) वैशेषिकदर्शन : कणादमुनीने असे सांगितले की जगाची निर्मिती परमाणूंपासून होते व त्यासाठी कुणा ईश्वराची आवश्यकता नाही. कणादमुनी हा चक्क एक वैज्ञानिक वाटतो आणि त्याचे हे दर्शन खरे तर नास्तिक दर्शन आहे. परंतु वेदांना न नाकारल्यामुळे त्याचीही गणना आस्तिक दर्शन अशी झाली.

    (४) न्यायदर्शन : गौतममुनी या प्रणेत्याचे हे दर्शन वादविवादांसाठी वापरले जात असे म्हणून याला वादविद्या असेही म्हणतात. ‘न्याय’ म्हणजे ‘प्रमाण’ ठरवून तत्त्वाची परीक्षा करणे होय. हे दर्शन स्पष्टपणे सर्वज्ञ, सर्वव्यापक व सर्वशक्तिमान ‘ईश्वराचे’ अस्तित्व मानणारे दर्शन आहे. पण हे दर्शन ईश्वराला सृष्टीचे ‘घटकद्रव्यकारण’ असे मानीत नसून, ते त्याला ‘निमित्तकारण’ असे मानते.

    Rituals
    आस्तिक दर्शनाचा गाभा ईश्वरीतत्त्वाची चर्चा करणारा आहे. मात्र यात ईश्वर आणि सृष्टी यात अद्वैत मानले गेले आहे, तरीही रुढी-परंपरांचा पगडा इतका जबरदस्त राहिला आहे, की ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कर्मकांडांना उत्तरोत्तर मान्यता मिळत गेली आहे...

    (५) मीमांसा किंवा पूर्वमीमांसा : जैमिनी ऋषीच्या या दर्शनाला ‘जैमिनीसूत्रे’ असेही म्हणतात. हे दर्शन यज्ञ, आत्मा, वेदप्रामाण्य वगैरे सर्व मानते व हे मुख्यत्वे वैदिक यज्ञांच्या कर्मकांडाशीच संबंधित दर्शन आहे. पण यांच्या मते, यज्ञाच्या कर्मफळाचा दाता स्वतः यज्ञ आहे, ईश्वर नव्हे. याअर्थी खरे तर हे दर्शन ‘नास्तिक’ आहे. पण वेद व यज्ञ यांना मानणारे म्हणून हे दर्शन आस्तिक, प्रतिष्ठित गणले गेले.

    (६) उपनिषदे, वेदांत दर्शन किंवा उत्तरमीमांसा हे दर्शन हिंदूंच्या षड्दर्शनांपैकी सर्वात प्रसिद्ध, प्रमुख व जवळजवळ सर्वमान्य असे दर्शन आहे. याच्यानुसार ईश्वर आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या वस्तू नसून, म्हणजे त्या दोघांत ‘द्वैत’ नसून ‘अद्वैत’ आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टी व त्यातील सर्व सजीव ईश्वरमय आहेत. आत्मा व परमात्मा एकच आहेत, असे संपूर्ण अद्वैत मानणारा हिंदू हा जगातील एकमेव धर्म आहे. प्रमुख उपनिषदांनंतर काही शतकांनी ‘ब्रह्मसूत्रे’ हा त्यांच्यावरील प्रमाण ग्रंथ बादरायणाचार्यानी रचला. त्यांनी नास्तिक मताला विरोध करून ईश्वरवादाचे म्हणजे ब्रह्मवादाचे समर्थन केले. पुढे हे औपनिषदिक तत्त्वज्ञानच हिंदू धर्माचे मुख्य तत्त्वज्ञान बनले.

    याशिवाय भारतीय तत्त्वज्ञानाने चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन या ३ नास्तिक दर्शनांनाही तितक्याच आदराने स्वीकारले आहे.

    (७) जैनदर्शन व (८) बौद्धदर्शनः आजपासून सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी इ.स.पूर्वच्या सहाव्या शतकात होऊन गेलेल्या महावीर यांना जैन धर्माचा व गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचा संस्थापक मानण्यात येते. हे दोघेही क्षत्रिय वर्णाचे मगध प्रांतीय म्हणजे, आजच्या बिहार राज्यातील वेगवेगळ्या राजघराण्यांत जन्मलेले समकालीन होते. त्यातील गौतम बुद्ध तर ब्राह्मणांहून क्षत्रिय श्रेष्ठ आहेत असे मानणारा होता. पण कुठलेही जातिभेद, वर्णभेद पाळू नका, असे त्याने सांगितले. हे दोन्ही धर्म हिंदू धर्मातील ‘ईश्वर’ किंवा ‘ब्रह्म’ ही संकल्पना मानीत नाहीत; आणि ते कुणा देवांच्या मूर्तीही बनवीत नाहीत. मात्र जैन धर्मीय त्यांच्या तीर्थंकरांना ‘मार्गदर्शक’ मानून त्यांच्या मूर्ती बनवितात. काही बौद्ध देशांमध्ये बुद्धाच्या (आदिबुद्धाच्या) मूर्ती बनवून त्याला ईश्वर म्हणून पूजतात. शिवाय हे दोन्ही धर्म अहिंसक आहेत. महावीराने तर अहिंसा हाच परमोधर्म असे सांगितले आहे. जैन धर्मात, वैदिक धर्मातील पशुहिंसेमुळे वेदांना चक्क ‘हिंसक श्रुती’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे जैन व बौद्ध या दोन्ही धर्माना वर्णभेद व जातिभेद मान्य नाहीत.

    वेद-वर्णविरोधी फुटीर शाखा

    जैन व बौद्ध हे दोन्ही वेगवेगळे धर्म मानले जात असूनही ते हिंदू धर्माच्याच यज्ञविरोधी, वेदविरोधी, वर्णभेदविरोधी अशा फुटीर शाखा आहेत, असेही म्हणता येते. कारण जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म मूलतः उपनिषदांप्रमाणे निवृत्तीवादी (संन्यासमार्गी) धर्म आहेत. या दोन्ही धर्मांनी आचारविचारांचा मोठा वारसा, वैदिक धर्माकडून घेतलेला आहे. उदाहरणार्थ, योगविद्या पण स्वतःची वेगळी परिभाषा निर्माण करून त्याचप्रमाणे पुढील काळात हिंदूंच्या पौराणिक कथा त्यात त्यांच्या धर्माला अनुकूल असे बदल करून त्यांनी उचलल्या. जैन धर्मीयांनी तर हिंदूंचे अनेक संस्कार व मूर्तिपूजा स्वीकारून आजही भारतात (आपले वेगळेपण काहीसे टिकवून) ते हिंदू धर्मीयांशी समरस होऊन सुखाने राहाताहेत. जैन धर्मात असे मानतात की, ऋषभदेव या त्यांच्या पहिल्या तीर्थंकरापासून सुरू होऊन, पार्श्वनाथ हा त्यांचा तेविसावा तीर्थंकर व महावीर हा त्यांचा चोविसावा तीर्थंकर आहे. त्यांच्यापैकी पार्श्वनाथापूर्वीचे बावीस जण ऐतिहासिक नसून काल्पनिक असावेत, असे त्यांच्या वयाच्या (लाखो वर्षे) व शारीरिक उंचीच्या पौराणिक वर्णनांवरून वाटते. पार्श्वनाथ हा तेविसावा तीर्थंकर मात्र इ.स.पू. ८००च्या सुमारास होऊन गेला असावा. सत्य, अहिंसा, अस्तेय (चोरी न करणे) व अपरिग्रह (साठा न करणे) अशा चार यमनियमांचा ‘चातुर्याम धर्म’ पार्श्वनाथाने श्रमणांसाठी म्हणजे मुमुक्षूसाठी सांगितला होता. या धर्मातच ‘ब्रह्मचर्य’ या पाचव्या यामाची भर घालून तो महावीराचा पंचमहाव्रतांचा जैन धर्म बनला.

    बुद्धाने वैदिकांचे शब्दप्रामाण्य, कर्मकांड व ईश्वरप्रामाण्य साफ नाकारले. त्याला दुःखी व पीडित लोकांना दुःखमुक्त होण्याचा नवीन मार्ग दाखवायचा होता. बुद्धाची चार थोर सत्ये अशी होती...

    (य) जग दुःखमय आहे.

    (र) दुःखाचे कारण तृष्णा हे आहे.

    (ल) तृष्णेच्या त्यागाने दुःखनाश होईल.

    (व) निर्वाणप्राप्तीसाठी अष्टांगिका मार्ग अवलंबावा.

    वैचारिक मन्वंतराचे पर्व

    मूलतः जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म निरीश्वरवादी आहेत. मात्र जैन धर्मात जीवात्मा या अर्थी आत्म्याचे अस्तित्व व पुनर्जन्मही मानतात. स्वतः गौतम बुद्ध मात्र अमर आत्म्याचे अस्तित्वसुद्धा न मानणारा होता. ‘सतत बदलणाऱ्या या जगात स्वतःला प्रश्न विचारून, चौकशी करून, बुद्धीला जे पटेल तेच स्वीकारा,’ असे बुद्धिप्रामाण्यवादी मार्गदर्शन करणारा गौतम हा जगातील एकमेव धर्मसंस्थापक होय.

    वैदिक कर्मकांडाला व हिंसक यज्ञांना लोक आधीच कंटाळलेले असताना व उपनिषदांनीसुद्धा यज्ञविरोधी आवाज उठविलेला असताना आणि अनेक राजे व त्यांची सैन्ये एकमेकांशी भिडून महाभारत युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाल्यामुळे, हिंसेबद्दल एक प्रकारचा उबग लोकांच्या मनात निर्माण झालेला असतानाच जैन व बौद्ध हे सत्य, अहिंसा, शांती अशा थोर मूल्यांवर आधारित धर्म लोकांसमोर आल्यामुळे एक वैचारिक मन्वंतर घडून आले. ‘न दिसणाऱ्या ईश्वरामागे धावण्यापेक्षा सदाचार व सद्भावना राखून सर्वानी सुखी व्हा’, असे आवाहन त्यांनी केले. लोकाश्रय व राजाश्रय मिळवून या दोन्ही धर्माचा तत्कालीन भारतात वेगाने प्रसार झाला.

    Darshane_Rationalist
    एका बाजूला कर्मकांडे, ती पार पाडणारे वर्ग आणि दुसऱ्या बाजूला न दिसणाऱ्या ईश्वरापाठी धावण्यापेक्षा सदाचार, सद्भावना बाळगा म्हणणारा बुद्धिप्रामाण्यवाद या दोन प्रवाहांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया विस्तारला आहे...

    प्रत्यक्ष हेच प्रमाण

    (९) चार्वाकदर्शनः चार्वाक हे एक प्राचीन भारतीय भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन होते. चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक हे नाव चारु (गोड) आणि वाक् (वाणी) या शब्दांच्या संधीपासून तयार झाले आहे असे मानले जाते. या अर्थाने चार्वाक म्हणजे गोड बोलणारे लोक होत. चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्व निर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. ‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नास्तिक मताची प्रवर्तक असलेली, कोणी एक चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक / ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतिप्रणीत विचार) असे आहे. त्याची परंपरा शंकर... पुरंदर... बृहस्पती... अशी धरली जाते.

    या दर्शनात प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. या शब्दात, प्रति आणि अक्ष अशी दोन पदे आहेत. अक्ष म्हणजे इंद्रिय; त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे जे इंद्रियांना अनुभवता येते ते. शब्द आणि अनुमान याला मर्यादा आहेत. यामुळे आत्मा, ईश्वर आणि स्वर्ग या गोष्टींना या तत्त्वज्ञानात स्थान नाही. चार्वाक मताप्रमाणे, जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच खरे आहे, असे समजले जाते. चैतन्य हे पृथ्वी, आप, तेज, वायू या जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते. चार्वाक तत्त्वज्ञान जडवादी असल्याने ही दृश्य सृष्टी केवळ जड द्रव्यांची परिणति आहे, असे ठाम मत या दर्शनाने मांडले. ‘भूतेभ्यः चैतन्यम्!’ हा त्याचा मुख्य सिद्धांत आहे. हे जड पदार्थ परस्परांच्या संपर्कात येतात आणि आकार धारण करतात आणि हे विश्व साकारते. ते घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात आणि निरनिराळे देह उत्पन्न होतात व त्यात चैतन्य स्वयं उत्पन्न होते. अंतर्भूत घटकांचे प्रमाण बिघडले की, देह किंवा आकार नष्ट होतात, चैतन्यही नाश पावते. हाच मृत्यू, चैतन्य किंवा आत्मा जडाहून वेगळा नाही. तो देहात येतो, देहातून जातो, ही कल्पना वेडगळपणाची आहे, असे स्पष्ट मत या दर्शनात आढळते.

