Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

सिसिफस आनंदी आहे...

  • आत्म संवाद

    Sisyphus

    व्हाय मी? मीच का? संकटाच्या प्रसंगी हा प्रश्न मनात हटकून फणा काढून उभा असतो. हा प्रश्न तुम्ही हॉस्पिटल वॉर्डमध्ये असताना उफाळून येतो. रोगाचे निदान झाल्यानंतरच्या सून्न क्षणांमध्ये डोके वर काढतो किंवा आजाराशी झुंजणाऱ्या प्रियजनांच्या उशाशी बसले असताना तुम्हाला अस्वस्थ करतो.

    एक सेवानिवृत्त मनोविकार तज्ज्ञ आणि एक नवरा म्हणून मी जेव्हा माझ्या ५२ वर्षांच्या बायकोला पार्किन्सन्सच्या दुर्धर नि वेदनादायी आजाराशी झुंजताना पाहत असतो, तेव्हा या प्रश्नाची मला पुरती जाण असते. ही काही केवळ एक सैद्धांतिक चिकित्सा नसते, तर जगण्यासाठी किंवा जगण्याच्या धडपडीसाठीचे घेतलेले श्वास, प्रियजनांचा दुरावा आणि न संपणाऱ्या कितीतरी रात्री अनुभवताना आकारास आलेली ही जाण असते.

    अल्बेर काम्यू लिहितो, मानवी आयुष्याला अर्थ आहे का आणि ते जगण्यायोग्य आहे का, हाच या जगातला सर्वात गांभीर्याने घेण्याजोगा तत्त्विक प्रश्न आहे. या संदर्भाने काम्यूने आपल्याला सिसिफसची प्रतिमा भेट दिली आहे. सिसिफस हा ग्रीक पुराण कथेतला असा कमनशिबी राजा आहे, ज्याला देवाने भलीमोठी शिळा डोंगरावर चढवण्याची शिक्षा देण्यात आलेली आहे. सिसिफसचे प्राक्तन हे आहे, की शिळा वर चढवण्याला, ती पुन्हा पुन्हा घरंगळत येण्याला अंत नाही. हे कधीही न संपणाऱ्या दुःख वेदनांचे प्रतीक आहे. तरीही, सिसिफस एकच कृती न थकता करत राहतो आहे. इथे, आनंदी सिसिफसची कल्पना करण्यास काम्यूने जणू आपल्याला आमंत्रित केले आहे. सिसिफसला दिलेल्या शिक्षेत बदल झाला, म्हणून नाही तर त्याच्या मनात बदल झाला म्हणून तो आनंदी असल्याचे काम्यूला सुचवायचे आहे.

    बळ निर्धाराचे

    सिसिफसने जगण्यातल्या अगम्यतेचा स्वीकार केलेला आहे आणि तरीही आयुष्य निर्धाराने जगत राहण्याची निवड केलेली आहे. आपल्या आयुष्यात जे काही घडतेय, त्यामागची कारणे आपल्याला बहुतेकवेळा दिली जात नाहीत. मिळतही नाहीत. त्यामुळे निष्ठुर वास्तवाखेरीज वा वास्तवाला तोंड देण्याखेरीज आपल्या हातात काही असत नाही. उरतही नाही. अशा प्रसंगी प्रतिक्रिया देणे किंवा परिस्थितीला प्रत्युत्तर देणे एवढी मर्यादशील कृती माणूस म्हणून आपल्या हातून घडते. त्या अर्थाने, मीच का? हा पडणारा वा पडलेला प्रश्न हे विदग्ध मनाचे केवळ रुदन नसते, तर मीच का? या प्रश्नाच्या उत्तरासाठीची केलेली एक प्रकारची याचिका असते. हे खरे तर मानवी अस्तित्वाच्या गाभ्याशी नेमके दडलेय काय, याची चिकित्सा करण्यासाठीचेही बोलवणे असते.

    आपला मर्यादांशी आमनासामना होतो, तेव्हाच मीच का? हा प्रश्न उभा राहतो. हे केव्हा घडते, तर जेव्हा आजारपणाचा विळखा पडतो किंवा आपले करियर आकस्मिक संपते किंवा दुःखवेग आपल्याला कोलमडून टाकतो तेव्हा, आपण अंतर्बाह्य हादरून जातो. आपले आयुष्य आपल्या ताब्यात राहत नाही. आपण रचत आलेल्या आपल्या आयुष्याच्या गोष्टीवर आपला ताबा राहत नाही. मनोविकार तज्ज्ञ व्हिक्टर फ्रैंक हे हिटलरने उभारलेल्या आऊत्स्वित्झ छळछावणीतून बचावले होते. ते म्हणतात, माणूस हा कल्पनाही करता येणार नाही, इतकी वेदना सोसू वा सहन करू शकतो. मीच का? किंवा का? हा प्रश्न त्यांचे उद्दिष्ट असेल, तर सहनसिद्धीतून तो सहज तरुन जाऊ शकतो, विशेषतः जेव्हा आपण परिस्थिती बदलू शकत नाही, हे पुरेसे स्पष्ट होते, तेव्हा तर हे खचितच घडू शकते. या संदर्भाने ते असेही लिहितात की, स्वतःला बदलण्यासाठी अशा रितीने आपल्याला आव्हान मिळालेलं असतं.

    वास प्रेमाचाच

    माझ्या आयुष्यात तर हे अनेक अर्थाने खरे ठरले आहे. माझ्या बायकोचे खचत जाणे, क्षीण होत जाणे सर्वकाही बदलून टाकणारे ठरले आहे. आता मला एकही सुट्टी नसते. घराबाहेर सहजपणे फेरफटका मारायला जाणेही सहसा घडत नसते. इतरांना अनुभवास येणारा निवांतपणाही माझ्या वाट्याला येत नसतो. तरीही प्रत्येक नव्या सकाळी, जसे आम्ही तिची काळजी घेण्यास सुरुवात करतो, तिला खाऊ पिऊ घालतो, तिला फिजिओथेरपी देतो, सौम्य स्वरांतले संगीत ऐकवतो, तिच्याशी मृदु शब्दांत संवाद साधतो, तेव्हा मला याची प्रकर्षाने जाणीव होते की, प्रेम माझ्या घरात, आसपास भरून राहिलेय. नव्हे, प्रेमच अवघे वातावरण भारून आहे. तेव्हा हे असे प्रेम व्यापून असते, तेव्हा आयुष्याला, आयुष्य जगण्याला अर्थ आलेला असतो.

    ATouchOfHope
    समानुभूती, सहवेदनेची जाणीव माणसाचे माणूसपण ठळक करत राहते. व्याधीग्रस्तास मदतीचा हात जिथे पुढे येतो, तिथे प्रेम, स्वातंत्र्य आणि मुक्ततेचा अवकाश आकारास येत जातो...

    एरवी, एखाद्याची काळजी घेणे ही कृती स्वतःचे म्हणून एक ओझे राखून असते. हे एका अर्थाने ऊर्जा आणि ओळखीचे धीमेधीमे त्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीपुरते कापरासारखे उडून जाणेच असते. पण त्याचवेळी हे असे घडणे, आपले व्यक्तित्व भरीव नि सखोल करणारेही ठरते. जी कृती एक कर्तव्य म्हणून सुरू झालेली असते, एका क्षणी कर्तव्याची जागा समर्पणाने घेतलेली असते. तेव्हासुद्धा मीच का? किंवा मलाच का? हा प्रश्न मनात रुतून बसलेला असतो. तो जाणीवही करून देत असतो, परंतु आता या प्रश्नाचे उत्तर तितकेसे महत्त्वाचे राहिलेले नसते. महत्त्वाचे असते, समर्पण भावनेने दैनंदिन कृतींचे साधणे. मनात समर्पणाचा भाव राखत इतरांची देखभाल करणे, जीवापाड काळजी घेत राहणे. श्रद्धाळूसाठी व्हाय मी? किंवा मीच का? हा प्रश्न एकप्रकारची प्रार्थना होऊन गेलेला असतो. ईशस्तवनकर्ता अश्रू ढाळताना म्हणतो, ‘अरे माझ्या परमेश्वरा, का म्हणून तू मला अव्हेरले आहेस.’ हेच शब्द येशू ख्रिस्ताने सुळावर चढल्यानंतर उच्चारले होते. म्हणूनही मला वाटते, शंका आणि संशय हा श्रद्धेच्या विरुद्ध नव्हे तर श्रद्धेचाच एक भाग आहे. अपराध नाही. हिंदू आणि बौद्ध धर्मतत्त्वांमध्ये मानवी आयुष्याची एक अवस्था म्हणून वेदनेचा स्वीकार करण्यात आला आहे. दुःख आणि वेदना ही जाणिवेतून, नि:संगतेतून आणि करुणेतून पाझरत राहणारी आहे. इस्लाममध्ये सब्र ही संकल्पना, दैवी शक्ती रंजल्या-गांजल्यांच्या सोबत असल्याचे, सुचवत आली आहेत.

    जाणीव समानुभूतीची

    अनेकदा घडते असे की, श्रद्धेमुळे दुःख-वेदना लोप पावत नाहीत, तर त्या तोलून धरल्या जातात. यामुळे आपल्याला एक विस्तृत अवकाश मिळतो, एक चौकट लाभते, ज्यात वेदनेला आपल्याला राखता येते. वेदना सुशोभित होते, म्हणा हवे तर. शेवटी, हे लक्षात ठेवले पाहिजे की, वेदनेचा धीरोदात्तपणे सांभाळ होणे आवश्यक आहे. जैविकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, वेदना एकप्रकाराने आपले संरक्षणही करत असते आणि आपल्याला धोक्याची सूचनासुद्धा देत असते. एकूणच, यातना आपल्याला इतरांपर्यंत पोहोचण्यास भाग पाडतात. शेवटी, मीच का? या प्रश्नाला किंवा या आक्रोशाला उत्क्रांतमूल्यदेखील आहे. हे मूल्य इतरांना, आप्तेष्टांना तुमच्या जवळ आणते, साक्षीदार बनवते, मदतीचा हात पुढे करण्यास प्रेरित करते.

    अर्थातच जीवशास्त्रापलीकडे समानुभूती कायमच अवकाश व्यापून असते. आपण जेव्हा यातनांमधून जात असतो, तेव्हा इतरांच्या वेदना जाणून घेण्यातली आपली समज प्रगल्भ झालेली असते. वेदना जाणून घेण्याची आपली क्षमता वाढलेली असते. आपण या क्षमतेला मुक्त वाव दिला तर मन आणि हृदय मोकळे नि मोठे होण्यास प्रारंभ होतो. हा म्हटला तर यातनांतून झालेला एक लाभच असतो. कृपाप्रसादच म्हणा ना. हा कृपाप्रसाद आपल्याला गहनतेकडे नेतो. ही गहनता समानुभूतीची असते!

    अर्थात, कालांतराने मीच का? हा प्रश्न आताच का? किंवा ‘मी यातून, या परिस्थितीतून कसा मार्ग काढू?’चे रूप घेऊ शकतो. हा बदल सहज नि तरल पातळीवरचा पण ताकदीचा असतो. निषेधाकडून उद्दिष्टाकडे नेणारा, पंगुत्वाकडून कृतीकडे नेणारा असतो.

    तसे पाहायला गेले, तर सगळ्याच प्रश्नांना उत्तरांची गरज नसते. काहींना फक्त ऐकून घेणे गरजेचे असते. तेही शांतपणे ऐकून घेणे गरजेचे असते. धर्मशास्त्रतज्ज्ञ पॉल टिलिच म्हणतातही की, प्रेमाचे पहिले कर्तव्य समोरच्या माणसाचे म्हणणे ऐकून घेणे, हे असते. तेव्हाच, आपण आपलेच म्हणणे ऐकतो, ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांचे म्हणणे ऐकतो आणि हो, नीरव शांततेचेही म्हणणे ऐकतो. तो अवकाश निःशब्द असतो. शब्दशून्य असतो. माझ्या घरात, औषधांच्या पसाऱ्यात, व्हिलचेअर आणि नर्सेसच्या वावरात, खरे तर अडथळ्यातच म्हणा ना, एक हास्य बागडत असते. सुश्राव्य संगीत तरंगत असते. करुणामयी प्रार्थनेचा गुंजारवही होत असतो. वेदना आणि यातनांपासून कोणाचीच सुटका नसते. परंतु यातना कशा सोसायच्या, सहन करायच्या, हे मात्र आपण नक्कीच ठरवू शकतो.

    किंबहुना, याच पर्याय निवडीत आपले खरेखुरे स्वातंत्र्य दडलेले असते!

    -oOo-

    (‘इंडियन एक्स्प्रेस’ दैनिकाच्या ३ जुलै २०२५ च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा स्वैर अनुवाद.)


    जॉर्ज जॉन
    जॉर्ज जॉन

    लेखक निवृत्त मनोविकारतज्ज्ञ आहेत.
    ईमेल: .



गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

कथा: अपराधी कोण?

  • अनुनाद

    AparadhiHeadImage

    दरवाजा उघडल्यावर अमरनाथ अवाक झाले. शिपाई नाही, कुरिअर सर्व्हिसेसचा माणूस नाही, ढगळ खाकी शर्ट आणि कंबरेला लाल पट्टा बांधलेला एकजण पत्र हातात घेऊन उभा होता.

    तो माणूस म्हणाला, “कोर्टाचं समन्स आहे, सही करून घ्या.” हे ऐकल्यावर अमरनाथ घाबरून गेले. समन्स? अमरनाथ जीवनात कधीही कोर्टात गेले नव्हते. पोलीस चौकी, हवालदार यांच्याशीही त्यांचा कधीही संपर्क आला नव्हता. नक्कीच काहीतरी चूक होत असली पाहिजे.

    तो माणूस विचारू लागला, “जयदीप सरकार, आपणच ना?” अमरनाथ म्हणाले, “नाही. म्हणजे माझा मुलगा.”

    तो माणूस म्हणाला, “ते घरात आहेत का? आपणही घेऊ शकता आणि जर घ्यायचं नसलं तर मी हे परत घेऊन जाईन. मग पोलीस येतील.”

    अमरनाथनी सही करून तो कागद घेतला. पत्ता बरोबर घातला होता, त्यांच्या मुलाचं नावही त्यावर लिहिलेलं होतं. परंतु जयदीपला कोर्टाकडून कशासाठी बोलावलं असेल?


    अमल दासगुप्त नावाच्या एका माणसाने हाय कोर्टात तीन लाख रुपयांचा स्कॅम झालाय म्हणून खटला भरला होता. तीन आरोपींच्यात जयदीपचा समावेश होता.

    अमरनाथ यांच्या छातीत धडधडू लागलं. जयदीपने कोणाला तरी सामील होऊन पैशांची अफरातफर केली होती? तेही तीन लाख रुपये? अशक्य! खोटं आहे हे!

    परंतु समन्स खोटं असणार नाही!


    दोन अपत्य. मोठ्या मुलीचा विवाह झाला होता. ती जमशेटपूरला राहत असे. जयदीप यादवपूर विश्वविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. अजून एक वर्ष शिल्लक होतं. अभ्यासात हुशार, सरळमार्गी, चांगला मुलगा. आईबाबांना अभिमान वाटावा, असा मुलगा.

    जयदीप उत्तम बॅडमिंटनपटू होता. आजवर त्याने अनेक ट्रॉफी मिळवल्या होत्या. एका स्पर्धेसाठी तो भुवनेश्वरी येथे गेला होता, त्या दिवशी संध्याकाळी परत येणार होता.

    आत्ता घरात फक्त नवरा-बायको. अमरनाथ पुनःपुन्हा समन्स वाचू लागले. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्यांचा!

    इंदिरेची ही वर्तमानपत्रं वाचायची वेळ. सकाळच्या वेळी ती घरकामात इतकी व्यग्र असे की वर्तमानपत्रं बघायलासुद्धा तिला सवड होत नसे. दुपारी जेवणं झाल्यावर ती दोन वर्तमानपत्रं घेऊन बसत असे.

    हे समन्स पत्नीला दाखवावं की दाखवू नये, हे अमरनाथना समजेना. मुलगा म्हणजे जीव की प्राण! अचानक असं काही ऐकलं, तर तिला धक्काच बसेल! शुद्ध हरपून अर्धांगाचा झटका आला तर…? अशा गोष्टी अनेकदा कानावर येत असत.

    केव्हातरी सांगावं लागणारच! जयदीप परत आला की त्याला हे समन्स दाखवावं लागेल. कोर्टाकडून आलेलं समन्स नाकारता येणार नाही.

    इंदिरेनी आतल्या खोलीतून विचारलं, “कोण आलं होतं?”

    अमरनाथ हळूहळू पावलं टाकत त्या खोलीत गेले. त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता. अस्फुट आवाजात ते म्हणाले, “काहीतरी चमत्कारिक घडलंय. मला त्याचा अर्थ लावता येत नाहीय.”

    यजमानांची स्थिती बघितल्यावर काळजी वाटून इंदिरा उठल्या आणि तो कागद पाहू लागल्या. भुवया उंचावत आठ्या घालत त्या विचारू लागल्या, “हे आहे काय?”

    अमरनाथ म्हणाले, “कोर्टाचं समन्स.”

    “ते तर दिसतंच आहे, पण खोकेनच्या नावाने का आलाय?”

    “ते मलाही ठाऊक नाही.”

    “नक्कीच काहीतरी चूक झालीय.”

    “आपल्याच घराचा पत्ता यावर लिहिलाय.”

    “असेना, का; पण खोकेन असलं घाणेरडं काम करू शकेल का?”

    “माझ्याही मनात तोच विचार येतोय. पण...”

    “तुम्ही हे परत का पाठवलं नाही?”

    “परत पाठवलं असतं तर आपल्याकडे पोलीस आले असते.”

    “इथे आणखी दोघांची नावं लिहिलेली आहेत, त्यांनाही आपण ओळखत नाही ना? खोकेनच्या सगळ्या मित्रांशी आपली ओळख आहे.”

    “आपण ज्यांना ओळखतो, ते सोडून आणखीही...”

    “त्याला इतर फारसे मित्र नाहीत आणि हा अमर दासगुप्ता कोण आहे? त्याचं नावही कधी ऐकलं नाही.”

    “मलाही माहीत नाही. खोकेन अधूनमधून बऱ्याच उशिरा घरी परततो. नऊ-साडेनऊ होऊन जातात. कुठे असतो, त्याविषयी तो काही बोलत नाही.”

    “खेळायला जातो. आणखी कुठे जाणार?”

    “पावसाळ्यात खेळ असतो का?”

    “मित्रांबरोबर असतो. गप्पांचा अड्डा. खोकेन आता मोठा झालाय. सारा वेळ आईबाबांबरोबर कसा राहील तो? तुमच्या या वयात तुम्ही घरात राहत होतात का हो?”