    या दर्शनात अर्थ आणि काम हेच पुरुषार्थ म्हटले आहेत. धर्म आणि मोक्ष या संकल्पना खऱ्या नाहीत. सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.

    पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो, तेवढेच खरे. म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. लोकायत तत्त्वज्ञानानुसार महाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू ही चार तत्त्वे; यांच्या संयोगांस शरीर, इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते. चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष. प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही. त्यामुळे परलोक अस्तित्वात नाही, आत्मा नाही, त्यामुळे अर्थात पुनर्जन्म नाही. श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. आत्मा मानणे म्हणजे जे दिसते ते शरीर नाही आणि जे दिसत नाही तो आत्मा आहे, असे म्हणणे. यालाच ते भ्रमिष्टपणा म्हणतात. ते परलोक मानत नसल्याने, कर्मविपाकसिद्धांतावरही त्यांचा विश्वास नाही. या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो, हे त्यांचे मत आहे. असे हे लोकायतिक म्हणजेच ईहवादी तत्त्वज्ञान आहे.

    ही नऊ दर्शने भारतीय तत्त्वज्ञानाचा समृद्ध वारसा आहेत. प्रत्येक दर्शन जीवन, विश्व आणि सत्य यांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते. आस्तिक दर्शने वेदांवर आधारित आहेत तर, नास्तिक दर्शने स्वतंत्र तर्क आणि अनुभवावर जोर देतात. यांनी भारतीय संस्कृती, धर्म, नीतिमत्ता आणि विज्ञानाला प्रभावित केले आहे. आजही कमी अधिक फरकाने आपण या नऊ दर्शनाच्या आधारेच आपले सांस्कृतिक जीवन जगत आहोत.

    -oOo-



    जगदीश काबरे
    जगदीश काबरे

    जगदीश काबरे हे विज्ञानप्रसार आणि सामाजिक उन्नयनाशी निगडित कार्यकर्ते, ज्येष्ठ लेखक आणि आस्वादक आहेत.
    ईमेल: jetjagdish@gmail.com.



गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

मुलाखत : “आरोग्य संवादाची समृद्ध संस्कृती आकारास येणं हेच उद्दिष्ट”

  • संवादयात्रा

    MohanDes_Aarogyabhan
    ‘आरोग्यभान’कर्ते मोहन देस

    अनेक वर्षांपूर्वी वैद्यकीय व्यवसाय थांबवून आरोग्याचं काम सुरू केल्याचं तुम्ही अनेकवार सूचित करत असता. त्यावरून वैद्यकीय व्यवसाय आणि आरोग्याचं काम या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत की काय असं वाटतं...

    वैद्यकीय व्यवसाय आणि आरोग्याचं काम या दोन्ही गोष्टींचा एकमेकींशी थेट संबंध नाही. माझी ओळख करून देतानाही ‘मी डॉक्टर आहे, तरीदेखील आरोग्याचं काम करतो’ असं सांगतो. डॉक्टर हा रुग्णांसाठी असतो आणि रुग्ण डॉक्टरकडे येतो, कारण त्याच्या आरोग्यात बिघाड झालेला असतो. आरोग्य म्हणजे काय, तर शरीराच्या सगळ्या यंत्रणा जागच्या जागी असणं, (त्या स्वस्थ असणं... म्हणून आरोग्याला आपण स्वास्थ्य असं म्हणतो...) त्यांचं काम योग्यरीत्या सुरू असणं. ते बिघडलं तर डॉक्टर लागतो. डॉक्टर रोगांवर काम करतात, आरोग्याचं काम करत नाहीत.

    वैद्यकीय व्यवसायात असताना मला वाटायचं, ही एवढी रोगराई खरंच आहे का? रोगराई, अस्वच्छता, मानसिक अस्वस्थता हे सगळे घटक वैद्यक सत्तेसाठी आवश्यक आहेत. अनारोग्य ही काही लोकांची आर्थिक गरज आहे. काही मूलभूत गोष्टींवर काम झालं, तर देशातली सत्तर टक्के रोगराई नाहीशी होईल, पण ती तशीच राहणं अनेकांच्या फायद्याचं आहे. त्यामुळेच मूलभूत आरोग्यावर फारसं काम केलं जात नाही.

    मी मुंबईत १७ वर्षं वैद्यकीय व्यवसाय करत होतो. त्यावेळीही मी काही संस्थांशी जोडलेला होतो. कामगारांसाठी, झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने चालवत होतो. पैसा कमावणं हा मुख्य उद्देश तेव्हाही नव्हताच. मात्र, माझ्या पत्नीची आणि नंतर मुलीची साथ असल्याने मी ते करू शकत होतो.

    रोगराईवर उपचारांचं काम करायला खूप डॉक्टर्स आहेत, पण रोगराई टाळण्यासाठी आणि आरोग्य टिकवावं, वाढावं यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स खूप कमी आहेत. तसं काही करता आलं तर बघावं, असा विचार प्रकर्षाने मनात येत होता.

    मुळात, समाजासाठी काही करण्याच्या विचाराची पायाभरणी कुठे आणि कशी झाली?

    सुरुवात झाली, पण ती समाजासाठी नव्हे, समाजासोबत! सुधारणावादी विचारांचा वारसा मला घरातूनच मिळाला होता. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ‘लोकविज्ञान’ या संघटनेचं काम मी डॉक्टर होण्याच्या आधीपासून करत होतो. १९८०च्या दशकात आम्ही महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये विज्ञानाचा प्रसार करत होतो. ‘फाउंडेशनल रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’मध्ये मी डॉ. अंटियांसोबत दहा वर्षं काम केलं होतं. आरोग्यसंवादाचा शोध तिथेच लागला. नुसतं संशोधन पुरेसं नाही, तर उपक्रमांमध्ये उतरणं गरजेचं आहे, हे तिथेच उमगलं. मग वैद्यकीय प्रॅक्टिस सोडली आणि ‘आरोग्यभान’ला सुरुवात झाली.

    ‘आरोग्यभान’ हे नाव नेमकं कसं आलं?

    आरोग्य हा शब्द तर आपल्याला माहीत आहेच. ‘व्हेअर देअर इज नो डॉक्टर’ या पुस्तकाचे एक लेखक डेव्हिड वेर्नर यांनी म्हटलं आहे- एव्हरिथिंग अंडर द सन, इन्क्लुडिंग द सन, इज हेल्थ. म्हणजेच सूर्याच्या प्रकाशपरिघात येणारी प्रत्येक गोष्ट, त्यात अगदी सूर्यसुद्धा येतो, आरोग्याच्या व्याख्यात मोडते. ‘भान’ ही संकल्पना व्यापक आहे, भान म्हणजे केवळ जागरूकता, माहिती नाही, तर अनेक गोष्टींची एकाच वेळी जाणीव असणं. हे भान आरोग्याबाबत असलं पाहिजे. चांगला डॉक्टर कोण, प्यायचं पाणी कसं असलं पाहिजे, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता, लैंगिकता, मैत्री सहकार्य, नातेसंबंध, लैंगिकता, लिंगभाव या सगळ्याचं भान हवं. आरोग्याबाबत भान निर्माण करण्याचा उद्देश असल्याने उपक्रमाला ‘आरोग्यभान’ नाव दिलं. १९९६ साली मी आणि आणखी काही समविचारी लोकांनी ‘आरोग्यभान’ची रचना करायला सुरुवात केली. हळूहळू माणसं जमत गेली. सुरुवातीला आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातच काम करत होतो. नंतर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काम सुरू झालं. मग राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांमधल्या काही ठिकाणी ते पसरलं.

    बरीच वर्षं आम्ही संस्था म्हणून नोंदणी वगैरे केलेली नव्हती. समविचारी लोक एकत्र यायचो, काम करायचो, त्यातून मिळणारं मानधन आपसात वाटून घ्यायचो. साहित्याची निर्मितीही सगळे मिळून करायचो. आमच्यात काही चित्रकार होते, काही नाटकात रस असलेले होते, काही गाणारे होते, लिहिणारे होते, आजही आहेत. गावागावांतले स्त्री-पुरुष, शाळा-कॉलेजातले विद्यार्थी यांनी ‘आरोग्यभान’ला खूप साथ दिली. त्यांनी गाणी लिहिली, चाली लावल्या. लोकगीतांच्या चालींवर बसणारे शब्द आम्ही लिहिले. मराठी, हिंदी भाषांतल्या गाण्यांची मग तेलुगुमध्ये, ब्रजभाषेत भाषांतरं झाली. राजस्थानमध्ये बसवाडात बागडी नावाची बोली आहे, त्यातही गाणी भाषांतरित झाली.

    चार वर्षांपूर्वी आम्ही संस्थेची नोंदणी केली. त्यामुळे सीएसआर निधी मिळण्याची शक्यता आहे. आम्ही पाच जण पूर्णवेळ काम करतो. बाकीचे १०-११ नोकरी करून वेळ देतात. संस्थेकडे ऑफिसची इमारत, वाहनं वगैरे मालमत्ता निर्माण झाली म्हणजे तिचं संस्थान होतं, सत्तास्थान निर्माण होतं, उतरंडी तयार होतात; त्यात कामाचं नुकसान होतं. पैशाची गरज असते, पण आर्थिक बाबींवर सत्ता उभी राहिली तर मूलभूत तत्त्वालाच बाधा येते. त्यामुळे संस्थेचं ऑफिस नाही, कोणतीही प्रॉपर्टी नाही. संस्थेचा कारभार पारदर्शक आहे. किती पैसे आले, कोणाला किती मिळाले हे प्रत्येकाला माहीत असतं. आमचं काम हा लोकसंस्कृतीचा भाग आहे. घराघरांमध्येच आम्ही पोस्टर्स, वह्या ठेवतो. बैठकाही कधी कोणाच्या घरी होतात, तर कधी चहाच्या टपरीवर. संवादाचं साहित्य विषयवार पेटाऱ्यांमध्ये ठेवलेलं असतं. लोक ते घेऊन जातात आणि परत आणून ठेवतात. कार्यशाळा कधी शाळांमध्ये होतात, कधी कोणाच्या गच्चीवर होतात, कधी आदिवासी भागात, कधी वडाच्या झाडाच्या सावलीत तर कधी शहरी कामगार वस्त्यांमध्ये होतात.

    संस्था लहान असल्याने हे जमतं असंही अनेकांचं म्हणणं आहे. ते बरोबरही असेल. मात्र, संस्थेचं स्वरूप विकेंद्रित आहे. बेळगाव-सोलापूरची वेगळी ‘आरोग्यभान’ आहे, कोकणातली वेगळी असू शकते. राजस्थानातल्या उपक्रमात आम्ही लक्ष घालत नाही. सत्तास्थानं निर्माण न होऊ देण्याचा प्रयत्न करतो. त्यातून काही वेळा संस्थेचं नाव वापरून (किंवा वापरण्याचं टाळून) गैरवापराचे प्रकारही झाले आहेत, पण तरीही विकेंद्रीकरणाचा आमचा आग्रह कायम आहे.

    ‘आरोग्यभान’च्या कामाचं स्वरूप नेमकं कसं आहे?