    “कधी कधी तो उदास दिसतो. स्वतःच्या खोलीत गुपचूप बसून राहतो. मी काही विचारलं तर उत्तर देत नाही.”

    “कोणाच्या प्रेमात पडला असेल कदाचित!”

    “इंदू माझ्या मनात एक शंका येतेय, सांगू का तुला? तो कोणाच्या तरी सांगण्याच्या भरीस पडून कोणाबरोबर व्यवसाय करायला गेला नसेल ना? इतके पैसे!”

    “व्यवसाय करणार? आपला खोकेन? अजून शिक्षण पूर्ण व्हायचंय. तुमचं डोकं फिरलंय का? व्यवसाय करायचा विचार तो कशाला करेल? जे काही पैसे लागतात, ते तुमच्याकडून मागून घेतो ना तो? तुम्ही पैसे द्यायला नकार दिलाय, असं कधी झालंय का?”

    “कधीच झालं नाही. तो वायफळ खर्च करत नाही.”

    “मग?”

    “जर कोणाच्या वाईट संगतीत अडकून पडला असला तर...? कोणीतरी सहज पैसे मिळवायचं आमिष दाखवून त्याला वाईट कामात सहभागी करून घेतलं असलं तर...?”

    “माझ्या रक्तामांसाच्या मुलाला मी ओळणार नाही का?”

    SagarShindeSketch2
    रेखाचित्रे : सागर शिंदे.

    जयदीप संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी परतला.

    आल्या आल्या त्याला काही सांगितलं नाही. आधी त्याचं खाणंपिणं होऊ दे. स्नान उरकून घेऊ दे. तरी अमरनाथ त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पुसून टाकू शकले नाहीत.

    अंघोळ झाल्यावर जयदीप बाहेर पडला, परत आला रात्री नवाच्या सुमारास.

    जेवणाच्या टेबलापाशी बसून अमरनाथ हळू हळू सूतोवाच करू लागले. जयदीपने समन्स पाहिलं. त्याने त्याला काहीच महत्त्व दिलं नाही. कपाळाला आठ्या घालत फक्त म्हणाला, “कोणीतरी बहुतेक माझी थट्टा करताय. तीन लाख रुपये? जीवनात दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम आजवर डोळ्याने पहिली नाही.”

    अमरनाथनी सावध होत विचारलं, “हा अमल दासगुप्त तुझा मित्र आहे का?”

    जयदीप म्हणाला, “मित्र! आयुष्यभरात मी हे नावही ऐकलं नाहीय.”

    इंदिरा म्हणाली, “मी तर केव्हाच सांगून टाकलंय, हे चुकीने आपल्याकडे आलंय किंवा कोणीतरी आपली थट्टा करतंय.”

    जयदीप ते समन्स फाडायला निघाला होता, पण अमरनाथ थांब, थांब म्हणत घाईघाईने त्याच्यापाशी गेले.

    ते म्हणाले, “कोर्टाचं समन्स फडता येणार नाही. उद्या तुला कोर्टात हजेरी लावावीच लागेल.”

    जयदीप स्वभाविक होत म्हणाला, “ठीक आहे. जाईन.”

    अमरनाथ म्हणू लागले, “एक वकील ठरवायला हवा ना?”

    “वकील कशासाठी? फॉल्स केस, त्यासाठी वकिलावर मी खर्च कशाला करू?”

    “हे फॉल्स अॅलिगेशन आहे, हे सिद्ध करावं लागेल ना?” “हे काम मी केलं नाहीय, हे मी स्वतःच्या तोंडून सांगेन. ते काही सिद्ध करू शकतील का?”

    “खोकन, तू नीट आठवून बघ. तुझ्या एखाद्या मित्राने तुला जामीन ठेवून कोणाकडून पैसे उसने घेतले होते का?”

    “जो जामीन राहतो, त्याचा काहीच दोष नसतो. परंतु त्याने पैसे परत दिले नाहीत, तर मात्र जमीनदार आपल्याला कोर्टात खेचू शकतात.”

    “इतक्या पैशांसाठी मी जामीन कशाला राहू? माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का?”

    “कदाचित बोलताना कमी पैसे म्हटलं असेल आणि प्रत्यक्षात जास्त पैसे घेतले असतील!”

    “अशा तऱ्हेचा एकही व्यवहार मी केला नाहीय.”

    “तू कधी कोणाला कोऱ्या कागदावर सही करून दिली होतीस का?”

    “बाबा, तुम्ही माझी उलटतपासणी घेताय का? कोऱ्या कागदावर सही देण्याइतका मी मूर्ख आहे, असं तुम्हाला वाटतं का? मित्रांशी मी पैशाचे कोणतेही व्यवहार करत नाही.”

    हे संभाषण थांबवत इंदिरेने त्यांना जेवायला यायची हाक दिली. त्यानंतर काही वेळाने सगळे झोपायला गेले. इंदिरेला झोप लागली असली तरी अमरनाथ जागेच होते. मनातली अस्थिरता काही केल्या कमी होईना.

    जयदीप सगळं सत्याला स्मरून सांगत होता का? अतिशय जोरदार निषेध केला नव्हता त्याने! त्याने नजरेला नजर देऊन पाहिलं नाही, दुसऱ्या दिशेला तोंड वळवून तो बोलत होता. शेवटी शेवटी तर तो चांगलाच रागावला होता.

    जयदीप काही प्रमाणात गोपनीय जीवन जगत होता का? संध्याकाळनंतर एक-दोन तास तो कुठे असतो? बरेचदा एक-दोन मित्र त्याच वेळात फोन करीत. अशा वेळी जय फोन घेतो का? इथल्या मुलांच्या वागण्यातला तपशील नीटसा समजत नाही.

    वकील नेमायला त्याने नकार दिला. का? त्याला खरोखरच तुरुंगात जावं लागलं तर फक्त घोटाळा होणार नाही, त्याच्या जोडीला समाजात तोंड दाखवायची सोय उरणार नाही. माझा मुलगा फसवणारा, लफडेबाज! शी! शी! शी! शी!

    अमरनाथ मध्यरात्री बाथरूमला जाण्यासाठी एकदा उठले होते.

    जयदीपच्या खोलीत अजूनही दिवा जळत होता. पोरगा झोपू शकला नव्हता!

    आईबाबांसमोर कितीही नकार दिला तरी नक्कीच एखादी चूक त्याच्या हातून घडली असणार! कोर्टाचं समन्स पूर्णपणे खोटं असू शकेल का?

    अमरनाथही रात्रभर झोपू शकले नाहीत.

    सकाळी अकरा वाजता कोर्टात हजेरी लावायची होती. एकट्यानेच जावं, अशी जयदीपची इच्छा होती. त्याने त्याच्या एकाही मित्राला यातलं काही सांगितलं नव्हतं. मुलाने तीव्र विरोध केल्यावरही अमरनाथ त्याच्याबरोबर गेले.

    जयदीपच्या वागण्यात कोणत्याही प्रकारचा उद्वेग नव्हता. त्याला ट्रॅमने जायचं होतं, पण अमरनाथनी टॅक्सी केली. ते जोरजोरात सिगारेटचे झुरके घेऊ लागले. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. आता काय होईल, हा विचार त्यांच्या डोक्यात सतत भिरभिरत होता.

    कोर्टात पोचल्यावर जयदीपने प्रथम अमल दासगुप्तच्या वकिलाचा शोध घेतला. त्याची भेट झाल्यावर त्याच्या नाकाच्या शेंड्यावर समन्सचा कागद नाचवत नाचवत म्हणाला, “हे काय आहे, ते सांगा पाहू? ही थट्टा चालवलीय का आमची?”

    समन्सवर नजर टाकत ते म्हणाले, “मी कालच म्हटलं होतं, टायपिंगमध्ये प्रचंड घोटाळा झालाय. जयदीप नाही, असायला हवं होतं जयदेव सरकार. अनुकूल चॅटर्जी स्ट्रीट नाही, अनुकूल बॅनर्जी स्ट्रीट, त्याच नावाचा आणखी एक रस्ता आहे. आज सकाळी शोध घेऊ लागलो, तेव्हा समजलं, तो जयदेव सरकार फरार झालाय!”

    जयदीप अतिशय रागावून म्हणाला, “टायपिंगची चूक? त्यासाठी अभ्यास सोडून मला ओढाताण करत इथे यावं लागलं? फार शहाणे आहात!”

    ते सभ्य गृहस्थ हात जोडून म्हणाले, “मी माफी मागतो. दोष माझा नाही. कोर्टाच्या कारकुनाचा. काय करू सांगा! यांना काही सांगायची सोय आहे का?”

    अमरनाथच्या अंगातून थंडगार घामाच्या धारा ओघळत होत्या. आजच्याइतकं स्वस्थ त्यांना या आधी कधी वाटलं नव्हतं!

    त्यांनी जयदीपला मिठी मारली. अर्थात त्या आलिंगनात मनस्ताप नव्हता!

    जयदीपने कोणताही अपराध केला नव्हता. अपराधी ते स्वतः होते. ते मुलावर विश्वास ठेवू शकले नव्हते. तो खोटं बोलतोय, असा त्यांच्या मनात संशय होता. या उलट इंदिरा प्रथमपासून ठासून सांगत होत्या, ‘त्यांना समजत नाहीय. स्वतःच्या मुलाला ते ओळखत नाहीयत.’

    बाबा या नात्याची आज प्रथमच त्यांना प्रचंड लाज वाटू लागली.

    -oOo-

    (सुनील गंगोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘के अपराधी?’ या बंगाली कथेचा मराठी भावानुवाद.)


    सुमती जोशी
    सुमती जोशी

    अनुवादिका सुमती जोशी या राज्य पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिका, अनुवादिका आहेत. त्यांची ‘उत्क्रांती’, ‘बंगरंग’, ‘दैत्याचा बगीचा’, ‘मंत्र’ आदी स्वतंत्र तसेच अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
    ईमेल: sumatijoshi154@gmail.com



नव्या घरघरीचा नवा अध्याय

  • काव्यार्थ

    Avyaakrut_Akshay

    ‘अव्याकृत’ हा अक्षय शिंपी यांचा दुसरा कवितासंग्रह. ‘बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे’ या संग्रहानंतर आलेला हा केवळ ४६ कवितांचा छोटेखानी संग्रह. अक्षय यांच्या पहिल्या संग्रहातील ६१ कविता आणि या नव्या संग्रहातील ४६ असा एकूण १०७ कवितांचा हा गेल्या पंधरा-वीस वर्षांचा काळ अनेक प्रश्न घेऊन उभा असलेला आहे. त्यामुळेच पहिल्या संग्रहातील पहिली कविताही प्रश्नचिन्हांकित झाल्याची नोंद करत अक्षयने आजच्या पिढीचा संभ्रम अधोरेखित केला आहे. अशा संभ्रमाच्या काळात केवळ ‘तू’ एवढाच एक शब्द लिहू शकलो, ही कबुली देत अक्षयचा हा दुसरा संग्रह पूर्ण होतो.

    नव्या शतकातील पंचवीस वर्षांच्या ‘वैराण’ वासून उभ्या असलेल्या काळाचा लेखाजोखा मांडणाऱ्या ह्या संग्रहात आजच्या तरुणाईच्या अव्यक्त भावभावनांचा कोलाज पाहायला मिळतो. ‘कोलाहालातील महाकाव्यं कुठल्या यातनांचं खत पिऊन फोफावतात अन् मौनातील महाकाव्यं कुठे कोरून ठेवतात’ हे माहीत नसलेल्या या कवीनं अव्याकृत अशा अनेक भावनांना या संग्रहात मुखर केलं आहे.

    सत्य एक मूल्य असण्याच्या काळापासून सत्य वस्तू होण्याच्या काळापर्यंतचा प्रवास कवी इथे करतो आहे. हा प्रवास करताना दुथडी भरून वाहात जाणाऱ्या उदासीच्या नद्यांवर आपली नाव वल्हवत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्या काळात हेच भागधेय असणारे अनेक लोक आज आपल्या आजूबाजूला दिसताहेत

    अक्षय शिंपी हे या गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील घडामोडींचे साक्षीदार आहेत. एका मूल्य संचिताचा वारसा असणारे पण मूल्यरहित जगात राहण्यास भाग पडलेल्या तरूण पिढीचे प्रतिनिधीही आहेत.

    झपाट्यानं पोखरून काढणाऱ्या काळात
    माझी उखडलेली मुळं घेऊन
    मी हिंडतोय विस्थापितासारखा
    दिशाहीन... (दिशाहीन-बिन चेहऱ्याचे कभिन्न तुकडे)
    पण असं दिशाहीन फिरतानाही ते म्हणतात,
    माझ्या मुळांना तुझं
    खतपाणी आहे,
    हे विसरणारही नाही
    कधीच. (डॉ. आंबेडकर - अव्याकृत)

    अक्षय शिंपी यांना जे खतपाणी मिळालं आहे, ते मराठी साहित्य आणि नाट्यसृष्टीचं. हिंदी, मराठी आणि इतर भाषांतील ललित तसेच वैचारिक साहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. या साहित्यातलं तरल, भावविभोर तसंच विचार करायला लावणारं जे काही आहे ते सारं टिपताना ते दिसतात. जसा एक कवी त्यांच्यात वस्तीला आहे, तसाच एक नटही त्यांच्यात वास करून आहे. तो सतत काहीतरी शोधतोय आणि मग स्वतःच उलगडत राहतोय कथांच्या विविध गुंडाळ्या. त्या गुंफत राहतोय, दास्तागोईमधून. सांगत राहतोय, कथा रात्रंदिवस आणि त्यातच गुंतून जातोय.

    या जगात पाहिलेलं कल्पित त्याला आपलं वाटतंय. कारण ते संवेदनशील, थेट आत पोहोचणारं आहे. पण बाहेरचा अंधार मात्र त्याला अस्वस्थ करतोय. आपण कोणत्यातरी विवरात गुडूप होण्याचं भय सतत त्याच्या मनात आहे. एवढंच नाही, तर संवेदना हरवलेल्या या जगातून आपल्याला बेदखल डिसकार्ड तर करणार नाही ना, हे भयही त्याच्या मनात सतत वसतीला आहे.

    गडद काळाचा साक्षीदार

    नव्वोदत्तरी पिढी वेगवेगळ्या अर्थानं वेगानं बदलणाऱ्या काळात जगते आहे. विविध संभ्रमात जगताना शेकडो तुकड्यात विभागलं जाण्याच्या काळात अक्षय शिंपी राहाताहेत. हा कवी ज्या काळात जन्मला आणि वाढला, तो गेल्या चाळीसएक वर्षांचा काळ पाहिला तर लक्षात येतं, की या पिढीच्या अंगावर एकाच वेळी अनेक गोष्टी आदळत होत्या. माहिती-तंत्रज्ञानानं जगाच्या उघडलेल्या खिडक्या आणि त्यासोबत आलेलं खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण होतंच, पण जगभरात आणि विशेषतः भारतात झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणानंही बदललेलं समाजमन ही पिढी पाहत होती. बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगली, त्यातून वाढत गेलेली धार्मिक तेढ, मुंबईत झालेले बॉम्बस्फोट आणि या सर्वांचा परिणाम म्हणून लोकांच्या मनात एकमेकांच्या धर्माविषयी वाढत गेलेला कडवटपणा, त्याचा राजकीय सत्तेसाठी उठवला गेलेला फायदा, पुढे झालेलं गोध्राकांड आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून जागी झालेली हिंदू अस्मिता आणि उसळलेल्या दंगली, त्यात होरपळली गेलेली विशिष्ट धर्माची अनेक निरपराध माणसं.

    कोणत्याही संवेदनशील माणसासाठी हा एक अस्वस्थतेनं भरून टाकणारा काळ होता. खरं तर आजही त्या काळातून आपण बाहेर आलेलो नाही. उलट त्या काळाचं अधिकाधिक विद्रूप स्वरूप आपल्यापुढे येत चाललं आहे. समाज माध्यमांचा वापर करून गेले दहा-बारा वर्ष या देशात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरण करून जे अराजक पसरवलं जातंय, ते भयावह आहे. या साऱ्याचा परिणाम या काळात लिहिणाऱ्या कवींवर होत आहे.

    समग्र नकाराच्या लाटांमधून
    कुठले ३६५ दिवस वेचून साजरं करावं नववर्ष
    त्याचा शक कुठल्या दिनदर्शिकेवर नोंदला जाईल...
    जुन्या दिनदर्शिका जपाव्यात जीवापाड.
    आपली रद्दी अधिक अधिक वातड होत गेली आहे
    हे तिच्या इतकं कुणीच प्रेमाने सांगत नाही. (काल खंड- अव्याहत)

    आपल्या जगण्याची रद्दी होत जाताना पाहणं ही संवेदनशील व विचारी माणसांसाठी शिक्षाच आहे. ती पाहत एका विचित्र तिठ्यावर घेऊन आलेला या सगळ्या काळात हा विचारी माणूस जगतो आहे. आजूबाजूला राजकीय अराजक तर आहेच, पण एवढे दिवस लोकशाही आणि संविधानातील मूल्यांवर विश्वास ठेवत वाढणाऱ्या मागच्या आणि आजच्या पिढीला गेल्या काही वर्षांत आपण नेमक्या कोणत्या चिखलात रूतत चाललो आहोत, हेच कळेनासे झाले आहे.

    Bincheharyaache_Cover
    जो संवेदनशील आहे, विचारशील आणि विवेकवादी आहे, अशा प्रत्येकाच्या भावनांचे प्रतिबिंब अक्षय शिंपी यांच्या काव्यातून उमटताना दिसते. तेव्हा त्यांची ही अभिव्यक्ती त्यांची एकट्याची न राहता, समष्टीची होऊन जाते...

    अस्वस्थ पिढीचा हुंकार

    एकीकडे समाजमाध्यमांनी व्यापलेल्या जगामुळे बाहेरचा मुक्त विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे, तर दुसरीकडे आजूबाजूला असलेला समाज त्यांना काही दशकं आणि शतकं मागे मागे घेऊन चाललेला दिसतोय. एकूणच या काळात त्यांना हव्या असलेल्या जगाचा आणि वास्तवातील जगाचा सतत संघर्ष होतोय. त्यामुळे व्यक्ती म्हणून जगण्याचे रस्ते बंद झाल्यासारखं वाटतंय. आपल्याला हवंय खूप काही आणि काहीच मिळत नाही, ही तीव्र होत चाललेली भावना आणि त्यासोबत जगताना हाती लागलेले निरर्थक पोकळ शब्द.

    ‘वर्तुळाकार पाराच्या परिघात झाड अगदी सुरक्षित आहे. पार त्याच झाडाशी बांधिलकी ठेवून आहे. इतरांना त्याच्या परिघात मज्जाव आहे.
    झाड पाराची नजर चुकवून आपली मुळं जमिनीत खोलवर रूजवत नेत आहे, गनिमी काव्यासारखी....
    हळूहळू मला जाणवतं, माझ्या कण्याला पारासारखाच बाक येऊ लागलाय,
    माझ्या त्वचेच्या अस्तराचे टवके उडून आतल्या नसाधमन्याचं शेवाळ भेगांमधून बाहेर डोकावतंय,
    माझ्या परिघावर अनेकांनी आपल्या अस्तित्वाचे पुरावे सोडलेत वेगवेगळ्या रुपांत.
    जणू मी म्हणजे सार्वजनिक शौचालयच.’ (परकाया प्रवेश)

    आपल्या आयुष्याचं दलदलीत रुपांतर होताना पाहणारी ही पिढी अस्वस्थ आहे, ती आपण काहीच करू शकत नाही या असह्य भावनेनं. खरं तर चळवळींचा काळही त्यांनीही थोडाफार पाहिला आहे. या चळवळी आज छोट्याछोट्या कोपऱ्यांमध्ये सुरु आहेत. त्याविषयी संवेदनशील असलेल्या या कवीला आत्मीयता आहे. पण आपण काहीच करू शकत नाही, ही भावना प्रबळ होत चालली आहे. म्हणूनच जगताना वाट्याला आलेला प्रत्येक दिवस निरर्थकपणे घालवताना तो मांडत राहतो, हिशेब एका एका क्षणाचा, मिनिटांचा, तासांचा, वारांचा. सोमवार ते शनिवार चिरफाळत राहायचं, ‘अन् मग रविवारी काढायची सोलून त्वचा, धुवून काढायच्या मेलेल्या पेशी, ओकायचे अशुद्ध रक्त,/सोडायचे उच्छ्वास, श्वासनलिका शुद्ध करून घ्यायची,/शरीर ताजं करून घ्यायचं -/नव्या सहा दिवसांच्या/नव्या सिगरेटी जिरवायला./इथे इच्छानिच्छेचा प्रश्न नाहीच.’ (रविवार)

    MovieScene
    काव्यप्रतिभेला अभिनय, लेखन आणि सजग सामाजिक भानाची जोड असल्यामुळे अक्षय शिंपी यांच्या कविता टोकदार तर होतातच, सोबतच आत्मचिंतनास प्रवृत्तही करतात...

    जगण्याची इच्छा नसताना लादलं केलेलं हे आयुष्य ही पिढी जगते आहे. नेमकं काय करायचं आहे, आजच्या या आत्मकेंद्री जगात, हे कळत नाही त्यांना. जागतिकीकरणाचे फायदे घेऊन श्रीमंत झालेल्या नव्या मध्यमवर्गाच्या संवेदनाच हरवत चालल्या आहेत. आत्ममग्न झालेल्या या लोकांच्यात आणि या कवीसारख्या संवेदनशील माणसांत एक मोठी दरी निर्माण झाली आहे. हा कवी परिवर्तनाच्या चळवळींनी प्रभावीत झालेला आहे. पण आज या चळवळी आणि त्यातून आलेलं परिवर्तन वगैरे केवळ बोलण्याच्या पोकळ गोष्टी झाल्यात की काय, असा माहोल तयार केला गेला आहे. धार्मिक ध्रुवीकरणामुळे ग्लोबल बनलेल्या आजच्या विश्वात पुन्हा संकुचित अस्मितांचं पीक बहराला यायला लागलं आहे.

    पुरला गणगोत रोवला दगड
    आता माझा मीच मुक्तछंद
    नुरला ना पाश भणंग बेभान
    अवघाची मास्क झुगारिला. (मीच)

    आपली मुळं सांभाळायची, अस्मिता जपायच्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा, असलेले नातेसंबंध सांभाळायचे की नसलेल्या संबंधांची चिरफाड करत फँटसीत रमायचं, हे कळेनासे झालेली ही पिढी आता सगळे मुखवटे झुगारून देते आहे आणि सभोवताली पसरलेला अंधार स्वीकारते आहे.

    इतका इतका अंधार मौजूद आहे
    की सूर्यही,
    अंधारच पाडतो प्रकाश नावाचा,
    आदिम काळापासून

    हा स्वतःला हवा तोच प्रकाश पाडणारा अंधार आजूबाजूला असण्याच्या काळात या पिढीतले लेखक, कवी आपलं तुकड्या तुकड्यात विभागलं गेलेलं जगणं आणि मानगुटीवर स्वार झालेला विचित्र काळ यांच्यातील विसंगती टिपण्याचा प्रयत्न करताहेत. आज लिहिणाऱ्या अनेक कवींच्या कवितेत सभोवार दाटून आलेली असहायता आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शोध तसंच जागतिकीकरणानं जवळ आलेल्या जगात जगताना झालेली विखंडित अवस्था परावर्तित झालेली दिसते.

    खरं तर महानगरातलं वास्तव मर्डेकरांच्या काळात जसं होतं तसंच आजही आहे. मुंबईत आणि इतर महानगरांत तर जमिनींना इतकं मोल आलं, की मुंबईतला खलनायक बदलला. या आधी अधोविश्वाशी असलेलं मुंबईचं नातं हळूहळू या धनदांडग्या बिल्डर लोकांशी जोडलं गेलं. वाढती बेकारी आणि त्या बेकारीतून आर्थिक सुबत्ता भोगणाऱ्या समाजाप्रती तयार होत गेलेली नकारात्मकता हा आजच्या महानगरांचा आणि महानगरांकडे वाटचाल करणाऱ्या शहरांचा विशेष होत गेला. तो आपल्याला जसा पाब्लो नेरूदाच्या कवितेत दिसतो किंवा मराठीत मढेकरांपासून नामदेव ढसाळांच्या कवितेत दिसतो, तसा तो अक्षयच्या कवितेतही येताना दिसतो.

    शहर साकळत जातं रक्तात
    शहराच्या लहान लहान गुठळ्या
    पेशींसोबत संचारू लागतात शरीरभर.
    शरीरात हाडं आहेत
    शहरातल्या उंचच उंच टॉवर्सची
    अन् खड्डे शरीराची भोकं. (पार्थिव)

    कवटीत ठासून भरलेला शहराचा भुस्सा जगण्याचा अपरिहार्य भाग झालाय, या पिढीच्या. अखंड वाहतानाच अखंड स्तब्ध असलेल्या या निर्मनुष्य शहरातून वाहाणाऱ्या अंत्ययात्रा पाहत राहतोय कवी आणि म्हणतोय की,

    एक शहर उगवत जातंय,
    जखमांच्या वेशीवर मला टांगत. (जखम)

    गेल्या वीस-पंचवीस वर्षांत, विशेषतः बाबरी पाडल्यानंतर, रूजत गेलेलं हिंसेचं झाड आता तरारून आलं आहे. गेल्या दहा वर्षांतील घटनाक्रमावर नजर टाकली, तर लक्षात येतं की व्यवस्थेविरोधात आवाज उठविणाऱ्या आणि आपल्याला नको वाटणाऱ्या लोकांना संपवण्याचं काम वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू झालं आहे. मग ते एका विशिष्ट धर्माच्या किंवा जातीच्या लोकांना झुंडीनं मारण्याचे असेल किंवा झुंडीनं बलात्कार करून स्त्रियांची धिंड काढण्याचे प्रकार असतील. अशा वेगवेगळ्या जखमा आपण वागवतो आहोत मनात. अशा काळात हा कवी म्हणतो,

    एक जखम फुलतीय निखाऱ्यासारखी,
    रक्तातला वारा पिऊन.
    एक जखम विस्तारतीय वसाहतवादी हिरीरीनं
    मेंदूतल्या गल्ल्यागल्ल्यांत लाल झेंडे फडकावत.
    एक जखम जिंकत चाललीय
    तालिबानी उन्मादात एकेक अवयव

    आज माणसं केवळ असहिष्णू राहिली नाहीत, तर उन्मादी झाली आहेत. गटागटानं हल्ले करताहेत. धार्मिक उन्मादाबरोबरच एकमेकांविषयी पराकोटीचा द्वेष पसरवण्याचं काम आजचा आपला सोशल मीडिया करतो आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर पाठविलेल्या मेसेजेसमधून तथाकथित राष्ट्रभावना जागवल्या जातात. आपल्या धर्माची दुसऱ्या धर्माशी तुलना करत आपल्याला काय काय नाकारलं आहे, याची यादी देतात. देशभक्ती म्हणजे संस्कृती रक्षण आणि संस्कृती म्हणजे धर्माचरण असा विचार मांडला जातो. अशा काळात हा कवी विचारतोय,

    बॉम्बला उगवू शकतील हातपाय?
    AK-47 मधून उगवून येतील वेली?
    रणगाड्यांतून उगवतील खानावळी?
    भाल्याच्या टोकावर उगवेल फुलदाणी?
    फासाचा दोर होईल का ब्रेसलेट?
    काट्यांना फुटतील गायीचे डोळे?
    माझ्या प्रश्नांना मिळेल का मोक्ष? (काही प्रश्न)

    एकूणच हा सारा काळ हा आत्मकेंद्री होण्याचा, संमोहित होण्याचा असा काळ आहे. या काळात कणा हरवलेले लोक आजूबाजूला दिसताहेत आणि अशा लोकांत राहिल्यावर आपलाही कणा हरवून गेल्याची शंका मनात येत राहते. ही शंका संवेदनशील माणसासाठी अतिशय भयावह असते. या भयातून कधीकधी हताशा येते आणि मग स्वीकारही. मग तो म्हणतो, नुकताच मी कणा काढून ठेवलाय, कणा काढून ठेवलेल्या उरलेल्या शरीराचं काय करायचं, याच्या सूचना देत हा कवी शेवटी सांगतो, ‘माझी हाडं जपून ठेवा त्याच्या कुबड्या करून त्या तुम्हाला वापरता येतील.’ ही सारी हताशा आणि असहायता आजच्या जगात अनेकांच्या मनात दाटून आलेली दिसते. आजूबाजूची हिंसा हताशपणे पहाण्याशिवाय आणि शब्दांतून व्यक्त करण्याशिवाय हाती काही राहत नाही, तेव्हा मग कवी आपलं आपलंच पसायदान तयार करतो.

    दीर्घ नष्टचर्यांचा एक तुकडा पडल्यावर
    नव्या घरघरीचा नवा अध्याय
    सज्जच असतो सजून-धजून.
    श्वास घेण्याआधी वा पापणी लवण्याआगोदरच
    घाला पडतो नव्या ३६५ श्लोक असलेल्या बारा अध्यायांचा.
    स्वाहाकार हे एकच पालुपद असलेल्या
    सर्व श्लोकांच्या ज्वाळांत आहुती देण्याचं बळ नवी घरघर देवो
    हेच पसायदान. (सरत्या डिसेंबरचा शोक)

    अक्षय शिंपी या त्यांच्या छोटेखानी कवितासंग्रहात जगण्यातली असाहाय्यता, निरर्थकता आणि आलेलं एकाकीपण अतिशय समर्थपणे व्यक्त करतात. त्यांची स्वतःची अशी शैली आहे. शब्दाची भाषेची त्यांना जाण आहे. नेमके शब्द वापरत, ते आपल्या मनातला कल्लोळ कागदावर उतरवतात. जगण्यातला हा अव्यक्त असा उद्वेग ‘अव्याकृत’ या संग्रहातून ते समर्थपणे मुखर करतात. त्यांच्या पुढील लेखनासाठी त्यांना मनःपूर्वक सदिच्छा!

    -oOo-


    Neeraja
    नीरजा

    नीरजा या नामवंत कवयित्री, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींवर व्यक्त होत राहणाऱ्या सजग नागरिक आहेत.
    ईमेल : nrajan20@gmail.com



रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा जोखताना...

  • ग्रंथ दालन

    Paaulkhuna_PramodM
    लेखक, अनुवादक आणि कार्यकर्ते प्रमोद मुजुमदार

    ‘दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ या पुस्तकातील माहितीसाठीचा आधार ‘गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ इंडिया’ हा अक्षय मुकुल यांचा संशोधित ग्रंथ असल्याची नोंद देऊन लेखक प्रमोद मुजुमदार म्हणतात, ‘हे पुस्तक म्हणजे मूळ पुस्तकाचा अनुवाद नाही किंवा त्याचे संक्षिप्तीकरण नाही. तर मूळ ग्रंथाचा आधार घेऊन केलेली स्वतंत्र मांडणी आहे.’ पुस्तकाच्या अखेरीस संदर्भ ग्रंथांच्या यादीत अक्षय मुकुलांच्या पुस्तकाबरोबरच अन्य पुस्तकांचीही यादी आपल्याला आढळते.

    मुजुमदारांनी आपल्या पुस्तकाची रचना पाच भागांत केली आहे. पहिला, स्वातंत्र्यपूर्व भारत गीता प्रेसची रुजुवात; दुसरा, गीता प्रेस आणि कल्याण मासिकाची वाटचाल; तिसरा, हिंदुत्व तत्त्वज्ञान : एक वैचारिक कसरत; चौथा, हिंदुत्वाची राजकीय चढाई आणि पाचवा, ‘दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ - अन्वयार्थ. या सगळ्या भागांतील मुद्द्यांची सविस्तर नोंद देणे, हा या लेखाचा हेतू नाही. मूळ पुस्तक वाचायला वाचकांनी प्रवृत्त व्हावे, यादृष्टीने काही मोजक्याच मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

    धर्मसंस्था आणि भांडवलदार वर्गाची आघाडी

    इंग्रजी अमलाखालील बदलत्या अर्थव्यवस्थेत १८८०-९० पासून मारवाडी समाजाने व्यापार आणि उद्योगात कळीचे स्थान मिळविले. (आज अग्रणी असलेली औद्योगिक घराणी याच मारवाडी समाजातील आहेत.) तत्पूर्वी ‘ब्राम्हण-क्षत्रिय’ आघाडीकडे असलेल्या हिंदू धर्माच्या प्रतिनिधित्वात आणि नियंत्रणात मारवाडी समाजाचा शिरकाव झाला. व्यापार-उदिमासाठी देशभर विखुरलेल्या मारवाडी समाजाचे संघटन आणि त्याच्या सामाजिक स्तराचा-आध्यात्मिक मान्यतेचा मूलाधार असलेल्या सनातन हिंदू मूल्यव्यवस्थेच्या संवर्धनाची आग्रही भूमिका तो घेऊ लागला. त्यासाठीची आर्थिक संसाधने उभारणे त्याच्या आर्थिक संपन्नतेमुळे सोपे झाले. हिंदुत्वाच्या प्रसारासाठी विविध प्रकाशने त्याने सुरू केली. हिंदुत्वाच्या चिकाटीच्या प्रचार-प्रसाराचे नेतृत्त्व आता ‘ब्राम्हण बनिया' आघाडीकडे आले. हा क्रम या पुस्तकात तपशीलवार आला आहे.

    BlowingConch
    भूतकाळाचे भांडवल करून आक्रमक हिंदुत्वाची पायाभरणी करण्यात गीता प्रेसचा मोठा वाटा राहिला आहे. त्याची प्रचिती वर्तमानातल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असलेल्या कार्यपद्धतीमुळे येताना दिसतेय...

    याच मारवाडी समाजातील एका व्यापारी कुटुंबातील कार्यकर्ते व आध्यात्मिक विचारवंत हनुमानप्रसाद पोद्दार यांनी जयदयाल गोयंका तसेच अन्य सहकाऱ्यांसह १९२३ साली ‘गीता प्रेस’ ही प्रकाशन संस्था काढली. त्याद्वारे हिंदू धर्मविषयक विविध साहित्य प्रकाशित होऊ लागले. पुढे १९२६ साली गीता प्रेसमधूनच त्यांनी ‘कल्याण’ मासिक सुरू केले. हे सर्व साहित्य सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी त्याचे दर स्वस्त राहतील ही दक्षता घेतली गेली. हनुमानप्रसादांनी कल्याण मासिकासाठी तसेच गीता प्रेसच्या विविध प्रकाशनांसाठी आयुष्य वेचले. त्यांची जोपासना आणि प्रचंड विस्तार केला. हिंदुराष्ट्राच्या मोहिमेसाठी प्रचंड जिद्दीने तथापि अत्यंत लवचिकतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि संसाधनांची त्यांना कधीच वानवा पडली नाही. लेखकाने एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भारतात हिंदू राष्ट्र तयार व्हावे, हा केवळ संघपरिवाराचाच नाही, तर देशातील पारंपरिक प्रस्थापित उद्योगपतींचाही प्रकल्प असल्याने आर्थिक संसाधनांची मुबलकता हिंदुराष्ट्राच्या मिशनला कायम राहिली. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत जमिनदारीविरोध, सामान्य शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय, समाजवाद, सामाजिक समता यांचे वाजणारे पडघम संसाधनांची परंपरागत मालकी आणि सामाजिक उतरंडीत वरचे स्थान असलेल्यांना अस्वस्थ करणारे होतेच. त्यांचे हे स्थान आणि संसाधनांची मालकी धोक्यात येणार हे त्यांना दिसत होते. या धगीपासून वाचण्यासाठीचे प्रभावी साधन म्हणून गीता प्रेस, कल्याण मासिक आणि एकूणच पुराणमतवादी हिंदुत्व प्रचारणाऱ्या संघटनांना त्यांनी जोरदार साथ दिली. हे सहाय्य आणि त्याही आधी हनुमानप्रसादांची चिकाटी व कष्ट यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही गीता प्रेस आणि कल्याण मासिकाचा कारभार सांभाळणारी नवी नेतृत्वं उभी राहत गेली. अलीकडेच गीता प्रेसने शंभरी पार केली. कल्याण मासिक पुढच्या वर्षी शंभर वर्षांचे होईल.

    लेखक म्हणतात, ‘आज मागे वळून पाहिले तर गीता प्रेस आणि कल्याण मासिकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, हिंदी भाषा शुद्धीकरणाची चळवळ, गोरक्षा समिती इथपासून पुढे इंटरनॅशनल कृष्णा कॉन्शस (इस्कॉन) अशा सर्व हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना, संस्था, प्रसार मोहिमा यांना एकत्र बांधण्याचे काम केल्याचे दिसते. सन २०१४ पर्यंत कल्याण मासिकाचे दोन लाख वर्गणीदार आणि इंग्रजी कल्याण मासिकाचे एक लाख वर्गणीदार होते. तर ७ कोटी २० लाख गीता प्रती त्यांनी वितरित केल्या. पुराणे आणि उपनिषदांच्या एक कोटी नव्वद लाख प्रती आणि ७ कोटी तुलसीरामायणाच्या प्रती वितरित केल्या गेल्या.’