    सुरुवातीला आरोग्याचं शिक्षण हेच डोक्यात होतं. ते खरं तर प्रत्येक स्तरावर अगदी घरोघरीही सुरूच असतं. लहान मुलांना आपण दात घासायला सांगतो, त्यांच्या आहाराचा विचार करतो, वाईट सवयींपासून दूर राहायला सांगतो. डॉक्टर, शिक्षक वगैरे तेच करतात. मात्र, त्यातली एक अडचण लक्षात आली. ज्याच्याकडे माहिती आहे, त्याने ती इतरांना द्यायची ही आपल्या शिक्षणाची परंपरा आहे. यातही सत्तेचं समीकरण येतंच. जशी डॉक्टरांची सत्ता असते, तशी शिक्षकांचीही असते. त्यामुळे आरोग्यशिक्षण सूचनांच्या पातळीवरच राहतं. हे खा, ते खाऊ नका, व्यसनं करू नका, मानसिक आरोग्य सांभाळा अशा सगळ्या सूचना/आज्ञा एकतर्फी पद्धतीने येतात. वैज्ञानिक माहिती देऊनही सूचनाचं कृतीमध्ये रूपांतर होत नाही. यामागचं कारण म्हणजे, शिकवणाऱ्याचा समोरच्या माणसाशी संवाद नसतो. ज्यांना सूचना केल्या जातात ती माणसं कशी जगतात याबद्दल सूचना करणाऱ्याला अजिबातच माहिती नसते. पोषणाच्या शासकीय कार्यशाळेत पोषक पदार्थ म्हणून थालीपीठ करून दाखवलं जातं. मात्र हा पदार्थ करण्यासाठी आवश्यक जिन्नस, वेळ त्यांच्याकडे आहे का, हे बघण्याचे कष्ट घेतले जात नाहीत.

    आणखी एक उदाहरण देतो. सरकारने बांधून दिलेली शौचालयं वापरण्याची सूचना आरोग्य कर्मचारी करतात, पण पाणी आहे का, सेप्टिक टैंक आहेत का हे बघितलं जात नाही. अशा परिस्थितीत आरोग्यशिक्षण वाया जातं. कारण संवादाचा अभाव असतो. आरोग्याच्या समस्यांना कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय अशी अनेक अंग असतात. भारत उष्ण कटीबंधीय आणि हिरवा देश आहे, मुबलक लोह असलेल्या हिरव्या भाज्या उपलब्ध आहेत, तरीही अॅनिमियाचं प्रमाण प्रचंड आहे. भारतात आयर्नच्या (लोहाच्या) गोळ्या द्याव्या लागणं ही ‘आयरनी’च आहे. या सगळ्याचा अर्थ गरज शिक्षणाची नसून संवादाची आहे.

    Drawing
    शरीरात उत्साह, उमेद आणि जीवंतपणा आणण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची मदत होऊ शकते, हे व्यक्त करताना मुले आपापल्या आकलन आणि अनुभवांना अनुसरून अभिव्यक्त होत राहतात...

    ‘आरोग्यभान’च्या कार्यशाळेत पहिला उपक्रम असतो तो ‘आरोग्य’ म्हटल्यावर जे काही मनात येतं, त्याचं चित्र काढण्याचा. दवाखाना, टॉनिक, इंजेक्शनपासून ते जेवणाचं ताट आणि हसऱ्या चेहऱ्यापर्यंत ३०-३५ चित्रं काढली जातात. आरोग्य म्हणजे डॉक्टर, दवाखाना ही कल्पना काढून टाकण्यासाठी आम्ही हा उपक्रम घेतो. आरोग्याचा प्रवास डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी असतो, हे कथांद्वारे सांगून आम्ही त्यावर चर्चा करतो. त्यातून लोकांना वेगळी जाण येते, शंका दूर होतात. या कार्यशाळांच्या ठिकाणी उपलब्ध घटक वापरून पोषक खाद्यपदार्थ तयार करून दाखवले जातात. काही रानभाज्यांमध्ये लोहाचं प्रमाण मेथी-पालकाच्या तुलनेत आठ पटींनी जास्त असतं, पण तिथल्या लोकांना त्याची माहितीच नसते. अशाप्रकारे संवादामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर समुदायाला आरोग्याबाबत एक पाऊल पुढे टाकता येतं.

    आरोग्यसंवादाची समृद्ध संस्कृती नव्याने निर्माण करणं हेच ‘आरोग्यभान’चं काम आहे. संवादाची संस्कृती तर आपल्याकडे आहेच. अनेकदा या संवादात असाहायता असते, नशिबाला बोल लावण्याची वृत्ती असते. एकत्रीकरणाच्या माध्यमातून ही असाहायता कमी करण्यासाठी ‘आरोग्यभान’ काम करते. रुग्णांना हक्क आहेतच. सामान्य माणसालाही आरोग्याचा हक्क आहेच. हा हक्क मान्य केला, तर लोक मागण्या करायला लागतील या भीतीने त्यांना त्या हक्कांपासून अनभिज्ञ ठेवलं जातं. आमच्या आरोग्यसंवादात अधिकार, सक्षमता हे परवलीचे शब्द आहेत, म्हणूनच लोकांना ते आपलेसे वाटतात.

    मध्य प्रदेशातल्या एका कार्यशाळेत लोकांना ते जे खातात, ते नमुन्यादाखल आणायला सांगितलं. त्यांचा सूर ‘यहाँ खास कुछ नही मिलता’ असा होता. प्रत्यक्षात त्यांनी तब्बल ६८ प्रकार आणले आणि त्यातले तीन-चार प्रकारच आपल्या माहितीचे होते. आपल्याकडे किती वैविध्य आहे, हेही त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागलं.

    आरोग्याचं काम वैज्ञानिक स्वरूपाचं असतं, पण त्यासाठी कलेचं माध्यम तुम्ही आवर्जून वापरता...

    निश्चितच. आम्ही गाणी, नाटकं, गोष्टी या सगळ्या माध्यमांचा वापर करतो. कार्यशाळांसाठी काही कथा तयार केल्या आहेत. अर्थात त्यात वेळेवर बदल केले जातात. अनेक संस्थांमध्ये निश्चित मोड्युल्स असतात, आम्ही मोड्युल्सनुसार काम करत नाही. रचना नक्कीच आहे. एक सांगाडा आहे, त्याच्या मधल्या जागा भरणं हे संवादकाच्या हातात असतं. आम्ही शिक्षक म्हणत नाही, संवादक म्हणतो. गुरू, सुधारक, डॉक्टर नको, तर आरोग्य संवादक व्हायला हवं. संवाद संस्कृतीजन्य असतो. अलीकडे तो कमी होत चालला आहे, त्यात कृत्रिमता आली आहे. घरात खाण्याबद्दल बोलतानाही आपण खूपच वैद्यक स्वरूपाचं बोलायला लागलो आहे. कार्ब्स, व्हिटॅमिन्स वगैरे. ही कृत्रिमता टाळली पाहिजे.

    संस्कृती प्रमाण नसते. ती लोकांची असते. त्यामुळे आरोग्याची गाणी लोकांची असली पाहिजेत, चित्रं लोकांची असली पाहिजेत, नाटकंही लोकाधिष्ठित असली पाहिजेत. आपलाच आरोग्याचा प्रश्न नाटकाच्या माध्यमातून समोर उभा राहिला, तर लोक त्याकडे त्रयस्थपणे बघू शकतात. त्यावर चर्चा होते. त्याला आम्ही आरोग्याचा संवाद म्हणतो. अखेरीस माणसं म्हणतात, ‘आरोग्यभान’च्या संवादातून काही उत्तरं मिळाली पण काही प्रश्नही पडले, पण या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची जबाबदारी आमची आहे.

    चित्रांचा वापरही प्रभावीरीत्या करता येतो. मात्र, अनेकदा शिक्षणासाठी दाखवली जाणारी चित्रं लोकांच्या परिचयाचीच नसतात. आम्ही लोकांनाच चित्र काढायला सांगतो, कथा तयार करायला सांगतो. गुजरातमधल्या भडोचजवळच्या नेत्रांग गावातल्या कार्यशाळेत आम्ही सांडपाणी या विषयावर कथा तयार करायला सांगितली. त्या गावात खूप मोर होते. या कथेतल्या मोराचा पिसारा सांडपाण्यामध्ये लडबडून झडून गेला होता, त्यामुळे लांडोरी त्याला विचारत नव्हत्या. मग एक कावळा येऊन (हा कावळा त्या बाईच्या माहेरच्या गावाचा होता म्हणे!) दुसऱ्या एका गावातल्या शोषखड्ड्यांबद्दल माहिती देतो, अशी गोष्ट त्या स्त्रियांनी तयार केली. हा कलेतून झालेला आरोग्यसंवादच आहे. बुंदेलखंडातल्या चित्रकूट भागातल्या एका कार्यशाळेत लोकांनी रामायणातल्या व्यक्तिरेखा घेऊन आरोग्याबद्दलचं गाणं तयार केलं होतं. तात्पर्य काय, परीकथा, चित्रकथा, पुराणकथा यांची पारंपरिक संवादी संस्कृती आरोग्यामध्ये येऊ शकते.

    आम्ही ज्यांच्यामार्फत कार्यशाळा घेतल्या त्या बहुतेक संस्था पुरोगामी विचारांच्या होत्या, लोकांचे अधिकार जाणणाऱ्या होत्या. त्यामुळेच त्यांच्यासोबत आम्ही काम करू शकलो.

    ‘आरोग्यभान’तर्फे ‘रिलेशानी’ शिबिरं घेतली जातात...

    हा शब्द आम्हीच तयार केलेला आहे. रिलेशानी म्हणजे शानदार रिलेशनशिप अर्थात आरोग्यपूर्ण नातेसंबंध. हा विषय शाळांमधून शिकवला जात नाही. ९३ टक्के मुलींना तर ५३ टक्के मुलांना नात्याचे भीषण, त्रासदायक अनुभव कधी ना कधी आलेले असतात, असं आकडेवारी सांगते. शाळांमध्ये दिलं जाणारं लैंगिक शिक्षणही जुजबी स्वरूपाचं असतं. प्रगल्भ, सुंदर नातेसंबंधांची गोष्ट आपल्याकडे काहीशी गोपनीय करून टाकतात. शाळेत सहशिक्षण असतं, कधीकधी त्यातून विसंवाद होतात. प्रेमाचा अर्थ काय, आपलं शरीर कसं घडलं आहे असे अनेक प्रश्न मुलांना पडतात. मासिक पाळीबद्दल मुलींच्या मनात गोंधळ असतात. त्या वयात शरीरात होणाऱ्या विकासाबद्दल त्यांना नीट कळत नाही. या विकासाबद्दल सन्मानाची भावना मुलामुलींच्या मनात निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. स्पर्शाची भाषा अनेकांना कळत नाही. मुलींशी निदान मासिक पाळीबद्दल तरी बोललं जातं. मुलांना तर कोणीच काही सांगत नाही. त्यात आज मोबाइल फोनसारखं साधन मुलांच्या हातात आहे. त्यातून खूप प्रश्न निर्माण होतात. अशा असंख्य गोष्टींबद्दल ‘रिलेशानी’मध्ये चर्चा होते. त्यातही गाणी, नाटकं असतात.

    Music_Learn
    वैद्यकीय व्यवसाय आणि आरोग्य जागृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. अशा प्रसंगी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या सगळ्या वयोगटांमध्ये आरोग्यविषयक जाणिवा जागृत असण्यातच निरोगी मन आणि शरीराचे इंगित दडलेले आहे...

    आमच्याकडे पोर्नोग्राफीबद्दलचं अत्यंत संयत असं नाटक आहे, लैंगिक छळाबद्दलचं नाटक आहे. मुलांच्या भावी आयुष्यातल्या नात्यांना एक निकोप पाया देणं हाच ‘रिलेशानी’चा उद्देश आहे.

    आमच्याकडे वेगवेगळ्या बोली-भाषांतली दीडशे गाणी आहेत. लहान मुलांसाठी शरीरशास्त्रावरचं गाणं बडबडगीतासारखं आहे. ग्रामीण भागांतल्या मुलांसाठी वेगळी गाणी आहेत, शहरांतल्या मुलांसाठी वेगळी गाणी आहेत. आदिवासी भागांत आदिवासी-नागरी नातेसंबंधांच्या गोष्टी आहेत.