    लोकशाही मूल्यव्यवस्थेविरोधातले प्रकल्प

    भारतासारख्या अर्धशिक्षित, अशिक्षित देशात झालेला हा साहित्याचा प्रसार लेखकाने म्हटल्याप्रमाणे खरोखरच ‘अचंबित’ करणारा आहे. देशाच्या केंद्रस्थानी हिंदुत्ववाद्यांची निरंकुश सत्ता मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ साली स्थापन झाली. पण त्याच्या पायाभरणीचा हिंदुत्वाचा प्रकल्प शतकभर सुरू होता. आधुनिक मूल्यांचा जागर करणारी सामाजिक सुधारणांची चळवळ आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ यांचा दबदबा आणि देशव्यापी प्रभाव असतानाही गीता प्रेस व कल्याण मासिकाचे हिंदुत्वाचे अग्निहोत्र अखंड सुरू होते. सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्याची चळवळ यातील मूल्यांचे वारसदार विघटित व दुबळे होईपर्यंत हिंदुत्ववादी मंडळी केवळ दबा धरून नव्हती वा वळचणीला बसली नव्हती; ती अखंड सक्रिय होती. ती कायम हिंदुराष्ट्रासाठीच्या युद्धाच्या पवित्र्यात होती. युद्धतंत्रे म्हणून विविध डावपेच टाकत होती. स्वातंत्र्य चळवळीतील सौम्य हिंदुत्ववाद्यांना हाताशी धरत होती. मोठ्या कौशल्याने आपल्या कामाला काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांच्या शुभेच्छा मिळवत होती. कल्याण मासिकात त्यांना लिहायला लावत होती. स्वतंत्रपणे काम करत असल्या तरी हिंदुत्ववादी संघटना परस्परांना कायम पूरक आणि मदतनीस राहिल्या आहेत. हेडगेवारांच्या काळात संघात आलेल्या गोळवलकरांना गीता प्रेस आणि हनुमानप्रसाद यांना काही काळ सहाय्य करायला संघाने गोरखपूरला पाठवले. कल्याण मासिकात त्यांनी लिहिलेल्या लेखांमुळे उत्तरेत अनेक नवे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मिळाले. गोळवलकर पुढे संघाचे दुसरे सरसंघचालक झाले. या सर्व मंडळींकरवी समाजमन पोखरण्याचे, आधुनिक लोकशाही, समतेवर आधारित मूल्ये समाजमनातून निरस्त करण्याचे मिशन अहर्निश सुरू होते.

    चातुर्वर्ण्यकेंद्री दृष्टिकोन आणि प्रतिगामित्वाचा पुरस्कार

    गीता प्रेस व कल्याण मासिक काय प्रचारत होते, हनुमानप्रसाद वा त्यांच्या वर्तुळातील लेखक काय म्हणत होते ते दलित आणि स्त्रियांच्या संदर्भात थोडे समजून घेऊ. बाकी मुद्द्यांसाठी वाचकांनी मूळ पुस्तकच पाहावे.

    गीता प्रेसचे अध्वर्यू हनुमानप्रसाद हे सामाजिक समतेच्या पूर्ण विरोधात होते. अस्पृश्यतेचे ठाम समर्थक होते. ‘अस्पृश्यता पाळणे म्हणजे कोणाचाही अपमान करणे नाही. ती आमची धार्मिक रीत आहे’, ‘अस्पृश्यतेची प्रथा ही पूर्णपणे वैज्ञानिक असून त्याला धर्मशास्त्राचा आधार आहे’ अशी काही त्यांची वचने लेखकाने नोंदली आहेत. ‘गांधीजींनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा आग्रह धरणे, हा सनातन हिंदूंच्या धर्माचरणाच्या हक्कावर हल्ला आहे’ अशी स्पष्ट भूमिका हनुमानप्रसादांनी घेतल्याचेही लेखकाने नमूद केले आहे. चातुर्वर्व्याधारित सनातन धर्म ही कल्याण मासिकाचीही भूमिका होती. लेखकाने हनुमानप्रसादांनी गांधीजींना लिहिलेल्या एका पत्राची नोंद केली आहे. त्या पत्रात हनुमानप्रसाद गांधीजींना लिहितात, ‘तुमच्या उपोषणामुळे अस्पृश्यांच्या आंदोलनाला बळ मिळाले, अनेकांनी दलितांबरोबर सहभोजनाचे कार्यक्रम सुरु केले आहेत. तर अनेक मंदिरांनी अस्पृश्यांसाठी प्रवेश खुला केला आहे. अस्पृश्यांबरोबर सहभोजन आणि अस्पृश्यांना मंदिर प्रवेश हा हिंदू धर्मावरील मोठा हल्ला आहे. याचा काय दुष्परिणाम होईल हे त्या देवालाच ठाऊक!’ याही पुढे जाऊन पोद्दार अत्यंत कर्मठ आणि अमानुष भूमिका मांडतात. ‘अस्पृश्य जोवर अंघोळ करत नाहीत, स्वच्छ कपडे घालत नाहीत, दारु सोडत नाहीत, मृत जनावराचे मांस खाणे सोडत नाहीत, तोवर तुमच्या या ‘सहभोजनाला’ काहीही अर्थ नाही.’

    JaydayalGoenka
    जयदयाल गोयकांनी गीता प्रेसच्या माध्यमातून चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उघडपणे पुरस्कार केला. जोडीला रुढी-परंपरा आणि कर्मकांडांचा अधिकाधिक प्रचार-प्रसार होईल, या दिशेने साहित्याची अखंड निर्मिती देखील केली...

    पोद्दार आणि सनातनी हिंदुत्ववादी लोकांचा मुख्य टीकेचा रोख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर होता, असे सांगून त्या सर्व करण्याचा आव आणत पोद्दार लिहितात, ‘लक्षात घ्या, हे दलितांचे नेते (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) स्पष्टपणे म्हणत आहेत की त्यांची चळवळ ‘देवासाठी’ नाही, तर सामाजिक समतेसाठी आहे. त्यांना सरकारी नोकऱ्यांत हक्क हवा आहे...’

    पोद्दारांच्या पत्राला गांधीजींनी दिलेले उत्तरही लेखकाने या पुस्तकात नोंदवले आहे. गांधीजी म्हणतात, ‘...सनातनी सवर्ण हिंदूंनी अस्पृश्यतेची प्रथा आणि दलितांना मंदिर प्रवेशाची बंदी या प्रथा लादून हिंदू समाजात बहिष्कृत वर्ग तयार केला आहे. हीच मुळात ‘अधार्मिक गोष्ट’ आहे आणि क्रूर प्रथा आहे. दलितांना बहिष्कृत करण्यामुळे त्यांच्यावर अस्वच्छता लादली गेली आहे. हा हिंदू धर्मावरील दोष हिंदूंनीच दूर करायला हवा. हे त्यांच्याच (हिंदूंच्या) हिताचे आहे.’

    हनुमानप्रसाद, गोयंका आणि त्यांची गीता प्रेस व कल्याण मासिक हे दलितांप्रमाणेच स्त्रियांच्या अधिकारांबद्दलही अत्यंत कडवे होते. स्त्रीविषयक अनेक पुस्तिका, विशेषांक त्यांनी काढले आहेत. ‘आदर्श हिंदू नारी’ या कल्पनेचा गीता प्रेस आणि कल्याण मासिकात कायमच पुरस्कार केला गेला, असे लेखकाने म्हटले आहे. त्यांनी ‘आधुनिक शिक्षणामुळे स्त्रिया भ्रष्ट आणि नष्ट होतात, शिक्षणसंस्था म्हणजे अनैतिक संबंधांचे अड्डे आहेत, अशा स्थितीत स्त्री-पुरुषांनी एकमेकांपासून दूर राहणे हाच योग्य मार्ग’ अशा गोयंकांच्या काही विधानांची नोंद केली आहे.

    मनुस्मृतीचा पुरस्कार, धर्मशास्त्रानुसार घटस्फोट अमान्य, हिंदू विवाह हा करार नव्हे तर दोन आत्म्यांचे मीलन, घटस्फोट घेणाऱ्या स्त्रिया म्हणजे राक्षसी आणि जनावरासम, मातृत्वाच्या उदात्त ध्येयासाठी नवऱ्याच्य छळाकडे दुर्लक्ष करणे हितावह, मासिक पाळीच्या काळात स्त्रियांची कामेच्छा अनियंत्रित होत असल्याने मुली वयात आल्या आल्या त्यांचे विवाह करणे, बालविवाह प्रतिबंधक कायद्याला विरोध, स्त्रियांचे स्वातंत्र्य म्हणजे समाजाचे नैतिक अधःपतन, व्यायामामुळे स्त्रियांचा नाजुकपणा नष्ट होतो, स्त्रिया हे केवळ वंशवृद्धीचे साधन, कोणत्याही पुरुषाच्या लैंगिक भावना उद्दिपित करण्याची शक्ती स्त्रियांच्यात असल्याने स्त्रियांनी कधीही आपले वडील, भाऊ आणि मुलासोबतही एकांतात राहू नये... अशी असंख्य वचने गीता प्रेस प्रकाशित साहित्यात आणि कल्याण मासिकात नोंदली गेली आहेत.

    हिंदू कोड बिलाला गीता प्रेसवाल्यांचा विरोध होणे, तर अगदी स्वाभाविक होते. कल्याण मासिकात ‘हिंदू कोड : हिंदू संस्कृति के विनाश का आयोजन’ या शीर्षकाचा मोठा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याची नोंद देऊन लेखक म्हणतात, ‘सर्व सनातन हिंदू धर्म समर्थक एकजुटीने नेहरु आणि डॉ. आंबेडकरांवर तुटून पडले. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध तर अत्यंत हीन पातळीवर जाऊन जहरी टीका सुरू केली. ‘हा स्वतः हीनवर्णीय माणूस, यांनी म्हातारपणी एका ब्राम्हण स्त्रीशी विवाह केला आणि आता आमच्या धर्मावर हल्ला करणारे हिंदू कोड बिल त्याने आणले आहे.’

    गांधीजींशी डावपेचात्मक संबंध ठेवणाऱ्या हनुमानप्रसाद पोद्दारांना नंतर गांधीजी हे सनातन हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या मार्गातील ‘मोठी धोंड’ आहे, असे वाटू लागल्याचे निरीक्षण लेखक नोंदवतात. पुढे सनातनी शक्तीच्या प्रेरणेने व सहाय्याने ही धोंड नथुराम गोडसे दूर करतो. गांधीजींचा देह अचेतन होतो. पण त्यांचा प्रभाव जिवंतच राहतो. ज्यांच्याशी गांधीजींइतकेही संबंध ठेवणे हिंदुत्ववाद्यांना शक्य होत नाही, असे जवाहरलाल नेहरु पुढे दीर्घ काळ या शक्तींचे क्रमांक एकचे शत्रू राहतात. आजही आहेत. मृत नेहरुंचे भूत त्यांना कायम छळत असते.

    सम्यक प्रबोधनाचा उतारा आवश्यक

    सामाजिक समतेसंबंधीच्या हनुमानप्रसाद, पर्यायाने गीता प्रेस व कल्याण मासिक यांच्या भूमिका लेखकाने सविस्तर मांडल्या आहेत. त्यांची ओळख करुन देताना मीही त्यातला बराच भाग इथे नोंदवला आहे. याचे कारण दलितांना वश करण्याची बरीच यशस्वी खटपट करणाऱ्या, त्यासाठी हरघडी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर दंडवत घालणाऱ्या आजच्या संघ-भाजपाचे मूळ वैचारिक घराणे संबंधितांना कळावे. गांधीजी आणि काँग्रेसशी बाबासाहेबांचे तीव्र मतभेद होते. पण या दोहोंत लोकशाही, समता, सामाजिक न्याय याबद्दल सहमती होती. या आधुनिक मूल्यांच्या, समतेच्या व मानवी मूलभूत हक्कांच्या विरोधात आजच्या संघ-भाजपाचे पूर्वसुरी होते. त्यामुळे त्यांना गांधी, नेहरु, काँग्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळेच शत्रू स्थानी होते. त्यांच्या हिंदुराष्ट्राच्या मोहिमेतील हे मोठे अडथळे होते. आज अनधिकृत हिंदू राष्ट्राचा अमल सुरूच आहे. संविधान नावापुरते राहिले आहे. तेही जाऊन येऊ घातलेल्या अधिकृत हिंदुराष्ट्राच्या पूर्ततेची दिशा रोखायची असेल, तर ज्यांना ज्यांना सनातनी हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला होता, त्या सगळ्या लोकशाही, प्रगतिशील शक्तींची संयुक्त आघाडी होणे नितांत गरजेचे आहे. राजकीय सत्तेवरुन हिंदुत्ववादी शक्तींना बेदखल करण्यासाठीची राजकीय मोर्चे बांधणी करतानाच या शक्तींनी विषाक्त केलेल्या समाजमनाला सम्यक प्रबोधनाचा उतारा द्यावा लागेल. सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्याची चळवळ यांचा वारसा असलेल्या प्रगतिशील, लोकशाहीवादी संयुक्त आघाडीला विस्कटलेल्या समाजमनाची घडी नीट बसवण्याचे काम दीर्घकाळ करावे लागेल. त्यासाठीचा आदर्श आपल्या विरोधकांकडून, गीता प्रेस आणि कल्याण मासिक चालवणाऱ्यां-कडून जरूर घ्यावा. संघ-भाजपविरोधी लोकशाहीवाद्यांची संयुक्त आघाडी हे माझे मत आधी होतेच. प्रमोद मुजुमदारांचे हे पुस्तक वाचून त्याचे महत्त्व आणि तातडी अधोरेखित झाली.

    -oOo-

    हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया
    लेखक : प्रमोद मुजुमदार
    लोकवाङ्मय गृह, मुंबई
    पृष्ठे २३२ । किंमत ३०० रुपये


    SureshS
    सुरेश सावंत

    सुरेश सावंत हे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक आहेत.
    ईमेल: sawant.suresh@gmail.com



उत्तुंग दीपमाळेचा झळाळता आयुष्यपट

  • बुक लाउंज

    IRU_IrawatiDinkar

    नरहर कुरुंदकर म्हणून गेले होते, की इरावतीबाईंचे मन त्यांच्या विशिष्ट जीवनक्रमामुळे तीन पातळ्यांवर वावरणारे होते. मनाने सुसंस्कृत असणाऱ्या आणि जीवनात रस घेणाऱ्या या विदुषीला आपण स्त्री आहोत, गृहिणी आहोत याचीही उपजत जाणीव होती. मातृत्वात आपल्या जीवनाची परिपूर्ती आहे याचीही जाणीव होती. म्हणून त्या घरात, संसारात आपल्या प्रिय पतीत, मुलाबाळांत समरस झालेल्या आणि रमलेल्या होत्या. समृद्ध सहजीवनासाठी आवश्यक असलेला समरसता हा त्यांच्या व्यक्तित्वाचा एक उपजत गुणधर्म होता. त्यामुळे त्यांचं किंवा त्यांच्या संदर्भात आलेलं काहीही वाचायचं याची खूणगाठ माझ्या मनाशी पक्की होती. लग्नानंतर कर्वेच्या घराचं मोठेपण लाभलेल्या इरावतीबाई म्हणतातः केवढे माझे भाग्य, की मी अशा माणसाची सून झाले! त्याही पेक्षा केवढे महत्तर माझे भाग्य, की मी अशा माणसाची बायको झाले नाही!

    हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण मला मात्र या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील ‘निसर्गायन’चे दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी आठवले. निसर्गाच्या सान्निध्यातलं अतिशय संयमित आणि कठोर जगणं बघून दिलीपजींची आई म्हणते, तू माझा मुलगा आहेस हे थोरच आहे. पण मी तुझी बायको नाही, याचा मला अधिक आनंद आहे... असो.

    रम्य गाठोडं संचिताचं...

    अलीकडेच माधव गाडगीळ यांच्या ‘सह्याचला आणि मी : एक प्रेमकहाणी’ या पुस्तकात देखील इरावतीबाईंचा खूपच आत्मीयतेनं केलेला उल्लेख वाचायला मिळाला होता. माधवरावांना सुरूवातीच्या काळातच इरुकाकूंचा समृद्ध सहवास लाभल्यामुळे त्यांची पुढची दिशा सुस्पष्ट झाली. त्या उत्खननाच्या कामाला गेल्या की, केव्हा परत येताहेत याची ही सर्वजण मोठ्या उत्कंठेने वाट बघायचे. कारण आल्या-आल्या इरुकाकू आपल्या पोतडीतून गारगोटीची पाती, हाडांच्या सुया अशा खूप गमती-जमती काढून दाखवायच्या, अश्मयुगातील मानव जगायचा तरी कसा, याच्या गोष्टी सांगायच्या. त्याच काळात निसर्गरम्य कोडागु जिल्ह्यातल्या मडिकेरीत मानववंशशास्त्रीय संशोधनासाठी जाताना त्यांनी माधवलाही नेल्याने या महिन्याभरात खूप काही नवे शिकायला मिळाले याची, स्वतः माधवराव खूप प्रेमानं नोंद घेतात, तेव्हा मला मात्र थोरोच आठवत राहिला. कारण वाल्डेनच्या तळ्याकाठी अनुभवलेल्या निसर्गातल्या चमत्कारिक गोष्टी ऐकायला थोरोच्या शेजारीपाजारी राहणारी लहान मुले-माणसे उत्कंठतेनं त्याचीही अशीच कमालीच्या उत्कंठतेनं वाट बघायची.

    कथाकार अरविंद गोखले यांना एक कथा लिहिताना नायिकेचे नावच सुचेना. ही प्रसिद्ध कथा म्हणजे, अविधवा. यावरच नंतर ‘माझं घर माझी माणसं’ हा चित्रपट निर्माण झाला. तर अरविंद गोखले कथेच्या तंद्रीत घराच्या पडवीत येरझारा घालत असताना अचानक समोरून एक तरूणी काष्टी साडीत सायकलवरून जाताना दिसली. त्या काळातली ज्या तरूणीची पुण्यात बंडखोर म्हणून ओळख प्रस्थापित झालेली होती. ती दुसरी तिसरी कुणी नसून इरावतीच होती, त्याच क्षणी गोखलेंना कथेतील नायिकेचे इरावती हे नाव सापडले आणि संपूर्ण कथेतील व्यक्तिमत्त्वच झळाळून उठले. इरावतीबाई म्हणजे, त्या काळात १९५२ सालात, लॅम्ब्रिटा स्कूटर चालवणाऱ्या विद्याधर पुंडलिकांच्या शब्दांत सांगायचे तर पुण्यातील पहिल्या ‘रोमन महिला’. यावर स्कूटर विकणारे दिनकररावांकडे तक्रार करायचे की मॅडममुळे ही स्कूटर लेडीज असल्याची सार्वत्रिक भावना झाल्यानं आमचा धंदा मार खातोय. पुरुष मंडळी स्कूटर विकतच घेत नाहीत आणि दुसरीकडे पुण्यात बायका वाहन चालवत नाहीत.

    लोभस माणूसपण

    खरंतर ‘दीपमाळ’ पुस्तकाची अनेक ठिकाणी अनेक विद्वजनांनी आपापल्या तन्हेनं ओळख करून दिली आहे. अनेकांनी त्यांची विद्वत्ता, हुशारी, शैक्षणिक कर्तृत्व याबद्दल भरभरून लिहिलंय, पण मला त्यांच्या आत दडलेले माणूसपण खुणावत राहिलं. या निमित्ताने इरावती कर्वे ही व्यक्तिरेखा जी आमच्या पिढीने निव्वळ वाचनातूनच अनुभवलेली आहे तिचा धांडोळा घ्यावासा वाटला, त्याचाच हा अल्पसा लेखा-जोखा.

    या पुस्तकात तसा बऱ्यापैकी बाईंचा लेखन प्रवास उलगडत जातो. प्रतिभा कणेकर या लेखिकेने अनेक संदर्भ तपासत बाईंचं विदुषीपण या पुस्तकात अधोरेखित केलं आहे. वेदवाङ्मय, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी आणि प्रमुख पाश्चात्त्य तत्त्वज्ञ यांचा वैचारिक गाभा त्यांना माहीत होता. ललित सौंदर्य, सामाजिक आणि सांस्कृतिक आशय आणि मूल्यविचार या तिन्ही पातळ्यांवरून त्यांचा महाभारत, रामायणाचा व्यासंग होता. महाभारताच्या भव्य आणि शाश्वत अशा ललित आणि विचार सौंदर्याचे क्षितिज त्यांच्या ‘युगांत’मुळे विस्तारत गेल्यासारखे वाटते. तथापि या सर्वात त्यांना प्रेम होते, ते मात्र स्वतःच्या समाजशास्त्र आणि मानवशास्त्र या विषयांवर. केवळ अखंड बौद्धिक निष्ठा आणि अपार कुतूहल, जिज्ञासा असल्याने त्या अखेरपर्यंत लेखन आणि संशोधन करू शकल्या. याच प्रचंड बौद्धिक आकांक्षेपायी सत्ता आणि प्रभुत्व गाजवण्याचे ताणही त्यांनी सहन केल्याची नोंद आहे. त्या जितक्या स्वतंत्र बाण्याच्या होत्या तितक्याच वत्सलही होत्या. पराकोटीचा राग आणि पराकोटीचे प्रेम त्यांच्या जवळच्या लोकांनी अनुभवले आहे. विठोबाबद्दल असलेल्या आत्मीयतेनं लोक त्यांची चेष्टाही करायचे, पण बाईंचा याबाबत साधा सरळ विचार होता की महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथे तुकाराम, ज्ञानेश्वर यांचेदेखील माथे टेकले, तिथे मी कोण बापडी. त्या अपार वत्सलतेनं, डबडबत्या डोळ्यांनी म्हणाल्या आहेत, की ज्ञानेश्वरांनी घेतलेल्या समाधीसारखी मनाला खोलवर जखम करणारी जगात दुसरी कुठलीही घटना नसेल.

    अभंग नि टवटवीत मन

    विठ्ठलराव घाटे यांनी बाईंबद्दल अशी नोंद केली आहे की कोंबडीसारखा कोणा ना कोणावर तरी पाखर घालण्याचा त्यांना हव्यासच होता. स्त्रीसुलभ ऋजुतेच्या, पुरुषामुळे स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या अपरिहार्य दुःखामुळे आलेल्या खोल शहाणपणाच्या त्यांच्या सौंदर्य जाणिवांना, कधी वेडेवाकडे विद्रूप तडे गेले नाहीत. उलट वाढत्या वयाबरोबर त्यांचे स्त्री-मन अभंग अन् अधिकाधिक टवटवीत राहिले. ‘कुंती’, ‘गांधारी’, ‘द्रौपदी’, ‘आजोबा’ या सर्वांची व्यक्तिचित्रे रंगवताना बाईंनी अस्तित्वाचा हाच आदि सूर धरला आहे- स्त्रीला कोणातरी पुरुषामुळे फार अटळपणे सोसावे लागणारे दुःख! पुरुषाच्या कणखर अस्तित्वाच्या अभावी घराला आलेले मलूल सुनेपण, उत्खननात सापडलेल्या स्त्रीचा सांगाडा पाहून सनातन स्त्रीच्या सखीपणाचा (हा संदर्भ वाचताना मलाही माझ्या सखीचा नव्याने साक्षात्कार होत गेला.) होत गेलेला साक्षात्कार, गल्लीतल्या वर्षानुवर्षाच्या भाजीवालीचा अबोल ओळखीचा वाटणारा आधार – ‘परिपूर्ती’ आणि ‘भोवरा’ यामध्ये आलेल्या बाईंच्या भावविश्वातील असल्या ‘थीम्स’मध्ये या शहाण्या जाणिवा व्यक्त झालेल्या आहेत. मिलिंद बोकील म्हणतात की, भारतीय समाजाला गोधडी म्हणणे हीच इरावतीबाईंची मुख्य देणगी आहे. कारण, इथे जे निरनिराळे गट आहेत त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध हा गोधडीसारखाच आहे. या सगळ्या विद्याधर पुंडलिकांपासून अनेकांनी केलेल्या नोंदींचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना पदोपदी येत जातो. आमच्यावरचा बाईंचा प्रभाव निव्वळ त्यांच्या तांत्रिक पुस्तकांचा नसून, या अशा ललित लेखनाचाही आहे. या सगळ्या वाचनात एक गोष्ट ठळकपणे जाणवते. ती म्हणजे, दिवा जसा उजळला की मी अंधार दूर केला, याची शेखी कधीच मिरवत नाही. तद्वतच बाईंचा प्रवास होता. भोवताल आपल्या ज्ञानाच्या उजेडात उजळवून टाकताना सहवासात आलेल्या सर्वांनाच मोठं करून टाकणारं हे व्यक्तिमत्व निव्वळ या पुस्तकापुरतं मर्यादित नाही, यानिमित्ताने त्यांच्या सगळ्याच पुस्तकांचा आस्वाद घेतला जावा हीच अपेक्षा आहे.

    म्हणजे, हे पुस्तक वाचता वाचता इरावतीबाई जशा उलगडत जातात ते, अनुभवताना फरहात शेहजादचा शेर समोर आला.

    एक बस तू ही नहीं मुझ से ख़फ़ा हो बैठा
    मैंने जो संग तराशा था ख़ुदा हो बेठा

    त्यांनी स्वतःच्या संशोधनात अनेक शिखरे पादाक्रांत केलीच, पण भोवताली असलेल्या, सोबत काम करणाऱ्या लोकांनाही एका उंचीवर नेऊन ठेवले, तिथवर येण्यासाठी लागणारी हरएक मदत केली. इरावतीबाईंनी विठ्ठल हा सखा, सोबती आणि अगदी आधुनिक परिभाषेत बोलायचं झालं तर ‘बॉयफ्रेंड’च असा लेख लिहिला. तो त्या काळातील प्रसिद्ध आणि दर्जेदार अशा अभिरूचीत छापूनही आला. त्यांच्या या विठ्ठलवेडाविषयी स्वतः पु. ल. देशपांडे यांनी देखील लिहिलंय की, पंढरीचा अबीर-बुक्का वाटावा तसा ‘वारी’ हा लेख वारीचा प्रसाद म्हणूनच समजला पाहिजे. मला मात्र प्रा. सरोजिनी बाबर यांनी गोळा केलेल्या लोकसाहित्यातील अभंग आठवला...

    रूकमिनी विचारती देवा जनीचं काय नातं?
    विठ्ठल सांगितो, पाखरू वस्तीला आलं हुतं!

    याच लोकसाहित्याची चर्चा करायला प्रा. सरोजिनी बाबर आल्या असताना त्यांना माझ्या बॉय फ्रेंडला भेटलात की नाही असंही इरावतीबाई विचारतात, तेव्हा प्रोफेसर चमकल्या, मग हळूच मिश्किल हसत आपल्या बॉयफ्रेंडचं गुपित त्यांना सांगितलं.

    डौलदार आणि नेटकी जीवनशैली

    प्रा. सरोजिनी बाबर आणि इरावतीबाईंचा अपार स्नेह होता. सरोजिनीबाईंच्या मधल्या बहिणीच्या लग्नासाठी इरावतीबाई संपूर्ण पारंपरिक वेशभूषेत आल्याची आठवणही त्या सांगतात. ‘युगांत’ला मिळालेल्या साहित्य अकादमीचा पुरस्कार स्वीकारायला इरावतीबाई दिल्लीला जायला निघाल्या तेव्हा, अचानक विमानात त्यांना सरोजिनी बाबर भेटल्या. त्याबाबतची एक स्नेहाळ आठवण त्यांनी सांगितली आहे. दोघींच्या अनेक विषयांवर गप्पा वगैरे झाल्या. उतरण्याच्या वेळी इरावतीबाई म्हणाल्या, मला घ्यायला गाडी येणार आहे, मी तुम्हाला तुमच्या निवासस्थानी सोडून जाईन. इरावतीबाईंची छोटीशी बॅग त्यांच्या पायाशीच होती. सरोजिनी बाबरांची बॅग सामानात मागे ठेवलेली आहे, हे समजल्यावर त्या इतकंच म्हणाल्या, ‘आपलं सामान नेहमी आपल्यापाशी हवं.’ विमानातून उतरल्यावर त्या सरोजिनी बाबरांची बॅग येईपर्यंत थांबल्यादेखील. नंतरच्या आठवड्यात त्या पुण्यात यायच्या होत्या, इरावतीबाईंना ते माहीत होते. एक दिवस सकाळीच दिनकरराव हातात एक लहानशी सुंदर बॅग घेऊन सरोजिनी बाबरांकडे गेले. फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल असे अचानक दारात पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सरोजिनी बाबरांना बॅग देऊन दिनकरराव म्हणाले, इरूनं पाठवलीय. तुम्हाला निरोप द्यायला सांगितलाय की, प्रवासात नेहमी आटोपशीर असावं! हा असा त्यांचा नेमकेपणा, त्यांची विद्वत्ता, नीटनेटकेपणा त्यांच्या समग्र जगण्यातून आणि लिखाणातून नेहमीच प्रतीत होताना दिसतो. इरावतीबाईंना हे नेहमी वाटायचं की लेखनाच्या सृजनकाळात जे कष्ट लेखक उपसतो, त्याच्या काही प्रमाणात तरी कष्ट, ते समजून घेण्यासाठी वाचकांनी उपसायला हवेत. लेखक लेखन करताना आपलं आयुष्यच पणाला लावत असतो. विष्णू नागरसारखा लेखक म्हणतो, की लेखनातून व्यक्त होण्याची वाट सापडली आणि मी आत्महत्येपासून दूर गेलो, या टोकाला जाऊन केलेलं लिखाण काळजाचा वेध घेतच. म्हणजे १०० वर्षे सुरू असलेल्या ‘नेचर’ मासिकात आलेल्या लेखाने जगभरातील जाणत्या लोकांनी त्यांची दखल घेतली. तोपर्यंत इरावतीबाईंचे अनेक लेख पुस्तके वगैरे मराठीत प्रकाशित होऊनही म्हणावं, तशी मराठी भाषकांनी त्यांची कदर केलीच नाही. तेव्हा त्या उद्वेगाने दिनूला म्हणतात, की अजून किती व्यासंग आणि लेखन करायचं रे! त्यामुळे नकळत एक तुसडेपणा त्यांच्यात मुरत गेला. यातून दुसऱ्याला तुच्छ लेखणं, तोडून बोलणं असेही बाईंकडून कधीमधी घडत गेले.

    मूल्यनिष्ठ आणि परखड

    संशोधनपर सर्वेक्षणासाठी त्या सतत प्रवास करायच्या पण त्यांना रेल्वेचा तिसऱ्या दर्जाचा प्रवास अधिक आवडायचा, कारण या प्रवासात लोकं मोकळी ढाकळी होऊन बोलायची, त्यांच्या प्रबंधाचे विषय नकळत पक्के होत जायचे. त्यांचं ‘हिंदू सोसायटी’ हे पुस्तकच मुळी मुंबई-पुणे रेल्वेच्या प्रवासात तयार झाल्याची नोंद आहे. एकदा पुण्यातील काही उच्चभ्रू मंडळी गांधींना मारायला हवे, अशी चर्चा करत असताना इरावतीबाई तिचं समर्थन करताना दिसतात तेव्हा दुर्गाबाई त्यांना खडसावतात, की असं तुम्ही विचारवंतच जर म्हणायला लागलात आणि हे कुणा अविचारी माणसानं ऐकून त्यावर अमल केला, तर अराजकता माजेल.

    Irawati
    स्वत्वाची जाणीव असलेल्या इरावतीबाईंच्या व्यक्तिमत्वात संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता यांचा अनोखा संगम होता. विद्याधर पुंडलिकांसारखे लेखक त्यांचा उल्लेख स्कूटर चालवणारी पुण्यातली ‘रोमन महिला’ असा करीत आणि स्कूटर लेडिज प्रकार आहे, असा समज पसरल्याने आमचा धंदा मार खातोय, असे लटकी तक्रार विक्रेते करीत...

    दुर्गाबाई आणि यांचा वाद तर जगजाहीर होता. तथाकथित प्रज्ञावंत माणसं मात्र इरावतीबाईंना झुकतं माप देताना दिसतात, यामागे त्यांचं त्या काळात परदेशी जाऊन येणं, जगभरातील या क्षेत्रातील विद्वानांनी त्यांची दखल घेणं, अशा अनेक कारणांचा समावेश आहे, पण त्यांचं म्हणणं की ‘नंद्या कर्व्याची आई’ हे शब्द ऐकताच एक प्रकारची हुरहूर खोलवर जाणवते. (हा नंद्या म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. नंदू कर्वे एकदा कुठल्या तरी वैज्ञानिक परिसंवादात सामील झाले होते, निघताना एकाने स्वतःच्या गाडीतून सोडतो म्हणाले. तर हे म्हणाले, नको माझी स्वतःची गाडी आहे. सहकारी भांबावून इथे तिथे बघत राहिला, पण गाडी कुठे दिसेना तेव्हा यांनी आपल्या सायकलीकडे बोट दाखवून म्हणाले हीच माझी गाडी, एवढा मोठा शास्त्रज्ञ पण जराही बडेजाव नाही, हा आईचाच साधेपणाचा संस्कार!)

    तर दुर्गाबाई आणि इरावतीबाई यांच्यामधला दुस्वास कदाचित आई होणं आणि न होणं याही कारणाभोवती घुटमळताना मला मात्र जाणवतो. म्हणजे, इतका पराकोटीचा दुस्वास की इरावतीबाई गेल्यानंतर मौजेच्या श्री.पु. भागवतांनी दुर्गाबाईंना लेख मागितला. यांनी फारच कडक लिहिला. श्रीपु म्हणाले, अहो, आता त्या वारल्या आहेत इतका तीव्र स्वर नका लावू, लेख जरा मवाळ करून द्या की. तर दुर्गाबाई म्हणतात, त्या माझ्या अगोदर गेल्या तर मी काय करू?

    सम्यक दृष्टीची देणगी

    पण याच इरावतीबाईंनी गांधीहत्या झाल्यानंतर ब्राह्मणां-विरोधात उफाळून आलेल्या हिंसक प्रतिक्रियांचं केलेलं विश्लेषण अधिक सम्यक होतं. त्या म्हणतात, शिवाजीराजांच्या काळापर्यंत सत्ता क्षत्रियांच्या हाती आणि शिक्षण व संस्कृतिरक्षण ब्राह्मणांच्या हाती अशी विभागणी राहिली. नंतरच्या काळात, राजा क्षत्रिय राहिला तरी सत्ता ब्राह्मणांच्या हाती आली व त्यांनी ब्राह्मण वर्गाचेच पोषण केले. इंग्रजी राज्य आल्यानंतर काही काळ ब्राह्मण व क्षत्रिय सत्ताहीन व निष्प्रभ झाले. मात्र मुळातच विद्यार्जन करणारा ब्राह्मण वर्ग इंग्रजी शिकून मामलेदार, सबजज्ज, कारकून, शाळामास्तर असा सरकारी नोकर झाला. पूर्वीच्या समाजव्यवस्थेत सर्व जाती परस्परावलंबी होत्या. नव्या व्यवस्थेत, सरकारी नोकर म्हणून काम करणाऱ्या ब्राह्मण वर्गाला इतर वर्गाशी मिळून मिसळून वागण्याची गरज उरली नाही. याच वर्गातून लोक पुढारी झाले, ते स्वातंत्र्य चळवळीतदेखील अग्रेसर झाले. बाई म्हणतात की, स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची स्थिती ब्रह्मासारखी झाली. तेव्हा बाकीच्यांच्या मनात विशेषच चीड निर्माण झाली. प्रत्येक ब्राह्मण पोटजातींची मंडळे तयार झाली आणि ती एकमेकांच्या आधाराने स्वतःच मोठी होत गेली. यातून निर्माण झालेला द्वेष गांधी हत्येच्या निमित्ताने उफाळून आला आणि ब्राह्मणांच्या घरादाराची राखरांगोळी होण्यास कारणीभूत ठरला. इतकं परखड विवेचन तोपर्यंत कुणीच केलेलं नव्हतं.

    कणखर नि धीरोदात्त

    आज आपण हतबल होऊन महाराष्ट्रात भाषेबद्दल जे अराजक माजलंय, ते बघून निव्वळ अस्वस्थ होतोय, इरावतीबाईंनी त्याही काळात इतक्याच रोखठोकपणे भाषेबद्दल मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणतात प्रत्येक प्रांताच्या भाषेतच सुरूवातीपासून उच्चतम शिक्षण व्हायला हवे. काही झाले तरी भाषिक आक्रमणाला उत्तेजन देऊ नये, ते आत्मघाताचे लक्षण आहे. त्यांचा हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता द्यायला विरोध होता. त्या स्पष्टपणे सांगतात की हिंदी नको म्हणणे म्हणजे राजद्रोह नव्हे. आजच्या काळात इरावतीबाईंसारख्या कणखर आणि प्रखर विदुषीला समाजाने सहन केलं असतं, का हा मला या विवेचनादरम्यान पडलेला प्रश्न भोवताली माजलेल्या अराजकामुळे मनातच विरून गेला.