    रिलेशानी शिबिर आम्ही वेगवेगळ्या वयोगटांसाठी घेतो. १० ते १५ वयोगटासाठी रिलेशानी-१, कॉलेजच्या वयाच्या मुलांसाठी रिलेशानी-२, पंचविशीच्या तरुणांसाठी रिलेशानी-३, आयुष्यात स्थिरावलेल्या मध्यमवयीन लोकांसाठी रिलेशानी-४, ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी रिलेशानी-५ आणि रिलेशानी-६ अशी रचना आहे. रिलेशानी-७ दिव्यांग, भिन्नमती किंवा देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया अशा लोकांसाठी आहे.

    ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरांमध्ये व्याधींवर बोललं जातं. त्यातून येणारं नैराश्य, त्याचे नातेसंबंधांवर होणारे परिणाम यांवर चर्चा करतो. वृद्धांच्या लैंगिकतेचेही प्रश्न असतात, लिव्ह-इन, विवाहबाह्य संबंध यांचेही प्रश्न असतात. आमचे फिजिओथेरपीस्टही वृद्धांना व्यायाम शिकवतात. योगातला अध्यात्मिक भाग बाजूला ठेवून आम्ही त्याचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांसाठी करतो.

    ज्येष्ठ नागरिकांचाही प्रतिसाद चांगला आहे. त्यांना खूप बोलायचं असतं, पण संधी मिळत नाही. या शिबिरांमध्ये ते खूप बोलतात.

    मुलामुलींना एकत्र बसवून त्यांना शरीराबद्दलची, नातेसंबंधांची माहिती देताना विरोधाचेही प्रसंग आले. राजस्थानात एका गावातल्या लोकांनी कार्यशाळेत येऊन गोंधळ घातला होता. मात्र, हे प्रकार आम्ही व्यवस्थित हाताळले.

    डॉक्टर असूनदेखील आरोग्याचं काम करतो अशी ओळख तुम्ही करून देता, पण डॉक्टर असण्याचा या कामात उपयोग होतच असणार...

    हे काम करण्यासाठी खरं तर डॉक्टर असण्याची गरजच नाही. संवाद महत्त्वाचा आहे. आमचा १७ दिवसांचा कार्यक्रम पूर्ण करून नववी-दहावी शिकलेली स्त्रीसुद्धा ‘बेअरफूट डॉक्टर’ म्हणून काम करू शकते. आम्ही हा कार्यक्रम मेळघाटमध्ये राबवला आहे.

    प्रॅक्टिसिंग डॉक्टर असल्याने सामान्य माणसाशी संपर्क आला, त्यांच्या समस्या मला कळल्या, आरोग्यसंवादाचं बीज तिथून पेरलं गेलं. मात्र डॉक्टर असण्याचा एक अडसर म्हणजे लोक काही वेळा प्रश्न न विचारता, माझं म्हणणं मान्य करतात.

    अर्थात, आव्हानं अनेक आहेत. फक्त डॉक्टर असण्याचा नव्हे तर पुरुष असण्याचाही अडसर जाणवतो. उत्तर प्रदेशातल्या एका शिबिरात परपुरुषाला तोंड दाखवायचं नाही म्हणून स्त्रिया पाठ करून बसल्या होत्या. पुरुष कितीही पुरोगामी असला, तरी त्याच्याकडून नकळत वर्चस्व गाजवलं जाऊ शकतं. इंग्रजीत त्याला ‘मॅन्सप्लेनिंग’ असा चपखल शब्द आहे. ते ‘मॅन्सप्लेनिंग’ माझ्याकडूनही अनेकदा झालं, पण संवादी व्हायचं असेल तर हे सोडलं पाहिजे, हे लक्षात आल्यावर मी जाणीवपूर्वक ते कमी करत गेलो. शहरी असण्याचाही अडसर काही वेळा होतो. ग्रामीण भागातले लोक प्रमाणभाषेने दीपून जातात. त्यावेळी लोकांना तुमच्या भाषेत गाणं म्हणा, नाटक करा म्हणून उत्तेजन द्यावं लागतं. मग ते मोकळे होतात.

    आव्हानांबद्दल बोलायचं तर गेल्या काही वर्षांतल्या राजकीय परिस्थितीचा परिणामही कामावर होतो. हिंदू संस्कृती, धर्म याबद्दल तुम्ही प्रतिकूल बोलता अशी टीका अनेक लोक करतात. मात्र, माझ्या मते आम्ही संस्कृतीचंच पालन करतो. आपली संस्कृती बहिणाबाईंचीही आहे, तुकारामांचीही आहे, कबिराचीही आहे, बसवेश्वराचीही आहे आणि विज्ञानसंस्कृतीही आपल्याकडे पूर्वापार आहे. वर्णाश्रम, जातीयवाद, लिंगभेद या असंस्कृत बाबी आहेत. त्या आम्हाला मान्य नाहीत. आम्ही संविधान मानतो. त्यातली न्याय, समता, लोकशाही, मानव अधिकार आदी मूल्यं मानतो. त्यामुळे काही संस्थांसोबत आम्ही काम करू शकत नाही. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही करतो, पण काहींशी तो होतो, काहींशी होत नाही.

    ‘आरोग्यभान’च्या पुढच्या प्रवासाचं नियोजन कसं आहे?

    संस्थेची नोंदणी झाल्यामुळे निधी मिळण्याच्या शक्यता खुल्या झाल्या आहेत. त्यातून आणखी काही गोष्टी करता येतीलच. सध्या पहिली गोष्ट म्हणजे, आत्तापर्यंत केलेल्या कामाचं दस्तावेजीकरण आम्ही करणार आहोत. सध्याची कोअर टीम ११ जणांची आहे. सगळे उत्तम काम करणारे आहेत. कोअर टीममधून बाजूला होऊन मी नवीन, तरुण लोकांवर सगळं सोपवण्याचा विचार आहे. काम सुरू राहणार हे मात्र नक्की आणि ते वाढणार, विकसित होणार हेही नक्की.

    -oOo-



    सायली परांजपे
    सायली परांजपे

    लेखिका, अनुवादिका असलेल्या सायली परांजपे यांची ‘राया’ (अनुवादित), ‘शहीद भगतसिंग’, ‘क्रांतिज्योती सावित्राबाई फुले’, ‘सम्राट अशोक’ ही लघुचरित्रपर पुस्तके प्रकाशित आहेत. त्या ‘समतावादी मुक्त संवाद पत्रिके’च्या सल्लागार संपादक मंडळाच्या सदस्या आहेत.
    ईमेल: sayalee. paranjape@gmail.com



दुर्मीळ मूलद्रव्यांचा वैश्विक पेच

  • विश्वकारण

    China_RareEarth

    सर्व दुर्मीळ मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म बहुतांशी सारखे असले तरी प्रत्येकाचा एखादा, विशेषतः चुंबकीय किंवा विद्युत, गुणधर्म प्रकर्षाने उठून दिसतो. इतका की आधुनिक तंत्रशास्त्र त्यांच्याशिवाय चालणार नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यांच्याशिवाय पवनउर्जा, सूर्यउर्जेची तावदाने, विद्युतवाहने, एलईडी दिवे, स्मार्टफोन, बॅटऱ्या, सपाट पडद्यांचे टीव्ही, सेमिकंडक्टर चिप्स, अद्ययावत कॅमेरांची भिंग, एमआरआय तंत्र, फायबर ऑप्टिक्स या नेहमीच्या वापरातील वस्तूंचं उत्पादन बंद होईल. त्याखेरीज एफ-३५ सारखी अत्याधुनिक विमानं, उपग्रह, पाणबुड्या, डिजिटल उपकरणं यांसारख्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक अशा वस्तूंच्या उत्पादनाचं पान हलणार नाही.

    सर्वव्यापी मूलद्रव्ये आणि चीनची कुरघोडी

    रेअर अर्थ धातू आणि लोखंड यापासून बनलेल्या मिश्रधातूंचे मॅग्नेट (लोहचुंबक) फक्त लोखंडापासून बनवलेल्या मॅग्नेटपेक्षा १५ पटीने प्रबळ असतात. हे वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक चिपसारखे सर्वव्यापी असतात. नाण्याच्या आकाराचे मॅग्नेट वायपरच्या गतिप्रेरकांमध्ये (मोटरमध्ये), खिडक्यांच्या काचा वर-खाली करणाऱ्या, सीट मागे-पुढे करणाऱ्या गतिप्रेरकांमध्ये डझनांनी वापरले जातात. तर मोठ्या आकाराचे मॅग्नेट वाहनांच्या मोठ्या यंत्रांमध्ये, ब्रेकमध्ये, संगणकांच्या हार्ड डिस्कमध्ये आणि मॉनिटरमध्ये, इंधनावर चालणाऱ्या गाड्यांमध्ये ३० किलो वजनाचे तर विद्युतगाड्यांमध्ये २०० किलो वजनाचे मॅग्नेट लागतात. तेव्हा मारुती सुझुकी गाड्यांना महिन्याला साधारण सहा हजार टन मॅग्नेटची गरज आहे, तर बीवायडी विद्युतगाड्यांना महिन्याला सहा लाख टन मॅग्नेटची!

    भविष्यकालीन तंत्रज्ञानापैकी हॅड्रोजनचा ऊर्जा म्हणून वापर करताना त्याचा सुरक्षितपणे साठा करणं आणि वाहतूक रेअर अर्थच्या सहाय्याशिवाय करणं अशक्य आहे. तसंच ताशी ६०० किमीपेक्षा जास्त वेगात धावणाऱ्या गाड्यांचं रूळावरचं घर्षण टाळण्यासाठी त्यांना रूळावरून उचलणं गरजेचं असतं (Magnetic levitation). त्यासाठी अत्यंत प्रभावी चुंबकांची गरज असते. तिथेही रेअर अर्थ मॅग्नेटना पर्याय नाही.

    वैद्यकीय उपकरणं लुटिटियम, थुलियम, अर्बियम या रेअर अर्थ धातूंशिवाय चालणार नाहीत. तर लढाऊ विमानांना या धातूंचा पूर्ण संच अधिक अॅण्टिमनी हा तितकाच दुर्मीळ धातू अतिशय गरजेचे आहेत. या धातूंचा अमेरिकेला होणारा पुरवठा चीनने बंद केल्याने युक्रेन आणि इस्राइलची फार अडचण झाली आहे. तेथे युद्धविराम व्हायला, ते एक मोठे कारण आहे.

    अमेरिकेची मुहूर्तमेढ, चीनची मुसंडी

    रेअर अर्थच्या उद्योगात प्रथम लक्ष घातलं, अमेरिकेने १९६५मध्ये. अमेरिकन एअर फोर्सने त्याच सुमारास समॅरियम आणि कोबॉल्ट यांच्यापासून मॅग्नेट बनवले. अर्थात ते फार महाग पडतात. त्यांचा आजचा भाव १ किलोला १० डॉलर आहे आणि ते ७००० तापमानापर्यंत वापरता येतात. (उदा. लढाऊ विमानांमध्ये) तितक्याच ताकदीच्या पण त्यांच्यापेक्षा खूप स्वस्त, किलोला २ डॉलर, अशा लोखंड, नीओडिमिअम आणि बोरॉन यांच्यापासून बनलेल्या मॅग्नेटचा शोध अमेरिकेच्या जनरल मोटर्सने आणि जपानच्या सुमीटोमो स्पेशल मेटल्सने १९८४ साली लावला. योगायोगाने चीनने त्याच वर्षी रेअर अर्थच्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. चीनचे तत्कालीन नेते डेंग शाओ-पिंग यांची दूरदृष्टी अशी की त्यांनी त्याच वेळी रेअर अर्थचं महत्त्व ओळखलं. जसा सौदी अरेबिया तेलाचा अनभिषिक्त सम्राट आहे, तसा चीन रेअर अर्थचा सम्राट बनला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं!

    त्या दृष्टीने चीनने प्रयत्न चालू केले. सुरुवात केली खनिजं शोधण्यापासून. आज जगातील उत्तम श्रेणीच्या नऊ कोटी टन खनिजांपैकी साडे चार कोटी टन चीनकडे आहेत. त्याच्या निम्म्याने प्रत्येकी व्हिएतनाम आणि ब्राझिलमध्ये आहेत. भारतात आतापर्यंत सापडलेली खनिजे फक्त एक चतुर्थांश कोटी टन आहेत आणि तीही फार उच्च श्रेणीची नाहीत. आपले शेजारी पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे याबाबतीत अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांचा डोळा असलेल्या ग्रीनलंडमध्ये खनिजे दहा लाख टनाच्या आसपास आहेत, तर रेअर अर्थसाठी अमेरिकेबरोबर करार करणारा युक्रेन या बाबतीत खंक असण्याची शक्यता दांडगी आहे. खणून काढलेल्या खनिजांपैकी ६५ टक्के चीनमध्ये आहेत, तर १५ टक्के (चीननेच खणलेली) ब्रम्हदेशात आहेत.