    त्यांच्या दिसण्यावर बरीच चर्चा आणि हेटाळणी त्यांनी आयुष्यभर सहन केली आहे. त्या तशा दिसायला उंच आणि सडसडीत यावरून सासुबाई बायो त्यांना हिणवायच्या, नुसतीच उंच दीपमाळ म्हणायच्या. पण काळाच्या ओघात त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला असे काही घडवले, की त्यांचं दीपमाळ हे दूषणच भूषण ठरले. सहसा बाईमाणूस असत नाही इतक्या त्या उंच आणि थोराड बांध्याच्या असल्या, तरीही त्यांचा वर्ण मात्र केतकी होता. विद्याधर पुंडलिकांनी बाईंची शेवटची आठवण लिहून ठेवली आहे. ते म्हणतात, त्यांना पाहिल्यावर मला जाणवले की, मरणाचा अचानक पडलेला घाव त्यांच्या सौंदर्याने शांतपणाने झेलला आहे. डोळे मिटले होते, पण वर्ण तसाच लखलखीत होता. अहेवपणी गेल्या म्हणून कुणीतरी ठसठशीत, अधेलीएवढे कुंकू लावले होते. तेही खुलून दिसत होते. अस्तित्व गेल्याची पुसटशी खूणसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. मरणही शांत अन् सुंदर आहे असे वाटून माझ्या मनाला त्या वेळीही जरा बरे वाटले होते...

    खरंतर असं कुणाच्या मरणानं कुणी सुखावत नसतं पण त्यांची भावना अपार मायेची होती. एखादं आपलं जीवाभावाचं, ज्यावर आपला जीव जडलेला आहे, ज्याच्याबद्दल आत्मीयता आहे, ते माणूस असं हळूहळू डोळ्यासमोर अस्तंगत होत जाताना बघवत नाही. त्याक्षणी अखेरच्या दिवशी दिनूने देखील इरावतीबाईंचा श्वास जाणवेना म्हणून नाकाजवळ बोटे नेली, निदान श्वास तरी जाणवतोय का बघायला. तर तशा अवस्थेतही मिश्किल इरावतीबाई म्हणतात, “नाही रे दिनू, अजून वेळ आहे रे” हे भन्नाट आहे. स्वतःचा मृत्यू देखील इतक्या आकर्षकपणे त्यालाच स्वीकारता येतो, ज्यांनी आपलं आयुष्य समरसून जगलेलं असतं.

    -oOo-


    GaneshK
    गणेश मनोहर कुलकर्णी

    गणेश मनोहर कुलकर्णी प्रसिद्ध ललितलेखक, कला आस्वादक आहेत. त्यांच्या ‘रूळानुबंध’ या लेख संग्रहाला अलीकडेच राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
    ईमेल:



गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

रंगांचा उघडुनिया पंखा...

  • ज्ञान-विज्ञान

    StableDiffusion

    प्रकाशाची उधळण निसर्गाने मुक्त हाताने केली आहे. त्याचे नाना आविष्कार माणूस अनंत कालापासून पाहत आला आहे. पण सामान्यांची नजर आणि चित्रनिर्मिकांची नजरच वेगळी. दर्शकाला वाटते कॅनव्हास, कुंचले, पॅलेट्स, पेन्सिल हे चित्रनिर्मितीचे ‘रॉ मटेरियल’ अहं, हे सगळे दुय्यम. चित्रकाराचे मूळ महत्त्वाचे निर्मितीचे ‘रॉ मटेरियल’ कच्चा माल म्हणजे, प्रकाश. मग हा प्रकाश दिनकराने ‘देता किती घेशील दो कराने’ असो किंवा कृत्रिम प्रकाश असो, वा प्रकाशाचा अभाव असो. प्रकाश महत्त्वाचा. प्रकाशाच्या बहुविध ‘तरंग’ लांबीच्या लहरी म्हणजे रंग. ‘ता ना हि नि पा जा’ याच्या अलिकडे आणि पलिकडे प्रकाशाच्या तरंग लांबी आहेत, ‘इन्फ्रा रेड आणि अल्ट्रा व्हायोलेट’ पण त्या मानवी नजरेला दिसत नाही. त्याला स्पेशल कॅमेरे वापरावे लागतात.

    सेन्सेशन आणि परसेप्शन

    जेव्हा वस्तूवरून प्रकाश परावर्तित होतो आणि माणसाच्या डोळ्यातील दृष्टीपटलातील प्रकाश-ग्राही पेशी उद्दिपित करतो, ते सेन्सेशन = संवेदन. दृष्टीपटलावर पडलेल्या प्रकाश-प्रतिमेचा मेंदू जो अर्थ लावतो, ते परसेप्शन = बोधन. याला बोधन, आकलन, जाणणे, असे पर्यायी शब्द आहेत. हे ‘जाणणे’ गुंतागुतीची प्रक्रिया आहे. व्यक्तीच्या स्मृती, मिळवलेली माहिती, ज्ञान, अनुभव या सगळ्यांचा उपयोग करून त्या संवेदनांचा लावलेला अर्थ म्हणजे, ‘जाणणे’. प्रत्येकाने जमवलेल्या ‘संदर्भ-ज्ञानावर’ ‘बोधन’ अवलंबून असते.

    ‘अॅब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट’ = अमूर्ततेचा चित्रकार काय करतो? दृष्टीपटलावर संवेदनाची एक ठिणगी टाकतो आणि दर्शकांच्या संदर्भ-ज्ञानाला खुणावतो, आवाहन करतो. तो चित्रनिर्मिक काढलेल्या चित्राचे तपशील देत नाही. तो अशी काही ‘चित्रस्थिती’ निर्मितो म्हणजे त्यायोगे दर्शकाने आपल्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या मनात मेंदूत ते चित्र पूर्ण करावे आणि एक विलक्षण अनुभव घ्यावा.

    अमेरिकन तत्त्वज्ञ-मनोवैज्ञानिक विलियम जेम्स (१८४२-१९१०) याने म्हटले आहे, ‘नूतनाचे हे विजयी समावेशन! अमूर्त कलेतून काही दर्शक जे चित्रसुख = प्लेजर अनुभवतात, ते जणू जेम्सच्या विधानाचे एक उदाहरण असते. नोबेल विजेते मेंदूवैज्ञानिक एरिक कँडेल (वय ९४) यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे, त्याचा आशय असा की, ‘जेव्हा दर्शक अमूर्त चित्राची त्याच्या मेंदूत पुनर्रचना करतो, तेव्हा ती सुखदायी ठरते. कारण हे करत असताना त्याची निर्मितीक्षमता उद्दिपित होते आणि हा सकारात्मक अनुभव अतिशय सुखदायी, आनंददायी असतो.’

    चित्रनिर्मिक जसा शिक्षित-प्रशिक्षित झालेला असतो, तसा दर्शकही शिक्षित व्हावा लागतो. शालेय शिक्षणात भाषा, साहित्य विज्ञान शिकवतो त्याचप्रमाणे चित्र पाहणे शिकवले तर? चिमुकल्यांचा मेंदू स्पंजासारखा असतो, हे विसरून चालणार नाही. यामुळे मुलांच्या मेंदूतील कितीतरी दरवाजे नकळत उघडतील. माणसात पंचेंद्रियाकडून सतत संवेदना येत असतात, मेंदू त्याचा अर्थ लावतो, ‘जाणतो’. ही शिदोरी घेऊन ‘रंग’ जाणण्याचा प्रयत्न पिया लेखात केला आहे.

    रंगविज्ञान थोडे ऐतिहासिक

    इंग्लंडमधील केंब्रिज वैज्ञानिक आयझॅक न्यूटन (१६४३-१७२७) यांनी शुभ्र सूर्यप्रकाश प्रीझममधून पाठवून प्रकाशाचा पंखा उलगडला आणि पुन्हा तो परत प्रीझममधून पाठवून शुभ्र प्रकाश दाखवला. न्यूटनने या प्रयोगाने प्रथमच रंगाबाबतचे बुद्धिसंगत, तर्कशुद्ध, मोजता मापता येण्यासारखे स्पष्टीकरण दिले. हा रंगविज्ञानातील वळणबिंदू होता. न्यूटनने नमूद करून ठेवले त्याचा आशय असा ‘प्रकाशकिरणांना रंग नसतो. पण हा ‘रंग का; तो रंग’, असे संवेदन निर्माण करण्याची शक्ती असते.’ स्कॉटिश भौतिकतज्ज्ञ आणि गणितज्ज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१-१८७९) यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी मांडली. ते रंगीत छायाचित्रण कलेचे जनक होते. त्यांनी लिहून ठेवले आहे, ‘ज्या संवेदनाला आपण रंग म्हणतो, याला जर काही नियम असतील ते आपल्या ‘स्वभावात’ असले पाहिजेत, म्हणून रंगविज्ञान हे ‘मेंटल सायन्स’ आहे. हे विज्ञान ‘ऑप्टिक्स प्रकाशविज्ञान आणि अॅनॅटॉमी = शरीरविज्ञान’ यांचा उपयोग करते.’ याचा अर्थ; रंग ही जणू मेंदूची निर्मिती आहे आणि ते समजण्याकरता या दोन विज्ञानाचा उपयोग होतो, हे मॅक्सवेल या विज्ञानवंताने जोखले होते.

    माणसाच्या अवतीभवती अनेक वस्तू आहेत. छाया प्रकाशाचा खेळ सतत सुरू असतो. म्हणजे त्या वस्तूवरुन परावर्तित होऊन येणारे विविध तरंग लांबीचे किरण माणसाच्या दृष्टीपटलावर सतत पडत असतात, पण माणूस गोंधळून जात नाही. याला कारण मेंदू हे बदल जणू फेटाळून लावतो, त्याकडे दुर्लक्ष करतो, ‘डिस्काउन्ट’ करतो. यावर अमेरिकेत संशोधन झाले आहे आणि चालू आहे, त्याचा थोडक्यात आणि सुलभ आढावा घेऊ.

    एडविन लँड (१९०९-१९९१) हा अमेरिकी वैज्ञानिक आणि पोलारॉइड कॉर्पोरेशनचा सहसंस्थापक यांचा या संशोधनात मोठा सहभाग होता.

    जेव्हा माणूस भवताल न्याहाळत असतो, तेव्हा सतत निरनिराळ्या तरंग लांबीचे किरण वस्तूंवर पडत असतात. कधी मळभ येते आणि किरणांची तीव्रता कमी होते, भर दुपारी तीव्रता वाढलेली असते, पण झाडांची पाने हिरवी दिसतात, गुलाबाचे फुल गुलाबी दिसते. ‘इल्युमिनेशन’मध्ये बदल घडत असताना माणसाचा मेंदू त्याकडे दुर्लक्ष करतो. याला 'phenomenon of discounting' म्हणतात, आणि वस्तूचे रंग जवळ जवळ तसेच राहतात याला 'colour constancy' – ‘रंग सातत्य’, ‘रंग स्थिरता’ म्हणतात. मेंदूतील कोणत्या केंद्रामुळे हे घडते, याबाबत विज्ञानाला थोडे फार कळले आहे, पण मेंदू हे कसे साध्य करतो याची मेंदूविज्ञानाला सुतराम कल्पना नाही. म्हणून तर मेंदूतील क्रिया-प्रक्रियांचे शोध घेणे चालू आहे.

    या रंगसातत्याचा व्यवहारात खूप उपयोग असतो हे माणूस अनुभवत असतो. साडी किंवा ड्रेस मटेरियलच्या दुकानात जाऊन पाहा. कृत्रिम प्रखर प्रकाशात बघितलेली साडी अनुभवी महिला दुकानाच्या दरवाजात जाऊन त्या साडीचा रंग नैसर्गिक प्रकाशात कसा दिसतो, हे तपासून मगच साडी विकत घेतात. त्याच्या मागचे हे मेंदूविज्ञान आहे.

    सृष्टी आणि रंगदृष्टी

    ‘रंगात रंगलो मी रंग रंगुनिया’ (मुक्त संवाद मार्च २०२५ अंक पृष्ठ क्र. ५७ ते ६१) या लेखात पुढील माहिती आधीच दिलेली आहे. मात्र, तिचे रुप तांत्रिक असल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात राहिलच असे नाही, म्हणून त्या माहितीचा उल्लेख पुन्हा केला आहे.

    दृष्टीपटलात सृष्टिज्ञान होण्यासाठी रॉड्स दंडपेशी आणि कोन्स = शंकूपेशी या प्रकाशग्राही पेशी असतात. रॉड्स कृष्णधवल दृष्टी करता, तर कोन्स रंगदृष्टी करता उपयुक्त असतात. असे सुलभतेने सांगता येईल. माणूस जो प्रकाश बघू शकतो, त्याला 'visible light spectrum' असे म्हणतात. त्या वर्णपटाची व्याप्ती ३८० नॅनो मीटर्स ते ७८० नॅनो मीटर्स एवढी असते. यातील ३८० तरंग लांबीचे किरण माणूस पर्पल-जांभळा म्हणून ओळखतो तर ७८० तरंग लांबीचे किरण डार्क रेड-गडद लाल म्हणून ओळखतो. याला perceive = दृष्टिगोचर असा पारिभाषिक शब्द आहे. दृष्टीपटलात तीन प्रकारचे कोन असतात. ते कोन परस्परव्यापी-ओवरलॅपिंग तरंग लांबीच्या किरणांना संवेदनशील असतात, म्हणून तर माणूस अनेक रंग अनुभवू शकतो. रेड, ग्रीन आणि ब्लू एवढ्या तरंग लांबीचे किरण दृष्टियंत्रणेला पुरेसे असतात, कारण निसर्गातील वस्तू वरुन परावर्तित होणारे किरण या तीन रंगात बसणारे असतात. पण मानवी मेंदूची कमाल म्हणजे, या छोट्या वर्णपटातून अनेक रंगाची उधळण माणूस अनुभवू शकतो. हे रहस्य चित्रनिर्मिकांनी जाणले होते. युजिन डेलेक्रोए (१७९८-१८६३) हा फ्रेंच क्रांतिकारक चित्रवंत त्याने नमूद करून ठेवले आहे, त्याचा आशय ‘चित्रकलेत आरेखनापेक्षा ‘रंग’ जास्त महत्त्वाचे आणि ज्ञानापेक्षा कल्पनेची भरारी महत्त्वाची’ हा धडा पाश्चात्य दृश्यकलेत बऱ्याच चित्रकारांनी घेतला असावा.

    रंगांची कामगिरी

    सृष्टिबोध होण्याकरता प्रथम दृष्टिबोध व्हावा लागतो. या दृष्टिबोधातील महत्त्वाचा भाग म्हणजे, ‘व्हिज्युअल डिस्क्रिमिनेशन’ एक वस्तू दुसऱ्या वस्तूपासून निराळी आहे हे कळणे. ‘अवकाशीय विवरण’ म्हणजे अवतीभवतीच्या बारीकसारिक गोष्टी कळणे, या करता रंगाची जरूरी असते.

    रंग हा कोणत्यातरी आकारात साधारणपणे बंदिस्त असतो, त्यामुळे आकार सुस्पष्टतेने दिसण्यास आणि ओळखण्यास मदत होते. घाटाचे कंगोरे, कडा, किनारी, बाजू या रंगामुळे कोरीव होतात. भवतालात कितीतरी आकृती गतीने माणसाच्या डोळ्यासमोरून निसटत असतात, त्या रंगामुळे नजरेला दिसतात. वस्तूचा आकार कळण्याआधी १०० मिलिसेकंड आपल्या दृष्टीला म्हणजे मेंदूला त्या आकाराचा रंग कळतो. त्यानंतर आकार आणि नंतर गती असा धागा आहे. मानवी मेंदूची ही विलक्षण क्षमता प्रयोगाने सिद्ध झाली आहे. रंग, आकार आणि गती यांचे असे अतूट नाते आहे.

    मुक्त रंग

    रंगांची मुक्ती म्हणजे काय? कशापासून मुक्ती? असे प्रश्न पडणे साहजिक. रंगाची आकारापासून मुक्ती अशी एक कल्पना आहे. पण त्याचा आशय बघणे महत्त्वाचे. आकारापासून मुक्ती ही तशी अशक्य गोष्ट आहे. रंगांची अमूर्तता अॅब्स्ट्रॅक्शन ऑफ कलर म्हणजे रंगांचा मुक्त वापर. कलाक्षेत्राने अॅब्स्ट्रॅक्ट हा शब्द काही आनंदाने निवडलेला नव्हता. ‘नॉन ऑब्जेक्टिव’ ‘नॉन फिगरेटिव’ असे शब्द सुचवले गेले होते. पण ‘अॅब्स्ट्रॅक्ट’ हा शब्द योगायोगाने वापरला गेला आणि रुळला. त्याचा मराठी अनुवाद अमूर्त असा केला जातो.

    सूर्योदयाचे वेळी पूर्वेकडे तर सूर्यास्ताचे सुमारास पश्चिमेकडे अनेक रंगदृश्ये आपण पाहतो, ते रंग अमूर्त असतात. म्हणजे त्यांना ठराविक आकार नसतात. नासाच्या विविध यानांनी पाठवलेली नेब्युलाच्या छायाचित्रात अमूर्त रंगांची उधळण दिसते. रंग आणि पाश्चात्य दृश्यकलेतील त्यांचा प्रवास समजून घेण्याकरता थोडे कलेच्या इतिहासात डोकावून पाहिले पाहिजे.

    फॉविझमचा प्रभाव

    १९०० सालची ती सुरुवात होती. चित्रकला अतिशुद्ध झाली असून यम-नियमात गुरफटून जात आहे, असे काही तरुण फ्रेंच चित्रकारांना वाटत होते. या गटाने हेन्री मतिस (१८६९-१९५४) हा सुप्रसिद्ध चित्रकारही होता. या गटानी आपल्या चित्रांचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरवले. त्या चित्रात नैसर्गिक घाटांना झुगारून दिले होते, भडक रंगांची आतषबाजी केली होती. कला समीक्षकांनी या गटाला 'les Fauves' रानटी प्राणी किंवा रानटी असे नाव ठेवले. पण त्यात रानटीपणा म्हणावे, असे फार काही नव्हते असे पाश्चात्य कलेच्या इतिहासकारांनी नमूद करून ठेवले आहे. त्या गटाच्या चित्रकारांची चित्रे नेटवर सहज मिळतील.

    हेन्री मतीस (इंग्लिश उच्चार) १९०८ सालचे 'The Dessert' हे चित्र त्या दृष्टीने पाहण्यासारखे आहे. हेन्रीने या चित्राला 'harmony in red' ‘लाल रंगाचा मेळ’ असे कलात्मकतेने म्हटले आहे. लहानग्यांना चित्रात सजावट आवडते. तसे हे सजावटी चित्र आहे. ‘रेषांची चित्रधारा’ (मुक्त संवाद जून २०२५ अंक पृष्ठ क्र. ५४ ते ५८) या लेखाच्या शेवटी ‘हेन्री मतीसला लहान मुलांसारखी चित्रे काढता यावीत, असे वाटत असे’ असे लिहिले होते. त्याचा संदर्भ इथे आहे. कदाचित त्याला लहान मुलांच्या चित्रातील निरागसता भावली असावी. गडद चमकणारे रंग, साधी बाह्यरेखा! कलेच्या इतिहासात फॉविझम फार काळ टिकला नसेल पण त्याचे दूरगामी परिणाम झाले असावेत.