    Composites
    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप कितीही गमजा मारत असले आणि चीनला या ना मार्गाने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असले, तरीही त्यांच्यातला बेपारी एका मर्यादेपलीकडे दादागिरी करू शकत नाही, याचे एकमेव कारण चीनची दुर्मीळ मूल्यद्रव्यांच्या क्षेत्रातली मक्तेदारी हे आहे...

    खनिजं एकमेकांपासून वेगळी करणं आणि त्यांपासून धातू बनवणं हे अतिशय कटकटीचं काम आहे. त्यात आणखी एक अडचण म्हणजे त्यांपासून शरीराला घातक असे किरणोत्सारी धातू संपूर्णपणे बाहेर काढावे लागतात. अशी संपूर्ण प्रक्रिया करणारा चीन हा जवळजवळ एकटाच देश आहे. चीनमध्ये संपूर्ण जगाच्या ९२ टक्के म्हणजे वर्षाला अडीच लाख टन, धातूची प्राप्ती होते तर मलेशियामध्ये ६ टक्के. समॅरियम हा धातू शंभर टक्के चीनकडेच आहे, असं यू. एस. जिऑलॉजिकल सर्व्हे या संस्थेनं म्हटलं आहे. तुलनेसाठी अमेरिकेत दर वर्षी ४४ हजार टन रेअर अर्थ तयार होतात, तर भारतात २ हजार टन.

    नवीन तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या इतर धातू आणि अधातू यांच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. ग्रॅफाइट हे मुख्यतः बॅटरीसाठी लागणारं मूलद्रव्य आहे. त्याचे ६० टक्के साठे चीनमध्ये आहेत. (म्हणजे ते कष्टाने शोधून काढले आहेत.) जगातील तयार ग्रॅफाइटपैकी ९५ टक्के चीनमध्ये आहेत. गॅलियम, इंडियम, आर्सेनिक यांची वस्तुस्थिती तीच आहे. अँटिमनी तर १०० टक्के चीनकडे आहे. अमेरिका आज ७० टक्के रेअर अर्थ धातू चीनकडून आयात करते.

    भारताचे डोळे इतरांकडे...

    भारतात पंतप्रधान पंडित नेहरुंनी दूरदृष्टीने स्वातंत्र्यानंतर लगेच, म्हणजे १९५० साली, रेअर अर्थ निर्मितीचा निर्णय घेतला. त्यानुसार इंडियन रेअर अर्थ नावाचा सार्वजनिक उपक्रम चालू केला. त्याचं मुख्य कार्यालय मुंबईत असलं तरी कारखाने केरळ, तामिळनाडू, ओरिसा येथील खाणीच्या ठिकाणी उभे केलेले आहेत. तरीही या शर्यतीत आपण प्रचंड मागे आहोत. आणि ज्या अमेरिकेने या शास्त्राची मुहूर्तमेढ रोवली, तीही आपल्याला मदत करायच्या परिस्थितीत नाही. कारण ती स्वतःच रेअर अर्थचं फारसं उत्पादन करत नाही. तिने कॅलिफोर्निया या राज्यातील माउंटन पास या गावात १९८० साली काढलेला कारखाना २००० साली बंद केला. अमेरिकेतल्या बोलघेवड्या राजकारण्यांनी तो परत सुरु करायच्या वल्गना केल्या असल्या तरी त्यातून काही निष्पन्न होत नाही, असं दिसतंय. (२०१० साली त्या वेळच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिटन यांनी असे कारखाने लवकर काढायचं आश्वासन दिलं होतं.)

    बऱ्याच विश्लेषकांच्या मते, रेअर अर्थचं जहाज अमेरिकेच्या किनाऱ्यावरून निघून गेलं आहे. तो उद्योग चालू करायला ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि वीस वर्षांचं नियोजन पाहिजे. आणि अमेरिकेला तत्त्विकदृष्ट्याच नियोजनाचं वावडं आहे. (नियोजनाला अमेरिकेत ‘जबरी अर्थव्यवस्था’ म्हणजे command economy म्हणतात!) शिवाय या उद्योगाला लागणारी यंत्रसामुग्री फक्त चीनमध्येच आहे. तिथे आज या क्षेत्रात सव्वा लाख कामगार, इंजिनियर, व्यवस्थापक कार्यरत आहेत. कामगारांना तीन ते चार वर्षांचं प्रशिक्षण मिळतं. ३५ युनिव्हर्सिटीत रेअर अर्थवर पदवी पाठ्यक्रम आहेत. तिथून दर वर्षी दोन हजार इंजिनियर बाहेर पडतात. १९९८ साली तिथे नवीन युगासाठी लागणाऱ्या मूलद्रव्यांवर संशोधन करणारी मोठी संस्था स्थापन केलेली आहे.

    मक्तेदार चीनचा वरचश्मा

    गेल्या वीस वर्षांत चीनच्या संशोधकांनी वीस हजार पेटंट दाखल केली आहेत. खाणीतलं जीवघेणं काम करायला कृत्रिम प्रज्ञेसह रोबो सज्ज आहेत. या सर्वांना टक्कर द्यायला कोणता हरीचा लाल तयार होईल? २०१० साली जपानने तो प्रयोग करून बघितला आणि त्यात हात पोळून घेतले. दक्षिण कोरियात सॅमसंग, एल.जी, एस. के हायनिक्स अशा राक्षसी आकाराच्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आहेत. त्यांचा व्यापार चीनच्या सहकार्याशिवाय ठप्प पडू शकतो. म्हणून कोरियाने कझाकिस्तानमध्ये खनिजं शुद्धीकरणाचा आणि धातू बनवायचा कारखाना काढण्याचं मनावर घेतलं. खनिजांच्या बाबतीत कझाकिस्तान नशीबवान आहे. त्या देशात वीस कोटी टन खनिजं आहेत आणि त्यापैकी दीड लाख टन रेअर अर्थची आहेत. सोव्हिएट युनियनच्या जमान्यात तिथे १९ धातू बनवायचे कारखाने होते. नंतरच्या काळात ते बंद पडले. कोरियाने त्यांचं पुनरुज्जीवन केलं, त्यासाठी ३ अब्ज डॉलर खर्च केले. इतके करून उत्पादनाचा खर्च एक किलोला ७ डॉलरच्या वर जायला लागला. हाच खर्च चीनमध्ये २ डॉलरच्या आसपास होता. याची कारणं तीन वीजेचा खर्च, कामगारांची कार्यक्षमता आणि पुरवठा साखळीचा अभाव. कोरियाला तो कारखाना बंद करायला लागला. या अनुभवावरून असल्या उपद्व्यापात भारताने किती पडावे हे आपण ठरवले पाहिजे.

    Mining_Compete
    जगावर राज्य दोन मार्गांनी करायचे, एक विकसनशील, कंगाल देशांना शस्त्रास्त्र पुरवठा करत राहायचा आणि दोन, नैसर्गिक साधनसंपत्तीवर सर्वंकष ताबा मिळवायचा. सध्या ट्रंप महाशय हाच प्रयोग उघडपणे करताहेत. परंतु, खमक्या चीनने त्यांच्या नाकात दम आणलाय...

    चीनशी अशी टक्कर घ्यायची खरं म्हणजे गरजही लागली नसती. सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण अमेरिकेच्या दुसऱ्या ‘स्वातंत्र्यदिनी’ ट्रंपसाहेबांनी चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंवर १४५ टक्के कर लावला आणि मोटारगाड्या बनवणाऱ्या कंपन्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. फोर्ड कंपनीला शिकागो येथील कारखाना बंद करायला लागला. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या म्हणण्याप्रमाणे तीन महिन्यांतच मॅग्नेटचा पुरवठा संपणार आहे. भारतातीलही मोटारगाड्या बनवायचे कारखाने मॅग्नेटच्या कमतरतेमुळे बंद होतील अशी भीती आहे. ई-स्कूटरचा कारखाना लवकरच बंद होईल, असा इशारा बजाज ऑटोने दिला आहे. आपल्या मोटर इंडस्ट्रीचा उद्योग १०,००० अब्ज रुपयांचा आहे आणि देशाच्या सकल उत्पन्नाच्या ७ टक्के आहे. यात मिळणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारावर दोन कोटी कुटुंबांचं पोट आहे. आपल्याला चीनवर अवलंबून राहायची गरज नाही, अशा गर्जना आपल्या राजकर्त्यांनी कितीही केल्या, तरी आपल्यावर येऊ घातलेला प्रसंग फार भीषण आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

    जोपर्यंत अमेरिका तिने चीनवर घातलेली निर्यातीची बंधनं काढत नाही, तोपर्यंत चीन आपली बंधनं काढणार नाही, असं चीननं ठासून सांगितलं आहे. आणि चीनची बंधनं आता सर्व देशांवर आहेत. त्या वादावर चाललेल्या द्वीपक्षीय वाटाघाटीतून अमेरिका आपली कातडी वाचवून घेईलसुद्धा, पण बाकीच्या देशांचं काय? हे धातू पुरवण्यासाठी कंपन्यांनी अर्ज करावेत आपण त्यावर विचार करू असं आश्वासन चीननं दिलं आहे. पण भारताचे आणि चीनचे प्रेमाचे संबंध लक्षात घेता आपले अर्ज सर्व अर्जाच्या तळाशी ठेवले जात आहेत, ही बाब काही फारशी उत्साहवर्धक नाही.

    -oOo-



    डॉ. मोहन द्रविड
    डॉ. मोहन द्रविड

    डॉ. द्रविड हे फिजिक्समधील पीएच.डी. असून राजकारण, विज्ञान, इतिहास या विषयांवरील त्यांचे लिखाण वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध होते. त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असून ‘मुक्काम पोस्ट अमेरिका’ हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन देणारे पुस्तक ‘रोहन प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आहे.
    ईमेल: mohan.drawid@gmail.com.



रविवार, १० ऑगस्ट, २०२५

वीज क्षेत्रातील ‘कारभार’ प्रक्रिया आणि अर्थ-राजकीय व्यवस्था बदलांचा अभ्यास

  • संशोधनयात्रा

    Electricity_Thesis

    आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया विविध देशांत सुरू झाल्यानंतर अकादमिक पातळीवर या विषयावरील चर्चाविश्व आकाराला आले. राज्यशास्त्र तज्ज्ञांनी या प्रक्रियेच्या परिणामी राज्यसंस्थेच्या (स्टेट) भूमिकेत काय बदल होतात, यावर विश्लेषणात्मक मांडणी केली. यामध्ये त्यांनी विविध प्रश्नांचा ऊहापोह केला. उदारीकरणानंतर विविध क्षेत्रातून राज्यसंस्था माघार घेते किंवा कसे? या प्रक्रियेमुळे राज्यसंस्थेच्या सार्वभौमत्वावर गंडांतर येते का? समाजातील विविध हितसंबंधी गटांवर या प्रक्रियेचे काय परिणाम होतात? राज्यसंस्था या गटांना कशा पद्धतीने सांभाळते? इत्यादी.

    भारतातही या संदर्भात विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांचा वाढत्या प्रभावाचा मुद्दा चर्चिला जाऊ लागला. ‘राज्यसंस्थेची माघार’ या सिद्धांतनाने (थिअरी) मुख्यतः तंत्रज्ञानात्मक आणि वित्तीय बदलांमुळे राज्यसंस्थेचे अधिकार कसे संकुचित होतात, यावर भर दिला. तर काही अभ्यासकांनी राज्यसंस्थेची भूमिका कमी होण्याऐवजी पुनर्घटित होत आहे, अशी मांडणी केली. राज्यसंस्था काही बाबतीत अधिक बलशाली तर काही बाबतीत दुर्बल बनत असल्यामुळे हे बदल वरवर दिसतात तितके एकतर्फी नाहीत, असे म्हटले गेले.

    पीएच.डी. संशोधनाची पार्श्वभूमी

    १९८० च्या उत्तरार्धात कारभार (गव्हर्नन्स) ही संकल्पना उदयाला आली आणि तिने राज्यसंस्थेला एक बहुलतावादी (प्लुरालिस्ट) यंत्रणा म्हणून सादर केले. या मांडणीनुसार, राज्यसंस्था ही समाजातील एकमेवाद्वितीय अशी संस्था नसून खासगी क्षेत्र, नागरी समाज, आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या सहकार्याने निर्णय घेणारी एक यंत्रणा आहे. थोडक्यात, सार्वभौम राजकीय सत्तेची वाहक म्हणून राज्यसंस्थेचे जे सर्वोच्च स्थान कोणत्याही समाजात अभिप्रेत असते, त्याला या मांडणीने प्रश्नांकित केले. त्या आधी नवउदारमतवादी मांडणीने कल्याणकारी राज्याच्या प्रतिमानावर प्रखर टीका करून राज्यसंस्थेचे व्यापक अधिकार हीच कशी मूळ समस्या आहे, यावर भर दिला होता. या चर्चाविश्वामधून मिनिमम गव्हर्मेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स तसेच गव्हर्नन्स विदाउट गव्हन्मेंट यासारख्या उद्दिष्टांचा जन्म झाला. भारतात पायाभूत सुविधांच्या (इन्फ्रास्ट्रक्चर) क्षेत्रात १९९१ नंतर जे संरचनात्मक बदल झाले, त्यामधून राज्यसंस्थेची भूमिका बदलणे अपेक्षित होते. या पार्श्वभूमीवर संरचनात्मक बदलांमुळे लोकशाही कारभाराच्या ढाच्यावर काय परिणाम होतो, हे अभ्यासण्यासाठी एक केस स्टडी म्हणून मी महाराष्ट्रातील वीज क्षेत्राचा अभ्यास माझ्या पीएचडी संशोधनासाठी केला. त्याचे शीर्षक आहे: Changing Paradigm of Democratic Governance: A Case Study of Electricity Sector Reforms in Maharashtra. यासाठी मी १९९९ साली ‘महाराष्ट्र वीज नियामक आयोग’ स्थापन झाल्यानंतरचा दहा वर्षांचा काळ निवडला. या काळात वीज नियामक आयोगाने वीज दर ठरविण्याची जी प्रक्रिया महाराष्ट्र राज्यात (मुंबई वगळून) पार पाडली, तिचा अभ्यास केला.

    संरचनात्मक बदलाचा आलेख

    वीज क्षेत्रातील संरचनात्मक बदलाचे तीन टप्पे आहेत. एक- वीजनिर्मिती क्षेत्रात राज्यसंस्थेची मक्तेदारी संपवून खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी हे क्षेत्र खुले करणे आणि त्याद्वारे स्पर्धेला चालना देणे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील एन्रॉन प्रकल्प. दोन- स्वायत्त नियामक यंत्रणांची निर्मिती करून राज्यसंस्थेचे नियमनाचे अधिकार कमी करणे. तसेच, वीज वितरणातील राज्यसंस्थेची मक्तेदारी संपवून वीज वितरणाचे खाजगीकरण करणे. आणि तीन- वीज कायदा २००३, ज्याद्वारे बाजाराभिमुख असे अनेक बदल वीज क्षेत्रात सुचवण्यात आले. माझ्या संशोधनाचा भर यामधील दुसऱ्या टप्प्यावर होता.

    ElectricityBills
    प्रशासकीय पातळीवरून होणाऱ्या संरचनात्मक बदलाचा थेट परिणाम लोकशाहीकेंद्री प्रक्रिया पूर्ण करताना होतो, तेव्हा वीज पुरवठादार कंपन्यांपेक्षाही वीज ग्राहकांना त्याचा सर्वाधिक फटका बसताना दिसतो. (प्रातिनिधिक छायाचित्र)

    अशाच प्रकारचे बदल, २००५ नंतर जल, निवास, शिक्षण अशा इतर क्षेत्रातही सुचवले जात होते. मी वीज क्षेत्राची निवड केली, याचे कारण आर्थिक विकासाबरोबरच लोकांच्या दैनंदिन आयुष्यात विजेची उपलब्धता मोठी भूमिका बजावते. तसेच २००८ साली हा विषय ठरवला, तेव्हा वीजक्षेत्रात नियामक आयोग स्थापन होऊन जवळपास एक दशक झाले होते. तेव्हा इतर क्षेत्रांसाठी वीज क्षेत्रातील बदलांचा अभ्यास महत्त्वाचा ठरेल, असे मला वाटले. हा विषय सुचण्याचे कारण म्हणजे, तेव्हा ‘प्रयास’ या स्वयंसेवी संस्थेच्या ‘संसाधने व उपजीविका गटा’त संशोधक म्हणून काम करत होते. आमच्या कामाचा एक भाग जलक्षेत्रातील संरचनात्मक बदलांचा अभ्यास आणि जनहिताच्या दृष्टीने धोरणवकिली (अॅडव्होकसी) असा होता. हे काम करत असताना वीज क्षेत्रातील नियामक बदलांचा संदर्भ वारंवार यायचा. या प्रक्रियेत ‘प्रयास ऊर्जा गटा’ने सुरुवातीपासून प्रभावी हस्तक्षेप केला होता. २००५ साली जलक्षेत्रातही स्वायत्त नियामक यंत्रणा स्थापन झाली. एकप्रकारे वीज क्षेत्रात यापूर्वी झालेल्या काही प्रक्रियांची पुनरावृत्ती जलक्षेत्रात घडण्याची शक्यता होती. तेव्हा मला वाटले, की वीज क्षेत्रामध्ये या बदलांचा नक्की काय परिणाम झाला, राज्यसंस्थेची भूमिका कितपत बदलली आणि नागरी समाजाने केलेला हस्तक्षेप किती प्रभावी ठरला, याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. आमच्या गटाचे समन्वयक सुबोध वागळे यांच्याशी चर्चा करताना ‘प्रयास ऊर्जा गटा’ने अवलंबलेल्या व्यूहनीतीचे आकलन होत असे. तरीदेखील वीज क्षेत्रातील घडामोडी फार तांत्रिक स्वरूपाच्या असल्यामुळे प्रयास ऊर्जा गटाच्या कामाबद्दल त्यावेळी मला अत्यंत वरवरची माहिती होती.

    अभ्यासपद्धती आणि परस्परसंवाद

    माझे पीएच.डी.चे मार्गदर्शक पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक यशवंत सुमंत हे होते. माझे एम. ए.चे शिक्षण मी या विभागातून पूर्ण केले होते. राजकीय विचार आणि सिद्धांत यामध्ये सुमंतसरांची विशेष तज्ज्ञता होती. आमच्या सुरुवातीच्या बैठकांमध्ये संशोधन आराखडा तयार करण्याविषयी आम्ही चर्चा केली. गुणात्मक संशोधन पध्दतीचा वापर या अभ्यासासाठी करण्याचे ठरले. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या स्थापनेनंतर वीज क्षेत्रात पारदर्शकता येऊन अधिकृत आकडेवारी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली होती. तसेच वीज दर ठरवण्याच्या प्रक्रियेत ग्राहकांचे मत ऐकले जावे, यासाठी नियामक आयोगाने १९९९ नंतर महाराष्ट्रात सहा ठिकाणी जनसुनावणीची प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली. वीज दरवाढ प्रस्ताव अतिशय तांत्रिक स्वरूपाचा असूनदेखील या प्रक्रियेतील नागरी समाजाचा सहभाग उत्तरोत्तर वाढत गेला. यामध्ये हितसंबंधी गट, स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, शासकीय व खाजगी यंत्रणा इत्यादींचा समावेश होता. मी चार प्रमुख मुद्द्यांच्या संदर्भात जनसुनावणीच्या प्रक्रियेचे विश्लेषण केले: १) वीज वहन व वितरणातील हानी, २) वीज मापन आणि वीज वितरण खर्चाची वसुली, ३) थकबाकी आणि ४) अनुदान.

    महाराष्ट्रात नागरी गटांनी वीज नियामक आयोगाच्या माध्यमातून वीज क्षेत्राचा कारभार सुधारण्यासाठी केलेला हस्तक्षेप लक्षात घेऊन मी ‘प्रयास ऊर्जा गटा’ने केलेल्या तांत्रिक-आर्थिक विश्लेषणाचा एक अति-संक्षिप्त आढावा माझ्या प्रबंधात घेतला. या प्रक्रियेचे विश्लेषण करताना मी सुमंतसरांबरोबर ज्या गोष्टींची चर्चा केली, त्यामध्ये मुख्यतः या प्रक्रियेचे मूल्यमापन करण्यासाठी कोणते निकष वापरायचे, जनसुनावणीत सहभागी होणाऱ्या सर्व संस्था आणि व्यक्तींना एकाच श्रेणीत ठेवायचे, की त्यांच्या उद्दिष्टांनुसार त्यांचे गट करायचे, त्यांच्यासाठी ‘नागरी समाज’ ही कोटी वापरणे योग्य ठरेल का, या गोष्टींचा समावेश होता. सुमंतसरांनी आपल्या विषयाला उपयुक्त अशा संकल्पनांचा उपयोग कसा करायचा, याचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे लिखाणात अचूकता आणण्याच्या दृष्टीने अनेक सूचना सर वेळोवेळी करीत.

    संशोधन साधने आणि विश्लेषण

    माझ्या संशोधनाच्या प्राथमिक साधनांमध्ये वीज क्षेत्रावरील शासकीय अहवाल, महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने सादर केलेले वीज दरवाढ प्रस्ताव, त्यावर नागरी समाजातील संस्था व व्यक्ती यांनी सादर केलेली टिपणे/प्रतिक्रिया आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने यावर दिलेले आदेश, यांचा समावेश होता. तसेच वीज क्षेत्रातील निर्णयकर्ते व नागरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या मुलाखतींचाही समावेश होता. मी मुख्यतः ऊर्जामंत्री, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, नियामक आयोगाचे सदस्य व अध्यक्ष आणि नागरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या मुलाखती घेतल्या. २००८ साली मला ‘आईसीएसएसआर’ची पीएच.डी. संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे मला दोन वर्षे पूर्ण वेळ संशोधनाला देणे शक्य झाले.

    संशोधनाकरता मी विविध प्रकारचे संदर्भ साहित्य उपयोगात आणले. भारतातील आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेचे वेगवेगळे टप्पे आणि या टप्प्यांमध्ये राज्यसंस्था आणि समाज यांचे परस्परसंबंध कसे बदलले, यावरील लिखाणाने मी सुरूवात केली. भारतातील राज्यसंस्थेचे स्वरूप आणि राज्यसंस्थेने हितसंबंधी गटांसंदर्भात वेळोवेळी वापरलेली रणनीती यामधून राजकीय अर्थशास्त्र समजून घेण्यास मदत झाली. याचबरोबर, नागरी समाज आणि लोकशाही यावरील सिद्धांतनाचा आढावा घेतला. उदारमतवादी लोकशाहीच्या मर्यादा आणि सहभागी (पार्टिसिपेटरी) लोकशाही, वाद-संवादी (डेलिबरेटिव्ह) लोकशाही या संकल्पना मला जनसुनावणी प्रक्रियेचे विश्लेषण करताना उपयुक्त ठरल्या. तसेच जागतिकीकरणाच्या काळात नागरी समाजाच्या संकल्पनेला मिळालेले बळ व त्याची डाव्या विचारसरणीने केलेली चिकित्साही उपयुक्त ठरली.

    मी स्वतः स्वयंसेवी संस्थेत काम केलेले असल्यामुळे स्वयंसेवी संस्थांचा हस्तक्षेप अराजकीय स्वरूपाचा ठरतो का? त्यांच्या कामाची परिणति तज्ज्ञाधिष्ठित व्यवस्था बळकट करण्यात होते का? अशा प्रश्नांमध्ये मला रस होता. त्यादृष्टीने आणि अभ्यासाला आवश्यक संकल्पनात्मक स्पष्टता येण्यासाठी या वाचनाचा उपयोग झाला. या काळात सुमंतसरांशी माझ्या अनेकदा चर्चा होत. त्यामधून विचारांमध्ये स्पष्टता येण्यास मदत झाली.