    रंगाची अमूर्तता

    MountingPainting
    लाल, हिरवा, निळा हे तीनच तरंग लांबीचे किरण मानवी दृष्टियंत्रणेला पुरेसे असतात. मेंदूच्या करामतीमुळे माणूस हा छोट्या वर्णपटातून अनेक रंगांची उधळण अनुभवत असतो...

    मार्क रॉथ्को याने १९५०च्या दशकात कलर फिल्ड पेंटिंगची अमेरिकेत सुरुवात केली. त्याने मोठ्या कॅनव्हासवर एका रंगाचा सपाट आणि पातळ थर पसरला. ‘पेंटिंग बघून तीव्र आनंदाची भावना दर्शकांच्या मनात निर्माण होते. हा रंग म्हणजे, एक ‘मेडिटेव स्पेस’ ‘ध्यानशील अवकाशाची’ सुंदर सूचक असते.’ असा दर्शकांचा अनुभव समीक्षकांनी नमूद केला आहे. अमेरिकेतली ह्यूस्टन शहरात रॉथ्को चॅपेल आहे. तेथील भिंतींवर कॉपरी ब्राऊन आणि ब्लॅक छटा असलेली सात पेंटिंग्ज आणि सात प्लम रंगाची टोनल पेंटिग्ज लावलेली आहेत.

    मॉरिस लुईस (१९१२-१९६२) हा अमेरिकी चित्रकार आणि कलर फील्ड पेंटर. त्याने न-ताणलेल्या’ ‘प्रक्रिया न केलेल्या’ मोठ्या कॅनव्हासवर पातळ केलेला अॅक्रिलिक रंग ओतला आणि त्या रंगाला आपल्या गतीने वाहू दिले, भिजू दिले. यामुळे रंग पृष्ठभागाचा अविभाज्य भाग बनतो. ‘डेप्थ’ ‘खोली’चा भास निर्माण होत नाही. हे विलक्षण तंत्र याने विकसित केले. मॉरिसने चित्रांच्या तीन मालिका रंगबद्ध केल्या. The Veils, the Unfurled आणि The Stripes या प्रत्येक मालिकेत शंभरपेक्षा जास्त कॅनव्हास आहेत. त्याने ही पेंटिग्ज कशी निर्मिली हे एक गूढ आहे. त्याच्या घरी डायनिंग रूममध्ये त्याचा स्टुडियो होता. तेथे काम करत असताना तो कोणालाही आत येऊन देत नसे. ही चित्रदृश्ये मुळातून पहाण्यासारखी आहेत. मॉरिस लुईस आणि केनेथ नोलँड (१९२४-२०१०) हे दोघे रंगवंत 'वॉशिंग्टन कलर स्कूल'च्या केंद्रस्थानी होते.

    Projector_Maxwell
    रंग जणू मेंदूची निर्मिती आहे. ती कशी, हे समजण्याकरीता प्रकाशविज्ञान आणि शरीरविज्ञान उपयोगात येते, असे विज्ञानवंत आणि रंगीत छायाचित्रणाचे जनक जेम्स मॅक्सवेल यांनी प्रयोगांती सिद्ध केले...

    चित्र कसे पहाल

    माणूस दोनचार मित्रांबरोबर चित्र दालनात जातो किंवा दृश्यकलेच्या संग्रहालयामध्ये जातो. एक फेरफटका मारून, ‘काय सुंदर होती चित्रे’ म्हणत बाहेर पडतो. पण काहीजण बाकावर बसून चित्राकडे तासन्तास पाहत असतात. हे अभ्यासक असतात. स्तानिस्लास डुहेन (१९६५) हे पॅरिस येथे बोधनाचे मेंदूवैज्ञानिक आहेत, यांनी माणूस चित्र पाहत असताना मेंदूत काय घडते, याचा शोध, बोधन होत असताना न्यूरोइमेजिंग करून घेतला आहे. त्याचा थोडक्यात आशय असाः एखाद्याने एका चित्राकडे काही क्षण बघितले, तर मेंदूतील दृष्टिकेंद्रातील काही भाग उजळून निघतो. पण जसजसे जास्त वेळ तुम्ही त्या चित्राकडे बघत राहता, तसतसे मेंदूतील निरनिराळे भाग उजळू लागतात. हे ‘अॅक्टिवेशन मेंदूतल्या निरनिराळ्या भागात पसरते आणि पुन्हा दृष्टिकेंद्रात माघारी येते आणि पुन्हा पसरू लागते. याचा अर्थ जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक त्या प्रतिमेकडे पाहता, तेव्हा ती माहिती वेगवेगळ्या भागांकडे पाठवून मेंदू त्यांना कामाला लावतो. हे मेंदूच्या स्कॅनिंगमध्ये स्पष्ट दिसून आले. हा कॉन्शस अनुभव असतो. मात्र जेव्हा तुम्ही चित्राकडे फक्त काही क्षण बघता, तेव्हा छोटेसे अॅक्टिवेशन होते. ते काही मर्यादेपर्यंत असते. मेंदू त्याची दखल घेतो. पण ती नेणिवेत. तो कॉन्शस अनुभव नसतो. कॉन्शस अनुभव घेण्यासाठी त्या चित्राकडे बराच वेळ पाहावे लागते.

    हा प्राथमिक शोधाभ्यास आहे. पण चित्राचे अभ्यासक तासंतास का पाहतात याचे स्पष्टिकरण त्यातून मिळते. (आपले वर्तन आपला मेंदू-डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर. आवृत्ती पहिली फेब्रुवारी २०२४ राजहंस प्रकाशन पुणे)

    फॉविस्ट आणि मेंदूविज्ञान

    रंगछंदी फॉविस्ट चित्रकारांचा रंगमुक्ती मागचा विचार काय होता ते पाहू. विशिष्ट आकाराला विशिष्ट रंग असे समीकरण मनात दडलेले असते. ही घाटांची गुलामगिरी दूर करायची आणि हे घट-सहयोगी रंग न वापरता तिसरेच रंग वापरायचे असा विचार त्यामागे होता. (हेन्री मतिस, मॉरिस डिव्लामनिक, आंद्रे डेरेन, की वान डॉन्जन वगैरे यांची चित्रे पाहा) आता मेंदू संशोधकांनी काय केले ते थोडक्यात पाहू. नेहमीची चित्रे म्हणजे पारंपरिक चित्रे पाहत असताना दर्शकांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले, तेव्हा दृष्टीकेंद्राबरोबर स्मृतिकेंद्रे, भावनेची केंद्रे, आनंदाचे बक्षीस देणारी केंद्रे, उद्दीपित झालेली दिसली. पण फॉविस्टची चित्रे पाहताना स्कॅनिंगमध्ये दृष्टीकेंद्रासह मेंदूतील इतर काही जागा उजळलेल्या दिसल्या. यामुळे दृष्टी विज्ञानात आणखी ज्ञान-गुहांचा तिळा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटिश आणि फ्रेंच मेंदूवैज्ञानिक सेमिर झेकी (१९४०) लिहितात त्याचा आशय ‘चित्रकलाकार न्यूरॉलॉजिस्ट असतात, मेंदूतील दृष्टिसंस्थेची रचना कशी असते याचा अभ्यास ते त्यांच्या कार्यातून, त्यांच्यापाशी असलेले आगळेवेगळे तंत्र वापरुन करतात. जेव्हा वैज्ञानिक त्यांच्या कार्याचा शोध घेतात तेव्हा पूर्वी ठाऊक नसलेली मेंदूची रचना उघड होते.’

    लेख बराच लांबला होता. मी थबकलो. दुरवरून कुठूनतरी मंगेश पाडगावकर (१९२९-२०१५) यांच्या गीताचे सूर-शब्द ऐकू आले. ‘रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली?’ या मोहक सवालाचा जबाब मी मनोमन सहज दिला, चित्रकलावंतांनी.

    अमूर्त चित्रकलेची चित्र त्वचा अलगदपणे, हळुवार प्रयत्नाने उकलून अंतरंगांचा चित्रबोध दर्शकाने आपल्या वकुबाप्रमाणे लावून आनंद लुटणे शक्य आहे. कारण, मानवी मेंदू नेहमीच नवनवीनता शिकत आणि आत्मसात करत आला आहे.

    -oOo-


    AnandJ

    व्यवसायाने हृदयरोग तज्ज्ञ असलेले डॉ. आनंद जोशी हे मराठीतले नामवंत विज्ञानलेखक, ललितलेखक आहेत. ‘बोलकी हाडे’, ‘मेंदूतला माणूस’, ‘कर्कविज्ञानाची गोष्ट’, ‘अक्षर पाविजे निर्धार’, ‘व्यूहचक्र’, ‘आपले वर्तन, आपला मेंदू’ (सहलेखक सुबोध जावडेकर) ही त्यांची अलीकडच्या काळात प्रकाशित झालेली पुस्तके आहेत.
    ईमेल : drjoshianand628@gmail.com



कार्यकर्तीच्या छत्रछायेत कथाकार

  • ग्रंथ समीक्षा

    HeartLamp

    कन्नड साहित्यात मुस्लिम समाज जीवनाचं, विशेषतः मुस्लिम आणि पुरुषसत्ताक समाजातील स्त्रियांच्या परिस्थितीचं यथातथ्य चित्रण करणाऱ्या अग्रदूत कन्नड कथाकार म्हणून सारा अबू बकर ओळखल्या जातात. २०२३ मध्ये वयाच्या ८७व्या वर्षी त्यांचं निधन झालं. बानू मुश्ताक या बुकर पुरस्कार विजेत्या लेखिकेच्या त्या पूर्वसूरी होत. त्यामुळे कर्नाटकातल्या मुस्लिम स्त्रियांच्या आयुष्याची परवड चितारणाऱ्या बानू मुश्ताक यांच्या कथा आणि त्यांच्या निवडक कथांचा संग्रह ‘हार्ट लॅप’ हा कन्नड साहित्यातला नवा प्रवाह असं समजण्याचं कारण नाही. ते सूतोवाच याआधीच सारा यांच्या लेखणीने केलेले आहे. तो प्रवाह याआधीच सारा यांच्या लेखणीतून स्रवत राहिलेला आहे.

    मूळ मल्यालम मातृभाषा असलेल्या सारा यांचं सगळं शिक्षण कन्नडमध्येच झालं आणि लेखनही त्यांनी कन्नडमध्येच केलं. ‘चंद्रगिरीतीर दल्ली’ या त्यांच्या कथेनं त्यांना कन्नड साहित्यविश्वातलं पहिल्या पंक्तीतलं स्थान मिळवून दिलं. धर्माचा आणि पुरुषसत्ताकाचा काच मुस्लिम स्त्रियांच्या आयुष्याची कशी परवड करतो याचं अतिशय बोचरं चित्रण करणाऱ्या या कथेनं वादही ओढवून घेतले आणि मुस्लिम सामाजिक प्रश्न धसास लावण्याची सुरुवातच करून दिली. या कथेचा अनुवाद इंग्रजीत ‘ब्रेकिंग टाइज’ नावानं झालेला आहे. ज्या लंकेश पत्रिकेत ‘चंद्रगिरीतीर दल्ली’ मालिकेच्या रूपात प्रसिद्ध होत झाली होती, त्याच नियतकालिकात बानू मुश्ताक यांनी वार्ताहर म्हणून आपल्या कारर्कीदीला सुरुवात केली होती. तेव्हा सारा अबू बकर यांची स्मृती मनात बाळगूनच बानू मुश्ताक यांच्या बुकर पुरस्कार विजेत्या पुस्तकाचा आढावा घ्यायला हवा.

    संग्रहातील पहिली कथा आहे ‘स्टोन स्लॅब्ज फॉर शाइस्ता महल’. कथेची निवेदिका आहे झीनत ही नवपरिणीत, सुशिक्षित स्त्री. ती सुरुवातीलाच नवरा या संकल्पनेभोवती धर्मानं निर्माण केलेल्या देवत्वाची परखड चिकित्सा करते. पतिदेव या संबोधनाची सालटी काढते. लग्नानंतरचे पहिले तीन महिने अतिप्रेम केल्यानंतर आता आपला नवरा नॉर्मल नवरा झाला असल्याचं सांगत ती सतत सावधपणे नवऱ्याच्या वागण्याचीही चिकित्सा करते आहे. यानंतर कथेत प्रवेश होतो, तो नवऱ्याचा सहकारी पन्नाशीचा इफ्तिखार आणि त्याची दहा वर्षांनी लहान असलेली बायको शाइस्ता यांचा. शाइस्तानं काही वर्षांतच सहा मुलांना जन्म देऊन आता ती सातव्यावेळी गरोदर राहिली आहे. यापायी सर्वात मोठ्या मुलीचं आसिफाचं शिक्षण थांबवून तिला भावंडांची आईच व्हायला लावलं आहे. इफ्तिखारच्या मते, मुलीला फार शिक्षणाची गरज नाही. शाइस्ताला ऑपरेशन करून घ्यावं असंही वाटतंय, पण इफ्तिखारचं म्हणणं, कितीही मुलं झाली तरी मी त्यांना पोसायला समर्थ आहे. झीनत इफ्तिखार आणि शाइस्ताच्या संसाराचं निरीक्षण करते आहे, निवेदन करते आहे. इफ्तिखारचं बायकोवरच्या प्रेमाचं अवास्तव प्रदर्शन ती नोंदत राहते. शहाजहाननं बायकोसाठी ताजमहल बांधला तसाच मी शाइस्ता महल बांधीन असं म्हणत इफ्तिखार आपल्या पत्नीप्रेमाचं प्रदर्शन मांडतो, तेव्हा मुजाहिद झीनतचा नवरा - त्याला ताजमहाल हा शहाजहानच्या बायकोची कबर असल्याचं निदर्शनाला आणून देतो. आईचा मृत्यू आयुष्यभर मनात वसत राहतो, पण बायकोच्या मृत्यूचं दुःख फार दिवस टिकत नाही हे त्याचं विधानही झीनतला आपल्या आईच्या शब्दांची आठवण करून देतात. ती म्हणाली होती, बायकोच्या मृत्यूचं दुःख हे कोपर आपटल्यावर होणाऱ्या असह्य पण तात्कालिक वेदनेसारखं असतं. काही सेकंदांतच ती वेदना नाहीशी होते. झीनत कथन करीत असलेल्या या प्रसंगांतून आणि संवादांतून पुरेशा हिंट्स दिल्यानंतर कथेचा शेवट होतो, तेव्हा सातव्या बाळंतपणात शाइस्ता मरण पावलेली आहे आणि इफ्तिखारनं चाळीस दिवसांचं सुतक संपताच अठरा वर्षांच्या मुलीशी लग्न केलं आहे. झीनतच्या निवेदनातून पोहोचलेलं सूचन कथेच्या शेवटाची पूर्ण कल्पना देऊन जातं. किंबहुना, कथेचा नाट्यपूर्ण परिणाम साधण्यासाठी जे वळण अचानक यावं लागतं, जो ट्रिस्ट यावा लागतो, त्याचा संपूर्ण अभाव कथा सपक करून टाकतो. कथा म्हणण्यापेक्षा एका परिस्थितीचं निवेदन एवढंच कथेचं स्वरूप उरतं.

    AmongstMuslims
    मुस्लीम समाजातले स्त्री केंद्री ताणेबाणे बानू मुश्ताक आपल्या कथांतून टिपतात. ते टिपताना त्यांच्या लेखनात स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह दिसत राहतो आणि या आग्रहाला विरोध करणारे जळजळीत वास्तवही ते तितक्याच प्रभावीपणे मांडतात...

    मुतवल्ली म्हणजे वक्फचा विश्वस्त. ‘फायर रेन’ ही कथा मुतवल्लीच्या पुढचा धार्मिक पेच मांडते. मुतवल्ली हा कोणत्याही पारंपरिक मुस्लिम पुरषासारखाच (किंवा कोणत्याही धर्मातील पारंपरिक पुरुषासारखाच) आहे. बायकोला तो काडीची किंमत देत नाही. मुतवल्ली वक्फचा विश्वस्त या नात्याने गावातल्या मुस्लिम सामाजाचा नेताच. घरात आणि गावात त्याची सत्ता. वडिलोपार्जित इस्टेटीत आपला वाटा मागायला बहिणीनं यावं हे त्याला आवडलेलं नाही. आजारी मुलाकडे दुर्लक्ष. काही ना काही कारणासाठी मदत मागायला गावातल्या लोकांची त्याच्या घरापुढे रीघ. कुणाला आजारी आईच्या उपचारासाठी पैसे हवेत, लेकीच्या लग्नासाठी पैसे हवेत, कुणाला नोकरी हवी... यात कुणाला मदत करण्याचा मानस नसला तरी मुतवल्लीचा अहंकार गोंजारला जातोच. आणि अशावेळी त्याच्यापुढे एक धार्मिक पेच उभा राहतो. गावातला गुंड दारुडा रंगारी निसार याचं प्रेत सापडल्यामुळे पोलिसांनी त्याला हिंदू स्मशानात पुरून टाकलं आहे. ही बातमी कळताच एरवी सगळ्यांची फसवणूक करत आलेल्या निसारच्या मोक्षाची काळजी मुतवल्लीसहीत गावाला वाटू लागते आणि मुतवल्लीच्या पुढाकारने निसारचं प्रेत उकरून काढून त्याचं सन्मानाने मुस्लिम रिवाजानुसार कब्रस्तानात दफन करण्यासाठी सगळे सरसावतात. एकदा हा धार्मिक प्रश्न उभा राहिल्यानंतर मुतवल्लीकडे सोडवणुकीसाठी आलेले सगळे प्रश्न आपोआपच मागे पडतात. कारण आता धर्म वाचला पाहिजे! निसारला कब्रस्तानात स्थान मिळवून दिल्यानं मुतवल्लीच्या नेतृत्वाचा गौरव होणार असतो, त्याचं राजकीय वजन वाढणार असतं. या प्रयत्नातलं वैयर्थ कुणालाच जाणवत नाही आणि मुतवल्लीचा हेतू तर त्याचा राजकीय फायदा घेणं हा आहे. पण थाटामाटात निघालेल्या प्रेतयात्रेत अचानक नवाच पेच समोर उभा ठाकतो. समोर जे सत्य येतं ते मान्य करणं मुतवल्लीला अडचणीचं असतं. धर्माच्या नावावर चाललेला सगळाच दांभिकपणा उघडा पडतो. तेव्हा ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशा पद्धतीनं दफनविधी पार पाडला जातो.