    महाराष्ट्रातील वीज क्षेत्राचा आढावा घेताना मी मुख्यतः केंद्रीय विद्युत प्राधिकरण, नियोजन मंडळ आणि विश्व बँकेचे अहवाल यांचा उपयोग केला. भारतातील सार्वजनिक संस्थांची (पब्लिक इन्स्टिट्यूशन्स) कार्यपद्धती आणि स्वायत्ततेसंबंधी राज्यशास्त्र तज्ज्ञांनी केलेले लिखाण मला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विश्लेषण करताना संदर्भ म्हणून उपयुक्त ठरले. मी एका प्रकरणात महाराष्ट्रातील एन्रॉन प्रकल्पाचा आढावा घेतला. याचे कारण हा प्रकल्प जरी योजल्याप्रमाणे प्रत्यक्षात आला नाही, तरी त्यामुळे पुढच्या सर्व घडामोडी प्रभावित झाल्या. एन्रॉन प्रकरण समजून घेण्यासाठी मी महाराष्ट्राची राजकीय अर्थव्यवस्था आणि राजकीय नेतृत्त्वाची जडणघडण या विषयावरील साहित्य वाचले. त्यामधून वीज क्षेत्राची वाटचाल-एकीकडे उद्योग/शहर केंद्रित धोरणे आणि दुसरीकडे शेतीला अनुदानित वीज पुरवठा-समजून घेता आली. एन्रॉन प्रकल्पामुळे वैश्विक भांडवलाची व्यूहनीती आणि आपल्या नियामक संस्थांनी केलेल्या तडजोडी दिसून आल्या.

    वीज क्षेत्रातील नियामक यंत्रणेची चिकित्सा करण्यासाठी मी विश्व बँकेच्या मांडणीमधून पुढे येणाऱ्या ‘संस्थात्मक सुधारणा आणि कारभार’ (गव्हर्नन्स) या मांडणीची चिकित्सा केली. तसेच नवउदारमतवादी विचार वीज क्षेत्राच्या पुनर्रचनेच्या मुळाशी कसा दिसतो, याचे विवेचन केले. राज्यसंस्था केंद्री आणि बाजार-केंद्री अशा दोन कारभार प्रणालींचे प्रतिबिंब १९९०च्या आधी आणि नंतर वीज क्षेत्रात दिसते का, हे बघण्याचा मी प्रयत्न केला. अर्थात प्रत्यक्ष अमलबजावणीच्या स्तरावर या दोन प्रणालींची सरमिसळ कशी होते, हे माझ्या नंतरच्या विवेचनात स्पष्ट झालेच.

    संशोधनादरम्यानचे उपयुक्त प्रशिक्षण

    या दरम्यान माझी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठामध्ये ‘व्हिजिटिंग रिसर्च फेलो’ म्हणून निवड झाली. आमच्या विभागातील प्राध्यापक सुहास पळशीकर यांनी यासाठी (इतर नावांबरोबर) माझ्या नावाची शिफारस केली होती. याद्वारे मी तेथील पीएच.डी. कार्यक्रमात एका सत्रासाठी सहभागी झाले. या कार्यक्रमाचा भर संशोधन आराखडा तयार करणे यावर होता. यामध्ये संशोधन पद्धतींबरोबरच ‘विकास’ या संकल्पनेवर केंद्रित काही कोर्सेस होते. संशोधन सुरू करण्याआधी त्या विषयावरील प्रकाशित साहित्याचे पुरेसे वाचन करून मगच संशोधन आराखडा तयार करण्यावर तेथे मोठा भर होता. तेथील पीएच.डी. विद्यार्थ्यांना यासाठी साधारण एक वर्षांचा कालावधी असे. तसेच अनुभवजन्य (एम्पीरिकल) संशोधन सिद्धांतनाशी जोडण्यावर भर होता. उपलब्ध सिध्दांतनाच्या साहाय्याने सामाजिक-राजकीय प्रक्रियेचे विश्लेषण करतानाच नवीन संकल्पनांची निर्मिती संशोधकांनी करावी, यासाठी प्रयत्न केले जात. विविध विद्याशाखांचे पीएच.डी. संशोधक नियमित भेटत असल्यामुळे वैचारिक आदानप्रदान होऊन संशोधनाला पूरक वातावरण निर्माण व्हायचे. तसेच पीएच.डी. संशोधकांना आपल्या संभाव्य संशोधनाविषयी अनेक अभ्यासकांसमोर बोलावे लागायचे. तेथील प्राध्यापकांचे संशोधन प्रकल्प वेगवेगळ्या देशांत असल्यामुळे त्यांच्या पद्धतींमध्ये तुलनात्मक दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर होता. कोणत्याही विषयावर चर्चा होत असताना लॉटिन अमेरिकेत काय परिस्थिती आहे, आफ्रिकेत काय झाले, असे संदर्भ वारंवार येत. संशोधक विद्यार्थी देखील विविध देशातून येत असल्यामुळे चर्चा एका देशापुरती मर्यादित कधी राहात नसे. तेथील विद्यापीठामधील निधी आणि संसाधनांची मुबलकता संशोधन केंद्री वातावरण निर्माण करण्यास हातभार लावते. उदाहरणार्थ, पीएच.डी. विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून पुस्तके आपल्या नावावर नेण्यासाठी कमाल मर्यादा ७५ पुस्तके आणि कालमर्यादा सहा महिने होती. ब्राऊन विद्यापीठातील अनुभवाचा उपयोग मला माझ्या संशोधनामध्ये अधिक बारकावे आणण्यासाठी तसेच युक्तिवाद मांडण्यासाठी झाला.

    संशोधन प्रक्रियेदरम्यानची आव्हाने

    संशोधन करताना मला जाणवलेली प्रमुख अडचण म्हणजे तांत्रिक बाबींचे आकलन. वीज क्षेत्राशी संबंधित सर्व साधनांमध्ये आकडेवारी व तांत्रिक माहितीचा मोठा भाग होता. त्यामुळे माझा बराच वेळ विविध तांत्रिक गोष्टी समजावून घेणे आणि वीज क्षेत्रातील हितसंबंधांच्या संदर्भात त्यांचा अन्वयार्थ लावणे, यामध्ये गेला. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे- द डेव्हिल लाइज इन द डिटेल्स त्याप्रमाणे कोणत्याही क्षेत्रातील सत्ताकारण समजावून घ्यायचे तर तांत्रिक तपशील माहीत असणे गरजेचे असते. त्या क्षेत्रातील संबंधित व्यक्तींच्या मुलाखती घेताना, त्यांच्या बोलण्यातील खाचाखोचा समजण्यासाठी त्याची गरज असते. तसेच त्यांना प्रतिप्रश्न विचारण्यासाठी किंवा आपल्याला मिळालेल्या माहितीची छाननी करण्यासाठी तांत्रिक बाजूची समज विकसित करावी लागते. मी जेव्हा वीज क्षेत्राशी संबंधित लोकांच्या मुलाखती घेऊ लागले, तेव्हा तांत्रिक तपशील सुटून जाऊ नयेत म्हणून सुरुवातीला ध्वनिमुद्रण करायचे. पण मला लवकरच असे लक्षात आले की त्यामुळे, विशेषतः सरकारी अधिकारी, फारच वरवरची उत्तरे देतात. तेव्हा माझ्यापुढे असा पेच निर्माण झाला की ध्वनिमुद्रणाशिवाय या अधिकाऱ्यांनी दिलेली तांत्रिक उदाहरणे मी नंतर वापरू शकेन का? शिवाय एखादी व्यक्ती बोलत असताना न समजलेल्या संज्ञांचे मी दरवेळी तत्काळ स्पष्टीकरण विचारू शकत नसे. कारण त्यामुळे बोलण्याचा ओघ तुटून मुख्य मुद्दा बाजूला पडण्याची भीती असे. तेव्हा त्या संज्ञांचा अर्थ नंतर तपासणे ध्वनिमुद्रणामुळे सोपे जाई. मात्र लोकांच्या त्रोटक उत्तरांना वैतागून मी एकदा एका वरिष्ठ अभियंत्याच्या मुलाखतीत रेकॉर्डर वापरला नाही आणि ती मुलाखत उत्कृष्ट झाली. त्यानंतर मी मुलाखतींचे ध्वनिमुद्रण करणे थांबवले.

    नियामक आयोगाच्या स्थापनेनंतर वीज क्षेत्राचे राजकीय अर्थशास्त्र ठसठशीतपणे दृगोच्चर झाले. पारदर्शकतेचे तत्त्व अंमलात आल्यावर वीज मंडळाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे त्यांच्या कारभारावरील हितसंबंधांचा पगडा नागरी संस्थांनी उघड केला. सार्वजनिक संस्थांच्या कारभारातील गुंतागुंत आणि त्यांना प्रभावित करण्याच्या मार्गातील अडचणी, या संस्थांच्या हस्तक्षेपामधून पुढे आल्या. यामधून कल्याणकारी राज्य वेगवेगळ्या पातळ्यांवर कोणत्या प्रकारच्या तडजोडी करते आणि त्यात समाजातील प्रभावशाली वर्गांची कशी भागीदारी असते, हे स्पष्ट झाले. वीज क्षेत्रातील संरचनात्मक बदलांच्या प्रक्रियेला त्या क्षेत्राच्या राजकीय अर्थव्यवस्थेने कसे प्रभावित केले, याचा लेखाजोखा माझ्या प्रबंधामध्ये आहे.

    पीएच.डी. संशोधन बऱ्याचदा नोकरी, लग्न अशा गोष्टी सांभाळत केले जाते. त्यामुळे त्याला लागणारा वेळ वाढत जातो. या काळात खूप लोकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य आपल्याला मिळत असते. त्यामुळे संशोधनाच्या या प्रक्रियेला एक सामाजिक परिमाणही आहे. पीएच.डी. संशोधनातून पुढे येणारे विश्लेषण आणि ज्ञाननिर्मिती आपल्या व्यापक अकादमिक विचारविश्वाच्या उपलब्धींचे दर्शन घडवते, असे मला वाटते.

    महाराष्ट्राच्या वीज क्षेत्रावरील माझे प्रकाशित लेख पुढीलप्रमाणे :

    ‘Paradoxes of Electricity Distribution in Maharashtra’ in Dubash, Navroz K., Sunila S. Kale and Ranjit Bhavirkar (eds.), Mapping Power: The Political Economy of Electricity in India’s States, Oxford University Press, New Delhi, 2018.

    ‘New Trends Demand New Strategies in Maharashtra’, Op-Ed Series, Centre for Policy Research, New Delhi, 2018. http://www.cprindia.org/news/7256.

    ‘Regulatory Reforms in Electricity Sector: Systemic Change or Sabotage?’, in Peter DeSouza, Hilal Ahmed, Sanjeer Alam (eds.) Companion on Indian Democracy: Resilience, Fragility, Ambivalence, Routledge, New Delhi, 2021.

    -oOo-



    डॉ. कल्पना दीक्षित
    डॉ. कल्पना दीक्षित

    डॉ. कल्पना दीक्षित या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर येथे स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत आहेत.
    ईमेल: dixitkal@gmail.com



अमराठी भांडवल, मराठी भाषा आणि अस्तित्वाचा प्रश्न

  • साद-प्रतिसाद

    HiteshP_Pages

    जून आणि जुलै २०२५ या ‘मुक्त संवाद’च्या दोन अंकांमध्ये हितेश पोतदार यांचे ‘मराठीचा प्रश्न, भांडवलशाही आणि विस्थापनेचे प्रश्न’ आणि ‘भाषिक राजकारण आणि अदृश्य वर्गीय भान’ असे दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्या अनुषंगाने अनुभव आणि अभ्यासाच्या आधारे माझी काही निरीक्षणे आणि विचार मुद्द्यांच्या स्वरूपात मांडत आहे.

    १. मराठी भाषेच्या शासकीय धोरणांच्या संबंधात १९५० सालापासून किंवा त्याही आधीपासून वाद झालेले आहेत. मराठीचा प्रश्न भांडवलशाहीशी, विशेषतः १९९१ नंतरच्या ‘खाउजा’ आर्थिक धोरणाशी आहे किंवा त्यामुळे निर्माण झालेला आहे. हे लेखकाचे प्रतिपादन वस्तुस्थितीदर्शक नाही.

    २. आर्थिक धोरणामुळे मराठी भाषा काठावर फेकली जात आहे, हेदेखील निरीक्षण मला योग्य वाटत नाही. मुळात ब्रिटिश काळात सार्वजनिक शिक्षणाची सुरुवात झाल्यावर पाचवीपासून, म्हणजे माध्यमिक शाळेत इंग्रजी भाषा शिकवली जात असे. मुंबईसारख्या शहरात हिंदी, उर्दू, गुजराती माध्यमांच्या शाळांमध्येही इंग्रजी भाषा शिकवली जात असे. (तेथे मराठी भाषा अनिवार्य होती का, याचा धांडोळा घ्यायला हवा.)

    ३. इंग्रजी भाषेचे शिक्षण पाचवी ऐवजी आठवी इयत्तेपासून सुरू करण्याचा प्रयोग बी.जी. खेर मुख्यमंत्री असताना १९५० च्या दशकात सुरू केला होता. परंतु काही काळातच पाचव्या इयत्तेपासून इंग्रजी भाषेचे शिक्षण पुन्हा सुरू करावे लागले.

    ४. १९६५-७० नंतर उच्चवर्गीय/वर्गीय कुटुंबांप्रमाणे सर्वसाधारण मराठी कुटुंबांमध्ये मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा ओढा सुरू झाला. तेव्हा अनेक मराठी माध्यमाच्या शाळांच्या संस्थांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या. शिवाय पालकांच्या मागणीनुसार आठव्या इयत्तेपासून विज्ञान आणि गणित हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविण्यास सुरुवात केली. त्यानंतर बहुतेक सर्व शहरांमधील मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठविण्याची चढाओढ सुरू झाली. तेथे वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या कुटुंबांची मुले एकत्र येऊ लागली. या सर्व बदलांचा भांडवलशाहीशी थेट संबंध नव्हता. असलाच तर त्याचा संबंध पालकांच्या इच्छा, आकलन-दृष्टिकोन आणि भवितव्याच्या विचाराशी होता. आता लहान खेडी आणि गावे वगळता पालक वर्गाचा दबाव हा इंग्रजीसाठी आग्रही झाला आहे. या काळात बहुतेक घरांमधील एक तरी पालक काही प्रमाणात तरी इंग्रजी भाषा शिकलेले आहेत.

    ५. इंग्रजी भाषेचे आणि माध्यमांच्या शाळांचे आकर्षण केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतामधील सर्व राज्यांमध्ये आहे. दक्षिणेकडील राज्यात तर पहिल्यापासूनच इंग्रजीचे महत्त्व लोकांनी स्वीकारलेले आहे. हिंदी विरोधी आंदोलने केली आहेत. आज तुलनेने दक्षिणेकडील राज्ये आर्थिक, सामाजिक दृष्टीने प्रगत झाली आहेत. त्याचा इंग्रजी भाषेशी संबंध असला तरी भांडवलशाहीशी तसा तो नाही!

    ६. मराठी भांडवलदार असा मोठा वर्ग महाराष्ट्रात कधीच नव्हता, आजही नाही. काही तुरळक अपवाद वगळता महाराष्ट्रा-तील बहुतेक सर्व उद्योगांमधील भांडवल गुंतवणूक गुजराती, मारवाडी, पारशी लोकांनी केलेली असे. त्यांचा संबंध पारंपरिक उद्यमशीलतेशी होता. शिवाय व्यापार करताना त्या त्या प्रदेशाची भाषा ते शिकत हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि आहे. जागतिक पातळीवर किंवा देशाचा अंतर्गत व्यापार वाढविण्यासाठी त्यांनी इंग्रजी भाषा स्वीकारली, तशीच ती ब्रिटिश काळात प्रशासनात प्रवेश मिळविण्यासाठी उच्चवर्णीय लोकांनी, सुशिक्षित शहरी समाजानेही व्यावसायिक यश मिळविण्यासाठी आत्मसात केली होती. आजही त्यासाठीच इंग्रजीचे महत्त्व आहे. परिणामी आता मराठी भाषकांना एकेकाळी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे वाटत असलेला न्यूनगंडही कमी झाला आहे. दुर्दैवाने, संकुचित राजकारणासाठी तो किंवा हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा आजही वापरला जात असला तरी सामान्य नागरिकांचा त्यात सहभाग दिसत नाही.

    ७. मुंबईसारख्या व्यापारी शहरात मराठी भाषेपेक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेचे महत्त्व वाढण्याची झालेली सुरुवात आजची नाही. व्यापारी शहरे नेहमीच बहुभाषिक असतात. हा त्यांचा स्थायीभाव आहे. स्थानिक कोळी आणि शेतकरी, सोडले तर मुंबई शहर हे बहुभाषिक लोकांच्या स्थलांतरातून घडलेले शहर आहे. येथे सार्वजनिक ठिकाणी बोलली जाणारी कोणतीच भाषा प्रमाण भाषा नसते. शिवाय येथील मराठी समूह महाराष्ट्राच्या भागातून आलेले आहेत व त्यांच्या मराठीमध्ये वेगवेगळ्या बोली आहेत. विदर्भातून आलेल्या लोकांच्या भाषेवर हिंदीची, सोलापूरहून आलेल्या लोकांच्या भाषेवर तेलगू, कानडीची छाप असते; तर खान्देशातून आलेल्या लोकांच्या मराठीवर गुजराती भाषेचा प्रभाव असतो. वेगळ्या जाती-धर्मीयांची मराठी भाषाही एकसारखी नसते. त्यातही शहरी-ग्रामीण असे भेद आहेत. अनेकदा ऐकणाऱ्या मराठी माणसाला ही कोणती मराठी? असा प्रश्न पडतो. अनेकांना पुण्याची-उच्चवर्णीय-वर्गीय समूहांची मराठी शुद्ध व बाकीच्या अशुद्ध वाटत असे व आजही वाटते. तसा दंभ अनेकांच्या ठायी दिसतो. याचा अर्थ बाकीच्यांची मराठी अपवित्र वा भ्रष्ट आहे असे मानणे चूक आहे. कोणती आणि कोणाची मराठी प्रमाणित हे कोणी आणि कसे ठरवायचे? आजपर्यंत कोणी ठरविले?

    ८. अलीकडेच मराठी भाषेतील विविध उपभाषांचा अभ्यास करणारा एक अहवाल प्रसिद्ध झाल्याचे वाचनात आले होते. त्यानुसार महाराष्ट्रात १२ प्रकारच्या मुख्य मराठी बोली भाषा आहेत, असे आढळले. खाली त्याची लिंक देत आहे. तो अहवाल आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकले की एकाच मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा परक्या भाषेइतक्याच अवघड वाटू शकतील. https://www.hindustantimes.com/cities/pune-news/survey-identifies-12-broad-dialect-regions-of-the-marathi-language-in-maha-101709575904162.html

    ९. भारतामधील विविध राज्यांतील बहुतेक सर्व उच्चशिक्षित, उच्चवर्णीय, आर्थिक सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात यशस्वी ठरलेले लोकसमूह एकमेकांशी इंग्रजी भाषेतून सहजपणे व्यवहार करतात. त्यांचे अनुकरण करणे ही मानवी सहजप्रवृत्ती आहे. मात्र प्रत्येक समूह त्याला काही ना काही वेगळेपण देत असतो, हेही दिसून येते.

    १०. पालक मुलामुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालतात या कृतीविरोधी काही वर्षांपूर्वी असा वाद झाला होता. तेव्हा स्पर्धा टाळण्यासाठी दुटप्पी वृत्तीने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला उच्चवर्णीय लोक विरोध करतात, असे मत अनेक वर्गांनी, नवशिक्षित लोकांनी मांडले होते. किंबहुना तसे आरोपच केले होते.

    ११. वरील सर्व कारणांमुळे हितेश पोतदार यांनी नवभांडवलशाही, पायाभूत क्षेत्राच्या विस्ताराशी भाषावादाचा प्रत्यक्ष, थेटपणे जोडलेला संबंध पटण्यासारखा नाही. अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्था, व्यवहार, राजकारण, समाज, संस्कृती या सर्व गोष्टी एकमेकांवर प्रभाव टाकणाऱ्या असल्या तरी त्यातील कोणताही एक घटक निर्णायकपणे कारण आहे, असे मानता येत नाही. आपल्याला मान्य नसलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी नव-भांडवलशाही, खाउजा धोरणाला बोल लावणे हे अनेक पुरोगामी राजकीय लोक चळवळींमध्ये आढळते. त्यामध्ये सामान्य नागरिकांच्या इच्छा, अपेक्षा, प्राथमिकता आणि निवडीच्या स्वातंत्र्याचा विचार क्वचितच केला जातो.

    १२. लेखकाने आपल्या आर्थिक-राजकीय सिद्धांताच्या चौकटीतून मराठी भाषेच्या धोरणावर भाष्य केले आहे. शिवाय त्यासाठी दिलेली सर्व उदाहरणे केवळ मुंबई पुरती मर्यादित आहेत. महाराष्ट्राच्या बारा-तेरा कोटी लोकसंख्येमध्ये मराठी लोकसंख्या १० कोटी तरी आहे. इतक्या लोकांची भाषा सहजपणे मृत होईल, यावर माझा तरी विश्वास नाही. ती बदलेल, वाकेल, कधी आकुंचन पावेल, तर कधी नवनवीन भाषांच्या शब्दांची भर पडून अधिक समृद्ध होईल. गेल्या काही वर्षात राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधून विविध प्रकारची पुस्तके प्रकाशित होत आहेत. नवशिक्षित लोक मोठ्या संख्येने लिहू लागले आहेत. वाचू लागले आहेत. मराठीच नाही तर बहुभाषिक लोकांमधील संबंध, घुसळण, सांस्कृतिक संकर वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विभागात होत आले आहेत. या पुढेही होत राहील. उलट नवीन ए.आय. तंत्रज्ञानाने एकमेकांच्या भाषांचे औपचारिक शिक्षण नसतानाही विचार, लिखित साहित्य, माहिती, शब्दांचे आकलन होणे सुलभ होते आहे. आज या सर्व घुसळणीचे परिणाम भविष्यात काय होतील, कसे होतील, समाजात काय बदल होतील याचे अनुमान करणे अशक्य आहे. असे असले तरी होत असलेल्या बदलांचे स्वागत करायला हरकत नाही, असे मला वाटते.

    १३. भाषा आणि इतर सर्व मानवनिर्मित गोष्टी एका व्यापक गुंतागुंतीच्या नात्याने एकमेकांवर परिणाम करीत असतात. प्रवाहीपणा (dynamism), व्यामिश्रता (complexity) हा या सर्व घटकांचा, निर्मितीचा स्वभाव आहे. त्यांच्यातील संकर प्रक्रिया आदिम काळापासून चालत आलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक-राजकीय मर्यादित सिद्धांताच्या चौकटीतून बघणे मला योग्य वाटत नाही. शिवाय लेखक काही भाषाविषयक तज्ज्ञ नाही, मीही नाही. मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे आणि आर्किटेक्चरची भाषाही मानवी भाषांसारखी संकर-प्रक्रियेतून विकसित होत समृद्ध झालेली आहे. मात्र लेखकाच्या दोन्ही लेखांवर भाषा तज्ज्ञांचे मत घेणेसुद्धा मला इथे आवश्यक वाटते. ‘मुक्त संवाद’ मासिकाने तसा प्रयत्न करावा, असे मला सुचवावेसे वाटते.

    -oOo-



    सुलक्षणा महाजन
    सुलक्षणा महाजन

    लेखिका मुक्त-संवादच्या सल्लागार संपादिका, ज्येष्ठ नगरनियोजनकार व पुरस्कारप्राप्त लेखिका आहेत.
    ईमेल: sulakshana.mahajan@gmail.com.