    ज्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, ते सगळे प्रश्न मनात कावकाव करत असतानाच घरी परतलेल्या मुतवल्लीला मुलाकडे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम सामोरा येतो. मुतवल्लीनं निसारचं प्रकरण उचलून धरणं, ते प्रेतयात्रेतला आकस्मिक उद्भवलेला प्रसंग पुरुषसत्तेपायी स्त्रियांच्या होणाऱ्या दुर्दशेच्या कथेची दिशा थोडी बदलतो आणि खरं तर विनोद व उपरोधासाठी चपखल परिस्थिती तयार करून देतो. आजारी मुलाच्या समावेशानं सामाजिक कार्यकर्ता कथाकार स्त्री-प्रश्न धरून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण मुख्यतः कथा रंजक होते, ती निसार प्रकरणामुळे.

    ‘ब्लॅक कोब्राज’ या कथेत बानू मुश्ताक यांच्यातली सामाजिक कार्यकर्ती त्यांच्यातल्या कथाकाराहून वरचढ ठरते. ही तीनही मुलीच जन्माला घातल्यामुळे नवऱ्याने सोडून दिलेल्या पत्नीची - अशरफची कथा आहे. आपले व मुलींचे पोट भरण्यासाठी अशरफला जुलैखा बेगमच्या घरी कामाला जावे लागते. जुलैखा बेगम सुशिक्षित स्त्री आहे. ती सतत अशरफला मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांविषयी लेक्चर देते. मुतवल्लीकडे दाद मागायला जायला सुचवते आणि लेखी निवेदनही अशरफला लिहून देते. त्यापलीकडे ही स्त्रियांच्या हक्कांविषयी जागरूक असलेली जुलैखा कोणतीही कृती करत नाही. याउलट मुतवल्लीची बायकोच मशिदीसमोर बसलेल्या भुकेल्या अशरफला आणि तिच्या मुलींना खायला देण्याचा प्रयत्न करते. सात मुलांना पैदा करूनही समाधान न मानणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या- मुतवल्लीच्या - वागण्यावर ती दबल्या सुरात का होईना, आपला निषेध व्यक्त करत राहते.

    या कथेतला मुतवल्ली हा सुद्धा पदसिद्ध माजोर्डेपणा आणि पुरुषी अरेरावी लेवूनच फिरतो. सर्वप्रकारचे ऐश करतो, बायकोसह स्त्रियांना किंमत देत नाही. अशरफचा रिक्षावाला नवरा त्याचा सवंगडी आहे. दरम्यान त्याने दुसरं लग्नही केलेलं आहे. मुतवल्ली अशरफच्या नवऱ्याचीच बाजू घेतो. अशरफला म्हणतो, तुला मुलगा होत नाही मग त्याने दुसरं लग्न केलं तर काय बिघडलं? चार लग्नं करायची मुभा धर्मानेच दिलेली आहे. परंतु पहिल्या बायकोच्या आणि तिच्यापासून झालेल्या मुलांच्या भरणपोषणाची जबाबदारी अशा नवऱ्याने टाळून चालणार नाही या धर्माच्याच कायद्याचा उल्लेख मात्र तो करत नाही. अशरफला न्याय कसा मिळणार? अखेर अशरफची आजारी मुलगी मशिदीसमोर प्राण सोडणार हे ओघाने आलंच. यानंतर मात्र गावातल्या पुरुषग्रस्त मुस्लिम स्त्रिया बंडासाठी एकत्र येतात, ही कथेची वास्तववादी परिणति वाटण्यापेक्षा कथाकारातील सामाजिक कार्यकर्तीचे स्वप्नरंजन अधिक वाटते.

    KarnadGauriD
    बानू मुश्ताक यांच्या कथा घटना-प्रसंगांतून फुलण्याऐवजी निवेदनाच्या अंगाने प्रामुख्याने पुढे जात राहतात. त्यात त्यांच्यातल्या कथाकारा-ऐवजी कार्यकर्ता प्रामुख्याने डोकावत राहतो...

    याच कथेवर गिरीश कासारवल्ली यांनी ‘हसीना’ हा आपला चित्रपट बनवला आहे. मूळ कथेतल्या भाषणबाजीला पूर्ण फाटा देऊन नेटकी केलेली ही पटकथा आणि तिच्यावरील चित्रपट मूळ कथेपेक्षा किती तरी अधिक प्रभावी ठरला आहे. साहित्यकृती हा केवळ चित्रपट-दिग्दर्शकासाठी टेक ऑफ पॉइंट असतो. तिथून पुढे ती संपूर्णपणे त्याच्या प्रतिभेतून निर्माण झालेली त्याची कलाकृती असते, याचा प्रत्यय या ठिकाणी प्रकर्षाने आलेला आहे.

    ‘अ डिसिजन ऑफ द हार्ट’ ही कथा आहे बायको नावाच्या तोफखान्याची, सासूविरोधात बायकोच्या सततच्या कटकटींनी हतबल झालेला नवरा आणि त्याची सहनशील आई यांची. वडिलांच्या मागे पुनर्विवाह न करता आईने एकटीने वाढवल्याची जाणीव युसुफमध्ये आहे. त्याच्या मातृभक्तीमुळे अधिकच चिडलेली अखिला सासूवर वाटेल ते आरोप करते, तिला आपली सवत म्हणते. यातून स्वतःला आणि आईलाही सोडवण्याचा उपाय म्हणून पन्नाशीत असलेल्या आईचा पुनर्विवाह करून द्यायचे युसुफ ठरवतो आणि आईचे मत न घेता तयारीला लागतो, तेव्हा कांगावखोर अखिला नवा पवित्रा घेऊन सासूची माफी मागू लागते. कोणतेही मतप्रदर्शन न करणारी आई ‘आईच्या हृदयाची हाक’ ऐकते. कथा 'ते हृदय कसे आईचे' या सुरावर संपते.

    ‘रेड लुंगी’मधून हट्टीकट्टी गरिबी, दुबळी श्रीमंती या सूत्राबरोबरच बानू मुश्ताक खतना या मुस्लिम प्रथेतल्या क्रौर्यावर भाष्य करतात. ते धाडस कौतुकास्पद. ‘हार्ट लॅप’ या कथेचे शीर्षकच कथासंग्रहाचे शीर्षक म्हणून निवडलेले आहे. इंग्रजी भाषांतरात विचित्र वाटणाऱ्या या शीर्षकामागे हिंदी-उर्दू भाषांतल्या दिल का दीया किंवा मन का दीप ही संकल्पना आहे. इथेही पत्नीकडे दुर्लक्ष करणारा, दुसऱ्या स्त्रीशी लग्न करू पाहणारा नवरा आहे. माहेरही मेहरुनला थारा देत नाही, तेव्हा अंगावर रॉकेल ओतून घेणाऱ्या तिची व्यथा जाणती झालेली तिची मुलगीच जाणते आणि तिच्या सदसद्विवेकाला साद घालते. पुरुषप्रधान समाजात सर्वच बाजूंनी कोंडी झालेल्या स्त्रीच्या नशिबात पोटच्या अपत्याची माया हा देखील निर्णय तडीस नेण्यातला एक अडथळा असतो आणि त्याचवेळी ती माया तिला जगण्याचं बळ देते. स्त्रीचं हे प्राक्तन म्हणजे ‘हार्ट लॅप’. कार्यकर्तीचा वेष जरा उतरवून लेखिका या कथेतून कथाकार म्हणून समोर येते, ही समाधानाची बाब.

    कथा फुलवण्यापूर्वी कथानकाचा कच्चा खर्डा लिहून काढावा तसं काहीसं स्वरूप ‘हाय हील्ड शू’चं जाणवतं. नयाझ खानला वाटणारं थोरल्या भावजयीच्या पेन्सिल हील्सच्या बुटांचं आकर्षण, आपल्या बायकोलाही तसेच बूट असावेत अशी मनात निर्माण झालेली इच्छा, कौटुंबिक गरजांपेक्षा या बुटांनीच घेतलेला त्याच्या मनाचा ताबा यातून गरजांपेक्षा चैनबाजी आणि दिखाऊपणाच्या चंगळवादी हव्यासाचे प्रतिनिधिक रूप कथालेखिका वर्णन करते. वर्तमान समाजाच्या या स्वभावाविषयीचे मतप्रदर्शन करते आणि कथेचा ओघ थांबवून, कांचनमृगाच्या मागे अवघे जग पळत आहे, आजच्या संस्कृतीचे हे रूप आहे, असे निबंधाला साजेसे भाष्य करते.

    प्रचारकीपणाचा आधार न घेता मानवी स्वभावाचं कोडं पेश करणारी ‘सॉफ्ट व्हिस्पर्स’ ही कथा, कथा-तत्त्वाशी अधिक प्रामाणिक वाटते. वर्गभेदातून येणाऱ्या मानसिकतेचं अगदी सूक्ष्म सूचन त्यात आहे. तरुण निवेदिकेकडे गावच्या उरुसाचं आमंत्रण द्यायला मशिदीतला मुजावर- मशिदीची साफसफाई, देखभाल करणारा नोकर-आबिद यायचा आहे. इथून निवेदिकेच्या लहानपणाची आठवण तिच्या मनाच्या पृष्ठभागावर येते. निवेदिकेच्या प्रतिष्ठित कुटुंबाकडे गावच्या मशिदीचं व्यवस्थापन आहे. या नात्याने मुजावर हा या कुटुंबाचा नोकरच होतो. दहाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या निवेदिकेच्या आपल्या आतेभावा-बहिणींबरोबर खेळण्या-बागडण्यात मुजावराचा चौदा पंधरा वर्षांचा मुलगा आबिदही आहे. झाडावर चढता न येणाऱ्या छोट्या निवेदिकेला तो उचलून फांदीवर ठेवतो, पोहता न येणाऱ्या तिला पाण्यात खेचून अचानक तिच्या गालावर ओठ टेकतो. दहाव्या वर्षांत पाऊल ठेवलेल्या निवेदिकेच्या आयुष्यात तो क्षण विजेसारखा चमकून जातो. कसला तरी प्रत्यय, मोठ्यांकडून नकळत कळलेलं नकळलेलं काही तरी निषिद्ध असतं असं अस्तर मनाला चिकटू लागण्याचं ते वय... कालांतराने आता शहरात तिच्याकडे तोच आबिद येणार आहे. वडिलांच्या पश्चात आता तो मुजावर झाला आहे. कुटुंबातल्या इतर कुणालाच उरुसाला हजर राहता येणार नसल्यामुळे निवेदिकेवर ती जबाबदारी आली आहे... आबिद येतो. खालमानेने, नजर जमिनीवर खिळवून आणि निवेदिकेला ‘आपा’ (ताई) असं संबोधून तिला उरुसाचं आमंत्रण देतो. वयाने वाढलेल्या आबिदला निवेदिकेच्या आणि आपल्या सामाजिक स्थानांतील फरक लक्षात आलेला आहे. निवेदिका हे नोंदते, पण त्याचा कसलाही ऊहापोह न करता इतकंच म्हणते की ‘काही माणसं असतात अशी. सगळं उलटं पालट करून टाकतात.’ ही सूचकता संग्रहाच्या सुरुवातीच्या कथांमध्ये का उतरत नाही, असा विचार इथे वाचकाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.

    ही सूचकता संग्रहातल्या पुढच्या ‘अ टेस्ट ऑफ हेवन’मध्ये आहे. किंबहुना या सूचकतेची पूर्ण शक्यता तीत आहे, फक्त कथेच्या शिल्पावर कठोरपणे छिन्नीचा वापर केला असता, तर तिचं सौष्ठव खुललं असतं, असं वाटल्यावाचून राहत नाही. कथा आहे एका वृद्ध बालविधवेची. बी दादी ही सआदतची बालविधवा आत्या त्याच्याकडे राहते आहे. साऱ्या सुखांपासून, आनंदापासून, मौज-मजेपासून कायमची दूर, त्याबद्दल कधीच तक्रार न करणारी, पाचही वेळा आपल्या जीर्ण सतरंजीवर नमाज अदा करणारी. देऊ केलेली नवी सतरंजी तिने कधीच स्वीकारली नाहीय. घरात पडतील ती सगळी कामं ती करते. अशा बी दादीची सतरंजीच नातू सायकल पुसायला घेतो आणि सतरंजी घाण होते, तेव्हा मात्र बी दादीचा बांध फुटतो. नमाजाची ती लहानशी सतरंजी ही बी दादीच्या कोळपून गेलेल्या आयुष्यातली एकमेव जाईची कळी होती. तिला जाईचा सुगंध होता. फार पूर्वी कधी तरी (कदाचित तिच्या तरुणपणी) एकदा दोरीवर सतरंजी वाळत असताना बी दादीच्या खिडकीतून कुणी तरी जाईची फुलं सतरंजीवर उडवली, त्या क्षणाचा तो सुगंध बी दादी जपत आली आहे. त्यात लहानपणीच लग्नानंतर तत्काळ मृत्यू पावलेल्या आणि तिने ज्याला कदाचित कधी पाहिले नव्हते, त्या तिच्या नवऱ्याचं अस्तित्व आहे. तिनं कधीही न अनुभलेल्या प्रणयाचा तो भास ती जपत आली आहे. बालविधवेच्या दमित भावनेचा इतका हळुवार प्रत्यय आणून देताना मात्र कथेचा सुरुवातीचा मोठा भाग सआदतच्या बायकोच्या नॉन-स्टॉप करवादण्याने, त्यापायी हतबल सआदत आणि त्रासलेली मुलं यांच्या वर्णनानी व्यापलेला आहे. त्यामुळे प्रथम ही कथा एका करवादणाऱ्या बायकोची आहे, असाच समज होतो. बी दादीचा प्रवेश बराच नंतर होतो. सतरंजीच्या रहस्याचा उलगडा झाल्यानंतरही कथेचा फापटपसारा चालूच राहतो आणि बी दादीच्या कथेतल्या हळुवारपणावर विनाकारण पाणी पडतं.

    धार्मिक पगडा व्यक्तीला मग ती शाझियासारखी श्रीमंत, साधनसंपन्न असो की यासीन बुआसारखी अभावग्रस्त, गरीब बिचारी बाई आपल्या गरजा बाजूला सारून धार्मिक प्रथा-परंपरा जगण्याच्या नादात केवळ दुःखच सोसायला लावतो, याचे दर्शन ‘श्राऊड’ या कथेत होते.

    ‘द अरेबिक टीचर अँड गोबी मांचुरियन’ या कथेत विनोदाच्या शक्यता आहेत. पण त्या खेळकर अंगाने आजमावण्याची प्रकृती लेखिकेची दिसत नाही. धार्मिक शिक्षणासाठी आवश्यक अशी अरबी भाषा शिकवणाऱ्या तरुण मौलवीच्या जीवनातला एकमेव आनंद आणि त्याचं एकमेव ध्येय म्हणजे गोभी मांचुरियन हा खाद्यप्रकार. लग्नासाठी मुलगी बघताना गोभी मांचुरियन बनवू शकणे ही एकमेव अपेक्षा. जेव्हा ती पुरी होत नाही, तेव्हा तो शिरस्त्यानुसार बायकोचा छळ करतो. प्रकरण वकिलापर्यंत येतं तेव्हा कथेच्या निवेदिका उर्फ व्यवसायाने वकील असलेल्या बानू मुश्ताक यांना पेच सोडवण्यासाठी गोभी मांचुरियनची रेसिपी शोधावी लागते.

    प्रसंग फुलवण्याऐवजी निवेदनावरच अधिक भर देणे हे बानू मुश्ताक यांच्या कथनशैलीचं वैशिष्ट्य दिसतं. पण त्यामुळे वाचकाला प्रत्यक्षदर्शी असल्याचा अनुभव येत नाही आणि रसास्वाद उणावतोच.

    ‘बी अ बूमन वन्स ओ लॉर्ड’ ही शेवटी कथा म्हणजे प्रत्यक्षात निबंध आहे. एकदा तरी बाई होऊन बघ, असं ईश्वराला सांगणारं हे त्याला लिहिलेलं पत्र किंवा निवेदिकेचा एकतर्फी संवाद आहे. शीर्षकावरून स्पष्टच आहे की निवेदिकेने यात स्त्रीच्या जन्माला आल्यामुळे पुरुषांच्या या जगात तिच्या वाट्याला आलेल्या सर्व मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी दुःखांची जंत्रीच आपल्या जीवनकथेतून मांडली आहे. थोडक्यात, इतर कथांमधून लेखिकेला जे सांगायचे आहे त्याचे सार या निबंधात आहे. एका सामजिक कार्यकर्तीद्वारे कथा हा प्रकार हाताळण्याच्या मागचा उद्देश स्त्री-शोषणाविरुद्ध हिरीरीनं आवाज उठवण्याचा आहे.

    कथांतला समाज मुस्लिम आहे, मुस्लिम समाजातल्या रूढी-परंपरांचे दर्शन त्यात होतं. त्याचबरोबर शैलीत लक्ष्मणरेखा, शकुनीमामा, असे रामायण, महाभारतातले उल्लेख येतात, तेव्हा हा समाज भारतीय मुस्लिम सामाज आहे हे सूक्ष्मपणे अधोरेखित होतं, हे नमूद करायला हवं. भौगोलिक लोकसंस्कृती ही धर्म या संकल्पनेच्यावरही कशी दशांगुळे उरते आणि आपलं अस्तित्व दाखवत असते याचं हे उदाहरण.

    स्त्रीचं शोषण हा धागा सर्व धर्मांत समान राहिला आहे. प्रत्येक धर्मातल्या ‘अनंता’ने स्त्रियांना जसे ‘ठेविले तैसेचि’ राहण्यात स्त्रिया सर्वसाधारणपणे जन्माचे सार्थक समजतात. क्वचित काही स्त्रिया तक्ररीचा सूर लावतात आणि सोसतच राहतात. काही थोड्या स्त्रिया शोषणाविरुद्ध आवाज उठवतात, त्यात कथा-लेखिका येते. परंतु कथा-लेखिका एक विचारवंतदेखील आहे. समाजाचं निरीक्षण करणारी आहे. तर हे चित्रण एखाददुसऱ्या करवादणाऱ्या बायकोच्या हतबल नवऱ्यापलीकडे एकांगी होत जातंय, की काय असा विचार तिच्यातल्या कथाकाराला येत नाही.

    -oOo-

    ‘हार्ट लँप’ सिलेक्टेट स्टोरीज : बानू मुश्ताक
    कन्नडमधून इंग्रजी अनुवाद: दीपा भास्ती. पेंग्विन बुक्स


    RekhaD

    रेखा देशपांडे या ज्येष्ठ पत्रकार, लेखिका, अनुवादिका आणि चित्रपट अभ्यासक आहेत.
    ईमेल: deshrekha@yahoo.com.